कृष्णविवर

Submitted by अंड्या on 25 September, 2012 - 12:17

काल दुपारी चार वाजता अचानक मला कसल्याश्या आवाजाने जाग आली.
डोळे उघडून चोहीकडे नजर टाकली तर अंधारून आल्याचा भास झाला.
खिडकीचे दरवाजे सताड उघडले तरीही मोजकाच संधीप्रकाश आत शिरकाव करत होता.
काल याच वेळी जेव्हा रटरटीत उनं पडली होती तिथे आज ही कातरवेळ.. मन चुकचुकल्यावाचून राहिले नाही..
दूर क्षितिजाकडे पाहिले आणि विस्मयचकित नजर तिथेच खिळली.
कोण ढगांची भाऊगर्दी झाली होती तिथे.
डोळा लागण्यापूर्वी निरभ्र अन कोरडे आकाश बघवत नव्हते.
किती तासांची झोप घेऊन मला जाग आली होती कळेनासे झाले.
की काही दिवसांनीच जाग आली होती.
इतक्यात कसलासा आवाज झाला की काळजाचे पडदे फाटावेत.
मी दचकून पुन्हा क्षितिजावर नजर लावली.
ढगांची हालचाल जाणवत होती.. पण लयबद्ध..
सारे ढग शिस्तीत एका रांगेत उभे आहेत असे वाटत होते..
पण काही क्षणच..
बघता बघता सारे वेगाने पळू लागले.
आकाश न्याहाळले तर धक्काच बसला.
आकाशाच्या मध्यभागी एक खड्डा पडला होता, एक फार मोठे विवर तयार झाले होते.
सारे ढग त्या उताराच्या दिशेने गडगडत जात होते.
प्रत्येक ढग पुढच्याला मागे टाकून पळत होता, जणू काही प्रत्येकाला त्या विवराच्या केंद्रस्थानी पोहोचायची ओढ लागली होती.
जसे जसे मी त्यांचे निरीक्षण करू लागलो आणखी एक विलक्षण प्रकार माझ्या नजरेस पडला,
काही मोठे ढग छोट्या ढगांना तुडवून पुढे जात होते तर काही छोटे ढग स्वताहून मोठ्या ढगांमध्ये सामावत होते.
प्रत्येक वेळी त्या मोठ्या ढगांचा आकार वाढत होता आणि ते आणखी आणखी गडद होत होते,
त्याचवेळी आकाश मात्र आणखी काळवंडले जात होते.
आता मात्र काही मोजकेच ढग शिल्लक राहिले होते, सारेच आकाराने मोठे होते.
विवराच्या केंद्रस्थानी फार जागा नव्हती की तिथे त्या सार्‍यांना सामावून घेतले जाईल.
आता टक्कर त्या मोठ्या ढगांमध्ये होती. त्यापैकी एकच तिथे विराजमान होणार होता.
पुढे काय होणार याची मला उत्सुकता लागून राहिली होती पण आता चोहीकडे एवढा अंधकार पसरला होता की काय घडते ते समजत असले तरी दिसत नव्हते.
काही काळ तसाच गेला, बरेच भयानक आवाज कानावर ऐकू येत होते,
कोणता ढग चिरडत होता, कोणता सरस होत होता याचा अंदाज घेत मी तसाच खिडकीवर रेलून उभा होतो.
थोड्यावेळाने पुन्हा दूरवरून काही किरणे चमकताना दिसली. क्षितिज बर्‍यापैकी मोकळे झाले होते.
काही नवीन ढगांनी ती जागा व्यापली होती.
हे ढग मात्र पांढरेशुभ्र होते, तर काही करडे.
सूर्यप्रकाश त्यांच्या आडून डोकावत होता.
मी पुन्हा आकाशाच्या मध्यभागी विवराकडे पाहिले,
आता ते विवर दिसत होते, तसेच काळेकुट्ट, पण तिथे काय झाले हे मात्र समजत नव्हते.
मी मात्र वातावरण बर्‍यापैकी निवळले असे बोलून माझी खिडकी बंद केली.....

- Anand

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही हरकत नाही.
मला जे बोलायचे होते ते समजवायला गेलो तर मजा गेली, माझी स्वताची.
त्याबद्दल दिलगीर आहे.