Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 06, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » विनोदी लेखन » गुंडाळलेलं प्रेम! » Archive through December 06, 2007 « Previous Next »

Psg
Wednesday, December 05, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या घराजवळ हल्ली सर्रास सर्व एरिय़ाजवळ असते तशी ’चौपाटी’ आहे बरंका.. भेळ, पाणीपुरी, ज्यूस, सॅंडविच, दाबेली, डोसा ई दुकानं ओळीनी आहेत बरीच. ओघानी तिथे पार्किंगही भरपूर असतं. (आम्ही पुणेकर दुचाकीशिवाय ऐकतो की काय!) तर परवा तिथून जाताना एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर पडताना मला दिसले. चालतचालत, एकमेकांशी काहीही न बोलता सरळ ते त्यांच्या दुचाकीकडे गेले.. मुलीच्या पूर्ण चेहर्‍यावर स्कार्फ गुंडाळलेला.. फक्त डोळे उघडे, आणि मुलाचा चेहरा तर चक्क हेल्मेटखाली! मला इतकी गंमत वाटली! आणि सवयीप्रमाणे ’थोडे’ प्रश्न पडले!

१) ज्या अर्थी चेहर्‍याचा इतका ’बंदोबस्त’ केला आहे, त्या अर्थी नक्कीच काहीतरी गडबड आहे! मग हे प्रेम त्यांना १० मिनिटं तरी ’मोकळा श्वास’ घेऊ देतं की नाही?

२) यांनी पाणीपुरी, किंवा तत्सम जे काय ते.. कसं खाल्लं असेल? तेव्हा तरी ही आवरणं दूर केली होती की नाही? का फक्त वासच घेतला?

३) रस्त्यावर सध्या इतकी गर्दी असते की साधं बोलतानाही एकमेकांशी ओरडून बोलावं लागतं, तर हे दोघं ’प्रेमाचे हळुवार कोमल बोल’ कसे बोलत असतील एकमेकांशी? का त्यांची मनंच बोलतात? (आमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, तरी अजूनही सगळं स्पष्टपणेच बोलायला लागतं, त्यामुळे असं ’ मनं समजून घेणार्‍या’ लोकांचा मला जाम हेवा वाटतो बुवा!)

४) जे काही दोनचार शब्द बोलत असतील ते एकमेकांना ऐकू कसे जात असतील?

५) प्रेमात ’डोळ्याची भाषा’ असते म्हणतात.. त्यावरच यांचं भागतं का? बाकीचा चेहरा लागत नाही का ही भाषा बोलायला?
ईत्यादि!

पण मला सांगा, हे नुसते चेहरे लपवून काही होतं का हो? (साधी पाणीपुरीही धड खाता येत नाही हा भाग वेगळा!) त्या मुलीच्या ड्रेसवरून, पर्सवरून, अगदी तिने घातलेल्या सॅंडलवरूनही तिला सहज ओळखता येईल.. आणि मुलाकडे तर आख्खी दुचाकीच.. त्याच्या नंबरप्लेटवरून त्याला लांबूनही ओळखता येईल की. ते ज्या कोणापासून लपत आहेत ते काय इतके मूर्ख असतील का की येणार्‍याजाणार्‍या लोकांच्या फक्त तोंडाकडेच पाहतील? बाकी काही दिसत नाही त्यांना असं यांना वाटतं का? प्रेमात ते दोघं आंधळे असतील हो, बाकी लोक कसे असतील, नाही का?

असो! पण हे तोंडं लपवून प्रेम करणं कसलं काहीच्याकाही अनरोमॅंटिक आहे, नाही? म्हणजे बघा हं- ’तिचा’ चेहरा कायम झाकलेला, त्यामुळे तिनी कोणती हेअरस्टाईल केली आहे, कानात काय घातले आहे, लिपस्टिकची शेड तिला चांगली दिसत आहे का.. हे त्याला कळणारच नाही.. आणि कळले नाही तर तो तारीफ तरी कशाची करणार? स्वानुभवावरून सांगते, की अशी प्रेयसीची तारीफ सुरुवातीला तरी करणं आत्यंतिक गरजेचं असतं बरंका.. नंतर संसाररथाला जुंपल्यानंतर खोटं बोलवत नाही हो! आणि खोटं तरी किती काळ बोलणार नाही का? प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, याच नियमानुसार प्रेमिकेच्या तोंडावळ्याची तारीफ करण्याची देखील एक वेळ असते... ती हीच.. नुकती प्रेमात पडल्याची. आणि नेमक्या त्याच वेळी ती बुरख्यात, आपलं फडक्यात! हाय रे दैवा! आता, तारीफ ऐकणं हे कोणत्याही वयोगटातल्या स्त्रीचं आवडतं काम. तीच तिला चक्क प्रेमात पडूनही ऐकायला मिळत नसेल तर काय उपयोग त्या प्रेमात पडण्याचा??

आणि ती? तिलाही वाटत नसेल का, की आपला बॉयफ़्रेन्ड किती ’हॅन्डसम’ दिसतो ते आपल्या मैत्रिणींना सांगावं? पण तो तर हेल्मेटखाली! त्याचे केस किती वाढले आहेत, ते कापण्यायोग्य झालेत की नाही? त्याने जेल लावलं की त्याच्या केसांना ’शाईन’ येते, की असे भुरकट केसच त्याला चांगले दिसतात? तसंच त्याला दाढी चांगली दिसते की नाही? अभिषेक (बच्चन हो!) सारखी ’स्टबल’ चांगली दिसते, की फ़्रेंचकट बरा दिसतो, की अजिबात दाढी नकोच, नुसती मिशीच बरी, का पूर्ण ’क्लीनशेव्हन लूक’च बेस्ट? किती किती गोष्टी असतात हो बघा ना.. तो कायमच हेल्मेटखाली असेल, तर त्याबद्दलची बहुमोल मतं ती कधी देणार? आणि तीच बरोबरही कशी आहेत हे त्याला पटवून देणार?

किमान या दोघांनी एकमेकांना प्रेमात पडण्यापुर्वी तरी नीट बघितलं असेल अशी आशा ठेवूया आपण. कारण त्यानंतर ’कोणीतरी पाहील’ या भितीनी हे, म्हणजे यांचे चेहरे लपलेलेच! पण मग थोड्या दिवसांनी चेहर्‍याचे ’फायनर डीटेल्स’ विसरायला होत असतील का हो? म्हणजे बघा हं.. मला तरी असं होतं.. एखादा चेहरा २-३ वेळाच पाहिला असेल आणि नंतर बराच काळ तो पाहिलाच नाही, तर तो चेहरा मनात थोडा धूसर होतो की नाही? आणि मग आपण त्याला ’आपल्या मनात असतं’ त्याप्रमाणे बघतो. असंच यांचं तर होत नसेल ना? अगदीच काही अशक्य नाही! मग स्वप्नात पण तसंच दिसत असेल का हो? म्हणजे तिला वाटत असेल की तो ’सेम ह्रिथिक’ सारखा दिसतो.. त्यामुळे तिच्या स्वप्नात त्याच्याऐवजी ह्रिथिकच येत असेल का हो? मग तर बाप्पा, त्याच्या स्वप्नात कोणकोण येत असेल याची आपण कल्पनाही न केलेली बरी, ना?

आणि सर्वात महत्त्वाचं- हे एकमेकांना भेटल्यावर ओळखत कसे असतील? सपोज, त्यांची भेटायची एक ’क्ष’ जागा आहे. त्या जागेवर ती रोज उभी असते त्याची वाट बघत. त्याला तो तिचा नेहेमीचा स्कार्फ परिचित आहे. एखाददिवशी तिने स्कार्फ बदलला, नवा गुंडाळला, तर तो तिला ओळखणारच नाही की! ती समोर असेल, पण त्याला दिसणारच नाही ना! ती नाहीये बघितल्यावर हा पटकन मनात म्हणेल... ’आज का नाही आली ही? तिच्या भावानी आम्हाला इतका बंदोबस्त करूनही ओळखले तर नसेल काल?’

किंवा, सीनारीयो नंबर दोन: तिचा तोच स्कार्फ गुंडाळून त्याची गंमत करण्यासाठी तिची बहीण, किंवा मैत्रिण गेली एखाद्या दिवशी सहज तर? हा पठ्ठ्या तिच्यासमोर जाऊन उभा राहील आणि खूण करेल मागे बसायची.. ती बिचारी स्कार्फ काढायचा प्रयत्न करेल, तर हा भडकेल, घाबरेल आणि इकडेतिकडे न बघता पटकन तिला बसवेल की मागे आणि वेगळ्याच मुलीबरोबर हिंडेल! ही बिचारी मागून सांगायचा प्रयत्न करेल की ’ती मी नव्हेच’, पण त्याला कुठे ऐकू जायला? ’डोळ्यांची’ भाषा सुरु व्हायला वेळ असेल ना थोडा..निदान पाणीपुरीचा स्टॉल गाठेपर्यंततरी?

आणि अजून एक हां, अजून एक सीनारीयो- नंबर तीन- एखाददिवस उलटं झालं तर? त्याचा एखादा निरोप सांगायला त्याचीच बाईक घेऊन त्याचा मित्र आला त्या ’क्ष’ जागी तर? ही पण मागेपुढे न बघता बसली आपली मागे लगेच! तो कस्सला बावरेल ना? तिला ’वहिनी’ म्हणावं, की नावानी हाक मारावी, हेल्मेट काढावं की नाही, काढायचं झाल्यास सुरक्षित जागा कोणती.. वगैरे वगैरे वगैरे...

थोडक्यात हे गुंडाळलेलं प्रेमप्रकरण मला तरी फार कन्फ्यूजिंग वाटतंय बुवा! यात प्रेम कमी आणि भानगडीच जास्ती दिसताहेत. अरे, करता ना प्रेम, मग चेहरे का लपवता? लोक बघतील म्हणून? पण सच्च्या प्रेमिकांना लोकांची पर्वा कधीपासून वाटायला लागली? उलट असे चेहरे लपवत फिरलं की लोकांचं लक्ष जास्त जातं, कुतुहल चाळवलं जातं.. उलट जितकं सहजपणे वावराल, तितकं लोकांच्या नजरेत यायचा नाहीत.. कधी कळणार लोकांना, सहजपणे प्रेम करून, ते सफलही करायच्या युक्त्या?


Monakshi
Wednesday, December 05, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है पूनम. सहीच मजा आ गया. :-)

Meenu
Wednesday, December 05, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळलं हो लग्नाआधी कुठल्या कुठल्या विषयावर बोल्लात ते .. आणि काय गं माझा चेहरा आठवतोय ना ? का latest photo पाठवायला हवाय ..?

Kedarjoshi
Wednesday, December 05, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, तरी अजूनही सगळं)स्पष्टपणेच बोलायला लागतं, त्यामुळे असं ’ मनं समजून घेणार्‍या’ लोकांचा मला जाम हेवा वाटतो बुवा > LOL

Daad
Wednesday, December 05, 2007 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम.... धम्माल लिहिलय.
***नंतर संसाररथाला जुंपल्यानंतर खोटं बोलवत नाही हो! ......***
मजा आया!


Manuswini
Thursday, December 06, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम पहील्यांदा केलेले वर्णन वाचताना वाटले की चेहरा काळा होवु नये schooter/bike बसल्यावर म्हणून मुलीने cover केला असेल नी आता scooter सुरुच करणार म्हणून मुलाने हातात घेवून चालत रहण्यापेक्षा bike जवळ जाण्याआधी डोक्यात घातले helmet पण पुढे वाचल्यावर कारणमिमांसा कळली :-)

हे असे चालते आजकाल? .एवढे भीत्रे प्रेम?
मग ते एवढे जुने गाणे त्याचे काय, प्यार कीया तो डरना क्या'?:-)

पूनम,
तारीफ़ एकणे हा बायकांचा हक्क आहेच पटले.


Divya
Thursday, December 06, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाददिवशी तिने स्कार्फ बदलला, नवा गुंडाळला, तर तो तिला ओळखणारच नाही की!
LOL छान लिहीलय पुनम.

Satyajit_m
Thursday, December 06, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्या कोणी स्कार्फवर कविता लिहीतय तर कोणी कथा. :-) स्कार्फचा बुर्दंड खुप महगात पडलेला दिसतोय.
पुनम, किती प्रष्न पडतात ग तुला?

पण पुण्यातल्या मुली आणि त्यांचा स्कार्फ हे जरा अती होत, साध रस्त्यावरुन चालायच म्हंटल तर स्कार्फ हवा. कारण काय तर दुशीत हवा आणि उन, जशा ह्या अत्ताच अमेरिकेतुन इम्पोर्ट झाल्या आहे आहेत. मुंबईत आणि इतर ठीकाणी काय Air filter बसवले आहेत का? पन उगाच एखाद्या गोष्टीच अवडंबर माजवणे म्हणजे काय तर ते म्हणजे पुण्यातल्या मुली आणि त्यांचा स्कार्फ. स्पष्ट बोलायच तर झाकायच ते सोडुन नको ते झाकणे.

नाहीतर मुंबई बघा, नुसती बघत रहाल मुंबई :-) :-)

गुंडळलेल प्रेम वाह!!! शेवटचा सल्ला जबरदस्त आहे.
प्रेम करुया खुल्लमखुल्ला...

पुनम लगे रहो अजुन बरेच ज्वलंत विषय आहेत


Ajai
Thursday, December 06, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, तरी अजूनही सगळं स्पष्टपणेच बोलायला लागतं, त्यामुळे असं ’ मनं समजून घेणार्‍या’ लोकांचा मला जाम हेवा वाटतो बुवा!) >> lol

Manjud
Thursday, December 06, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, सही आहे. मी बहुतेक तुझ्या ब्लॉगवर वाचलं होतं. शीर्षक मस्त दिलंय 'गुंडाळलेलं प्रेम'....... व्वा!!

मोना, आठवले वाट्टं पूर्वीचे दिवस? एकदम दिलखुलास दाद आली तुझ्याकडून.....


Ajjuka
Thursday, December 06, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा हा! मस्त
|(आमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, तरी अजूनही सगळं स्पष्टपणेच बोलायला लागतं, त्यामुळे असं ’ मनं समजून घेणार्‍या’ लोकांचा मला जाम हेवा वाटतो बुवा!) |
अगं पूनम.. लग्नाची वर्षं आणि स्पष्टपणा एकाच प्रमाणात वाढत जातात. व्यस्त प्रमाणात नाही. :-)


Farend
Thursday, December 06, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या कथेची 'कथापौर्णिमा' झाल्यानंतरही थोडी वाढ झालेली दिसते, पण मस्त :-)

Vaibhav_joshi
Thursday, December 06, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम

टायटलसकट भारी लिहीलंय . स्कार्फ किंवा हेल्मेट्च काय , नुसतं लोकांकडे पाठ करून बसलं की आपल्याला कुणी ओळखूच शकत नाही असला जबरा कॉन्फिडन्स असतो प्रेमिकांना . वास्तविक रोज त्या रस्त्यावरून जाणार्‍या प्रत्येक माणसाला ह्यातील प्रत्येकाची पाठ तोंडपाठ झालेली असते .
पण निर्व्याज निर्व्याज म्हणतात ते प्रेम हेच असाव .
:-)
असो . मस्त लिहीलंयस . पुढील लेखनास शुभेच्छा


Monakshi
Thursday, December 06, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे मंजू, कसं असतं माहितीये का, मांजर डोळे मिटून दुध पीते तिला वाटतं की कोणी आपल्याला बघत नाहीये हे पण असच आहे.

मी तर पूर्वी पार्ल्यात फिरायचे तेव्हा तर चक्क नवर्‍याच्या पाठीमागे लपून बसायचे की मी कोणाला दिसू नये म्हणून. :-)


Manjud
Thursday, December 06, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३१ डिसेंबरच्या संध्याकाळचे फोटो वगैरे येतात ना पेपरात, ते सुर्यास्त बघतानाचे, त्यात असलेल्या जोडप्याच्या बाबतीत मला कायम हाच प्रश्न पडतो की ह्यांच्या घरी माहीत असेल का? नसेल तर आता या मुलीची आई तिला ड्रेसवरून ओळखणार नाही का?

Zakasrao
Thursday, December 06, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, तरी अजूनही सगळं)स्पष्टपणेच बोलायला लागतं, त्यामुळे असं ’ मनं समजून घेणार्‍या’ लोकांचा मला जाम हेवा वाटतो बुवा >
नेमकेपणा आहे प्रश्नामध्ये :-)

Anjut
Thursday, December 06, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! पूनम मझा आ गया आणि शीर्षक पण अगदी समर्पक. अश्याच लिहित रहा.

Dineshvs
Thursday, December 06, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणेकराना अगदी घरचा आहेर आहे हा. मला पुणे सोडल्यास इतर कुठे असे थोबाडं लपवणारे प्रेमिक दिसले नाहीत.

Manuswini
Thursday, December 06, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो तेच मी म्हणतार होते दिनेशदा, म्हणून माझ्या वरच्या post मध्ये लिहिले की हे आजकाल असे चालते(प्रेम हो) पण ते पुण्यातले प्रेम आशे हे नंतर कळले.

कारण आपल्या five garden मध्ये कीतीतरी जोडपी खुल्लम्खुल्ला प्रेम करत असत आणि आम्ही तेव्हा लहानपणी कुतुहलाने नजर टाकत जात.

आता हे एकच नाव आठवतेय कारण माझी आत्या माटुंग्याला रहायची.


Farend
Friday, December 07, 2007 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग मुंबईत एखाद्याने लेडीज डब्याच्या एका बाजूला असलेली मुलगी व बाजूच्या फर्स्ट च्या डब्याच्या त्याच बाजूला दाराबाहेर असलेला मुलगा असे लोंबकळून प्रेम करणारे प्रेमीक पाहून 'लोंबकळणारे प्रेम' वगैरे लेख लिहिला तर मुंबईतील लोक तसे घरच्यांपासून लपण्यासाठी गर्दीच्या वेळी लोकलच्या दारात लटकून प्रेम करतात असा समज आम्ही करून घ्यायचा काय? :-)

मला वाटते की येथे फक्त विनोद निर्मितीसाठी तसा अर्थ लावलाय त्याचा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators