Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 16, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » ललित » एक सकाळ » Archive through November 16, 2007 « Previous Next »

Daad
Friday, November 16, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक चांगलं आहे ह्या प्रोजेक्टचं. असतं तेव्हा मरणाचं काम्- विष खायलाही फुरसत नाही असलं. पण काम नसतं तेव्हा गेलं नाही तरी चालतं एखादा दिवस ऑफिसला. डॅरेन, मॅनेजर. चांगला आहे, बिचारा.

आताशा, का कुणास ठाऊक... पण काम असलं की त्याचं आणि नसलं की त्याचही ओझं वाटायला लागलय. ऑफिसमधून घरी येताना आज ऑफिसमध्ये काय करायचं राहिलं, आता घरी जाऊन काय काय करायचय त्याचा विचार. सकाळ झाली की घरातलं काय करायचं राहिलं, आणि आज ऑफिसात काय वाढून ठेवलं असेल त्याचा विचार. एक प्लॅनिंग म्हणून असल्या गोष्टिंचा विचार करणं एक पण, फक्तं त्याचाच विचार करत राहणं म्हणजे....
छोट्या छोट्या कामांची 'काम आहे', 'काम आहे'.... भुणभुण नको वाटते, ओझं होतं त्याचं.

नवर्‍याने मस्तच उपमा दिली. म्हणाला, थोडाचवेळ उचलायचं म्हटलं तर नेट लावून, जोर करून वीस पंचवीस किलो उचलशील. पण तासनतास, दिवसेंदिवस नुसता एक चमचा हातात देऊन धरून ठेवायला सांगितला तर हात भरून नाही का येणार?

आजही तसच झालं. काम असं काही खास नव्हतं. पण ऑफ्-शोअर टीम मेम्बर्सचे परफ़ॉर्मन्स फ़ीड्बॅक द्यायचेत, थोडी डॉक्यूमेंट्स अपडेट करायचियेत असलं नंतर केलं तरी चालतिल असली कामं होती.

मग जाते, जाऊ का?, नको जाऊ का?, अशी ऐलथड्- पैलथड इतकावेळ केली की नवराही म्हणाला, 'असं वाटतय तर नकोच जाऊस, ना एक दिवस! किती तिडबिड करतेस दररोज! आणि सुट्टी घेतेयस तर आराम कर. फिरून ये जवळच. उगीच कामं उकरून काढू नकोस'.
'माझी खोली तर अजिबात लावू नकोस', नवर्‍याचं बोलून संपायच्या आधी लेक.
'हल्ली अगदी आपल्या बाबा सारखा बोलतो', मी मनात म्हटलं!

पण कधी नव्हे ते त्यांचं ऐकायचं ठरवलं. फोन केला डॅरेनला. अन तोपर्यंत मोकळ्या, शांत झालेल्या घरात शीळ घालीत एक चक्कर मारली. मस्तंच पसारा पडला होता सगळीकडे. एकदा हात उचलला देखिल, लेकाच्या खोलीत 'माझ्या मते' वाटेत पडलेला बॉल उचलायला पण मग त्याची दटावणी आठवली अन, मीच उडवला थोडा लाथेने. गम्मत वाटली. एक गिरकी घेऊन मनाशी काहीतरी ठरवलं.
आज अगदी काहीतरीच करायचं किंवा काहीच नाही.....
म्हणजे नक्की काय? ते काही कळेना! म्हटलं सुचेल.... किंवा नाहीही!

झक्कासपैकी गुणगुणत आंघोळ केली. किचनमधल्या इतर पसार्‍याकडे लक्ष न देता, जायफळ घालून दुधाची कॉफी केली. मग त्या कॉफीचा थर्मॉस, कधी पासून 'मग वाचू' खात्यात पडलेलं एक बिच्चारं पुस्तक, पाणी, बिस्किटं, ब्लंकेट असलं काही बाही एका बास्केटमध्ये भरून घराजवळच्याच पार्क मध्ये पोचलेही. कित्ती दिवस गाडीतून येता जाता बघायचे हा पार्क. बहुतेकदा माणसांनी फुललेला. एका बाजूला प्राथमिक शाळा सोडल्यास पार्कला तसा रहदारीचा गजबजाट कमीच.

जरा आजूबाजूला बघितलं. म्हटलं उगीच करून आणली कॉफी. गप्पा मारत, पुस्तक वाचत, रेंगाळत कॉफी पिता येते असली एकदोन कॉफी शॉप्स होती शिवाय एक जुन्या पुस्तकांचं दुकानही.
कधीच कसं लक्षात आलं नाही आपल्या आधी? रोज तर वळसा घालून जातो आपण, या पार्कला! मग अगदी नव्याने बघितला, पार्क फिरून. नवीन लावलेली मुलांची खेळण्याची इक्विपमेंट्स, मध्यंतरी कधीतरी रंग दिलेलं त्या भोवतीचं कुंपण....
मुद्दाम बघू जाता मग असलच बरच काही दिसलं.....

कोपर्‍यातलं खराटलेलं एक झाड प्रत्येक फांदीच्या कपाळी हिरव्या-पोपटी पानांचं गोंदण लेवून उभं होतं. तिथेच, येऊ घातल्या वसंताचं स्वागत करायला एका हारीने लावलेली नवीन रोपटी दिसली आणि माळ्यांच्या असल्या टाईमटेबलला धुडकावून, आधीच फुललेली त्यातली काही अतिउत्साही सुद्धा.

....मधला मोठ्ठाच्या मोठ्ठा हिरवळीचा तुकडा, त्यावरचा नवीन रंग दिलेला परगोला, नीटस आकारात कापून ठेंगणी-ठुसकीच ठेवलेली झाडं, सकाळचा वॉक घेऊन, त्याखालच्या बाकांवर आता दम खात, गप्पा मारत बसलेले सिनिअर सिटिझन्स....
मस्तच वाटलं हे सगळं! आजूबाजूला उलगडत जाणारं सकाळचं एक वेगळं जग..... हे इथेच असणार असच, रोज सकाळी! माझी 'तिडबिड' ह्याला वळसा घालून जाते.... रोज!

मग मीही झक्क पिवळ्या, मऊ उन्हातला हिरवळीचा एक छोटा तुकडा माझं ब्लंकेट घालून सजवला. फुला फुलांचं ते ब्लॅन्केट, त्याच्या कोपर्‍यावर ठेवलेली ती बास्केट.... मला एकदम उड्या मारत 'साऊंड ऑफ म्युझिक'ची गाणी मोठ्ठ्याने म्हणाविशी वाटू लागली.
ब्लॅन्केटच्या मध्यावर, आधी व्यवस्थित मांडी घालून बसले. मांडीवर पुस्तक ठेवून वाचायला सुरूवात केली. तिसर्‍या पानावर पोचले आणि लक्षात आलं की अरे, आपण आडवारलोय.

मग आठवलं लहानपणी पोटावर पालथं पडून, समोर जाड जूड पुस्तक ठेवून दोन्ही हाताच्या दुबेळक्यात हनुवटी ठेवून, मागे पायांचे लंबक हलवत हलवत केलेलं वाचन. आपल्याच टाळक्याचं वजन पेलून असे हात दुखून आले की जमिनीवर दोन्ही तळवे एकमेकांवर ठेवून त्यावर हनुवटी ठेवून केलेलं वाचन. कधी एका हाताच्या तळव्यावर डोकं पेलून विष्णुदेवाच्या पोजमध्ये कुशीवर किंवा आपल्याच दंडावर डोकं ठेवून कुशीवर तोल संभाळीत वाचलेली मासिकं!

