Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 06, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » कथा कादंबरी » उकल » Archive through November 06, 2007 « Previous Next »

Daad
Tuesday, November 06, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्मय आपणहून ड्रायव्हरबरोबर घरी आला होता. गिरिश डॉक्टरकडून परत येईपर्यंत तासभर थांबला. सुनिता आवरता आवरता, तिच्या स्वभावाप्रमाणे इकडचं तिकडचं बोलत राहिली. गिरिशचा धडपडा स्वभाव, तिची उडणारी तारांबळ, फिजिओथेरपिस्टबरोबरची गिरिशची झक्काझक्की, तीच कशी त्याला सरळ करते, चिन्मयच्या घरच्यांची चौकशी असलच काही बाही.

तेव्हढ्यात फिजिओवाली आलीही. आणि तिच्याच मागोमाग गिरिशही. चिन्मयला बघून खुलला.
"अरे, चिन्मय काय म्हणतोस? इकडे कसा?"

"सर, तुम्हाला थोडं...., तुमच्याशी एक बोलायचं....विचाराय..." चाचरत बोलणार्‍या चिन्मयने कमरेवर हात घेऊन उभ्या फिजिओवालीकडे बघितलं आणि पुढे म्हणाला, "मी थांबतो. तुमचं होऊद्या."

मग आज नको, आता नको, मी दमलोय, हा चिन्मय कधीपासून बसून आहे, त्याचा खोळंबा वगैरे तेवीस कारणं देऊनही जेव्हा तिने तिची उपकरणं काढली तेव्हा तोंड वेडीवाकडी करत गिरिशने पुढचा तास कसातरी घालवला. ती त्याला त्याच्या क्रचेसवरच्या वाईट सवयींबद्दल बजावत होती. ह्या प्रकराकडे बघून चिन्मयच्या ओठांवर हसू फुटलेलं. फिजिओथेरपिस्ट गेल्यावर मोठ्ठी बला टळल्यासारखा चेहरा केला गिरिशने.

मोठ्ठी टाळी वाजवून हात चोळत म्हणाला, "आता बोल. काय म्हणतोस?" आणि आपल्या सवयीने क्रचेसवर फेर्‍या मारायला सुरूवात केली.
"सर तुम्हाला... मला.... आय मीन....तुम्ही...." चिन्मयचं चाचरत बोलणं ऐकून गिरिश सुनिताकडे वळून म्हणाला, "बाईसाहेब, काहीतरी पोटाचं बघा बुवा. त्या फिजिओच्या व्यायामांनी प्रचंड भूक लागलीये.... एक अख्खा पाणघोडा नाहीतरी किमानपक्षी भरला जिराफतरी खाईन..... पण ते नंतर. आत्ताला पोहे चालतिल.... आणि पोहे संपलेत..... कोपर्‍यावरचा वाणी उघडा आहे का ते विचारू नकोस. मी बघितलं नाही मगाशी. पण तो नेहमीच उघडा असतो. थंडीतही बनियनही घालत नाही.... स्टेशनपलिकडे जा... जरा चालणं होईल.... मीच काय म्हणून व्यायाम करायचा......"

काय ते ओळखून सुनिता पर्स घेऊन निघाली... समोरच्या बागेतून थेट न जाता, वळसा घालून जायचं ठरवलं. हसूच आलं तिला गिरिशच्या तोफखान्याचं. काय बोलतो.... किती बोलतो.... काय नव्हेच ते.

पण चिन्मय आज आपणहून आलाय, त्याला काही बोलायचय, सांगायचय हे कित्ती चांगलय. गडी थोडा रुळावर येतोय असं दिसतं. बरोबरच आहे. घरी वडील ते तसे.... आईशी या वयात किती अन कसं बोलणार मुलगा?
कठ्ठिणय बाई. त्याच्या वडलांचं तरी. इतकं कसं कळत नाही, आपल्याच मुलाचं आपल्याला? आपण नाही लक्ष ठेवायचं तर कोणी ठेवायचं?

आता झाला अपंग म्हणून काय फक्त खाऊ-पिऊ घालण्याची, कपडे-लत्त्याची शारिरिक जबाबदारीच उरते का? चांगला, इतर मुलांसारखा होता तेव्हा काय करत होतात म्हणाव?
तुमचं नॉर्मल बोलणं चालणं, संवाद, विसंवाद हे सगळं होतच होतं ना? काही वेगळं करावं लागत नव्हतं त्याच्या मनाच्या घडणीसाठी.

एक मोकळं अंगण, निळं आभाळ, थोडा चोचीला दाणापाणी आणि पंखांची ऊब... पिल्ल हा हा म्हणता मोठी होतातच. घरटं असतं संध्याकाळी परतायला... काळज्या सोपवायला बापाची छाती आणि दुधमाखलं तोंड पुसायला आईचा पदर... त्यापरतं काही नको...

अरे, पण एक धट्टाकट्टा तरूण मुलगा जेव्हा शरिराने अधू होतो, तेव्हा मनातही कुठेतरी पडझड होतेच की. मग बाहेर औषधं लावा, कुबड्या द्या... त्यानं मनाची डागडुजी होते का? एक दुखर्‍या जखमेला बॅडेज बांधाल, कुणाच्या स्पर्शापासून वाचवाल...
पण दुखर्‍या मनाच काय? अशावेळी बोलणीच काय पण नजरा सुद्धा घायाळ करणार्‍या.... त्यापासून कसं वाचवाल म्हणते मी?

आणि कधी कधी तर घरातलेच म्हणायचे ते खोदतात खड्डे, हळव्या मनाच्या मातीत.... मुद्दाम नाही पण चुकुनही धक्का लागला तर कोसळतात हे मनाचे कोपरे. हळू, हलकी फुंकर घालूनच वाळवायची असतात असली आसवं. त्यांना स्पर्शही सहन होत नाही!

अपंग झाला म्हणून काय झालं... अरे, एक मूल आहे... हुशार आहे. आजवर खतपाणी घालून वाढवलत.... थोडी मुळं उखडलीत, दुखावलीत.... म्हणून काय त्याचं अंगण नाकाराल?

द्या एक थोडका आधार, उन्हं लागूद्या थोडी कोवळी.... कधी घरात आणून ठेवावं लागेल फार वादळ-वारं असलं तर..... इतर झाडांना घालतात तसं धसा-फसा पाणी ओतून नाही चालायचं.... अलवार हातानं शिंपण करा.... त्याची त्याला मुळं धरू द्या... मग त्याचं आकाश तो शोधेल.... तुम्हालाच विसावा देण्याइतका मोठा होईल, म्हणावं. कसं कळत नाही या आई-वडलांना......

कसही झालं तरी.... तरी..... एक मूल आहे....

हुंदका अनावर होऊन बागेतल्या एका बाकावर बसली. येणारे कढ आतल्या आत जिरवत राहिली. फडफडत्या पापण्यांनी नजर स्वच्छ करत राहिली.

अन, जरा वेळाने...... आपली आपल्याला सापडल्यावर पदराने स्वच्छ तोंड पुसून, भरला जिराफ खाण्याइतकी भूक लागलेल्या नवर्‍यासाठी पोहे आणायला कोपर्‍यावरच्या वाण्याकडे वळली.

अगदी तासाभराने घरी आली तेव्हा हॉलमधलं दृश्य पाहून तिचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना.

चिन्मय गिरिशला क्रचेस कसे वापरायचे ते शिकवत होता. गिरिश अतिशय लक्षपूर्वक ह्या गुरूकडे बघत होता. चुकीचं बल दिलं गेल्यास कोणते स्नायू कसे वापरले जातायत, कुठे चुकीचे आकुंचन पावतायत, प्रसरण पावतायत, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन चालू होतं.

वाकून चिन्मयच्या पोटरीचे स्नायू हलक्या हातांनी गिरिशने धरले होते. त्याच्या क्रचेसच्या वापराबरोबर टाच उचलताना, चवडा टेकताना होणारी पोटरीच्या स्नायूंची हालचाल समजावून घेत होता. इतके तल्लीन झाले होते की, ती आत येऊन स्वयंपाकघरात गेल्याचही कळलं नाही दोघांना.

फोडणीच्या वासाने शुद्ध आली असावी. क्रचेस घेऊन नव्याने पावलं टाकीत गिरिश आणि तो बरोबर चालतोयना हे पहात उलटा उलटा चालत चिन्मय.... दोघेही स्वयंपाकघरात आले.
"सर, मला वाटतं की आता डाव्या पोटरीवर तितका भार येत नाहीये. आणि टाचही पूर्ण टेकताय तुम्ही..... तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आत्ता लगेच नाही गूण यायचा.... पण....", चिन्मय पायवरची नजर काढून त्याच्या चेहर्‍याकडे बघत म्हणाला.

"बरोब्बर... आत्ता लगेच नाही सांगत येणार पण कम्फर्टेबल नक्की वाटतय.... मी हेच टेक्निक चालू ठेवतो... तुला सांगतोच दोन दिवसात..... आणि थॅंक्स रे. खरच. साधी गोष्टं... सोनारही होताच कान टोचत.... पण काये, आपण पेशल, आपले कान त्याहून सपेशल. आपल्याला सपशेल सोनार लागला भोक पाडायला..., काय?" पुढे होत गिरिशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि जवळची खुर्ची ओढून घेऊन बसला. तोपर्यंत चिन्मयने त्याचे क्रचेस भिंतीला लावून ठेवले.

"अरे, पण तू का आला होतास ते नाही सांगितलस?... बोलो, बोलो! क्या कर सकते है हम आपकेलिये? येऊन माझी चाल सुधारलीस ते एक बरं केलस बाबा, हिच्याकडून तुला एकशेदहा मार्कं.... पण ते कारण नव्हतं ना? बोल! .... तुझं बोलून होईपर्यंत हिचे सगळे पोहे शिजवून होतील एक एक करून, बहुतेक.....", गिरिश सुनिताकडे बघत हसत म्हणाला.

"तसं महत्वाचं काही नाही... ते टुर्नामेंट्स बद्दल बोलत होते सगळे... मी म्हटलं की.. मलाही भाग घेता आला तर... म्हणजे अपंगा.... अपंगांचे असतीलच ना काही इव्हेंट्स.... त्यात... तुम्ही म्हणालात... तुम्ही परवानगी दिलीत तर...
म्हणजे माझी..... माझी तयारी आहे.... खूप मेहनत करेन.... तुम्ही म्हणालात तरच..."

'अरे, यार...." म्हणत गिरिशने जोरात टाळी वाजवल्याचं तिने ऐकलं फक्त....

भरले डोळे घेऊन वळण्याचं झालं नाही तिला. तशीच पाठमोरी परत परत पोहे ढवळत राहिली.....

त्यानंतर दोघे थांबलेच नाहीत........
क्रमश:


Daad
Tuesday, November 06, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिश तर पूर्ण बरा झालाच पण ह्या गुंत्याची उकलही अलवार करत गेला. सुनिता स्तिमित होऊन हे बघत राहिली.

गेले काही महिने चिन्मयच्या आजूबाजूचा प्रत्येकजण त्याल मदत करत होता, जपत होता. ज्या वयात धडपडायचं त्या वयात "जपून", "हळू", "इथे नाही", "तिथे नको", "हे कसं शक्य आहे?", "ते तर अशक्यच" असल्या जगात फेकला गेला.

त्यादिवशी पूलवर गिरिशचं तारांगण बघितलं, अन मग त्याच्या घरी फिजिओचा घोळ.

नेहमी जिथे तो हतबल होऊन कुणीतरी मदत करण्याची वाट बघायचा, किंवा नको असताना लोक मदतीचा हात द्यायचे.... त्याच अवस्थेत, भोवर्‍यात अडकलेला गिरिश बघितला त्याने.
त्याक्षणी तो स्वत: काहीतरी करू शकला.... कुणालातरी मदत करू शकला. खूप खूप दिवसांनी स्वत्:हून काही करण्याची इच्छाशक्ती जागी झाली आणि करण्याची संधीही मिळाली. दोन्ही अगदी हातात हात घालून...
आपले आपण कुणासाठीतरी काहीतरी करू शकतो. कुणालातरी आपला काही उपयोग होतोय ही भावना सुखावून गेली त्याला.

अनेक दिवस प्रयत्न करूनही चिन्मयच्या कोषात शिरू शकला नव्हता गिरिश. त्याच्या स्वत:च्या असहाय्य अवस्थेने, चिन्मयच्या कोषाची, जगाची एक झलक मिळाली त्याला. आपण इतके वयाने, विचारांनी मोठे म्हणायचे ते, पेलू शकत नाही, हे काही दिवसांचच ओझं... तर हे अर्धवट वयाचं पाखरू अधू पंख घेऊन बावरून घरट्यात लपलं तर काय चुकलं?

चौदा-पंधरा वर्षाच्या वयाला मुलं "मोठे झालोय"च्या जमिनीवर अधांतरी चालत असतात. हळूहळू वय वाढतं, घटना घटनांनी खरोखरच जबाबदारीने वागायला लागतात, प्रसंगांतून शिकतात.... आणि अधांतरी अवस्था हळू हळू जाऊन घट्ट जमीन घडते पायाखाली.... आपली आपणच. मग आत्मविश्वासाने पुढची पऊलं पडतात.... आपोआपच.
चिन्मयच्या ह्या अधांतरी अवस्थेतच जमीनच काय, पण पायच काढून घेतले..... त्याने पुढे चालण्याचंच नाकारलं होतं.

कोष फोडून उडू पहायच्या ऐवजी आपल्याच धाग्यांच्या गुंत्यात अडकला होता.

गिरिशला हात देण्याची संधी मिळाली.... त्याच्या त्या कवचाला हा एक सुखाचा "धक्का" पुरेसा होता. गिरिशला मदत करता करता चिन्मयने आपल्याच गुंत्यातल एक महत्वाचा धागा गिरिशच्या हाती दिला होता.... आत्मविश्वासाचा!
सुनिताच्या मते दुरंगी मोज्यासारखा दोन रंगांचा.... एका बाजूने बघावं तर आत्मविश्वासाचा अन दुसर्‍या बाजूने सह-अनुभूतीचा.

एकदा हाती आलेला हा धागा मग गिरिशने सोडला नाही. त्याला धरून गिरिश त्याच्या पिळातून फिरला. त्याच्या निरगाठी, सुरगाठी शोधल्या. कसलाही धसमुसळेपणा न करता आई म्हणाल्या तस्सा अलवार सोडवला गुंता.

टूर्नामेंट्ससाठी सगळ्यांनीच बेदम प्रयत्नं केले. चिन्मयनेही लावलेला नेट त्याच्या वडिलांच्याही लक्षात आल्याशिवाय राहिला नाही. त्याच्या ट्रेनिंगसाठी येऊ लागले आणि अख्ख्या टीमसाठीच राबले. पोरांना पूलवर घेऊन जाणे, घेऊन येणे, काहीतरी "मस्तपैकी" खाणं आणणे.... आणि टुर्नामेंटच्या दिवशी तर स्वत्:ही त्यांच्या टीमचा लोगोचा शर्ट घालून धावपळ करत होते. पोहायला उभा राहिलेल्या चिन्मयने प्रेक्षकात बघितलं. बाबा त्याच्याकडे बोट दाखवून तो माझा मुलगा आहे हे शेजारच्याला किती अभिमानाने सांगत होते.....

दहावीचं एक वर्ष ड्रॉप घेऊन चिन्मयने पुढल्याच वर्षी दहावी पूर्ण केली. एव्हाना एक उत्तम अपंग जलतरणपटू म्हणून त्याला मान्यता मिळायला लागली होती. शाळेतला आदर्श विद्यार्थी म्हणून मिळालेलं सर्टिफिकेट घेऊन दाखवायला घरी आला. आता नुसते ब्रेसेस लावून चालत होता, स्टिकसचा आधार न घेता.

स्वयंपाकघरात डायनिंगटेबलजवळ खुर्चीत बसून कॉलेजबद्दल बोलत होता, मित्रांबरोबरच्या सुट्टीतल्या गमती जमती सांगत होता. मध्येच गिरिशला डोळा मारून तिच्या मऊसूत, पिळदार चकल्यांची तारीफ करत होता.
त्यांच्या विरोधाला न जुमानता वाकून तिला, गिरीशला नमस्कार करून 'येतो' म्हणून वळला आणि आपल्यामते ताठ मानेने, आत्मविश्वासाने चालत निघाला....

आपल्या आयुष्याचे धागे जुळवायला, त्यातून एक रेशिमघडी विणायला आत्मविश्वासाने झेप घेऊ निघाल्या ह्या पाखराकडे दोघे डोळे भरून पहात राहिले.

समाप्त


Itgirl
Tuesday, November 06, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर!! किती मनस्पर्शी लिहायला जमत तुम्हाला...
दिपावलीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप सार्‍या शुभेच्छा :-)


Aaftaab
Tuesday, November 06, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा अप्रतिम..
steady opening partenership, solid middle order batting, and amazing slog overs...!!
दाद, आपने तो हिला दिया दिल को! खूप काही शिकायला मिळालं; यातून लोकांना आपापले गुंते उकलण्याची प्रेरणा मिळो, मिळेलच...


Akhi
Tuesday, November 06, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, अतिशय उत्तम कथा! कथा का म्हणावे जीवनाचे सुरेख मर्म च तुम्ही सन्गितले. मी पण माझ्या आयुश्याचा गुंता असाच अलगद सोडविन म्हणजे प्रयत्न तरी नक्की. नवी उमेद मिळाली.
तुम्हाला आणी तुमच्या कुटुंबियांना दिवाळी च्या हर्दिक शुभेच्छा!!!!!


Swa_26
Tuesday, November 06, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच छान!! नेहमीप्रमाणेच अप्रतिम :-)

Manjud
Tuesday, November 06, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, सॉरी पण नेहमी बिर्याणी खायची सवय लावून ह्यावेळी जिरा राईस दिलास....

Psg
Tuesday, November 06, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईगं! काय लिहितेस गं.. कस्सली उकल केलीयेस नात्यांची!! ग्रेट!! मानलं!!

ऑस्ट्रेलियात अजून कोण रहातं? जाऊन या बाईची दृष्ट काढा कोणीतरी! :-)


Princess
Tuesday, November 06, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे दाद... तुझी कथा म्हणले म्हणजे अप्रतिम असणारच. नेहमी नेहमी कुठुन नवे शब्द आणणार... म्हणुन मी मागच्या २ ३ कथाना प्रतिक्रिया दिली नाही. पण तू जे लिहितेस ना... त्याला जोड नाही... simply superb
पी एसजी ला अनुमोदन. दृष्ट काढा हो कोणीतरी...


Manjud
Tuesday, November 06, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही, नेहमी नेहमी नंदिनीने का म्हणून तीट लावायचं?

जिरा राईस पण अप्रतिम झालाय.....

प्रतिक्रिया द्यायला शब्द सुचत नसले की असं होतं.


Sush
Tuesday, November 06, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र मैत्रिणिनो तिला कथा लिहुद्यात.
अभिप्राय नन्तर लिहुयात ना
खुप हिरमोड होतो new चा tag वाचुन फक्त अभिप्राय वाचावा लागतो.


Itgirl
Tuesday, November 06, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...मित्र मैत्रिणिनो तिला कथा लिहुद्यात. ...

अग मैत्रिणी, समाप्तचा बोर्ड लागलाय आधीच :-)


Bsk
Tuesday, November 06, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपली की कथा आता! आता अभिप्रायच लिहायचा!
दाद.. अप्रतीम! नात्यांची उकल करणं..ते शब्दात बांधणे,आणि खूप सुंदर उदाहरणे देणे(उदा, धाग्याचा गुंता) तुलाच जमते! अजुन अश्याच कथा लिही!


Mankya
Tuesday, November 06, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद .. जियो ! एकदम तबीयत खूश हो गयी. काय अप्रतिम लिहून गेलीयेस simply supreb ! माझ्याजवळही शब्द नाहियेत दाद द्यायला, तेंव्हा वरील सर्वांच्या छान छान अभिप्रायांना अनुमोदन ! गुंता या शब्दानीशी कायम आठवण येईल आता ' उकल ' ची !

माणिक !


Zakasrao
Tuesday, November 06, 2007 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच :-)
पुनमला अनुमोदन
नात्यांची उकल अगदी नीट उघडुन दाखवली आहे :-)


Dineshvs
Tuesday, November 06, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर कथा, दाद.
पण सलग वाचायला खुप छान वाटले असते.
देवनागरी शीर्षकाबरोबर हाही निर्धार करणार ना ?


Sarivina
Tuesday, November 06, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप सुन्दर....कालच एक लेख वाचला वर्तमानपत्रात. त्यात म्हटलं होत कि अपन्ग मुलंही जन्मत: आनन्दीच असतात. दु:खी असतात ते त्यान्चे पालक जे पर्यायाने मुलाना दु:खी करतात...

म्हणून अशा गिरिश्-सुनिताची गरज आहे त्यान्च्या आयुष्यात आनन्द क्षण पेरायला... मग रोप रुजेलच....


Uchapatee
Tuesday, November 06, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद नेहेमी प्रमाणेच उत्तम आहे. प्रतिक्रिये साठी शब्दच सुचत नाहीत. अशाच लिहीत राहा.

Sakhi_d
Tuesday, November 06, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद..... खरच खुपच सुरेख लिहिले आहेस..... :-)
तुझ्या पुढच्या लेखनासाठी शुभेच्छ्या...!!!


Nandini2911
Tuesday, November 06, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला तीट लावून झालेलंच आहे.
दाद, मजा आ गया. ओय यार दिवाळीच्या आधीच मस्त फ़टाका बम...






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators