"अव दातारम |"

Submitted by शमा on 18 August, 2015 - 18:25

.. ॐ नमस्ते गणपतये...

कानावर नेहमीचे सूर आले आणि नकळत ती त्याच्या अस्तीत्वाच्या तिच्यात असलेल्या खुणा शोधू लागली. रोजचा नियम तिचा. काही झालं तरी अथर्वशीर्ष ऐकल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही. अगदीच नाही जमलं तर गाडीत एक सीडी कायम असायची. येणाऱ्या दिवसाला सामोरं जायच बळ यायच मग. एक छोटूसा गणपतीही होता. एरवी नाही व्हायचं तिला पण गणेश उत्सवाचे दहा दिवस रोज एक लालचुटुक जास्वंदाच फूल त्या छोटूशा गणपतीमागे विसावायच. वर्षभर हिच्या गाडीत जीव मुठीत धरून बसलेला तो बाप्पा मग आनंदाने फुलांच्या पाकळ्यात गुरफुटून बसायचा. कारसीटमधे बसलेल्या बाळासारखा.

त्याच्या हाती स्वतःला सोपवून मग सगळ्या लढाया लढत राहायची. कधी हरायची कधी जिंकायची. हरली तरी तक्रार नाही करायची त्याच्याकडे. जिंकली तरी उन्माद नव्हता. रोज नवी लढाई आहे तिला ठाऊक होत. काही जिंकून देऊ शकत होता काही नाही, अस साध सरळ सामंजस्याच नातं. मर्जी तुझी अस म्हणून पुन्हा कर्म एके रे कर्म हा पाढा सुरू. कधी कधी त्याच अस्तित्व जाणवेल असे प्रत्यय यायचे मात्र. एकदा घरातून निघताना काहीतरी विसरलेली ती अर्ध्या रस्त्यातुन माघारी आलेली आणि घरून निघून पुन्हा तिथे जाईपर्यंत रस्त्यात भयंकर अपघात झालेला. अगदी काही क्षणांचा खेळ. आपण या क्षणी तिथे पडलेलो असतो ह्या विचाराने अंतर्बाह्य हादरून गेलेली. गर्दीतून बाहेर येताना मग भरून आलेल्या डोळ्यांनी त्याला शोधत बसलेली. हे अस काही सांगितल की मग हसायचे सगळे. योगायोग असतात सगळे हा युक्तिवाद. पण ते योगायोग जसे घडतात तसेच का घडतात, एरवी का बरं ती काही विसरत नाही घरातून बाहेर पडताना? आजच का? अनेक प्रश्न असतात. वाद घालायचा ठरवल तर तिलाही येतच होत की. पण तिने ठरवल होत, जास्त कुणाला समजून सांगत नाही बसायचे. हसू देत बापडे. त्याच अस्तित्व मान्य करण्यात तिला कसलाही कमीपणा वाटत नव्हता,पण तरी जाणीवपूर्वक तिनं स्वतःपुरत मर्यादीत ठेवलेलं. त्याला ज्याच्या मनात जायचय त्याच्या मनात जायला आपल्या बड्बडीची गरज नाही हे पुरेपुर ओळखलेल.

गणपतीचे दहा दिवस म्हणजे सुख! थकूनभागून घरी आली की असा प्रसन्न बसलेला बाप्पा पाहिला की घर घर वाटायचं! त्याच्या करूण डोळ्यात पाहिल की तिला वाटायचं जणू काही बाप्पा म्हणतोय, "किती धावशील. बस जरा शांत. झाला माझ्याकडून मोठा पसारा. चालायचंच. हा पसारा नाही आवरला तरी चालेल. पण मनाचा पसारा आवरायचा वेळीच." असा दहा दिवस तिला आधार. मग जायच्या दिवशी दोघं टाळायचे नजरभेट. हा असा जीव लावून पुन्हा निवांत मी परत येतो म्हणाला की तिचा धीर सुटायचा. आता घर रिकामं रिकामं होणार म्हणून डोळ्यातल पाणी मागे ढकलायची. शेवटी नाहीच जमायच तिला. व्हायचीच नजरभेट. पण तरी कुठे काय? ते जरा धूपाच्या वासाने ठसका लागला अस म्हणून ती डोळ्यावाटे बाहेर पडणारा आवेग आतल्या आत आवरायची. तिची त्रेधातिर्पीट पाहून तोही हसायचा तिला.

सगळे उन्हाळे पावसाळे पाहिले त्याच्या सोबत. आता निवांत त्याच्याशी बोलायला, त्याला बघायला, चतुर्थी नसली तरी मोदक करायला आणि रोजच लाल फूल वहायला वेळ होता तिच्याकडे. तिला आठवल पहिल्यांदा दिवस गेले तेव्हा कुणी सांगितल हे स्तोत्र म्हण, कुणी सांगितल ते म्हण. कुणी म्हणाल अस ध्यान कर. तिनं ऐकलं सगळ्यांचच पण नाही मन रमल कशात. हिला टेन्शन अरे आपण काळजी नाही घेत वाटत बाळाची. मग एक दिवस त्याच्यासमोर उभ राहून खड्खडीत आवाजात म्हणून काढल अथर्वशीर्ष. डोळे उघडले तेव्हा दीपवून टाकणारा प्रकाश होता. ऊन किती वाढलंय म्हणून पुन्हा डोळे मिटले तरी तोच प्रकाश. मग जाणवलं स्पष्ट. तो असताना काळजी करत बसली होती. लख्ख उजेड पाडला त्यानं डोक्यात. मग निर्धास्त झाली. नऊ महीने न चुकता ऐकवल अथर्वशीर्ष बाळाला. त्यानंही ऐकलं. बाळ सरस्वती घरी आली आणि घर भरून गेल कधी रिकामं न होण्यासाठी. मग थोडे दिवस दुर्लक्ष झालं तिचं त्याच्याकडे. पण तो येत राहिला न चुकता.

तिच्या राणुचा आवडता फ्रॉक. खूप तोकडा. दिसायचा मस्त पण बाहेर ही थंडी पडलेली. त्यात पांघरूण कधी अंगावर ठेवण्यासाठी असतं हेच मान्य नसायच. मग हिचा नियम रात्री झोपताना अंगभर कपडे घालून झोपवायच. लहान होती तोवर ठीक होत पण चालू पळू लागली मुलं की प्रचंड आत्मविश्वास येतो त्यांना. अगदी धरून धरून पावलं टाकत असली तरी जग जिंकल्याचा भाव असतो चेहऱ्यावर. मग आपण आपल्याला हव ते घालू शकतो,घालायला लावू शकतो हा स्वावलंबी व्हायचा पहिला धडा गिरवला जातो. पु.लं च्या दिनेश प्रमाणे मग तो इवला जीव "ही चड्डी नको" म्हणत घरभर फिरतो. तिच म्हणणं दोन वर्षाच्या बाळासाठी चड्डी ही काय चॉइस करायची गोष्ट आहे का?

म्हणून घरभर पळून शेवटी थकून बसली की बरोबर राणु तिला हवा असणारा रंग हुड्कुन आणणार् आणि तिच्या समोर धरणार. सगळा राग कुठच्या कुठे पळून मग ती हसून तिला जवळ घेणार. इतरही अनेक धडे असतात स्वावलंबी व्हायचे जस की आपल्या हाताने थोडं तरी का होईना जेवायला शिकणे पण काही विद्यार्थ्यांच्या आपला वेळ वाया जातोय हे लगेच लक्षात येत, जेवत जेवत खेळूही शकतो ही शक्यता लक्षात आली की मग आईने भरवल्याशिवाय जेवण संपत नाही आणि इतर सगळ्या बाबतीत जस की बाहेर गेल्यावर बोट धर म्हणल्यावर उम्म्म म्हणून पुढे पळणार् बाळ जेवणाच्या बाबतीत मात्र आईला बिनाशर्त शरण जात.

अगदी ह्याच वर्गात बसणारी तिची राणु. आत्ता कुठे सर्दी कमी झालेली आणि तिचा दंगा तोच फ्रॉक्क पाय्जे. या वादळाची चाहूल लागून तिच्यातल्या आईने तो फ्रॉक्क आधीच कप्प्यात अगदी आत सारून ठेवलेला. मग काहीशा नाराज मनान तिनं आईने घातलेले कपडे घालून निद्रादेवीला हुल्कावणी देत पडल्या पडल्या चाललेले खेळ. बाळाला सवय अथर्वशीर्ष ऐकत झोपायची. बोलत नव्हती तोपर्यंत ठीक होत पण बोलायला लागल्यावर मग हीच प्रत्येक वाक्याला म्हणजे काय? तयार. तिला माहीत होते अर्थ पण एवढ्या लहान बाळाला समजेल अस सांगायच म्हणजे तिची परीक्षा असायची. कधी कधी तिला उत्तर सुचेपर्यँत राणु डोळे मिटून स्वप्न नगरीत गेलेली असायची आणि ही हुश्श करायची. तरी गाडी कशीतरी ढकलत रहायची रोज न कंटाळता.

त्या दिवशी नेमका "अव दातारम " ला आला प्रश्न "दातारम म्हणजे काय?"

अरेच्या हे सोप्पय की मनातल्या मनात तिनं खुश होऊन दिलेलं उत्तर.

"अग दातारम म्हणजे देणारा."

अजून वाक्य पूर्ण होतय तोपर्यंतच पुढचा प्रश्न, "काय देतो?"

आता तिला समजाव म्हणून सांगितल, "जी बाळ आईच ऐकतात की नाही, त्यांना देवबाप्पा छान छान खेळणी देतो कपडे देतो"

इथे क्षणाचाही वेळ न घालवता, "तो फूलाफुलांचा माझा छान छान फ्रॉक्क देणार आहे?"

आता तिची अवस्था खिंडीत सापडल्यासारखी. हो म्हणाव तरी आत्ता दे म्हणून ही गोंधळ घालणार. नाही म्हणाव तर पुढच्या "का" ला काय उत्तर शोधणार?

त्यातल्या त्यात मध्यम मार्ग म्हणून तिनं हो देणार आहे ग उद्या अस सांगताच अगदी विश्वासाने आपल्याला काय हवय हे माहीत असलेली तिची राणु म्हणते

"धुवून द्यायला सांग प्लीज." ही अवाक. काही क्षण काय झालं तेच कळलं नाही तिला. मग झोप विसरून डोळ्यात पाणी येईपर्यंत हसली ती. राणुची झोप लागली तेव्हा तिच्या केसातुन हात फिरवता फिरवता तिला जाणवलं, या ह्रुदयीचे त्या ह्रूदयी काही अंशी तरी जात होते. असच थेंब थेंब का होईना पाणी घालत राहिल की त्याचा व्रुक्ष होणार होता आणि त्याच्या सावलीत तिची राणु राहणार होती.त्या दिवशी ती झोपली तेव्हा खूप खूप निश्चिंत होती.

काळ पुढे सरकत होता. घरभर आई आई करत मागे फिरनारी चिमणी आता उंच भरार्या घेत होती. आज फोन करून बोलूया निवांत अस स्वतःशी ठरवल तिनं. अशी विचारात रमलेली असतानाच फोन वाजला. उचलला तर पलीकडे तोच आत्मविश्वासपूर्ण आवाज, "आई आज माहिती का आज तुझी खूप म्हणजे खूप म्हणजे इंफायनाइट आठवण आली. आज येतेच मी तुझ्याकडे. अथर्व कालच म्हणत होता तुला आज्जीसारख येतच नाही अथर्वशीर्ष!"

( इतरत्र पूर्वप्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलय. Happy
[एरवी "संस्कार" हा शब्दजरी कानी पडला तरी अंगावर पाल पडल्याप्रमाणे किंचाळणार्यांना व नाके मुरडणार्‍यांना आणि संस्कार म्हणल्यावर लग्गेच कसली तरी "बंधने अन ती देखिल स्त्रीवरच" अशा काही गैरसमजात असणार्‍यांना हे वाचून काही कळले तर बाप्पाच पावला असे म्हणावे लागेल]

मस्त.. सकाळी सकाळी वाचायला मिळाल्याने दिवसाची पॉझिटिव्ह सुरुवात झाल्यासारख वाटल > + १००००००००००००० . खूप खूप मस्त वाटलं .

मला फार प्रयत्न करूनही कधी पाठ झाल नाही अथर्वशिर्ष . बाबानी बहिणीला शिकवलं .
गणपतिच्या पाच दिवसात कधितरी एक दिवस शेजारचे काका हक्काने यायचे ,बाप्पाला अभिषेक करत अथर्वशिर्ष चा जप करायचे. नंतर मग बाबा आनि बहिणीने नेम चालू ठेवला .
बाप्पाची फार फार फार आठवण आली . तसा आता येइलच म्हणा आता महिन्याभरातच.

अवांतरा बद्दल क्षमस्व.

छान कथा! Happy

वर्षभर हिच्या गाडीत जीव मुठीत धरून बसलेला तो बाप्पा मग आनंदाने फुलांच्या पाकळ्यात गुरफुटून बसायचा. कारसीटमधे बसलेल्या बाळासारखा.>>
किती मस्त उपमा.

किती सुंदर लिहिले आहे! डोळ्यांत पाणी आले..
लिंबूटिंबू, कंसातली वाक्ये अस्थानी आणि अनावश्यक वाटली. का? सगळीकडे का? हे स्वगत आहे. उत्तराची अपेक्षा मुळीच नाही. कृपया उत्तर देऊन धागा भरकटवू नये.

काही काही वाक्ये खुप आवडली! निरागस श्रद्धा! कुठलेही अवडंबर न माजवता स्वतःवरचाच विश्वास दृढ करणारी! प्रचंड पॉझिटिव्ह वाटलं!!

कंसातली वाक्ये अस्थानी आणि अनावश्यक वाटली.>> सहमत

सुंदर.

बाप्पा मग आनंदाने फुलांच्या पाकळ्यात गुरफुटून बसायचा. कारसीटमधे बसलेल्या बाळासारखा. >>> आता बाप्पाला जास्वंदीचे फुल वाहताना नेहमी ही उपमा आठवणार. Happy

Pages