असला विचार करता करता, पुस्तकातलं लक्षं कधी उडालं कळलच नाही...... समोरच्याच फुटपाथवर बरीच फुलपाखरं शाळेत जायच्या लगबगीत दिसली. काही आई-बाबांच्या सोबतीने तर काही मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात, काही एकटिच भिरभिरत कायम हरवलेल्या स्थितीत! युनिफॉर्म सारखाच असला तरी काय एकेक तर्‍हा होत्या!

नवीन बूट घालून पलिकडल्या घरातून एक राव बाहेर पडले. थोडावेळ बुटाच्या आतली टोचा-टोची सहन करून आता दिसेल त्या टेंगळावर लाथा हाणित चालले, शाळेकडे. त्यांचे जोडिदार हातात एक आपल्याही पेक्षा लांब काटकी धरून काल मोठ्या भावाबरोबर बघितलेल्या कोणत्यातरी मूव्हीतल्या कुणाचीतरी acting करून दाखवत होते.

वसंताची चाहूल होती आणि सगळीच झाडं पानगळ विसरली होती. नवीन साजाचा उत्साह प्रत्येक झाडा, वेलीवर दिसत होता. एक "लेट करंट" झाडोबा मात्रं, अजून गडद लालसर पानाचा पसारा बिनदिक्कत घालत उभा! कित्ती सुंदर पिवळ्या-लाल रंगांची पानं पडली होती अवती भवती! मी ही एक आणलं होतं उचलून..... पुस्तकात खूण म्हणून.

चिवचिवणार्‍या दुसरी-तिसरीतल्या चिमण्यांचा एक थवा त्या एकांड्या झाडाखालून जात असताना मध्येच थांबला. सगळ्या चिमण्या विखरल्या त्या सड्यात. साताठ एकसारखी पानं गोळा करून, त्याचा पंखा घडवण्यात दंग झाल्या. झाडाखाली येईपर्यंत अविश्रांत बडबडणार्‍या त्या आता अगदी एकाग्रतेने पानं वेचत होत्या, अगदी एकतान!.

बाबाच्या मोठ्ठ्या पाऊलांच्या गतीला मॅच करण्यासाठी दिडकीची दुडकी घालत एक चालले होते. काय प्रश्नोत्तरं चालली होती, कुणास ठाऊक पण, बाबा गहन विचारात पडत उत्तरं देत होता. डोक्यावरची टोपी सरळ करण्यात, मध्येच बाबाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बाबाच्या चेहर्‍यावर वाचण्यासाठी उलटं चालण्यात त्या दिडकीची दुप्पट होत होती. परवा नाही.... बाबाच्या बरोबर संवाद महत्वाचा!

त्यांच्याच मागे, उडू पहाणार्‍या दोन जुळ्या पाकोळ्या, हातातल्या कसल्यातरी कार्डांच्या खजिन्यात बुडालेला, कासवाच्या गतीने चाललेला त्यांचा मोठा भाऊ आणि हे संभाळायला कमी होतं की काय म्हणून एक कुत्रा घेऊन एक सुपर माता चालली होती. शाळेच्या गेटपाशी पाकोळ्या आवारात उडाल्या, तरी बंधूराज त्या 'तिळा दार उघड'वाल्या गुहेतून बाहेर आले नव्हते.

रस्त्याच्या या बाजूने, दुसरे एक पिटुकले साहेब आपल्या उंचच उंच बाबाच्या पायाला मजेत लोंबकळत होते. दप्तर बाबाच्या खांद्याला होतं. ते बाबाही कसले? ते पिल्लू आणि आपला पाय मिळूनच पाय असल्यासारखे झपा झपा चालले होते. खिदळण्याला ऊत आला होता. त्या लोंबकळ-दुकलीने तश्शा चालीत झेब्रा-क्रॉसिंगला उभ्या गाड्यांच्या समोरून रस्ता क्रॉस केला.

इथे आपल्या बहिणाईला शाळेत सोडायला एक भाऊसाहेब आले होते. आधी चार पावलं आई ढकलत असलेल्या प्रॅम मध्ये, मग उतरून बहिणीचा हात धरून, मग तिचं दप्तर आपल्या खांद्यावर घालून घेत, गुढग्यापर्यंत येणारं ते दप्तर आपल्या अवाक्याच्या बाहेर आहे हे समजून मग ते आई कडे दिलं. मग आपली प्रॅम आपण ढकलण्याचा अट्टाहास, मग त्यात बहिणाईचं दप्तर ठेवून ती ढकलण्याचा हट्टं.... बहिणाई होती मुळात पाच्-सहा वर्षांची चिमखडी पण ह्या धाकट्या ध्यानापुढे ती खरच 'ताईबाई' झाली होती. त्याच्या समजुतीने सगळं घेत आईबरोबर चालली होती.

इथे माझ्या समोर, एका कारचा बूट उघडा होता. त्यात एक चारेक वर्षाच्या बाईसाहेब अजून आपल्या गुलाबी चांदण्याच्या रोबमध्ये, मांडी घालून दात घासत होत्या. तंद्रीत एकाच कुंदकळीवर तेवीस वेळा ब्रश फिरत होता, डोळे उघडे असले तरी, स्वप्नं अजून मागल्या पानावरून पुढे चालूच होतं.
डोक्यावरच्या कुरळ्या सोनेरी झावळ्यांची एक बाजू आई आणि दुसरी बाप धरून वेणीत घडवण्याच्या खटपटीत होते. आईची अर्थात आधी झाली आणि ती बाजूला ठेवलेल्या मोठ्ठ्या बॅगेत डोकावली. हा प्रकार रोजचा असावा. कारण बर्‍यापैकी सराईताप्रमाणे बाबाचीही झालीच.
मग बाबाने पाण्याची बाटली घेऊन ही दोन सोनेरी ऍन्टेनावाली परी समोरच्याच झाडाखाली धरली. दोन चुळा भरल्यावर परी जागी झाली असावी कारण मागून गेलेल्या एका तसल्याच केसांच्या कुत्रेभाऊन्ना टाटा केला. मग आईने थर्मॉस मधून ओतलेल्या दुधाचा मजेत घोट घेत आपल्याच वर्गातल्या मित्र-मैत्रिणींना हाय्-हॅलो चालू होतं.

बाबाने वरचं चांदण्यांचं आवरण बाजूला करताच आतल्या शाळेच्या युनिफॉर्ममधल्या फुलपाखराने पंख पसरले आणि मागे वळून बघत आई-बाबांना टाटा करीत अशाच एका घोळक्यात गेलंही.
" you can't help but love " असलं विनोदी एक cute हताश होत, हातात हात गुंफुन आई-बाबांनी आपल्या पाखराकडे ते शाळेच्या आवारात दृष्टीआड होई पर्यंत डोळेभरून बघितलं, मग आपापल्या वाटांनी कामाला गेले.

माझ्या जवळचाच हिरवळीचा एक चौकोन एव्हाना निळ्या जर्द आकाशाच्या तुकडा झाला होता. त्यावरचा एक गुबगुबीत चांदोबा माझ्या बास्केटच्या मिशाने असावा बहुतेक, पण पालथा उलथा होत होत त्या चौकोनी क्षितिजाच्या या टोकाशी आला होता. मऊ लुक-लुक चांदणीसारख्या दिसणार्‍या त्याच्या आईने त्याला उचलून त्याच्या कक्षेत आणुन सोडला.... कितव्यांदा माहीत नाही, अन माझ्याकडे बघून हसली. चंदूभाऊंची लोळणफुगडी चालूच होती चौफेर. आणि एखादा बॉल आणून आणून ग्राऊंडच्या मध्यावर ठेवावा तस्सा ती त्याला ब्लंकेटच्या मध्ये आणून ठेवत होती.

मध्येच कधीतरी मॉर्निंग-टी ची वेळ झाली असावी.... आईने तिच्या एका खांद्यावर टाकलेल्या एका पांढर्‍या स्कार्फच्या ढगामागे चांदोबा लपला... मग एका लबाड बाळ्-मुठीत कधी आईच्या गळ्यातलं धरलं तर कधी समोरच्या ढगाचीच खेचाखेच मजेत चालू होती. आईची मात्रं तो चांदोबा त्या ढगामागे ठेवताना तारांबळ! एक पाय आईच्या मांडीचा शिकारा ओलांडून बाहेर आला होता आणि हिरवळीवर वल्हवणी चालू झाली होती...
आता किनारा लागूच नये असं.... मलाही वाटलं.

बागेच्या एका कोपर्‍यातून येणारी वाट आणि ती संपली ते रिंगण... साकूराने सजवली होती. साकूराचा इन्-मिन्-तीन दिवसांचा साजणसोहळा संपला, की इतर रात्री, त्या झाडांवर नुसतेच विजेचे दिवे लुकलुकायचे.... आत्ता मात्रं साकूराच्या पांढर्‍या, अन फिक्कट गुलाबी ना sss जुक फुलांनी नुसती झिरमिळली होती झाडं. त्यांच्या आजूबाजूला बघावं तिकडे, चौफेर त्यांच्या गुलाबी शहार्‍यांच्या खाणाखुणा!

त्या वाटेवरून 'कराटे किड' मूव्हीमधून उठून आल्यासारखे दिसणारे मिस्टर आणि मिसेस मियागी-एक चायनीज आजोबा आणि आज्जीबाई आपल्या दुडू दुडू चालीने बागेत आले. दोघांच्याही हातात चमत्कारिक दिसणार्‍या काठ्या होत्या. आपली मिची-मिची हसणारी नजर इथे-तिथे फेकत, कुणाला कमरेतून वाकून तर कुणाला नुसतच काठी उंचावून दाखवत आले. ह्या अंगणात उगवणारा माझ्या बाजूचा हा चांदोबा त्यांना रोजचा असावा, कारण त्यांनी त्या चंदाराणी आईला हात केला.
मला आपलं उगीच वाटलं.... हा चांदोबा त्या झाडांमागून, निंबोणीच्या झाडामागे झोपल्यासारखा दिसत असेल का? की फुललेल्या साकूरामागून अधिकच गोड?....

आजोबा आज्जी नी अगदी कराटे-कुंग्-फू असल्या मूव्ही मधल्यासारखच हातातल्या काठ्यांमधून दोन लाकडी तलवारी काढल्या. अरेच्चा म्हणजे त्या काठ्या नव्हत्या, ती म्यानं होती. आता मात्रं मी उठून बसले. एकमेकांना कमरेत वाकून अभिवादन करीत आपापल्या जागेत पवित्रे टाकायला सुरूवात केली. अजून ती एकमेकांच्या तलवारींच्या कक्षेत आली नव्हती. डोळे मिटून, आपल्यातच मग्नं होऊन, त्यांनी घेतलेले मोहरे, त्यांच्या हालचाली एकाच लयीत, एकाचवेळी होत होत्या. कुणा अदृश्य एकाच व्यक्तीच्या दोन सावल्या असल्यासारखं वाटलं.

पुन्हा एकदा एकमेकांना कमरेत वाकून अभिवादन करून आता त्यांनी आता एकमेकांवर पवित्रे घ्यायला सुरूवात केली. ती साठ्-सत्तर वर्षाची पिकली पानं हातात कंबरभर उंचीची पाती घेऊन लवलवत होती. एकमेकांना धक्काही न लावता छोट्या छोट्या उड्या मारीत, मागुन पुढुन वार काढित होते. त्यांची ती लुटुपुटूची लढाई किती वेळ चालली होती कुणास ठाऊक! माझ्याही नकळत मी गुढग्यांवर उभी राहून मान उंच करून हे विस्मयकारी नाट्य बघत राहिले होते. भान न राहून मी यडचाप सारख्या टाळ्या वाजवण्या आधीच ते थांबले, ते एक बरच झालं.

आपली लढाई संपवून, आपापली हत्यारं म्यान करून, थोडावेळ तिथल्याच बाकावर बसून दोघे निघाले. उठताना आज्जीने आजोबांच्या खांद्यावर पडलेलं पान हातातल्या म्यानाने उडवलं आणि आजोबांनी आज्जीच्या डोक्यावर पडलेल्या साकूराच्या दोन्-चार पाकळ्या उचलून तोंडात टाकल्याचं मी ह्या डोळ्यांनी बघितलं.

हसण्या-खिदळण्याचा आवाज ऐकून वळून बघतेय तो दिसलं की नुकतच लग्नं झालेलं एक जोडपं फोटो-शूट साठी बागेत आलं होतं. इथे तर काय... निरंतर वसंताचं एकच स्वप्नं दोन्ही नजरा बघत होत्या. बरोबरच्या सजणी-गडणी, सखे-सहोदर यांच्या चेष्टा-मस्करीला ऊत आला होता.

कधी डोळ्यावर येणारी बट सावरत, मोतिया वेडिंग ड्रेसचा फुलोरा आवरत स्वत:शीच हसणारी, सख्यांच्या गुजगोष्टींना लाजणारी, प्रियकराशी नजर मिळताच विरघळणारी ही नववधू, उगीचच आपल्याच केसांवरून हात फिरवत, बो-टाय पुन्हा पुन्हा नीट करत, तिच्याकडे सहेतुक आणि निर्हेतुकही दृष्टी टाकणारा हा राजबिंडा वर... आत्ता फोटोमध्ये हे क्षण पकडले नाहीत तर फुलपाखरांसारखे उडून जातील अशा लगबगीने ते फोटोत साठवणारा कॅमेरामन, त्यांना त्या कोवळ्या पिवळ्या उन्हात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोझेस घेण्यासाठी सुचवत होता..... नुसती धम्माल चालली होती.

इतक्यात..... सरसरून पावसाची सर आली. मोठ्ठे मोठ्ठे थेंब नाही... असे लहानखुरेच.... म्हणजे म्हटला तर पाऊस, म्हटली तर झुरमुर.

राजकुमाराने वधूचा हात धरून परगोल्याच्या दिशेने पळायला सुरूवात केली.... अर्ध्या वाटेवर हात सोडून तिच्या वेडिंग गाऊनचा पिसारा उचलला.... कसं तरी करून नवरी पळवली, एकदाची. जोरजोरात हसत, उड्या मारत वर्‍हाडी, फोटोग्राफरसहीत आश्रयाला पळाले. आम्हीही गाशा गुंडाळून जवळच्या झाडाखाली जाऊन उभे राहिलो... सगळेच परगोल्याच्या दिशेने बघत होते.....

'काय नशीब ना? आत्तापर्यंत एक ढग नव्हता आकाशात.... ह्यांचं फोटोशूट सुरू झालं आणि ही पावसाची सर... आता कसले फोटो अन काय....', आमच्या झाडाखाली उभ्या लोकांच्यात 'चुक्-चुक' उद्गार ऐकू आले. मला खात्री आहे, इतर झाडांखालून असलेच बोल निघाले असणार..... मलाही तसच वाटलं.

दोनच मिनिटं गेली असतिल-नसतिल, त्या सरीच्या जोडीला उन्हानेही धरतीवर मुसंडी मारली.... अजून पावसाची झिरमिळ हलतच होती..... बोल बोल म्हणता अश्शी समोर इंद्रधनुष्याची कमान उभी राहिली.... आम्ही सगळेच ते नवल एकमेकांना दाखवीत माना उंचावून बघत राहिलो.

......इतक्यात एक अकल्पित घडलं. ती नखशिखांत सजलेली, नटलेली वधू आपल्या सजणी-गडणी, आप्तांच्या गोतावळ्यातून सुटून, पळत येऊन बागेच्या मध्यावर पावसात उभी राहिली. वरती, आकाशाकडे बघत हात फैलावून तिने पावसाची एक सर झेलली, स्वत:भोवती एक गिरकी घेऊन तिने परगोल्यातल्या आपल्या राजकुमाराकडे बघितलं. त्यालाही कळायच्या आत तो तिच्या बाजूला उभा होता.....

झुरमुरत्या पाऊसझडीत, इंद्रधनुष्याच्या कमानीखाली.... नजर नजरेत विरघळली, हात हातांना मिळाले, रेषा जुळल्या, स्वप्नं जुळली! बघता बघता त्याने तिला कवेत घेतली आणि पावसाने त्या दोघांना!

एकमेकांच्या मिठीत हरवलेले ते दोन जीव बघून बघणार्‍या सगळ्यांच्या डोळ्यांना श्रावणझड लागली तरी ओठांवर इंद्रधनुष्यं फुलली होती....

असले क्षण जगातल्या कोणत्याच कॅमेर्‍यात बंदिस्त करता येत नाहीत हे उमगून फोटोग्राफर कमरेवर हात ठेवून उगा-मुगा उभा होता!
आमच्याच झाडाखाली, निव्वळ आईने धरून ठेवलय म्हणून पावसाबाहेर राहिलेल्या एका भिंगरीने त्या दोघांचं पावसातलं लग्नं बघून टाळ्या वाजवल्या..... अन सार्‍या बागेतल्या सगळ्यांचे हात उठले...........................

ऊन्-पावसाच्या लपाछपीत आता उन्हावर राज्यं होतं. अन पाऊस लपला. मगासच्या झडीत न्हाऊन सगळी झाडं कशी दिवाळीच्या अभ्यंगस्नानानंतर आपण दिसतो ना, तश्शी दिसत होती. मागच्या कमानीवरली वेल, पदराचा शेव पिळीत उभी असल्यासारखी दिसली. कडेच्या त्या लहान लहान झुडुपांची माथी हुंगल्यास नुकत्या न्हाऊ घातल्या बाळाच्या 'पिअर्स' साबणाचा वास येईल असलं वेड्यासारखं काहीतरी मला वाटलं.

नुकते अकराच वाजले होते.... आता माझा समोरच्या पुस्तकातला आज सुरूही न झालेला ईंटरेस्ट पूर्णपणे संपला देखिल. कसल्यातरी विजूने भारल्यासारखं मन आनंदी, हलकं झालं होतं. नक्की काय काय बघितलं, त्यातलं काय आतपर्यंत उतरलं काही कळेना.
एक मात्रं नक्की.... सकाळी काय ते ओझं ओझं म्हणत होते ना, ते मात्रं कुठेतरी गुल्ल झालं होतं.

समाप्तं


Akhi
Friday, November 16, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच ह्या शिवाय जास्त मला काही लिहिता येत नाही पण सुरवात आणी शेवट मस्तच!!! आणी पावसातल लग्न देखिल!

Nandini2911
Friday, November 16, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त... जबरदस्त.. आणि जबरदस्त.. झाले माझे चार शब्द

Itgirl
Friday, November 16, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुंदर!! सगळ डोळ्यांपुढे उभ राहिल अगदी!

Psg
Friday, November 16, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंय दाद. एखादी सकाळ फक्त आपल्यासाठी मोकळी ठेवावी.. सगळी ओझी गायब होतात.. :-)
तुझ्या वर्णनशैलीबद्दल काय बोलावं? :-)


Lampan
Friday, November 16, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक पाय आईच्या मांडीचा शिकारा ओलांडून बाहेर आला होता आणि हिरवळीवर वल्हवणी चालू झाली होती...
आता किनारा लागूच नये असं.... मलाही वाटलं. >>>

फ़ार फ़ार फ़ार भारी ...

Manjud
Friday, November 16, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांच्याच मागे, उडू पहाणार् 0dया दोन जुळ्या पाकोळ्या, हातातल्या कसल्यातरी कार्डांच्या खजिन्यात बुडालेला, कासवाच्या गतीने चाललेला त्यांचा मोठा भाऊ आणि हे संभाळायला कमी होतं की काय म्हणून एक कुत्रा घेऊन एक सुपर माता चालली होती.

इथे सुपरमॉम लिहायचा मोह आवरलास ना तू दाद? खरं सांग.....

काय प्रतिक्रिया देऊ लेखाबद्दल? उगाच वाचलं म्हणून दर्शवायला काहीबाही खरडायचं....


Prajaktad
Friday, November 16, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कडेच्या त्या लहान लहान झुडुपांची माथी हुंगल्यास नुकत्या न्हाऊ घातल्या बाळाच्या 'पिअर्स' साबणाचा वास येईल असलं वेड्यासारखं काहीतरी मला वाटलं. >>>>या आणी अशा बर्‍याच वाक्यांसहित तुझ लिखाण आवडल.. उत्तम लिहित रहा किंवा मागे कुणीतरी लिहल्यासारख 'परिसत रहा..'

Monakshi
Friday, November 16, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

as usual, theeee bbbbbbbbbeeeeeeeeesssssssttttttttt :-)

Princess
Friday, November 16, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद... पावसातले लग्न एकदम खास ग... मस्तच वर्णन केलेयेस. अशी एक सकाळ मलाही मिळु दे रे देवा :-)

Mrdmahesh
Friday, November 16, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्रे क्या सुप्पर्ब!!!... लंपण ला जे वाटलं तेच मलाही वाटलं - लय भारी.. कसल्या कसल्या उपमा शोधून काढल्यात... hats off ... अजून येऊ द्या हो..
खरंच आपल्या रोजच्या धांदलीत अपल्याच जवळचं असं सुंदर जग आपल्या लक्षात सुद्धा येत नाही..

भान न राहून मी यडचाप सारख्या टाळ्या वाजवण्या आधीच ते थांबले, ते एक बरच झालं.>>>
खी खी खी...

Anilbhai
Friday, November 16, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही सगळी जादु कसली आहे.
मला पण आता जायफ़ळ घालुन केलेली दुधाची कॉफ़ी पिवुन पाहिल पाहिजे.
:-)

Divya
Friday, November 16, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान असच सकाळी सकाळी बागेत जाउन बघायला पाहीजे पण तिथे पाहीजे जातीचे तशी नजरही पाहीजेच हे बघायला.

Swaatee_ambole
Friday, November 16, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, झकास!! :-)
       

Amruta
Friday, November 16, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय मस्त!!!! लग्न तर खासच. मन भरुन आल एकदम...

Ashwini
Friday, November 16, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, मस्तच जमलय एकदम!

Asami
Friday, November 16, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदी, हलकं झालं होतं. >> अगदि अगदि. कोणीतरी हे मायबोलीच्या पहिल्या पानावर कायमचे चिकटवून थेवा रे.

Gautami
Friday, November 16, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, एकदम मस्तच. तुझी शब्दसंपदा तर अफाटच आहे.

Mansmi18
Friday, November 16, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग आठवलं लहानपणी पोटावर पालथं पडून, समोर जाड जूड पुस्तक ठेवून दोन्ही हाताच्या दुबेळक्यात हनुवटी ठेवून, मागे पायांचे लंबक हलवत हलवत केलेलं वाचन.
-----------------------------------------------
दाद,
अतिशय अतिशय सुंदर!!


Pama
Friday, November 16, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद..
फार सुरेख वर्णन आहे. मस्तच लिहिलय.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators