२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग ३

Submitted by वेदांग on 28 June, 2016 - 05:09

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध
http://www.maayboli.com/node/58713

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग १
http://www.maayboli.com/node/58938

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग २
http://www.maayboli.com/node/59092

=========================================

कालची कसर भरून काढायची असल्यामुळे आज पहाटे ४.३० ला उठलो. सगळ्यांचे आवरून होईपर्यंत तासभर गेला. सायकलींवर खोगीरं चढवली आणि हात पाय ताणायला लागलो. ५ च मिनिटात द्विवेदिजी आम्हाला घ्यायला आले. काल ठरल्याप्रमाणे द्विवेदींकडे नाश्त्यासाठी जायचे होते. आम्ही राहिलो होतो त्या मंदिराच्या अगदी जवळ त्यांचे घर होते. घरी माताजींनी (सौ. द्विवेदी) अगदी प्रेमाने स्वागत केले. गेल्या गेल्या गरमा गरम चहा मिळाला. सकाळच्या त्या बोचऱ्या थंडी मध्ये चहा पिण्याची मजा काही औरच. चहा देऊन माताजी लगेचच स्वयंपाकघरात गेल्या. द्विवेजी म्हणाले कि माझा पुतण्या नाश्ता घेऊन येतोय. येईलच इतक्यात. मग नाश्त्याची वाट बघता बघता गप्पा रंगल्या. बोलता बोलता लक्षात आले कि माताजी सकाळी ४ वाजता उठून अंघोळ करून स्वयंपाकाला लागल्या आहेत. पण मला काही संदर्भच लागेना. नाश्ता बाहेरून येतोय, आणि माताजी स्वयंपाक कसला करतायत. पण सध्यातरी मी गप्प बसायचे ठरवले आणि गप्पा ऐकु लागलो. द्विवेदी एकदम मस्त आणि प्रेमळ माणूस. त्यांचे बोलणे खूप आर्जवी. त्यांना जेव्हा कळले कि बाबा आणि मी एकत्र परिक्रमा करत आहोत, तेव्हा त्यांना आनंदाचा धक्काच बसला. त्यांच्या मते वडील-मुलाने एकत्र परिक्रमा करणे हि अत्यंत भाग्याची गोष्ट. पण आम्हाला एवढं काही वेगळं वाटलं नाही.

गप्पांच्या ओघात असे लक्षात आले कि द्विवेदिजी दर वर्षी शिर्डी ला चालत जातात. त्यांचा एक ग्रुप आहे जो साधारण मे-जून च्या दरम्यान शिर्डी ला चालत जातो. कमाल आहे. गप्पा चालू असतानाच त्यांचा पुतण्या बटाटे वाडे आणि मिरची भजी घेऊन आला. भरपूर नाश्ता केला. पोट तुडुंब भरले. इथल्या बटाटे वड्यामध्ये सामोश्याप्रमाणे मटार घालतात. सारण सुद्धा जरा वेगळ्या पद्धतीने बनवले जाते. पण वडे मस्त लागतात. नाश्ता झाल्यावर परत चहा झाला. निरोप घेऊन निघायच्या तयारीत असतानाच माताजी एक मोठी पिशवी घेऊन आल्या आणि म्हणाल्या “आपको रास्ते में भूक लगेगी इसलिये सब्जी और पराठे दे रही हुं. जब भूक लगे तब खा लेना.” मग मला कळले कि माताजी सकाळी उठून कसला स्वयंपाक करत होत्या. आम्ही मनापासून आभार मानले आणि निघालो. आम्हाला परत परत वेगवेगळे अनुभव येत होते. अर्थात ते चमत्कारिक नसले तरी समाधानकारक नक्कीच होते. या अशा अनुभवांवरून मैय्या अस्तित्वात आहे याची खात्री पटते आणि मैय्या पावलोपावली तिची प्रचीती अशा भल्या माणसांकरवी देत असते.

राजपूर सोडून पळ्सूदच्या रस्त्याला लागलो. वाटेत एका माणसानी अडवले आणि कोण कुठले चौकशी केली. परिक्रमा करतोय असे सांगितल्यावर त्याने चहा प्यायल्याशिवाय सोडलेच नाही. नर्मदे हर म्हणून पुढे निघालो. रस्ता खूप अवघड आणि चढाचा होता. राजपूर पासून पळ्सूद २५ किमी वर आहे. हाश हुश करत पळ्सूदला पोहोचलो. तिकडे परत चहा, सामोसा, कचोरी आणि शेव असा नाश्ता केला आणि निवाली च्या रस्त्याला लागलो. रस्ता प्रचंड खराब होता आणि शिवाय चढ पाठ सोडत नव्हते. निवाली अजून १८ किमी होते. दुपारच्या टळटळीत उन्हात आम्ही निवाली ला पोहोचलो. हा सगळा आदिवासींचा भाग. खूप छोटी गावे आणि लोकांच्या अगदी मोजक्या गरजा. तिकडे खायला हॉटेल मिळायची मारामार. पण नशिबाने आम्हाला एक हॉटेल सापडले. सामोसा, पोहे, कचोरी असे खायला मागवले. तिकडेच श्री. राजेश चौहान नावाचे एक बस कंडक्टर चहा घेत होते. आमचा अवतार बघून त्यांनी चौकशी केली. पुण्याचे आहोत म्हणल्यावर ते म्हणाले “ मै मराठी actors कि नकल कर सकता हुं|” इती काकांनी विचारलं “कौनसे actors?” तो म्हणाला “ नाना पाटेकर और दादा कोंडके” नंदू काका म्हणाले “बहुत बढिया, करके दिखावो” असं म्हणल्या म्हणल्या त्याच्या अंगात नाना पाटेकर संचारले. कडक नक्कल करून दाखवली. दादा कोंडकेंची नक्कल बघताना मी हसुन हसुन लोळायचा बाकी होतो. त्याचे तोडके मोडके मराठी उच्चार ऐकताना फार मजा येत होती. पण खरंच हुबेहूब नक्कल केली. मनापसून दाद दिली त्याला. मग नेहमीप्रमाणे गप्पा रंगल्या. चहा घेऊन झाल्यावर पैसे द्यायला गेलो तर श्री. चौहान घाईने आले “आप परकम्मा(परिक्रमा) कर रहे हो, मै आपको पैसे नही भरने दुंगा.” असं म्हणुन त्यांनी पैसे भरले. मनापासून आभार मानून निघालो.

निवाली पासून खेतिया ३७ किमी वर होते. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे रस्ता खोदुन त्यावर खाडी टाकली होती. सायकल चालवताना प्रचंड त्रास होत होता. त्यात भर म्हणून मला सॅडल सोअर (सायकल चालवताना पृष्ठभाग सीटवर घासल्यामुळे जे दुखणे सुरु होते त्याला सॅडल सोअर म्हणतात) चा त्रास सुरु झाला. सायकलवर बसायची बोंब व्हायला लागली. तरी दुसरा पर्याय नसल्यामुळे तशीच सायकल दामटत होतो. नंदू काका सोबतच होते. त्यांना माझा त्रास सांगितला आणि त्यांनी सुचविल्याप्रमाणे आडोसा बघून कैलास जीवन चा मारा केला.
गुण यायला वेळ लागणार होताच, तोपर्यंत थोडं बसून आणि बरंचसं उभं राहून सायकल मारणं चालू ठेवलं. जवळपास ३० किमी खराब रस्ता होता. मैय्याची कृपा म्हणून कोणतीही सायकल एवढ्या खराब रस्त्यावर पंक्चर नाही झाली. खेतिया च्या अलीकडे ७-८ किमी वर चांगला रस्ता सुरु झाल्यावर कुठे जीवात जीव आला. माझा सॅडल सोअर चा त्रास सुद्धा सुसह्य झाला होता. नवीन रस्ता लागल्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी थांबलो. तिकडेच गायत्री मंदिर होते. दर्शन घेऊन येईपर्यंत सर्वजण आलेच. मग तिकडेच हिरवळीवर बसून सौ. द्विवेदी माताजींनी दिलेले पराठे आणि उसळ बाहेर काढले. आम्हा ५ जणांसाठी माताजींनी जवळपास २०-२२ पराठे दिले होते आणि त्याला पुरणारी मुगाची झकास उसळ, सोबत दाण्याची चटणी. अहाहाहा!! भूक लागली असल्यामुळे आडवा हात मारणं साहजिक होतं. माताजींनी दिलेलं सुग्रास जेवण करून आम्ही तिकडेच आडवे झालो.

गायत्री देवी मंदिर परिसर

पं. दीनदयाळ उपाध्याय – गायत्री मंदिर परिसर

खेतिया हे मध्यप्रदेशमधील शेवटचे गाव. त्यापुढे महाराष्ट्राची हद्द सुरु होते. १० मिनिटे विश्रांती घेतल्यावर निघालो. प्रकाशाला राहायचा प्लॅन फिक्स झाला. खेतियापासून शहादा २० किमी आणि तिकडुन पुढे प्रकाशा १५ किमी वर होते. संध्याकाळचे ५.३० झाले होते पण रस्ता मस्त होता. ताशी २८-३० किमी च्या वेगाने सुसाट निघालो. प्रकाशा च्या अलीकडे ८-१० किमी आम्हाला आमच्या दिव्यांची गरज लागली आणि ७ वाजता आम्ही प्रकाशा ला पोहोचलो. तिकडे तापी नदीच्या तीरावर केदारेश्वर नावाचे शंकराचे मंदिर आहे ज्याला दक्षिण काशी म्हणतात. मंदिराला लागुनच “श्री संत दगडूजी महाराज सत्संग भवन” नावाचा आश्रम आहे तिकडे राहण्याची सोय झाली. जेवण सुद्धा तिकडेच मिळाले. भरपेट जेवण करून सामानापाशी येऊन झोपायची तयारी करायला लागलो तर तेवढ्यात श्री. गणेश पाटील नावाचे सद्गृहस्थ आले. ते एका शाळेत शिपाई आहेत. आमची चौकशी केली आणि काही खायला हवे का विचारले. जेवण आत्ताच झाले असल्याने नको म्हणालो. मग त्यांनी सकाळी चहा घेऊन येतो असे सांगितले आणि गेले. थंडी असल्याने आम्ही लगेचच स्लीपिंग bag मध्ये शिरलो आणि निद्रादेवीच्या अधीन झालो.

केदारेश्वर मंदिर - प्रकाशा

संत श्री दगडूजी महाराज सत्संग भवन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच !

गणेश पाटील शाळेत प्युन / किंवा शिपाई आहेत असे करणार का ?
शाळेत पिऊन वाचायला फार विचित्र वाटतंय

हा भाग पण मस्तच. ओळख देख नसताना केवळ परिक्रमा करताय म्हणून इतकी आपुलकीने मदत करणारी, आदरातिथ्य करणारी माणसे भेटतायत ते वाचायला देखील किती छान वाटतंय .

नर्मदा परिक्रमेचे ३-४ वेगवेगळे अनुभव आजवर वाचले आणी दर्वेळी वाचताना तेवढीच मजा येते आणि मेधा म्हणते आहे त्याचं आश्चर्य वाटतं. तिथे राहाणारे आणि परिक्रमावासींना खाउ पिउ घालणारे लोकं कसं मॅनेज करत असतिल असं वाटतं, कारण रोजच त्यांना कोण ना कोण परिक्रमावासी भेटतच असणार...

छानच वाटतेय वाचायला. कृपया रस्त्याचे पण फोटो देणार का ? वाट किती अवघड आहे, त्याची निदान कल्पना तरी येईल.

हि सामान्य माणसे प्रत्येक यात्रीची अशी सेवा करत असणार... त्यांच्या श्रद्धेपुढे नतमस्तक व्हायला होते.

सगळे भाग वाचून काढले . मस्त लिहिताय . प्रत्यक्ष परिक्रमा केल्याचा अनुभव येतोय .

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत

वेदांग भाऊ, सलग वाचून आत्ता प्रतिसाद देतोय, ही परिक्रमा वाचायला सुरुवात केली अन मैय्याच्या आठवणीने डोळे पाझरायला लागले, हिंदू धर्मात गंगेचे महत्व अनन्यसाधारण आहेच, हे वादातीत आहे पण ह्या भागात (एमपी किंवा दक्षिण तटावरील विदर्भ मराठवाडा अन गुजरतेतले जिल्हे) नर्मदा लोकांचे सर्वस्व आहे, जे समाधानकारक अनुभव तुम्हाला आले ती इथली जनरीत आहे, मध्यप्रदेशात इंदौर उज्जैन बडवाह कडे भरपूर नातलग आहेत आमचे , दिवसाची सुरुवातच नर्मदे हर ने होते, आस पण ही की मरताना मुखात नर्मदा तीर्थ पडावे दोन थेंब, गंगा यमुना कावेरी गोदावरी कृष्णा आमच्या मावश्या आहेत अन माय फक्त नर्मदा इतके हे लोक ह्या नदीवर प्रेम करतात, शिवाय नर्मदा ही भारतातली एक अतिशय स्वच्छ (अजूनही) उरलेली नदी आहेच!! फर्स्टक्लास सुरु आहे परिक्रमा!! पुढील भाग लवकर येऊ देत,

-बाप्या

नर्मदा परिक्रमेच्या वर्णनाबद्दल छान लिहिलय. वाचून मी सुद्धा तुमच्याबरोबरच परिक्रमा करतोय की काय असे वाटले. मस्त...

मी नर्मदा परिक्रमेची बहुतेक सर्व वर्णन ,पुस्तके वाचिली,you tube वर ऐकली आहेत.पण मन भरत नाही.तुमच्या सारखेच अनुभव लोकांना येतात.एक मात्र आहे परिक्रमा करणाऱ्यांना अतिशय आदर पूर्वक वागवलं जातं. खूप छान लिहीत आहात. सायकलने परिक्रमा मात्र पहिल्यांदाच वाचत आहे.पुढील भागांच्या प्रतीक्षेत.फोटो पण खूप छान.