|
Daad
| |
| Friday, November 30, 2007 - 4:31 am: |
| 
|
आई ओरडणार आता. पीटीच्या सरांनी जास्त वेळ प्रॅक्टीस घेतली.... त्याला मी काय करू? त्यांना सांगू? आई ओरडेल सातच्या आत घरात गेले नाहीतर?... आईला सांगितलं तरी काही उपयोग नाही. कितीही सांगितलं तरी तिचं चालूच असतं. सातच्या आत घरात यायलाच पाहिजे... अशी चालू नकोस, तशी बसू नकोस, आता मोठी झालीस.... एकदा म्हणायचं लहान राहिलीस का आता? मोठी झालीयेस. जरा विचार कर आपला आपण... परवा आपणहून कबड्डीसाठी नाव घातलं तर म्हणे... घरात कुणी मोठं आहेत की नाही? आम्हाला विचारायचस तरी. अजून लहान आहेस म्हणून सांगतेय. अगदिच शिंग फुटल्यावर.... एकाच वाक्यात एकदा लहान काय मोठी काय.... वैतागचय. बाबा नाही बोलायचे, अगदी परवा परवा पर्यंत. पण आईने एकशे पंचवीस वेळा म्हटल्यावर त्यांनीही म्हणायला सुरूवात केलीये.. राणी, जरा जपून! आत्ता जपून काय? जपून खो-खो की जपून कबड्डी? तिकडे शाळेत त्या डुडायडू बाई... डोजबॉल जोरात फेकला नाही तर, आईने जेवायला घातलं नाही काय आज? असं विचारतात.... ती परी आणि तिचा ग्रूप... खेळणार नाहीच पण हसणार मात्र फिदिफिदी... परी कसली? चेटकिण आहे, झालं. आयला... विसरलेच! आईने देसाईंकडे बेसन सांगायला सांगितलं होत. किती किलो? दीड की अडीज? चला.... परत उलटपावली देसायांच्या किराणा आणि भुसार.... भुसार म्हणजे काय?... दुकानाच्या बाहेर कायम बायका पाखडत बसलेल्या असतात... भुसा उडवत... वैतागच आहे च्यायला.... च्च! आईचं हे अजून एक. च्यायला-बियला बोलायचं नाही.... म्हणजे दादाने म्हटलेलं एकवेळ चालतं पण मी नाही. हा दाद्या-पाद्या तरी असा आहे ना.... नको ते शब्द घेऊन येतो घरी.... त्याचे मित्र आले की काय धम्माल असायची.... काय एकेक शब्द... कोट्या.... पप्या, आणि अश्क्या. कुणाची उंची जास्तं वरून परवाच मस्ती चालली होती. तेव्हा उभं केलं दोघांना दोन बाजूंना आणि पट्टी लावायला गेले डोक्यावर खुणेसाठी.... तर आलीच आमची कालीमाता, 'तुझं काय काम इथे... चल बघू घरात....' मी जरा मजेत असलेलं बघवतच नाही तिला हल्ली. तिने काहीही बोललेलं ऐकूनच घ्यायचं म्हटल्यावर काही अर्थच नाही. आमच्यावेळी आम्हाला, तुझ्या वयाची होत्ये तेव्हा..... ही रेकॉर्ड एकदा सुरू झाली की शाळेची असते तशी तासाची घंटा असती तर काय बरं झालं असतं.... असं वाटतं. साधं गाणी ऐकत कॉटवर पालथी पडल्येय, पाय हलवत तर म्हणे सरळ उठून बस. फ़्रॉक वगैरे तर कध्धीच घालायचा सोडला... आत्ता स्कर्टची कसली मस्त फॅशन आहे.... तरी स्कर्ट घालायचा नाही, स्लीव्हलेस नाही. सारखा सारखा येऊन जाऊन तो पंजाबी, त्यावरची ती मॅड ओढणी.... उज्वला काय मस्तं एकाच खांद्यावर घेते... आमच्याकडे दोन बाजूंना पिना लावायला लागतात.... अस्सा राग येतो म्हणून सांगू.... मोठी माणसं एकदम मोठीच जन्माला आली की काय? विसरलीत आपला छळ. का बिलकुलच विसरली नाही? हे म्हणजे आपल्या सासूने आपल्याला छळलं म्हणून आपण सुनेला छळायचं.... तसलं! छळवाद आहे नुसता! मगाशी धक्का लागल असं दाखवून मुद्दाम धक्का मारणारा तो.... मला कळत नाही असं वाटतं की काय या मुलांना! इतकी बावळट वाटले की काय. मला नाही पर्वा असल्या धक्क्यांची आणि पोरांचीही. च्यायला, कबड्डीत ह्याच्यापेक्षा दसपट लागतं. परवा आईबरोबर बाजारात जात होते. समोरून आला एक किडमिड्या... लक्षात आलंच माझ्या की हा धक्का मारणार... मुद्दामच खांदा मीच जरा जोरात पुढे केला.... त्यालाच लागलं... कळवळून वळला... तशी खुन्नस देत उभी राहिले.... दुसर्या तिसर्या आईला काय आनंद झाला असता.... पण आमची आई नाही. माझा हात धरून तिथेच बडबडत, ओढत निघाली. काय इज्जत राह्यली..... गेल्या शुक्रवारी क्लासहून घरी येताना तसलाच रोडसाईड रोमिओ... येऊन दादाला सांगितलं तर निघाला होता माझा हात धरून 'चल दाखव कोण तो... साल्याला..' आईने थांबवलं म्हणून.....मी तर निघालेच होते, दाखवायला. झोडपून काढ म्हणावं. अशूदादाच्या लग्नात, गेल्याच महिन्यात आम्ही सगळ्या मावस, मामे बहिणी साड्या नेसलो होतो. चांगल्या साठेक पिना लावून माझं पार्सल बांधलं होतं तरी येता-जाता माझा पदर सारखा करायची काही गरज आहे का?.... नाही तर ती आई कसली? तिथेही मावश्यांची चर्चा माझ्या उंचीची, बांध्याची... म्योठ्ठी दिसत्ये न्यायी वयाच्या मॅनॅने..... मग घरी आल्यावर तो दृष्ट काढणे-बिढणे प्रकार..... ........................... मी तरी अशी आहे ना.... काय बरं दादाचा शब्द? हा.... भिन! तंद्रट! देसायांच दुकान मागे राहिलं.... शुभाच्या घरापर्यंत आले की. आता इथे रस्त्यातच वळले तर किती बावळट दिसेन.... त्यापेक्षा जिमखान्याच्या कट्ट्याला वळसा घालून..... कसली कसली भुक्कड पोरं बसलेली असतात कट्ट्यावर.... आता मारतिल शिट्ट्या, काहीतरी यडचाप सारखं बोलतिल.... .............................. जाइये... आप कहा जायेंगे... ये नजर लौटके फिर आयेगी..... .....बघितलाय त्याला दादाच्या टोळक्यात एक्-दोनदाच. मुद्दाम माझ्याशीच बोलला होता.... मॅथ्स काय, हिस्टरी काय.... कसलातरी विषय काढून. माझ्यापेक्षा फूटभर तरी उंचच असेल. कट्ट्यावर दुसरं कुणीच नव्हतं.... हा एकटा काय करत असेल तिथे? चक्क हाक मारली नावाने.... बरोबरय... नावानेच हाक मारेल.... तो काय राणी म्हणणारय? पण त्याच्या तोंडी राणी बरं.... की मानसी बरं? ....श्शी कुठून बुद्धी झाली कट्ट्यावरून जायची..... म्हणे तुझ्याशी जरा बोलायचय..... कित्ती ब्रेव्ह म्हणायचा.... कितीही जोरजोरात श्वास घेतले तरी धाप जात नाहीये. छातीवर हात ठेवून किती वेळ अशी खोलीत बसणारय मी? अजून धडधड थांबत नाहीये. श्शी... कानाच्या पाळ्याही लाल झाल्यात. खेळते तेव्हाचं ठीकय पण आत्ता गाल तापलेत.... चोळले तरी लालच.... अश्शी गाढवतरी मी. चोळले तर अजून लाल नाहीका होणार? ........ असेल काहीतरी दादाला निरोप... म्हणून थांबले आणि जवळ गेल्ये. तर.... तर.... नुसतच डोळ्यात बघितलं.... किती खोल.... तो काही बोलायच्या आधीच..... .... मी वळले झर्रकन अन भराभरा चालत सुटल्ये..... तर मागून ही गाण्याचे लकेर.... धुंद घोगर्या आवाजात..... जाइये... आप कहा जायेंगे... नको नको म्हणता... वळून बघितलच शेवटी.... अगदी वळणावर पण.... ते ही निसटतं.... पूर्णं वळून नाहीच... नुसतीच मान वळवून, डोळ्यांच्या कोपर्यातून.... सुटल्ये तिथून जी.....ती घरात शिरून थेट खोलीत येऊन थांबल्ये..... पण गाण्याचे सूर पाठ सोडत नाहीयेत.... सूर म्हटले की शब्द आलेच.... मॅडसारखे पाठोपाठ.... दू ऽऽऽरतक आपके पीछे पीछे... पण.... पण हे म्हटलच नव्हतं त्याने... आपल्याच तिरक्या डोक्यात.... नुसते गाण्याचे शब्द आठवले तरी... तो आवाज.... ते डोळे.... भरदार खांदे.... कमरेवर हात घेऊन उभा.... नेहमीची, मानेवरची केसांची सुटलेली बट.... मेली हुळहुळतेय.... ती तरी अश्शी लाघट.... कित्ती बांधली पोनीटेलमध्ये तरी..... .....तिचे नव्हते शहारे आले कधी... हं?.... ................... आई हाक मारतेय... बेसन..... (जाईये.... आप कहा... ) दुकानात बेसन सांगायचं राहिलंच की...... (दूरतक आपके पीछे पीछे... ) आता? संध्याकाळी ह्यावेळी? नाही गं बाई ह्या काळोखात जायची मी.... समाप्त.
|
Akhi
| |
| Friday, November 30, 2007 - 4:47 am: |
| 
|
खुप खुप खुप छान!! अजुन काय लिहु दाद???
|
Divya
| |
| Friday, November 30, 2007 - 5:27 am: |
| 
|
आई ग! दाद कसल लिहीतेस ग तु, अगदी माझ teenage त्यावेळच आईच बोलण आठवण करुन दिलस. अगदी अगदी ते च्यायला म्हणल कि खाल्लेला ओरडा, मला कॉलेजमधे असताना north indian मित्रांमुळे यार म्हणायची फ़ार सवय लागली होती. माझे पपा म्हणजे जमदाग्नीचा अवतार, काय यार... अस कधी तोंडातुन गेल कळायचच नाही. ते कशाला आईला अस म्हणल कि आई अमका अमका माझ्याकडे बघत असतो रोज दिसतो वैगरे म्हणल तर हिच सुरु, तु कशाला बघत होतीस, मी कुठे बघत होते तर तिच मग तुला कस कळल तो तुझ्याकडे बघतो म्हणुन तु बघीतल्याशिवाय का... नाकासमोर सरळचालाव ईकड बघु नये कि तिकडे बघु नये... आज फ़ार हसु येत पण तेंव्हा फ़ारच वैताग आणायची आई. ते रोडरोमियोच तर काय विचारुच नकोस, माझ्याकडे एक चांदण्या असलेला dress होता, खुप आवडायचा मला. तो घातला कि ते गाण सुरु व्हायच 'बदन पे सितारे...' शेवटी तो घालायचाच सोडुन दिला. परत तु म्हणते तस ते गान कानात घुमत रहायच अगदी सेम. आणि ते माधुरीच 'एक दोन तीन... तेरा करु दिन दिन गिनते..'ने एक फ़ारच वैताग आणला होता. माझ्या भावाचा मारपण खाल्ला होता त्या पोराने. खुप खुप आठवणी जाग्या झाल्या. अगदी मनापासुन दाद. फ़ुलपाखरासारखे दिवसना ते. 
|
Rajya
| |
| Friday, November 30, 2007 - 5:55 am: |
| 
|
मस्त, मऽस्त, मऽऽस्त, मऽऽऽस्त
|
Mankya
| |
| Friday, November 30, 2007 - 6:28 am: |
| 
|
दाद .. .. .. क्लाSSSSSस ! माणिक !
|
Meggi
| |
| Friday, November 30, 2007 - 7:04 am: |
| 
|
दाद, किती सुंदर लिहितेस तू.. teen age मध्ये गेल्या सारखं वाटलं..
|
छान झक्कास, अस सगळ असत काय?
|
Ajai
| |
| Friday, November 30, 2007 - 12:19 pm: |
| 
|
दाद ट्युशन्स देणार का? तुमच्यासारखं सोडा त्याच्या २५% जरि लिहता आल तरी मी स्वत : चीच पाठ थोपटुन घेईन
|
Chinnu
| |
| Friday, November 30, 2007 - 3:28 pm: |
| 
|
दाद, कधी भेटलीच तर नक्की दृष्ट काढणार तुझी! तंद्रट, ढिम्म.. अगदी अगदी! म्हटलं रायफल शूटिंग शिकायचयं, तर घरी जो हशा पिकला होता, तो अजून आठवतोय! दिव्या
|
फ़ारच छान...............मी नविनच आले आहे मायबोलिवर..मस्त वाटले वाचून....
|
Pama
| |
| Friday, November 30, 2007 - 4:26 pm: |
| 
|
दाद.. खूपच सुंदर. मी शाळेत असताना तू होतीस का तिथे? कस अगदी अचूक मनातल लिहिलस.
|
Asami
| |
| Friday, November 30, 2007 - 6:39 pm: |
| 
|
अशक्य लिहितेस यार दाद तु. हे सगळे रंगीबेरंगी वर हलव तुझ्या, एकत्र राहिल. नसेल तर माझा घेऊन वापर
|
Meghdhara
| |
| Friday, November 30, 2007 - 7:07 pm: |
| 
|
व्वा दाद! काय मस्त लिहिलयस. अगदी त्या वयातल्या वेगात झपाटलेलं.. गोंधळलेलं.. मजा आली. टीनेज रीविजीटेड! मेघा
|
Sashal
| |
| Friday, November 30, 2007 - 7:26 pm: |
| 
|
दाद, मस्त विषय निवडलास आणि लिहीलंयस पण छान .. फ़क्त काही काही वाक्य adolescent च्या विचारातली न वाटता, एखाद्या adult च्या विचारातली वाटतात .. For e.g., हे म्हणजे आपल्या सासूने आपल्याला छळलं म्हणून आपण सुनेला छळायचं, आणि दुसरं म्हणजे त्या वयात तसा experience आला तरी असं शब्दांत मांडता येणं कठिण वाटतं म्हणून कदाचित adult thinking असेल ह्या वाक्यांमागे असं वाटतं .. त्यातली निरागसता highlight होत नाही असं वाटलं .. कानाच्या पाळ्याही लाल झाल्यात. खेळते तेव्हाचं ठीकय पण आत्ता गाल तापलेत नेहमीची, मानेवरची केसांची सुटलेली बट.... मेली हुळहुळतेय.... ती तरी अश्शी लाघट.... कित्ती बांधली पोनीटेलमध्ये तरी..... .....तिचे नव्हते शहारे आले कधी...
|
Daad...you are just too good!!! Masta 
|
Vrushs
| |
| Friday, November 30, 2007 - 10:25 pm: |
| 
|
दाद..................... काय लिहितेस तु. दरवेळेस वाटतं आपला अनुभव ही कशी काय जगली? ह्यापेक्षा चागंल्या शब्दात दाद द्यायला मी दाद नाही ना.....
|
Amruta
| |
| Friday, November 30, 2007 - 10:30 pm: |
| 
|
म्योठ्ठी दिसत्ये न्यायी वयाच्या मॅनॅने..... >>> हसुन हसुन पुरेवाट झाली बघ अगदी म्हणुन पाहिल मोठ्यांदा. साडी नेसली कि मोठ्या बायकांकडुन असली वाक्य तर ठरलेली असतात. मोठि दिसत असो वा नसो बाकी एकदम झकास लिहिलयस दाद, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. अक्षरश्: दिव्या म्हणते तस त्या १,२,३ ने वात आणला होता. काय मजेदार होते ते दिवस...
|
Jayavi
| |
| Saturday, December 01, 2007 - 3:55 am: |
| 
|
अगं काय गं....... किती अचूक उतारल्या आहेस त्या वयातल्या सगळ्या भावना...!! फ़ार फ़ार छान लिहितेस गं...! तुला दाद काय द्यावी हाच मोठा प्रश्न असतो..... किती विषय लीलया हाताळतेस गं!
|
Anaghavn
| |
| Saturday, December 01, 2007 - 9:12 am: |
| 
|
धुंद सैर करुन आणलंस दाद्-----त्या वयात. अनघा
|
Savyasachi
| |
| Saturday, December 01, 2007 - 11:19 pm: |
| 
|
दाद, अप्रतिम.... एकदम मस्त कथा. जेवढी पाहीजे तेवढीच. तुझा कंट्रोल वाखाणण्यासारखा आहे. आणि शेवटच्या एकाच वाक्यात तू झालेला बदल दाखवला आहेस ते कमाल आहे. अशक्य !
|
|
|