साठा उत्तराची कहाणी .

Submitted by स्मिता द on 15 November, 2018 - 23:12

साठा उत्तराची कहाणी ...

आज सकाळीच बातमी कळली छबी गेली.. मनापुढे छबीची कहाणी उलगडायला लागली. काय नव्हती छबी ..ती आई होती, आजी , पणजी होती ,संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ होती. छबी म्हणजे एक गाव नाही तर एक संस्थानच होती. या बातमीसरशी आठवणींची कितीतरी पाने झरझर उलटली गेली.

तिचा आणि माझा सहवास तसा अगदी लहानपणापासून. एकाच आळीत राहणारे आम्ही, शेजारी तसे नातेवाईकही. तिची आई किसनामामी आणि वडील तुळश्‍या मामा. त्यांची छबी अगदी मोठी मुलगी. आमच्यापेक्षा मोठी, तिच्या पाठचे मग सगळी भावंडे. त्यामुळे तिचा वावर सतत जबाबदारीचा आणि मोठे असल्यासारखे असायचा. तिचा आब जरी मोठ्यांचा असला तरी ती आमच्यात खेळायची. मुलींचे फुगड्या, झोके, सागरगोटे अशा खेळात तर ती अगदी त्यातली अनभिषिक्त सम्राज्ञी असे. त्यावेळेसही आम्हाला गंमत वाटायची. किसनामामी म्हणायची तीच पोटालाच कुंकू लागलंय. म्हणजे ही छबी जन्माला यायच्या आधीच तिचे लग्न ही ठरले होते. आम्हालाही ते वेगळे कधी वाटलेच नाही. तर मग घरात, शेतात आई-बापांचे भावंडांचे सगळे करत छबी मोठी झाली. खूप लहानपणी ही मोठेपणाची झूल तिच्यावर पांघरली गेली असे वाटते..

काळ जात होता. तिचे लग्न ही लावले मग आत्याच्या मुलाशी. आम्ही सगळ्यांना एक गोष्ट खटकत होती की बाई. एव्हाना आम्ही तिच्या भावंडावरोबर सगळेच बाई म्हणायला शिकलो होतो. आता बाई आपल्यापासून खूप लांब जाणार, मोठ्या गावात जाणार हे दु:ख होते. आता पाहिजे तेव्हा, हाक मारली तेव्हा बाई आम्हाला दिसणार नव्हती की आमच्या मदतीला येणार नव्हती. यथावकाश छबी पण मोठी झाली मग तिचे सासरी जाणे झाले. तशी मग ती अधून मधून दिसायला लागली. सदैव हसतमुख असलेली छबी तशी आमच्या सगळ्या गोतावळ्याची लाडकी होती. एक तर मोठी मुलगी त्यात लग्नानंतर आतेकडेच गेली पण तिकडेही मोठी सून. आम्हाला एक गंमत वाटायची तेव्हा की छबीचा नवरा असा आमच्या खेड्यातल्या पोरांसारखा नव्हता. एकतर तो शिकलेला. अगदी इस्त्रीचे कपडे घालणारा, उंच , त्यावेळी आमची मुलांमध्ये खुप हौस असलेला केसांचा कोंबडा पाडणारा आमच्या देव आनंदसारखा. त्या शिकलेल्या रघुनाथाशी छबी काय बोलत असेल?आमच्या मुलाच्या मनात हा प्रश्न असे.

माझी मॅट्रिक परीक्षा म्हणजे जुनी अकरावीची परीक्षा झाली. मी मग शहरात म्हणजे तालुक्‍याच्या गावी गेलो. त्याची परीक्षा आमच्या तालुक्‍याच्या गावी झाली होती.

छबीचे गाव पण तालुक्‍याचे होते. मी तेव्हा पहिल्यांदा छबीच्या घरी गेलो . घर कसलं थोरला वाडाच होता तो. बाहेर जोत्यावर पोर खेळत होती, ओसरीवर तिच्या घरची पुरुष माणसे होती.. मी भीतभीत विचारले ,'छबी हाय का? ' त्यावर त्या पागोटवाल्याने फक्त आत नजर टाकली. मग तेव्हड्यात हरणात्या आली बाहेर. हरणात्या म्हणजे छबीची आत्या आणि सासू , ती पण छान देखणी होती. हसून म्हणाली, 'हाय छबी ,पर आता जरा तिकडं गेलीय. तू तवर बस येईल ती. हातपाय धू, चा पानी घे. मला जरा बरं वाटलं आत्याबाईंच्या बोलण्याने. घरात छबीचे धाकटे दीर, नंणंदा दिसत होत्या इकडून तिकडे जाताना. लय लहान पोर होती ती
त्यांच्याशी काय बोलावं म्हणून मी आपला ओसरीवर बसलो चा पानी घेऊन, छबीची वाट पाहत.

'आर. कदी आला' आली छबी आली. मी अगदी आनंदाने ,उत्सुकतेने छबीकडे पाहिले. छबी होतीच आमची तशी अगदी उंचीपुरी, धडधाकट पण आता अगदी लुगडं खोवलेलं पायापर्यंत, डोक्‍याला पदर बांधलेला अशा अवतारात. मला कुठेतरी पाल चुकचुकलीच मनात. छबी आली उत्साहाने, मला आत ये म्हणाली. चहापाणी घेतला का चौकशी करून मग बोलता बोलता लागली चुलीपुढे स्वैपाकाला. म्हणजे अजून हरणात्याने सैंपाक केलाच नव्हता तर.. कुटून आला. कसा हायेस त्याबरोबर सगळ्या गावाची चौकशी करून झाली तिची. हळू हळू सगळ्यांची जेवण झाली.

मग छबी जेवायला बसली तेव्हा तिच्याशी जरा बोलता आले. पण तिचे वास्तव ऐकून तसे माझे मन खिन्न झाले होते.. एकतर रघू ही गावाकडची अशिक्षित बायको म्हणून तिच्याशी बोलत नव्हता. आम्हाला पडलेले कोड आता सुटल होत. रघू आणि तीच फार सख्य नव्हतं. त्यात ही सगळी पोरं, त्यांचं करणं हे सगळं छबी करत होती. त्यात आणिक भर म्हणजे तिच्या घरी शेतीभाती नव्हती त्याचे चुन्याचे धंदे होते. चुना तयार करण्याच्या भट्ट्या होत्या. माझ्यासाठी ही माहिती नवीन होती. त्या भट्ट्या लावण्यासाठी चुनखडी लागायची. ती चुनखडी छबी कामाला येणाऱ्या बायांबरोबर जाऊन, कधी कधी एकटीने जाऊन त्या चुनखडीच्या म्हणजे पेमगिरीच्या डोंगरावर जाऊन झाडून, गाडी भरून आणायची .मग भट्टी भरुन ती भट्टी लावायला लागायची. मग तयार होणा-या चुन्याची प्रतवारी करणं ही कामे छ्बी करायची. छबी जरी हसत वागत होती ,तेव्हा ती करते ते काम पाहून माझा उर अभिमानाने भरून येत होता. पण त्याच बरोबर तिचे काम, तिच्या भोवती असलेला कामाचा रगाडा बघून मन खिन्नही झाले. त्यात तिचे ते रघू तिच्याशी बोलत नव्हता हे बोलणे. अर्थात तो काळ काही फार बायकोचे नाव घेऊन बोलायचा नव्हता. पण थोडा फार संवाद व्हायचा नवरा बायकोत. छबीला याची खंत असेलच, ती दाखवत नव्हती पण तिचे ते घरचे आणि बाहेरचे काम उपसणे बघून वाईटच वाटले..

निघायच्या दिवशी पण मी गेलो भेटायला, काही निरोप आहे का ? हे बघायला तर हरणात्याने सांगितले झोपलीये आत. मनात पाल चुकचुकलीच छबी आणि झोपून ? आत जाऊन पाहिले तसे चेह-यावर उसने हसू आणत छबी बोलली पण मला मात्र तिचा तो रात्री खूप मार खाल्ल्याने काळानिळा झालेला आणि सुजलेला चेहरा, हात खूप काही सांगून गेले. म्हणजे बोलत नाही पण मारतो मात्र बायकोला हा. इतकी चीड आली. छबीला म्हणालो ,' छबे चल घरी.. तुळश्या मामाला सांगतो मी हे.. ' त्यावर छबी अगदी ,'नको त्याला सांगू नको. त्यानं मला सांगितलंय.. बाई माझा तू मानाचा मंदील हाय तशीच राय सासरी.. माझा मंदिल पडू देऊ नको.. '

