Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 26, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » काव्यधारा » कविता » Archive through November 26, 2007 « Previous Next »

Psg
Friday, November 23, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, किती गोड लिहिलं आहेस, आवडलं हे गाणं :-)

Tungrus
Friday, November 23, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका तुमच्या साठी........

आलेला कधीतरी जाणारच असतो
त्याच्या साठी अश्रु नाही ढाळायचे,
कारण जाणारा परत येतच असतो
त्या कडे डोळे जरुर ठेवायचे

शब्द काळजावरुन नुसते चरचरत गेले


Mankya
Friday, November 23, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जूका .. ..
सुधीर .. धन्स रे !

माणिक !


Pulasti
Friday, November 23, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, "जाणिवेतुन कळले तरिही, स्पर्श कसला नाही" - छान!
माणिक - "मी मात्र मुखपृष्ठावरच्याच काही शब्दांच्या अर्थाने भारावलेला ! " - मस्त!! कविता आवडली
मीनु - गाणी फार फार आवडली. "गाणे मोकळे ढाकळे" - वा!
अज्जुका - :-( माझ्या मनावर माझीही अशीच काही सुटलेली बोटं क्षणभर हळुवार फिरून गेली...

Pkarandikar50
Sunday, November 25, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,

डोळे पाणावले.. कारण अगदी वैयक्तिक. सुमारे चार वर्षांपूर्वी माझी आई गेली. शेवटच्या क्षणी मी जवळ नव्हतो. तासाभराचा उशीर झाला होता. खूप माणसे जमलेली. ती गाढ झोपेत. गुरुजी मला म्हणाले, "पंधरावा अध्याय म्हणायला लाग. त्या नेहमी सांगायच्या आम्हाला, सहा वर्षाच्या वयात तुला तो अध्याय तोंडपाठ झाला होता." माझ्या तोंडून आवाज फुटत नव्हता. गुरुजीनींच हलक्या स्वरात सुरु केले, " उर्ध्वमूल मध: श्याखम". मग मात्र माझे डोळे आणि माझा कण्ठ दोघेही वाहू लागले होते. तो सगळा प्रसंग कविता वाचताना डोळ्यांपुढे साकारला.

अशी अनूभूती देणार्‍या कवितेला समीक्षेच्या कसल्या फूटपट्ट्या लावायच्या?

-बापू


Pkarandikar50
Sunday, November 25, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,
मी हल्ली गुलमोहोरावर येत नाही अशी तू [प्रेमळ] तक्रार केली होतीस. त्याला मी काहीतरी थातुर मातुर उत्तर दिले होते.. खरं उत्तर हे आहे...

नेम

सर तुटलेल्या मण्यांसारखे
बघता बघता वेगात घरंगळले
शोकसभा संपल्यावरच्या गर्दी सारखे
गल्ली बोळातून घाई-घाईने पांगले

कदाचित माझेच काही चुकले असेल
मीच हट्टाने पाठीवर त्यांच्या
असह्य ओझी लादली असतील
लटपटले जेंव्हा पाय त्यांचे
मीच डाफरून घेतले असेल
आता कसचे येतात पुन्हा
माझ्या वाट्याला ते?

तूर्त मी नि:शब्दांवरच सगळी
बांधली आहेत माझी बोचकी

वाटा तुडवणं चाललंच आहे निरंतर
थकून टेकेन एखाद्या निर्मनुष्य पारावर
तेंव्हा पारंब्यावर लटकून मजेत
झोके घेणारे मुक्त अन नि:संग ते
मला पुन्हा भेटतीलहि
त्यांचा काय नेम?

-बापू









Ajjuka
Sunday, November 25, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करंदीकर, या अनुभवातच आहे मी अजून गेले २० दिवस. तिचे शेवटचे सगळे क्षण परत जगतेय. तिच्या सगळ्य वेदना आणि मला त्यावर काही करता न आल्याने स्वतःला सतत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणं, सतत जर तर मधून जाणं, मधेच तिचा भास असं सगळं सतत चालू आहे डोक्यात, वरकरणी कामात लक्ष अडकवलं असलं तरी.

Pkarandikar50
Monday, November 26, 2007 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,
मानवी जीवनाची मूलभूत अपरिपूर्णता आणि वारंवार जाणवणारी अपरिहार्यता पचवता आली तरच स्वत्:वर वृथा दोषारोप करणं, अपराधीपणाची खंत बाळगणं हे सारं टाळता येतं. अर्थात बोलणं सोपं असतं, प्रत्यक्षांत स्वत्:ला समजावणं खूप कठीण असतं हेसुधा खरंच. पण तुला अभिव्यक्तीची प्रतिभा लाभलीय, विचारी मनाची देणगी लाभलीय, तुला हा विवेक सुचणं अवघड नाही. असो. आपली धड ओळखहि नाहीय, मी तुझं सांत्वन कोणत्या उपायी करू?
-बापू


Jo_s
Monday, November 26, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू, मोठं गाणही छान झालय

बापू, बऱ्याच दिवसांनी?
"मला पुन्हा भेटतीलहि" ........

अज्जुका, आपली अगतीकता जाणवत रहाते, मनात काहीही कितीही असलं तरी... आणि हतबल होण्यावाचून पर्याय रहात नाही, पण स्वत:ला अपराधी समजू नये. आपला प्रामाणिक पणा स्वत:लातर माहीत असतोच ना.

सुधीर


Meenu
Monday, November 26, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापु नेम सुंदर ! अशी अवस्था कदाचित प्रत्येकच लेखकाच्या / कवीच्या वाट्याला येतेच कधी न कधी .. तुम्ही शब्दात खूप ताकदीनं उतरवली आहेत.

Vaibhav_joshi
Monday, November 26, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा ,

या जगण्याचा अजुनि मजला, सूर गवसला नाही,
मेघ दाटुनी आले पण, मल्हार बरसला नाही.

ह्या ओळींचे वजन फारच सुरेख आले आहे .

माणिक ,
मी मात्र बरेचदा शीर्षकाच्याच अर्थापाशी अडलेला
संपवल्याच्या समाधानाने पूस्तक मिटून तू निमूट बसलेली
मी मात्र मुखपृष्ठावरच्याच काही शब्दांच्या अर्थाने भारावलेला !

सही .

अज्जुका .. बर्‍याच वेळा फोनकडे हात गेला ( आणि तिथेच थांबला हेच बरे म्हणायचे ) बोलू कधीतरी . काळजी घे .

बापू ,

तेंव्हा पारंब्यावर लटकून मजेत
झोके घेणारे मुक्त अन नि:संग ते
मला पुन्हा भेटतीलहि
त्यांचा काय नेम?

अगदी अगदी . कविता आवडलीच पण तुमच्या पोस्ट मधलं सगळ्यात आवडलेलं वाक्य सांगू ?

त्याला मी काहीतरी थातुर मातुर उत्तर दिले होते.. खरं उत्तर हे आहे...


ये लिखने को जिगरा लगता है . परत एकदा मानलं . पण येत रहा असेच .


Desh_ks
Monday, November 26, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुकाचं स्वगत म्हणावंसं लिखाण आणि त्यावरचे प्रतिसाद, विशेषत: बापूंचा, वाचून वाटलं की हे सारे अनुभव किती व्यापक आणि तरीही किती व्यक्तिगत आहेत. उदासीनतेचं एकटेपण किती खरं आणि एकटेपणाची असहाय उदासीही.

काहीतरी निमित्त होतं नकळतसं
आणि शेवरीचं बोंड फुटून वार्‍यावर उधळाव्या
दिशाहीन, निरर्थक म्हातार्‍या,
तशा आठवणी निसटतात मनातून.
आणि आपलं मी’पण तेवढं लोंबकळत राहातं
सुकलेल्या देठाच्या आधारानं लोंबकळावं रिकामं बोंड,
तसं
ना धड झाडाचं, ना मातीचं.

बाटलीतून भुतं निसटावी तसे
हरवलेले, गमावलेले, निसटून गेलेले क्षण
फेर धरतात भवताली;
आणि रिकाम्या बाटलीसारखं भेडसावत राहातं
रिकामं रिकामसं असहाय एकटेपण...



Satyajit_m
Monday, November 26, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरजा :-( सांत्वन न करता येणार अटळ दुःख.
:-( फोन करेन.


Pkarandikar50
Monday, November 26, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देश

खूपच सुन्दर कविता.

वैयक्तिक अनुभूतीला वैश्विक [व्यापक किंवा युनिवर्सल] परिमाण देता येणं ही श्रेष्ठ साहित्याचं एक महत्वाचं गमक मानलं जातं ते काय उगीच? असहाय आणि असह्य एकटेपण हीच कित्येकदा अभिव्यक्ती किंवा आविष्कारा पाठीमागची चेतना प्रेरणा असते. प्रतिभेचं कार्य व्यापक परीमाण देण्याचं.

-बापू


Chinnu
Monday, November 26, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देश अतिशय समर्पक कविता. मनातल्या भावना अचुक पकडल्या आहेत. शेवरीचे (सावरीचे) बोंड फुटून निसटलेल्या म्हातार्‍या तर सुरेख उपमा. बाटलीतील भुतं तर अगदीच!
बापू, नितांत सुंदर आहे नेम. लहान तोंडी मोठा घास घेत्ये आहे. पण नि:शब्दांची बोचकी हवी का? नि:शब्दंवरची बोचकी थोडं अडखळल्यासारखं झालं पहा. मीनु गाणं छाने.
सर्वांच्या कविता छान. काही वाचावयाच्या आहेत अजुन.


Pama
Monday, November 26, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद..
अज्जुका.. फार खोलवर स्पर्शून गेली तुझी प्रत्येक ओळ..
बापू.. नेम अगदी नेमका आहे..
देश.. भाव नेमके पकडलेत.. छान!!


Meenu
Monday, November 26, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्द

सारे हे शहाणे शब्द हवे असतात तेव्हा,
अगदी तेव्हाच.. कसे नाहीसे होतात?
आपली फजिती पहात, मस्तपैकी साले हसतात.
चेहर्‍यावर आणून आपण शहाणपणाचा आव,
काहीतरीच अघळपघळ वेड्यासारखं बोलतो राव.
'नाही, नाही' 'तसं नाही' 'तसं नव्हतं म्हणायचं'
सापडत नाही काही केल्या जसं होतं म्हणायचं.
साहेबासमोर, तिच्यासमोर, त्याच्यासमोर ..
उगीच म्हणजे उगीचचं ..
आपण बावळट ठरायचं.
आपल्याच शब्दांनी का असं,
वेठीला आपल्याला धरायचं?
नको तेव्हा जणू सारे घरी आपल्या पाणी भरतात
हवे तेव्हा, तेव्हाच साले, कुठे बुवा दडी मारतात ?
हे सारे शहाणे शब्द, हवे असतात तेव्हा,
अगदी तेव्हाच, नाहीसे होतात.


Pama
Monday, November 26, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अव्यक्त....
..
दोन ओळी लिहायला,
आधी कागद कोरा हवा...
नाहीतर..
बरबटलेल्या निळ्या काळ्या
शाईच्या डागांमधून
रिकामी जागा शोधताना,
अवचित गवसल्या आकारांत
मन गुंतून जाते
आणि
डोळ्यांत साठतात नुसतेच आकार..
नाव नसलेले,
ठाव नसलेले.
अलगद पापण्यांत उतरून,
त्यांचे डोह तयार होतात.
ज्यात खोल बुडी मारून
तळ शोधत राहतो..
कागदभर पसरल्या..
गडद अंधारात..
रिकाम्या जागा हरवतात..
अन मनातल्या ओळी,
मनातच राहतात..







Shyamli
Monday, November 26, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आह्हा...... पमा दोन्हि कविता मस्त,
बरं झालं सगळेच लिहायला लागले पुन्हा

सतिशजी: काहीतरी निमित्त होतं नकळतसं >>>>..... आवडली कविता.

बापू: हं तर सगळ्यांनाच जाणवत असतं हे असं.
मीनु: :-)


Mankya
Tuesday, November 27, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू .. नेम खूपच ताकदिची कविता ! बाकी तूमचं नाव वाचलं कि तूमच्या ' सावल्या ' आठवतात.
सतीश .. ' ना धड झाडाचा .. ना धड मातीचा ' क्या बात है, आवडली !
पमा .. ' अव्यक्त ' भिडली अगदी ! ' कागदभर पसरल्या.. गडद अंधारात.. ' व्वाह !

सुधीर, पुलस्ति, वैभवा .. खुप खुप आभार !

कुठल्याही सौंदर्यानं
असं समेटून राहू नये
एकट्यात गाऊ नये
स्वतःकडेच पाहू नये
ज्या पापण्याखाली 'त्याचं' स्वप्न आहे.. कदर आहे
त्या डोळ्यांना अवघ अस्तित्व दान करून टाकावं

ईथे कोणत्याही मनाने
असं भिजून जाऊ नये
मुसमुसत सर्व साहू नये
उगाच नादी लागू नये
भारावून जावं चराचरातून ओसंडणार्‍या सौंदर्यानं
वेडावणार्‍या लावण्याला त्याचाच अंश होऊन पाहावं

जाणारा कोणताही क्षण
असं रिता रिता वाटू नये
मेघ काळवंडून दाटू नये
पश्चातापाचे कारण होऊ नये
काळाच्या प्रवाहातल अस्तित्व कायम स्मरणी राहिल
असं ईतकं काही द्याव त्याला, जाताना शहारून जावं

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators