गाजलेल्या गाणी/कवितांचा अर्थ..रसग्रहण ...चर्चा

Submitted by mansmi18 on 5 June, 2014 - 03:32

नमस्कार,

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..ही रविंद्र साठे यांच्या आवाजात कै. भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेली कविवर्य आरती प्रभू यांची कविता आपण शेकडो वेळा ऐकली आहे/असेल. पण मला याचा अर्थ नीट कळला नाही.
खास करुन पुढील ओळी..
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देइ कोण हाळी त्याचा पडे बळी आधी..
हारापरी हौतात्म्य हे ज्याच्या गळी साजे..

मायबोलीवरील "दर्दी" रसिकांनी त्यांना उलगडलेल्या वरील ओळी/संपुर्ण कवितेचा अर्थ लिहिला तर माझ्यासारख्या अनेकाना आवडेल याची मला खात्री आहे. कृपया लिहाल का?

अशी अनेक गाणी/कविता असतील जी आपल्याला आवडतात पण अर्थ कळत नाही. त्यावर इथे चर्चा झाल्यास फार सुंदर. (भाषेचे बंधन नाही).
माझी विशलिस्टः
१.जाहल्या काही चुका (लता)
२.सजल नयन नितधार बरसती (अजित कडकडे)
३.स्वप्नातल्या कळ्यांनो..(आशा)
४. सातो बार बोले बन्सी.. (आशा/गुलझार.. दिल पडोसी है)
५. कशी काळनागिणी..

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mansmi18,

मला जसा समजला तसा सांगतो. ही कविता परिस्थितीला शरण गेलेल्या लढवय्याची आहे. आगोदर चळवळ्या असलेला कार्यकर्ता पुढेपुढे सुखलोलुप होतो. या पार्श्वभूमीवर या ओळी पाहूया :

१.
>> अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी

मृत्यू येण्याआधी लढाऊपणाचा अंत झाला आहे. त्यामुळे उरलेले आयुष्य घालवतांना जन्म जणू व्याधीसमान भासतो.

२.
>> वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी

मात्र असं असलं तरी लढाऊपणाचा मुखवटा चढवावाच लागतो. मग विद्रोहाची आणि वेदनेची गाणी म्हणजे बकध्यान (=पोकळ समाधी) होतात.

३.
>> देइ कोण हाळी त्याचा पडे बळी आधी..

तरी कोणी जुना एल्गार दाखवलाच तर 'सिस्टीम' त्याचा अचूकपणे बळी घेते. सिंहासन सिनेमातील डीकास्टा असाच बळी गेला. मात्र तो पार सुखलोलुप नव्हता, तर तडजोडीस तयार झाला होता (चूभूदेघे).

४.
>> हारापरी हौतात्म्य हे ज्याच्या गळी साजे..

'सिस्टीम' ने बळी घेतला किंवा इतर मार्गाने कोणी मेला की झालाच तो हुतात्मा! तोंडदेखले हौतात्म्य त्याच्या माथी मिरवायला बाकीच्यांचे काय जाते!

असो.

मला वाटतं की तुम्ही सिंहासन चित्रपट पाहावा. या गाण्याचा अर्थ नेमकेपणे लक्षात येईल. मात्र हे गाणं सामना चित्रपटातलं आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

ही पूर्ण कविता मला एकंदर आयुष्याच्या निर्मम निरर्थकतेवर भाष्य करणारी वाटते. आपण नक्की समूहशील आहोत की श्वापद आहोत हे ठरवता येऊ नये अशा विरोधाभासांनी भरलेल्या मानवी स्वभावावरही. कोणी कोणात खर्‍या अर्थी गुंतलेलंही नाही आणि तरीही कोणीच स्वतंत्र बेटाप्रमाणे जगापासून तुटलेलंही नाही. (कुणाच्या खांद्यावर..!).

असत्य, अन्याय, अनाचार यांनी बजबजलेल्या जगात व्याधीसारखा मिळालेला जन्म का काढावा (कशासाठी उतरावे तंबू ठोकून?!) असा प्रश्नही कवीला पडतो आणि 'तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे' याचा विस्मयही वाटतो.

ज्या आयुष्यात काही मंगल, काही चिरस्थायी घडलं नाही, घडवता आलं नाही, नव्हे ते घडणं अशक्यच असतं (दीप सारे जाती येथे विरुन विझून/वृक्ष जाती अंधारात गोठून झडून) ते मृतवत् आयुष्य 'जगतो' आहे असं तरी कसं म्हणावं? प्रत्यक्ष मृत्यू येण्याआधीच हा जिवित्त्वाचा झालेला अंतच आहे. आणि वेदनांची गाणी म्हणजे जणू त्या अंताची निशाणी. पोकळ टाहोपलीकडे त्यातही काही नाही.

ज्यांना हे असले सगळे प्रश्न पडत नाहीत ते सुखी - स्वतःला राजे समजणारे वेडे पीर. ज्याला पडतात तो वेडा. जो त्यावर उपाय शोधू पाहतो तो ठार वेडा. सावधानतेसाठी किंवा मदत मागण्यासाठी हाळी घालेल त्याचाच पहिला बळी जाण्याची शक्यता इथे अधिक. त्याला समजून घेण्यापेक्षा तो मेल्यावर त्याला हुतात्मा घोषित करून गळे काढणं केव्हाही सोपं, नाही का?

तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे???

मस्त मस्त! मला बहुतेक गद्यातून उलगडल्याशिवाय पद्य नीट्पणी उकलत नाही.
हा धागा मस्त आहे. इथे फक्त ह्याच कवितेविषयी रसग्रहणात्मक लिहायचं आहे की बाकीच्याही काही आवडणार्‍या पण तरिही न समजणार्‍या कविता पण?

हा धागा फार देजावू वाटतो आहे. असाच अजून एखादा रसग्रहणाचा धागा आधी होता का?

गामा आणि स्वाती,

अनेक धन्यवाद. फार छान लिहिलेत तुम्ही. एखादे गाणे आवडते त्याच्या स्वरांसाठी पण जर अर्थेही कळला तर आणखी मजा येते..

शुंपी,,
मला न कळलेल्या गाण्यांचा/कवितांचा अर्थ विचारायला मी काही धागे काढले आहेत यापुर्वी. पण या धाग्याचा उपयोग इतरही काही गाण्यांचा रसास्वाद घेण्यासाठी झाला तर मला आनंदच होइल. धाग्याच्या नावात बदल करतो आहे.