|
Daad
| |
| Sunday, November 04, 2007 - 3:10 am: |
| 
|
एव्हाना गिरिशने आपलं नशीब स्वीकारलं होतं. डॉक्टरी उपाय, लोक सांगतात म्हणून मंत्र-तंत्राचे वगैरे सगळे उपाय झाले होते. त्याला मूल होऊ शकणार नाही हे त्याला आणि सुनिताला स्वीकारणं सुरुवातीला जड गेलं. पण दोघही सुशिक्षित होते, आपापल्या कामात बुडून जायचे. सुनीता एक प्रतिथयश चाईल्ड सायकॉलॉजिस्ट आणि गिरिश एक स्वीमिंग कोच. दोघांची ओळखही तिच्या एका पेशंटच्या मधूनच झालेली. मनं जुळली आणि लग्नं केलं. दोघांना मुलांची अत्यंत आवड. पाचेक वर्षात अनेक प्रयत्नांअंती, आणि टेस्ट्स्मधून गिरिशमध्येच दोष निघाल्याने मूल होणार नाही हे लक्षात आलं तेव्हा दोघेही तसे कोसळलेच. पण दोघेही शिकलेले होते, समजदार होते. नातेवाईकांनी जोर देऊनही विचार्-विनिमय करून दत्तक वगैरेच्या भानगडीत पडायचं नाही असं ठरवलं. दोन्ही घरात सगळीच माणसं समजदार असणं हा दैवयोग, पण त्यांच्या बाबतीत होता खरं. त्यांना संभाळून घेणारे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी होते अवती-भवती. आपापल्या क्षेत्रात दोघेही माहीर होते, अगदी समरसून काम करायचे. गिरिशचे विद्यार्थी सगळ्य देशभरातल्या स्पर्धांमध्ये यश मिळवत होते. गिरिश स्वीमिंगबरोबरच वेगवेगळ्या वनस्पती अर्कांचा, तेलांचा मालीश करण्याच्या एका आयुर्वेदिक तंत्राचाही गुरू होता. त्याच्या हिमालयातल्या एका एक्स्पिडिशनमधल्या एका जर्मन मित्राचा हा बांधलेला गंडा आणि मिळवलेली विद्या. त्यासाठी त्याच्याबरोबर तिबेट, हिमाचल आणि राजस्थानही फिरला, औषधी वनस्पती शोधत. गिरिशचं हे असं वेगळेपण सुनिताने असोशीने जपलं होतं. सुनिता भारतातच नव्हे तर बाहेरही विख्यात होती. तिचे पेपर्स जगभर वाचले जायचे. तिच्याशी कंसल्ट करायला बाहेरूनही पेशंट्स यायचे. दोघांच्या कामाच्या वेळाही जुळून आलेल्या. दोघेही दुपारी तीनेक तास घरी असायचे. तेव्हा गिरिशच्या स्वयंपाकघरात सुनिताची आणि सुनिताच्या बागेत गिरिशची लुडबुड चालायची. एकमेकांना आपापल्या कामातल्या गोष्टी सांगत तोही वेळ जायचा. एक दिवस पोलिओने उजवा पाय अधू झालेल्या चिन्मयला त्याची आई घेऊन आली स्विमिंगपूल वर. आधी फोन करून त्यावेळी इतर कुणी पूलवर नाही ह्याची खात्री करून घेऊन त्या आल्या. आधी नुसत्याच स्वत्: आल्या, कुणीही आजूबाजूला नाही ह्याची खात्री करून घेऊन मगच गाडीतून ड्रायव्हरच्या मदतीने व्हीलचेअरवरून चिन्मयला आणलं. एकच पाय अधू होऊनही व्हीलचेअरमध्ये बसलेला चिन्मय, टेबलाच्या पलिकडे खिडकीच्या बाहेर बघत किंवा खाली मान घालून होय किंवा नाही इतकच पुटपुटणारा हा मुलगा नुसता पायानेच अधू झालेला नाही हे गिरिशच्या लक्षात आलं. चित्राताई त्याला गाडीत बसवून परत आल्या, गिरिशशी बोलायला.. हा चौदा-पंधरा वर्षांचा तरूण मुलगा दोन वर्षांपूर्वी पर्यंत शाळेच्या बास्केट्बॉल, हॉकीच्या टीममध्ये होता, एक उत्तम गायक आणि तबला वादक होता हे सांगून पटलं नसतं. जगन्मित्र, हरहुन्नरी, विनोदी अशा एका कोवळ्या, नुकत्याच बहरू लागलेल्या आयुष्यावर पोलिओने उभे आडवे आघात करून त्याला निष्पर्ण केलं होतं. चिन्नूचे वडील स्वत्: एक उत्तम ऍथलेट होते त्यांच्या शाळेच्या, कॉलेजच्या कारकिर्दीत. अजूनही वयाच्या पन्नाशीतही ते कंपनीच्या हॉकी टीममध्ये खेळत होते. स्वत:ला कामात गढवून घेत आणि जास्तीत जास्त बाहेर रहात त्यांनी घरातला प्रॉब्लेम जवळ जवळ डिनाय केला होता. घरी असत तेव्हा, भेटत तेव्हा चिन्नूला गाडीतून कुठे कुठे फिरायला नेणे, त्याच्या सुखसोई, औषधोपचार या सगळ्याची चौकशी आणि आपल्यामते हात-भार लावत. पण एक बाप म्हणून त्याच्या मानसिक तयारीकडे त्यांच्याकडून काहीच अपेक्षा करणं मूर्खपणाचं ठरलं असतं. चित्राबाईंच्यामते त्यांनी अजून हे स्वीकारलच नव्हतं. ते स्वत: अजून तयार नव्हते तर चिन्नूला काय मदत करणार होते ते? बैठे खेळ कधीच न खेळलेला हा गडी आता तासनतास कंप्यूटरवर काही-बाही वाचत असायचा. शाळेत अभ्यासातही त्याचं लक्ष कमीच झालं होतं. एक 'काय फरक पडतो' अस attitude तयार झाला होता. आत्ता पंख उभारून घरट्याबाहेर पडू पहाणारं आपलं पिल्लू जाया होऊन घरट्यात कुचमत बसलेलं बघून चित्राबाई कुणाही आईइतक्याच घायाळ झाल्या होत्या. आपल्यापरीने त्याला जमेल तसं "ताळ्यावर" आणण्याचा प्रय्त्नं करत होत्या. त्यांचं ऐकताना, त्यांच्याशी बोलतान गिरिशला जाणवलं की हा नुसताच चिन्मयचा प्रॉब्लेम नाही, सगळ्या घरालाच पोलिओने जायबंदी केलय. क्रमश:
|
Daad
| |
| Sunday, November 04, 2007 - 3:17 am: |
| 
|
"अरे, असं नाउमेद होऊन कसं चालेल? त्याला मोठ्ठा आघात आहे हा. तुझी बाकीची मुलं शिकतात ना, ते त्यांना आवडतं पोहायला म्हणून. त्यांच्यासाठी तो एक खेळ आहे, किंवा नुसतच एक नवीन स्किल. चिन्मयसाठी ही औषधाची गोळी आहे... आणि हे तो जाणून आहे... हेच तू विसरतोयस", सुनिता गिरिशला समजावत होती. गिरिशने खूप समजावूनही हा नुसता शारिरिक नाही तर पर्यायाने मानसिक प्रॉब्लेम झाला आहे, हे चित्राबाईंना पटत नव्हतं. सुनीता किंवा दुसरी कुणीही मानसोपचारतज्ञ त्याला भेटणं आवश्यक आहे. किमान काऊंसेलिंगतरी व्हायला हवं. हे कसही समजावून सागितलं तरी पटत नव्हतं. दिवसेंदिवस गिरिशला अजून काय करावं समजत नव्हतं. "अगं पण आता जवळ जवळ पाच महिने होत आले... अजून त्याच्यात काहीच सुधारणा नाही. मी सांगतोय तितकं आणि फक्त तितकंच करतोय तो. त्यातही स्वत:हून काही करण्याची इच्छाच नाहीये........ अगं तू बघायला पाहिजेस. किती नाईलाज म्हणून त्या व्हील्चेअर वरून पाण्यात उतरतो. शक्य झालं असतं ना, तर व्हील्चेअर सकटच पाण्यात आला असता.... पोहायला! आई आणते, म्हणून हा येतो. मी सांगतो म्हणून हात हलवतो, पाय मारतो. 'पुरे का' विचारलं तर नेहमी 'हो'! तेसुद्धा मानेने. अग हा बोलतच नाही. माझ्याशीच नाही अस नाही, कुणाशीच नाही..... I really don't know what to do.... मी जे करतोय त्याचा काय परिणाम होतोय.... मुळात परिणाम होतोय का नाही हे सुद्धा कळत नाहीये मला. बर.... त्याचे जरा जरी रिस्पॉन्सेस यायला लागले ना, तर मी मसाज थेरपी पॅरलली चालू करू शकतो..... पण जोपर्यंत......" सुनिताने त्याच्याकडे टक लावून बघत होती आणि तिच्या ओठांच्या कोपर्यावर हलकं हसू होतं. शरीर आणि मन यांच्या दु:खांच्चा विचित्र पीळ, गुंता, तो सुद्धा दुसर्याकुणाचा तरी घेऊन तिचा नवरा बसला होता. आपल्यामते सोडवण्याच्या प्रयत्नात. समोर reference बुक्सचा पसारा, टिपणं काढलीयेत. चार रंगांची पेन, हायलायटर्स..... तिला एकदम मागे कधीतरी हट्टाने त्याने विणकाम शिकायला घेतल्याचं आठवलं, ते सुद्धा दुरंगी हातमोजे असलं काहीतरी. 'येत नाही म्हणजे काय', असल्या आवेशाने गिरिश सुया फिरवत होता..... ते बघण एक परवडलं. पण ते एन्जॉय करण्यासाठी मग मोठ्ठ्याने गाणी म्हणायचा. हळूवार हातांनी टाके घालत स्वत:शी गुणगुणणार्या सासूबाई तिला आठवल्या आणि हा प्रकार! .....'विनोदी'च्या पलिकडे. पण एकदिवस त्याच्या खोलीतून काहीच आवाज कसे नाहीत म्हणून डोकावली तर दोन्ही रंगांच्या लोकरीच्या गुंड्यांचा गुन्ता सोडवत बसला होता. तो सोडवताना आणखिन गुंता होत होता. तिची मदत घ्यायचं साफ नाकारलं. तिने सासूबाईंना बोलावून घेतलं, "तुमच्या मुलाचा प्रॉब्लेम आहे, सोडवायला या" म्हणून सांगत. त्याच्या खोलीतला प्रकार बघून त्यांनी डोक्याला हात लावला होता आणि तिला धपाटा घातला होता. आत्तासुध्धा अगदी जमिनीवर फतकल मारलं नव्हतं पण चेहर्यावर भाव तेच होते.... हतबल! तिचं एकटक बघणं गिरिशच्या लक्षात आलं. आता आपली मानसोपचारतज्ञ बायको आपल्याला सुधारणार, हे ही लक्षात आलं. "काय? .... काय झालं? टकरी कावळिण दिसत्येस आत्ता", frustrate होऊन चिडला की लहान मुलांसारखा दिसायचा आणि वागायचाही. तसच आत्ताही. "तुला आठवतं तुझं वीणकाम?" चुकीची आठवण करून देणं होतं.... चुकीच्या वेळीही. पण इलाज नव्हता. "त्याचं काय आता?", टोपण नसलेल्या बॉलपेनाचं टोपण शोधत गिरिश म्हणाला. "त्यावेळचा गुंता आठवतोय? आणि आईंनी काय सांगितल होतं?....", आता मात्र गिरिश खुर्चीवर बसला. एकात एक बोट अडकवून बनवलेल्या मुठीवर हनुवटी- 'गडी ऐकून घ्यायला तयार'चं लक्षण. सासूचे शब्द त्यांच्याच टोनमध्ये सुनिताने त्याला ऐकवले. "गुंता झालाय हेच आधी कबूल कर, स्वत:शी. गुंता अलवारच उलगायचा असतो, बोद्या. त्याच्याबरोबर धसमुसळेपणा करून चालत नाही. बर... गुंता हा धाग्याचा स्वभाव नाही.... कुणीतरी घातल्याशिवाय गाठी बसत नाहीत..... मग सुताच भूत बनायला वेळ लागत नाही. धाग्याच्या पीळाबरोबर जा... तो वळेल तसा वळ, त्याच्या प्रत्येक गाठीतून शीर. दिसताना सूरगाठ दिसत्ये पण निरगाठ असू शकते..... तरच तुला ह्या चक्रव्यूहातून बाहेर यायला जमेल. नुसतीच आत उडी घेऊन दे-मार घे-मार केलस तर तुझा अभिमन्यू झालाच म्हणून समज!", थोडं मिश्किल हसत, थोडं खरच गंभीर होत, सासूबाईंची नक्कल करत सुनीता बोलत होती. अभिमन्यू वगैरे मसाला तिचाच... पण ते गिरिशला आठवणार नाही हे ही तिला माहीत होत. तिचं बोलून झालं तसा गिरिश उठला आणि कमरेवर हात ठेवून खिडकीबाहेर बघत उभा राहिला. मग वळून तिला घट्ट मिठीत घेऊन कपाळावर ओठ ठेवले. आता चहाची फर्माईश असा तिच्या मनातला विचार, "चहा टाक मस्तपैकी तोपर्यंत दोन फेर्या मारून येतो...." असा बोलून दाखवत बूट घालून बाहेरही पडला. हसत सुनिता वळली.... हे नेहमीचं. डोक्यातली चक्र फिरायला लागली की, धावायला जायचं! आता येईल परत मोठ्ठा गुंता घेऊन किंवा नीट गुंडाळलेला गुंडा घेऊन म्हणत चहा टाकला आणि वाट बघत बसली. क्रमश:
|
Itgirl
| |
| Sunday, November 04, 2007 - 4:23 am: |
| 
|
मस्तच जमली आहे सुरुवात, आवडल
|
छान सुरुवात केलीत, दाद! पुढच्या भागाची उत्कन्ठा लागून राहिलीय. कथेचा विषय ही छान निवडलात पुढचा भाग कसा रन्गेल? वाट पहातेय! लवकर लिखाण येऊ देत.
|
Vrushs
| |
| Sunday, November 04, 2007 - 5:51 am: |
| 
|
दाद, तुमचं नाव दिसल की छान वाटतं.मी वाट पहात होते अश्विन महिन्यात तुमची कथा कधी येतेय याची. छान झालीये सुरुवात.एक सलग लिहिलत तर अजून मजा येईल. Of course take your own time
|
Ajai
| |
| Sunday, November 04, 2007 - 9:22 am: |
| 
|
वाटल होत तुमच्या कथेसाठी दिवाळी अंकापर्यंत वाट बघावी लागतेय की काय, पण गुलमोहरात ही लिहताय म्हणुन आभार. तुम्ही एव्हढ व्यवस्थीत देवनागरी लिहता पण शिर्षक मात्र रोमन लिपीतच असते शक्य असेल तर तेव्हढे बदला.
|
Prajaktad
| |
| Sunday, November 04, 2007 - 2:08 pm: |
| 
|
गुंता हा धाग्याचा स्वभाव नाही.... कुणीतरी घातल्याशिवाय गाठी बसत नाहीत..... मग सुताच भूत बनायला वेळ लागत नाही. धाग्याच्या पीळाबरोबर जा... तो वळेल तसा वळ, त्याच्या प्रत्येक गाठीतून शीर. दिसताना सूरगाठ दिसत्ये पण निरगाठ असू शकते..... तरच तुला ह्या चक्रव्यूहातून बाहेर यायला जमेल. नुसतीच आत उडी घेऊन दे-मार घे-मार केलस तर तुझा अभिमन्यू झालाच म्हणून समज!", >>>>> हा खास 'दाद टच '..
|
Aashu29
| |
| Sunday, November 04, 2007 - 3:59 pm: |
| 
|
दाद, तुझी कथा वाचताना कधी मनात नि कधी ओठांवर नकळत हासु येतं ना, कळतहि नाही ग! खास आहेस तू अगदि, तुझं लिखाण त्याहुन खास!
|
Alpana
| |
| Sunday, November 04, 2007 - 4:33 pm: |
| 
|
किती दिवसांपासुन वाट बघत होते तुमच्या कथेची..... वाटलं दिवाळी अंकातच वाचायला मिळेल आता.....लवकर पुर्ण करा प्लीज......दिवाळीला गावी जायच्या आत...
|
Daad
| |
| Sunday, November 04, 2007 - 9:43 pm: |
| 
|
आयटीगर्ल, पीसलिली, वृश, अजय, प्राजक्ता, आशू, अल्पना.... अरे, काय मस्त वाटलं तुमचा अभिप्राय वाचून!, thanks heaps . अजय, बिनशर्त कबूली- प्रत्येकवेळी शीर्षक लिहिताना माझ्या हेच मनात येत. मी यापूर्वी विचारलाय हा प्रश्न, मॉड्सनाही. आता, कुणीतरी मला खरच मदत करा रे (आणि गं). देवनागरीत शीर्षक कसं लिहायच? काहीतरी सोप्पं असणार पण मला कळत नाहीये, खरच
|
अग तु शिर्षक लिहायचा वेळेस इंग्रजी मधुन लिही अन परत डेव्ह २ टैग लाव जसे \ dev2{Ukal} फक्त \ नंतर ती स्पेस देउ नको. एकत्रच लिही.
|
Akhi
| |
| Monday, November 05, 2007 - 4:36 am: |
| 
|
मस्त......... पुढच्या post ची वाट बघतेय............
|
Daad
| |
| Monday, November 05, 2007 - 4:53 am: |
| 
|
है शाब्बास, केदार! thanks heaps यापुढची शिर्षकं महराहाटीहीतहच!
|
उकल असे लिहावे ukal . Hope that helps!
|
Daad
| |
| Monday, November 05, 2007 - 5:02 am: |
| 
|
पाच आठवड्यांनी आज पहिल्यांदा गिरिश पूलवर निघाला होता. त्यादिवशी पाच मिनिटांत येतो सांगून गेलेला एकदम हॉस्पिटलमध्येच गेला. दोनच रस्ते सोडून एका बंगल्यातल्या कुणीतरी चुकून वेगात गाडी रिव्हर्समध्ये बाहेर काढली. फुटपाथवर धावणारा गिरिश उडवला गेला आणि उजवा पाय आणि डावा हात फ़्रॅक्चर करून बसला. एकतर आधी शुद्धीवर यायलाच दोन दिवस लागले. सुनीताचा जीव अर्धा झाला होता. आई-तातांना तिने जबरदस्तीने घरी पाठवलं. दोघेही हार्ट पेशंट्स. त्याचे विद्यार्थी, मित्र सगळे येऊन जात होते.... धावून धावून सगळ्यांनी मदत केली. पायाचं ऑपरेशन करावं लागलं. सगळं स्थिरस्थावर होऊन घरी यायला आठवडा लागला. घरी आल्यावरही गाडी रूळावर यायला बरेच दिवस लागले. नुसता विचार करायचा तर पळून येणार्या ह्या पात्राला बैठे प्रकार जरा जडच गेले. थोडी चिडचिड, वैताग. ऑपरेशनची जखम भरून येणं, फिजिऑच्या वार्या, कधी फिजिओचे व्यायाम करायचा कंटाळा, कधी आदल्या दोन दिवसांचा आणि दुसर्या दिवसाचाही व्यायाम आजच करायचा, प्लास्टरवाल्या पायचा पिलर घेऊन स्वयंपाकघरात काम करण्याचा हट्ट, मग तिला स्वयंपाक शिकवण्याचा प्रयत्नं, तिच्या आमटीच्या पातेल्यात पातळ आमटी म्हणून सूर मारण्याची acting करताना तोल गेला, बाकी काही नाही पण खोक पडली डोक्याला मागे. लवकर लवकर सगळं करता यायला पाहिजे या फंदात तो क्रचेस नीट न वापरता चालायचा. मग धडपडायचा. फिजिओथेअरपिस्ट बाई शेवटी सांगून गेली तिलाच... की गिरिशने नीट लक्ष दिलं नाही तर त्याच्या रिकव्हरीला खूप जास्तं वेळ लागेल. शिवाय तो क्रचेसचा वापर नीट करत नाहीये. नको त्या मसल्सवर जोर येऊन त्यांच्यावर करेक्टीव्ह थेरपी करायला लागेल, लवकरच. सुनीताने सांगितलं, आठवण केली की ऐकायचा.... स्वत:चा स्वत: असला की ये रे माझ्या मागल्या! क्रचेस घेऊन चुकीचं चालताना दुखायचच, मग तोंड वेडीवाकडी करायचा. सगळेच विद्यार्थी येऊन जायचे, गप्पा मारून जायचे. चिन्मयही आई-वडिलांबरोबर येऊन गेला एक्-दोनदा. पोर जमली की गिरिश खुष असायचा. क्रचेसवर चालत चहा-कॉफी वगैरेचा गोंधळ घालायचा. ..........पण त्या सगळ्यातून पार पडून आज शाळेच्या पहिल्या दिवसासारखा पूलवर निघाला होता. अजून कोचिन्गसाठी पोहता येणार नव्हतं. पाण्यात उतरायला परवानगी नव्हती. पण.... जाण्याचा, मुलांना भेटण्याचा उत्साह प्रचंड होता. नुसती गडबड चालली होती. माझं हे घेतलस का, ते विसरशील, क्रचेस कुठेत, चल लवकर, उशीर झाला, मुलं वाट बघत असतील, तिसरी बॅच चालूही झाली असेल.... एक ना दोन! स्वत्: मानसोपचारतज्ञ नसती ना, तर सुनीताला वेड लागलं असतं सकाळी उठल्यापासूनच्या दोन तासात. जरा शांतपणे सगळं आवरू म्हणून, शेवटी त्याला तिने आधी गाडीत जाऊन बस एक शब्द न बोलता, म्हणून पिटाळला. तरी शेवटी गाडीत बसल्यावर तो मागच्या सीटवरून काही सांगू जाणार तोच तिने अल्टिमेटम दिला, 'गिरिश, हाताची घडी आणि तोंडावर बोट. चूप एकदम. मी सगळं घेतलय काही विसरल्ये नाहीये. पूलवर पोचेपर्यंत एक शब्द बोललास तर परत घरी नेऊन सोडेन'. खरच गप्प बसला, शहाण्या मुलासारखा. गाडीतून उतरायला मदत करताना तिच्या लक्षात आलं की, हा शर्टाखाली स्वीमिंग ट्रंक्सच घालून आलाय, वर नुसता टॉवेल गुंडाळून..... पोट धरून हसताना तिचा तोलही गेला. 'अरे, पाण्यात उतरणार नाहीयेस ना? मग....' 'अग, होतेय का घालून बघत होतो.... मग तू सरळ गाडीत जाऊन बस म्हणून ओरडलीस.... मग, तेच तर सांगायचा प्रयत्नं करत होतो....., काही हरकत नाही. सुलेमानची लुंगी लावून येईन परत' असं म्हणून आपल्यामते ताठ मानेने क्रचेसवर लंगडत गेलाही.... येणारे जाणारे सगळे डोळे विस्फारून बघत होते. हुश्श करून ती कामावर जायला निघाली. खूप दिवसांनी डोक्यावर कसलही ओझं न घेता आज कामावर निघाली होती. दुपारी जरा लवकरच त्याला घ्यायला गेली आणि ऑफिसातला प्रकार बघून अवाक झाली. बाहेर सुलेमानने तिला सतर्क केलच होत. गिरिश भयंकर चिडला होता. त्याला पूलच्या कमिटीने पूर्ण बरा होऊन डॉक्टरचं फिटनेस सर्टिफिकेट आणल्याशिवाय पूलवर येऊ नकोस म्हणून सांगितल होतं. तो नुसतं मुलांचं ट्रेनिंग बघत खुर्चीवर बसतो म्हणाला, ते ही ऐकलं नाही. त्याला पूलच्या आवारातही प्रवेश नव्हता. सुनिता विचार करत होती, की तिच्या हे कसं लक्षात आलं नाही? बरोबरच आहे, एक पायावरचा हा लंगडधीन पडला, बिडला तर? केव्हढ्याला पडेल ते? ऑफिसात, खुर्च्यांमध्ये चिन्मय आणि अजून दोघे बसलेत, गिरिश एकाच कुबडीचा आधार घेऊन फेर्या मारतोय. कमिटीचा रवी रानडे कमरेवर हात घेऊन गिरिशच्या त्राग्याकडे बघतोय, दोन पोर, गिरिशच्या वाटेत येणार्या वस्तू दूर करतायत. एकच खुर्ची जेव्हा त्या बिच्चार्या पोरांनी दुसर्यांदा त्याच्या वाटेतून हलवली तेव्हा मात्र सुनिताला राहवलं नाही. ती आत आली. "अरे काय म्हणायचय काय तुम्हाला? मला नुस्तं तिथे बसायलही परवानगी नाही? जरा कुठे एक फ़्रॅक्चर झालं तर लगेच हे करू नको, ते करू नको, हळू, जपून, हे आत्ता जमणार नाही.... पाय घसरून पडेन म्हणे. आयुष्य गेलं माझं ह्या.... ह्या पूलवर. अरे, जमिनीपेक्षा पाण्यात जास्तं रहातो मी. कोणाला सांगताय?..... आ? कोणाला?".... "हो ना, अरे, दोन कल्ले असते ना तर तुला मासाच म्हटलं असतं, बिनशेपटीचा.", ती आत शिरत म्हणाली. पोरांसकट रवी सुद्धा हसला, हळूच. गिरिश तावातावाने काही म्हणायच्या आधी तीच पुढे म्हणाली, "माझाच गाढवपणा. इथल्या दमटपणाने, तुझी जखम सुकायला जास्तं वेळ लागेल असं डॉक्टरच नव्हते का म्हणाले? तेच लक्षात आलं म्हणून आले लगेच. उगीच गोंधळ नको बाबा. स्विमिंगच्या टूर्नामेन्ट्स आल्यात चार महिन्यांवर. एकदा का तू यायला लागलास की मग आजारी पडायला वेळ नाही. पोरांच्या ट्रेनिंगमध्ये खंड नको पडायला तुझ्यामुळे, चल.". तिने हात पुढे करताच चिन्मयने गिरिशची दुसरी कुबडी पुढे केली. एव्हाना गिरिश दमलाही होता आणि तसं कुठेतरी त्यालाही पटत होतच. फक्त त्याच्या "तावाला" कुठेतरी पळवाट हवी होती. "रवी, टूर्नामेंटमध्ये भाग घेतलेल्या सगळ्यांना उद्या पाठवून दे रे घरी.... आणि सतीशलाही, ते जास्त महत्वाचं. तो बिचारा करून घेतोय पोरांकडून सद्ध्या पण कॉम्पिटिशनच्या दृष्टीने कुणाकडून काय करून घ्यायचं. ते गिरिश आणि तो ठरवतील. आजच पाठव त्याला वेळ असला तर", रवीने तिच्याकडे बघत मान हलवली. आश्चर्य म्हणजे गिरिशही, "बघ हा, वाट बघतो मी, सतीशला पाठव नक्की. ए, प्रॅक्टिस चालू ठेवा रे. आणि सतीश सांगतोय ते ऐका. नाहीतर लंबे करेन एकेकाला परत आल्यावर" अस म्हणून वळला. ती गिरिशच्या मागून बाहेर पडेपर्यंत पोरांचे नि:श्वास आणि रवी धप्पकन गिरिशच्याच खुर्चीत बसलेला तिने ऐकला. क्रमश:
|
Jaijuee
| |
| Monday, November 05, 2007 - 5:52 am: |
| 
|
छान चालू आहे. तुझी कथा म्हणजे सहीच असणार! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! पुढचे भाग टाक, फराळातून वेळ मिळाला तर. वाट बघतेय. बर्याच दिवसांनी मायबोलीवर आले आहे, सगळ्यांच्याच कथा वाचून बरे वाटत आहे.
|
Psg
| |
| Monday, November 05, 2007 - 6:41 am: |
| 
|
किती छान लिहितेस गं बाई!
|
Akhi
| |
| Monday, November 05, 2007 - 7:19 am: |
| 
|
खुप छान!!!! पुढचा भाग कधी???
|
Chaffa
| |
| Monday, November 05, 2007 - 1:07 pm: |
| 
|
ये हुई ना बात......! बरेच दिवसांनी तुमची कथा आली "अब आयेगा मजा" बाकी आणखी काही स्तुती करायला शब्द नाहीत.
|
>>है शाब्बास, केदार! thanks heaps यापुढची शिर्षकं महराहाटीहीतहच! दाद, 'है शाब्बास' अस डोळ्यांना इतक छान वाटणार मराठी वाचल्यावर ते पुढच thanks heaps डोळ्यांना मला तरी फार खुपल बघ ! (२ वेळा लिहीला आहेस) 'धन्यवाद' हा एवढा काही वाईट शब्द नाहीये बाकी कथाशैली काय, सुंदर आहेच नेहमीप्रमाणे. आता मला स्तुती करायचा कंटाळा आलाय (तरी सुरवातीला मला वाटले की पहिल्यांदाच जरा सरधोपट कथा लिहीली की काय दादने. )
|
|
|