|
Daad
| |
| Friday, September 28, 2007 - 3:54 am: |
| 
|
प्रार्थना. परवा गणपतीच्या आरतीनंतरच्या मंत्रपुष्पांजलीत, नुकत्याच भारतातून आलेल्या एका छोट्याने 'देवे' ला आपला निकोप स्वर लावला. सातेक वर्षाचं ते रुपडं, हात जोडून डोळे मिटलेले, पापण्यांमागचे डोळे टुळू टुळू काहीतरी डोक्यातच शोधतायत, स्वच्छ उच्चार, नेमका स्वरांचा हेलकावा, विसर्ग, म्हणणं आणि थांबणं दोन्ही वेधक, म्हणणारे इतर सगळे आवाज हळू हळू लहान होत गेले. 'विश्वेदेवा सभासद इति'.... .... किती गोमटं वाटलं म्हणून सांगू. पुढचं म्हणताना दाटून येऊ लागलं. त्या 'देवे' पुढे मन जाईना ही पुष्पांजली तर अनेकानेक वर्षं ऐकतेय.... मग आजच कशी 'भेटली'? त्यानंतर हा एकच विचार मनात घोळत राहिला. कशा कशा, कधी, कुठे कुठे भेटल्यात मला प्रार्थना? क्रमश:
|
Daad
| |
| Friday, September 28, 2007 - 4:00 am: |
| 
|
आठवू जाता बरच काही आठवलं. 'प्रार्थना' या शब्दाचा अर्थ, त्या कृती मागची जाणीव, नेणीव कळण्याइतकी मोठी होण्याआधीही प्रार्थना भेटल्यात मला, पण त्या भेटल्याचं पुरतं कळलं नाही, त्या वेळी. शाळेची सुरूवातीची प्रार्थना म्हणजे शाळेत वेळेवर पोचण्याचं एक वैतागवाणं कारण वाटायची. सुरुवातीची प्रार्थना मनापासून कधी म्हटल्याचं आठवत नाही. पण शाळा सुटताना म्हणायच्या 'वंदे मातरम' ला उगीचच घशात टोचणारं काहीतरी दाटून यायचं. ते संपल्यावर मुला-मुलींच्या 'हे sss ' आणि 'हो ssss ' मध्ये, मैत्रिणिंच्या घोळक्यात कुचकुचत, खिदळत घरची वाट चालताना ती दूख थांबायची ही झटकन. शाळेत असताना, सेवादलाच्या एका कॅम्प मध्ये माझ्या 'इंक्यूबेटेड', सुंदर, कोवळ्या वगैरे विद्यार्थी आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. त्याच आयुष्याची, दुसर्या गरीब घरातली, समाजाच्या वेगळ्या स्तरातली एकेक रुपं अनुभवायला मिळाली. मुंबईबाहेरची अगदी गावातली मुलंही आली होती. आपण समाजातल्या कोणत्या स्तरात आहोत, मुंबईसारख्या शहरात रहातो, त्याचा इतर समाजाला झालेला बोध काय, वगैरे वगैरे गोष्टी नव्याने कळत होत्या. आपण ज्याला कला गुण म्हणतो, जे आपण 'क्लासला-बिसला जाऊन 'जोपासलेत, नक्की कोणत्या पातळीला, कोणत्या कसोटीला उतरतात हे ही नव्याने कळत होतं. खरतर बर्याच 'आपल्या मान्यताप्रद कसोट्यांची' नव्याने खातजमा करायला हवी हेच मुळात कळत होतं. असो.... एका रात्री, शेकोटीच्या भोवती सादर होणार्या विविध करमणुकीच्या कार्यक्रमात एका मुलाने गोंधळ सादर केला. त्याच्याच गावातल्या दुसर्या एकाने उलट्या धरलेल्या ऍल्युमिनियमच्या डबड्यावर संबळेचा ठेका धरला. त्याने डोळे मिटले होते, चेहरा उच्च स्वरात गाताना लाल झालेला पण शेकोटीच्या उजेडात लखलखीत तांब्याच्या मुखवट्यासारखा दिसत होता, चुटक्या वाजवत तो देव देवतांना आव्हान करीत होता... या, माझ्या