Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » काव्यधारा » मराठी गझल » Archive through November 27, 2007 « Previous Next »

Mi_anandyatri
Tuesday, November 20, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वाक्य

वेगळे काहीतरी समजून गेलो
सांत्वनाच्या ऐवजी रडवून गेलो

स्वप्न होते जागलेले, थांबलेले,
संभ्रमातच मी मला निजवून गेलो

एकट्याची वाट माझी चालताना
अनुभवांचा गाव मी वसवून गेलो

दूर जाताना तुला ना रोखले मी
आसवांना लोचनी अडवून गेलो

"मौन हे सामर्थ्य" ऐसे सांगताना
काहीच्या काहीतरी बरळून गेलो

शब्द पुरती तीन जेथे व्यक्त होण्या
मी तिथे वाक्यांमध्ये हरवून गेलो


Mayurlankeshwar
Tuesday, November 20, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदयात्री... बर्‍याच दिवसांनी गझल... :-)
गझल चांगली झाली आहे.

वेगळे काहीतरी समजून गेलो
सांत्वनाच्या ऐवजी रडवून गेलो

इथे कुणाला रडविले, काय समजले हे नीटसे प्रकट झाले नाही.
सानी मिसर्‍यामध्ये उला मिसर्‍यातील 'समजून' च्या संबंधित संदर्भ
असता तर शेर अजून चांगला झाला असता असे वाटते.

स्वप्न होते जागलेले, थांबलेले,
संभ्रमातच मी मला निजवून गेलो

छान आला आहे हा शेर. 'जागलेले'ला 'थांबलेले'ची पुरवणी समर्पक वाटत नाहीये. शेवटी 'थांबलेले' असे असल्याने सानी मिसर्‍याचा प्रभाव कमी झालाय का?

एकट्याची वाट माझी चालताना
अनुभवांचा गाव मी वसवून गेलो

साधा सरळ शेर. गझलेचा पंच त्यात वाटत नाही. 'एकट्याची' च्या जागी
'एकट्याने' कसे वाटेल?

दूर जाताना तुला ना रोखले मी
आसवांना लोचनी अडवून गेलो
ठिक आहे.

"मौन हे सामर्थ्य" ऐसे सांगताना
काहीच्या काहीतरी बरळून गेलो

वा!! मस्त शेर!! 'काहीच्या काहीतरी' ही शब्दरचना चपखलपणे योजली आहे!

शब्द पुरती तीन जेथे व्यक्त होण्या
मी तिथे वाक्यांमध्ये हरवून गेलो

उला मिसरा... शब्दरचना नीट वाटत नाहीये. स्पीडब्रेकर जास्त झालेत असा भास होतोय. सानी मिसरा मस्त आहे.







Swaatee_ambole
Tuesday, November 20, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' मौन हे सामर्थ्य'चा शेर आवडला. ( टीप : तिथे ' काहिच्या काही'तला पहिला ' हि' र्‍हस्व होतोय मात्र.) त्यानंतरचा शेर जवळपास त्याच अर्थाचा असल्यामुळे परिणाम कमी झाला असं वाटलं.
( शिवाय अगदी ' मराठमोळं' बोलायचं तर तीन शब्द कसे पुरतील? :-) )

' एकट्याने' हा बदल चांगला आहे. मला तो शेर आवडला.


Milya
Wednesday, November 21, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!! चांगली जमली आहे...
'मौन' शेर आवडला...

"मौन हे सामर्थ्य आहे" सांगताना उला मिसरा असा केला तर अजून सहज होईल असे वाटते..
चु.भू. द्या. घ्या.

मयुर : इस्लाह छान केला आहेस... पटला

---
एखादया शेरातील सहजता राखता राखता तो वजन हरवून बसतो.. तसे 'एकट्याची' ह्या शेरामध्ये झालेय का? हा तोल सांभाळणे जरा अवघड आहे...

जाणकार लोकहो तुम्हाला काय वाटते ह्याविषयी?


Vaibhav_joshi
Wednesday, November 21, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत

वेगळे काहीतरी समजून गेलो
सांत्वनाच्या ऐवजी रडवून गेलो


मतल्यातला उला मिसरा फार मस्त आहे . मात्र तो दुसर्‍या कुठल्यातरी किंवा मतल्यातच सानी मिसरा म्हणून चपखल बसला असता असे वाटते . तुला ह्या शेरमधून काय म्हणायचे आहे हे जरी वाचकाला समजत असले तरी तो अर्थ वाचून वाचून लावावा लागतोय विशेषतः दोन मिसर्‍यांमधला संबंध लावावा लागतोय असे वाटते .

वेगळे काहीतरी बोलून गेलो
सांत्वनांच्या ऐवजी रडवून गेलो


असं काहीसं हवं होतं का ?

मतल्यात " गेलो " चा टोन " मी हे काय करून बसलो " असा येत असल्याने चूक दाखवणारी क्रिया " समजून गेलो " पेक्षा आणखी थेट येणे गरजेचे आहे असे वाटले .

स्वप्न होते जागलेले, थांबलेले,
संभ्रमातच मी मला निजवून गेलो


मयूर म्हणतोय त्याप्रमाणे जागलेले आणि थांबलेले आर नॉट जेलिंग . म्हणजे स्वप्न जागे होते ला थांबलेले होते असा विरोधाभास किंवा पूरक शब्द येईल का अशी शंका वाटते .

निजवून गेलो च्या ऐवजी सरळ सरळ झोपून गेलो हे जास्त वाक्यरचनेला अनुसरून झाले असते असे वाटते .

एकट्याची वाट माझी चालताना
अनुभवांचा गाव मी वसवून गेलो


मस्त शेर . एकट्याने आणि एकट्याची ह्यातला फरक " माझी " आल्याने धूसर होतो असे वाटल्याने मला त्या बदलातून खूप काही गवसले नाही . जागा दिसली ती उला मिसरा

एकट्याने वाट XX चालताना

इथे वाटेला एखादं एकाकीपणाचं किंवा निरागसपणाचं विशेषण लिहीलं असतं तर खाली अनुभवांचा " गाव " चा खुमार अधिक वाढला असता असे वाटले .

पण एकंदरीतच हा शेर इन इटसेल्फ सही आहे .

दूर जाताना तुला ना रोखले मी
आसवांना लोचनी अडवून गेलो


मयूर मतल्याबाबत म्हणतो ती अडचण मला इथे जास्त जाणवली . ते बहुधा " गेलो " रदीफ़ मुळे जाणवले असावे . कारण ती दूर जातेय ना मग मी अश्रू अडवून कुठे गेलो ? तर तिला भेटायला . हे ( असं असेल तर ) शेरातून स्पष्ट होत नाहीये . तिला निरोप देताना भेटायला गेलो तेव्हा अश्रू पापण्यांआड दडवून गेलो अशा अर्थाचे काही यायला हवे होते का ? आणि हे तेच असेल तर आणखी सुस्पष्ट यायला हवे होते असे वाटते .

"मौन हे सामर्थ्य" ऐसे सांगताना
काहीच्या काहीतरी बरळून गेलो


बद्दल स्वाती ( मौनात सामर्थ्य असोनही ) बोलली आहेच .
:-)


शब्द पुरती तीन जेथे व्यक्त होण्या
मी तिथे वाक्यांमध्ये हरवून गेलो


ह्यात " तीन " ला जरूर सिग्निफिकन्स आहे असे मला वाटले . माझ्यामते एक अर्थपूर्ण वाक्य लिहायला तीन तरी शब्द लागतात . म्हणजे " मी आलो " ह्यापेक्षा निदान " मी तुझ्याकडे आलो " हे कमीतकमी शब्दांत आलेलं वाक्य बेटर आहे असे वाटते . तीन साठी इतर काही कारण असल्यास कळव .

बाकी लिखाण पुन्हा सुरु केलेस हे पाहून आनंद ( यात्री ) झाला
:-)

मिल्या ...

सहजतेचा आणि वजनाचा काही संबंध आहे असे वाटत नाही . कुठल्याही शेराला ( पावशेर का होईना :-) ) वजन लागतेच . शेर अर्थपूर्ण , गोटीबंद , व सहज सुंदर असावा इतकच .
आता ह्याच गज़लमधला

एकट्याने वाट माझी चालताना


हा मिसरा बघ . हा जर सरळ सरळ वर लिहीलाय तसा म्हणजेच आपण बोलतो तसा लिहीला तर वाचकाला बांधून ठेवण्यात जास्त यश येतं असं मला तरी वाटतं . म्हणजे उगाच " ओह ! सगळा एम्फसिस " एकट्याने " वर आहे तर आता " वाट माझी चालताना एकट्याने " असे मोह टाळावेत असे माझे तरी मत आहे . अर्थात हे सगळं केस टू केस बेसिस वरंच अवलंबून आहे सहजतेच्या नादात आशयघनता कमी होवू नये आणि आशय आशय म्हणत शेर क्लिष्ट होवू नये इतकं पाहिलं की झालं .


Mi_anandyatri
Wednesday, November 21, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद!
सगळ्यात आधी, मला काय अभिप्रेत होतं ते सां गतो..

वेगळे काहीतरी समजून गेलो
सांत्वनाच्या ऐवजी रडवून गेलो

मयूर, माझ्या मते, इथे "कोणाला रडवले" इ. प्रश्न पडतच नाहीत... मक्त्यामध्ये फक्त प्रस्तावना केली आहे की मी वेगळंच काही समजलो, आणि सांत्वन करायच्या ऐवजी रडवलं..
वैभव दादा, "बोलून गेलो" हा बदल फार specific वाटतो.. केवळ बोलणंच नव्हे, तर एकंदरीतच नेहमी "वेगळंच" काहीतरी समजलो आणि भलतीच reaction देत गेलो, असं काहीसं म्हणायचं होतं.

स्वप्न होते जागलेले, थांबलेले,
संभ्रमातच मी मला निजवून गेलो

इथे मला असं म्हणायचं होतं, की स्वप्न माझ्यासाठी जागत होतं आणि माझी वाट पाहत थांबलं होतं पण मी संभ्रमातच (उठावं की उठू नये, स्वप्नाचा वेध घ्यावा की घेऊ नये इ.) स्वत:ला निजवून गेलो..
तरीही, थांबलेले नंतर आल्यामुळे सानी मिसर्‍याचा प्रभाव कमी वाटतो हे कबूल..

एकट्याची वाट माझी चालताना
अनुभवांचा गाव मी वसवून गेलो
यात "एकट्याने" पेक्षा "एकट्याची" म्हणून जो अर्थ मिळतोय, तोच मला हवा होता...

मौन हे सामर्थ्य" ऐसे सांगताना
काहीच्या काहीतरी बरळून गेलो

स्वाती ताई सहमत... "काहिच्या" असं हवं होतं.. आनी शेरांचा क्रम कसा असावा यावर मी विचार केला नव्हता, त्यामुळे अर्थाची रेपेअतिओन वाटते आहे..

दूर जाताना तुला ना रोख़ले मी
आसवांना लोचनी अडवून गेलो

"गेलो" हा रदीफ़ संपूर्ण गझलेला एक संपूर्ण भूतकाळी बनवतोय असं मला वाटतंय...
वैभव दादा, इथे "मी अश्रू अडवून कुठे गेलो ?" असा प्रश्न खरंअच पडतोय??? अडवून गेलो म्हणजे simply अडवून धरलं असं ध्वनित नाही होत? दूर जाताना तुला नाही रोखलं मी, पण अश्रूंना डोळ्यांत अडवून धरलं असा साधा आणि उला मिसर्‍यात साधं वाक्य आणि सानी मिसर्‍यात just twist असा हा शेर मला अपेक्षित होता...

शब्द पुरती तीन जेथे व्यक्त होण्या
मी तिथे वाक्यांमध्ये हरवून गेलो

वैभव दादाशी सहमत... मराठमोळ्या भाषेत ही आपल्याला तीन पेक्षा जास्त शब्द लागतात, पण प्रत्यक्षात ते तीन अर्थपूर्ण शब्द एकत्र आले की सुद्धा सांगता येतं, असं मला म्हणायचं होतं...

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.. चू.भू.द्या.घ्या..


Milya
Thursday, November 22, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोल प्रेमाचे तुझ्या ओठात होते
कोण जाणे काय पण पोटात होते

माणसाला दंश करता सर्प मेला
जहर इतके मानवी रक्तात होते

रंगता मैफल मनी तव आठवांची
हुंदक्यांची भैरवी मी गात होते

जाळते आयुष्य पळ पळ काळजाला
राख स्वप्नांची उरी दिन-रात होते

साठते पाण्यात शेवाळे जसे, ते
साचलेपण आपल्या नात्यात होते

जीवनाच्या चक्रव्यूहा भेदती जे
अंश का असले अता गर्भात होते?



Mi_anandyatri
Thursday, November 22, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साठते पाण्यात शेवाळे जसे, ते
साचलेपण आपल्या नात्यात होते

मस्त शेर.. किती सहज अर्थ! पण "जसे" ला "ते" हे खटकतंय.. आणि त्यामुळे, "ते" केवळ वृत्त पूर्ण करण्यासाठी वापरावं लागलं असं वाटतंय..

रंगता मैफल मनी तव आठवांची
हुंदक्यांची भैरवी मी गात होते
हा ही शेर आवडला...

शेवटचा शेर नाही कळला...


Pulasti
Friday, November 23, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत, मस्त गझल आणि सर्व चर्चा देखिल. "गेलो" सारखी रदिफ़ जरा problematic च असते. मराठीगझल.कोम च्या कार्यशाळेत (हुंदका साधा तुझा सांगून गेला) मला हे जाणवले होते.
मिल्या, छान गझल! शेवाळ आणि राख हे शेर मला फार आवडले!

Pulasti
Friday, November 23, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(पुन्हा एक छोट्या बहरची गझल :-(. पण मोठ्या बहरचे प्रयत्न चालू आहेत!)

"गुंता"

आज असेही करेन म्हणतो
म्हणायचे ते म्हणेन म्हणतो

पुन्हा मनाचा गुंता झाला
पुन्हा जरा विंचरेन म्हणतो

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो

इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो

मला सुचेना कविता आता
मी कवितेला सुचेन म्हणतो

मर्द मराठा "जगलो मी जर -
पुन्हा तुझ्याशी लढेन" म्हणतो

तुम्ही पुरावे मागा, शोधा...
मला मीच उद्धरेन म्हणतो!

--पुलस्ति

Shyamli
Friday, November 23, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

िपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो >>>> सवडीने कळवळेन, क्या बात है

जबरद्स्त गझल पुलस्ति

Mi_anandyatri
Friday, November 23, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो

इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो

मला सुचेना कविता आता
मी कवितेला सुचेन म्हणतो

लय भारी.....
जियो...


Desh_ks
Monday, November 26, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति,

पुन्हा मनाचा गुंता झाला
पुन्हा जरा विंचरेन म्हणतो

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो

इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो

खूप छान

-सतीश


Vaibhav_joshi
Monday, November 26, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या

मतला सहज सुंदर .

माणसाला दंश करता सर्प मेला
जहर इतके मानवी रक्तात होते

मागे एकदा बोलल्याप्रमाणे उला मिसर्‍यातच सर्व काही आले आहे त्यामुळे पूर्ण शेर वृत्तांतात्मक झाला आहे असे वाटते .

जाळते आयुष्य पळ पळ काळजाला
राख स्वप्नांची उरी दिन-रात होते

काळजातच जाळ आणि उरातच राख ह्याची मांडणी मला आवडली .

साठते पाण्यात शेवाळे जसे, ते
साचलेपण आपल्या नात्यात होते

नचिकेत्शी सहमत .

जीवनाच्या चक्रव्यूहा भेदती जे
अंश का असले अता गर्भात होते?

असले वगैरे शब्दांचा वापर शक्यतो टाळावा असे ऐकून आहे . कारण कसले हे सांगून झाले आहे उला मिसर्‍यात मग अंश ते उरले कुठे गर्भात होते वगैरे लिहीता येऊ शकेल असे वाटले .

पुलस्ति

" सवडीने कळवळेन म्हणतो " ला मानाचा मुजरा . बाकी गज़ल ही छान पण त्या बद्दल सवडीने लिहीन म्हणतो . आज के लिये यह मिसरा काफ़ी है . बहोत बहोत शुक्रिया

छोट्या बहर च इतकं मनावर घेऊ नका हो . वो तो बात बात में बात निकल गई थी .


Nachikets
Monday, November 26, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो

क्या बात है, पुलस्ति!!! मस्त.


Daad
Monday, November 26, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्ध्या वेळच नाहीये सवडीने, इथे यायला.... यायचं, ते ही चटकनी देवाची धूळभेट घेतल्यासारखं...
निवांतपणे ह्या गाभार्‍याच्या एकाही खांबाला टेकून बसण्याचा मुहुर्तं बर्‍याच दिवसात लागल नाहीये....

पण... पुलस्ति, तुमच्या 'सवडीने कळवळेन म्हणतो'... ने "मार डाला"!
बाकी....
लोक हो, एक सांगत्ये. तुम्ही लिहिता त्याने कुणाचीतरी घराची वाट गुणगुणती होत्ये.... हे ध्यानात असूद्या!
असेच लिहिते रहा रे.... सगळेच!


Milya
Monday, November 26, 2007 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ती : उत्तम आहे गझल. सर्वच शेर सहज आहेत अगदी...

पुन्हा मनाचा गुंता झाला
पुन्हा जरा विंचरेन म्हणतो

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो >>>
दोन्ही खूप आवडले..
---------
वैभव : सविस्तर प्रतिक्रीयेबद्दल आभार...
'सर्प शेर' : पटले तुझे. शेर परत वाचला असता तू म्हणतोस ते जाणवले...

आनंदयात्री, वैभव... जसे, ते मधला 'ते' साचलेपण ला उद्देशून आहे.. त्याजागी योग्य काही सुचतेय का हे बघेन पण...

अंश : वैभव ह्याबबतीत जरा सविस्तर बोलुयात.. कारण इथे उला मिसर्यात सर्व काही स्पष्ट होत नाही त्यामुळे त्याला जोडायला 'असले' पाहिजे असे वाटते.. तसेच मला 'अता/आता' तिथे असणे जास्त महत्वाचे वाटले.. ते काढले तर अर्थ थोडा बदलतो शेराचा..

Princess
Monday, November 26, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सवडीने कळवळेन... क्या बात है... कसला जबरदस्त शेर आहे हा. हे सुचणं आणि शब्दात मांडणे... वाह वाह. दाद द्यावी तेवढी कमी.

Asami
Monday, November 26, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो >> दादcया लेखानंतर आज अजून काही भिडेल का वाटले होते पण मार डाला

Jo_s
Tuesday, November 27, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ती
गुंता छानच झालाय. त्यातून सुटणं कठीण आहे.
विंचरेन आणि कळवळेन हे दोन शेर अप्रतीम....

सुधीर





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators