मृच्छकटीक

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मृच्छकटीक

"मृच्छकटीक" शूद्रक लिखीत ह्या संस्कृत नाटकाचे आमच्या पिढीने केवळ नावच एकलेले आहे. आणि कदाचित आमच्या पुढची पिढीला ऐसे काही नाटक होऊन गेले आहे असे केवळ कुठेतरी वाचेल. तसे काही होऊ नये म्हणून डॉक्टर प्रसाद भिड़े आणि त्यांच्या संघाने आटोकाट प्रयत्न केला आहे आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी झालेला आहे. स्वत: प्रसाद हे संकृत विषय घेऊन एम ए झालेले आहेत आणि त्यानी modern sanskrit l exicography हा विषय घेऊन पी एच डी केलेली आहे. त्यानी आणि त्यांच्या चमूने सादर केलेला " मृच्छकटीक" ह्या नाटकाचा रस स्वाद अफलातून झालेला आहे आणि त्याची अनूभूति काल पार्ल्याच्या टिळक मंदिर मध्ये अनुभवायला मिळाली. मुळात "मृच्छकटीक" हे केवळ नाटक नाही तर ते साधारण 2000 वर्षापूर्वी म्हणजे साधारण पहिल्या शतकात केलेले सामाजिक परिस्थिति वर केलेले एक भाष्य आहे. ह्या नाटकाचा रचनाकार शूद्रक हा एक शुद्र आहे. नाटकाचा नायक चारुदत्त हा एक ब्राम्हण आहे पण चारीतार्थाने वैश्य आहे. नाटकाची नायिका वसंतसेना ही एक गणिका आहे. नाटकात एक जुलुमी राजा आहे त्याविरुद्ध बंड पुकारणारा आर्यक हा एक शुद्र आहे. केवळ प्रेमाप्राप्ती साठी चोरी करणारा शरविलक आहे. वसंतसेनेची दासी असलेली पण प्रत्यक्षात मैत्रीणी समान असलेली दासी आहे. चारुदत्ताचा मित्र विदूषक मैत्रेय आहे.थोडक्यात तेव्हाच्या चातूवर्ण व्यवस्थेला पूर्णपणे भेद देणारे है नाटक आहे. कल्पना करा आताच्या युगात जाती भेद असताना, तेंव्हाच्या काळात है जातीभेद रचनेवर भाष्य करणे हे केवढे मोठे धाडस लेखकाने केलेले आहे. नाटकात वसंतसेना आणि चारुदत्ताची प्रेमकहाणी आहे. त्यावर राजाच्या मेहुणयाची खलनायकी नजर आहे. नाटकातले एकही पात्र अनावश्यक नाही. प्रत्येक पात्राचे नाव हे त्याचे स्वभाव विशेष, बाह्यरूप दर्शवणारे आहे. चारुदत्त म्हणजे चारु (सुंदर) दत्त (दाता), वसंतसेना ( वसंतातली सुंदरी) मृद (माती) शकटिक (गाड़ी) मृच्छकटीक , शरविलक (चोर), शकार (प्रत्येक स चा श उच्चार करणारा)मैत्रय (मित्र), धुता (धुतल्या तांदळसारखी), प्रत्येक पात्राची योजना ही कथानकाला पुरक अशीच आहे. हे दहा अंक नाटक प्रसंगा प्रसंगाने खुलत जाऊन शेवटी परमोच्च बिन्दु साधते. शेवटी आनंदी आनंद होतो. ह्या कथानकावर आधारितआज पर्यन्त हजारो कथा, चित्रपट, नाटक येऊन गेलेली आहेत पण दुर्दैवाने कुणीही ह्या नाटकाचा प्रेरणा म्हणून साधा उल्लेखही केलेला नाही आणि है ह्या नाटकावर आणि नाटककारावर अन्याय आहे

प्रसाद ह्याची ह्या नाटकाचा रसास्वाद देण्याची कल्पना अफलातून आहे. नाटकाचे कथानक सांगत सांगत मध्ये मध्ये नाट्यगीते सादर करत काही एकपात्रीय प्रस्तूत करत प्रयोग रोचक करण्याची प्रक्रिया जमून आलेली आहे. विशेष उल्लेख करावा तर डॉन जुगारी आणि जुगारखान्याचा माथुर ह्यांच्या देवळातील प्रवेश मस्त जमला आहे. प्रवेशातले पूर्ण संवाद हे संस्कृत मध्ये असूनही माझ्यासारख्या संस्कृत फारसे न जाणणाऱ्या प्रेक्षाकाना तो प्रवेश आणि त्यातली नाट्यमयता भावली है त्या कलाकारांचे खरे यश. नाटकाची कथा सांगताना त्याला आताच्या कालातील संदर्भ जोडून नाटकाचे कथानक सादर करण्यात आलेले आहे त्यासाठी प्रसाद आणि गायक नर्तक सहकलकार शुभम जोशी आणि अनूया गोवित्रिकर ह्यांना दाद द्यायलाच हवी. कुठलीही प्रकाश योजना, नैपथ्य, वेशभूषा, कपडे पट नसताना हा प्रयोग सादर होतो हे मुद्दामून सांगण्या सारखे

हा संच मृच्छकटीक नाटका व्यतिरिक्त शाकुंतल, उत्तर रामायण ह्या नाटकाचे ही रस स्वाद सादर करतात आणि ते पाहण्याचे भाग्य लाभावे ही देवाजवळ मागणी आणि प्रसाद आणि त्यांच्या संचाने हे आणि ह्या सारखे अनेक प्रयोग सादर करावेत ह्या शुभेच्छा

केदार अनंत साखरदांडे

प्रकार: