या जगाने मला नाडले कित्तेकदा

Submitted by सुधाकर .. on 19 September, 2012 - 08:03

या गर्दीत श्वास कोंडले कित्तेकदा
या जगाने मला नाडले कित्तेकदा

का कुणास मी कळलो नाही? जरी इथे,
प्रत्येकाने मला ताडले कित्तेकदा

तू हसून गेलीस जरा, सहज पुढे पण,
या बघ्यांनी मला छेडले कित्तेकदा

विकॄतीने माजलेल्या या जगाने
सुकॄतांचे गर्भ पाडले कित्तेकदा

सहप्रवासी बनून ठरले चालणे पण,
वाटांनीच अंग मोडले कित्तेकदा.

काय काय रचले मीच माझ्या मनाशी
मनाविरूध्दच तरी घडले कित्तेकदा

या जगात नालायकही असेन मी पण
लायकांनी हात झाडले कित्तेकदा

जगता जगता आयुष्याचे द्यूत झाले
नियतीचेच फासे पडले कित्तेकदा

का घडते नको ते? का नसते हवे ते?
या प्रश्नांनी मला पिडले कित्तेकदा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users