|
बापू . आपण गझल विरोधक वगैरे नाही आहात ह्यात काही शंकाच नाही . आणि मी ही फक्त गझल समर्थक नाहीये . कवीने कवी असावं कुठल्याही काव्यप्रकारापुरतं मर्यादित असू नये हे सत्यच आहे . गझलचा पगडा वगैरे बसत असावा ह्याबद्दल मात्र दुमत आहे . मी ह्या स्थितीतून गेलो आहे ( दोन्ही अर्थी ) म्हणजे कविता सुचत राहिल्या की गझल सुचणं बंद झाले की काय किंवा उलट अर्थी सुद्धा . गझल हा प्रकार बंदिस्त आहे ह्यात वादच नाही . तीच तर खरी मजा आणि नशा आहे ह्या काव्यप्रकाराची . नियम अगदीच जुजबी असतात . एकदा का तुम्हाला वृत्त आणि लय , वजन ह्यांची जाणीव झाली की तुम्हाला कल्पना सुचतानाही मीटरमध्ये सुचतात जेणेकरून ते केवळ craft होत नाही . आणि कल्पना मीटर मध्ये सुचणं हे कुठल्याही काव्यप्रकाराला मारक असेल असे मला वाटत नाही . झालाच तर त्याचा वाचकाला वाचताना एक लय , एक नाद निर्माण झाल्याने फायदाच होतो असं वाटतं . मायबोलीवरची गझल समीक्षा ही कंटेंट " सोबतच " नियमांवरती पण असते कारण तिथे बरेचसे लोक नव्याने गझल लिहून पहात असतात . त्यांना अश्या चर्चेने झाला तर फायदाच होतो . आणि एखादा बंदिस्त फॉर्म स्वीकारला म्हटल्यानंतर तो पाळला आहे की नही ह्याबद्दल चर्चा होणारच , नाही का ? उद्या कुणीतरी समजा असं म्हटलं की बर्याचशा मुक्तछंदातल्या कवितांच्या ओळी आडव्या लिहील्या की एक ललित तयार होतं तर ? राहता राहिला भाग विरोधाभासाचा तर गझल ही कधीच दारू , प्रेयसी , आणि विरोधाभास ह्यांच्यापुरती मर्यादित नव्हती . अनेको उदाहरणं अशी आहेत की ज्यामध्ये दोन्ही ओळी एकमेकांना पूर्क म्हणून अत्यंत सुंदर रीतीने लिहील्या जातात . त्यात विरोधाभास नावालासुद्धा नसतो . वानगीदाखल चंद्रशेखर सानेकरांच्या पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे तुला गुणगुणाया तुहे ओठ व्हावे किंवा माझ्या एका गझलमधील तुला हवे तोवरी तुझ्या अंगणात होतो कधी तुझा मोगरा कधी पारिजात होतो ह्या ओळी आपण जरूर पहा . ह्यांची जर मुक्तछंदातली कविता लिहायची झाली तर ? दोन वृत्तबद्ध ओळीतून जे सार सांगता येतं आहे त्यासाठी विरामचिन्हांनी नटवत एक आख्खा paragraph लिहायचा का ? बरं पारंपारिक भावगीतं तरी गझल पासून अशी कितीशी दूर आहेत ? शेवटच्या अक्षरावर यमक जुळतेच ना ? ( त्याला स्वरकाफ़िया वर आधारित गझलही म्हणतात ) मग त्यात काव्य नाही किंवा प्रतिमा गझलच्याच धर्तीच्या आहेत असं म्हणणं योग्य ठरेल काय ? आपल्या म्हणण्यात मला तथ्यांश असा दिसतो की कविता लिहीताना विस्कळीत प्रतिमांचा वापर केला गेला तर वाचक दूर जातो आणि ते तर गझल मध्ये अधिक प्रकर्षाने पाळलं जातं कारण तिथे प्रत्येक दोन ओळीत नियम तर आलेच पण त्यातूनही प्रत्येक दोन ओळीत एक कविता असणं महत्त्वाचं असतं . म्हणजे गझलमध्ये तर काव्यात्मकता जास्तच पडताळली जाते असं नाही का ? थोडक्यात कुठल्याही काव्यप्रकारात काव्यच असणं सर्वात महत्त्वाचं असं वाटतं . बाकी माणिक्च्या कवितेसंदर्भात आपल्याला पडलेले प्रश्न मलाही पडले होते हे मी आधीच मान्य केलं आहे . पण ते गझलच्या प्रभावानेही मला वाटत नाहीये . माझ्यामते त्याला जे सांगायचं ते पहिल्याच दोन ओळीत सांगून झाल्याने ती अडचण आली असावी . म्हणजे असं बघा ना की प्रत्येक वाक्य अर्ध्यात तोडून जर दोन दोन ओळींच्या चार ओळीकेल्या तर त्या सेपरेट चारोळ्या वाटतात . पण दोन ओळी दिसल्या की कल गझल कडे जास्त जातो . असो . चू.भू.दे.घे.
|
Mankya
| |
| Tuesday, December 04, 2007 - 2:59 am: |
|
|
सतीश .. कविता आवडली ! मीनू .. दिवस मस्त ! लोपा, मीनू .. धन्यवाद ! बापू .. गजल वगैरे लिहिण्याचा हा प्रयत्नच नव्हता मुळी, आणि अजून तरी मला एकही गजल किंवा एकही शेर वृत्तात व्यवस्थित लिहिता आलेला नाही. यमकासाठी तडजोड वगैरे नाहीये बापू, मला तो शब्द नीटसा माहित नव्हता म्हणजे मी confident नव्हतो त्याबद्दल. ' ताळेबंद ' हवय तिथं. वैभवा .. प्रयत्न करतो जे लिहिलं आहे त्यामागची भूमिका मांडण्याचा ! तू हिशेबापाशी येऊन डिस्कनेक्ट झालास, करेक्ट. अता मधूनच येथे हिशेब वगैरे का आला ? हा तूझा प्रश्न. वर वर्णन केलेल्या वेळी एकांतात comfortable वाटत असताना माणूस स्वतःशी बर्याच गोष्टींची कबूली देत बसतो. ते एक प्रकारचा दिल्या घेतल्याचा हिशेबच ( ईथेही तूझी ' देवाण घेवाण ' आठवतेय मला ) असेल नाही का. ह्यात मुख्यत्वे अस होत साधारणतः की एखादा भावनिक व्यवहार स्वतःला अजिबात पटलेला नसतो किंवा अनपेक्षित झालेला असतो. त्यामागच्या कारणात माणूस नाही म्हटलं तरी थोडा काळ गुरफटतोच, त्या विचारात. नात्यात म्हणा किंवा कशातही जो असतो तो व्यवहारच की, फक्त प्रत्येक व्यवहाराचा स्तर वेगळा असतो. ' मिट्ट काळोख नाही ' म्हणजे पुर्णपणे पराभूत किंवा वाईट्ट काळ आहे असही नाही. त्याचा संदर्भ तर दुसर्या ओळीतही आलाय. एकवेळ पुर्णपणे दुःख परवडलं असत पण उगा दिलासा देणारा आशेचा किरण मला जास्त दुखावतोय. सांज जिवाभावाची सखी का वाटेल ? का नाही वाटू शकत, ते कळलं नाही. संध्याकाळचं वातावरण माझ्या मनाला दुःख कुरवाळत बसायला उद्युक्त करतय. त्या कडेलोट झाल्याचाही एक अघोरी आनंद किंवा उपभोग मला घेता आला नाही म्हणून तर हे अस अर्धवट जळत राहतोय सांजवेळी. हे फक्त मला अपेक्षित होतं ते लिहिलय. पुढल्या वेळेपासून नक्कि काळजी घेईन ह्या सगळ्या मुद्यांची. वैभवा .. अजूनही काही चुकल असेल तर फोन आहेच. मला आवडेल तु विचारलेलं. तु अगोदरही मला काळाबद्दल बोलला होतास पण अजुन ते पुरेस भिनल नसाव. वैभवा, बापू .. अनेकानेक धन्यवाद मार्गदर्शनासाठी ! शिकतोय अजून हे सगळ आणि जमेल असही वाटतय तूम्ही असताना. माणिक !
|
माणिक कलाकृतीमध्ये चूक बरोबर असं काही नसतंच , अंदाजे बयां और देखने का नज़रिया अलग अलग होता है बस . तुझं स्पष्टीकरण वाचून पटलं की तू जे लिहीलं आहेस त्यामागे तुझी अशी एक विचारधारा आहे . बाकी उहापोह करावयाला हा काही गणिताचा पेपर नक्कीच नाही . तुझा दृष्टीकोण समजला . आता त्यावर विचार करतो . फोन करेनच पण तो गप्पांसाठी . सतीश .. कविता आवडली . मीनू .. sunny days are here again? " गुत्ता " वरच्या सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद .
|
Desh_ks
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:12 am: |
|
|
माणिकच्या निमित्तानं झालेली सारीच चर्चा, विशेषत: बापू आणि वैभव यांची, खूपच उद्बोधक वाटली. वैभवचं सांगणं मला पूर्णच पटतय. या संदर्भात दोन उद्धरणं द्यावीशी वाटली, जी बहुतेक सार्यांनाच माहित असतील, तरीही.. पु.ल. देशपांडे यांनी म्हटलंय तसं "गझल हे एक वृत्त नसून ती एक वृत्ती आहे आणि त्यात एक सूक्ष्मशी निवृत्तीही आहे". ज्या कवीच्या संदर्भात हे 'सहज' आहे तो काव्याचा हाच 'फॉर्म' प्रभावीपणे लिहिणारच, नाही का? आणि कवयित्री शांता शेळके या एकदा म्हणाल्या होत्या "प्रतिभा आणि कारागिरी यातली सीमारेषा फार पुसट असते". तेव्हां प्रतिभेच्या प्रकटनात कारागिरी नाही दिसत तेव्हांच दर्जेदार निर्मिती म्हटलं जातं. खरं तर बापू आणि वैभव दोघांशीही सहमत असावंसं वाटतंय. मीनू, 'दिवस' छानच. पण एक विचारावसं वाटलं की दिवसांचं दुसरही रूप (बैल जुंपलेल्या घाण्यासारखं, निरर्थकपणे ओढल्या जाणार्या जपमाळेच्या मण्यासारखं वगैरे) मांडावंसं नाही वाटलं? बहुतेक वैभवनी म्हटल्याप्रमाणे "सनी डेज् आर हिअर अगेन... " Please don't mind. This is a casual comment. -सतीश
|
Meenu
| |
| Tuesday, December 04, 2007 - 9:18 am: |
|
|
सतीश आधीच्या काही माझ्या लिखाणातुन तु म्हणतोस तसं दिवसांच वर्णन येऊन गेलंय. या कवितेचा एक वेगळा मूड आहे. मी या कवितेबद्दल विचार करत असताना अध्यात्मिक पातळीवरचा विचार माझ्या डोक्यात जास्त होता. त्या पातळीवर विचार करताना असे नकारार्थी विचार नाही आले इतकच ..
|
Meenu
| |
| Tuesday, December 04, 2007 - 9:31 am: |
|
|
जहाज सहज वाटलं लिहावं तुम्हालाही सांगावं भलं केलं, बुरं केलं काय झालं ? कधी झालं ? कसं कसं घडत गेलं ? सहज वाटलं लिहावं लिहीता लिहीता कळत गेलं, कुठे काय चुकत गेलं .. पाहता पाहता जहाज कसं, खोलवर रुतत गेलं मध्यावर अथांगाच्या बुडलं असतं ? अगदी अगदी तरीही चाललं असतं .. समोर अथांग सागर खुणावत असताना, किनार्यावरंच रुततं ना आपलं जहाज, तेव्हा कशी घुसमट होते, ते कसं सांगावं ? सहज वाटलं लिहावं, सहज वाटलं ..
|
Devdattag
| |
| Tuesday, December 04, 2007 - 10:37 am: |
|
|
मीनु, जहाज उत्तम आहे, आवडली..
|
vaibhav, आर्कीमिडीजचे ते सुविख्यात वचन आहे ना, पहारीने पृथ्वी उचलण्याचे, ते एक 'थिअरी' स्पष्ट करण्याकरता वापरलेली अतिशयोक्ती आहे. त्याचा शब्दश: अर्थ घेणे अभिप्रेत नाही. मला वाटते की, गझलच्या पाच शेरांचा एकमेकांशी संबंध नसतो किंवा असण्याची गरज नाही ह्या नियमाचे सुद्धा असेच असावे. एका मर्यादेच्यापुढे हा नियम ताणणे अभिप्रेत नसावे. उदाहरणार्थ 'मराठी गझल' विभागातला 'पुलिस्त'चा " गुंता' हा गज़ल. त्यावर बर्याच मित्रांनी समीक्षा केलीय, वाहवा केलीय, तू सुद्धा. पण माझ्या बालबुद्धीलातरी काही गोष्टी खटकल्या. चमकदार कल्पनांचे दोन-तीन शेर जरूर आहेत पण पाचाची बेरीज जुळवण्याकरता नोटेचा किंवा गुन्त्याचा वगैरे शेर "टाकावे" लागला आहेत का अशी मला शंका आली. शायराची नम्र माफी मागून मी कबूल करतो की मला तरी त्या शेरात ना थोर काव्यगुण आढळले, ना त्या शेरांचे प्रयोजन समजले. शायराने हवे तर " हा हन्त हन्त" म्हणावे, मला चालेल.. समजा खूप खटपट करूनही पाचवा शेर सुचला नसता आणि मी लिहीले असते, " आज बांगडे स्वस्त झाले, आईकतो, दोन किंवा तीन वाटे आणीन, म्हणतो" अर्थात, तुमच्या नियमात वगैरे बसवून, दोन-चार काने-मात्रा घुमवून, फिरवून, असा काही तरी [पाव]शेर पाचवा शेर म्हणून टाकला असता तर ते खपून जावे का? -बापू
|
Shyamli
| |
| Tuesday, December 04, 2007 - 2:48 pm: |
|
|
मीनु जहाज आवडलं, आणि त्यातला सहज भाव जास्त आवडला बापू
|
बापू ... तुमच मत वाचलं . माझा प्रॉब्लेम इतकाच आहे की मी कुठल्याही काव्यप्रकाराला कनिष्ठ मानत नाही . इथे बरेच कवी / कवयित्री आहेत ज्यांनी गज़लची कार्यशाळा अटेंड केली होती . वृत्ताच्या माहितीबरोबरच सर्वांगीण चर्चा प्रत्येकजणाशी प्रत्येक गज़लवर झाली होती . मी काही लिहीण्याआधी मला त्या सर्व मित्र मैत्रिणींचं मत जाणून घ्यायला आवडेल . सगळेच असे लोक ज्यांना मराठी गज़ल वाचायला आणि लिहायला भावली अशा लोकांचं मत जाणून घ्यायला आवडेल मला . श्यामली .. नुसतं स्मायली टाकून भागणार नाही . तुझंही मत जाणून घ्यायला आवडेल . ही एक छान चर्चा आहे . बापू .. एक सुरेख चर्चा सुरू केल्याबद्दल आभारी आहे .
|
Shyamli
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:53 pm: |
|
|
अरे गज़ल आणि कवितेच्या बाबतीत मी सी-सॉ वर आहे जमली गज़ल कि, प्रचंड आवडते आणि जमत नसली की चिडचिड मग त्याचे नियम बनवणा-याचा उद्धार (केवळ जमत नाहिये म्हणून, तेवढ्यापुरताच) मग मधेच तुझापण उद्धार करून घेते ," हे अस नाही चालणार असं हवं वगैरे वगैरे..." . ~D पण अगदि एक शेर जरी मनासारखा जमला तर मग होणारा आनंद अवर्णनिय असतो. आपल्याला जे म्हणायचय ते एवढ्या सुंदर शब्दात आपल्यालाच लिहिता आलं. वृत्तासाठी तडजोड करताना--- ब-याच वेळा निराश व्हायला होतं, वाटून जातं, हेच मुक्तछंदात किती पटकन बोलता येइल. पण वृत्त सांभाळण्यासाठी वेग-वेगळे शब्द शोधणं आणि त्यातून नविन कल्पना सुचणं ही एक वेगळीच गम्मत अनुभवायला मिळते दरवेळेला. यात एक गोष्ट मला सांगायला आवडेल, गज़लकार्यशाळेत मतला लिहिताना, मला सुचलेली २री ओळ बसत नव्हती वृत्तात ऋतू येत होते ऋतू जात होते मला सुचलेला मिसरा मनाचे परी गाव उन्हात होते>> उन्हात बसत नव्हत आणि त्यासाठी विचार करून शेवटी ग्रीष्मात सापडलं होतं मलाच, तिथल्यातिथे जाणवला फरक गज़ल आणि कवितेत. काय मस्त वाटली होती तिच ओळ एका शब्दाच्या बदलामुळे. गज़लकार्यशाळेचा अनुभव लिहायचाच होता कुठेतरी. आणि स्मायली अशासाठी कि सध्याची माझि अशिच ५व्या शेराविना अडकलेली गझल मला पण काहि शेरांच गज़लेत प्रयोजन कळत नाही आणि कळत नसेल म्हणूनच आवडत नाही बहुदा. पण एकमात्र झालंय आता जे काही सुचत ते लयीत असतं (माझ्याबाबतीत तरी) म्हणजे तसच गुणगुणत सुचण वगैरे प्रकार गज़लकार्यशाळेपासून सुरु झाले आधि झटापट करावि लागायची शब्दांबरोबर.
|
Pulasti
| |
| Tuesday, December 04, 2007 - 9:25 pm: |
|
|
ओघा-ओघात माझ्या गझलेचे उदा. निघाले म्हणून काही मुद्दे - ५ शेरांनी माझीही अडवणूक होते बर्याचदा पण "गुंता" बद्दल तसे झाले नाहीय. गझलेत एकूण ७ शेर आहेत. मला गुंता, नोट हे शेर भरीला टाकावे लागण्याचं काहीच कारण नव्हतं. असं होत नाही असं नाही पण इथे, या ७ शेरांच्या गझलेत, ते झाले आहे या निष्कर्षाप्रत बापू आपण कसे आलात ते मला सांगाल तर मला पुढच्या लिखाणाच्यावेळी उपयोग होईल. कुठले शेर "चमकदार" आहेत आणि ते तसे का (विरोधाभास, आक्रमक/धक्कादायक शब्दयोजना इ.इ.) तेही कळले तर बरे होईल. माझ्या शेरांवर बर्याचदा "सपाट, साधे-सरळ" असल्याचाच आक्षेप घेतला जातो. कवितेतल्या एखाद्या पंक्तिचे "प्रयोजन" मला समजू शकते. शेरातल्या एखाद्या मिसर्याचे "प्रयोजन" हेही मला समजते. पण शेराचे गझलेतले "प्रयोजन" म्हणजे काय हे मला अजूनतरी समजत नाही. ते प्रयोजन कसे assess करायचे हेही म्हणूनच समजत नाही. ते शेर (की अख्खी गझल?) तुम्हाला काव्यगुणरहित वाटले हे तुमचे मत शिरोधार्य. ("थोर" शब्दाची खरच गरज नव्हती ) शेवटचे २ शेर अर्धकच्चे आहेत, ते नको होते हे काही वाचकानी इतर्त्र मांडलेले मतही मला विचारांती पटले आहे. सुधारणेसाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरूच असतात. तुम्ही अधिक specific मत कळवले तर आणखी फायदा होईल. माझी माफी वगैरे मागण्याची काहीच गरज नाही. आणि कुणालाही "हा हन्त हन्त" म्हणण्याइतकी माझी लायकी नाही. शेवटी, बांगड्यांच्या शेराबद्दल. उत्तर अर्थातच नाही हे आहे. असे पावशेर खपावे की नाही हा प्रश्नच नाहिये, प्रश्न आहे तो "५ शेर हवेत, शेरांचा एकमेकांशी संबंध असावा/नसावा - अशा नियमाना किती कर्मठपणे चिकटून राहवे". एका अतिशय तर्कशुद्ध मुद्द्याला अभिनिवेषामुळे असे तर्कदुष्ट फाटे फुटू हीच अपेक्षा. ============== गझल-कविता या मूळ विषयाबद्दल माझे मत पुढच्या पोस्टमधे टाकीन.
|
Mankya
| |
| Wednesday, December 05, 2007 - 2:15 am: |
|
|
बापू .. लहान तोंडी मोठा घास घेतोय, माफ करा. गझलच्या पाच शेरांचा एकमेकांशी संबंध नसतो किंवा असण्याची गरज नाही .. आपण एकाच विषयावरही लिहू शकतो की गज़ल, ह्याउलट मलातरी सगळे शेर वेगवेगळ्या विषयांवर असलेली गज़लच भावते. कित्येक वैविध्यपूर्ण विषय समर्थपणे हाताळले जाउ शकतात एका गज़लमध्ये. अर्थात ही गोष्टही depends on individual , पूर्णपणे वैयक्तिक आवड. आणि शेरांच्या संख्येच किंवा कसलच बंधन कितपत पाळावं हे लिहिणार्यावर अवलंबून आहे कारण काहिंच्या लिखाणात नविन नाणी पाडण्याइतपत ताकद असु शकते. पुलस्ति यांच्या गज़लच तुम्ही उदा. दिलत. सगळेच शेर सगळ्यांनाच भिडतील अस नसेल ना कदाचीत, जो शेर आपल्याला भिडला नाही तो कोणा दुसर्याला भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदरणीय सुरेश भटांचे बहुतेक सगळेच शेर ( ज्याच्या त्याच्या आवडीनिवडी बघता ) भिडतात. वैयक्तिक मला वैभवच्या बर्याच गजलेतील बहुतेक सर्व शेर आवडतात. कार्यशाळेमुळे गज़ल कशी लिहावी अन त्याहीपेक्षा महत्वाचे गज़ल कशी वाचावी हे शिकलो. पुलस्ति च्या गज़लांबद्दल म्हणाल तर ( माझ्या अल्पश्या बुद्धीला पटत त्याप्रमाणे ) तर त्याचेही बर्यापैकी शेर भिडतात. अता शेर आवडणे हि पण एक निव्वळ वैयक्तिक बाबच नाही का. तुम्ही जो बांगड्याचा शेर सांगीतला तो व्याकरणदृष्ट्या योग्य असेल तर तुम्ही टाकू शकता पण तुम्हालाच तो अगोदर त्या विशिष्ट उंचीचा वाटायला नको का. कविता किंवा कुठलीही कलाकृती जमेल तितकी दर्जेदार करण्याचा प्रत्येक कलाकार प्रयत्न करतोच की त्याच्या परीने. अगदी उदा. सह सांगायच म्हटल तर कविता मीही लिहितो पण त्या काव्यप्रकाराची मला कितपत जाण आहे त्यावर माझ्या कवितांचा दर्जा ठरेल. मी जर तो काव्यप्रकार लिहितो पण ते तो समर्थपणे हाताळू शकत नसेल तर त्याचे निकष त्या काव्यप्रकाराला कसे लागू होतील ? वैयक्तिक मला तरी हा काव्यप्रकाराचं कौतुक वाटतं. एक गज़लकार वृत्त, मात्रा, आकृतीबंध सांभाळत प्रत्येक शेरातून एक वेगळा विषय हाताळतो. त्यात परत लय ( यती ) आली, सहजता आली आणि वैभवच्या भाषेत सांगायच झाल तर ' कानाला गोड लागणारी ' लिहायच. त्यात मग कोणाला काय भावतं हि ज्याची त्याची आवड, नाही का. बापू, वैभवा, पुलस्ति .. चुकून काही वेगळच लिहून गेलो असेल तर माफ करा. माणिक !
|
Bee
| |
| Wednesday, December 05, 2007 - 3:02 am: |
|
|
मीनू, दिवस खंग्री लिहिलीस! भली पहाट, कुंद दुपार म्लान सांज, नटलेली रात कळ्यांचे श्वास, जाईच्या पानात गोठलेला गजरा, उमलतो पदरात अंगांगी शहारे, शीणलेल्या देहात धुक्यातून येतात, तुझे रोजचे भास..
|
Mankya
| |
| Wednesday, December 05, 2007 - 3:06 am: |
|
|
मीनू .. ' जहाज ' आवडली ! लिहायच राहून गेल होतं ! माणिक !
|
Satyajit_m
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:03 am: |
|
|
गझले बद्दल चर्चा गझल विभागात केली तर गझल जाणकारांचे मत जाणुन घेता येईल. कृपया येथे चर्चा करु नका. मीनु जहाज सुंदर आहे.
|
बापू, अगदी खरं सांगायचं तर तुमचा नक्की मुद्दा काय आहे हेच मला समजलेलं नाही. विरोधाभासावर आधारित प्रतिमा वापरण्याला आक्षेप आहे, मुसलसल ( वेगळ्या विषयांवरचे शेर) लिहीण्याबद्दल आक्षेप आहे, एकंदरीतच वृत्तबद्ध लिहीण्यावर आक्षेप आहे, की ( माफ करा, पण) केवळ वाद घालण्याची खुमखुमी आहे? वृत्तात लिहीण्यासाठी ' तडजोड' करावी लागते' हा समज मुळात चुकीचा आहे. काही कल्पना या सुचतानाच लयीतच सुचत जातात हा माझा स्वानुभव आहे. रोजच्या बोलण्यातही आपल्या नकळत आपण कित्येकदा लयीत वा अतिशय नादमय बोलत असतो. पण तो नाद वा ती लय काहींना सहज जाणवते, काहींना नाही जाणवत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही इथल्या गज़ल कार्यशाळेच्या सुरुवातीला वैभवने लिहीलेली ही पोस्ट या संदर्भात आवर्जून वाचा. मुळात कोणत्या ' फॉर्म'मधे कविता लिहीली ( यात गज़लही आली) यावरून तिची श्रेष्ठाश्रेष्ठता कशी काय ठरू शकते? केवळ तुम्हाला मुक्तछंद सोयीचा, सोपा वाटतो म्हणजे वृत्तबद्ध लिहीणारे काना मात्रांची फिरवाफिरवीच करतात, हे कसलं तर्कशास्त्र आहे? बोरकर ' माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, फळी फुलांचे पाझर, फुली फळांचे सुवास, येते चांदणे माहेरा'सारख्या चमकदार कल्पना वृत्तात लीलया वापरून जातात. कुसुमाग्रज ' कणा' कवितेच्या शेवटी ' पाठीवरती हात ठेवुन नुसतं " लढ" म्हणा' असा ' धक्का' देतात, विंदा ' नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी'सारखी विरोधाभासावर आधारित प्रतिमा मिश्किलपणे वपरतात, या सगळ्यांचा उल्लेख तुम्ही असाच हेटाळणीने कराल का? राहता राहिला निरनिराळ्या विषयांवरचे शेर एका रचनेत लिहायचा मुद्दा. आता हे असे नियम हे आपापल्या प्रकृतीनुसार कोणाला बंधनकारक वाटतात, तर कोणाला ते पाच निरनिराळ्या कविता लिहीण्याचं स्वातंत्र्य वाटतं. वैभवसारखा कवी एकाच गज़ल मधे बळेच केला न्यायनिवाडा त्यांनी झाली नव्हती साक्ष तिच्या डोळ्यांची आणि घाव घालणार्यांची पर्वा नाही भीती मज शेपूट घालणार्यांची अश्या दोन नितांतसुंदर कविता लिहीतो. सांगायचा मुद्दा असा की चांगलं काव्य हे चांगलं काव्यच असतं. एखादा शेर आवडला नाही म्हणून एकूण गज़ल या काव्यप्रकाराबद्दल हेटाळणीने बोलणं हे एक कविता आवडली नाही म्हणून कविता हे साहित्यच नव्हे असं म्हणण्याइतकंच चूक आहे.
|
Desh_ks
| |
| Wednesday, December 05, 2007 - 7:05 am: |
|
|
बापू, “वरिष्ठांच्या चर्चेत न बोलणे”, हा शिष्टाचार बाजूला ठेवून मला काय वाटलं ते मांडतो आहे. तुमचा आक्षेप हिणकस आणि ‘भरताड’ लिखाणाला आहे असं मला वाटलं. (पण पुलस्तींचे ‘गुंता, नोट’ हे शेर तुम्ही याच प्रकारात पाहाता याचं मला सखेदाश्चर्याचं वाटलं. माझ्या मते ते दोन्ही शेर अतिशय अभिनव आणि ताज्या कविता आहेत). शिवाय, नियमबद्धता दर्जेदार निर्मितीच्या आड येऊ नये, असंही तुमचं मत असावंसं मला वाटलं. हे दोन्ही विचार मला तरी योग्यच वाटतात. पण सहजपणे नियमबद्ध येतं त्याचं तेही रूप सुंदरच असतं ना? “गझलच्या पाच शेरांचा एकमेकांशी संबंध नसतो किंवा असण्याची गरज नाही” हा नियम मला वाटतं “गझलचे शेर अर्थाच्या किंवा आशयाच्या दृष्टीनं एकमेकांवर अवलंबून नसावे” असा पाहायला हवा. (एकाच विषयाचे सर्व शेर असलेली – असा गझलचा एक प्रकारच आहे ना?). अर्थात, जाणकार यावर मतं मांडताहेत, मांडतीलही. आणि हेच तुम्ही सुरू केलेल्या चर्चेचं महत्वाचं फलित, नाही का? शिवाय तुम्ही म्हटल्याप्रमाणे, “एकमत बोअरिंगही असतं”.
|
Desh_ks
| |
| Wednesday, December 05, 2007 - 7:10 am: |
|
|
मीनू, जहाज सुंदरच! एक इंग्लिश अवतरण आठवल "An anchored ship is safest, but that is not what it is made for". जहाजाला याची खंत आहे हे आणखीनच सुंदर
|
Satyajit_m
| |
| Wednesday, December 05, 2007 - 8:24 am: |
|
|
की केवळ वाद घालायची खुमखुमी आहे? स्वाती हा काय प्रष्ण आहे का? असे प्रष्ण हितगुज वर विचारु नयेत आणि तसे नसल्यास तसे नमुद करावे. अन्यथा उत्तर सर्वज्ञात आहे. ~D
|
|
|