काय हे केवळ नाव, अभिमान. वडिलांचे नाव धुळीस मिळू द्यायचे नाही म्हणून छबी हा त्रास सोसत होती. ते पण किती आपलेपणाने. डोळ्यांतले पाणी मी लपविले कारण तिला आवडलेही नसते ते..छबीच्या त्या दर्शनाने मी बराच काळ अस्वस्थ होता. .छबीचे हे काम करणे, पुन्हा नवऱ्याचा मार खाणे मला एकदम गप्प करून गेले. नाही तुळश्‍या मामाला सांगू शकत होतो न कुणाला

हळूहळू जखम भरत गेली. छबी यायची गावी अधून मधून, तिला मुलेपण झाली. दिसायची ती उत्साही, आनंदी , त्या दुःखाचं कुठे लवलेशही नाही अशी. आणि इकडे आली तरी लहान, बहीण भावांसाठी झटून काम करणारी, शेतात मामा , मामीला मदत करणारी अशीच ती होती. कामानं काय माणूस मरतो व्हय हे तीच तत्त्व होत. मी ही माझ्या शिक्षण, नोकरी यात गुरफट गेलो. मग गावाला जाण कमी झालं. मध्यंतरी कळाले की छबी आता साखर कारखान्यावर राहायला गेली. रघू शिकलेला होताच., त्याला तिकडे नोकरी लागली. मग छबी , मुले तिकडे गेली.

अधून मधून छबीच्या बातम्या कानावर यायच्या. तिने तिच्या भावांना पण तिकडे काम पाहिले होते आणि त्यांनाही तिकडे बोलावून घेतले होते. नंतर एकदा असाच तिच्या साखरकारखान्याच्या गावाजवळ जाण्याचा योग आला. मग छबीकडे गेलोच. छबी आता स्वतंत्र राहत होती छबीकडे गेल्यावर अनेक आश्चर्याचे सुखद धक्के ही बसले. सतत काम करणारी छबी इथेही गप्प बसली नव्हती. रघूच स्वभावानुसार तो महिन्याचा पगाराचे पैसे सोपवायचा तिच्याकडे पण यात तू काय ते बसव म्हणून. छबीचे तर याचे कर, त्याचे कर, हे कर आणि ते कर. मग ती काय गप्प बसते. तिने हळूहळू तिथे गायी पाळल्या ,त्याचा गोठा केला, दूध घालायची. त्यात तिचे सासर म्हणजे तांदळाची बाजारपेठ, मग ती तिथून तांदूळ मागवायची, इकडे लोकांना विकायची. त्यात ही तिने अजून आधी बुकिंग करणे वगैरे प्रकारही सुरू केलेले, कौतुक वाटले मला त्या छबीचे.

हल्ली अजून फार पसारा वाढतोय म्हणून तिने खानावळ सुरू केली होती. ती आधी सुगरण
'काय गं. बाई'.. आता मी ही तिला बाई म्हणायला लागलो होतो, ' आता खानावळ '
'आर. , त्यात काय ? घरी करायचीच की मी इतक्‍या लोकांचं तसा ह्यो. बाहेरून येतात लांबलांब राहतात त्यांना घातले खाऊ तर काय त्रास'.'
तिचे हे कर्तृत्व बघून मी खरोखर तिला नमस्कार केला. तशी ती आमचा असून मोठी होतीच. आता तिला मना पासून बाई म्हणायला मी सुरुवात केली

काळ सरत होता. मी ही आता नोकरी, संसार, मूल बाळ यात गुरफटलो गेलो. कधीतरी सटीसामाशी गावाला जायला योग यायचा. मला मध्ये भाऊ भेटला बाईचा तो सांगत होता बाईने आपल्या इकडे जमीन घेतली. अरे वा! हा तर आश्चर्याचा धक्का होता
बाईने एकटीने स्वतःच्या जिवावर मरमरेतो कष्ट करून. जमीन पायजे बग आपल्याला. आपली काळीआई हाय ती, तिला इसरून कस चालल या ईर्ष्येने पै-पै जमवून, नानाविध कामे करून ही जमीन घेतली होती. माणूस काय करू शकतो ना आपल्या जिद्दीच्या जोरावर. त्या जिद्दीला अखंड कष्टाची जोड होती.

माझ्या नजरेसमोर अजून बाई येते जेव्हा मी तिच्या घरी गेलो होतो तेव्हा रातभर मुक्काम करून निघावं या विचारानेच मी गेलो, तेव्हा तिने सगळे खानावळीतले लोक जेवून गेल्यावर, मला आग्रहाने खाऊ घातले. मग तिच्या चुलीपाशी सगळी बसली होती. बाई काम करायची ती पण हसत खेळत. लहानपणापासून गप्प मारणे म्हणजे तर कोणाला ऐकायची नाही. खूप,खूप गप्पा मारल्या.. रात्रभर सगळ्या आठवणी.. कोण कुठे आहे ,काय चालले आहे हे सगळे तर झालेच त्यासोबत बाईच्या नकला पण झाल्या. कोणाबद्दल बोलताना ती त्या माणसांची मस्त नक्कल करून दाखवायची. बाहेर थंडी मी म्हणतं होती पण तिच्या चुलीभोवती मात्र धग होती. दोनदा चहा ही झाला.. बघता बघता दिवस उजाडला. अरे रातभर आपण सगळे गप्प मारतूया कळलेच नाही असे म्हणत चहा घेऊन उठून नामा,सोपान कामाला गेले आणि बाईपण तिच्या कामाला लागली.. आश्चर्य वाटले तिच्या त्या उत्साहाचे, शक्तीचे.. खरंच बाई , महान आहे.

बाईला मध्यंतरी भेटलो गावाला गेलो तेव्हा. कोणाच तरी लग्न होत. मग त्या लग्नात बाई म्हणजे तर काय साक्षात अन्नपूर्णाच. सगळा लग्नाचा स्वयंपाक म्हणजे बाईच. अत्यंत सुगरण आणि कामाचा झपाटा तसा अफाट . जेव्हा ती असायची. तेव्हा लग्नाचा असो नाहीतर दहाव्याचा, सगळे स्वयंपाक हौसेने करायची. तिच्या मांड्याच्या जेवणाची आठवण आली तर आज ही ती मांड्याची चव रेंगाळते. काय मांडे करायची बाई. दोन, तीन पायलीचे मांडे ती इतर बायांच्या मदतीने करून घ्यायची. स्वतः काम करायची आणि हसत खेळत इतराकडूनही मस्त काम करून घ्यायची. तिच्यात काम करण्याचे आणि काम करवून घेण्याचे कौशल्य होते. उत्तम मॅनेजर होती ती. . एकदा मला तिच्या
हातशेवया बघण्याचा आणि खाण्याचा योग आला होता. आमच्या इकडे पाटशेवया असायच्या पण बाईने तिकडे हातशेवया पण शिकून घेतल्या होत्या. हातावर वळून छान मऊसूत, लांबवर बारीक मोठे धागे ते, असे लीलया हातावर घ्यायचे आणि मग काठीवर वाळत टाकायचे. मी तर बघूनच मंत्रमुग्ध झालो होतो. ही बाई कधी शिकली हे सारे इतके निगुतीचे .

बाईची ख्याली खुशाली अशी अधून मधून कळत होती. तिला तीन मुले होती. दोन मुली अन एक मुलगा. बाई स्वतः शिकली नव्हती पण शिक्षणाचे महत्त्व ती जाणून होती. तिने तिच्या तिन्ही मुलांना शिकवले. मुलींचे लग्ने झाली, मुलाचे पण झाले. बाईची लेक चांगली नोकरी करत होती. बाईने मग मुलाचे ही लग्न केले. सुनेला शिकवायचा प्रयत्न केला. घर बांधले अशा बातम्या कुणा कुणाकडून कळायचा. कधी कौतुकाने सांगितलेल्या. चला, बाई एकदाची स्थिर झाली. असे म्हणून ही बरे वाटत होते. खूप खूप कष्ट केले. सगळ्या घरादारासाठी केले. दीर ,नणंद, जावा ,बहीण ,भाऊ या सगळ्या गोतावळ्यात बाई अगदी संतृप्त होती.

काळ जात होता. पुला खालून बरेच पाणी वाहून गेले. आता शरीर थकत चालले. रिटायरमेंटची तयारी मनाने सुरू केली. अशा या पैलतिराला लागलेल्या मन:स्थितीत बाईचा मुलगा भेटला , त्याच्याकडून कळाले. बाईच्या दुर्दैवाने काही तिची पाठ सोडली नव्हती. तिची एक मुलगी कायमची माहेरी आली. तिच्या पदरी लेकरं. बाईने तिच्यासाठी परत कंबर कसली होती. ती शेती बरोबर एक छोट दुकान पण चालवत होती तिकडे खेड्यात . माझाही जाण होत नव्हते फार गावाला त्यामुळे या गोष्टीची कल्पनाच नव्हती.. काय देव पण एखाद्याची परीक्षा घेतो . मी दीर्घ सुस्कारा सोडून गप्प राहिलो.
...........................
एका लग्नात बाई भेटली तिला बघून सर्दच झालो. रघुनाथ गेल्याचे कळले होते. पण कपाळावर मोठं कुंकू मिरविणाऱ्या बाईचा असा मोकळ्या कपाळाचा चेहरा बघून खरेतर भडभडून आले. पण बाई धीराने अगदी शांत होती. लढाईला कायम तयार असणाऱ्या लढवय्या सारखी. नियतीचा प्रत्येक घाव तिने पेलला आणि परतून लावला होता. झुकली नव्हती ती कधी.

आता तर तिची पोरगी माघारी आली. तिला नोकरीला लावायचे तिच्यापुढे ध्येय होते.. कमाल होती या धगधगत्या ज्योतीची. अखंड नंदादीप झाला होता आता तो.

बाई जरी भेटली नाही तरी तिच्या बातम्या कानावर यायच्या. जिच्या उभे राहण्यासाठी तिने पुन्हा शिवधनुष्य पेलले होते, ती तिची लेक, स्वत:ची मुले तिच्याकडे टाकून , दुसरे लग्न करून निघून गेली होती. जास्त स्वाभिमानाने जगलेल्या आणि बापाच्या मंदिल होणाऱ्या आमच्या बाईला हा घाव मात्र वर्मी बसणारा होता. सगळं आयुष्य असे कष्टात आणि दुःखाचा सामना करत काढलेल्या बाईच्या दृष्टीने मुलीचे हे पाऊल म्हणजे तिचे नाक कापण्या सारखे होते. खूप खचली बाई त्या घावाने .
पण खचून जाईल ती बाई कसली. ती पुन्हा नातवाचे आयुष्य उभे करायचे या जिजीविषेने उभी राहिली. त्यांत तिच्या मुलाचा कारखाना बंद पडला. तो एक मोठा धक्का होता बाईला. पण या सगळ्या धक्क्यातून बाई वाट काढत होतीच.
..................................

मला काल अचानक बाईच्या मुलाचा फोन आला, 'बाईने बोलावले भेटायला
आता मीच सत्त्याऐंशी वर्षाचा माझ्यापेक्षा दहा एक वर्षांनी मोठी असलेली आमची छबी म्हणजे बाई, आता पार शंभरीच्या दिशेने वाटचाल करत होती. मलाच प्रश्न पडला आता मला प्रवास झेपेल का. तिला भेटायला जायचं म्हणजे.
...........आलो पण हिकमतीने प्रवास झेलत. बाईने अगदी अंथरूण धरलेले होते. पण डोळ्यात चमक तीच होती. मला बघितल्या बघितल्या डोळे चमकले तिचे. मोठ्या आस्थेने उठून बसत माझा हात हातात घेतला. डोळ्यातून मी आल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. त्या आजारपणातही कसा आहेस विचारले. मला खायला प्यायला घातले. पथ्य आहे म्हटल्यावर पथ्याचे करायला लावले. बरेच लोक भेटायला येते होते कारण तिने निरोपच पाठवून बोलावून घेतले होते. तिचे आप्त सगळेच भेटून जात होते, भेटायला येत होते. आलेल्या प्रत्येकाला खाऊन जा.. येत जा असे म्हणत होती

तिच्या जवळच्या नातलगांना तिने साड्या घे, जेवायला घाल असे केले तर लेकीला माझी आठवण राहूदे म्हणून अंगठी करून घातली. तर अधिक महिना म्हणून जावयाला वाण दिले होते. अगदी भारावलेल्या अवस्थेत खरेतर मी बाईचा निरोप घेतला. मला रडायला आले तशी ती ही रडायला लागली. मुकंपणे आसवं गाळत अन पुन्हा हसत बरे वाटेल तुला , येतोच मी म्हणून निघालो... तर आज ही बातमी आली. आता काय करायचे जाऊन बाई तर भेटणार नाही. पण एक मन म्हणाले, जावे, निदान अखेरीचे दर्शन तरी होईल.

आलो, मोठ्या कष्टाने पाय ओढत ,ओढत. पण इथे जमलेला समुदाय बघून मन थक्कच झाले. किती माणसे जोडली होती तिने. तिचे नातेवाईक, सासरचे, माहेरचे. तिची भाचरंड, नातू, नाती,पणतू असे सगळे होतेच शिवाय लांबून अनेक गावावरून माणसे आली होती. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. तिच्या अनेक आठवणी काढल्या जात होत्या . इथे आल्यावर एक , एक चर्चा कानावर पडल्या मला. अजून वेगळीच बाई उमजत होती. कोणाला कधी काही खाऊ घातल्याशिवाय तर तिने जाऊच दिले नव्हते. तिच्या अनेक भाच्यांना तिने पायावर उभे केले होते. बाईला उत्तम मॅनेजर मी म्हणत होतो त्याचा प्रत्यंतर आला. जाण्याची हीे चोख व्यवस्था तिने केली होती. सगळ्याच्या भेटी घेतल्या होत्या.लेकीकडे गेल्यानंतर कार्याला ,गुरुजींना हे पैसे द्यावे लागतील ते ठेव. मी गेल्यावर माझ्या मुखात घालायला हा पोवळ्याचा मणी, सोन्याचा मणी आणि मोती असू दे. तो घाला.गेल्यावर. तिथे रडारड नको भजने ठेवा. नातीला जी कोंकणात होती तिला समुद्राचे पाणी आणायला सांगितले होते. आता कुठे गंगा आणि काशी मी करेल, सगळ्या नद्या समुद्रालाच मिळतात तेव्हा मी समुद्राच्या पाण्याने अंघोळ करेल.. सगळ्यात कहर म्हणजे मी गेल्यावर अंघोळ घाला मला तेव्हा ती तांब्याचा घंगाळातून घाला. हे तिने आधीच सांगून ठेवले होते. तिच्या या मरण्याच्या मॅनेजमेंटचे ही मला कौतुक वाटले. तिला कायम एकच भीती होती मला शनिवारचे मरण नको . हे ऐकले मी अन चमकलो .अरे ती गेली तो रविवार आहे. म्हणजे शनिवारी येणारा मृत्यूला ही ती बरोबर शनिवार झाल्यावर रविवारी सामोरी गेली...अगाध आहेस बाई तुझे हे अपार गुण

तिच्या लेकाने मुखाग्नी दिला अन आज सतत तेवणारी ज्योत निमाली.. पण तिच्या प्रकाशाने आसमंत अजूनही प्रकाशलेलाच होता. अशा या आमच्या असामान्य छबूची म्हणजेच बाईची अनेक कथांची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण झाली होती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर चरीत्र आहे. वाईटही वाटलं वाचून.पण फार कर्तबगार लोकांच्या नशिबी देवाने मुद्दाम जास्त कडक परिक्षा ठेवलेली असते, तसंच काही.

खुप आवडली.

पण बर्‍याच ठिकाणी वाक्यरचना विस्कळीत आहे.
उदा:
तिच्या मांड्याच्या जेवणाची आणि मांड्यांची आठवण आली तर आज ही ती मांडायची चव रेंगाळते.

यामुळे रसभंग होतोय. एकदा नजरेखालून घालून संपादीत करा म्हणजे अजुन छान वाटेल वाचताना.

धन्यवाद नॅक्स, मी-अनु, शाली, उमानू, डॉ. मनाली, वावे, आणि आसा
आसा तुमच्या सांगण्याप्रमाणे बदल केले आहे. धन्यवाद

माबोवर कोणीतरी आपल्या आजीबद्दल निबंध लिहला होता. त्यात हे चुनखडी, खानावळ, जमीन विकत घेणे, मांडे वगैरे सगळं होतं. त्या तुम्हीच का? बहुतेक तिचं नावपण स्मिताच होतं. पण तुमच्या लेखनमधे तो निबंध दिसत नाहीय.

पशुपत धन्यवाद... खरे आहे तुमचे समस्यांना पुरून उरणारी ही माणसे..
अ‍ॅमी.. तुम्हाला ह्या निबंध भासणा-या कथेबद्द्ल अभिप्राय दिल्याबद्द्ल धन्यवाद. त्या मीच लिहिलेल्या आठवणी होत्या. यात जरा कथेमुळे सविस्तर आहे. पुनश्च धन्यवाद

ओके.
निबंध तो आधीचा लेख होता. हा दुसरा ड्राफ्ट चांगला आहे. फक्त पहिला आणि शेवटचा शब्दबंबाळ परिच्छेद काढून टाकला तर अधिक आवडेल.

तुमची आजी खरंच इतरांना काहीतरी सांगण्यासारख्या व्यक्तिमत्वाची होती. त्यामुळेच मला तो लेख आठवतोय. मी फक्त लेखनाबद्दल फीडबॅक देत होते.