पिठलं ... आणि तोंड मिटलं

Submitted by मनीमोहोर on 14 September, 2015 - 18:56

कोकणात आमच्याकडे पावसाळ्यात भातशेती करतात आणि जमीनीचा पोत कायम राखणयासाठी हिवाळ्यात कुळथाचे पीक घेतले जाते. घरचेच असल्यामुळे सहाजिकच आमच्या आहारात भात आणि कुळीथ यांचा समावेश जास्त असतो. साधारण नोव्हेंबरच्या सुरवातीला कुळथाची पेरणी होते. याचे वेल असतात. कुळथाच्या वेलाचं हिरवगार शेत फार सुंदर दिसत. फेब्रुवारी मार्च मध्ये याच्या लांबट, शिडशिडीत शेंगेत दाणा तयार होतो. मग तोडणी, झोडपणी , पाखडणी वगैरे संस्कार होऊन चपटा , गोल, लालसर काळ्या रंगाचा दाणा मोकळा होतो खरा पण हाय, पुढे वर्षभर खाण्यासाठी आमच्या कोठी खोलीत बंदिस्तच केला जातो.

कुळथाचं शेत

From mayboli

आणि हे जवळुन

From mayboli

या कुळथाची इतर कडधान्याची करतात तशी मोड आणुन उसळ आणि कळण ही करतात. मोड आलेले लाल पांढरे कच्चे कुळीथ ही खूप सुंदर दिसतात. या उसळीत आम्ही इतर कोणता मसाला न घालता वेस्वार नावाचा फक्त आमच्याच भागात केला जाणारा मसाला घालतो. कुणी पाव्हणे मंडळी आली की खास म्हणुन एखाददा होतेच ही उसळ.

कुळथाचं पीठ करण्यासाठी त्याची डाळ करावी लागते. त्या साठी कुळीथ मडक्यात भाजुन नंतर ते जात्यावर भरडले जातात. मग पाखडुन सालं आणि डाळ वेगळी केली जाते. सालं काढलेली डाळ पिवळट दिसते. ही दळुन आणली की कुळीथ पीठ तयार. या डाळीच वरण अप्रतिम होत. डाळ शिजली की फार घोटायची नाही आणि जास्त पाणी ही घालायचं नाही. त्यात हळद , हिंग , मीठ आणि लाल मिरच्या, जीरं, सुकं खोबरं याच वाटण घालायचं. या वरणावर तूप न घालता नारळाचा घट्ट रस घालायचा . हे वरण, गरम भात आणि जोडीला पापड कुरडयांच तळण. आमच्याकडचा सॅालिड हिट बेत आहे हा.

नमनाला घडाभर कुळीथ खर्ची पडलेत आता पिठल्याकडे वळु या . अहो , उसळ,कळण काय किंवा वरण काय , हे पाहुणे कलाकार. कधीतरी होणारे. देशावर करतात त्या शेंगोळ्या तर आमच्याकडे कधी होतच नाहीत . खरं हुकमाच पान म्हणजे कुळथाचं पिठलं जे पानात वाढलं की पान खरोखर भरुन जातं. पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. आमच्याकडे कुळथाच पिठलं सगळ्यांना आवडतं . पिठलं म्हटलं की कुळथाचच, कधी चण्याचं केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज खाऊन ही त्याचा कंटाळा येत नाही . ह्या पिठलं प्रेमावरुनच माझ्या एका सासुबाईनी " पिठलं... आणि तोंड मिटलं अशी मुळी म्हणच तयार केली आहे. घरात काही महाभाग आहेत पानात पिठल्याचा थेंब ही पाडुन न घेणारे . पण ते किती ? अपवादाने नियम सिद्थ होतो म्हणण्या इतपतच.

जनरली कोकणात न्याहारीला पात्तळ पेज असते पण आमच्याकडे न्याहारीला असतो पिठलं भात. करायला अगदी सोप पण चवीला भन्नाट. थोड्या तेलात कांदा परतायचा , नंतर त्यात पाणी घालायच. मीठ, तिखट आणि चवीला एखाद सोलं टाकायच आणि अंदाजाने पीठ घालुन ढवळत रहायच, गुठळी होऊ द्यायची नाही. पाच सात मिनीटं उकळवायचं , पिढल्याचा घमघमाट दरवळला की गॅस बंद . पिठल तयार. हिरवी मिरची, कोथिंबीर असे पिठल्याचे लाड क्वचितच होतात कोकणात. गरम भात, तूप , पिठलं आणि दही भात त्यात चवीला पिठलं . तोंडी लावायला आंब्याच लोणचं . न्याहरीचा न्याराच बेत. ओरपा हव तेवढ. अशी भरभक्कम न्याहारी झाली की माणूस आहारला नाही तरच नवल.

एवढ जरी असल तरी दुपारच्या जेवणात पिठलं कधीच नसत. कारण दुपारच्या जेवणातल्या पीठल्याचा संबंध अशुभाशी लावला गेला आहे. हां पण पानातली भाजी अगदीच कोणाच्या नावडतीची असेल तर सकाळच्या उरलेल्या पिठल्याचा वाडगा त्याच्या समोर ठेवला जातो.मग त्याच जेवण बिनबोभाट होतं. शिळं पिठलं ही काही जणांना जास्त आवडत पण मला स्वत:ला नाही आवडत ते.

सणासुदीच्या दिवशी दुपारच गोडाधोडाचं जेवण, ते ही थोड्या उशीराच झालेलं. रात्री जेवणार नाही फक्त ताक घेऊ असं सांगुन पुरुष मंडळी ओटीवर गप्पा मारत बसलेली असतात. घरातल्या इतर माणसांसाठी आणि मुलांसाठी रात्री भात पिठलं केलच जातं. पिठल्याचा घमघमणारा दरवळ ओटीवरच्या पुरषांना स्वयंपाकघरात खेचुन आणतो. " घासभर पिठल भात खाईन म्हणतो" असं म्हणत एकेकाची विकेट पडायला लागते . आम्हाला याचा अंदाज असतोच. पिठल भात जास्तच केलेला असतो. पण मंडळी कधी कधी असा काही हाणतात पिठल भात की आम्हाला दोन्ही पुन्हा करावं लागतं . (स्मित )

पिठलं फक्त कोकणातल्या आमच्या हेड आॅफिस मध्येच केलं जात असं नाही तर मुंबई पुण्याच्या शाखांमध्ये ही ते तेवढ्याच आवडीने केलं जातं. पिठाचा स्टॅाक कायम लागतो घरात. अगदाी परदेशी रहाणारी मंडळी ही बॅगेतुन कुळथाच्या पिठाची पुडी आवर्जुन नेतात. ह्या पिठाचा वास बॅगेतल्या इतर वस्तुना चटकन् लागतो व तो लवकर जात ही नाही म्हणून जाड पॅकिंग करुन नेतात पण नेल्याशिवाय रहात नाहीत. इथे मात्र पीठ कधी संपलं तर चार दिवस आमटी, सार असं करुन काढले जातात, पण नंतर गावाला फोन केलाच जातो पीठ कुरिअर करा असा. वास्तविक हल्ली सगळीकडे कु. पी विकत मिळतं तरी ही कुरिअरने पीठ मागवणे हे खरं तर कोब्राना शोभत नाही. पण काय करणार? विकतच्या पीठाला आमच्याकडे बिग नो . पीठ घरचचं हवं. त्या साठी मग कुरिअरचा खर्च ही सोसायची ह्या कोब्रांची तयारी.

जाऊबाई सर्दी पडशाने बेजार झाल्या की जेवताना म्हणतात ,“ पिठलं वाढ ग थोडं, तोंडाला रुची येईल जरा " नवीन सुना घरात रुळायच्या ही आधी पिठलं आवडीने खायला लागतात. शिक्षणासाठी बाहेर रहाणारी मुलं घरी आली की "काकू, पिठलं पोळी वाढ, किती दिवस झाले खाल्लं नाहीये " असं म्हणतात. दोन वर्षाचं घरातलं छोटं बाळ वरणभाताला तोंड फिरवत आणि भात पिठलं मिटक्या मारत खात .

या सगळयामुळे पिठलं प्रेमाची आमच्या घरची ही परंपरा या पुढे ही अशीच कायम राहील याची खात्री पटते आणि मन आश्वस्त होते...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलंय. कुपि प्रचंड आवडीचं आहे.

बादवे, लेख एकाखाली एक असा दोनवेळा पेस्ट झाला आहे. तो एडिट करणार का प्लीज?

मस्तं!
मलाही कितीतरी वर्षं पीठलं म्हणजे कुळथाचंच असंच वाटायचं.
पीठलं - भात आणि लोणंचं म्हणजे स्वर्गव्ह.
तुम्ही पीठल्यात ठेचलेला लसूण घालत नाही का?

पीठल्यातलं आमसूल उकलून त्याच्या आत लपलेलं पीठलं जीभेच्या टोकाने हळूच चाटायला फार मजा येते.

आता स्थलकालपरत्वे बेसनाच्या पीठल्याची चव पण आवडायला लागलीच आहे.

आमच्याकडे पीठलं करावं तर आजीनंच.
तिच्या हातच्या घट्टसर पीठल्याची चव अजून आईच्या हातच्या पीठल्यालाही येत नाही.

मस्त लेख. दोनदा पोस्ट झालाय वर म्हटल्याप्रमाणे.
कुळथाचं पिठलं विशेष आवडत नाही, रादर पिठलंच आवडत नाही. घरातील मुख्य कोकणातल्या व्यक्तींना खूपच धक्का बसतो असं बोलून दाखवलं की. Wink

अहाहा कुळथाचे पिठलं. प्रचंड आवडतं. सुंदर झालाय लेख हेमाताई नेहेमीप्रमाणे.

गावाला कांदा घालून करतात बऱ्याचदा पण मी कांदा न घालता लसूण, मिरची, आले असे तुकडे फोडणीत घालते. लेकाचं पण प्रचंड आवडतं त्यामुळे आठवड्यातून एकदा होतंच. नुसतं प्यायलाही खूप आवडतं, लेकालाही. शिळे पिठलं प्रचंड आवडतं मला. मी मुद्दाम उरवते जास्तीचं करून. त्यात जाडे पोहे घालून खायला पण मला खूप आवडतं. मी कोकम घालते त्यात पण गावाला कैरीच्या दिवसात सासूबाई कैरी घालतात.

गावाला घरी नाही हल्ली पीठ करत पण गावाहून आणतो बऱ्याचदा विकत. ते करताना वास सुटला कि लेकरू माझं बघायला येतं.

कुळथाची उसळ आणि कळण पण खूप आवडतं.

वेसवारपण गावाहून आणतो, नवऱ्याला प्रचंड आवडतो. मी भाज्या घालून आमटी केली कि त्यात वेसवार घालते उसळीतही घालते. नवऱ्याला मौभात केला की त्यावर आवडतो.

पिठलं तोंड मिटलं, माझ्या आईचं पण वाक्य.

चला संध्याकाळचा मेन्यू ठरला आजचा. कुपि आणि भात. Happy

आहाहा.. किती मस्त चविष्ट लेख झालाय ममो.. खरोखरंच मन मोहरून आलंय!!!
मी स्वतः कधीच टेस्ट नाही केलंय , पण आता माहितीये कुठे हमखास मिळेल चाखायला Proud Wink
रच्याकने,'सोलं ' म्हणजे काय गं??

मला वाटतं कुळथाचं घट्ट, चपाती/भाकरी बरोबर खायला करतात ते पिठलं आणि भाताबरोबर खायला, थोडं पातळ करतात त्याला पिठी म्हणतात.

पिठलं/पिठी, दोंन्हिबरोबर सुका-खारावलेला बोंबील/बांगडा आणि पिनंन्वा मस्त जाते... Happy

तुमचा लेख वाचुन मी ब्रे फा ला पिठल (देशावरच) आणि पोळी अस करून खाल्लं तेव्हा कुठे प्रतिक्रिया द्यायला जीव शांत झाला.
कुलथाच पीठ (एका माबोकरणीने दिलेलं) आहे आता याच आठवड्यात त्याच पिठल करून खाते!

अतिशय चविष्ट आणि जमुन आलेला लेख!

कालच कुळथाचं कळण आणि उसळ केली होती. पीठलं पण एकदम कम्फर्ट फूड.
मस्त लिहिले आहे.

>>> अगदाी परदेशी रहाणारी मंडळी ही बॅगेतुन कुळथाच्या पिठाची पुडी आवर्जुन नेता >>> हे पण अगदी अगदी

ममो, मस्त लिहिलंयस. आज करावंच लागणार कुळथाचं पीठलं.

वेस्वार मला ऐकून माहिताय. कोब्रा खासियत आहे बहुतेक. इथे रेसिपी टाक ना गं.

मला पिठलं म्हणजे बेसनाचंच माहीत होतं. आमच्या शेजारी पूर्वी मराठे नावाचं कुटुंब राहत असे. त्यांच्याकडे पहिल्यांदा कुपिचं नाव ऐकलं आणि ते चाखलं. सुरवातीला आवडलं नाही फारसं. आता मात्र खूप आवडतं. पण फोडणीत भरपूर लसूण हवाच.

गरमागरम आंबेमोहोराचा गुरगुट्या भात, कुळथाचं पीठलं, त्यावर तूप, बरोबर लसणीची चटणी आणि कच्चा कांदा.....

शेताचे फोटोही टाकल का? कुळथाच सूप फार चविष्ट लागत .
काही वर्षांपूर्वी आईला उपचारासाठी बालाजी ताम्बेंकडे नेल होत तिथे हे सूप जेवणात दिल होत.
तर ते त्याचा उच्चार कुल इट सूप असा करत होते, मनात म्हंटल हे काय सूप असाव? आई म्हणाली अग कुळथाच आहे ? Uhoh
अवांतर बद्दल क्षमस्व !

साती ठांकु Happy
वॉव पिठल्यात आमसूल.. मस्त लागत असेल..

मामे.. कसला तोंपासु बेत दिलायेस.. श्या..>> आता सिरिअल जाणार कसे घशाखाली Uhoh
अ‍ॅक्चुली ममो ने सांगितल्याप्रमाणे ब्रे फा ची आयडिया फार आवडली.. पिठलं भात... स्लर्प!!!
वत्सला Lol

सायोसारखंच मलाही पिठलं फारसं नाही आवडत. खाल्लंच तर चण्याच्या डाळीचं, पण कुळथाचं पिठलं बिग नो नो. आमचे बाबा अगदी हताश होतात. Proud त्यांचं अगदी कम्फर्ट फूड आहे कु. पिठलं आणि भात म्हणजे.

तुमच्याकडे डांगर पण खाता का कालवून भाकरी/पोळीशी?

मनीमोहोर, किती सुंदर लिहिले आहे तुम्ही. तुमच्या आठवणींत कोकणाविषयीचा, तुमच्या घराविषयी जिव्हाळा आणि अभिमान इतका ओतप्रोत भरलेला असतो की वाचायला फार मजा येते.

कुळथाचं पिठलं लहानपणी विशेष आवडायचं नाही. आता उसळ, कळण, पिठलं सगळंच फार आवडतं. भाताबरोबर आवडतं पण पोळीशी लावून खायलाही आवडतं ( बेसनाचं पिठलंही पोळीशी लावून खायला आवडतं ) कांदा नसतो. लसूण आणि आमसूल हवंच. मामी म्हणतेय तसं पिठल्यासोबत कांदा कच्चा खायचा.

आणि हो, ती शीर्षकात वापरलेली म्हणही मस्त एकदम Happy

http://www.maayboli.com/node/44285

मामी ह्या वरील लिन्कमध्ये आहे वेसवार मसाला. दिनेशजीनीच लिहीलाय.

ममो, तोपासु लेख आहे, मस्त! आवडला लेख.:स्मित:

मामी कसच कसच.:इश्श: अहो आपण दिनेशजीन्चे धन्यवाद मानायचे.:स्मित: चालता बोलता खजिना आहेत ते.:स्मित:

किती छान लिहिलंय.
मला कुळथाचं पिठलं विशेष आवडत नाही (मला एकंदर पिठलं हा प्रकारच फारसा आवडत नाही), पण हे लिहिलेलं खूप आवडलं. घरी मी सोडून समस्त प्रजा कुळथाच्या पिठल्याची फॅ.क्ल. आहे. हे वाचून पुन्हा एकदा कु.पि. चाखून पहावंसं वाटलं, खरंच.

मस्त लिहीलय. Happy पण मी म्हणते पिठलं, मन विटलं... आवडत नाही.
कुळीथ कधी खाल्लं नाही, काळ होते ना बहुतेक हे पिठल ? कधीतरी पीठ मिळाल तर नक्की करून खाईन. Happy

व्वा !
मी हे खाल्ले नाहिये कधी.. पण वाचून भूक लागली..
बेत जमवून आणावा लागेल लवकरच Happy
लेख मस्तच जमलाय Happy

मनीमोहोर, किती सुंदर लिहिले आहे तुम्ही. तुमच्या आठवणींत कोकणाविषयीचा, तुमच्या घराविषयी जिव्हाळा आणि अभिमान इतका ओतप्रोत भरलेला असतो की वाचायला फार मजा येते. + १११११

मलापण कुळथाचं पिठलं आणि उसळ दोन्ही प्रचंड आवडत Happy पण त्यात लसुण मस्ट.

कुळथाचं पिठलं, उसळ, कळण खूप आवडतं. आम्ही चण्याच्या किंवा कुळथाच्या पिठल्यात कांदा घालत नाही. चण्याच्या पिठल्यात तर लसूणही नाही. कुळथाच्या पिठल्यात फोडणीत लालसर केलेल्या लसणीच्या पाकळ्या, लाल तिखट, मीठ, आमसूल एवढंच. घातली तर कोथिंबीर, नाही तर नाही. मी वाट्या वाट्या भरून पिते हे गरम गरम पिठलं.

मी देखिल शुभ दिवशी/सणावारी संध्याकाळीसुद्धा पिठलं करत नाही.

Pages