आयुष्याची ससेहोलपट बघवत नाही आता

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 February, 2019 - 21:31

*वृत्त - लवंगलता*

तुझ्याविना करणार काय हे उमगत नाही आता
आयुष्याची ससेहोलपट बघवत नाही आता

सळ-सळण्याने पानांच्या आभास तुझा का होतो ?
धुक्यातला किरणांचा वावर साक्ष तुझी का देतो ?
ह्या प्रश्नांना जमेससुद्धा धरवत नाही आता
आयुष्याची ससेहोलपट बघवत नाही आता

विरघळताना मिठीत आपण पहाट झाली होती
गालांवर अन नभांवरी सम-समान लाली होती
समीप असुनी दोघांना हे खुणवत नाही आता आयुष्याची ससेहोलपट बघवत नाही आता

दिशा बदलत्या वाऱ्याचा मी हात घेतला हाती
पुढे पुढे तो धावे मागे हुळहुळणाऱ्या पाती
मागे वळणे घटकाभर का जमवत नाही आता ?
आयुष्याची ससेहोलपट बघवत नाही आता

सोडुन जाताना कायमचे का थांबवले होते ?
मरण आजचे उद्यावरी तू का लांबवले होते ?
तुझ्याविना जगण्याला जगणे म्हणवत नाही आता
आयुष्याची ससेहोलपट बघवत नाही आता

तुझ्याविना करणार काय हे उमगत नाही आता
आयुष्याची ससेहोलपट बघवत नाही आता

सुप्रिया

Group content visibility: 
Use group defaults

पण कधीतरी कोण जो जिवलग आहे तो आता ह्या जगात नाही व आपल्याला अजून मस्त जगायचे आहे तर त्याबरोबर घालवलेले क्षण सुरक्षित मनात जपून ठेवून पुढे का जाता येत नसावे ह्या कवितांमधील प्रेयसीला? मूव्ह ऑन टाइप्स. तो वारला तरी आपण जिवंत आहोत ना. ससे होलपट वगैरे काही करून घ्यायची गरज नाही खरेतर. जीवनातला खरा आनंद शोधला पाहिजे. विलापिका सीरीज छान आहे पण इतके सारखे उदास जगणे खरेच अवघड आहे.

अमा फार महत्वपुर्ण प्रतिसाद !

<<<<तो वारला तरी आपण जिवंत आहोत ना>>>>>

हे वाक्य सोडून आपले सगळे म्हणणे पटते आहे पण कविता उलगडण्यात थोडीशी गल्लत होते आहे का ? ज रा शी परत वाचलीत तर कदाचित उलगडू शकेल किंवा माझेच अपयश असावे की ती पोहचू शकली नाही.

प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद !

मंडळी लोभ राहो !