ओसाडवाडीचे ईलेक्शन

Submitted by ग्रेटथिन्कर on 26 February, 2014 - 06:30

इलेक्शन मंट्ले की ओसाडवाडीत एकच चैतन्य संचारायचे, तरणीबांडं पोक्त व्हायची ,थेरडी तरुण व्हायची ,बाया बापड्या व्हायच्या ,पाराची लोकसभा व्हायची. गावाला दर पाचवर्षांनी इलेक्शन लागायचं. मंग आख्खा गाव या एकाच विषयाभोवती फिरायचा.
गाव तसा हजार उंबर्याचा ,टुमदार. मधोमध भैरोबाचे देवळ ,देवळाला लागूनच ग्रामपंचायतीचे हापिस. रोजच्या कामाला, शेताकडं, तालुक्याच्या गावी जायच्या अगुदर भैरोबाला जायचा गावच्या गडी माणसांचा शिरस्ता व्हता. देवळात आल्यासरशी शेजारी ग्रामपंचायतीची खबरबात घ्यायची हुक्की अनेकानला यायची. मागच्या पाच वर्षात सरपन्च रावसाहेब जमदाडे पाटलाच्या कारभारावर गावकरी नाराज व्हते. त्यानी आणि त्याच्या बगलबच्यांनी लै माल पंचायतीत हाणला व्हता असा गावकर्या॑चा आरोप व्हता .ईरोधि गटाचा बि त्योच आरोप हुता. त्यातलं किती खरंखोटं भैरुबाला मायित व्हतं. पण रावसाहेबाचा दगडी वाडा जाऊन तिथं बंगला हूभा राहिला ,त्यो बी मागच्या पाच वर्षात, यालाच पुरावा मानुन गावकरी औंदा रावसाहेबाचा धोबीपछाड करायचा असा मनसुबा आखत व्हते .

औंदाचं इलेक्शन येनार येनार म्हणता त्याची तारिख बी पडली ,ती बी पुढल्या मैन्यात .मंग काय गावात एकच गडबड गलका सुरु झाला. रावसायबानं आपलि उमेदवारी लागलीच डीक्लेर करुन टाकली.
राबसाहेबाच्या इरोधी गटात नारबा मोदळे होता. त्यो गरीबीतन वर आल्याला ,त्यामुळं गावात त्याला लै मान व्हता .तालुक्याच्या गावी गुर्हाळ चालवून त्यानं अर्द्या एकराचं वीस एकर केलेलं .भैरुबाचा तो निस्सीम भक्त व्हता, भैरुबाच्या पुजार्याच्या डोक्यानं तो बर्याचदा चालायचा. बारा सदश्यांच्या पंचायतीत त्याच्या गटाचं चार सदस्य होतं, मागल्या पाचवर्षापासनं सत्तेबाहीर राहिल्यानं त्याच्या गटाचा जीव कासावीस झाल्येला. औंदा इलेक्शन मारायचेच याचा निर्धार करुन त्यानंही आपला अर्ज भरुन टाकला ...शेवटल्या दिवशी रामू सज्जने या कॉलिज शिकलेल्या व तालुक्याची गावी शिक्षक असलेल्या हिशेबी तरुणांनं अर्ज भरुन, आपला अर्ज ग्रामपंचायत' स्वच्छ' कराण्यासाठी असल्याचं झाहिर करुन टाकलं .गावातली चार बुकं शिकलेली त्याचा प्रचार करु म्हणत होती..रामु हा तात्यासाहेब विचारे यांचा कार्य्कर्ता होता. ते तालुक्यात सदाचारि विचारि संघ चालवायचे,तिथं रामु घडला व्हता.

बघता बघता प्रचाराला सुरवात झाली, पैलीच सभा रावसाहेब पाटील जमदाड्याची झाली, मागच्या पाच वर्षात आपण नवीन शाळा आणली, नवीन पाणीपुरवठा योजना आणली ,पंचायतीच्या मालकीच्या तळ्यातले पाणी दोन मैलावरच्या कारखाण्याला घालून पंचायतीचे उत्पन वाढवल्याचं त्यानं दणकुन सांगितलं. इरोधि गटाच्या नारबानं लगी पुडल्या दिवशी सभा घेऊन राबसाहेबाला टक्कर द्यायचा प्रयत्न केला. कारखान्याचा मालक लक्ष्मिचंद याच्याकडून पैका घेऊन राबसाहेबानं गावचं पाणि इकल्याचा आरोप नारबानं केला. रावसायबाला शहरात फ्ल्यॅट ,बोलेरो गाडी मिळाल्याचा आरोपही मोदळे गटानं केला. त्याच बोलेरोतनं रावसाहेब रुबाब दावत फिरायचा .
हिकंड राबसायबानं गावात ओल्यासुक्या पार्ट्या द्यायला सुरवात केली..
लक्ष्मीचंदला फोन करुन स्टॉक वाड्यावर तयार ठेवला असून तिथुनच तीर्थ वाटल्या जातं अशी कुजबुज गडीमाणसं पारावर करायची .नारबा माळकरि, टाळकरी असल्यानं त्यानं जिलबी ,मिसळ ,मिठाईच्या पार्ट्या द्यायचा धडाका लावला ....फूढची पाचवर्ष मला द्या रोज तुमाला अशीमिठाई खायला घालतो अशी थाप माराय लागला.. तो थापाड्या म्हणुन पन्च्क्रोशित प्रसिद्ध हुता .प्रत्येक सभेच्या शेवटाला तो जै भैरुबा... जै भैरुबा... असं लोकांनकडनं वदवून घ्यायला लागला
पार्ट्यांचा पैका नारबा कुटुन अणतो व त्याची पाटलावाणीच नवी बोलेरो कुठून आली याची गावकर्यांना चौकशी पडली व्हती.
हिकडं रामू सज्जनेकडं पैका नसल्यानं त्यानं घरोघरी जाउन प्रचार करायला सुरवात केली. कोपर्यासभा घेऊन राबसाहेब व नारबा दोघंबी लक्ष्मीचंदच्या पैशाचे गुलाम आहेत अशी हाकाटी मारायला सुरवात केली.वरुन शिव्या द्यायच्या, पन आतनं समदि येक हायेत असं जिव तोडुन सान्गत व्हता. भल्या माणसान्ला रामुचं म्हणनं पटत व्हतं पण रावसायबाची दारु व नारबाची जिलबी त्यांच्या डोस्क्यातून जात नव्हती. रामू जिकला तर नवी पाणियोजना ,नवा चांगला रस्ता ,गावचं तळ परत सोडवून आणेल असं म्हणत व्हता .पण फुढचं कुणी बघितलेलं.....
इलेक्शचा दिस उजाडला ,सकाळपास्न गडी बायामाणसं म्हातारी रांगा लावून मतं टाकत व्हती. भाईर येऊन गालातच हसत व्हती .पूढचा आठावडा पाटील ,नारबा, कि रामू ह्यो एकच प्रश्न लाखयेळेला गावामधी इचारला गेला.
निकालाचा दिस उजाडला, आख्खा गाव केद्रा भायेर जमला. रावसायेब पाटील ,मोदळे ,रामू सज्जने कार्यकर्त्यांबरुबर भाइर उभं व्हतं .निकाल लागला ,तवा एकच गलका झाला .रामु सज्जनेला बारापैकी सहा जागा मिळाल्या. नारबाला आणि पाटलाला प्रत्येकी तीन. तीन ....
रामु सत्ता घेणार हे फिक्स झालं तसं लक्ष्मीचंदच्या पोटात गोळा उठला... त्यानं फोन घुमावला ,रावसायबाच्या घरात फोनची बेल वाजली ,,,,नारबाही लगबगीन बोलेरोतनं कुठतरी गेला ,,,,,,
पन्चायत ताब्यात घ्यायचा दिसं उजाडला ,गावकरी रामुच्या नावाचा जल्लोष करत होते .आता तरी गाव सुधरल म्हणत व्हते आणि अचानक हडकंप झाला ....रामुच्या गटाच्या दोन सदश्यांनी अचानक राजीनामा दिला ...रामु अल्पमतात गेला....पंचायतीवर आता प्रशासक बसणार हे फिक्स झालं .लक्ष्मीचंदच्या पैक्याने पाटलानी आणि नारबानी एकमेकाच्या मदतीने सदस्य फोडल्याची चर्चा रंगली.आपला भ्रष्टाचार बाहेर येणार याची पाटलाला ,तोंडची सत्ता हातची गेली याची नारबाला आणि कारखाण्याची चिंता लक्ष्मीचंदला पडली होती .त्यातनच हा प्रकार घडला असावा हे जून्याजानत्यांनी वळखले .
हिकंड कलेक्टर हापिसात लक्ष्मिचंद बसला होता. पंचायतीवर आपल्याच मर्जीतला प्रशासक नेमावा याची गळ घालायला तो तिथं आला होता .थोड्यादिसानी स .दा तुंबडे या अधिकार्याची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली .तो भ्रश्ट होता.लगेचच लक्ष्मीचंदच्या कारखान्याचे पाणि कायम केले गेले, गावच्या पाणी योजनेत भ्रष्टाचार झाल्याने ती बंद पडली .गावच्या तळ्यावर लक्ष्मीचंदने हक्क सांगितला.रामुचा प्रचार करणारी कारखाण्यातली पोरं लक्ष्मीचंदने कमी केली......
.गावकरी आता भैरुबाला नेमानं जात नाहीत, कारण ग्रामपंचायत बर्याच येळेला बंद असते ,समदा कारभार कारखाण्यातून चालतो..... रोज तीन बोलेरो तिकडं धुळ उडवीत जात्यात गावकर्यान्ना धूळ चारुन........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या लहानपणी चिं वि जोशी यांचे 'ओसाडवाडीचे देव' नावाचे पुस्तक आवडले होते. या कथेच्या नावावरून ती आठवण झाली म्हणून ही गोष्ट वाचली. वेळ चांगला गेला. छान कथा! गावरान साचा उत्तम जमला आहे. भाषेवरून श्री शंकर पाटील यांच्या 'मीटिंग' या गोष्टीची आठवण झाली.

माझ्या लहानपणी चिं वि जोशी यांचे 'ओसाडवाडीचे देव' नावाचे पुस्तक आवडले होते. या कथेच्या नावावरून ती आठवण झाली म्हणून >>
डॉ. + १०००. मीही हेच लिहायला आले होते. माझंही ते आवड्तं पुस्तक होतं.

छान

कथा आवडली. देशात जे निवडणुकीचे वातावरण आहे नि जो काही प्रचार चालला आहे त्याचे सुंदर असे विडंबन ओसाडवाडी च्या निवडणुकीच्या रूपाने दाखवून दिले आहे.

नारबा मोदळे नि रामू सज्जने हि पात्रे अचूक वाटली.

भैरुबाचा तो निस्सीम भक्त व्हता, भैरुबाच्या पुजार्याच्या डोक्यानं तो बर्याचदा चालायचा. >>>>> हे आवडले उत्तम निरीक्षण.

>>>>> आता तरी गाव सुधरल म्हणत व्हते आणि अचानक हडकंप झाला ....रामुच्या गटाच्या दोन सदश्यांनी अचानक राजीनामा दिला ...रामु अल्पमतात गेला.... <<<<
इलेक्शना होऊन आख्ख वरीस झाल तरी इकडे "मोदी" काय अल्पमतात जायची चिन्हे नाहीत्, नै का? Proud