|
Chaffa
| |
| Wednesday, October 17, 2007 - 7:46 am: |
| 
|
दोष...........! ********* एकमेकांच्या गळ्यात हार घालताना प्राजक्ता आणि हिमांशु आगदी मोहरुन गेले होते. सह्या करायच्या फ़ॉर्मेलिटीज पुर्ण होवुन दोघेही पती पत्नी झाले होते. गेली पाच वर्षे जोपासलेल्या त्यांच्यातल्या नात्याला आता अर्थ आला होता. त्या सोनेरी क्षणात दोघेही आणखी काही वेळ रममाण झाले असते पण हिमांशुचे मित्र आणि प्रजक्ताच्या मैत्रिणींनी वाजवलेल्या टाळ्यांनी ते भानावर आले. सर्वजण हॉटेल लकीस्टार कडे रवाना झाले लग्नाप्रत्यर्थ मित्रमैत्रीणींसाठी ठेवलेल्या पार्टीसाठी, मैत्रीणींच्या खट्याळ बोलण्याने लाजुन चुर होत प्रजक्ता हिमांशुकडे एखादा कटाक्ष टाकत होती आणि त्यावरुन हिमांशुचे मित्र त्याला पिळत होते. हसत्या खेळत्या वातावरणात पार्टी उशिरापर्यंत छान रंगली. सगळ्यांनी नवपरीणीत जोडप्याला शुभेच्छा देउन निरोप घेतला. आणि दोघेही घरी जायला निघाले त्यांच्या स्वःतच्या घरी. प्राजक्ता आणि हिमांशुची ओळख तशी जुनीच दोघेही एकाच बसस्टॉपवर बस पकडण्यासाठी येत, एकाच रुटचे ते प्रवासी होते. संघ्याकाळीही बरेचदा एकाच बस मध्ये असत त्यामुळे दोघांनाही एकमेकांची ईतकी सवय झाली होती की एखाद्या दिवशी कुणी एकजण आलं नाही तर दुसरा काळजी करत दिवस घालवत असे. यातुनच ओळख वाढली ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले पण हे प्रेम अंधळे नव्हते दोघेही एकमेकांचे स्वभाव ओळखुन होते. प्राजक्ता मनमोकळ्या स्वभावाची तर हिमांशु थोडासा रिझर्व, तिला कविता, कथा असल्या साहित्यात गुरफ़टुन जायला आवडायचे तर त्याला नेहमी सद्य परिस्थीतीची काळजी, त्यामुळे दिवसाचे वर्तमानपत्र याखेरीज तो काही आवांतर असे वाचायचा नाही, स्वप्ने रंगवणे हे तिला आवडायचे तर स्वप्न साकारताना कोणत्या अडचणी येतील याचा सविस्तर आढावा तिला द्यायचे हे त्याचे आवडते काम. आवडींच्या बाबतीत दोघेही आगदी दोन टोकांचे होते पण त्याचे प्रॅक्टीकल रहाणे तिला बरेच वाटायचे स्वप्न नुसती पाहुन कधी खरी होत नाहीत तर ती खरी करण्यासाठी प्लनिंग, मेहनत करावी लागते हे तर उघड आहे. पण बहुतांशी एकमेकांच्या विरुध्द स्वभावाच्या दोघांचे एकमेकांशी छान पटते हे त्यांच्या बाबतीत एकदम सत्य होते. अशीच भावी आयुष्याची स्वप्ने पहाताना तिने घराचा विषय काढला म्हणजे घर कसे असावे आपण ते कसे सजवुयात असला स्त्रीसुलभ विषय होता तो, आर्धातास ती एकटीच बडबडत होती हिमांशुकडुन साधा हुंकारही ऐकु येत नव्हता याची जेंव्हा तिला जाणिव झाली तेंव्हा तिने थोड्याश्या रागानेच त्याच्याकडे पाहीले तर तो मान खाली घालुन हातातल्या भेळेच्या कागदावर काहीतरी खरडत होता. त्याच्या हातातला कागद तिने रागानेच हिसकावुन घेतला आणि एक नजर टाकली तर आश्चर्याचा धक्काच बसला तिने वर्णन केलेल्या तिच्या स्वप्नातल्या घराचेच ते चित्र होते आणि बाजुला त्यासाठी लागणार्या खर्चाचा हिशोबही मांडला होता बारकाव्यां सहीत. हे आपलं घर तु म्हणतेस तसं माझ्या पगाराच्या आधारावर मी इतके मोठे कर्ज नाही गं घेउ शकत, त्याच्या डोळ्यात आता आर्त भाव होते. जणु तिचा हट्टही छोटासाच होता आणि तो पुरवु शकत नसल्याने तो स्वःतला असमर्थ समजत होता. प्राजक्ताने तो कागद पुन्हा पुन्हा वाचला आणि तिच्याही लक्षात आले की आपण पहात असलेले स्वप्न सत्यात उतरणे शक्य आहे फ़क्त हिमांशुला साथ द्यायला हवी. एका साध्यशा घटनेने त्या दोघांचे आयुष्य बदलुन गेले आपले स्वःत चे घर या एकाच कल्पनेने दोघांअनाही झपाटुन टाकले, आपापल्या पगारावरुन दोघांनीही यथाशक्ती कर्जे घेतली. त्यांच्या बजेटमधे बसुशकेल अशी जागा शोधायचे काम हिमांशुने आधिच केले होते. जागा थोडी शहरा बाहेर एकांतात होती पण प्रजक्ताने काही कुरकुर केली नाही कारण तिला हिमांशुच्या अभ्यासु स्वभावाची पुर्ण जाणिव होती. आता तिथल्या त्या