Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 23, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » ललित » बालपणीचं खाऊजगत » Archive through October 23, 2007 « Previous Next »

Sayuri
Friday, October 19, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या पाश्वात्य रेस्टॉरंटमध्ये मेन कोर्स झाल्यावर सवयीनुसार पावलं डेझर्ट/आईसक्रिम कॉर्नरकडे वळली. खरं म्हणजे ’सॉफ़्टी’ नामक फुगवलेलं, फेसासारखं दिसणारं (आणि लागणारं) ते आईसक्रिम मला मुळीच आवडत नाही. त्याऐवजी केक/पेस्ट्री/पुडिंगच मी जास्त पसंत करते (आणि अशावेळेस आपल्या शाही भारतीय मिठाया हटकून आठवतात!) आणि याही पेक्षा त्याठिकाणी हे पदार्थ सजवण्यासाठी असलेल्या नखरेल गोष्टी पहायलाच मला फार आवडतं. लालचुटूक आणि हिरव्यागार रंगांचे थरथरणारे पारदर्शक जेली क्युब्ज, चौकटींचं डिझाईन असलेली त्रिकोणी पेपर किंवा वेफरच्या जाडीची कुरकुरीत बिस्कीट्स, पाकातल्या स्ट्रॉबेरीज, चेरी, फ़्रेश क्रिम, चॉकलेट सॉस किंवा चॉकलेटचा किस, जिरागोळ्या.............

जिरागोळ्या! एकेकाळी जबरदस्त आकर्षण होतं जिरागोळ्यांचं मला. लहानपणचं ते छोटं विश्व अजून रंगीबेरंगी होण्यात त्यांचाही सहभाग होताच ना! गोल नव्हे तर अंडाकृती आकाराच्या आणि पांढरा, गुलाबी, पिवळा, केशरी, निळ्या अश्या विविध रंगात डुंबलेल्या त्या जिरागोळ्या प्रथम माझ्या हातात पडल्या त्या भातुकलीतल्या ’फ्रिज’ नामक बड्या खरेदीमुळे. त्यामध्ये ज्या चिमुकल्या बाटल्या होत्या त्या या जिरागोळ्यांनी भरलेल्या होत्या. झालं! तेव्हापासून नादच लागला. पुढे नानाविविध आकारांमध्ये भरलेल्या स्वरुपात त्या खरेदी केल्या. जिरागोळ्यांमध्ये अशी खुबी आहे की केवळ त्यांच्या असण्याने एखादी अनाकर्षक गोष्ट आकर्षक व्हावी. आणि चव गोडच असल्याने न आवडण्याचा प्रश्नच येत नाही. जिभेवर जिरागोळ्या ठेवून त्या काही सेकंद नुसत्या चघळण्यात तेव्हा आम्हाला त्रिलोकीचा आनंद मिळत असे. बाकी जिरागोळ्यांचा आतमध्ये बडीशेपेचा दाणा असताना त्यांना ’जिरा’-गोळ्या का म्हणतात हा प्रश्न आम्हाला कायम पडायचा.

पुढे अजून एका आकर्षणाशी गाठ पडली जी अजूनही अतूट आहे. एए स्वीट्सच्या (आठवल्यांच्या बहुतेक) काजूवड्या. आखीव चौकोनी आकार. पिस्ता किंवा गुलाबी रंग. पारदर्शक प्लास्टीकच्या कागदाचं वेष्टण. आणि वर मधोमध ब्रॅडनेमची सोनेरी कागदी टिकली. काजूवडी म्हणा किंवा आताच्या भाषेतली एका प्रकारची कॅंडी म्हणा, ही छबी अजूनही डोळ्यासमोर तशीच्या तशी आहे. या काजूवड्या आणि श्रीखंडाच्या गोळ्या आम्हांत एकदम पॉप्युलर होत्या. या काजूवड्यांप्रमाणेच त्या श्रीखंडाच्या गोळ्याही लागतात मस्त पण ’श्रीखंडाच्या’ म्हणाव्या तर श्रीखंडासारखी चव कुठे असते त्यांची!

शाळेत मधली सुट्टी झाली की पावलं शाळेजवळच्या वाण्याच्या दुकानाकडे वळायची. त्या वाण्याच्या 'टिपीकल' दुकानात हमखास कपड्याच्या साबणाचा वास दुमदुमत असायचा पण तिकडे कोणाचं लक्ष जातंय? तिथल्या त्या दर्शनी भागातल्या बूड टेकवून उभ्या केलेल्या गोल काचेच्या बरण्यांतल्या मेव्याकडे आम्ही आशाळभूत नजरेने पहायचो. काय नसायचं त्यात! परीकथातले हिर्‍यांमाणकांनी भरलेले पेटारे आणि बालपणातली सर्व आकर्षणं एकाच ठिकाणी बंदिस्त केलेल्या त्या पारदर्शक बरण्या आमच्या दृष्टिने एकाच पातळीवर असायच्या. रंगीत लॉलीपॉप्स, लिमलेटच्या-संत्र्याच्या फोडीचा आकार आणि डिझाईन असलेल्या केशरी-पिवळ्या गोळ्या, रावळगाव चॉकलेट्स, पॉपिन्स नामक रंगीत चघळायच्या गोळ्या (त्याचं पॉकिंग मला भन्नाट आवडायचं) यांनी तुडुंब भरलेल्या त्या बरण्या पाहून डोळ्याचं पारणं फिटायचं. पण त्याचबरोबर शेजारच्या बरणीतली 'वैद्य यांची आवळासुपारी'ही खुणावायची. मग काय घ्यायचं यावर बरोबरच्या शाळूसोबतींशी सल्लामसलत करुन चार-आठ आण्यांत गोळी किंवा त्या आवळासुपार्‍या खरेदी करुन आरामात चघळत पुढच्या तासाच्या बाईंविषयी गंभीर चर्चा केली जायची.
}
या सर्वांमध्ये अत्यंत अप्रूपाची अजून एक गोष्ट असायची. कॅडबरीज जेम्स. पण त्या म्हणजे जरा श्रीमंती, दिखाऊ आणि बाकी गोळ्यांशी तुलना केल्यास महागडं वाटावं असं प्रकरण होतं. त्यामुळे त्यांच्याशी गाठ वाढदिवसानिमित्त किंवा अभ्यास वेळेवर करण्याच्या सत्कृत्याबद्दल मिळाणार्‍या बक्षिसामार्फतच घडत असे. लाल, पिवळ्या, शेंदरी वगैरे रंगांच्या चकचकीत गोल बटाणांसारख्या त्या आकारात आतमध्ये कॅडबरीसारखं काहीतरी असायचं. अश्या त्या रंगारुपात अत्यंत आकर्षक आणि चव तर काय बोलायलाच नको अश्या प्रकारची असल्याने जेम्सचं पाकीट हातात पडणं ही एक मोठी आनंदाची पर्वणीच होती. पण त्या हवा भरलेल्या पॅकेटमधून जेमतेम १० गोळ्या निघायच्या तेव्हा अस्सा राग यायचा (अजूनही येतो :-)) पण तोंडात टाकल्यावर विरघळणार्‍या त्या सुमधुर चवीत ते विसरायलाही व्हायचं. या जेम्सचाच अजून एक राजेशाही चुलतभाऊ म्हणजे कॅडबरीज फाईव्ह स्टार. तो तर चॉकलेट जगतातील आकर्षणांतील परमोच्च बिंदू! हे कायम सामूहिक रित्याच, उपस्थित लोकसंख्येइतके भाग करुन खाण्यात आल्याने एक अख्खं फाईव्ह स्टार एकट्यानेच खाणं हे एक स्वप्न असायचं. नाही म्हणायला अमूलची चॉकलेट्सही होती पण फाईव्ह स्टारच्या त्या सोनेरी झगमगाटापुढे त्या सौम्य वेष्टणातल्या अमूलकडे म्हणावं तितकं लक्ष जायचं नाही. याशिवाय कॅम्प्को, पॅरीज ही चॉकलेट्सही जोडीला होतीच. टीव्हीवर लागणार्‍या त्यांच्या जाहिरातीही विशेष आकर्षक होत्या.

शाळेजवळ शेजारीशेजारी अशी दोन वाण्याची दुकानं होती. पैकी एकाला आमच्याकडून जास्त भाव मिळायचा. कारण त्याच्याकडे फ्रिज होता आणि फ्रिजमध्ये काय तर पेप्सीकोला (आमच्या बोलीत 'पेप्शीकोला'). आता हल्लीच्या पेप्सी आणि कोकाकोल्याच्या युद्धात हा आमचा लहानपणचा दोस्त मिळतो की नाही कोणास ठाऊक पण ऑरेंज, कालाखट्टा, मॅंगो पासून ते कॉफी, पिस्ता, केशर या स्वादांच्या दुधाळ पेप्सीकोल्याची गारेगार दांडकी तोंडाने स्स्स आवाज करत, चोखत उन्हाळ्यातल्या सुटीतल्या कितीतरी दुपारी घालवल्यात! आणि तेही खाऊन समाधान नाही झालं तर आहेच आपला कुल्फीवाला भैय्या. त्याच्याकडच्या त्या अल्युमिनियमच्या कोनातल्या कुल्फ्या खात खात कितीक कॅरम किंवा पत्त्यांचे डाव खेळलेत त्याला सुमार नाही. याव्यतिरिक्त ती बारकी चन्यामन्या आंबटगोड, मीठ लावलेली बोरं, चिंचा, पेरु, खारेदाणे वगैरे विशेष आम्हाला दिवसातल्या कुठल्याही प्रहरी खायला चालत होतेच.

दूरदर्शन आणी डीडी मेट्रो या दोन चॅनेलचंच विश्व ठाऊक असणार्‍या त्या काळात 'रसना'ची तुफान क्रेझ होती. 'आय लव्ह यू' रसना असं म्हणणार्‍या त्या पोरीची आणि रसना काठोकाठ भरलेला काचेचा मोठ्ठा जग एकट्यानेच पिणार्‍या त्या अगडबंब मुलाची जाहिरात पाहून घराघरात रसना आणण्याचा हट्ट तेव्हा होत असे. चवीला फार अलौकिक वगैरे नसलं तरी रसनाला प्रत्येक बालमनात एक स्थान होतंच. त्या जाहिरातीतल्या सुंदर आकाराच्या काचेच्या ग्लासात कोसळणारे बर्फाचे क्युब्ज बघायला भारी आवडायचं. त्याकाळातील बहुतेक वाढदिवस रसनाबरोबर साजरे केले गेले असणार या शंका नाही. आता मध्ये एकदा भारतात गेल्यावर मुद्दाम पाहिलं, रसनाची जाहिरात जाऊ देत पण मागमूसही कुठे दिसला नाही! (नाही म्हणायला जेम्स, फाईव्ह स्टार आपलं स्थान जरातरी टिकवून आहेत. फक्त किटकॅट, मंच, पर्कबिर्क असल्या आधुनिक भावंडांसोबत किती टिकतात बघायचं)

कुतुहलाने मी आमच्याच बिल्डींगमधल्या एका छोटीला विचारलं, "काय गं रसना आवडत नाही का तुला?"

"रसना? म्हणजे?" डोळे मोठ्ठे करुन तिने मलाच विचारलं.
मी काय समजायचं ते समजले. म्हटलं हल्लीच्या पिढीची आकर्षणं काय आहेत विचारुया.

यावर तिने एकेक नावं घ्यायला सुरुवात केली. मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणार्‍या त्या फक्त चॉकलेटांच्या प्रकारांची नावं ऐकून खात्री पटली, ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणतात ते हेच. लिमलेट, रावळगाव, श्रीखंडाच्या गोळ्या, जेम्स आणि फाईव्ह स्टार यावर आमची यादी संपत असे. आणि आता काय!

पठ्ठी एकही भारतीय ब्रॅंडच्या चॉकलेटचं नाव घेत नव्ह्ती. नेसले काय, टोब्लेरोन काय, किसेस काय...काय नी काय. (खरं सांगते, तो मोदकांच्या आकाराचा किसेस नामक चॉकलेटचा प्रकार मी आत्ता अलिकडे काही दोन-तीन वर्षांपूर्वी प्रथम पाहिला!) म्हटलं बरोबर आहे, बदलत्या काळात वाण्याची दुकान जाऊन मॉल्स आले मग त्याबरोबर वाण्याकडचे खाद्यविशेषही जाऊन त्याजागी देशोदेशींचे खाद्यप्रकार आले. यात नवल ते काय? हल्लीच्या मुलांना कॅडबरी ही पाण्याइतकीच कॉमन गोष्ट आहे. नुसती टॉफी किंवा कॅंडी म्हटलत तर विविध ब्रॅंडच्या, विविध आकार आणि चवीच्या अनंत प्रकारच्या टॉफीजनी मॉल्समधली शेल्फ नुसती भरली आहेत. फाईव्ह स्टार इज नो मोअर अट्रॅक्शन नाऊ बट इज जस्ट अनादर चॉईस!
मॉल्समधल्या खाऊने लगडलेल्या त्या भिंती मला अंगावर येतायत की काय असं वाटतं. हिंडून थकल्याने पावलं थबकतात आणि तिथेच एक आईसक्रिमचा कोन खरेदी केला जातो.

पण नेमक्या त्याच क्षणी अल्युमिनियमच्या साच्यातल्या, मिठाची किंचीत चव लागणार्‍या, आटीव दुधाच्या चवीच्या त्या मटका-मलई कुल्फीची चव मला आठवते...! फार त्रास होतो!!


T_pritam
Saturday, October 20, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सयुरी, मस्त लिहिलय... लहानपण आठवलं एकदम... पूर्वी महीन्याच्या शेवटी आई पगाराहुन येताना नेहमी आमच्यासाठी कडबरी घेवुन यायची...

Itgirl
Saturday, October 20, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिल आहेस ग सायुरी :-)
पुणे विद्यापीठात माझी एक मैत्रीण शिकायची आणि तिथल्याच वसती गृहात रहायची, तिला भेटायला गेल की तिथल्या कुल्फ़ीवाल्याकडून कुल्फ़ी घेऊन खायला खूप मजा यायची, कुल्फ़ीचा आकार, किती रुपयाची कुल्फ़ी घेतली त्यावर ठरे, Rs.1/-, Rs.3 किंवा Rs.5/ नेहमी एक किंवा तीन रुपयाची खायचो, ऐश करायला पाच रुपयाची :-) इथे बेंगलोरला मिळतच नाही अशी कुल्फ़ी :-(


Swasti
Sunday, October 21, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी सहीच !!!!!!!

आम्ही लहान असताना शेजारच्या काकु श्रीखंडाच्या वड्या द्यायच्या . त्यानंतर तशा वड्या खल्ल्या नाहीत . नंतर एकदा दादरच्या शिवाजी मंदिर बाहेर वड्या मिळाल्या , पण तशा नाहीत . आत ऑफ़िसमधे एक मैत्रीण आणते पण त्याही तशा तोंडात विरघळणार्‍या नसतात :-(

आणखी एक चॉकलेट आठवलं , पारलेचं ' किस्मी '. हल्ली एकदा FOOD BAAZAR मध्ये अचानक अर्धा किलोच pack सापडल . दुसर्‍या दिवशी office मध्ये सगळे तुटुन पडले . drawer मधली kisses तशीच राहिली .

आम्ही लहान असताना बाबा नेहमी त्यांच्या पगाराच्या दिवशी Bourbon biscuits आणायचे पुठ्ठ्याच्या pack मध्ये मिळणार्‍या त्या बिस्किटांची चव आताच्या प्लास्टिक wrapper वाल्या बिस्किटांमध्ये नाही .


R_joshi
Monday, October 22, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सयुरी ... "लहानपण दे ग देवा" असे म्हणावेसे वाटले. फारच छान लिहिलेस:-)

Prajaktad
Monday, October 22, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी जिरागोळ्यांचा आतमध्ये बडीशेपेचा दाणा असताना त्यांना ’जिरा’-गोळ्या का म्हणतात हा प्रश्न आम्हाला कायम पडायचा.
>>>त्याच्या शेपमुळे असेल... आम्ही त्याला बडिशोपच्याच गोळ्या म्हणतो.ऽजुनही आणते मी त्या...(आता लेकिसाठी!)
जिरागोळी (ज्यात खरच जिरे असतात ती) म्हणुन वेगळी गोळी खायचो(लोकल मेड)....
असो!मस्तच लिहलय.. मेलडी आठवते का कुणाला? सही चॉकलेट होत ते.ऽजुनही असेल...
लहानपणीच्या खाउजगतात अजुन एक अविभाज्य घटक म्हणजे पोंगे


Dineshvs
Monday, October 22, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी छान लिहिले आहे. जिरागोळ्या बहुदा तुमच्याकाळी इतिहासजमाच झाल्या होत्या. या गोळ्या कोकमापासुन करत आणि आत जिरे असे. या खाऊन जिभ लाल व्हायची.

रावळगावची तर चवच न्यारी होती. तहान लागु नये म्हणुन, मिळायच्या त्या लिमलेटच्या गोळ्या. संत्र्याच्या फ़ाकीच्या आकाराच्या पण छोट्या गोळ्या. केशरी असत त्या संत्र्याच्या स्वादाच्या आणि पिवळ्या असत त्या लिंबाच्या स्वादाच्या.
रसनाचे वितरण आधी व्होल्टासकडे होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक स्वादाची चव घेतली आहे मी. काला खट्टा, जास्त आवडते. फारसे लोकप्रिय नसणारे, खस आम्ही उन्हाळ्यात खास पाणी सुगंधी करण्यासाठी आणतो.

पेप्सी ऑफ़िशियली भारतात यायच्या आधी, ती पेप्सीची नळकांडी प्रसिद्ध होती. आता त्यात दुध असलेला प्रकार मिळतो. अजुनही लांबच्या एस्टीच्या प्रवासात, तो प्रकार खुणावतो.
बिस्किटांमधे ग्लुकोज आणि मोनॅको जास्त फ़ेमस होती. कुणाच्याही घरी जाताना, लहान मुलांसाठी ग्लुकोजचा पुडा आवर्जुन घेतला जात असे. ( मग आमच्या प्रोफ़ेसरानी सांगितल्याप्रमाणे ) एकदा चुकुन या दोन्हीचे मिश्रण झाले, म्हणुन त्या बिस्किटाना क्रॅकजॅक म्हणु लागले.

छान वाटले, हे सगळे आपल्यासारखेच अनेकजणाना आठवतेय ते बघुन.


Skdeep
Monday, October 22, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरेच खूपच छान लिहिलय लहानपणी गाडीवर मिळणार्या बर्फाच्या गोळ्याची पन आठवण झाली गोळेवाला त्याच्या हातगाडी वरच्या सरबतान्च्या रन्गीबेरन्गी बाटल्याअ बर्फ किसायाचे मशीन त्याचा सरबताने रन्गीत झालेला हात सगळे अगदी डोळ्यासमोर आले तीच गोष्ट ऊसाच्या रसाची मला अजूनही ऊसाचा रस प्यायला फार आवडतो आमच्या शाळेसमोर पार्ल्याला एक ऊसाचा रगडा होता तिथल्या ऊसाचा रसाचि चव अजूनही तोन्डावर आहे तिथे आम्ही लहान असतना एक मुका माणूस कामाला होता, हल्ली दिसत नाही

Manuswini
Monday, October 22, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीरा गोळी माझी एकदम फ़ेव.मग पेप्सी कोला,रसना वगैरे.
मोनॅकोचा अक्खा पुडा मी दूधाबरोबर संपवून टाकायची :-)
champion ची cream biscuits खुप फ़ेमस होती तेव्हा. ते दूधात बुडवून काय लागत.
मग bournbourn मस्त होते.
तो टूटी फ़्रूटीचा ब्रेड पण मस्त लागयचा.


Tiu
Monday, October 22, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टूटी फ़्रूटीचा ब्रेड... अगदी अगदी! मला पण फार आवडायचा. :-)

आणि ते जीरा बटर... आम्ही त्यात चमचा खुपसुन चहात बुडवुन ठेवायचो. एकदम नरम व्हायचं. आणि मग बशीत घेउन खायचो. बटर असले की आई जास्त चहा करायची. कारण चहा संपुन जायचा बटर बुडवुन ठेवल्यामुळे. मग चहाचा दुसरा round . :-) आता तसं खायला लाज वाटते!

मी तिसरी चौथीत असतांना, म्हणजे जवळ जवळ सोळा सतरा वर्षांपुर्वी शानदार नावाचं एक चॉकलेट मिळायचं. आता मिळतं की नाही काय माहीत नाही. छोट्या फाइव्ह स्टार सारखा बार असायचा. त्याची चव मला इतकी आवडायची नाही पण तरीही मी रडुन, हट्ट करुन तसले चार चार बार घ्यायला लावायचो आईला. ४ की ५ शानदार घेतल्यावर एक प्राण्यांचं पोस्टर मिळायचं फ्री! :-) जंगलातले हत्ती, चित्ते, वाघ, हरिण...सगळे पोस्टर जमा केलेले!

Thanks सायुरी :-)


Supermom
Monday, October 22, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच ग सायुरी.
लहानपणी सोमलवार शाळेत असताना मधल्या सुट्टीत एक म्हातारी बाहेर बसलेली असे. उकडलेली बोरे हे तिच्याजवळचे खास आकर्षण होते. अगदी तीन पैशापासून ते पंचवीस पैशापर्यंत ती बोरे मुलं मुली सारेच घेत. त्यावर ती किंचितसे खडेमीठ नि बोरकूट शिंपडून देत असे. त्या मिश्रणाची चव फ़ारच छान लागायची तेव्हा.

बाजूलाच चूरनवाला बसत असे. त्याच्याजवळचे रंगीबेरंगी प्रकार घेऊन कागदावर चाटत बसायला इतके आवडायचे तेव्हा. पण आता भारतात गेल्यावर माझ्या मुलांना ते चूरन घेऊन द्यायची हिम्मत होईल की नाही कोण जाणे.


Farend
Monday, October 22, 2007 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी फारच सुंदर लिहिले आहे. सगळ्या आठवणी एकदम जाग्या झाल्या. आम्हीही त्या गोळ्यांना बडीशेप च्या गोळ्याच म्हणायचो (माझी मुलगी त्यालाच बडीशेप म्हणते :-) ). बेकरी टाइप दुकानांच्या जवळ एक प्रकारचा वास येत असे, अजूनही कोठेही तो वास आला की आमच्या शाळेकडून बस स्टॉप कडे जाताना लागणार्‍या एका बेकरीची आठवण येते. आणि बर्फाचा गोळा (वरती skdeep ने लिहिलेला) कसा विसरलीस? त्याची सर जगातल्या कोणत्याही आइस क्रीम ला येत नाही. मला चॉकोलेट्स विशेष आवडत नाहीत, फक्त ५-स्टार सोडून, अजूनही भारतात गेलो की ते घेतोच (येथे मिळत असून सुद्धा). तशी ती निळ्या वेष्टणातील एक चौकोनी तुकडे करता येणारी 'कॅडबरी' असायची, बहुधा ५-स्टार पेक्षा जरा स्वस्त. कॅडबरी म्हणजे चॉकोलेट नसून तो फक्त एक ब्रॅंड आहे बरेच नंतर कळाले.

मस्त लेख!


Atul
Monday, October 22, 2007 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही शाळेत असताना RK फाईव फ्रूट नावाचे एक फ्याड आले होते. एका जेम्स सारख्या पाकिटात पाच टॉफ्या असायच्या. १ रुपयाला ते पाकिट मिळत असे. त्या पाकिटात मिळनार्या चित्रान्च्या कलेक्शन चा पोरान्ना छन्द होता. ही वाईल्ड लाईफ ची चित्रे असत, सगळी मिळून ५०-५५ प्राण्यान्ची चित्रे होती. त्यान्चा एक अल्बम करुन RK ला पठवला की एक फालतू गिफ़्ट मिळत असे, हे गिफ़्ट म्हणजे आपला पत्ता असलेली ४०० का ५०० ग्रीटीन्ग कार्ड्स. :-). ती सगळी चित्रे जमवता जमवता जितके पैसे खर्च होत असतील तितक्या पैश्यात त्या ग्रीटीन्ग कार्ड्स पेक्शा लाख पटीने चान्गली वस्तू विकत मिळाली असती. त्या टॉफ्या ठीकठाक असायच्या पण ती चित्रे अजुनही आठवतात :-)

Monakshi
Tuesday, October 23, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Skdeep पार्ले टिळक शाळेजवळचा म्हणताय ना हो उसवाला?

मस्तच वाटायचं त्याच्याकडे. शाळा सुटल्यावर ज्या मैत्रिणी बस ने जायच्या त्यांच्याबरोबर आम्ही बसकरता थांबत असू आणि त्यावेळी हाफ ग्लास मारत असू. :-) तो बसस्टॉप म्हणजे आमचा TP चा अड्डा होता. :-)



Alpana
Tuesday, October 23, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच रावळगाव सारखी चव कुणाचीच नव्हती. १५ पैशाला एक असे मिळायचे.. आम्ही तर त्यांना पण चॉकलेटच म्हणायचो..... बर्फ का गोला तर आत्ता आत्ता कॉलेजमध्ये असेपर्यंत खात होते..... अजुनही कुठल्याही प्रदर्शनात गेले की तिथे असलेल्या बर्फ का गोला चा स्टॉल शोधत असते.. तेच चुरणच्या बाबतित...अगदी परवा सोनीपत जवळ एका ढाब्यावर जेवायला गेलो... जेवण झाल्यावर मी आपली शेजारच्याच चुरणच्या स्टॉलवर गेले.. नव़रा डोळे मोठे करुन बघत होता तरीपण....अर्थात हल्ली त्यांचे ही ब्रॅंडस निघालेत....
मेलेडीची जाहिरात पण मस्त असायची..." मेलेडी है चॉकलेट डी" अशी काहीतरी..... अश्यात दुकानात दिसली नाही कुठे..

Sush
Tuesday, October 23, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेलडी अजुनही मिळते.
त्या दिवशी मायबोलिवरच कुठेतरि लिहिताना त्याची आठवण झाली आणि घरी जाताना एक दोन दुकानात विचारली. exact आठवत नाहिये पण दिड्- दोन रुपयांना मिळते. टेस्ट अजुनहि तशीच आहे. पण पार्ले नाहि मिळाले कुठेही. पुण्यात अजुनही पेप्सीकोला, बडिशेप्च्या गोळ्या सगळं मिळतं.


Dineshvs
Tuesday, October 23, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिरागोळी आता जरा वेगळ्या रुपात म्हणजे द्राक्ष वटी वैगरे नावाने मिळते, त्यात कच्ची कैरी वैगरे फ़्लेव्हर्सही असतात.
पुर्वी बर्फ़ाचा गोळा इतका लोकप्रिय होता कि सुमीत मिक्सरच्या रेसिपी बुकमधे त्याची रेसिपी होती. त्याचे मिन्स ब्लेड वापरुन बर्फ़ाचा चुरा करता येत असे. अजुनही तो मिळतो म्हणा, पण आता त्या सरबताच्या रंगांची खात्री वाटत नाही.
या गोळ्याचे एक शाहि व्हर्जन मलाई गोला म्हणुन मिळते. वाशीला बिग बज़ारच्या फ़ुड कोर्टमधे तो छान मिळतो. भरपुर वेळ लागतो खायला तो.


Sayuri
Tuesday, October 23, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद. दिनेशदा, खर्‍या जिरागोळ्या कोकमाच्या असतात होय! मस्तच लागत असतील त्या, निदान कोकणात तरी अजून मिळत असतील का?
हं..बर्फाच्या गोळ्यासारख्या अमूल्य गोष्टीला मी विसरलेच की! त्यातल्या त्यात लेटेस्ट म्हणजे मागच्या वर्षी मी मुलुंडच्या आर मॉल मध्ये तिसर्‍या मजल्यावर खालेल्ला एकदा..पण लहानपणची मजा नाही आली


Sashal
Tuesday, October 23, 2007 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी छान लिहीलं आहेस ..

लहानपणीच्या अजून काही आठवणी म्हणजे फ़क्त दोन रुपयाला मिळणारी भेळ आणि शेवपुरी आणि काबुली चण्यांची भेळ .. ती तर १ रुपयाला किंवा आठ आण्यालाच मिलायची बहुतेक ..

ते चूरन, एक लाल चूरन आणि एक काला चूरन असं मिळायचं आमच्याकडे .. आणि मग नंतर ऐकलं की काला चूरन खाल्लं तर कँसर होतो म्हणून ..


नुकतीच कॉलेजला जायला लागल्यावर Bandra च्या Linking Road शी ओळख झाली आणि मग तिकडे मिळणारी फ्रँकी खूप आवडायला लागली .. दहा रुपयांना मिळायची व्हेज फ्रँकी ..


Madhura
Tuesday, October 23, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लेख.किती आठवणी जाग्या झाल्या. आम्ही लहानपणी चिंच गुळ आणि इतर काही घटक पदार्थ एकत्र कुटुन ते lollypop सारखे खायचो. नाव आणि नीट कृती आता आठवत नाही. कुणाला हा पदार्थ आठवतोय का?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators