"करायला गेलो एक आणि …" -वैद्यकीय सत्यकथा !

Submitted by SureshShinde on 1 February, 2014 - 16:47

करायला गेलो एक आणि … - एक वैद्यकीय सत्यकथा !

image_0.jpg

१ जानेवारी २००८ !
स्थळ : सिंगापूर मधील एक मोठे पब्लिक हॉस्पिटल.

नवीन वर्षाची सकाळ. हॉस्पिटल मधील सर्व व्यवहार मात्र नेहेमीप्रमाणेच चालू. बाह्य रुग्ण विभाग मात्र नेहेमीपेक्षा जास्तच गजबजलेला ! सिंगापूर शहर नववर्ष रजनीच्या धुन्दिमधुन हळूहळू जागृत होत होते. बहुतेक वॉर्ड दारू पिवून बेहोष झालेल्या रुग्णांनी आणि त्यांनी घडवलेल्या अपघातामध्ये हकनाक सापडलेल्या निरपराध व्यक्तींने भरला होता.

आज डॉक्टर-ऑन-ड्युटी होते डॉ. डेव्हिड आणि त्यांचे दोन मदतनीस इंटर्न डॉक्टर्स. रात्रपाळीच्या डॉक्टरांकडून सर्व ॲडमिट असलेल्या पेशंटांची 'ओव्हर' म्हणजे माहिती घेवून खुर्चीवर टेकतच होते कि दरवाजामधून एक स्ट्रेचरचा आवाज आला. स्ट्रेचरवर एका बेशुद्ध पेशंटला घेवून दोन वॉर्डसेवक आत येत होते. डॉ. डेव्हिडांचे पाय त्यांना अभावितपणे स्ट्रेचरजवळ कधी घेवून गेले ते त्यांना देखील समजले नसावे. नर्सिंग स्टेशनजवळ उभ्या असलेल्या दोन नर्सेस देखील धावत आल्या. डॉक्टर डेव्हिड यांनी नेहमीचा तपासण्याचा प्रोटोकॉल सुरु केला. ते तपासतानाच मोठ्याने सांगत होते आणि एक इंटरन डॉक्टर ती माहिती भरभर लिहित होता.
"सिक्स्टी यीअर्स मेल, चायनीस , डीपली अनकोन्शस नॉट रीस्पॉन्डींग टू पेनफूल स्टीम्युलाय. पल्सेस ओके !"
"बी पी १५० बाय १०० , पल्स १००, एसपी ओटू ९५ !" दुसर्या इंटर्न डॉक्टरांनी पुस्ती जोडली.
हा पेशंट बेशुद्ध होता पण त्याचे ब्लड प्रेशर , नाडीचे ठोके व्यवस्थित होते. बोटाच्या टोकाला एक चिमट्यासारखे रक्तामधील प्राणवायूचे प्रमाण मोजणारे यंत्र ते प्रमाण ९५ म्हणजे पुरेसे दाखवीत होते. त्यानुसार पेशंटचा श्वासोच्श्वास पुरेसा असून तांतडीने कृत्रिम श्वसनयंत्र लावण्याची गरज दिसत नव्हती.
डोळ्यांमध्ये विजेरीचा प्रकाशझोत टाकताच डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचित होत होत्या.
हातातील हॅमरने पेशंटच्या हातापायावर ठोकून डेव्हिड पुढे म्हणाले, " लाईट रिफ्लेक्स शिवाय इतर कोठलेही रिफ्लेक्स नाहीत. प्लान्टर रिफ्लेक्स अपगोयींग आहे."
तळपायांना जोराने टोचले असता नेहमी अंगठा तळपायाच्या दिशेने हलतो. मेंदूच्या आजारात मात्र त्याची दिशा बदलते आणि तो डोक्याच्या दिशेने हलतो.
"ह्याला बहुतेक ब्रेन स्ट्रोक झाला असावा किंवा काल रात्री भरपूर ढोसल्यामुळे हायपोग्लायसेमिया झाला असावा. सिस्टर, ब्लड शुगर चेक करा, प्लीज !"
आपली रक्तामधील साखरेचे प्रमाण शंभर मिलीग्र्याम च्या आसपास असते. ते पन्नासपेक्षा कमी झाल्यास शुद्ध हरपते. एखाद्या मोटारचे पेट्रोल संपल्यानंतर इंजिन बंद पडावे तसेच ! याला आम्ही हायपो-ग्लायसेमिया म्हनतो. अशा व्यक्तीला शिरेतून साखरेचे इंजेक्शन दिल्यास झोपेतून जागे झाल्यासारखा हा रुग्ण अगदी नाट्यपूर्ण रीतीने शुद्धीवर येतो.
"सर, ब्लड शुगर फक्त वीस आहे!"
"ओ गॉड ! गिव्ह हिम शुगर, पूश फिफ्टी पर्सेंट ग्लुकोज, फिफ्टी सीसी आयव्ही ,फास्ट !"
डॉ. डेव्हिड यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पुढील पाच मिनिटानंतर पेशंट स्ट्रेचरवरच बसून बोलत होता.
"माझे नाव चीन चीनचू आहे. मी काल रात्रीच्या पार्टीमध्ये जरा जास्तच प्यालो होतो. रात्र खूप झाल्यामुळे यजमानीण बाईंच्या घरीच झोपलो. पुढचे काहीच आठवत नाहीये !"
"तुला मधुमेह आहे का? इन्शुलिन किंवा डायबेटीसच्या गोळ्या खातोस काय?"
"छे हो, आमच्या चार पिढ्यांत कोणाला डायबीटीस नाहीये !"
एव्हडे बोलून चिंचीन्चू पुन्हा झोपी गेला.
"सिस्टर, याला ग्लुकोज ड्रीप चालू ठेवा आणि दर एक तासाने पुन्हा शुगर चेक करून चार्ट करा. गरज वाटल्यास पुन्हा कळवा. "
डेव्हिड पुढच्या कामाला लागले.