ओबडधोबड मातीत एक वास्तु साकारु लागली त्यांची वास्तु, दोघांचे घर. यथावकाश घर पुर्णही झाले. हिमांशुच्या अंदाजाप्रमाणे त्यांच्या घराच्या आजुबाजुला नव्या नव्या कॉलनी तयार होत होत्या. घर तयार होतानाही हिमांशुने आपला व्यवहारी दृष्टीकोन कायम ठेवला होता. शक्य तितकी काटकसर केली होती पण दर्जा मात्र उत्तम ठेवला होता. घराचे संपुर्ण काम होईपर्यंत त्याचे तिथे कायम येणे जाणे चालु होते. त्यामुळेच घराचा खर्च त्यांच्या आवाक्यात राहीला नाहीतर कुठे आजकाल घर ते ही इतके व्यवस्थीत इतक्या कमी खर्चात बांधुन होते. आपले घर होईपर्यंत लग्न करायचे नाही हे दोघांनी ठरवले होते. आणि तसाही घराच्या कामात व्यग्र राहील्याने हिमांशु प्राजक्ताला फ़ारसा भेटू शकत नव्हता. त्यामुळे त्यांच्या लग्नाला इतका उशिर झाला. दोघांचेही या जगात कुणी नव्हतेच त्यामुळे परवानगी घेणे वगैरे सोपस्कार करण्याचा प्रश्नच नव्हता. आणि आज त्या दोघांचे स्वप्न पुर्ण झाले होते लग्न करुन आज ते त्यांच्या घरी निघाले होते. गाडी थांबल्यावर विचारातुन भानावर येत प्राजक्ताने हसुन हिमांशुकडे पाहीले. तो तिला घरात चलण्याची खुण करत होता, ती पायर्या चढेपर्यंत तो आतही निघुन गेला, त्याच्या या असल्या वागण्याचे तिला आश्चर्य वाटल्याशिवाय राहीले नाही. पण दारात पाउल टाकताच तिच्या सगळ्या शंका दुर होवुन तिच्या चेहर्यावर सुर्योदयी हसु फ़ुलले. दारात तांदळाने भरलेले माप ठेवलेले होते. ........ दिवस,महीने कधी सरले कळलेच नाहीत पण आजकाल हिमांशुचे काहीतरी बिनसल्यासारखे प्रजक्ताला वाटत होते. इतक्या इतक्या गोष्टीवरुन त्रागा करण्याची त्याची सवय नव्हतीच पण आजकाल तो असा वागायला लागला होता खरा. दोघेही नोकरीमुळे दिवसभर घराबाहेर असत त्यामुळे दोघांना एकमेकांसाठी वेळ फ़ारसा मिळायचा नाही याबद्दल आधी दोघांच्यात चर्चा झाली होती आगदी ती सुरु करणाराही हिमांशुच होता. तीने नोकरी सोडावी का? या प्रश्नावर उत्तर असे शोधायची गरज नव्हतीच कारण घराचे कर्ज अजुन संपले नव्हते. पण हिमांशुच्या वागण्यातला फ़रक तिला जाणवायला लागला होता, कधी तिला यायला उशिर होतो म्हणुन कधी ती लवकर झोपी जाते म्हणुन त्याचा राग उफ़ाळुन येइ, मग कुठेतरी कुढत बसण्याखेरीज ती काहीही करु शकत नव्हती. जोपर्यंत हे इतपतच होते तिथपत तिने कदाचीत समजुन घेतलेही असते कारण माणसाचा मुळ स्वभाव काही तास त्याच्याबरोबर काढल्याने कळत नाही तर त्यासाठी त्याचा सततचा सहवास गरजेचा असतो. पण आजकाल त्याचे वागणे आणखी बदलायला लागले होते. ज्या दिवशी त्याचा शर्ट धुवायला घेताना तिला त्यात सिगारेटचे पाकीट सापडले तेंव्हा तिला पहिला धक्का बसला, हिमांशु हा काही छंदी फ़ंदी माणुस नव्हता व्यसनामागे पैसा खर्च करणे म्हणजे त्याला तो वाया घालवणे असेच वाटायचे आणि आता त्याच्या खिशात सिगारेट? तिने त्याच दिवशी त्याला त्याबद्दल विचारले, तिला वाटले होते की तो आढेवेढे घेईल मित्राचे आहे असे काहीतरी उत्तर देईल पण तिचा समज साफ़ चुकीचा निघाला त्याने ते सरळ मान्य केले आणि वर " मला तेवढीही मोकळीक नाहीये का?" असा खडा सवाल टाकला. हळुहळु त्याचे सिगारेट ओढणे तिच्या समोरही चालु लागले तो दारुही पित असावा असा तिला आजकाल संशय यायला लागला होता. तो खराही ठरला एक दिवस झिंगत घरी आलेल्या हिमांशुने न बोलता तिच्या प्रश्नाचे उत्तर देउन टाकले होते. त्याच्या अशा वागण्याचे तिला एकीकडे नवल वाटत होते एकीकडे आश्चर्य! माणसाच्या वागण्यात बदल होतो पण तो ईतका? दोन दोन दिवस घरीच बसुन मित्रांना बोलाउन पत्ते खेळण्याच्या त्याच्या सवयीने तिच्या सगळ्या समजुतींचा आणि अपेक्षांचा कडेलोट केला होता. आजकाल तिच्या मनावरचे हे दडपण तिच्या वागण्यातही जाणवायला लागले. सगळ्यांशी हसुन खेळुन रहाणारी प्राजक्ता आता एकटे रहाणे पसंत करु लागली कामातही ल्क्ष लागेनासे झाले. या सगळ्या बदलाकडे तिचे लक्ष नसले तरी तिच्या सहकार्यांच्या नजरेत ते आले होतेच. तिच्या मैत्रीणींनी तिला खोदुन खोदुन विचारले तरी ती सांगत नव्हती पण गप्प रहाण्यालाही काही मर्यादा असतातच ना! एक दिवस या सगळ्या दुःखाचा भार सहन न होवुन तिने आपले मन एका मैत्रीणीकडे मोकळे केले. अर्थात ती तरी काय करु शकणार होती म्हणा! पण तेवढेच मन मोकळे झाल्यासारखे वाटले ईतकेच. बातमी पसरायची ती पसरलीच तिच्या ऑफ़िसमधे. अश्यावेळी सल्ले देणार्याची संख्या बरीच असते. मदत तर होण्यासारखी नसते पण सल्ले कधी आवरल्या जात नाहीत पण अपवाद फ़क्त प्राजक्ताचा बॉस, त्याला दोघांच्याही स्वभावाची जाणिव होती तिच्या पेक्षा चार पावसाळे जास्त बघितल्याने त्याचा सल्ला अनुभवी होता. त्याने हिमांशुला घेउन काही दिवस बाहेरगावी हवापालट म्हणुन जाउन रहायचा सल्ला दिला, तिला न विचारताच तिची सुटी मंजुर करुन टाकली. प्रश्न सुटीचा नव्हता सुटी घेउन बाहेर जाण्याचा होता एखाद्या हिलस्टेशनवर जाउन रहाण्यात खर्च बराच झाला असता. आत्ता ते परवडणारे नव्हते. योगायोगाने हिमांशुच्या एका मित्राने आपले आई-वडील गावाहुन शहरात नुकतेच आणले होते त्यामुळे त्याचे गावातले घर रिकामेच होते आणि तिथे जाउन रहाण्यासाठी त्याने हिमांशुला आग्रह केला. सहसा अश्या आग्रहाला प्रतीसादही न देणारा हिमांशुही कसा काय तो तयार झाला. आपापली आवराआवर करुन दोघे बाहेरगावी जायला निघाले खरे, पण प्राजक्ताच्या मनात अजुनही धास्ती होती की जर परक्या गावी जाउन हिमांशु असा बेताल वागायला लागला तर? किती मोठी नामुष्की आली असती त्यांच्यावर. आज सहज आपल्या घरी जाउन रहा म्हणणारा त्याचा मित्र? त्याचे हे गाव म्हंटल्यावर त्याची इमेज खराब होण्याचीही शक्यता होती......... पण तिची भिती फ़ोल ठरली हिमांशु पुन्हा पहील्यासारखा वागायला लागला निदान तिथे तरी त्याने आपला एकही दुर्गुण दाखवला नाही. जुनी जाणती मंडळी सल्ले देतात त्यामागे त्यांचा काहीतरी अनुभव नक्की असतो बरा-वाईट कसाही तो आपल्या उपयोगी पडू शकतो. प्राजक्ता हाच विचार करत होती. तिचा जुना हिमांशु तिला पुन्हा गवसला होता. सुटी तर भुर्रकन संपुन गेली. वाढीव रजेसाठी दोघांनीही आपापल्या ऑफ़ीसमधे फ़ोन लावले होते सात-आठचे पंधरा-विस दिवस होवुन ते कसे संपले ते ही कळले नाही. दोघांनीही मनसोक्त एंजॉय केले आणखीही काही दिवस रहाण्याची तिची ईच्छा होती पण हिमांशुच्या व्यवहारी मनाला ते पटले नाही पण कशी का होईना एकदाची गाडी रुळावर आली या आनंदात तिनेही जास्त कुरकुर केली नाही आणि अखेरीस ते परतले पुन्हा आपापल्या चाकोरीत रुळण्यासाठी. सुटीवरुन परत आल्यावर काही दिवस ठिकठाक गेले पण पुन्हा.......... ! हिमांशुचे वागणे पुर्वपदावर गेले तेच ते दारु पिणे, जे उडाणटप्पु मित्र त्याने आता जमवले होते त्यांचे पत्त्यांचे अड्डे पुन्हा पहील्यासारखे घरात बसायला लागले. त्याच्यातल्या या पुन्हा झालेल्या बदलाने प्राजक्ताला आश्चर्य वाटल्याखेरीज राहीले नाही. सहनशक्तीलाही काही मर्यादा असतात आगदी प्राजक्तासारखी समंजस स्त्री असली तरी! हिमांशुच्या व्यसनीपणात उत्तरोत्तर वाढ होत चालली होती. एकटीच्या पगारात घर भागवायची वेळ आली होती कारण त्याचे ऑफ़ीसला जाणे जवळजवळ बंद झाल्यात जमा होते. बॅंकेचे हप्ते थकत चालले होते. त्यांची पत्र यायला लागली होती. एखाद्यावेळी तिने हे ही मान्य केले असते पण त्या दिवशी पहील्यांदा हिमांशुने तिच्यावर हात उगारला. प्राजक्ताच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला तिने घर सोडायचा निर्णय घेतला. हिमांशुला तिने हे सांगताच त्याची प्रतिक्रीया एकदम उदासीन होती त्याचे तसे थंड वागणे पहाताच तिने ताबडतोब आपले कपडे भरले आणि घर सोडले. तिच्याकडे स्वःतचे असे हे एकच घर होते पुढे काय करायचे वगैरे असले विचार भावनेच्या भरात लक्षात येत नाही पण थोडा वेळ गेला की एकएक गोष्ट लक्षात यायला लागते आणि मग आपल्या वागण्यातल्या चुका लक्षात यायला लागतात तसेच प्राजक्ताचेही झाले म्हणजे हिमांशुचे घर सोडण्यात तिने काहीही चुक केली नव्हती पण दुसर्या रहाण्याच्या जागेची सोय पाहीली नव्हती. ती रात्र तिने आपल्या एका मैत्रीणीकडे घालवायचे ठरवले. तसे तिला कळवुनही टाकले. प्राजक्ता घरातुन बाहेर पडताच आत्तापर्यंत दबुन राहीलेली हिमांशुची बेफ़ाम वृत्ती जोरदार उफ़ाळून आली आता त्याने सारी हद्द पार केली होती. अखेर एकदा तो असाच झिंगुन बाहेर कुठेतरी चाललेला असताना त्याचा एक लहानसा अपघात झाला सुदैवाने जवळुन जाणार्या त्याच्या एका हितचिंतकाने त्याला आपल्या घरी नेले. जेंव्हा हिमांशुला जाग आली तेंव्हा प्रथम वेदनांच्या कल्लोळात त्याला काहीही सुचेना पण माणसाला आजुबाजुच्या परिस्थितीची जाणिव व्हायला काही मिनीटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्याला जाणिव आली तेंव्हा आजुबाजुचे टापटीप ठेवल्या गेलेले घर आपले नाही हे त्याला ताबडतोब कळले पण ते कुणाचे आहे ते मात्र त्याला आठवेना! अतिव्यसनाने विचारशक्तीवर परीणाम होतोच ना! पण थोड्याच वेळात त्याला बाहेरुन उचलुन आणुन प्रथमोपचार करुन घरात आसरा देणारी ती भली व्यक्ती आली त्या गृहस्थांचे नाव आठवेना पण त्यांना कुठेतरी पाहील्याचे मात्र आठवत राहीले. त्यांनी त्याला उठलेला पाहीला पण पुन्हा झोपुन रहाण्याची खुण केली. थोडावेळातच त्याला गरमागरम दुध आणि बिस्कीटे त्यांनी स्वःत आणुन दिली. आत्तापर्यंत त्यांनी एकही शब्द उच्चारला नव्हता. खाणे उरकल्यावर हिमांशुला जरा तरतरी आली त्याने घरी जाण्याची परवानगी मागितली. अत्यंत सौम्य शब्दात त्यांनी त्याला ती नाकारली, त्यांचा आवाजही खुप प्रेमळ होता पण पुन्हा पुन्हा विचारुन आपले नाव न सांगता" मला आपला एक हितचिंतक समजा हिमांशु आणि तशिच हाक मारलीत तरी काहीही हरकत नाही". अशी समजुत काढून त्यांनी हिमांशुला गप्प बसवले." आणि हो समोरच्या टेबलावर सिगारेटचे पाकिट आहे, त्याच्या वर जे कपाट आहे त्यात काही ड्रिंक्सही आहेत जर तुम्हाला गरज वाटली तर बेधडक उपयोग करायला हरकत नाही" त्यांच्या या वक्तव्याने हिमांशुला स्वःतची लाज वाटली. जे काही दिवस हिमांशु हितचिंतकांच्या घरात व्यतीत करत होता त्या कालावधीत त्याला आपल्या गतायुष्यातल्या घडामोडी आठवत होत्या, आपल्या वागण्याचे आश्चर्य वाटत होते. समोर असुनही अजुन त्याने अजुन सिगारेट,दारुला स्पर्शही केला नव्हता. नव्हे त्या सार्याचा त्याला तिटकारा वाटत होता. प्राजक्ताची आठवण त्याला अस्वस्थ करत होती. आपण घरी न आल्याने ती किती काळजी करत असेल? आपल्याशिवाय तिची काय अवस्था झाली असेल?( अजुनही प्राजक्ताचे घर सोडून जाणे त्याला आठवत नव्हते). काही दिवस असेच गेल्यावर प्राजक्ताच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या हिमांशुने पुन्हा घरी जाण्याची परवानगी मागीतली तेंव्हा हितचिंतक त्याला म्हणाले " मला त्याच विषयावर बोलायचे आहे आता मला सांगा तुम्हाला आता पुर्विचं व्यसनाधीन आयुष्य जगावस वाटत की नाही हिमांशु?" " म.. मला त्या वस्तुंचा तिटकारा वाटतो". "तुमच्या अलिकडच्या काही दिवसातल्या काही आठवणी येताहेत का?" " आठवतय मला पण फ़ार अंधुक आठवणी आहेत त्या, माझी प्राजक्ता मला सोडून निघुन गेली ही माझी जवळ जवळ शेवटची आठवण" " पण ती का सोडून गेली तुम्हाला, तुमच्या तश्या वागण्याचे स्पष्टीकरण देता येईल का तुम्हाला". फ़ारच बोचरा सवाल होता तो दुसर्या कुणी असे विचारले असते तर हिमांशुने कदाचीत त्याला खडसावलेही असते पण या गृहस्थांविषयी त्याला आदर वाटायला लागला होता. त्यांच्या शांत समजावणीच्या सुराचाही परिणाम असेल तो पण त्याला राग आला नाही. " हिमांशु तुम्ही स्वःत या मागची कारणमिमांसा करण्याचा प्रयत्न केलात का?" पुन्हा विचारलेल्या प्रश्नाने त्याला पुन्हा वास्तवात आणले. " नाही.. म्हणजे मी तसा विचार केला, आम्ही बाहेर गेलो होतो तेंव्हा हा विषयही आमच्या बोलण्यात आला होता पण मला त्यामागचे कारण देता येत नाही." "बरं तेंव्हा कधी असे वागावे असे वाटले का?" " जोपर्यंत बाहेर होतो तोपर्यंत मला एकदम मोकळे वाटत होते पण पुन्हा घरी परत आल्यावर एकदम दडपण आल्यासारखे वाटले आणि पुन्हा माझा माझ्यावर ताबा राहिला नाही." "पण तुम्ही ईतके सगळे प्रश्न का विचारता आहात?" "कारण मला उत्तरे हवी आहेत, अंहंहं तुम्हाला वाटतायत तशी या प्रश्नांची नाही तर आणखीही काही प्रश्न आहेत जे तुम्हाला कदाचीत माहीतही नाहीत." थोडे थांबत अंदाज घेत ते पुढे म्हणाले " मी तुमच्या घरी जाउन आलो, आता का? मला पत्ता कुणी दिला, कुणाच्या परवानगीने मी तेथे गेलो हे प्रश्न थोडावेळ बाजुला ठेउयात. पण मला तिथे जे जाणवले ते फ़ार महत्वाचे आहे." "काय काय जाणवल तुम्हाला तिथे?." "तुमच्या घराच्या आवारात पाउल टाकताcअ मला तुमच्या घरातल्या निगेटीव्ह एनर्जीची थोड्याफ़ार प्रमाणावर जाणिव झाली. परंतु तुमच्या घरात पाउल ठेवलं तेंव्ह ती जाणिव अधीक तिव्र झाली". " अहो पण काय निगेटीव्ह आणि काय पॉझेटीव्ह मला तर काहीच कळत नाहीये." "अर्थात तुमचा या गोष्टींशी कधी संबंध आलेला नाही"."सर्वसाधारणपणे असे मानले जाते की सर्वच वास्तु मग ते मंदिर असो की घर,ऑफ़ीस सर्वच ठिकाणी जे वातावरण असते त्या पासुन ह्या निगेटीव्ह पॉझेटीव्ह एनर्जी निघत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर मंदिरात गेले तर मनाला शांतता लाभते खरं ना! पण एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथुन लगेच लवकर बाहेर पडावे असे वाटते, वाटतं ना?" " हा सगळा त्या ठिकाणच्या एनर्जीचा परीणाम आपले अंतर्मन नोंद करत असते" " माझ्या घरात काय चुकीचे आहे माझ्या एका मित्राने याचा प्लान बनवला तो तर वास्तुशास्त्रातला जाणकार आहे" हिमांशु करवादला. " बरोबर आहे मी पाहिलय ते तुमच्या घराच्या रचनेत काही दोष नाही आहे पण त्या घराच्या वातावरणात का वेगळेपणा का जाणवताहेत?" थोडं थांबत ते पुढे म्हणाले. " तुम्हाला काही आठवत का तुम्ही घर बांधताना काही तडजोड वगैरे केली होती का?" "म्हणजे? तडजोड.......... मला कळले नाही." " म्हणजे काही गोष्टी आगदी साधारण वाटणार्यासुध्दा ज्या तुम्ही दुर्लक्षीत केल्या असतिल" "नाही असे काही झाले नाही सगळ्या बाबतीत काही प्रॉब्लेम झाला नाही" "तरी स्मरणशक्तीवर ताण द्या तुम्ही वेगळे काही केलेत का? सर्वसाधारणपणे इतर लोक करत नाहीत असे काही?" ह्यावर थोडावेळ विचारात घालवल्यावर अचानक काही सुचल्यासारखा हिमांशु म्हणाला. " येस, म्हणजे बाब फ़ार महत्वाची नाही पण तेवढेच काहीतरी वेगळे असे मी केले. म्हणजे मला घराच्या चोकटी आणि फ़र्निचर साठी साग हवा होता पण तो सहजासहजी मिळणे शक्य नव्हते किंमतीही अव्वाच्या सव्वा होत्या त्यामुळे मी तो दुसर्या मार्गे मिळवला". ते काही बोलतील या अपेक्षेने त्यांच्याकडे त्याने पाहीले पण ते डोळे मिटून चिंतन करत होते. " दुसर्या मार्गाने म्हणजे मी एका जुन्या वाड्यातले लाकुड लिलावात विकत घेतले त्यात मला हे सगळे करता आले". " तुम्हाला आठवतो का तो वाडा नक्की कुठे होता?" त्याचे बोलणे थांबवत हितचिंतक म्हणाले. " अर्थात, आता जिथे डेक्कन बिल्डर्स त्यांची नवी इमारत उभी करताहेत तिथे होता." "म्हणजे ती दक्षीणेकडची जागा होती मोठी पडिक हवेली होती आधी आणि बरीच मोकळी जागा होती तेच का?" " येस तिथेच !" " ठिक आहे आता खुप उशिर झाला आहे आता आपण आपले बोलणे इथेच थांबवु आणि उद्या पुन्हा चर्चा करुयात आता आधी तुम्ही जेउन घ्या पाहू" ते उठत म्हणाले. " आणि तुम्ही?" "मी रात्री कधीच जेवत नाही पण तुम्ही संकोच करु नका" जेउन घेतल्यावर हिमांशुला जरा तरतरी आली आणि पुन्हा त्याच्या मनात हे स्वःतला हितचिंतक म्हणवुन घेणारे कोण याचा प्रश्न पडला. पण एकंदरीत गृहस्थ सोज्वळ होते, रहाणीमान टापटीपीचे होते, इतक्यावेळात त्याच्या लक्षात न आलेली एक बाब म्हणजे त्यांच्या घरात ते एकटे होते तरीही सर्व ठेवण दोन व्यक्ती रहाण्यासाठी केलेली दिसत होती. त्यांचा स्वयंअपाक करण्यासाठी एक आचारी होता त्याला कधी बोलताना पाहीले नसल्याने तो कुठला असावा ते कळत नव्हते. आपल्याबद्दल त्यांच्या मनात इतकी आद्रता का हे ही कळत नव्हते, जगाने झिडकारलेला आगदी लाडक्या पत्नीनेही झीडकारलेला माणुस आपण, प्राजक्ताcई आठवण होताच तो पुन्हा भुतकाळात गेला येणार्या अंधुक आठवणी पुन्हा पुन्हा जागवायचा प्रयत्न करता करता त्याला केंव्हा झोप लागली ते कळलेच नाही. दुसरा दिवस उजाडला सकाळपासुनच हितचिंतकांचा पत्ता नव्हता. ते संध्याकाळी आले आता त्यांच्याशी चर्चा करण्यात हिमांशुलाही रस वाटू लागला होता. संध्याकाळी जेंव्हा हितचिंतक आले आणि त्यांनी हिमांशुला बोलावले तेंव्हा जरा चुटपुटतच तो त्यांच्या समोर गेला. आज ते जरा विचारात पडल्यासारखे दिसत होते. " हिमांशु तुम्ही ज्या हवेलीतुन साग खरेदी केला तिचा इतीहास तुम्ही जाणुन घ्यायचा प्रयत्न केला होतात का?" "नाही तसं मला ते महत्वाचं वाटल नाही" " पण अश्या लहानश्या गोष्टीतही काही दडलेले असु शकते" "म्हणजे त्यात काही चुक झाली आहे का?" "फ़ार मोठी, तुम्ही ज्या हवेलीच्या लाकडाचा व्यवहार केलात त्या हवेलीच्या इतिहासाबद्दल मी आज थोडी चौकशी केली. तुम्हाला हे ठाउक नसावे की तिथे रहात असलेल्या जहागीरदार कुटूंबाचा शेवाटचा वारस रहात होता. अंकुश ठेवणारे असे कुणीच तेंव्हा तिथे शिल्लक नव्हते, त्यामुळे त्याचे वागणे दिवसेंदिवस बेताल होत गेले छंदीफ़ंदी जीवन हेच त्याचे रहाणीमान व्हायला लागले होते. त्याच्या पहील्या दोन्ही पत्नी त्याच्या या वागण्याला कंटाळून आत्महत्या करुन मोकळ्या झाल्या. त्याने तिसरे लग्न केले पण त्याही पत्नीने त्याच्या या असल्या वागण्यामुळे अंथरुण धरले, आणि शेवटी त्याचा दुःस्वास करत तिनेही आपले प्राण सोडले. पुढेही त्याचे वागणे तसेच बेताल राहीले अखेर याचा शेवट व्हायचा तसाच झाला. व्यसनाने पोखरलेल्या त्याच्या शरीराने अर्धवट आयुष्यातच त्याची साथ सोडली. त्याच्या मृत्यु नंतर ती हवेली ओस पडली आणि कुणी वारस नसल्याने अखेर सरकारजमा झाली. आणि सरकार कडून ती जागा डेक्कन बिल्डर्सनी विकत घेतली आणि तो लिलाव घडून आला." "पण त्याचा या सगळ्याशी काय संबंध?" "आहे ना फ़ार जवळचा संबंध आहे. ज्या वास्तुत इतक्या वाईट गोष्टी घडत होत्या ज्या वास्तुने व्यसनी व्याभिचारी माणसाचे जीवन अनुभवले, होणारा स्त्रियांचा कोंडमारा पाहीला त्या वास्तुतल्या प्रत्येक वस्तुवर आगदी विटा, दरवाजे खिडक्या यांच्यावरही त्याचा निगेटीव्ह परीणाम हा होणारच होता. तसा तो झालाही याचाच अनुभव तुम्हाला आला त्या वास्तुशी संबंध जोडल्या गेल्यामुळे तुमचेही वागणे तसेच बेताल होत गेले आणि तुम्हीही वहावत गेलात." "पण हे कसे शक्य आहे एखादी निर्जीव वस्तु कशी काय जिवंत माणसावर प्रभाव पाडू शकते? आणि परीणाम व्हायचाच तर तो माझ्या एकट्यावर का झाला? प्राजक्तावर का नाही ?" "माझ्या आधिच्या बोलण्यातच तुमच्या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत हिमांशु त्या वास्तुत जहागीरदाराचे वागणे बेताल होते आणि त्याच्या पत्नींना त्याचा जाच सहन करावा लागला तुमच्या घरात आणखी काही वेगळे घडले?" "राहीला प्रश्न निर्जिव वस्तुंचा तर एक साधी बाब आहे की आपण देवळात गेलो की कधीतरी एखादे देवाजवळचे फ़ुल म्हणा, अंगारा म्हणा आणतोच की. देवळातल्या त्या श्रध्देच्या वातावरणात त्या वस्तुवरही पॉझेटीव्ह एनर्जीचा प्रभाव पडतो. कित्येक जण अंगठीत निरनिराळे खडे वापरतात हा ही एक पॉझेटीव्ह एनर्जी मिळवण्याचाच मार्ग नव्हे का? त्याचा उपयोग होताना दिसतो थोड्याफ़ार प्रमाणावर का होईना ?" " आता याचा अर्थ मी घरातुन त्या सागापासुन बनवलेल्या सगळ्या वस्तु नष्ट कराव्यात का?" " नाही त्याचा उपयोग होणार नाही कारण एव्हाना त्या सगळ्या एनर्जीचा परीणाम तुमच्या पुर्ण वास्तुवर झालेला आहे." " मग मला ते घर सोडण्या खेरीज दुसरा मार्ग नाही तर!" "मुळीच नाही मी तुम्हाला असा सल्ला मुळीच देणार नाही. सर्व प्रथम तुम्ही तुमच्या पत्नीचा शोध घ्या, तिला कसेही करुन तुमच्या घरी पुन्हा रहायला येण्यासाठी आर्जव करा, तिच तुमच्या आणि तुमच्या नाशाच्या मधे ढाल बनुन राहीली होती" "ते कसे काय ?" " पातिव्र्यत्यात खुप ताकद असते हिमांशु. त्यातुन तुमची पत्नी तुमच्यावर अतिशय प्रेम करते. मुळातच स्त्री हीच एक शक्तीचे प्रतीक आहे आणि ती तुझ्या बाजुला होती त्यामुळे ही लढाई तिच्या पवित्र स्पंदनात आणि घरातल्या त्या वाईट स्पंदनात चालु होती त्यामुळे जेवढे म्हणुन वाईट घडू शकले असते त्यापेक्षा नक्कीच खुप कमी घडले. आता जे घडले त्यावरुन तुम्ही निश्चित समजु शकता." " पण तिला मी पुन्हा त्या घरात नेण्याचा धोका नाही पत्करु शकणार" " माझे बोलणे आजुन संपले नाही हिमांशु तिला फ़क्त घरी न्या असे म्हणत नाहीये मी, त्या नंतरही तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतील. घरात पॉझेटीव्ह एनर्जी जमा करायची, म्हणजे देवांची पुजा नियमीत करणे, एखादे स्तोत्र म्हणणे, असेच आणखी काही. आणि एक त्या घरात कृपया एकटे जाउ नका. मनावर ताबा ठेवण्यासाठी एखाद्या तुमची श्रध्दा असलेल्या देवाचा जप करा. काही दिवस तुम्हाला कदाचीत कठीण जातीलही पण जेंव्हा तुमच्या घरातली पॉझेटीव्ह एनर्जी निगेटीव्ह एनर्जीपेक्षा जास्त होईल तेंव्हा तुमचे आयुष्य पुन्हा पहील्यासारखे होईल" " पण इतके सारे घडल्यावर प्राजक्ता पुन्हा परत येईल का?" " का येणार नाही? तुमच्यावरचे प्रेम तिला पुन्हा परत आणेलच तुम्ही आधी तिला शोधुन तिची माफ़ी मागुन तिला घरी परत आणा ते महत्वाचे" इतके बोलुन हितचिंतक उठले. म्हणजे आता ह्या चर्चेचा शेवट झाला होता तर. दुसर्या दिवशी सकाळी हितचिंतकांच्या गाडीतुन हिमांशु प्राजक्ताच्या शोधात निघाला. तिला शोधण्यासाठी फ़ार कष्ट घ्यावे लागले नाहीत. ती अजुनही तिच्या मैत्रीणीकडेच रहात होती. हितचिंतकांनी तिचीही समजुत काढली आणि हिमांशुने तिची माफ़ी मागीतली आणि ते तिघेही घराकडे निघाले वाटेत देवांच्या फ़ोटो आणि मुर्तींची खरेदी झाली. हितचिंतकांनी त्यांना त्यांच्या घराजवळ सोडले आणि आग्रह करुनही घरात न येता ते परत निघाले. जाता जाता त्यांनी हिमांशुच्या हातात काही दिले. शुभ्र पांढर्या वस्त्रात असलेल्या हितचिंतकांच्या त्या पाठमोर्या अकृतीकडे हिमांशु भरल्या डोळ्याने पहात होता. हातात हात घेउन हिमांशु आणि प्राजक्ताची जोडी घरात पुन्हा एकदा नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी पाउल ठेवत होते. हिमांशुच्या मनात अजुनही काही प्रश्न घोळत होतेच हितचिंतकांना आपल्या बद्दलची इतकी माहीती दिली कुणी असावी? त्या जहागीरदार बद्दल त्यांना कुणी माहीती दिली असावी? आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी त्यांना चावी कशी मिळाली असावी? पण प्राजक्ताच्या सहवासात तो थोड्याच वेळात हे प्रश्न विसरुन गेला असताही पण हाताच्या बंद मुठीची त्याला आठवण झाली त्याने ती मुठ उघडली आणि हातातल्या शाळिग्रामाकडे तो पहातच राहीला. प्राजक्ता,हिमांशुला घरी सोडल्यावर पुढच्या वळणावर हितचिंतकांची गाडी दिसेनाशी झाली. आबासाहेब जहागीरदारांच्या चेहर्यावर आता समाधान फ़ुलले होते त्यांच्या करंट्या पुत्राने विनाशाच्या काठावर आणुन ठेवलेल्या त्या जोडप्याला त्यांनी पुन्हा सामान्य आयुष्यात आणले होते. या एकाच ओढीने त्रिशंकु अवस्थेत अडकलेल्या त्यांच्या आत्म्याला आता सुटका मिळत होती. आणि पहाता पहाता त्यांची अकृती धुसर होत गेली.
|
Mankya
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:22 am: |
| 
|
चाफा .. मस्तय राव ही कथा ! फ्लो तर अगदी जमून गेलाय. माणिक !
|
Namrata4u
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:35 am: |
| 
|
फारच सुंदर कथा आहे. शेवट खूप आवडला.
|
Yashwant
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:37 am: |
| 
|
चाफ़्फ़ा , उत्तम लिहीली आहे गोष्ट.
|
Balika
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:58 am: |
| 
|
खूप छान कथा आहे. अशा घटना आजच्या युगातही घडतात. पण काही लोक सर्वसामान्य लोकांच्या या भावूक स्वभावाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची फसवणूक करतात.
|
Monakshi
| |
| Wednesday, October 17, 2007 - 10:00 am: |
| 
|
चाफ्फा. मस्तच रे. शेवट तर खूपच छान. पण सुरुवातीची कथा जरा घाईघाईत लिहिल्यासारखी वाटते. आणि परिच्छेद नसल्यामुळे एकसलग वाचायला कठिण जातं. पण तो हितचिंतकांना भेटल्यानंतरचा भाग मात्र चांगला जमलाय. तिथपासून कथा व्यवस्थित पुढे सरकते आणि वाचायलाही बरी पडते. अर्थात हे माझं observation .
|
Zakasrao
| |
| Wednesday, October 17, 2007 - 10:30 am: |
| 
|
चाफ़्या छान आहे कथा. पण मागची कथा ह्यापेक्षा जास्त छान वाटली. बर आता मला एक सांग बघु तुला भुताखेताविषयी एवढ प्रेम का आहे रे??
|
Akhi
| |
| Wednesday, October 17, 2007 - 10:42 am: |
| 
|
तुझ्या कथा वाचन म्हणजे मेजवानी असते. Ultimate....... पुढच्या कथे ची वाट बघतेय.
|
Kts
| |
| Wednesday, October 17, 2007 - 11:05 am: |
| 
|
चाफ़ा मी कथा कोणी लिहिलिये हे न बघताच कथा वाचायला लागलो कथा वाचतानाच मला वाटलेच होते कि तुच अशी कथा लिहु शकतो. कथा सुन्दर आहे.
|
R_joshi
| |
| Wednesday, October 17, 2007 - 11:21 am: |
| 
|
चाफा वेगळा विषय छान हाताळलास. कथेचा शेवट एकदम निराळा
|
Chaffa
| |
| Wednesday, October 17, 2007 - 12:04 pm: |
| 
|
monakshi खरंय ते हे पॅरा वगैरे मी नंतर पाडतो पण ही कथा बरेच दिवस रखडली होती तिला पुर्ण करुन टाकली त्यात ते राहीले आणि तसेही माझे शुध्दलेखन हा संशोधनाचा विषय आहे. झकास अरे भुता परस्परे घडो बालिका माणीक kts,R_joshi , सगळ्यांनाच धन्यवाद.
|
Rajya
| |
| Wednesday, October 17, 2007 - 12:24 pm: |
| 
|
व्वा चाफा मस्तच.. ..
|
मस्त झालीय. मागच्यांपेक्षा सरस. कथाबीज, फ्लो, मांडणी आणि स्वभाव चित्रण सगळेच व्यवस्थित जमलेय यावेळी. शुद्धलेखनाबद्दल तू स्वतःच बोललास त्यामुळे मी काय बोलत नाही
|
Chaffa,tujha sarvach katha far chhan astat; pan saglya kathanmadhli hi saglyat changli vatli
|
Itgirl
| |
| Wednesday, October 17, 2007 - 4:47 pm: |
| 
|
आवडली कथा .. ..
|
Panna
| |
| Wednesday, October 17, 2007 - 6:17 pm: |
| 
|
चाफा, छानच आहे कथा! अपेक्षेप्रमाणे तुझी ही पण गुढ कथा निघाली!! 
|
Mandarnk
| |
| Wednesday, October 17, 2007 - 6:37 pm: |
| 
|
खरंच, too good गुढ कथा!
|
Disha013
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:24 pm: |
| 
|
खुप छान लिहिलयं. आणि वेगवानही.
|
Daad
| |
| Wednesday, October 17, 2007 - 10:17 pm: |
| 
|
चाफ्फा... गूढकथा मस्तच, अगदी आवडली. असलं लिहणं तुम्हाला अगदी जमतय.
|
Pony
| |
| Thursday, October 18, 2007 - 2:14 am: |
| 
|
नमस्कर, मी ह्या मायबोलिची नवीन वाचक अहे. ख़ुपच छान चाफा. ह्याच सहजतेने लिखाण येउन्दे.
|
|
|