Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 26, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » ललित » तुझे गीत गाण्यासाठी... » Archive through November 26, 2007 « Previous Next »

Daad
Friday, November 23, 2007 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुक्रवारी रात्री त्या प्रवचनाहून परत येताना कुणीच काही बोलत नव्हतं. स्वामीजी विषयातले पारंगत. अधिकारवाणीने बोलत होते. सुघड मुद्रेवर तेज होतं. वचनं, प्रमाणं, श्लोक, अभंग चपखल सुचत होते. मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी.... भाषांवर प्रभुत्व होतं.
विषय तसा कठिण. गीतेतील कर्मसन्यासाची व्याख्या.
पण मांडणी भुरळ पाडणारी, convincing म्हणतात ना, तशी.... तळहातावरील रेषेसारखे स्वच्छ, या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखे सोहोपे करून सांगत होते.....
पण......

निखळ कर्मसन्यास कसा, कर्मसन्यासी व्यक्तीचं वागणं कसं, बोलणं कसं हे सारं सागतान, कर्मसन्यास त्यांनी शुद्ध कर्म-सन्यास म्हणून सांगितला.
एखाद्या विस्तीर्ण वाळवंटाचं भव्य, एकांडं, न अतिशय विरक्त रूप बघावं अन त्याची भुरळही पडावी असं अवघड होऊन गेलं.

आमच्या सारख्या संसारी श्रोत्यांना ह्या मात्रेचा वळसा थोडा जास्तच लागला!
परतताना, नवरा आपल्याच विचारात गाडी चालवत होता, माझीही तीच अवस्था होती. इतरवेळी काहीनाकाही बोलून खुलवणारे रवीभैय्यासुद्धा गप्प होते. नाही म्हणजे त्यांची बोटं गुढग्यावर तबला वाजवत असतात. ते ही आपल्याच विचारात खिडकीबाहेर बघत होते. आमच्या ब्लॉकपाशी आलो आणि रवीभैय्या नुसताच हात हलवून वरच्या जिन्याकडे वळले.

जितके टाळवेत तितके तेच तेच फकिरी विचार तरंगत राहिले. सकाळी लवकर उठून नवरा चार आठवड्यांच्या टूरवर जाणार होता.
कुशीत शिरून 'भेटणार नाहियेस आता तब्बल चार आठवडे...' असलं काही बोलण्याऐवजी नुसतेच छताकडे बघत झोपी गेलो दोघेही. अशी ओढ.... ह्याला मोह म्हणायचं का? असलं काहीतरी पुन्हा पुन्हा ठसकत राहिलं मनाच्या कोपर्‍यात, त्याच्याही अन माझ्याही.

आजूबाजूला जे सुंदर दिसतय ते मोह-माया म्हणून का नाकारायचं?
माझ्या सख्याच्या छातीवर माथा टेकला की ऐकू येणारी स्पंदनं अन त्याने मला झालेलं सुख, माझ्या लेकराच्या जावळाचा गंध, त्याच्या इवल्या बोटांनी माझं बोट घट्ट धरून टाकलेलं पहिलं पाऊल, मित्र-मैत्रिणी, सखे-सहोदर, त्यांची आपल्याला अन आपली त्यांना वाटणारी काळजी, वाटून घेतलेले सुख दु:खाचे प्रसंग, प्रेमाने जोडलेली घरची-माहेरची माणसं, त्यांच्यावर जडलेला जीव.... हे सगळं मोह, माया म्हणून त्याज्य? असं पायाखालची स्वस्थ जमीन काढून घेऊन तापल्या भांगरावर चालण्याचा अट्टाहास का?

फकिरांना सुख, दु:ख नसतं का? संन्यासी कशाने सुखावतो, कशाने दुखावतो? संन्याशाचे आई-वडील... त्यांना दु:ख कसलं असेल, आनंद कशाचा होतो? हे आत्ता आपण विचार करतोय ते तरी किती सुसंगत आहे? हे ही कळत होतच.

काय आहे आणि काय नाही.... नुसतेच कालवलेले विचार.... आतून उलटं पालटं करीत रात्रं कशी सरली कळलच नाही. पहाटे चार वाजताच, नुसतच हो हो नाही नाही... इतकच बोलत, आपल्याच विचारात नवर्‍यानेही घर सोडलं. मग अधिकच भरून आलं.
नुसतच आतून रिकामी वाटण्याची ही पहिली वेळ नाही.... पण ते रिकामीपण असं निष्फळतेनं भरलेलं.... असं पहिल्यांदाच अनुभवलं. एका गूढ निष्क्रीय अवस्थेत बसून राहिले बाल्कनीत येऊन.

कृतकृत्य होऊन मावळतीला झुकला चंद्र, झाडांची हलकी सळसळ, पहाटेचा उत्सुक वारा.... ह्यातलं काहीच जाणवत नव्हतं. जणू आतल्या कालव्याने नेहमीच्या सजग संवेदनाही बोथटल्या होत्या.....

तरी, वरती रवीभैय्यांच्या ब्लॉकमधून त्यांच्या रियाजाची तयारी सुरू झाल्याचं कळत होतं. तानपुरा लागला होता... पण तेही सुखदायी होईना. रवीभैय्यांनी तरफेच्या तारा छेडल्या आणि समोरचा काळोख अधिकच गडद झाला. जोगिया......

अतीव एकलेपण. विलक्षण रितं, अपूर्ण, असहाय्य करणार्‍या जोगियाची आलापी. एक एक स्वर, एक एक तार माझं उरलं सुरलं "असलेपण" निचोडून काढत होती.... रितं रितं करीत सुटली.....

ते सहन न होऊन मी उठणार इतक्यात रवीभैय्या अर्ध्या तानेत तटकन थांबले......

चिकारीच्या तारेचा एकतारी सारख वापर करीत त्यांनी नुसताच ताल धरला....

झाकोळून आलेल्या मनाने कान टवकारले.... किलकिलं झालं, सजग झालं.

रवीभैय्यांनी एकच ओळ छेडली.... तुझे गीत गाण्यासाठी.... सूर लागू दे... रे......
परत एकदा छेडली.....
तिन्ही लोक आनंदने भरुन वाहू दे रे.... तुझे गीत गाण्यासाठी.....!

आणि सर्रकन काटा आला अंगावर.

पाडगावकरांचे शब्द... अमृताची झड होऊन रवीभैय्यांच्या सतारीतून झरू लागले.
तरफेच्या तारा अजून जोगियात लागलेल्या होत्या.... पण त्यातलेही काही सूर होतेच की ह्या ही गाण्यात..... त्या तारा झिणझिणत राहिल्या, इतर जोगियाच्या तारांचं न ऐकता....... तुझे गीत गाण्यासाठी....

शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
आणि फुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा....
या सुंदर यात्रेसाठी....

मन कधीच त्या सुंदर यात्रेला निघाले होते.... हे असं जडाचं अस्तित्वं, त्याची पंच इंद्रीय आणि त्यांचे भास या सार्‍याला चेतस देणारे कसे हे शब्द, कसे हे सूर....

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी....
झर्‍यातुनी दिडदा दिडदा......
सोहळ्यात सौंदर्याच्या... तुला पाहूदे रे...

ह्या इथे माझ्यासमोर माझ्यासाठी सतारच बोलत होती...
सभोवतालच्या सार्‍या सौंदर्याच्या सोहळ्याचा तोच एक निरंतर साक्षीदार नव्हता का?

आपल्या आयुष्यातल्या सार्‍याच सोहळ्याचा तो नाही तर दुसरा कोण साक्षीदार? किंबहुना त्यानेच स्वश्रीहस्ते घडवलेला प्रत्येक सोहळा नव्हता का? आपण फक्त निमित्तमात्रं नाही का? सार्‍या होण्या-न होण्याचं, सार्‍या असण्या-न असण्याचं कर्तेपण त्याच्याच हातात नाही का?

इतकं स्वत:ला यत्किंचित, लहान करणारे विचार सुरू होऊनही... आई-बापाच्या कुशीत हिंदकळणार्‍या लहानग्यासारखं मन निवांत झालं.

पूजा केल्यासारखं असावं प्रत्येक काम, प्रत्येक कर्म. पूजेत वाहण्यासाठी खुडलेल्या कोणत्या फुलात आपला जीव अडकतो? कोणती कळी आपण हुंगतो? कोणता प्रसादाचा पदार्थ आपण नैवेद्य दाखवण्याआधीच चाखतो?
... हं हे मी खुडलेलं फूल, हा मी खपून शिजवलेला, दाखवलेला नैवेद्य, बरं का.... ही आत्ता म्हटली ती मी म्हटलेली आरती.... अशी नसते ना पूजा!
ह्या 'मी' चा स्पर्श नसलेली निष्काम नसते का पूजा? मग असच का असू नये प्रत्येक काम?

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे....
तुझे प्रेम घेऊन येती गंध-धुंद वारे...

माझ्या समोरचंच दृश्यपटल होऊन बोलताहेत हे सूर.... सारं काही जसं समोर होतं तस्सं! दृश्य, प्रत्यक्ष... काहीही अदृश्य नाही. कुणा दुसर्‍याचा अनुभव नाही... ही माझी अनुभूती!

त्याचं प्रेम वाहून आणणारे वारे, त्याच्याच प्रेम्-गंधाने कोंदून गेलेला आसमन्त.... हे माझं त्या क्षणाचं सत्य.... आत्-बाहेर त्या एकाच सत्याचा वास!
वेडे, हे क्षणिक नाही.... हेच सत्य स्थळ-काळाच्या कक्षांचा भेद करून आपल्यासाठी चिरंतन होऊन उभं आहे.... हा विश्वास माझ्यातल्या 'मी' इतका मला खरा वाटला..... तेव्हा.....

रवीभैय्यांची बोटं त्याच कृपेची तार छेडत होती....
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना.....

सुरांना शब्दांचा धुमारा फुटला आणि मला हुंदका....
सारा आसमन्त गाढ झोपेत असतो तेव्हा फुलून येण्यासाठी कळ्या जागतात ना? आपणहून, अधीर होऊन...
मी उगवलोय असं ना सूर्य सांगत अन, हे माझ्याच चांदण्याचे शैत्य असा चंद्राचाही दावा नाही.... घरातल्या कोनाड्यात किंवा तुळशीपाशी ठेवल्या दिवलीची ज्योत जळिताच्या पहिल्या क्षणापासून आनंदाने लवलवते..... आपल्यापरीने आस्-पास उजळते....

रात्रभर रितं रितं, अस्वस्थ झालेलं मन एका समाधानाने, विश्वासाने भरून आलं..... त्याच्या कृपेची सामक्षा याहून वेगळी ती कोणती?
मनोमन हात जोडत,
'माझ्या सार्‍या पौर्णिमा तुलाच वाहण्याची निर्लेप बुद्धी दे,
तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे'........
असं म्हणून तटतटल्या गाऊली सारखी माझ्या तान्ह्याकडे धावले.... अपार निष्काम मायेने!

समाप्त



Nandini2911
Friday, November 23, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्रकन अंगावर काटा आला हे वाचताना. काय लिहितेस तू???

Manjud
Friday, November 23, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, मी वाचलं ललित. बाकी काही प्रतिक्रिया लिहिण्याची लायकीच नाही माझी.......

Swa_26
Friday, November 23, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, काळजाला भिडणारं लिहितेस गं तु!!
शब्दच नाहीत लिहायला काही!


Akhi
Friday, November 23, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचल्या वर प्रतिक्रिया द्यावी हे पन लवकर कळल नाही. काही सुचलच नाही. अशीच छान छान लिहित जा.............. मनाला थेट भिडनार

Aaftaab
Friday, November 23, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद!!!
तू 'हुंदका' शब्द लिहिलास आणि तो तिथेच आलाही..
असंच आतलं आतलं लिहीत रहा...


Nakul
Friday, November 23, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह दाद !! तुला मानाचा मुजरा !!
अजून एका गाण्याबद्दल जरुर लिही. कुठले ते विसरलो ग पण मी

Aaftaab
Friday, November 23, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुचवतो कुठल्या गाण्यावर लिहायचे ते...
१. मोगरा फ़ुलला
२. पसायदान
३. ती गेली तेव्हा रिमझिम
४. पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
५. चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा
६. ग़ालिबची कुठलीही ग़ज़ल किंवा नज्म
७. एखादं आनंदी गाणं हवं असेल तर.. "ती येते आणिक जाते.."


Manogat
Friday, November 23, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद..
वाचुन मि सुद्धा स्तब्ध झाले... शब्दच सुचत नाहियेत कींवा माझी पात्रता पण नाहि तुझ्याबद्दल काही लिहीण्याची..
असेच छान छान लिहित रहा.


Princess
Friday, November 23, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद... ... शेवट तर खासच... सगळंच छान.

Ana_meera
Friday, November 23, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच काळजाला भिडणारे लिहितेस ग तू.. कोणत्या शब्दात दाद द्यावी हेच समजत नाही.. :-) खूप छान.. :-)

Lopamudraa
Friday, November 23, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(सुघड मुद्रेवर तेज होतं>>>> sughaD chaa arth naahee lakshaat aalaa?)

मस्त लिहिले आहेस दाद, सुंदर... (शलाका नाव जास्त छाने पण..)

Akshara0703
Friday, November 23, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरचं खुप सुंदर,अप्रतिम आहे :-)
भिडलं आत खोलवर कुठेतरी..
आपल्या लिखाणावर काही बोलण्याची पात्रता नक्कीच नाही माझी


Rajya
Saturday, November 24, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्या सर्व प्रतिक्रिया माझ्या आहेत असं समज :-)
बघा ना राव हे असलं काही वाचलं की काय प्रतिक्रिया द्यायची हा प्रश्ण पडतो :-)

धन्यवाद दाद :-)


Daad
Sunday, November 25, 2007 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, thanks heaps ... आवर्जून वाचून कळवल्याबद्दल.
लोपा, 'सुघड' म्हणजे सुंदर घडण असलेला... नीटस. इथे मी एका सन्यासिन वक्त्याबद्दल म्हणतेय... तेव्हा नुसतीच शारिरिक घडण अपेक्षित नाही... मानसिकही घडण जी आपल्या चेहर्‍यावर सहज उमटते... ती सुद्धा अपेक्षित आहे.

असं नका रे म्हणू. 'प्रतिक्रिया देण्याची आपली लायकी नाही, पात्रता नाही'....
आपण आपल्यातच रसिक असतोच असतो.... ते व्यक्त करू शकणं, न शकणं... हे वेगळीच गोष्टं. पण तुमचं हे म्हणणं म्हणजे.... तुमच्या स्वत्:च्या रसिकतेचा अपमान आहे (असं मला वाटतं!)....
तुमच्या शुभेच्छा अशाच सोबत असू देत....


Vrushs
Monday, November 26, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, खरच तुला दाद देणं ही अवघड आहे.
पण तुझ्या लिखाणावरून कळ्तं की तुझ्याकडे नुसती प्रतिभाच नाही तर तुला बर्‍याच विषयाची माहिती पणं आहे. तु गातेस पण का?


Neelu_n
Monday, November 26, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, खरच अवघड अवघड आहे तुला दाद देणं. वाचतानाही अंगावर काटा आला.
'सामक्षा' या शब्दाचा अर्थ तेव्हढा जाणुन घ्यायचा होता. मला वाटते या नावाची एक कादंबरीही आहे. पण अर्थ ठाऊक नाहीय.


Daad
Monday, November 26, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वृशस, मी गाते... पण लोक ऐकून घेतिल याची खात्री नाही :-)
....गंमत सोडता, मी खूप खूप (म्हणजे अतिच खूप) ऐकते... डोक्यात गाणं सदैव चालू असतं....
नीलू, सामक्षा हा शब्द मी कोकणात ऐकलाय. त्याचा अर्थ 'प्रचिती'. म्हणजे स्वप्नात देवी आली आणि संगितल की मी येतेय.... सामक्षा काय? तर... तुळशीजवळच्या रूईच्या झाडाला पाचच फुलं असतिल उद्या सकाळी....
असलं.... (हे लिहिताना मलाच कोकणात गेल्यासारखं वाटलं)


Bsk
Monday, November 26, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समक्ष वरूनच आलाय का हा शब्द? किंव उलटे? असो..दाद! खूप छान.. लिहीत रहा!

Asami
Monday, November 26, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरांना शब्दांचा धुमारा फुटला >> खलास एकदम.

तो शेवटचा समाप्त शब्द असू नये असे वाटत राहिले सारखे





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators