आरस्पानी...राजवर्खी - ध्वनिमुद्रण

Submitted by चिनूक्स on 27 February, 2014 - 13:29
mbd2014whitelogo.jpgदहाबारा वर्षांपूर्वीच्या एका संध्याकाळी फर्गसन महाविद्यालयाच्या अ‍ॅम्फिथिएटरात कुसुमाग्रजांची कविता मला नव्यानं भेटली. काव्यवाचनाच्या एका कार्यक्रमात. श्री. विनय आपटे आणि श्रीमती शैला मुकुंद यांनी सादर केलेला हा कार्यक्रम बराच गाजला होता. दोघांचीही आवाजावर जबरदस्त हुकुमत. भाषेची जाण अव्वल. शब्दांचा तोल जराही न ढळू देता केलेल्या त्या अप्रतिम सादरीकरणानं कुसुमाग्रजांची चित्रदर्शी कविता अक्षरशः जिवंत झाली. त्या कवितांचं सौंदर्य आणि त्यांतले मूलगर्भी, तत्त्वदर्शी विचार अधिकच झळाळून उठले. त्या संध्याकाळी विनय आपटे आणि शैला मुकुंद यांनी माझ्या मनःपटलावर उमटवलेली कुसुमाग्रजांच्या कवितांची चित्रं आजही तितकीच ताजी आहेत.

१९९२-९३ साली श्री. प्रभाकर पाटणकर आणि श्रीमती शैला मुकुंद यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली. कार्यक्रमाचं नाव - 'आरस्पानी...राजवर्खी'. कवितांची निवड, संहितालेखन श्री. पाटणकर यांचं. रसिकांना अतिशय आवडलेला हा कार्यक्रम अचानक थांबला तो पाटणकरांच्या अकाली मृत्यूमुळे. मात्र हा कार्यक्रम सुरू राहावा, अशी पाटणकर कुटुंबाची इच्छा होती. मग विनय आपटे आणि शैला मुकुंद यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचं सादरीकरण पुन्हा सुरू केलं. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक कार्यक्रम झाले. कुसुमाग्रजांची कविता अनेकांचं आयुष्य श्रीमंत करून जात होती.

या कविता किंवा निदान त्यांची झलक मायबोलीवर असावी, म्हणून पाचेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. विनय आपटे यांची परवानगी होती. त्यासाठी त्यांना दोनतीनदा भेटलोही होतो. पण कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण उपलब्ध होत नव्हतं.

श्री. विनय आपटे यांच्या दु:खद निधनानंतर आता या कविता मायबोलीवर येत आहेत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने. श्रीमती वैजयंती आपटे व श्रीमती शैला मुकुंद यांनी केलेल्या तत्पर मदतीमुळेच या कविता समस्त मायबोलीकरांपर्यंत पोहोचू शकल्या आहेत. शैलाताईंनी ही ध्वनिमुद्रणं उपलब्ध करून दिली आहेत.

खाली तीन ध्वनिमुद्रणं आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम नाही. कार्यक्रमाचा संपादित अंश आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर संपूर्ण कार्यक्रम लवकरच मायबोलीवर ऐकता-बघता येईल.

या कार्यक्रमाच्या रूपाने कुसुमाग्रज, विनय आपटे व प्रभाकर पाटणकर यांच्या स्मृती कायम राहतील, याची खात्री आहे.

Araspani_Rajwarkhi.jpg


***


***


***


ही ध्वनिमुद्रणं मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्याची अनुमती दिल्याबद्दल आणि ती तातडीनं उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती वैजयंती आपटे व श्रीमती शैला मुकुंद यांचे मायबोली.कॉम ऋणी आहे. त्यांच्या अजोड सहकार्यामुळेच हा ठेवा मायबोलीकरांपर्यंत पोहोचू शकला आहे.

तसंच कुसुमाग्रज प्रतिष्ठान, श्री. विद्याधर नीमकर व चतुरंग प्रतिष्ठान, कॉण्टिनेण्टल प्रकाशन व पॉप्युलर प्रकाशन यांचेही मायबोली.कॉम आभारी आहे.

***

श्री. विनय आपटे व श्रीमती शैला मुकुंद यांचं छायाचित्र श्रीमती शैला मुकुंद यांच्या खाजगी संग्रहातून.
ध्वनिमुद्रणांच्या आधीचं व नंतरचं संगीत प्रताधिकारमुक्त. कलाकार - GreenDJohn

***

ही ध्वनिमुद्रणं संबंधितांच्या परवानगीशिवाय कोणत्याही माध्यमातून प्रसारित करण्यास परवानगी नाही.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! संध्याकाळी लॅपटॉपवर नक्की ऐकेन. धन्यवाद.

ही ध्वनीमुद्रणं किंवा एकुणच mp3 असलेले धागे आयफोनवर चालत नाहीत. कुठला अपडेट वगैरे आहे का?

सगळी ध्वनिमुद्रणं ऐकली आणि अतिशय आवडली.खूप खूप धन्यवाद तुम्हांला,शैला मुकुंद आणि वैजयंती आपटे ह्यांना.
श्री.विनय आपटेंचा आवाज ऐकून मला "गजरा" मालिकेची आठवण झाली खूप.
संपूर्ण कार्यक्रमाच्या प्रतिक्षेत...

हे अतिसुंदर आहे!!! विनय आपटेंचा आवाज म्हणजे काय अजब रसायन आहे. ऐकताना अंगावर काटा आला.

धन्यवाद!! आणि पूर्ण कार्यक्रम लवकरच उपलब्ध करून द्यावा ही विनंती.

अप्रतिम!! खजिन्याची झलक आहे ही Happy आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल केवढे तरी आभार आणि त्यासाठी तू मोलाचे कष्ट घेतो आहेस... खुप खुप धन्यवाद रे! मायबोली, थँक्स!

चिनूक्स, खूप धन्यवाद. तुझ्यासारख्यांच्या प्रयत्नांमुळे मायबोली संपन्न होते आणि मग माझ्यासारख्याला मायबोली सदस्य असल्याचेच खूप अप्रूप वाटते.

खूपच सुरेख!!!
विनय आपटेंचा आवाज म्हणजे काय अजब रसायन आहे. ऐकताना अंगावर काटा आला. >>>> +१

धन्यवाद चिनूक्स.

बावनकशी सोन्याचा खजिना पोचवलास चिनूक्स.धन्यवाद.मराठी असल्याचा अभिमान वाटला.कुसुमाग्राजांचे आरस्पानी राजवर्खी शब्द्,विनय आपटेंचा हृदयाला भिडणारा आवाज,हे सर्वाना खुले करण्याची परवानगी देणारे वैजयंती आपटे आणि शैलामुकुंद्,ते पोचविण्याची धडपड करणारा चिनूक्स, अणि ते उपल्ब्ध करुन देणारी मायबोली सर्वांचाच अभिमान वाटतो

अहाहा...!!!! पुन्हा पुन्हा पुन्हा ऐकतेय.

सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.. हे विनय आपटेंच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा आला. त्यांच्या आवाजाकरताच लिहिली गेली आहे ती कविता असं वाटलं.

विनय आपट्यांच्या आवाजातल्या ह्या कविता पुन्हापुन्हा ऐकत रहाव्याश्या वाटतात. इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!

अंगावर काटा येतोय कुसुमाग्रजांचे शब्द ऐकून. चिन्मय तू म्हणतोयस तसा अर्थ नव्याने समजतोय.
पूर्ण कार्यक्रम पोस्ट कर लवकर. काही मदत हवी तर सांग.

निरभ्र सोलिव कविता पुन्हः पुन्हः ऐकल्या.प्रत्येक वेळा खुप खुप धन्यवाद चिनुक्स म्हणत.पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

Pages