दोन तासांनंतर, इमर्जन्सी बेल वाजली. चिंचिंचूला फीट आली होती.
"सर, याची शुगर पुन्हा वीस झाली आहे. फिटसाठी फेनिटोईन लोड केले आहे. पुन्हा शुगर बोलसडोस दिला आहे पण असे पूर्वी कधी झालेले मी पहिलेले नाही."
सिस्टरांच्या बोलण्यातून अनुभव डोकावत होता. कोठे तरी काही तरी चुकत होते.
डॉक्टर डेव्हिड यांच्या कपाळावरील आठी जास्तच रुंदावली. त्यांची मेंदुरूपी हार्ड डिस्क वेगाने फिरून ज्ञानसाठा सर्च करीत होती. अशा प्रोफावुंड हायपोचे कारण स्पष्ट होत नव्हते. दारूबाज मंडळींच्या लिव्हरमध्ये शुगरचा साठा कमी असतो पण याला भरपूर साखर दिली होती तरी शुगर करेक्ट होत नव्हती.
"याचे लिव्हर फंक्शन टेस्ट रिपोर्ट नॉर्मल आले आहेत." इंटर्न डॉक्टरांनी पुस्ती जोडली.
डॉक्टर डेव्हिड आपल्या इंटर्नस् बरोबर 'लाऊड थिंकिंग' करू लागले.
"पर्सीस्टंट हायपो …. बॉडीमध्ये इन्शुलिन जास्त असेल का ? असल्यास का ? ब्लड इन्शुलिन लेव्हल आणि सी-पेप्टाईड लेव्हल पाठवा.
दोन्ही लेव्हल जास्त असतील तर स्वादुपिंडा मध्ये जास्त इन्शुलिन तयार होते आहे. दोन कारणे, एक म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त इन्शुलिन तयार करणारे ट्युमर अर्थात 'इन्शुलीनोमा' किंवा डायबेटीसच्या गोळ्या !"
" पण सर, याला तर डायबेटीस नाहीये."
" होमीसायडल ! कोणी त्याला गोळ्या चारल्या असतील तर ! त्याची युरीन विषबाधा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवा. डायबेटीसच्या गोळ्या क्रोम्याटोग्राफी तंत्राने कळू शकतील."
"पण सर, खून करण्याच्या उद्देशाने जर कोणी इन्शुलिनचे इंजेक्शनचा मोठ्ठा डोस दिला असेल तर ?" इंटर्न.
"वेल, तसे असेल तर इन्शुलिन लेव्हल वाढेल पण सी-पेप्टाईड लेव्हल नॉर्मल असेल, कारण सी-पेप्टाईड हे फक्त शरीरामध्ये तयार होणार्या इन्शुलिनमुळेच वाढते." इंटर्नचे समाधान झालेले दिसले.
"चला, भरभर कामाला लागा." डेव्हिडने सर्वांना बजावले.
पुढील कांही तासातच परिस्थिती स्पष्ट झाली. चिंचीन्चू च्या ब्लड इन्शुलिन लेव्हल आणि सी-पेप्टाईड लेव्हल दोन्ही भरपूर वाढल्या होत्या आणि त्याच्या युरिनमध्ये आढळले होते डायबीटीस साठी वापरले जाणारे एक औषध - ग्लायबेनक्लामायीड !

एकदा निदान झाल्यानंतर पुढील ट्रीटमेंट सरळ होती. चार दिवसानंतर चीचिंचू ठणठणीत बरा झाला. पण कोठल्याही प्रकारचे डायबीटीसचे औषध घेतल्याचे त्याला आठवत नव्हते.
"हे पहा मिस्टर चिंचीन्चू, तू आम्हाला खरी माहिती न दिल्यास आम्हाला पोलिसांना कळवावे लागेल, कारण तू स्वतः जर हे घेतले नसले तर कोणी तरी तुला हे औषध चारून तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे दिसते. कदाचित तुझ्या यजमानीण मैत्रिणीला अटक होवू शकते. "
आता मात्र तो चांगलाच हादरला.
"डॉक्टर, प्लीज तिला त्रास देवू नका. ती माझी प्रिय मैत्रीण आहे व त्या रात्री आम्ही शरीराने एकत्र यायचे ठरवले होते. मी सर्व तयारी केली होती पण सगळाच घोळ झाला."
त्याच्या वयाची जाणीव झाल्याने इंटर्न मंडळींना थोडेसे हसू फुटले.
"हसू नका पण मी माझ्या एका अनुभवी मित्राकडून एक पलंगतोड गोळीदेखील पैदा केली होती. "
डॉ. डेव्हिड यांची हार्ड डिस्क पुन्हा एकदा फिरू लागली. कदाचित या गोळीचा तर हा प्रताप नसेल न ?
"काय नाव त्या गोळीचे ?"
"पॉवर वन वॉलनट !"
नावात तर काहीच बोध होत नव्हता.
"सर, ही गोळी म्हणजे देशी व्हायग्रा आहे. " चिंचीन्चूने किंचित लाजत ही माहिती पुरवली.

पुढील काही दिवसांत या गोळीच्या पृथक्करणाचा अहवाल आला. या गोळीमध्ये एक मिलीग्राम व्हायग्रा आणि जवळजवळ शंभर मिलीग्राम होते - ग्लायबेनक्लामायीड ! व्हायग्राचा एका वेळीचा डोस असतो पन्नास मिलीग्राम आणि ग्लायबेनक्लामायीडचा एका दिवसाचा जास्तीतजास्त डोस असतो वीस मिलीग्राम ! म्हणजे त्या गोळीत व्हायग्रा क्षुल्लक प्रमाणात तर ग्लायबेनक्लामायीड पाचपट होते ! चिंचीन्चू पुरते तरी हे कोडे सुटले होते.

पण या गोळ्या बाजारामध्ये विकल्या जात होत्या, लोक नक्कीच खात होते आणि मग त्यांना त्रास होत नव्हता का ?

पुढील सहा महिन्यातील घडामोडी ….

सिंगापूरमधील पाच मुख्य पब्लिक हॉस्पिटलमध्ये या सहा महिन्यांमध्ये असे हायपोग्लायसेमियाचे एकशे पन्नास रुग्ण दाखल झाले होते. एकच अपवाद वगळता बाकी सर्व पुरुष होते आणि वयोगट होता एकोणीस ते सत्त्याण्णव वर्षे ! ( आठवा - दादा कोंडकेकृत "ऐंशी वर्षांचा असून म्हातारा सांगतोया वय सोळा' ! ) यातील सात पेशंट कोमामध्येच राहिले व त्यातील चार दगावले ! एकशे सत्तावीस पेशंटच्या रक्तामध्ये आणि युरिनमध्ये ग्लायबेनक्लामायीड सापडले. यातील पंचेचाळीस जणांनी साखर कमी होण्याच्या आधी अशा लिंगवर्धक गोळ्या घेतल्याचे कबूल केले. बाकीच्यांमध्ये बहुतेक खरे बोलण्याचे धाडस नव्हते.
या पेशंटांकडून आणि पोलिसांनी बाजारात छापे घालून जप्त केलेल्या औषधांचे पृथक्करण केल्यानंतर त्यातील ही भेसळ सिद्ध झाली. अनेक वेगवेगळी नावे आणि तयार करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या कंपन्या असल्या तरी सर्वांचा 'बोलविता धनी' एकाच असावा हे सुर्यप्रकाशाएव्हडे स्वच्छ होते.
----------------
ही भेसळ हेतू पुरस्सर केली होती कि चुकून झाली होती कोणास ठावूक. तीस वर्षांपूर्वी भारतामधील एका प्रख्यात जागतिक औषध कंपनीच्या को-ट्रायम्याकसोल या गोळीमुळे ही अनेक लोकांना हायपोग्लायसेमियाचा त्रास झाला होता. तपासात असे आढळले कि ज्या मोठ्या व्हेसल मध्ये ग्लायबेनक्लामायीडच्या गोळ्या बनवल्या त्याच व्हेसलमध्ये नंतर को-ट्रायम्याकसोल ची पावडर ओतून गोळ्या बनवल्या. ही संपूर्ण बॅच बाजारातून पुन्हा मागे घेतली गेली. आता मात्र औषध बनवण्याचे प्लांट GMP ( Good Manufacturing Practice) certified असतात. त्यामुळे अशी भेसळ होण्याची शक्यता नसते. तरीही cost cutting करताना आपले देशबंधू काय करतील याचा नेम सांगता येत नाही. अर्थात आपल्या देशात अशा देशी पलंगतोड गोळ्या विकणारे आणि खाणारे भरपूर आहेत. या गोळ्यांमध्ये डोपामिन सद्दृश हर्बल औषधे अप्रमाणित स्वरूपात असतात व त्यामुळे हृदयक्रिया गंभीरपणे अनियमित होणे, ब्लड प्रेशर कमी होणे अशी लक्षणे झालेली मी ही पाहिली आहेत. कधीकधी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने माणसे डायबीटीस च्या गोळ्या खातात पण घरातील माणसांच्या बेफिकीर्पणामुळे अशा गोळ्यापैकी एखादी गोळी एखाद्या दोन वर्षे वयाच्या चिमुरडीच्या हातात पडली तर काय अनर्थ होतो हेही मी अनुभवले आहे. तेंव्हा मित्रहो, जरूर असल्यास औषधे खा जरूर पण जरा काळजीपूर्वक ! "Handle With Care !"

इति लेखनसीमा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं!
यानिमित्ताने गेल्या पंधरा ऑगस्टला (काय पण दिवस निवडला होता)
एकाच दिवशी वायग्रा खाऊन आलेले एक स्ट्रोक आणि एम आय चे पेशंट आठवले.

आपल्याकडे काही स्ट्रिक्ट ड्रग रेग्यूलेशन नसल्याने सिल्डेनॅफिल ओवर दकाऊटर मिळू शकते.

धन्यवाद, राजसाहेब ! मी डेव्हिड शोरी आणि ह्यू लॉरी,लीझ आणि म्हटले तर सर्वच टीमचा जबरदस्त चाहता आहे.
'डॉ. हाऊस, एमडी' चे सर्व सीझनस माझ्या संग्रहात आहेत. मी माझी एक कथा देखील अवलोकनार्थ पाठवली होती पण तिला पडदामूल्य बहुतेक कमी होते. असो. धन्यवाद.

धन्यवाद , सातीजी, आपला अभिप्राय म्हणजे आर्टिकल पियर रेव्हूला पाठविल्यानंतरच्या कॉमेंट्स वाटतात !

छान ..

छान.
Happy

नमस्कार डॉ साहेब - लस उत्पादन क्षेत्राशी (व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंग) निगडित असल्याने या जी. एम. पी. संदर्भातल्या गोष्टी कायमच लक्षात ठेवून काम करावे लागते/ करवून घ्यावे लागते.

खूपच चांगला अनुभव शेअर केलात त्यासाठी मनापासून धन्यवाद .....

ते सियालिस ने पण काही परीणाम होतात ठोक्यांवर. व म्हातारी तरुण ज्यास्त घेतात हि औषधे असे वाचण्यात आलेले ते आठवले.

बाकी, पलंगतोड शब्द. Proud

@डॉ.कैलास गायकवाड >>>कैलासराव, आपल्या पाठीवर एक थाप ! तसे माझ्याकडे एक इंसुलीनोमाच्या गोष्टीचा सांगाडाही तयार होता पण हे कथाबीज जास्त चांगले वाटले.

मस्त .. ! घटना, लेखनशैली, दोन्ही !
लहानपणी मित्रांच्या वात्रट चिडवाचिडवी मध्ये वापरला जाणारा पलंगतोड बादशाह हा शब्द या निमित्ताने आठवला.. Wink

Pages