मी धामापूर तलाव बोलतोय ....

Submitted by डी मृणालिनी on 20 February, 2019 - 04:31

प्रबुद्ध जनहो ,
ही जाहिरात नाही अथवा कोणताही प्रचार नाही . हा मी तुमच्याशी केलेला संवाद आहे. हा तुमच्याशी -माझ्या भावंडांशी , हो तुम्हीच ! मी तुम्हाला घातलेली एक अंतर्साद आहे. मी कोण ओळखलंत ?? सभोवताली घनदाट जंगल , डोंगर ,जैवविविधतेने नटलेला आणि समोर पवित्र भगवती देवीचे मंदिर लाभलेला मी धामापूर तलाव बोलतोय . १२५ एकर क्षेत्रफळ व्यापून ,बारमाही तुडुंब पाण्याने भरून असलेला मी धामापूचा तलाव . काळसे -धामापूरवासियांचा जीव कि प्राण. मी माझ्या अद्भुत सौंदर्याने मनुष्यालाच नव्हे तर पशुपक्ष्यानाही मोहित करतो. नुसते मोहीतच नाही, तर मी या सजीवांना माझ्या कुशीत आसाराही देतो. माझे शांत स्वरूप सर्वांच्या मनाला प्रसन्नतेची झुळूक देऊन जाते . निरनिराळे पशु पक्षी ,झाडे ,वनस्पती यांचा सहवास मला लाभल्याने मी निसर्गसंपत्तीचा समृद्ध खजिनचाच आहे. डार्टर ,लेसर विसलिंग डक्स ,ब्रॉन्झ विंग जकाना ,हॉर्नबिल सारखे पक्षी माझे सोबती आहेत . माझ्यासोबत काही महिने वास्तव्य करायला परदेशातूनही काही पक्षी आपल्या लवाजम्यासह येतात. आश्विन आणि कार्तिक या मासांत मला भेट द्यायला युरोपवरून युरेशियन मार्श हिरियार हा पक्षी येतो. मिमिसिलोन रंदेरियाना ,नॉथोपेजिया कास्टनेफोलिया ,क्लॉटलरिया फिलिपस बेंथ यासारख्या नामशेष होणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती माझ्या किनाऱ्यावर आढळून येतात . ब्लु मॉर्मन ,तामिळ लेसविंग,क्लिपर यासारखी फुलपाखरे माझ्या किनाऱ्यावर आनंदाने बागडतात. अलीकडे धोक्यात असणाऱ्या पाणमांजरींच्या प्रजाती माझ्या कुशीत वास्तव्य करतात . माझे पाणी तीर्थासारखे पवित्र मानतात. यासारखी अद्भुत निसर्ग संपत्ती जन्मतःच लाभल्याने मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो.
माझा जन्म १५३० साली झाला. मी एक शिवकालीनपूर्व तलाव आहे. जगविख्यात कीर्तिवंत अशा ताजमहलहून मी ८० वर्षांनी मोठा आहे.
गावातील लोकांच्या अथक परिश्रमाने मी साकारला गेलो. माझ्या या मनमुग्ध करणाऱ्या सौंदर्याचे श्रेय त्याच श्रमिकांना जाते ,ज्यांनी आपल्या कष्टाने मला उभारले. डोळ्यांना दिपवून टाकणारे माझे हे सौंदर्य आज त्यांच्या श्रमाचे व बुद्धीमत्तेचे प्रतीक आहे. माझी रचना भौगोलिक दृष्टीने अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे. गाव समाज खाली व माझे स्थान वरती आहे . जेणेकरून माझे पाणी गावकऱ्यांना कोणतेही विद्युत उपकरणे न लागता अगदी सहजपणे पोचू शकेल. माझे स्वच्छ आणि निर्मळ पाणी कालव्यांद्वारे अनेक गावांस पुरविले जाते. पाण्यासारखी बहुमोल गोष्ट मी देत असल्याने या गावांत मी महत्वाची भूमिका बजावतो . माझ्यावर अनेक दंतकथा लिहिल्या गेल्या. एका दंतकथेनुसार मी पूर्वी लग्न अथवा शुभ कार्यांसाठी परडीभर फुलांच्या बदल्यात सोने देत होतो. या दंतकथेचा उल्लेख गॅझेटियर बॉंबे प्रेसिडेन्सी खंड-१० मध्ये आहे. मी स्वतःला अतिशय सुखी आणि भाग्यवान तलाव समजतो.
ज्या लोकांनी मला घडवण्यासाठी घाम गाळला,निसर्गाने मला हे अद्भुत सौंदर्य देऊन अलंकारीत केले ,या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. मी तुम्हाला देत असलेला हा अनमोल ठेवा काळाच्या ओघात लुप्त होऊ देऊ नका . माझी काळजी घ्या . माझे रक्षण करा आणि आपल्याला भरभरून देत असलेल्या या निसर्गाचा मान ठेवा ..
तुमचा धामापूर तलाव . Picture1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. बाकी माहिती नविन आहे माझ्यासठी.
एकदा गावाला गेलेलो , २ वर्शापूर्वी तेन्व्हा बाबानी खास धामापूरच देउळ आणि तलाव पहायला नेलं होत.
देवळाच्या मागे उभे राहून बघितलेला तलाव फार सुन्दर दिसत होता .

@ मृणालिनी.
छान लेख आणि माहिती...
धामापूर तलाव, देऊळ आणि परिसराचे काही फोटो आहेत.
इथे दिले तर चालेल का...?

छानच! आहे मनोहर तरी मध्ये वाचलं आहे या तलावाबद्दल. एवढा मोठा आहे हे मात्र माहिती नव्हते. सुंदर फोटो आहे.

धामापूर माझं आजोळ . लहानपणापासूनच्या या तळ्याच्या कांठावरच्या अगणित रम्य संध्याकाळ आठवल्या !

अतीशय सुंदर !! धन्यवाद मृणालिनी. छान परीचय करुन दिलास धामापूर तलावाचा. खरे तर कोकणी लोकांनी व सरकारनेच हे सौंदर्य अबाधीत राखले पाहीजे. पर्यटक तर मेन मुद्द्यावर आहेत. कडक शिस्त ठेवली व स्वच्छता पाळली तर देवाचे हे देणे वर्षानूवर्षे टवटवीत राहील.

निरु तुमचे फोटो पण मस्त. काय देखणा आहे सभामंडप ! अशा ठिकाणी निरव शांततेत मन किती प्रसन्न होत असेल ना !

बाजूच्या पायवाटेने थोडं पुढे गेल्यावर दिसणारी लाकडी प्रेक्षागॅलरी, धामापूर तलाव, स्वतःच प्रतिबिंब पहायला पुढे झेपावलेलं एक एकटंच नारळाच झाडं, डोंगर आणि त्याचही प्रतिबिंब...

IMG-20190221-WA0003.jpg

Asha jaganchi olakh karun deu naka.
Tithe botee, tourist, plastic cha kachara choupati vhayala vel laganar nahi. Sad

* Tithe botee, tourist, plastic cha kachara choupati vhayala vel laganar nahi* - वेळ नाहींच लागला. हें सुरूं झालंच आहे. तरीही, तळयाच्या मूळ सौंदर्याला अजून तरी विशेष बाधा झालेली नाहीं, हें नशीब !!

छान लिहिलं आहेस Happy

सुनीता देशपांडेंच्या 'आहे मनोहर तरी' मध्ये या तलावाचा उल्लेख वाचला न् धावत इथे आले Happy
त्या परडीभर दागिन्यांच्या दंतकथेचाही उल्लेख आहे तिकडे Happy

अतिशय छान वर्णन,

तुमच्या वर्णना प्रमाणेच मस्त आहे तलाव. या डिसेंबरला गेलेलो. तिथे एका निमुळत्या भागात जिथे तलावाचे पाणी घुसले आहे, तिथे हॉर्नबिल ची अनेक घरटी होती.

छान महिती .
फोटोंसाठी धन्यवाद निरु , नितांतसुंदर जागा दिसतेय.

मी या धामापूर तलावावर २०१० साली सहकुटुंब गेलो होतो.एक रात्र धामापूरमधे मुक्काम पण केला होता. रात्री बराच वेळ तलावाच्या पायऱ्यांच्यावर बसून गप्पा मारल्या होत्या सकाळी नावेत बसून तलावात फिरून आलो होतो. अतिशय आनंददायी आणि अविस्मरणीय असा अनुभव होता. निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य लाभलेला हा परिसर आहे. आपल्या या लेखाने माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद !!