हायकू

Submitted by vilasrao on 19 June, 2015 - 17:05

शांत तळ्यात
लपलेला हा मासा
चमके तरी

आकाशी पक्षी
सांगे ढगात घर
घर पंखात

काळखी रात्र
चंद्राला शोधू नका
ती अमावस्या

गोंधळणारा
प्रवास सोबतीला
रस्ता तुडूंब

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा जापानी काव्यप्रकार 'हायकू' !
१ ल्या ओळीत ५ अक्षर
२ र्या ओळीत ७ अक्षर
३ र्या ओळीत ५ अक्षर
मराठीत पचेल का ?
मला नाहीं आवडला हायकू !!!
तुमचे मत सांगा !!!

हायकू मी अगोदर सुद्धा एकदा वाचलेत. पण विसरून गेलेलो..
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ..

मलातर छान वाटला हा प्रकार .. कमी शब्दात जास्त सांगायला छान वाटत .. Happy

थोडेसे शब्द
दडलेला भावार्थ
कूल हायकू .. Happy

तुम्हाला का नाही आवडला हा प्रकार.?
आणि तुम्ही पहिल्या कडव्यात शेवटच्या ओळीत ७ अक्षर का लिहियेत.?
तसाच नियम आहे का .?

तुमच्याकडे काही हायकू असल्यास येथे उधृत करावेत (प्रताधिकार पाहून).. वाचूयात Happy

छानच आहे. आवडले. हाइकू हा प्रकार तसा सोपा दिसतो पण करायला सोपा नहिये. अगदि कमीत कमी शब्दात वाचका पर्यंत आपल्या भावना पोचल्या पहिजेत. तुम्हाला ते छान जमले आहे.

हायकू लिहितांना मोजके शब्द वापरून भावार्थ कळेल असे मलाच वाटत नाही!
उदाहरण:

कुंकवातील
पावित्र्य जपतेच
ह्या संस्कृतिला

पाउलखुणा
जपून चल बघ
मागे तुझ्या त्या !

वेळातवेळ
काढावाच तू पण
जगण्यासाठी

प्रतिक तुम्हाला काय वाटते !

हायकू लिहितांना मोजके शब्द वापरून भावार्थ कळेल असे मलाच वाटत नाही! >>>> मला वाटते हेच एक छान आवाहन आहे.. नक्कीच कळेल ! हा प्रकार एकदा समजून घ्यायला हवा ..

http://www.marathiworld.com/muktangan-m/muktangan-lekh22
हि लिंक पहा ..
मराठी हायकू असे गुगललो तेव्हा सापडली ..
या लेखाप्रमाणे हायकू म्हणजे एक उत्स्फूर्त उद्गार आहे म्हणे.. ते गझलेप्रमाणे काही काळ मनावर ताबा मिळवलेल्या भावनांचे वर्णन, किंवा कवितेमध्ये एखादे निसर्गाच्या रूपाचे शांतपणे केलेले वर्णन नाही.. तर एकदम अचानक अद्भुत काहीतरी पाहून निघालेला, उत्स्फूर्त उद्गार आहे.. असे असेल तर मात्र एवढे शब्द पुरून उरतील असे वाटते.. Happy

शिरीष पै (आचार्य अत्रेंच्या कन्या) यांनी केलेल्या 'हायकू' मिळवुन वाचा. मराठीत 'हायकू' हा प्रकार रुढ करण्याचे श्रेय त्यांना जाते.

कुंकवातील
पावित्र्य जपतेच
ह्या संस्कृतिला

पाउलखुणा
जपून चल बघ
मागे तुझ्या त्या !

वेळातवेळ
काढावाच तू पण
जगण्यासाठी
>>> हे हायकू म्हणाव का ?

http://www.nirantar.org/1206-vatayan-samiksha

हि लिंक बघा ,,,,

५ ७ ५ अक्षरातच हायकू असायला पाहिजे!
आपण दिलेला संदर्भ मला तिथे चारोळी सारखा तिनोळी वाटतो
ते हायकू नाहीच ,,!

विलासजी , माझ्या माहितीनुसार ५ ७ ५ हा जपानी हायकूचा नियम आहे हे अगदी खरे पण तो जेव्हा शिरीष ताईंनी मराठीत आणला तेव्हा हे नियम शिथील केले ... त्यांच्या पुस्तकातले हायकू सुद्धा याची साक्ष देतील ... मात्र यमक साधले गेलेच पाहिजे तीन पैकी कोणत्याही दोन ओळीत . आणि कमितकमी शब्दांत ... शेवटच्या ओळीत कलाटणी आवश्यक ... शक्यतो निसर्गावर ...
मीही असे अनेक हायकू लिहिलेत ...

विलासरावजी,पहिल्यांदा तुमचे अभिनंदन करतो!
तसेच तुमचे,प्रकु आणि कविताजींचे मनापासून आभार व्यक्त करतो!
या प्रकाराबद्दल इथेच वाचलेली थोडीशी माहिती गाठीशी घेवून प्रतिसाद लिहितो आहे!(अर्थात,चूक-भूल माफ कराच!)

विलासरावजी,तुम्ही काही म्हणा...प्रकु सांगतायेत तितके 'उत्स्फूर्त उद्गार' स्वरुपाचे वाटले नाही,कविताजींनी सांगितलेल्या काही नियमांत बसत नसले,तरीही आपले हायकू नक्कीच 'तंत्र-मंत्र-शुद्धते'च्या अगदी जवळ वाटताहेत मला!तुमच्या भावना पोहोचत आहेत नक्कीच त्यातून!

>>>पाउलखुणा
जपून चल बघ
मागे तुझ्या त्या !>>>आयुष्याच्या वाटेवर चालताना,आपण आपल्या बऱ्या-वाईट आठवणी कुणासाठीतरी सोडत असतो,तेव्हा जपून,जाणिवपूर्वक,आपल्या चांगल्या गोष्टीच मागे उराव्यात असे चालायला हवे!

>>>वेळातवेळ
काढावाच तू पण
जगण्यासाठी>>>आयुष्याच्या रगाड्यात 'जगण्यासाठी' वेळ हमखास काढावाच! यातला 'तू पण' सांगतो आहे...की,मी किंवा कुणीतरी असा खास वेळ काढून (का होईना!) 'जगतो'! तसाच तू ही 'जग'!

माझ्या बुद्धीला लागलेले हे (इतके काय ते!) अर्थ! तुम्हाला असेच काहिसे म्हणायचे असेल तर...आणि बाकी नियमांत बसवून लिहाल,तर नक्कीच हे 'हायकू' असतील!

अनेक लेखन-शुभेच्छांसह...
सत्यजित...

Disclaimer - I'm not a poet or writer or critic, just a reader who at a point of time was enchanted by the Japanese Haiku form.

विलासजी , माझ्या माहितीनुसार ५ ७ ५ हा जपानी हायकूचा नियम आहे हे अगदी खरे पण तो जेव्हा शिरीष ताईंनी मराठीत आणला तेव्हा हे नियम शिथील केले ... त्यांच्या पुस्तकातले हायकू सुद्धा याची साक्ष देतील ... मात्र यमक साधले गेलेच पाहिजे तीन पैकी कोणत्याही दोन ओळीत . आणि कमितकमी शब्दांत ... शेवटच्या ओळीत कलाटणी आवश्यक ... शक्यतो निसर्गावर ...>>>

५ ७ ५ हा नियम जपानी भाषेत शक्य होता कारण जपानी भाषा चित्रलिपीत लिहिली जाते आणि सन्दर्भाने चित्रान्चा सुक्ष्म अर्थ ठरतो. अन्य भाषात अर्थातच हे अशक्य नसले तरी सोपे नाही. वरती मूळ लेखात विलासरावाना पहिली आणि चौथी हायकू मस्त जमलीय.

यमक साधले पाहिजे हा नियम किती कडक आहे माहित नाही. मात्सुओ बाशो हा सतरव्या शतकातला नावाजलेला जपानी हायकू लेखक होता. त्याची त्याकाळात (म्हणजे मी हायकूने भारावलेली तेव्हा Happy ) वाचलेली आणि माझी सगळ्यात आवडती हायकू इथे वाचा...
http://www.bopsecrets.org/gateway/passages/basho-frog.htm
त्यात तरी यमक साधलेले वाटत नाही.

मी कुठेही असे स्पष्ट शब्दात वाचले नाही पण शिरीष पै यान्ची खालिल हायकू मला बाशोच्या हायकूचा स्वैर अनुवाद वाटते... आणि सर्वात आवडता अनुवाद आहे. Happy

तळ्यात तळे
तळ्यात तळे
तळ्यात डुबुक

विलासरावजी,तुम्ही काही म्हणा...प्रकु सांगतायेत तितके 'उत्स्फूर्त उद्गार' स्वरुपाचे वाटले नाही, >> हे खरे! आणि 'उत्स्फूर्त उद्गार' हा हायकूचा प्राण!

तळ्यात तळे
तळ्यात तळे
तळ्यात डुबुक >>यातून काय बोध होतो हेच मला कळत नाहीं!
कदाचित आकलन शक्ति माझी कमी पडत असेल!

मी स्वतः अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतोय मुळ हायकू बात्सोचा असा आहे
BASHŌ 'S

World famous Original haiku !

फुरू इके या (2+2+1)=5
कावाझू तोबिकोमू (3 +4)=7
मिझू नो ओटो (2+1+2)=5

---------------------------
Furu ike ya
Kawazu tobikomu
Mizu no oto
---------------------------
Japani -->English

Furu = to wave,to shake
Ike=pond
Ya= valley

Tobikomu=to jump in,to dive
mizu=water
no=possessive particle (an arch) (तरंग)
oto =sound

...............
माझ्या मते अनुवाद असा पाहिजे
--------*--------

शांत तळ्यात

बेडूक सूर मारी

नाद तरंगें
-------*----------
५ /७/५ नियम सुध्दा पाळल्या जाईल ,,

सविस्तार अर्थ बघुया नंतर !

Furu ike ya
Kawazu tobikomu
Mizu no oto

ज्यावेळेस मी हे पहिल्यांदा कुठल्यातरी पुस्तकात वाचले होते, तेव्हा त्याचा हा इंग्रजी अनुवाद दिलेला होता.
Old pond — frogs jumped in — sound of water.

त्याचा मी घेतलेला अर्थ असा होता. स्तब्ध, कुंठीत तळे आहे जिथे वर्षानुवर्षे काहीच हालचाल नाही. कधी कुणाच्या आयुष्याला पण असाच कुंठीतपणा येत असेल. अशा ह्या तळ्यात बेडकाने उडी मारण्यासारखी क्षुल्लक घटना घडली आणि तरंग उठले. ती स्तब्धता, कुन्ठीतपणा संपला.
मला "तळ्यात तळे, तळ्यात तळे" ह्यात का कोण जाणे ते कुंठीतपण कमीतकमी शब्दात व्यवस्थित प्रतीत झाल्यासारखे वाटले.
मी दिलेल्या लिंकमध्ये वेगवेगळे अनुवाद आहेत. जी अनुभूती मला वाटते ती मला तळ्यात तळे मध्ये कमीतकमी शब्दात उमटली आहे असे वाटते आणि त्यामुळेच मला तो अनुवाद असावा असे वाटले आणि तो अनुवाद माझा सगळ्यात आवडता आहे.
हे सगळे माझ्या डोक्यात इतकं घट्ट बसलंय, की दुसरा कुठचा विचार त्यात असेल असं वाटतच नाही.

शांत तळ्यात
बेडूक सूर मारी
नाद तरंगें

अनुवाद सुंदर जमलाय. I can say its my next favorit after "तळ्यात तळे" Happy

देवळातल्या घंटेचा नाद
दूर दूर लोपला
रस्ता तिथेच संपला

एक पक्षी दुपारचा
सावलीच्या शोधात
अचानक हिरव्या बनात

हे पुर्वी वाचलेले आणि लक्षात राहिलेले काही हायकू, नियमात बसतात की नाही माहित नाही.

मुळातच चर्चेला मी सुरवात 'हायकू हा प्रकार मराठीत पचनी पडेल काय?' माझा नकारात्मक पवित्रा घेवून केली. या विषयावर ज्यांनी भाग घेतला ,मत मांडले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो .
आलेल्या प्रतिक्रियेंतून हायकू विषयी जी महत्वपूर्ण व विशेष माहिती मिळाली, त्यामुळे
जी जिज्ञासा,आवड उत्पन्न झाली की आपसूकच या विषयात खोलवर शिरायचा मी प्रयत्न करतो आहे !

सुरवातिलाच मुळ लेखात जे हायकू मी उधृत केले तो माझा हायकू लिहिण्याचा पहिला प्रयत्न होता,त्यावर पद्मावती'जी ,प्र. कु ,भ्रमर यांचा प्रतिसाद आल्यावर थोडा हुरूप आला !

उदाहरण म्हणून मी काही हायकू उधृत केले व मला हे विचारायचे होते की एवढ्या कमी शब्दात कवि त्याचा भावना समर्थपणे वाचकापर्यंत पोहोचवू शकतो काय ? मला आश्चर्य वाटले की सत्यजित'जी नी जे मला मला नेमके म्हणायचे होते नेमक्या त्याच भावनांचे १०० प्रतिशत अचूक विश्लेषण केले,
खूप छान वाटले,आनंदही झाला पण तंत्रशुध्दतेचा प्रश्न शिल्लक उरतोच !

कविता'जींनी शिरीष ताईनी मराठीत हायकू प्रकारासाठी शिथील केलेले नियम ,यमकांचे बंधन ,विषयाला कलाटणी इत्यादि बाबी थोडक्यात सांगितल्या त्याबद्दल त्यांचे विशेष आभार ! कविताजींनी काही हायकू मायबोलीच्या धाग्यावर "हायकू सदृश्य कविता" म्हणून पोष्ट केलेल्या आहेत ,त्या सर्व अत्यंत सुंदर आहेत व मला आवडल्या .
वंदना'जी आपणसुध्दा स्वैर अनुवादित हायकू चा सविस्तार अर्थ तुम्हाला कळाला तो खूप छान समजावून सांगितल्याबद्दल मी आभारी आहो .

आलेल्या प्रतिसादातून व माझ्या अवलोकनातून मी ज्या निष्कर्षाप्रत पोहचलो व आता हायकू विषयी माझे नवीन मत काय हे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो . कृपया कोणीही गैरसमज करून घेवू नये व काही चुका असल्यास मोठ्या मनाने माफ कराच !

एखादवेळी काहीतरी विशेष घडल्याचे मनाला वाटणे व त्यामुळे ज्या उस्फूर्त भावना मनात उत्पन्न झाल्या त्यांचे मोजक्या शब्दात प्रतीकात्मक शैलीत मांडने म्हणजे हायकू!

हायकूचे जनक बात्सो यांनी ही शैली विकसित केली, पाच / सात/ पाच अक्षरे व त्यात दडलेला भावार्थ मांडून अर्धवट सोडून दिलेली कविता म्हणजे "हायकू"!

जणू वाचक त्याच्या मनात ती कविता पूर्ण करतो ! अन हे अगदी खरे सुध्दा आहे !
बात्सोंचे जे हायकू आहेत त्यांचे अनुवाद जरी वेगवेगळे असले तरी भावार्थ एकच आहे !
हेच हायकू चे खरे तंत्र!

हायकूत अक्षरछंद पाळल्या जातो ,यमकाचे बंधन नाही .
अनेक हायकू बात्सोंचे अभ्यासल्यानंतर एक निश्चित रुपरेखा हायकूचा आकृतिबंध कसा असावा यासाठी मनात तयार झाली .
ती अशी,,,,,

हायकू तीन भागात विभागल्या जातो

१)निसर्ग किंवा भोवतिचे वातावरण
२)घडलेली एखादी घटना
३)निसर्ग किवा वातावरणात झालेला बदल

यामध्ये प्रतिकांचा प्रभावी वापर करून कविने त्याच्या भावना नेमक्या ५ / ७/ ५ या नियमाचे पालन करून पोहोचविने म्हणजे यशस्वी हायकू लिहिण्याचे तंत्र कविला अवगत आहे असे समजता येईल असे मला वाटते .

या निष्कर्षाच्या आधारावर मी उधृत केलेल्या मुळ लेखातील हायकू पैकी फक्त पहिला व चौथा हायकू म्हणता येईल बाकी हायकू सदृश्य कविता सुध्दा म्हणता येत नाही !
ज्या हायकूचा अर्थ सत्यजित'जी नी मला अभिप्रेत असलेला काढला तरी ते हायकू नाहीत असे माझे मत आहे !

उदाहरण म्हणून मी काही हायकू उधृत केले व मला हे विचारायचे होते की एवढ्या कमी शब्दात कवि त्याचा भावना समर्थपणे वाचकापर्यंत पोहोचवू शकतो काय ? मला आश्चर्य वाटले की सत्यजित'जी नी जे मला मला नेमके म्हणायचे होते नेमक्या त्याच भावनांचे १०० प्रतिशत अचूक विश्लेषण केले,
खूप छान वाटले,आनंदही झाला पण तंत्रशुध्दतेचा प्रश्न शिल्लक उरतोच ! >>>>

विलासराव खरतर तुमच्या हायकू वाचल्यावर तुम्हाला हा प्रश्न का पडावा हा प्रश्न मला पडला! तुम्हालाच छान जमल्या आहेत की! आणि अगदी तंत्रशुद्ध! (म्हणजे ५/७/५ नियमाप्रमाणे) Happy
मला हायकू अमुर्त चित्रांसारख्या वाटतात. पण माझ्यासाठी अमूर्त चित्रांपेक्षा सोप्या! Happy

अर्थ आणि तंत्रशुद्धतेच्या दृष्टीने तुमच्या सर्व हायकू मला आवडल्या. फक्त तो उस्फुर्त उद्गार भाव मिसिंग वाटला.

मला आवडलेले हिन्दी हायकू

ठहरा पानी

उनका प्रतिबिम्ब

घुलता चाँद

----*-------
पाषाण मन

अंतर बहे लावा

आँखों का नीर !
------*----------

~~-अल्पना वर्मा ~~

माझा एक प्रयत्न—

एकच तारा
अचानक तुटला
अंधार पूर्ण

मेघ दाटले
मोर नाच-नाचले
झडली पिसे

—सत्यजित

विलासराव तुम्ही हायकूची सुरुवात केलीत आणि पूर्वीचे दिवस आठवले... आणि आज अचानक मला चक्क हायकू सुचली. माझी पहिली हायकू आणि ६वी नंतर सुचलेली पहिली कविता...
हायकूच्या नियमात बसते आहे आणि मला उस्फुर्तपणे सुचली पण तुमच्याइतक्या सहजतेने अर्थपुर्ण बनवता नाही आलिय...

संधिप्रकाश
उन्हाळी संध्याकाळ
चंद्र दुबळा

विलासराव सन्ध्याकाळी हायकू वाचलेली पण मोबाईल वर रिप्लाय नाही करु शकले.
अर्थ छान आहे, पण "लख्ख झाल्यात" किंवा "प्रकाशमान" पेक्शा "लख्ख प्रकाश" असते तर जास्त उस्फुर्त वाटले असते असे वाटते. पण प्र्काशची पुनरावृत्ती होतेय... लख्ख उजेड कसे वाटेल?

तुम्ही अर्थ छान पकडता! Happy

लख्ख उजेड !>>छान वाटतो ! धन्यवाद!

लख्ख झाल्यात ,लखलखाट ,झगमगल्या हे शब्द सुचले होते पण सहज उस्फूर्त म्हणाल तर लख्ख उजेडच !

Pages