गोंधळाला या! तो तिथे नव्हताच मुळी. कधीच त्या त्याच्या गावच्या देवळाच्या ओवरीत पोचला होता. डोक्याला भगवा फेटा गुंडाळून, गिरक्या घेत घेत देवाला आळवणारा गोंधळी झाला होता तो. त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या समस्त देव-देवतांना आवताण देत होता..., 'या हो या, माझ्या गोंधळाला या! त्याच्या स्वरात जाणवत होतं की हे नुसतं तोंडदेखलं आमंत्रण नाही. ही जीवाने शिवाला केलेली विनवणी आहे, जडाने चेतनेला दिलेलं मानाचं निमंत्रण आहे. 'खेळ मांडुन बसलोय, देवा. तुमच्याविना अडलोय! असाल तसे या, झडकरी या! ह्या सुदिन, सुवेळा मांडलेल्या खेळाला या देवा, या पुताचा हट्ट पुरवायला या! या लेकराचं कोड पुरवायला या! त्याला अशिर्वादाचं बळ द्यायला या' खरतर त्याने गायला सुरूवात केल्यावर, काही क्षणातच त्याच्या प्रत्येक उदेकाराबरोबर समोरच्या शेकोटीतली धग बाहेर नसून, माझ्याच शरिरातून, ....आतून बाहेर येतेय असं जाणवायला लागलं. विस्फारलेल्या डोळ्यांनी ते बघत राहिले. त्याचा आवेश, विनवणी, त्याच्या प्रत्येक शब्दात, सुरात जाणवत होता. तो 'संबळधारी' सुद्धा ह्या जगात नव्हताच. अतिशय तल्लीन होऊन मस्तं ठेका धरला होता. आत्ता आठवायला बसले तेव्हा, लक्षात आलं की आधी चौकस नजरेने बघून घेतलेलं सारं काही.... आजूबाजूचा काळोखात बुडालेला प्रदेश, लांबवर दिसणारी गावातली मिणमिणती घरं, हे सगळं सगळं विझल्यागत दृष्टीआड झालं होतं. इतकच काय पण गोल धरून बसलेले आम्हीही कुठेतरी अंतर्धान पावल्यागत झालो. एक त्याचा तो बुलंद आवाज, त्या आवाजात कुठल्या कुठल्या देव, देवी, दैवतंना, त्यांचा उदेकार करीत केलेलं पाचारण, त्याला साजेसा वाजणारा ठेका आणि या सगळ्याला चैतन्याची लवलवती ज्वाळा देत ढणढणत पेटणारी शेकोटी.... ह्या परतं कशा कशाचं भान राहिलं नाही. त्या न कळत्या वयातही भान विसरायला लावणारी, मला भेटलेली आणि आठवणारी ही एक, 'प्रार्थना'! क्रमश:
|
Karadkar
| |
| Friday, September 28, 2007 - 4:48 am: |
| 
|
दाद, एक छोटी दुरुस्ती. रागावु नको. गोंधळी मोरपिसाची टोपी घालत नाहीत वासुदेव घालतात. गोंधळी पांढरा, गुलाबी, केशरी, पिवळा फ़ेटा घालतात. बाकी लिखाण नेहेमीसारखेच वेध घेणारे
|
Madhavm
| |
| Friday, September 28, 2007 - 5:34 am: |
| 
|
दाद तुम्ही तर माझ्याही डोळ्यापुढे तो गोंधळ उभा केलात, अगदी हुबेहुब! मन इहलोकात परत आल्यावर " क्रमश्: " वाचले. चला म्हणजे अगदी जंगी मेजवानी आहे!
|
Ana_meera
| |
| Friday, September 28, 2007 - 5:34 am: |
| 
|
समरसून जायला होतं अगदी तुझ लिखाण वाचताना सुध्दा दाद! केवळ अप्रतिम!!
|
Daad
| |
| Friday, September 28, 2007 - 6:13 am: |
| 
|
मिनोती, अगदी! दुरूस्ती लगोलग! रागवायचं काY? उलट चूक सांगितल्याबद्दल thanks म्हणायचं. नाहीतर शिकणार कसं?
|
Chinnu
| |
| Friday, September 28, 2007 - 7:34 pm: |
| 
|
Amazing! प्रार्थना मलापण भेटली, हा लेख वाचता वाचता! बाप्पाला आपोआपच हात जोडून झाले, धन्स
|
Daad
| |
| Tuesday, October 02, 2007 - 1:22 am: |
| 
|
'देवा मला चांगली बुद्धी दे, सगळ्यांना सुखी ठेव', हीच प्रार्थना शिकवली लेकाला, खूप लहानपणी. दररोज झोपताना म्हणायची प्रार्थना. त्याने आपल्याबुद्धीने त्यात घातलेली भर म्हणजे अजून तीन शब्दं, 'आणि मला पण!'. तो तीनेक वर्षांचा असताना मेलबोर्नला पेंग्वीन्स बघायला गेलो होतो. संध्याकाळच्या झुरूमुरू प्रकाशात, मोठे झालेले एकटेदुकटे तर अजून काही आपल्या आई-बाबांबरोबर असे छोटे छोटे पेंग्विन्स आपापल्या बिळांकडे परतत होते. आम्हीही त्यातल्या एका कुटुंबाकडे लक्ष ठेवून आपापल्या गाड्यांकडे चालू लागलो. कॉमेंट्री करणार्या गाईडने आमचं लक्ष एका छोट्या पिल्लू पेंग्विनकडे वेधलं. लडबडत चालेल्या त्या पिल्लाची आई हरवली होती. हे ऐकल्यावर माझ्या तीन वर्षाच्या पिल्लाने माझ्या बोटावरची आपली पकड घट्ट केली. ते वेडं पेंग्विन पिल्लू इकडे तिकडे बघत होतं. ढाळे ढाळे अंधारचा पगडा पडला आणि माझ्या लेकाने मुसमुसायला सुरूवात केली. 'अरे, मिळते त्यांना त्यांची आई, त्यांच्यात हरवत नाहीत लोक. आईही त्याला शोधत असेलच ना? आत्ता भेटेल बघ.' असल्या कसल्याही समजावण्याचा परिणाम होईना. शेवटी तिथेच बसकण मारून भोकांड पसरलं. बरोबर चालत असलेल्या इतरांना त्याच्या sensitive नेचरचं कौतुक वगैरे वाटत होतं. मला मात्रं आता हा प्रकार कसा थांबवावा कळेना. आणि खरच अजून त्या पिल्लाला आई, आपलं घर काहीच सापडलं नव्हतं. शेवटी तो गाईड मदतीला आला. 'हे एक पिल्लू जरा चावटच आहे. पण काळजी करू नका.' हातातली बॅटरी दाखवत त्याने असही प्रॉमिस केलं की तो स्वत: त्या पिल्लाची आई शोधून देईल आणि सापडली नाही तर तो सोबतीला राहील. चेहर्यावर जराही हसू न दाखवू देता आम्हीही त्याला thanks म्हटलं. चालून, आणि रडून दमलेला माझा लेक गाडीतच झोपला. आम्ही तो झोपलेला बघून झाल्या प्रकाराची चेष्टा करीत घरी आलो. झोपेतच त्याचे कपडे बदलून, अंथरूणात ठेवला. सगळं आवरून झोपायला आले. निळा स्पायडरमcनचा पायजमा, कुशीवर, एक हात गालाखाली, दुसर्या हातात त्याच्या बनीचा कान, रडलेल्याचे ओघळ गालावर सुकलेले.... मनात म्हटलं कसं होणार बाई ह्याचं? मगासचं त्याचं तारांगण आठवून हसूही आलं. माझे चाहूल लागून डोळे किलकिले झाले. 'आई, सकाळ झाली?' 'नाही रे. झोप, अजून खूप वेळय', जरा थोपटलं. 'आई, मी झोपताना बाप्पाची प्रार्थना विसरलो. आत्ता करू?' हो म्हणून मी केसांवरून हात फिरवला. 'बाप्पा, मला चांगली बुद्धी दे, सगळ्यांना सुखी ठेव... आणि पिल्लू पेंग्विनची आई सापडू दे,... लवकर...... आई, सापडेल ना?' कसबसा स्वर संभाळत म्हटलं, ' हो, रे. सापडलीही असेल, एव्हाना. तू प्रार्थना केलीस ना? आता नक्की सापडेल.' थोपटताना मिटू मिटू लागलेले डोळे किती शांत दिसले, नेहमी सारखे त्याची आवडती स्वप्नं बघायला तयार. हरवल्या पिल्लाची आई त्याला मिळेल हे माझं आश्वासन आधीही होतंच, मग आत्ताचा भरवसा कशाचा? मगाशी माझ्याही कुशीत मुसमुसणारं माझं हे पिल्लू, ही नि:शंक झोप कुणाच्या बळे घेतंय? कधी न पाहिल्या देखल्या कुणा 'बाप्पाच्या' हाती त्या पिल्लाची काळजी सोपवली ह्याने आणि त्याच्या त्या 'बाप्पाने' ती स्विकारल्याची ग्वाही मानून आधीचं कावरंबावरं झालेलं मन स्वस्थं झालंही? त्याच्या त्यावेळच्या त्या भरवशाचा अजून हेवा वाटतो मला! अर्ध्या झोपेत उठून कुणा पेंग्विनच्या पिल्लासाठी म्हटलेली माझ्या चिमुकल्याची, माझ्याच घरात, मला भेटलेली ही एक, प्रार्थना! क्रमश:
|
दाद, मस्त. ' गोंधळ' खास. पुढच्या भागांची वाट बघत्ये.
|
Daad
| |
| Wednesday, October 03, 2007 - 4:18 am: |
| 
|
आठेक वर्षं झालीत तरी ती संध्याकाळ अजून ताजी आहे. कलकत्त्याच्या कनिका मित्र म्हणुन एक गुणी गायिका सिडनीला भेट देऊन गेल्या. बडे गुलाम अली खान साहेबांच्या एका पट्टशिष्येची ती शिष्या. पतियाळा घराण्याचं गाणं गुरू घरी राहून शिकलेल्या. त्यांच्या सोबत दोन अख्ख्या संध्याकाळ घालवण्याची आणि दोन कार्यक्रमांना साथीची संधी मिळाली. आधी कधी बघितलेही नाहीत असले साथिदार घेऊन कार्यक्रम करण्याची त्यांची हिम्मत मुळात दाद देण्यालायक. दुसर्याच संध्याकाळी माझ्या लाघवी ("आगाऊ") स्वभावानुसार गेल्या गेल्या मी माझ्या अवाक्याच्या बाहेरचा घास घेतला आणि त्यांना विनंती केली, 'दीदी, 'आये ना बालम' सुनायेगी? प्लीज?' घराण्याचं गाणं आयुष्यभर जोपासलेल्या कलाकाराकडून घराण्याची चीज ऐकणं हा दुर्लभ योग असतो.... आणि मी तो सोडत नाही. चीजेचं मूळ सौदर्य उलगडून दाखवण्याचं कौशल्य त्यांनाच जमतं. (हे पूर्णत्: माझं मत). पहिल्यांदा तर दीदी अवाक झाल्या. 'ना बाबा ना. मै तो ना गाऊंगी. मेरी गुरू दिदीभी इन्हे आम नही गाती. अरे, ये तो बडे गुरूजी की चीज है. ना! किछ्छू ना!. त्यांच ते नाकारणंही किती लोभस होतं. पण इतक्यावर ऐकेन तर ती मी कसली. परत नेट लावला. शेवटी त्या ज्यांच्या कडे उतरल्या होत्या, त्या त्यांच्या गुरू भगिनी, त्यांनीही "बंगलात" आग्रह केला. दीदी एका अटीवर तयार झाल्या, त्या गुरू दिदींना फोन करतिल आणि त्यांची परवानगी असल्यासच गातील. लगेच कलकत्त्याला फोन केला. बंगालीतलं भाषण कळलं नाही पण फोन ठेवताना दीदींनी तिथेच जमिनीला हात लावून आपल्या गुरूंना केलेलं वंदन बघून मात्रं माझ्या गळ्याशी दाटून आलं. एव्हाना संध्याकाळ झाली होती. सूर्य डोंगराआड गेला होता. अगदी 'या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या....'तल्या सारखी व्याकूळ करणारी तिन्ही सांज. एकलेपाणाची तीव्रता या वेळी जितकी जाणवते तितकी इतर कोणत्याही वेळी नाही जाणवत. गर्दीतही एकटं करणारी ती वेळा, स्वरात झणझणणारे तानपुरे, कनिकादींसारख्या समर्थं कलाकाराची संगत, आणि विरहाची वेदना अधिक उत्कट, अधिक तीव्र करणारा सिंधू भैरवीतला तो सुप्रसिद्ध दादरा- आये न बालम! नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला. दीदी स्वत्:शीच विचार करीत आल्या आणि बैठकीवर बसल्या. थोडावेळ नुसतच त्या दादर्याबद्दल बोलत राहिल्या. मग तानपुरा पुन्हा लावून त्यांनी कानावर हात ठेवून सा लावला. आणि मोत्यांच्या लडीसारखी ओळ घरंगळली.... आये न बालम.... ठेक्याचा अंदाज घेत त्यांनी दोनदा तीच ओळ म्हटली आणि पुढची ओळ न म्हणता.... तबल्यावर हात ठेवला. मला थांबायचा इशारा होता. माझं काही चुकलं की काय असं समजून मी त्यांच्याकडे बघितलं. माझ्या हातावरची त्यांची बोटं थरथरत होती. माझ्याकडे एक रिकामी नजर टाकून त्यांनी नि:श्वास सोडला आणि डोळे मिटले. तानपुरा वाजतच राहिला. एका संथ लयीत त्यांचा श्वास चालला होता. दावी भुवई किंचित उठली होती, ओठ, पापण्या सूक्ष्म थरथरत होते. चेहरा लाल झाला होता. ती घराण्याची चीज, तिचे शब्दं तिचे स्वर,.... ह्या सार्याला एक दैवी, पवित्र झळाळ होता. गुरूंच्या गुरूंनी प्रत्यक्षात आणलेली ती अतीव विरहाची वेदना, तिला आपल्या स्वरांनी, श्वासानेही स्पर्श करण्यापूर्वी ही गुणी कलाकार नतमस्तक होऊन थांबली होती. त्या देवदत्त देण्याचं ओझं उचलण्याआधी, किंबहुना त्याला स्पर्शही करण्याआधी त्या विनम्र झाल्या होत्या. त्या गाभार्यात शिरण्यापूर्वी, दारातच पायरीशी झुकल्या होत्या. कुठेतरी आपल्याच आत त्या दादर्याचं, त्यांच्या गुरूंनी 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' घातलेलं मूर्त रूप आठवत, देखत, त्याची पूजा बांधण्यासाठी बळ शोधत राहिल्या. काही क्षणातच त्यांनी मिटल्या डोळ्यांनीच परत सा लावला. आये न बालम.... का करू सजनी, आये न बालम. ती संपूर्ण संध्याकाळ तीन्-चार तास फक्तं 'आये न बालम' ची आळवणी झाली. तरपत बिती मोरी, तुमबिन रतिया.... एका एका शब्दाच्या उच्चाराला, उचलण्याला, स्वरांच्या हेलकाव्यांना, आलापांना, आणि दोन आलापांच्या मधल्या शांततेला, मुरक्यांना, झटक्यांना, तानांना.... या सार्या सार्याला झालेल्या परतत्व स्पर्शाचं भान राखत गात होत्या. त्यांच्या गुरूंनी कधी काळी शिकवलेली, साकार केलेली मूर्त डोळ्यांआड दिसत होती. तिला आता आपल्या श्वासाची फुंकर घालीत प्राण चेतवीत होत्या. त्या दादर्याच्या मूळ रूपाशी एकरूप होण्यासाठी त्यांची स्वरांनी बांधू घातली ती पूजा, ती विनवणी, ते आर्जवं, ती प्रार्थना संपूर्ण संध्याकाळभर माझ्या आजूबाजूला वावरत राहिली. अजूनही कधीतरी 'आये ना बालम' चे स्वर ऐकू आले तरी अवचिता परीमळू लागते, ती संध्याकाळ, माझ्या अवती-भवती वावरली ती प्रार्थना! क्रमश:
|
Daad
| |
| Wednesday, October 03, 2007 - 4:21 am: |
| 
|
या एका अतिशय गुणी कलाकाराला जवळून बघण्याची संधी आली. थोडी जवळीक झाल्यावर वर म्हटल्याप्रमाणे 'आये ना बालम' म्हणण्याचा अत्त्याग्रह केला. माझ्यावर जडल्या लोभाने असेल, किंवा गुरूभगिनीच्या आग्रहाचा परिणाम म्हणा, पण तयार झाल्या. त्यानंतरचा त्यांचा तो भाव, ते आत्ममग्नं होणं मी आधी नुसताच टिपलं, अनुभवलं आणि नंतरच्या गप्पांमध्ये त्यामागची भावना कळून आली. आज आठेक वर्षांनंतर आठवून लिहिताना लक्षात येतय की किती तोकडी पडल्ये, तो अनुभव साकार करायला.
|
Jo_s
| |
| Wednesday, October 03, 2007 - 9:08 am: |
| 
|
व्वा, दाद याला दाद द्यायलाच हवी. छान लिहीलय सुधीर
|
Psg
| |
| Wednesday, October 03, 2007 - 9:24 am: |
| 
|
क्या बात है! तोकडी नाही पडतेस.. तुझं लिखाण म्हणजे शब्दचित्र आहे!
|
Sush
| |
| Wednesday, October 03, 2007 - 9:40 am: |
| 
|
वा अप्रतिम, शब्दच नाहित वर्णन करायला. भेटतात अशा प्रार्थना, पण तुझ्यासारख्या प्रत्येकाला त्या शब्दात नाहि पकडता येत. अशाच प्रार्थना पहायला मिळतात क्रिकेट चि मैच पहाताना, जेव्हा अगदि २ overs मधे १८-२० runs करायचे असतात. ८ जण बाद झालेले असतात. २ विकेत हातात असतात. प्रत्येक जण श्वास रोखुन TV पहात असतो. नकळत काहिन्चे हात जोडले जातात प्रार्थना करण्यासाठी....
|
Chinnu
| |
| Wednesday, October 03, 2007 - 11:56 am: |
| 
|
आह.. दाद तुझा हेवा वाटतोय! आये न बालम सहीच!
|
Itgirl
| |
| Wednesday, October 03, 2007 - 12:06 pm: |
| 
|
दाद, 'आये ना बालम' अतिशय सुरेख. असा अनुभव मिळण पण भाग्याचच. नशिबवान आहत ज्या नजाकतीन ते इथे मांडलय, आणि आमच्या सारख्या वाचकांनाही त्याचा प्रत्यय दिलाय, त्याबद्दल धन्यवाद आणि लेखनशैलीच खूप कौतुक
|
Mahe
| |
| Wednesday, October 03, 2007 - 2:31 pm: |
| 
|
दाद, नेहेमीप्रमाणे खुपच छान वाचता वाचताच मनामध्ये प्रार्थनेला सुरुवात..!! खुपच छान लिहिता भाग्यश्री
|
Daad
| |
| Wednesday, October 03, 2007 - 10:42 pm: |
| 
|
तीन वर्षांमागे भारत भेटीला गेलो आणि ठरवून पंजाब बघितला. पंधरा दिवस भटक भटक भटकलो. नेहमीची 'लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळं' तर बघितलीच पण वाटल्यास अजून एखादा दिवस एखाद्या आवडल्या ठिकाणी काढण्याची flexibility ठेवली होती. अमृतसरला पोचलो आणि कळलं की गुरू ग्रंथ साहेबाला ४०० वर्षं पुरी झाल्याचा महोत्सव चालू आहे. व्वा! पर्वणीच! सकाळी नऊ-दहा वाजताच सुवर्णमंदिरापाशी पोचलो आणि हजारोंची अलोट गर्दी बघितली. जरा हबकलोच. पण कुठेही कचरा नाही, घाण नाही, शिस्तीत सगळं चालू आहे. हजारोंनी भाविक येताहेत, पायातलं काढून ठेवायला सोय आहे, प्रशस्त आवारात झाड-पूस चालू आहे, कलकलाट नाही, गोंधळ नाही. मंदिराच्या मुख्य कमानीशी झुळझुळणार्या पाटत पाय धुवून आत प्रवेश केला. सकाळच्या सोन प्रकाशात झळाळणारा सुवर्णमंदिराचा कळस, त्याला पोचणारी संगमरवराची वाट, त्याच्या दो बाजूंची नक्षी, इतर संगमरवरी इमारती, त्यावरचं नकसकाम, भोवतालचं पाणी, 'सत् श्री...' चा गजर करीत त्यात डुबक्या मारणारे वीर आणि पाई, अवतीभवती कोंदून राहिलेला भक्तिभाव.... काय बघू अन काय नाही असं झालं. इथे 'सिंगां'ची आणि 'कौरां'ची रांग वेगवेगळी होती. मंदिरातून ऐकू येणारं कीर्तन, शबद ऐकत, मंदिराची महिरप निरखत पुढे पुढे सरकत होते. सवय नसल्याने डोक्यावरचा दुपट्टा सावरण्यात अर्धा वेळ जात होता. कधी दाराशी येऊन पोचले कळलच नाही. इतक्यात कसं कोण जाणे पण लक्षात आलं की आपला पाय कुणालातरी लागणार आहे. चटकन थांबून खाली बघितलं तर एक भल्या घरची दिसणारी, थोडी वृद्धशी बाई आपल्या दुपट्ट्याने दारासमोरची पायरी पुसत होती. मुंबईहून आलेल्या मला पहिल्यांदा वाटलं की भीक मागण्याचा एक प्रकार असावा. आजूबाजूला कुठेही पैसे पडलेले दिसत नव्हते, इतकच काय पण तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. मागचीने पाऊल पुढे घातल्याने मला आत पाऊल घालावच लागलं. मागे वळून वळून बघत राहिले. प्रत्येक दोन माणसांच्या मध्ये ती बाई पायरी पुसत होती. असेल, काहीतरी नवस्-बिवस असं स्वत्:ला समजावत पूजेचा छोटा सोपस्कार पार पाडला. आत गादी समोर शबद गाणारा एक धाकुटा वीर आणि त्याच्याबरोबर तबला वाजवणार्या त्याहुनही धाकुट्याचं मनोमन कौतुक करीत बाहेर आले. उत्सुकता स्वस्थ बसू देईना म्हणून परत एक फेरी मारली. त्या दरवाजाशी ती बाई अजून पुसतच होती. लोकांच्या ओल्या पायांमुळे ओला किच्चा झालेला दुपट्टा जवळच्या एका भांड्यात घट्ट पिळून पुन्हा सुरू. तिला निरखत तिथेच उभी राहिले. इतक्यात एक तरूण मुलगी येऊन तिच्या जवळचं ते पाण्याचं भांडं घेऊन जाऊन रिकामं करून, परत घेऊन आली. ती वळून जाणार इतक्यात मी माझ्या उत्सुक ("भोचक") स्वभावानुसार तिला थांबवून विचारलं, की माजी काय करतायत, काही व्रत, नवस आहे का? हसून ती मुलगी म्हणाली, 'नव्हे, ही नुसतीच सेवा आहे' आणि पळालीही. मागे नवर्याची हाक ऐकू आली म्हणून मीही वळले. सारा दिवस त्या माजींचा विचार काही पाठ सोडेना. कुणासाठीतरी, कशासाठीतरी ही सेवा आहे हे नक्की. रात्री रोषणाईत न्हाणारं मंदिर बघायला परत एकदा गेलो. अगदी थोडी माणसं होती आजूबाजूला. संपूर्ण मंदीरावर विजेच्या दिव्यांची रोशणाई केली होती. शिवाय नवल म्हणजे ठाई ठाई दिवट्या पाजळून लावल्या होत्या. भवतालच्या पाण्यात पडलेला ह्या चित्राचा झळाळ अपूर्व होता. हालू नये, बोलू नये असं आपसूकच झालं. नि:शब्द होऊन पाण्यात पाय सोडून नुसतेच बसून राहिलो. त्याच पायरीवर जरा बाजूला सकाळच्या माजी बसल्या होत्या. दोन मोठे मुलगे, सुना, तरूण नातवंडही भोवती दिसत होती. सकाळी मला भेटलेली चांदणी नात असावी. माजी तिथेच बसल्या, बाकीचा परिवार दर्शनाला गेला असावा. आता मात्रं मला राहवेना. नवर्याला आणि लेकाला संभ्रमात सोडून मी जाऊन खालच्याच पायरीवर बसले. माझं नाव सांगितलं, मुंबईहून आलोत, पंजाब हिंडतोय वगैरे सांगितलं. दिवसाच्या समारंभाबद्दल बोलले. मग साहजीकच समोरच्या दृश्याबद्दल आणि इथे येताच कशी आतली खळमळ थांबत्ये, शांत वाटतं वगैरे बोलणं झालं. न राहवून मी विचारलच की आज सकाळी मंदिराची पायरी साफ करताना पाहिलं. हे वेगळं आहे. काही व्रत करताहात का? माजी हसल्या. म्हणाल्या, व्रत कशासाठी? काही मिळवण्यासाठी, मागण्यासाठीच करायचं ना. मीहून आजवर काही मागितलं नाही. गुरूंना आपल्यापेक्षा जास्त कळतं, म्हणाल्या. ते देतात तेच आपल्यासाठी 'सही' आहे, 'सत्' आहे.' 'मग ही सेवा?' मी अजून साशंकच होते. त्या सेवेमागचा कार्यकारण भाव अजून कळलाच नव्हता. 'सेवा गुरूंची नाही, त्यांच्या पायाशी आलेल्या भक्तांची आही, बेटी. इथे आलेल्या, प्रत्येकाची मला सेवा करायची आहे. 'सत' मार्गाला लागलेल्या प्रत्येक भक्तामुळे ही 'जमी' स्वर्ग बनणार आहे. त्या प्रत्येक सन्मार्गीची सेवा आहे ही'..... मग हळूच म्हणाल्या, 'तसं मागत नाही असं नाही....... मागते ना, जरूर मागते. गुरूंच्या दारी आलेल्या आणि येण्याची चाहत असलेल्या माझ्या प्रत्येक बेटा-बेटीला शांती आणि समाधान मिळूंदे, म्हणते.... बघ, तुझ्यासाठीसुद्धा मागितलं!' असं म्हणून बोळकभर हसल्या. मला काय बोलावं सुचेना. हा तर प्रत्येक आईचा जोगवा. ही माऊली जगातल्या प्रत्येकासाठी तो मागुन राहिली. नुसतेच त्यांचे पाय शिवून आणि सुखी रहाण्याचा आशिर्वाद मिळवून परत आले. ही पंजाबी माऊली, एक भरल्या घरातली वृद्ध आई! देव दिल्या आयुष्यातल्या कर्मांवरल्या नितांत विश्वासामुळे तिचं स्वत:साठी असं काहीच न मागणं अन, जगातल्या हर लेकरासाठी तिचं पदर पसरणं, परब्रम्हाभेटी आलेल्या प्रत्येक पुंडलिकासाठी, 'जमी' घासून्-पुसून ठेवण्याची तिची सेवा.... हे सारं मला खूप भिडलं, खूपच खोलवर भिडलं! सध्यातरी समाप्त!
|
दाद, सुरेख लिहीले आहेस. लिखाणाच्या शैलीमुळे गोनिदांची आठवण झाली.
|
Maanus
| |
| Thursday, October 04, 2007 - 2:14 am: |
| 
|
निरीक्षण चांगले आहेच, पण निरीक्षण एकदम नीट शब्दात उतरवले देखील आहे. good तुम्ही जास्त भावनीक (हळव्या?) दिसता असे म्हणनार होतो, पण लगेच गेल्या महीन्यातला विठ्ठल आठवला
|
|
|