माझं प्रौढशिक्षण !

Submitted by Charudutt Ramti... on 15 February, 2019 - 11:02

आम्ही शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना असतांना, दिसायला देखणे राजबिंडे, तरुण असे राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. राजीव गांधींनी देशाचा राज्य कारभार सांभाळत असताना दोन गोष्टींवर विशेष भर दिला होता. एक म्हणजे भारतात इलेकट्रॉनिक क्रांती घडवून आणण्यावर. आणि दुसरा म्हणजे प्रौढ शिक्षणावर. दोन्हीही धोरणे अगदी मूलभूत. मी 'यांत्रिकी' म्हणजेच मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा विद्यार्थी असल्यामुळं असेल कदाचित, राजीव गांधींची इलेट्रॉनिक्स क्षेत्राविषयीची धोरणे मला पुढे जाऊन कधी फारशी कधीच पटली नाहीत. त्यांच्या प्रौढ शिक्षण धोरणांविषयी माझं काही फारसं विशिष्ट असं चांगलं किंवा वाईटही असं काही मत नव्हतं. असायचं कारणही नाही. त्याकाळी दूरदर्शन वर प्रौढ शिक्षणाविषयीची सामाजिक जाणीव वाढवणाऱ्या ज्या शासकीय जाहिराती असायच्या, त्या जाहिराती पाहण्यात मात्र आमची खूपच करमणूक व्हायची. संबंध चेहऱ्यावरून, अगदी माथ्या पासून ते मानेपर्यंत येणारा स्वतःचा घुंगट सांभाळणारी उत्तरप्रदेश ( अमेठी ? ) अथवा बिहारच्या कोणत्यातरी खेड्यातली मोलमजुरी करणारी ती कष्टकरी बाई, किंवा मग तंबाखू अथवा बिडीकाडीत सर्वस्व शोधणारा एखादा शेतमजूर, त्या जाहिरातीत रोजंदारी चे पैसे मिळवण्यासाठी साठी आधी रजिस्टर वर अंगठा उमटवत होता आणि आता त्याला रात्रीच्या शाळेत जाऊन अंकलिपी गिरवल्यामुळं स्वतः ची स्वतः "महिपाल" अशी सही त्या मस्टर वर करता येते अश्या स्वरूपाची जाहिरात असायची, थोडीशी सरकारी प्रचारकी थाटाची. आम्ही त्या जाहिराती लागल्या की थोडं कुत्सित थोडं चेष्टेनं असं संमिश्र पणे हसायचो मात्र. पण ते प्रौढ शिक्षण किती पराकोटीचं अवघड असू शकतं ह्याची मला सुतरामही शंका असती त्यावेळी तर मी त्या सरकारी जाहिरातीतली महिपाल किंवा भंवरी देवी वगैरें तत्सम रिअल लाईफ मॉडेल्स ना कधीच हसलो नसतो. दिवसभर रोजंदारी करून मोलमजुरी करून बिचारे रात्री प्रौढ शिक्षणाच्या वर्गात बसून सही एवढे का होईना पण शिकायला आले होते ना...! पण मला ह्या महिपाल किंवा भंवरी देवी ला त्या वेळी हसल्याची उपरती आता एवढ्या उशिरा पंचवीसेक वर्षांनंतर होण्यामागं तसंच एक ठोस कारण आहे. झालं असं की दोनहजार पंधराचा डिसेंबर महिना असावा किंवा दोनहजार सोळा चा जानेवारी महिना. म्हणजे साधारण अडीच ते तीन वर्षांपूर्वीची ही गोष्ट...

" किससे मीलना है ? "

उंचच उंच गजांनी आणि ऐतिहासिक लढयात आणि युद्धात वापरत तश्या भाल्यासारख्या अणुकुचीदार पाती लावून सजवलेल्या भरभक्कम गेट वरच्या हिरवट खाकी पोशाख परिधान केलेल्या सिक्युरिटी गार्डानं मला अडवलं.

" इन्स्टिटयूट के डेप्युटी डायरेक्टर साब से मिलना है । " – मी कोणत्याही सिक्युरिटी गार्ड्स शी बोलताना माझा इगो फार आडवा येऊ देत नाही. कारण एकतर ते त्यांचं काम इमाने इतबारे करत असतात. दुसरं आपल्या कामात मोडता घालण्याची सहज क्षमता ह्या लोकांमध्ये असते. त्यामुळं मी शक्य तेवढ्या नम्र आवाजात बोललो.

रजिस्टर मध्ये नाव पत्ता सह्या वगैरे घाणेरड्या अक्षरात खरडून मी ते ‘भाले' खोचलेलं गेट पार करून भव्य इमारतीच्या आत गेलो. वास्तू अप्रतिम बांधलेली होती. अडीच तीन फूट व्यासाचे उंचच उंच पण भव्यता उरी बाळगणारे पिलर्स त्या तीन मजली देखण्या इमारतीस आधार देत होते. वर मान करून पाहिलं तर लॉबी मध्ये उंच छता पर्यंत जाणारे कुणाकुणाचे पोर्ट्रेट्स लावलेले होते. एक जरा ओळखीचं वाटलं पोर्ट्रेट, म्हणून जवळ जाऊन खाली पितळी अक्षरांमध्ये लिहिलेलं नावं वाचलं सहज तर 'पद्मश्री मुजुमदार' असं लिहिलेलं होतं. मनात किंचित उमटलेलं दडपण चेहऱ्यावर अजिबात न दाखवता पलीकडे उभ्या असणाऱ्या एका उंच गोऱ्यापान रुबाबदार अश्या तरुणाला सराईत इंग्रजीत " could you please help me with the Deputy Director’s office ? " असं विचारलं. तो तरुण तिच्या तितक्याच उंच आणि रुबाबदार दिसणाऱ्या देखण्या अश्या मैत्रिणी बरोबर कसली तरी चर्चा करत होता. त्यानं मैत्रिणीबरोबर चर्चेत व्यत्यय आल्यामुळे असेल पण त्रोटक पणे " धिस वे प्लिज " असं म्हणून दिशा दाखवली.

डेप्युटी डायरेक्टर सरांच्या केबिन बाहेर उभारलो. उजव्या हाताची चार बोटं तळहाताकडे मुठी सारखी वळवून स्वच्छ चकचकीत लाकडी फ्रेंच पोलिश केलेल्या केबिनच्या दरवाज्यावर, चित्रपटात नॉक करतात तसं नॉक केलं. दरवाज्यावर प्रोफेसर प्रवीण कुमार , डेप्युटी डायरेक्टर , सिम्बायोसिस इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अशी तांब्याच्या पत्र्यावर अक्षरं कोरलेली नावाची आणि हुद्द्याची पाटी होती. " कssम इsन " असं म्हणत सरांनी आत बोलावल्यावर आत गेलो. सरांनी ओळख वगैरे विचारली, मी सोबत आणलेल्या documents वर नजर फिरवली आणि " आय सी नो इशूज हिअर. आय थिंक यू शूड बी इलिजिबल फॉर एक्सिक्युटीव्ह एम. बी. ए. ऍडमिशन इन अवर इन्स्टिटयूट , लुकिंग ऍट युअर इंडस्ट्री एक्सपीरियन्स."

ते डॉ. प्रवीण सरांचे शब्द ऐकले आणि माझा जीव भांड्यात पडला. आणि त्या दिवसापासून मग माझंही ते दूरदर्शन च्या जाहिरातीत पाहिलेलं अडाणी महिपाल सारखं प्रौढ शिक्षण सुरु झालं. कारण मी ह्या एक्सिक्युटीव्ह एम. बी. ए. ला जानेवारी २०१६ ला ऍडमिशन घेतली तेंव्हा माझं वय चांगलं अडतीस ओलांडून एकोणचाळीसावं नुकतंच सुरु झालं होतं. तब्बल सोळा सतरा वर्षं नोकरी झाली होती. दोन एततदेशीय आणि दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अनुभव पदरी होता. पण अलीकडे अलीकडे, मुळात पेशाने आणि लौकीकार्थाच्या शिक्षणाने अभियंता जरी असलो तरी आता 'पदवीधर' म्हणून जगण्याचा कंटाळा आला होता, आणि पदव्युत्तर शिक्षणाचं अपूर्ण राहिलेलं असं एक बरंच जुनं स्वप्न आता पूर्ण करावं असं स्वतःलाच मनानं कुठंतरी धजावयाला सुरुवात केली होती.

आता तर सिम्बायोसिस च्या प्रवीण सरांनी "यस तुम्हाला ऍडमिशन मिळू शकेल" अशी शाश्वतीही दिली. तेंव्हा आता भराभर पैसे उभे करायचे होते. कारण इथोवर माझी नोकरी खूप वर्षं झाली असली आणि सेविंग सुद्धा बऱ्यापैकी केलं असलं तरी मासिक उत्पन्नातले बरेच पैसे घरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यात जात, आणि माझी लेक ही तिची बालवाडी संपवून नुकतीच आता मोठ्या शाळेत जाऊ लागल्यामुळं शालेय शिक्षण शुल्का करिता सुध्दा बरेच पैसे वर्षाकाठी लागायला नुकतीच सुरुवात झाली होती. त्या दिवशी रात्रीचं जेवण आटोपून रात्री मी आणि माझी बायको दोघं जुनी सगळी फाईल मधली फिक्स डिपॉसजिट्स आणि पोष्टाची सर्टिफिकीटं अंथरुणात पसरून बसलो, आम्ही ही असली सगळी कामं लेक झोपली की करतो. कारण ती धड पणे काहीच करू देत नसे, तीन वर्षांपुरी, आता मोठी झाली जरा तसं समजायला लागलंय तिला, पण तेव्हां बरीच लहान होती.

पंधरा वीस मिनिटं त्याच त्याच नॅशनलाइज्ड बँकांच्या एफ. ड्या. आणि पोस्टाची सर्टीफिकेटं धुंडाळून झाल्यावर मला आणि बायकोला एक गोष्ट समजली. की माझ्या एम. बी. ए. च्या फी ला पुरून उरणारे पैसे आपल्या कडे आहेत पण ते सगळे अडकलेले आहेत. कारण इनकम टॅक्स वाचावा म्हणून गुंतवलेल्या स्कीम्स मधून पैसे निघू शकत नव्हते आणि इतर स्कीम्स मधून पैसे काढले तर व्याजाचं नुकसान होत होतं.

आमचा त्या रात्री घडलेला एकंदर संवाद असा...

" एक काम करतो , हे बँक ऑफ बडोदा चे मॅच्यूअर होताहेत पुढल्या महिन्यात त्यानं माझ्या "फी" ची फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरतो. " - माझ्यातला एक उत्सुक विद्यार्थी.

"अरे! परवा तर म्हणालास नं , की ते सर्टिफिकेट मॅच्युअर झाल्यावर कार चं लोन क्लिअर करतो , खूप इंटरेस्ट वाया जातोय म्हणून ? " - हिच्यातली गृहिणी.

" आयला हो , मग एक काम करतो ना, मार्च मध्ये इन्सेन्टिव्ह येणार आहे ऑफिस चा, त्यानं कार लोन रिपे करतो, आत्ता फी भरतो, नाही तर मिळालेली ऍडमिशन जाईल हातची " - माझ्यातला अंगठेबहादूर महिपाल.

" बsरं, इन्सेन्टिव्हनं कारचा हप्ता भरणार! आणि मग आर्याची शाळेची फी कशातून भरणार? " - माझ्या बायकोत लपलेली, माझ्या लेकीच्या भविष्याविषयीची चिंता करणारी आमच्या चिमुकल्या लेकी ची आई.

" ये लो मेरी चुडीयाँ, में मेरे मायकेसे लायी थी , मेरी माँ ने मुझे बिदाईके के दिन दी थी यह चुडीयाँ, वोह किस दिन काम आयेंगी, उन्हे साहुकार के पास गिरवी रख लेना और मिले पैसो से भर देना अपनी फ़ीस। "

" अरी पगली नsहीss रेss ! वोह चुडीयाँ तुम्हारे माँ की ममता का प्रतीssक है । रहेने ने दो, मैं मेरी फीस अपनी साइकिल बेच के भर लुंगा , और कल से दफतर मैं पैदल जाया करुंगा "
असा फिल्मी संवाद होणं मला अपेक्षित होतं पण तो काही शेवट पर्यंत झालाच नाही. आमच्या त्या रात्रीच्या त्या आर्थिक प्रश्नाला इकॉनॉमिक्स किंवा फायनान्शियल मॅनेजमेंटच्या भाषेत 'problem of plenty coupled with liquidity crisis’ असं म्हणतात हे मला पुढे माझ्या एम. बी. ए. च्या चवथ्या सेमिस्टर ला समजलं. पण त्याला अजून बराच अवकाश होता.

परंतु असा एकंदर कोणत्याही विशिष्ट दिशेस न जाणारा अठरा वीस मिनिटांचा आमचा संवाद संपल्यावर आणि संवादानंतरची ती त्या रात्रीत पाचेक मिनिटांची भयाण शांतता निर्वात पोकळीत पसरल्यावर हिनं,

" एक काम कर, तू आत्ता भर तुझ्या फी चे पैसे, पुढचं बघू पुढ " असा धाडशी ऐतिहासिक निर्णय आमच्या सौभाग्यवतीने घेतला आणि आमची तब्बल सोळा वर्षांच्या मोठ्या कालावधी नंतर पुन्हा एकदा माझी विद्यार्थी"दशा" सुरु झाली.

शनिवार, दिनांक ९ जुलै २०१६ ला कॉलेज चा पहिला दिवस. 'न कर्त्याचा वार' जरी शनिवार असला आणि 'आमचे घरी' कोणतेच शुभकार्य शनिवारी न सुरु करण्याचा प्रघात जरी असला तरी मला ह्या ९ जुलै चा शनिवार टाळण्यासारखा कोणताही उपाय हाती नव्हता. कारण आमच्या ह्या लंब्या चौड्या अडीच वर्षांच्या कोर्स चं वेळापत्रकच मुळात असं होतं की दर शनिवार रविवार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असं 'पूर्ण वेळ' कॉलेज आणि सोमवार ते शुक्रवार, सकाळी नऊ ते रात्री घरी पोचेस्तोपर्यंत पूर्णवेळ नोकरी. त्यामुळं माझ्या ह्या पद्युत्तर शिक्षणाची सुरवातच मुळात शनिवारी झाली. पण शनी पेक्षा आज, मारुती चा वार आहे असं मानून, शनिवारच्या ड्युटीचा चार्ज मारुतीकडे आणि मंगळवारच्या ड्युटीचा चार्ज पुढील अडीच वर्षं तात्पुरता गणपती कडे आहे अशी श्रद्धा ठेवत, मी सकाळी लवकर उठून आवराआवर केली. 'दप्तरात' नक्की काय घ्यायचं आणि काय नाही हेच माहित नसल्यामुळं एक नोट बुक आणि एक बॉल पेन टी शर्टाच्या खिशाला लावून आमचा चारचाकी रथ शनिवारच्या ट्राफिक मधून मधून बाहेर काढत काढत आम्ही पुण्यातली आधुनिक नालंदा म्हणजे सिम्बायोसिस गाठली. मला वर्गात पोचायला पाच दहा मिनिटं उशीर झाला होता. वर्ग आधीच सुरु झाला होता. पाहिलंच लेक्चर essentials of marketing management चं. मी जरा लांबून येत असल्या मूळ उशीर झाला तर झाला असं म्हणत लेक्चर ला बसलो. पाहिलंच लेक्चर ' बंक' करण्यापेक्षा ' लेट कमर' होणं बरं असं मी मनात बोललो स्वतःशीच. माझ्या कडे सरांनी अगदी विचारलंच तर कारण होतं. लांबून आलोय आणि ट्रॅफिक लागलं वाटेत येताना. वर्गात गेलो आणि बेंच पकडला. सरांनी फारसं लक्ष दिलं नाही. डॉ. कोमल चोप्रा एक एक करून उपस्थित विद्यार्थ्यांची ओळख करून घेत होते. मी ऍडमिशन घेतली तेंव्हा उगाचंच स्वतःला जरा वयानं मोठा समजत होतो. सोळा वर्षाचा अनुभव असल्या मुळं. थोडं मानसिक अवघडलेपण (कॉम्प्लेक्स) सुद्धा होतं. पण वर्गात बाकीचे विद्यार्थी स्वतः ची ओळख सांगत होते ती लक्ष पूर्वक ऐकताना समजलं की वर्गात वीस , पंचवीस आणि अगदी तीस बत्तीस वर्षांचा (महा)अनुभव गाठीशी असलेले सुद्धा विद्यार्थी ह्या प्रौढ शिक्षणासाठी आले होते. मला उगाचंच जरा हायसं वाटलं.

कोण, कोण, कोणकोणत्या कंपन्यांमधून आलंय? आणि कोण नक्की कुठं जॉब करत आहे? हे सांगत असताना, एक मुलगी स्वतःची ओळख करून देत "आय एम फ्रॉम मुंबई" असं म्हणाली. आणि लंच ब्रेक मध्ये ओळख झाली तेंव्हा ही ‘छवी नाम्बियार’ एम.बी. ए. करण्यासाठी दर शनिवार रविवार मुंबईहुन चक्क पुढचे दोन अडीच वर्षं पुण्याला येणार असल्याचं तिच्या कडून समजलं. मी स्वतः वर जाम खजील झालो. माझं घर ते इन्स्टिटयूट हे अवघं चौदा किलोमीटर च्या अंतरावर. आणि पहिल्याच्च लेक्चर ला दहा मिनिटं उशिरा येण्यावर मी काहीतरी सबब शोधत होतो. आणि इकडे ही छवी नाम्बियार सोमवार ते शुक्रवार एका ऑप्टिकल लेन्स बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करून, शनिवारी सकाळची मुंबई पुणे ट्रेन पकडून वेळेच्या आधी दहा मिनिटं वर्गात येऊन बसली होती. एवढं कमी पडलं की काय की काय म्हणून 'पूर्वा कृष्णपल्ली' नावाची एक मुलगी ओळख करून देताना मी हायदराबाद वरून येऊन जाऊन हा कोर्से पूर्ण करणार आहे असं म्हणाली. हे ऐकल्यानंतर मात्र मी आता पार वेडा व्हायचा बाकी राहिलो होतो. माझ्या चौदा किलोमीटर ची आता मला चांगलीच लाज वाटू लागली. मुंबई हुन येणारा आणखी एक विद्यार्थी भेटला "राजन पोरवाल" नावाचा. एका मोठ्या केमिकल कंपनीत चांगल्या पदावर कामाला होता. पुढे ह्या राजन पोरवाल ची मुंबई हुन बदली झाली ते डायरेक्ट "हो ची मिन" सिटी मध्ये, म्हणजे व्हिएतनाम च्या राजधानीत, पण तरीही हा राजन पोरवाल दर शनिवार रविवारी नाही पण अल्टर्नेट वीकएंड ला कॉलेज ला यायचा अगदी कोर्से पूर्ण होईस्तोपर्यंत. माझ्या अडीच वर्षांच्या अत्यंत खडतर अश्या ह्या कोर्स च्या काळात जेंव्हा जेंव्हा पदरी नैराश्य आणि किंचित अपयश आलं की मी लांब लांब हून कॉलेज ला येणाऱ्या ह्या वर्ग मित्रांकडे पाहून माझी वाट शोधात असे. खरं म्हणजे मी ज्यांना मुलं किंवा मुली असं इथं संबोधत आहे, किंवा वर्ग मित्र वगरे म्हणत आहेत, त्या सगळ्यांची लग्न होऊन त्यांची मुलं बाळं वगैरे व्यवस्थित शिकत आहेत अश्या स्टेज ला येऊन मग हे सगळे इथं शिकायला आलेले आहेत. त्यामुळं ती मुलं मुलीं अजिबात नाहीत, खरं तर स्त्री पुरुष, प्रौढ आहेत अगदी. पुढे एका स्टॅटिस्टिक्सच्या क्लास मध्ये आम्ही आमच्या क्लासचं सरासरी वय (अरीथमॅटिक मीन) किंवा साध्या भाषेत ऍव्हरेज एज, काढलं तर ते चांगलं एकोणचाळीस भरलं.

कॉलेज चा पहिला महिना अगदी हौसे ने पार पडला! आणि दुसऱ्या महिन्या पासून 'असाइन्मेंट्स' नावाचा एक महाभयाण प्रकार सुरु झाला. ह्या कोर्सचं साधारण स्ट्रक्चर असं होतं. दर सहामहिन्यांचे असे मिळून एकूण चार सेमिस्टर्स. म्हणजे ही दोन वर्षं. पाचवी सेमिस्टर डीझरटेशन. पहिल्या चार पैकी प्रत्येक सेमिस्टर ला एकूण नऊ किंवा दहा विषय. त्यातले पाच एक्सटर्नल आणि उरलेले चार किंवा पाच इंटर्नल. एक्सटर्नल विषयांना युनिव्हर्सिटीच्या रीतसर टर्म एन्ड परीक्षा. इंटर्नल विषयांना मात्र टर्म वर्क, आणि पण ते टर्मवर्क मात्र अत्यंत मरणाचं. उरकता उरकायचं नाही. आणि ह्या व्यतिरिक्त एक्सटर्नल विषयांना सुद्धा टर्म वर्क असे ते निराळंच. एवढं कमी की काय म्हणून तिसऱ्या सेमिस्टरला ला एक प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण करायचा होता. आणि हे सगळं करताना मुळात क्लाएंट आणि बॉस वगरे लोकांना सांभाळत नोकरी टिकवायची होती. ह्या सगळ्या एक्सटेर्नल आणि इंटर्नल, टर्म वर्क आणि प्रोजेक्ट तसेच डीझरटेशन चे क्रेडिट पॉईंट्स मिळणार होते. क्रेडिट पॉईंट्स चा हिशेब करून एक क्युमुलेटिव्ह ग्रेड पॉईंट्स ऍव्हरेज (सी. जी. पी. ए.) काढला जाणार होता आणि त्या सी. जी. पी. ए. (हा सी.जी.पी.ए. कसा काय कॅलक्यूलेट करतात हे आजता गायत मला एक न उमगलेलं कोडं) वरून फायनल डिग्री मिळणार होती पोस्ट ग्रॅजुएटची , मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट अशी. एकंदर आपण ह्या कोर्से ला ऍडमिशन घेऊन मोठी चूक केली आहे हे समजायला पहिली सेमिस्टर निम्मी जावी लागली. कारण, जसा जसा असाइन्मेंट चा आणि टर्म वर्क लोड वाढत गेला आणि ऑफिस मधल्या उचापती आणि प्रोजेक्ट्स च्या करामती सांभाळता सांभाळता तारांबळ उडत गेली तसं तसं हे एक्सिक्युटिव्ह एम बी ए प्रकरण फक्त दुरून डोंगर साजरेच होते की काय, असं वाटायला लागलं.

एका बाजूला अभ्यासाचं आणि सबमिशन चं प्रेशर वाढंत होतं पण दुसऱ्या बाजूला बरेच वर्षांच्या गॅप नंतर परत एकदा अभ्यासाचं पुस्तक उघडण्याचा, रात्री किंवा पहाटे जागरणं करत आणि पेंगत पेंगत नोट्स काढण्याचा आणि लायब्ररीत बसून अभ्यास करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत होता. कारण ह्या कोर्से चे विषय फारच निवडक होते. आतापर्यंत शिक्षणा मध्ये अप्लाइड मेकॅनिक्स किंवा थिअरी ऑफ मशीन्स, असे रुक्ष आणि फिजिक्स च्या पूर्वापार चालत आलेल्या न्यूटन, आईन्स्टाईन वगैरे किंवा अगदी अलीकडच्या काळातील बर्नोलीज वा रेनॉल्ड इत्यादी शास्त्रज्ञांनी घालून दिलेल्या चाकोरीबद्द थेअरम्स नुसार चालणाऱ्या अभियांत्रिकी शिक्षणातील विषयांपेक्षा, ह्या व्यवस्थापन क्षेत्रातील विषय आम्हाला नवीनच समजणारे! 'ऑर्गनायझेशनल बिहेवियर' किंवा ‘मॅनेजरियल इकॉनॉमिक्स’ हे असे विषय क्लिष्ट जरी असले तरी खूपच 'इंटरेस्टिंग' आणि ' कॅची' होते. व्यवस्थापन क्षेत्रातील आणि सोशल सायन्स ह्या अकॅडेमिक्स ब्रँच मधील बरेचसे विषय हे ‘Inexact sciences’ ह्या प्रकारात मोडतात. त्यामुळं इथे वैयक्तिक विचारसरणी आणि स्वानुभव सिद्ध मतांचा खूप आदर केला जातो. शास्त्र आणि गणित ह्या विषयांमध्ये 'नेमकेपणाला' जितके महत्व आहे तितकेच कमी किंवा (खरंतर शून्य) महत्व वैयक्तित मत प्रदर्शनाला तिथे आहे. पण मॅनजेमेंट थेअरिज मात्र बरोबर ह्या उलट असतात. There is no right answer and there is no wrong answer. All we look for is your approach to the problem ! असं अगदी नवीन व्यवधान प्रथमच आम्हाला ह्या कोर्स मध्ये मिळालं. त्याला कारणही तसंच होतं. ह्या कोर्से मध्ये फॅकल्टीजच असे एक से एक होते की नव्वद मिनिटांच्या एका लेक्चर मधली पहिली पाच मिनिटं जरी चुकली तरी काही तरी पदरचं हरवल्याची चुटपुट लागून राहायची.

अगदी उल्लेखच करायचा झाला तर , ह्या कोर्से मध्ये साने सरांच्या सारखे मार्केटिंग आणि ब्रँड मॅनेजमेंट विषयात अक्षरश: सिद्धी प्राप्त असल्यासारखे असलेलं शिक्षक आम्हाला मिळाले. सी. आर. एम. शिकवणारे सोमण सर तर अगाध वाचन समृद्धी पाठीशी घेऊन आलेले गुरुवर्य. त्यांचं इंग्लंड मधल्या ऑक्सफर्ड गावाच्या च्या अगदी जवळून जाणारं इंग्लिश ऐकून वर्गात एखाद्याला त्यांच्या बरोबर इंग्लिश मध्ये बोलायचीसुद्धा लाज वाटावी एवढं अस्खलित आणि सौंदर्यपूर्ण असं भाषेवरचं प्रभुत्व ह्या सोमण सरांचं. गम्मत म्हणजे ह्या सोमण सरांच्या सुविद्य आणि उच्च शिक्षित पत्नी आम्हाला सायकॉलॉजी च्या निगडित विषय शिकवायला होत्या. लेर्निन्ग अँड डेवलपमेण्ट, किंवा डायव्हर्सिटी, हे तसे नाही म्हंटल तरी थोडे थोडेसे कंटाळवाणे आणि क्लिष्ट विषय. पण सोमण मॅडमची सायकॉलॉजी ह्या विषयातली मास्टरी वाखाणण्यासारखी होती. अगदी जोहरीज विंडो पासून ते पावलाव्ह च्या क्लासिकल कंडिशनिंग थिअरी पर्यंत मानसशास्त्राचा एक एक पैलूनपैलू त्यांनी उलगडून दाखवला.

एकीकडे हे असे आम्हाला नवीन असणारे आणि हवेहवेसे वाटणारे विषय अभ्यासाला असले तरी दुसरीकडे फायनान्शियल मानजेमेंट, इंटरनॅशनल फायनान्स, मॅनेजरिअल अकाउंटिंग, सिक्युरिटीज, कॅपिटल मार्केट वगैरे आम्ही तहहयात द्वेष केलेलं विषयसुद्धा आवडो न आवडो शिकावे लागले. आणि हे इतके किचकट विषय आम्ही पास झालो ते केवळ आणि केवळ " प्रसाद काळभांडे " नावाचे एक अत्यंक तीव्र बुद्धिमत्ता लाभलेले गुरु आम्हाला भेटल्यामुळे. त्या सरांनी तर शेयर मार्केट मधले हर्षद मेहता ते चैन रूप भन्साळी ते अगदी अलीकडच्या काळातील सत्यम घोटाळे वगैरे सगळे कसे रोजचा इकॉनॉमिक टाइम्स काढून वाचल्या सारखे अगदी आकडेवारीनिशी मुखोद्गद विवेचन करून सांगितले. शेयर बाजारात आजिबात गती नसणाऱ्यांनी ह्यां व्यक्तीच्या पायावर किंचित पाणी घालून त्यातले घोटभर जरी प्यायले तरी अगदी पी.ई. रेशो आणि टेकनिकल ऍनालिसिस नाही पण बेसिक डिप्रेसिएशन आणि डिविडेंड पे आऊट ची गणितं तरी नक्की समजू लागतील असे हे आमचे मार्केटगुरु. खरं तर ह्या अडीच वर्षांत स्ट्रॅटेजि, मर्जर ऍक्वीजीशन, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, बिझनेस ऍनालिटिकस, असे अत्यंत विविधपूर्ण असे एक ना अनेक तब्बल चाळीस च्या वर विषय शिकलो. त्यातलं नक्की किती समजलं आणि किती नाही? ह्याही पेक्षा बरंच काय काय असतं इंजिनीरिंग सोडून जगात आणि ते आपल्याला माहितीच नव्हतं हे मात्र स्वतःला चांगलंच स्पष्ट झालं. अगदी मॅनेजमेंटच्याच भाषेत सांगायचं झालं तर we did not know, what we did not know!

एकीकडे हे शनिवार रविवार व्यवस्थापनाच्या एकेक विषयाचं असं रसग्रहण सुरु असताना, संसार आणि घराकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत चाललं होतं. कारण लेकीचा अभ्यास, तिचं वार्षिक स्नेह संमेलन, आमचे कौटुंबिक आणि घरगुती सांस्कृतिक कार्यक्रम, झालंच तर किरकोळ आजारपणं, सगळंच ' हिला' म्हणजे माझ्या बायकोला एकटीलाच पाहायला लागायचं. ती चांगलीच दमायला लागली. प्रत्येक वेळा कोणत्या तरी शनिवार रविवारी फॅमिली गेट टू गेदरला एकटीच ( किंवा फक्त लेकीला) घेऊन गेली आणि तिला कुणी "नवरा कुठं असतो गं हल्ली तुझा दिसला नै बरेच दिवसात??" ह्या प्रश्नाला तिनं तिनं शेवटी शेवटी अलीकडे " तूर्त सोडलाय - दोन हजार एकोणीस साली आम्ही (परत) लग्न करणार आहोत, त्याचं शिक्षण संपून तो परत एकदा रांकेला की" असं गंमतीनं सांगायला सुरुवात केली होती. पण गंमतीचा भाग सोडला तर माझ्या ह्या शिक्षणात खरी जर कुणाची ससे होलपट झाली असेल तर , ती मात्र माझ्या एकुलत्या एकबायकोची. कारण एकतर मी घरी जवळ जवळ नसायचोच. जेव्हा असायचो तेंव्हा, असून ही नसल्या सारखाच. ऑफिस मध्ये कामाचा आणि कॉलेज मध्यल्या असाइन्मेंट्सचा असा माझ्यावरचादुहेरी ताण वाढला की माझी चिडचिड व्हायची तेंव्हा 'ही' माझ्या कडे "तुझी एखादी असाइन्मेंट् मी करून देऊ का मार्केटिंगची वगैरे? असं आपुलकीनं विचारायची, कारण ही आमच्या लग्ना आधी पासूनच फुल टाइम एमबीए ची स्टुडन्ट असल्या मुळं तिला हे असाइन्मेंट् प्रकरणत लपलेलं क्रौर्य चांगलंच ठाऊक होतं.

हे असं इकडं कॉलेज आणि ऑफिस अश्या भौगोलिक दृष्ट्या भिन्न सरहद्दींवरती एकाच वेळी वेगवेगळ्या शत्रूंशी दोन हात करताना, घरी माझ्या मुलीचं आणि माझं मात्र वेगळंच प्रकरण सुरु झालं. लेकीनं आईकडे हळू हळू "बाबू माझ्या कंपास पेटीतली माझी सेंटेड खोडरबरं आणि पेन्सिली पळवतो, मी घरी नसताना" अश्या तक्रारी सुरु केल्या तिच्या आईकडे. आणि त्या तक्रारींमध्ये काही अंशी तथ्यही असायचं. नाही असं नाही! पण मी तसा कबुली जबाब मात्र लेकी पुढे आणि तिचं वकील पत्र घेणाऱ्या तिच्या आईकडे आजतागायत कधीच दिला नाही. आधीच सोळा सतरा वर्षांपासून लिहिण्याचा सराव संपून फक्त टायपिंगची सवय लागल्यामुळं मला ( आणि वर्गातील इतर सर्वांनाच ) पेपर लिहिताना हात दुखण्याचा वगैरे जाम त्रास होत होता. त्यात घरी ही लेकीची रबरं आणि पेन्सिली पळवल्याच्या तक्रारी, सगळी धमाल होती नुसती.

ह्या माझ्या अडीच वर्षातील घटनांक्रमा मध्ये सांगीन तितकं थोडं आहे. गेल्या महिन्यात ११ तारखेला माझ्या ह्या पदव्युत्तर शिक्षणाचा निकाल लागला. आमच्या घरातला हा पप्पू (बऱ्यापैकी मार्काने) पास हो गया. "चला सुटलो एकदाचा!" ही एकमेव भावना. आता मागे वळून पाहिलं की वाटतं एवढा मोठा डोंगर आपण कसा काय चढून पार केला कुणास ठाऊक. खूप काही शिकलो. बरंचसं पुस्तकातून. पण त्याही पेक्षा बरंचसं पुस्तकांच्या बाहेरून. खूप वर्षांनंतर एका बाकावर शेजारी शेजारी बसणारे आणि पेन पेन्सिली आणि वह्या नोट्स एकमेकांच्यात शेयर करणारे मित्र भेटले. त्यात टाटा ग्रुप मधील एका कंपनीमध्ये बऱ्याच मोठ्या पदावर असणारे श्री अविनाश बेडेकर होते. मी आणि ते एका वर्गात भेटत आणि एका बाकावर बसत नव्हतो तर कदाचित आयुष्यात त्यांच्या शेजारी खांद्या ला खांदा लावून बसण्याची माझ्या अंगी कधीच पात्रता न येणे. तिकडे वर्गात कोपऱ्यात बसून लक्षपूर्वक सगळं ऐकणारा शांत, पण इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिकस दोन्हीही अगदी कोळून प्यायलेला सुशांत शिलवंत भेटला. एकीकडे अगदी शाळेत दहावीत किंवा बारावीत असल्या सारखा, एका मुलीचा बाप असून सुद्धा निरागस पणे ऑफ पिरिअड ला वर्गात जोरदार दंगा घालणारा सरळ मार्गी आणि जितका निरागस तितकांच अवलिया असा कोल्हापूरचा निषाद कोटणीस भेटला. दोन मुलांची आई असून सुद्धा नोकरी सांभाळून सगळ्या असाईनमेंट्स अगदी नेटकेपणाने आणि सुवाच्य हस्ताक्षरात असाइन्मेंट्स आणि पेपर लिहिणारी पेठेतली पुणेरी अनघा गोगटे-पाटणकर भेटली. जिभेला तलवारीसारखी धार लावून वर्गात आपली परखड मतं कुणाला आवडो नं आवडो पण निर्भीड पणे स्वतः अगदी पत्रकार असल्यासारखी मांडणारी सुखदा सोंडकर भेटली. (परवाच सुखदा पुणे एअरपोर्ट वर भेटली. तिचं लग्न झाल्याचं तिच्याकडून समजलं. मस्त पहिल्या पेक्षा दुप्पट कॉन्फिडन्ट होती.)

ह्या एम. बी. ए. मुळं दिनकर सूर्यवंशी भेटले. ह्यांचा मुलगा इंजिनीरिंगला होता. आणि हे इकडे एम. बी. ए. करत होते. बाप आणि लेकांत दोघांमध्ये कोण जास्त मार्क्स पाडतंय अशी पैज असायची. शेवटी बाप हरला, मुलगा अर्ध्या टक्क्यांनी जिंकला. त्या दिवशी बापाला पैज हरुनही कोण आनंद झाला ! आणखी एक गंमत, आमच्या कोर्स ला एका दाम्पत्यानं एकदमच ऍडमिशन घेतली होती. केतकी दरेकर आणि समशेर चड्ढा. असं ह्या दाम्पत्याचं नाव. कधीकाळी लव्ह मॅरेज केलेलं हे दाम्पत्य. मराठी मुलगी आणि पंजाबी मुलगा. केतकी पेशानं फॅशन डिझायनर तर समशेर नावाप्रमाणेच मिलिटरीत कॅप्टन सध्या पुण्यात पोस्टिंग वर. दोघं ही खूप अभ्यासू आणि कष्टाळू! ही दोघं एका बाकावर बसून सगळी लेक्चर्स अगदी लक्ष पूर्वक ऐकत. असेच आणखी एक, अडीच वर्षात एकही लेक्चर "न" चुकवणारे अगदी प्रामाणिक आणि कष्टाळू आणि तितकेच बुद्धिमान असे चिन्मय कुमठेकर, भेटले ते ही इथेच. आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ह्या आमच्या प्रौढ शिक्षणाचा खरा 'आनंद' घेतला. कारण आम्हाला फॅकल्टीज कडून आमची वेगवेगळ्या विषयांवरची मते आणि अनुभव मांडण्याची आणि त्यावर इतरांची त्यांची दुमतं आणि मतांतरे मांडण्याची खूप मुभा होती. चर्चा, वादविवाद, मतभिन्नता, हेच खरं एम.बी.ए.च्या शिक्षणाचं गमक होतं. परीक्षा आणि मार्क्स हे केवळ युनिव्हर्सिटी आणि यू. जी. सी. चे रूल्स पाळण्यासाठी. आमच्या सगळ्यांच्यात दडलेला एक सामायिक असा जिद्दी महिपाल आणि तितकीच चिकाटीची भंवरी देवी होती, त्या महिपाल आणि भंवरी देवीनं आम्हाला अडीच वर्षं एकत्र बांधून ठेवलं.

हे असे सगळे असे मस्त असामी भेटले पण, खरी आम्हा सगळ्यांना पुरून उरली ती "छवी नाम्बियार" एकमेव अशी. कारण मुंबई मध्ये रोज लोकल ट्रेन आणि शनिवार रविवार थ्रू ट्रेन ने "मुंबई पुणे मुंबई" अश्या दोन वर्षं खेपा घालत वर्गात चक्क पहिला क्रमांक पटकावला. परवा तिचा रिझल्ट ऐकून मी धन्य झालो. ती हुशार तर होतीच पण नेव्हर से डाय अशी ऍटीट्युड काय असते ते कुणी शिकावं तर फक्त ह्या मुंबईत जन्मलेल्या आणि मुंबईतच लहानाची मोठी झालेल्या, पण पुण्यात पोस्ट ग्रॅजुएशन करायला आलेल्या ह्या केरळी 'छवी नाम्बियार' कडूनच ! तिला आता येत्या डिसेंबरात आमच्या विद्यापीठाचा दीक्षांत सोहोळा संपन्न होईल तेंव्हा सुवर्ण पदक बहाल होईल! इकडे चवथ्या सेमिस्टरला केतकी दरेकर आणि समशेर चड्ढा ह्या दाम्पत्याला दोन मस्त जुळी बाळं झाली. गुटगुटीत अशी चार, साडेचार पौंडांची!

माझा फायनल रिझल्ट लागल्यावर मी, माझी लेक आणि माझी सुविद्य पत्नी, असे आम्ही तिघेही थोड्या गरजे पेक्षा महागड्या आणि उच्चभ्रू अश्या रेस्तराँ मध्ये पार्टीसाठी गेलो. तिघेही अगदी भलं मोठं बिल होईस्तोवर जेवलो. मी माझ्या एम.बी.ए. चं शिक्षण पूर्ण झाल्या प्रित्यर्थ बायकोला आणि मुलीला एक गिफ्ट आणलं होतं. कारण माझ्या ह्या चिमुरडीनं आणि तिच्या आईनं केलेल्या त्यागा शिवाय ह्या महिपालचा हा प्रौढ शिक्षणाचा खडतर प्रवास केवळ अशक्य होता. निळसर चंदेरी चमचमत्या कागदात रॅप करून आणलेलं ते गिफ्ट, तुडुंब जेवणानंतर डेझर्ट म्हणून घेतलेलं 'कस्टर्ड' खाता खाता मी लेकीच्या हातात दिलं. तिनं सवयी प्रमाण कुणाचीही भीड भाड न बाळगता तो गिफ्ट रॅप चा कागद टराटरा आमच्या दोघां समक्ष फाडत आतमध्ये गिफ्ट काय आहे ते तिच्या बालसुलभ उत्सुकतेपोटी अधाशी पणाने पाहिलं.

मी लेकीच्या कंपासपेटीमधून सहा महिन्यांपूर्वी ढापलेली तिची पेन्सिल आणि तिचंच वासाचे खोड रबर, तिला गिफ्ट म्हणून दिलं होतं. त्या वासाच्या खोड रबराचा अप्रतिम सुवास त्या कस्टर्ड डेझर्ट मधील कोणत्यातरी इंग्लिश फ्लेवर च्या गंधाशी एकरूप होत आमच्या तिघांमध्ये दरवळत राहिला होता, कितीतरी वेळ !

चारुदत्त रामतीर्थकर.
९ फेब्रु १९, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला त्रिवार सलाम !
आणि जीवन विकास साधायचा तर मानवाने कायम विद्यार्थी राहून नवनवीन शिकत राहायचे हेच योग्य आहे ह्याचा परिपाठ समग्र अनुभवासकट इतरास कायम स्फूर्तिदायक ठरेल अश्या रीतीने मांडल्याबद्दल धन्यवाद आणि सुयशाबद्दल अभिनंदन !

अहाहा, खूपच छान लिहिले आहे. सगळे कसे अगदी डोळ्यासमोर उभे राहिले.
महत्त्वाचे म्हणजे तुमचे अभिनंदन आणि तुमच्या चिकाटीला सलाम.

ग्रेट अ‍ॅचिवमेंट !! अभिनंदन.
हे अस काही वाचलं कि आपण पण मास्टर्स करायला पाहिजे अस वाटत. पण संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर सोफ्यावर आडवं झाल कि सगळे प्लॅन राहून जातात.

मनापासून अभिनंदन...
तसे मी तुमच्या सारखा प्रौढशिक्षण घेण्याचा प्रयत्न करतोय... 3वर्ष झाली cs ची अँडमिशन करुन पण परिक्शा देवू शकलो नाही.... तुमचा लेख वाचुन आत्ता ते शिवधनुश्य पेलावे असे परत वाटु लागले आहे...
परत इकदा मनापासून अभिनंदन

अभिनंदन ! सुरेख लिहिलेय .
आवडलंय .

जीवन विकास साधायचा तर मानवाने कायम विद्यार्थी राहून नवनवीन शिकत राहायचे हेच योग्य आहे ह्याचा परिपाठ समग्र अनुभवासकट इतरास कायम स्फूर्तिदायक ठरेल अश्या रीतीने मांडल्याबद्दल धन्यवाद आणि सुयशाबद्दल अभिनंदन !>>>> +१००००

लेख आवडल्याच्या प्रतिक्रियां बद्दल शतशः धन्यवाद.
तसेच तुम्ही केलेल्या अभिनंदना बद्दल मी तुमचे सर्वांचे ऋण व्यक्त करतो.

hemant82 जी लवकरंच तुमचं CS सुद्धा पूर्ण होईल.

खूप खूप अभिनंदन.
लेख एकदम खुसखुशीत तरी प्रेरणादायी झालाय !

अभिनंदन !
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
लेख मस्त झालाय, अर्थात तुमचं खुसखुशीत लिखाण नेहमीच आवडतं.