Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 22, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » काव्यधारा » कविता » Archive through November 22, 2007 « Previous Next »

Samurai
Tuesday, November 13, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरोप
.......

वादळ्-वारे
अथांग तारे,
अनवट वाटा
बुडली गाथा

कोळुन सारे प्याले आहे,
जहाज आता थकले आहे

कूट खलबते
धीट गलबते,
निळी नीळाई
झुरती आई

सगळे पाहून झाले आहे,
जहाज आता थकले आहे

सगे सोबती
रगेल भरती,
रुमझूम राती
जलचर नाती

नांगर सगळे उचलत आहे,
जहाज आता थकले आहे

नवे शहारे
नवे किनारे,
नवी कहाणी
नवे सुकाणी

लाट दमाची फुटते आहे,
जहाज आता थकले आहे




Mankya
Thursday, November 15, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह .. समुराई !
मस्त जमलीये ' निरोप ' . चार चार शब्दात सगळं आटोपत, लयीत अन विषेश म्हणजे सगळं काही मांडलयस !
एकंदर कविता आवडली !

माणिक !


Jayavi
Thursday, November 15, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुत्रकामेष्टी

बोलायचंय खूप... पण.... शब्दच आटलेत
कधी कधी ह्या कुबड्‍या सुद्धा अगदीच अधू होतात
आधाराच्या ऐवजी पांगळेपणच देतात
आणि मग चिडचिड होत रहाते आतल्या आत
आतली धुमस, घुसमट बाहेर पडायला हवीये आता
कुठल्याही भावनेला पुरुन उरणारी....!
संवेदनेच्या पलीकडलं काहीतरी आत रुजतंय....... वाढतंय
आणि तटतटून बाहेर यायचा प्रयत्न करतंय
पण कसं येणार बाहेर...
ह्या वांझपणातून कोण सोडवेल आता
कुणा दुर्वासाचा वर.....
की करावा लागणार पुत्रकामेष्टी यज्ञ ...!

जयश्री


Vaibhav_joshi
Friday, November 16, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समुराई
शेवटचं कडवं आवडलं. कविता छान .

जयू
संवेदनेच्या पलीकडलं काहीतरी आत रुजतंय....... वाढतंय

सही .


Vaibhav_joshi
Friday, November 16, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयसभा


येरझारे ऋतूंचे असे चालले
एक जाता दुजा ठाकलेला उभा
मोहराया पुरेसा इथे वाव ना
आणि जळण्यासही ना पुरेशी मुभा

मार्ग आखायचे मार्ग खोडायचे
सूख शोधायला चाल चालायचे
पावलोपावली संकटे थांबली
आणि प्रारब्ध बसले धरोनी दबा

काय सोसायचे, काय सोडायचे
जे नशीबी असे तेच भोगायचे
दान पावन म्हणोनी हसावे तरी
आत उध्वस्त हर एक तो मनसुबा

का बरे तृप्ततेचे असे वावडे
पाहिजे ते मुळी ना कधी सापडे
अन गवसले कधी तर चुके पायरी
जीवनाने जणू बांधली मयसभा


Psg
Friday, November 16, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समुराई, मस्त कविता.. छान लिहिली आहे.

जया, मस्त. आजकाल तुझी स्टाईल बदलतीये :-) चांगलं लिहित आहेस.

वैभव वाह! शेवटचे कडवे मस्त जमलंय. शब्दांचा चपखल वापर!


Mankya
Friday, November 16, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया .. खरंच बदल झालाय तूझ्या लिखाणात, तरीही कविता आवडली !

संवेदनेच्या पलीकडलं काहीतरी आत रुजतंय....... वाढतंय .. मस्त !

वैभवा .. 'मयसभा' खूपच आवडली !

मोहराया पुरेसा इथे वाव ना
आणि जळण्यासही ना पुरेशी मुभा.. क्लाSSSSस !

माणिक !


Swaroop
Friday, November 16, 2007 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वैभव!... नेहमीसारखेच जबरदस्त.
आत उध्वस्त...
आणि
जीवनाने जणू खासच!


Shyamli
Friday, November 16, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समुराई, जहाज आता थकले आहे आवडलं,
जयु, <कधी कधी ह्या कुबड्‍या सुद्धा अगदीच अधू होतात
आधाराच्या ऐवजी पांगळेपणच देतात >>>> क्या बात है!

वैभव, शेवटच कडव जास्ती आवडलं

Swaatee_ambole
Friday, November 16, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामुराई, जया, वैभव, छान कविता.
जयू, हे काय गं नवीनच? :-)


Pulasti
Friday, November 16, 2007 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समुराई, जयु, वैभव - मस्त कविता!!

Pama
Tuesday, November 20, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सूर गवसला नाही...


या जगण्याचा अजुनि मजला, सूर गवसला नाही,
मेघ दाटुनी आले पण, मल्हार बरसला नाही.

अखंड येथे खेळ चालला, ऊन पावसाचा,
एकवारही सहज परंतु, वसंत हसला नाही.

नजर जाईतो फुलून येती, रोज इथे ताटवे,
किंचितही पण वर्‍यावरती, गंध पसरला नाही.

कले कलेने चंद्र माझ्या, अंगणी उतरतो,
पुनवेचा पण चांदवाही, सखा सोयरा नाही.

पश्चिमेचा रक्तिमा, मज रोज खुणावत आहे,
क्षितिज शोधतो आहे, अजुनी अंत दिसला नाही.

सामोरे जे दिसले मज ते, सत्य कि आभास
जाणिवेतुन कळले तरिही, स्पर्श कसला नाही.





Mankya
Wednesday, November 21, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा .. खूप खूप दिवसांनी लिहिलस ईथे !
पुनवेचा पण चांदवाही, सखा सोयरा नाही ... आवडलं !

सवय

किती किती वेळा सांगीतलंय तूला
भरभर वाचायची सवय वाईट आहे
नूसतेच नजरेस शब्द भावले.. आवडले
म्हणजे अर्थ पटला किंवा भिडला अस नसतं
कमीतकमी एकदातरी ते शब्द एकत्रित वाचून
त्यावर क्षणभर का होईना विचार व्हायला हवा
पण तूला पानं उलटण्याची घाईच फार
काही काही शब्दांना तर तू अगदी सरावलेली
त्याचं स्थान अगदी गृहीतच धरतेस मनात
शब्दाच्या आधी नंतर काही वेगळं असेल हे गावीही नसतं
अश्याने मागच्या पानाचे सोयीस्करपणे संदर्भ घेत जायचं
वर तेच निकष धरुन अगदी चोख मुल्यमापन आणि तूलना
तूला शेवटही नेहमीसारखा अपेक्षित.. मनासारखा
मी मात्र बरेचदा शीर्षकाच्याच अर्थापाशी अडलेला
संपवल्याच्या समाधानाने पूस्तक मिटून तू निमूट बसलेली
मी मात्र मुखपृष्ठावरच्याच काही शब्दांच्या अर्थाने भारावलेला !

माणिक !


Daad
Wednesday, November 21, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे किती किती दिवसांनी आलेय इथे!
सामुराई, मस्त लय! सुंदर निरोप!
जया, का बरं हे असं? वेगळं आहे, अस्वस्थ करणारं!
मयसभा.... वैभवा मस्तच.
"मोहराया पुरेसा इथे वाव ना
आणि जळण्यासही ना पुरेशी मुभा "- असाच लिहीत रहा बाबा!
पमा, "सामोरे जे दिसले मज ते, सत्य कि आभास
जाणिवेतुन कळले तरिही, स्पर्श कसला नाही. "- अतिशय आवडले!


Ajjuka
Thursday, November 22, 2007 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दिवशी तुला शांत निजलेलं पाह्यलं
तुझा वेदनारहित चेहरा
इतकं शांत कधीच नसायचीस तू
तुझ्याकडे बघत बसले होते मी
वाटलं म्हणशील
"नुसती बसू नको,
उठ, काही काम कर!"
खूप वाट पाह्यली तू म्हणशील म्हणून..

आत कुणीतरी चहा केला,
कप वेगळे काढले
"ह्यातले कप नकोत,
गेल्यावर्षीचे नवीन आहेत त्यातले वापरा."
असं काहीच तू म्हणाली नाहीस

कोणी म्हणालं १५ वा अध्याय म्हणूया
म्हणला!
तुला रामरक्षा आवडायची
ती पण म्हणालो आम्ही!

अवघड उच्चार मुद्दाम चुकवले.
"असं नाही गं सोने!
त्याचा संधी असा असा होतो..
त्यामुळे उच्चार असा असायला हवा"
असं नाही म्हणालीस तू!
तू तशीच शांत निजून होतीस.

तेव्हा कळलं..
नव्हे अंगावरच आलं..
बाळपणी कधीतरी धरलेलं तुझं बोट
आज सुटलंय
कायमचं


Bee
Thursday, November 22, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाट दमाची फ़ुटते आहे.. वाह!!!
समुराई, पुन्हा एकदा कविता लिहायला लागलास इथे हे पाहून खूप बरे वाटते आहे. अजून लिही..

अज्जुका, तुझे दुःख आम्ही समजू शकतो..


Manjud
Thursday, November 22, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, .. .. ..

Meenu
Thursday, November 22, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाणं

व्यक्त होणे शब्दातुन,
शब्दप्रभूला साधले ..
शब्द फुलोरा फुलोरा,
त्यात भाव गुंफलेले ..

सजवाया की फुलोरे,
महिरप हो सुरांची ..
गाता भावपूर्ण स्वरे,
गोडी अवीट गाण्याची ..


Jo_s
Friday, November 23, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामुराई, छान आहे कविता

जयश्री, चांगली झाल्ये ही कविता

जीवनाने जणू बांधली मयसभा, वैभव मस्तच

क्षितिज शोधतो आहे, अजुनी अंत दिसला नाही.: पमा कविता आवडली

"मी मात्र मुखपृष्ठावरच्याच काही शब्दांच्या अर्थाने भारावलेला" माणिक दिवसेंदिवस छानच् लिहीत चालला आहेस खासच, ही कवितापण

अज्जुक्का : ..............


मिनू, छोटस गाण छान आहे.

सुधीर




Meenu
Friday, November 23, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर हे घे मोठठ गाणं फारच लांबलय ..

गाता गाता गावे गाणे,
देता देता द्यावे गाणे ..
पुन्हा शिलकी उरावे,
थोडे थोडे गाणे गाणे ..

घेता घेता घ्यावे गाणे,
नेता नेता न्यावे गाणे ..
सांडो द्यावे वाटेवरी,
जाता जाता गाणे गाणे ..

कोणा दिसेल ? दिसावे..
कोणी वेचेल ? वेचावे..
पारीजातकाच्यापरी,
उचलावे त्याने गाणे ..

देता घेता गाण्यामध्ये,
असे मिसळावे गाणे ..
पुन्हा वाटावे सहज,
एकसंध सारे गाणे ..

कोणी डोलवित मान,
कोणी हलविते हात ..
मज वाटते नाचते,
मन लपलेले आत ..

हळू हळू वेग घेई,
गाणे मनात साकळे ..
मग येत असे ओठी,
गाणे मोकळे ढाकळे ..

झिजतील देह सारे,
परी गाणे ना झिजेल ..
मातीमध्ये मिसळाया,
पुन्हा गाणेच उरेल ..

त्याच मातीतुन मग,
तरारेल नवे गाणे ..
फुल होऊनी फुलेल,
आणि सुगंधित गाणे ..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators