जोरात कोसळणारा पाऊस. रात्र चढत जाणारी.. पाणीच पाणी सगळीकडे, इतका वेळ गजबजणारं शहर शांत दुलईत झोपलेलं. तो मात्र तिथेच कुडकुडत का होईना पण चाललेला. सायकल ढकलत नेत. त्या गर्द अंधारात हलकेच ओरडत. "चाय काफ़ी सिगरेट." वरपासून तो खालपर्यंत भिजलाय. अंगावरचा रेनकोट तसाही काही उपयोगी नाही. उद्या त्याला परत दुसर्या कामावर जायचय. पण तरीही तो रात्री तीन वाजतासुद्धा एकटाच फ़िरतोय. मुलाला शाळेत घालायचय, बायकोला नवीन साडी पाहिजे, गावाला पण पैसे पाठवायचे आहेत. म्हणूनच तर तो दिवसाचे वीस तास राबतोय. अपुर्या झोपेने डोळे खोल झाले आहेत. तब्बेत खालावलेली आहे. कधी काळी मित्रमंडळीमधे ग्रूपची "जान" असलेला तो सध्या काम असलं तरच बोलतोय. त्या कोसळणार्या पावसात. सगळ्या संसाराचं इझं खांद्यावर घेऊन वाकलेल्या आणि तरीही गुणगुणनार्या. बिल्डिंगच्या कडेने उभ्या असलेल्या त्या चायवाल्याला.... कधी पाहिलय तुम्ही? ====================== ते चौघे रेस्टॉरंटमधे येतात. आईबाबा. पन्नाशीला आलेले. कॉलेजला जाणारी मुलगी. आणि मोठा मुलगा. त्याचा आज पहिला पगार झालाय. आईच्या चेहर्यावरचं कौतुक ओसंडून वाहतय. आजवर कुणी तिला विचारलं नव्हतं. आज लेक विचारतोय. "काय मागवू आई?" तिच्या डोळ्यासमोरून त्याच्यासाठी जागलेल्या कित्येक रात्री तरळून गेल्या. समोरचं अस्पष्ट कसं दिसायला लागलं तेच समजलं नाही. "तुला काय हवं ते मागव. मला काय समजतय त्यात." ती मनाशीच हसतेय. इतक्या विक्षिप्त नवर्याबरोबर संसार केलाय. त्याला सोडून जायचं तर कुठे जायचं हा प्रश्न होता. सोबत पांढरपेशा समाजाची भिती. आज ती कुणालाच घाबरत नाही. तिच्या मुलाने तिला झिजताना पाहिलय. तो संभाळेल आता तिला.... त्या छोट्याशा रेस्टॉरंटमधल्या अंधुक प्रकाशात. पहिल्यादाच मेन्युकार्डावरच्या किमतीची पर्वा न करता ऑर्डर देणार्या त्या मुलाला. आणि रुमालाआडून हलकेच डोळे पुसणार्या त्या आईला.. कधी पाहिलय तुम्ही? ============= तो थिएटरच्या बाहेर उभा आहे. ती अजून आलेली नाही. गेले तीन वर्षे ते एकमेकाना भेटतायत. अर्थात चोरून. तिच्या घरी समजलं तर धडगत नाही. पिक्चर चालू व्हायला अजून पाच मिनिटे आहेत. तो नेहमीच्याच ठिकाणी उभा आहे. त्याच्या चेहर्यावर तिची प्रतिक्षा दिसतेय. हाततली सिगरेट विझवत तो तिचा मोबाईल तो परत ट्राय करतोय. कुणीच उचलत नाही आहे. बास झालं आता हे चोरून भेटणं. नोकरीला लागून वर्ष होत आलं. आज ती आली की पुढचं काय ते ठरवून टाकू. तो परत एकदा हातातल्या घड्याळाकडे बघत वैतागतो. वाटेत येतानाच तिला काही झाले असेल तर... अपघात वगैरे... शेवटी नाईलाजाने तिच्या घरच्या नंबरवर फोन करतो. फोन तिच्या भावाने घेतलाय. त्याने काही बोलायच्या आधीच तो पलिकडून ओरडतो. "खबरदार इथे फोन करशील तर. तंगडी तोडून ठेवीन." एखादी वीज पडावी तसा त्याचा चेहरा झालाय. हताशपणे तो तिथेच बसलाय. त्याच्या आजुबाजुचे सगळे हसत खेळत फ़िरतायत. तो कितीतरी वेळ तिथेच बसलाय. आज मुद्दाम तिने गिफ़्ट केलेला शर्ट घातलाय. थिएटरच्या पायर्यावर बसलेल्या त्याला. आता काहीतरी करायचंच हे ठरवत असलेल्या त्याला..... कधी पाहिलय तुम्ही? ================= ती स्वत्:शीच हसत बाहेर आलेय. रिक्शावाल्याला "स्टेशन" असं सांगतानासुद्धा तिला हसू फ़ुटतय. नवर्याला ऑफ़िसमधे फोन करावं की करू नये हा तिला प्रश्न पडलाय. बिच्चारा!! कामात असेल आता...... पण तरी त्याला समजल्यावर किती खुश होईल तो.. स्टेशनवर आलावर लक्षात येतं की लोकल एका मिनिटात निघेल. ती धावते.. मग अचानक तिच्या लक्षात येतं... आता धावपळ करायची नाही. स्टेशनमधून त्या निघणार्या ट्रेनकडे बघत हसणार्या, हातात प्रेग्नन्सीचा पॉझिटीव्ह रीपोर्ट असणार्या त्या इवलाल्या पाकिटाकडे बघत लाजणार्या तिला कधी पाहिलय तुम्ही?
|
Itgirl
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:13 am: |
|
|
किती छान पकडले आहेस हे क्षण नंदिनी.. खूपच सुरेख
|
तिला आज फ़ार राग आलाय. तिच्या वर्गातल्या कुणीतरी तिचं दप्तर फ़ेकून दिलय. ती मधल्या सुट्टीत बाहेर खेळत असताना. ती धावत तिच्या दादाकडे गेलीये. तिचा दादा पाचवीला आहे. मुसमुसत त्याला ती सांगते. तो तिच्या वर्गात येतो. अजून बाई वर्गात आलेल्या नाहीत. प्रत्येकाला तिचं दप्तर कुणी फ़ेकलं ते दरडावून विचारतो. तिसरीच्या वर्गातली ती मुलं घाबरून गप्प आहेत. पण त्यापैकीच कुणीतरी एकजण त्या दप्तर फ़ेकणार्याचं नाव सांगतोच. तिचा दादा त्या वात्रट मुलाला चांगलंच ओरडतो. "परत असं केलंस तर हेडमास्तरांकडे नेईन" हे पण सांगतो. इतका वेळ रडून रडून तिचे डोळे सुजले आहेत. दादा वर्गात सर्वाना सांगतो "परत माझ्या बहिणीच्या वाट्याला जाल तर बघा..." तिला दादा तारणहार वाटतो. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत कसलीच भिती नाही हे जाणवतं. राखीचा दिवस नसतानाही तिला ओवाळणी मिळते. दादा वर्गातून जायच्या आधी तिच्या केसावरून हात फ़िरवून जातोय. त्या चिनुकल्या बहिण्याच्या गालावरून वाहणार्या आसवाना पुसणार्या त्या भावाला.... कधी पाहिलय तुम्ही? ================= ते सर्वजण खूप हसताहेत. खरंतर हसण्यासारखं काहीच घडलं नाही.. पण तरीही.. ती आज कुठेतरी इंटरव्ह्युला गेली होती. तिथल्या गमतीजमती ती सर्वाना सांगत बसलेय. रात्रीची साडेअकरा वाजून गेलेत. उद्या रविवार आहे. त्यामुळे उद्या उठायचं टेन्शन नाही. तिच्या रूममधे बसून गोंधळ घालेणे हेच काम चालू आहे. ती सर्वाना रीसेप्शनिस्ट कसं बोलत होती. प्रत्येक प्रश्नाला तिने "मनातल्या मनात" काय उत्तरं दिली हे सांगतेय. हॉस्टेलच्या या ग्रूपमधे बसून ती हसतेय. पण मनात ठाऊक आहे, हा जॉब तिला नाही मिळाला. घरून पैसे येणं केव्हाच बंद झालय. तीन महिने झाले आता हॉस्टेलपण सोडावे लागेल...... तिचे मन तिच्या इच्छेविरुद्ध भरून यायला लागतय... ".. आणि तो वॉचमन सारखा माझ्याकडे बघत होता. मी मनात म्हटलं.... " परत एक हास्याचा फ़वारा फ़ुटलाय. त्यातच हलक्या हाताने स्वत्:छे डोळे पुसून हसणार्या तिला... कधी पाहिलय तुम्ही? ========================= तिला सर्वजण खडूस सासू म्हणतात. तशी ती त्या सवापेक्षा लहान आहे. पण तिचा हुद्दा मोठा आहे. अर्थात इतक्या सर्व पुरुषाची ती एकटीच बॉस आहे. आणि ती अजून "मिस" आहे. याची तिला जाणीव आहे. कायम इस्त्रीचे कपडे वापरून वापरून असेल कदाचित पण तिचा चेहरापण रोज इस्त्री मारल्यासारखा दिसतो. आजही मीटिंगमधे ती तशीच बसलेय. बाकीचे बडबड करत आहेत. ती शांतपणे ऐकतेय. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. खरंतर मीटिंगमधे फोन आल्यावर ती कधीच घेत नाही. पण आज तिने हा फोन घेतला. तिच्या कपाळावरची आठी स्पष्ट दिसतेय. पलीकडून कोण काय बोललं ते समजलं नाही. पण ती मात्र ओरडली. "काय सांगतेस काय? केव्हा?" आणि बोलतच ती मीटिंगच्या बाहेर गेली. पहिल्यादा तिला हसताना त्यानी पाहिलय एखाद्या लहान मुलीसारखी. इतके दिवस "बॉस" म्हणून वागणारी आज मात्र ती फ़क्त एक मैत्रीण आहे. तिच्या बालमैत्रीणीचं लग्न ठरलय. खूप खुश असणार्या. मैत्रीणीच्या लग्नाला काय करायचं यात हरवलेल्या.. मीटिंग ऑफ़िस हे सर्व विसरलेल्या तिला.. कधी पाहिलय तुम्ही? ======================== किती भावना. किती चेहरे. किती प्रसंग. किती क्षणचित्रं. प्रत्येक भाव डोळ्यात उतरतो. चेहर्यावर उठतो. मनातली सर्व गुपिते घेऊन. हलकेच. नकळत. कोण काढतं ही चित्रे? क्षणाक्षणाला बदलणारी.. माहीतही नसतं की बाजूचाच चेहरा इतक्या कल्लोळात असेल. भावनामधे असेल. आपण आपल्याच धुंदीत असतो. विसरून जातो की आपला चेहरापण असेच बोलतोय. असेच बोलके चेहरे... लाजरे चेहरे, रडके चेहरे, हसरे चेहरे.. स्वत्:चेच चेहरे... कधी पाहिलय तुम्ही? ========== समाप्त ==========
|
Zakasrao
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:34 am: |
|
|
झकास लिहिल आहेस. हे असल काहितरी छान वैचारिक तु लिहिलेल वाचल की माझ्या चेहर्यावरच समाधान पाहिलयस कधी? बर आता थोडा माझ्या स्वाभावाला अनुसरुन TP आज काय खावुन आली होतीस? नाय एकदम शहाण्यासारख लिहिलस
|
Gobu
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:41 am: |
|
|
नन्दिनी, सुन्दरSSSSS! किती दिवसानन्तर असे दर्जेदार साहीत्य वाचतोय अभिनन्दन मुली! तुझ्या वयाच्या मानाने तुझ्या लिखाणात प्रचन्ड प्रगल्भता आहे! आणि प्रतिभा तर वादातीत आहे! लिहीत रहा..
|
Manjud
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:42 am: |
|
|
नंदिनी सुरेख!! फारच छान लिहिलयस...... झ, भाद्रपदाच्या आरंभालाच सुंदर असं लिखाण वाचायला मिळालं.
|
Monakshi
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:44 am: |
|
|
जियो नंदिनी, सगळे प्रसंग कसे डोळ्यासमोर उभे रहातात. खूप छान शब्दात मांडलं आहेस.
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:46 am: |
|
|
सुंदर नंदिनी, हे सगळे न सांगता समजण्या इतके संवेदनशील मन असणार्या तुला हे दिसायलाच हवे.
|
Swa_26
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:01 am: |
|
|
नंदिनी... केवळ अप्रतिम!! ...
|
Mankya
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:12 am: |
|
|
नंदिनी ... एक नंबर गं .. एक नंबर लिखाण ! कायमच जवळ ठेवावं अस लिखाण मिळालं ! व्वाह ! माणिक !
|
पॉश एकम मस्त लिहील आहेस
|
Varsha11
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:33 am: |
|
|
नंदिनी खुपच छान. तुझ्या सगळ्याच कथा छान असतात. ती रेहान लवकर पुर्ण कर ना प्लिज.
|
Ladaki
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:44 am: |
|
|
१०००वी पोस्ट... हाय सगळ्यांना... थोडसं काहीतरी वेगळं लिहीतेय... ही माझी १०००वी पोस्ट आहे... ती मायबोलीवरुन वाहुन जाऊ नये... अशी माझी ईच्छा होती... म्हणून थोडा विचार केल्यावर लक्षात आले... नंदिनीचे घर हे माझेच आहे त्यामुळे मी ही पोस्ट ईथे टाकु शकते... नंदिनीने मायबोलीवर थोडफार लिखाण केलय... तिचं प्रत्येक लिखाण तुम्ही वाचलत... तिचे 'विठ्ठल'हे ललित मनापसुन आवडल्याची कबुली दिलीत... तिची 'रेहान' कादंबरी ईतकी ताणली गेलीये...तरीही तुम्ही सगळेजण एकदम patiently कादंबरी वाचताय... आपल्या प्रतिक्रिया दिल्यात... वेळोवेळी तिला मार्गदर्शन केलेत... याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत... माझ्या मैत्रीणीला नेहमी असेच प्रोत्साहन देत रहा... तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आजपेक्षा दुसरा चांगला दिवस... शायदही मिलता... ... //१२ सप्टेंबर...
|
Zaad
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:45 am: |
|
|
आवडेश!मस्त आहे. मजा आली वाचताना
|
Psg
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:57 am: |
|
|
साधंसं पण अगदी पटेल असं लेखन! शेवट सर्वात जास्त आवडला..
|
सर्वाना धन्यवाद.. लाडके, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अजून एक धन्यवाद. बरं ते मधी इतके टिंब टिंब टाकले आहेस. (कंसातली वाक्ये लिहायची होती का तुला तिथे?)
|
Ajai
| |
| Wednesday, September 12, 2007 - 11:05 am: |
|
|
ललित, कथा कादंबरी..गुलमोहरवर चौफेर लिहताना कुणाला कधी पाहिलय तुम्ही?..मस्तच
|
Krishnag
| |
| Wednesday, September 12, 2007 - 11:18 am: |
|
|
नंदिनी, अचूक शब्दात मांडलेस सारे!! खुपच छान!!
|
Abhi_
| |
| Wednesday, September 12, 2007 - 11:41 am: |
|
|
मस्त!!
|
Shraddhak
| |
| Wednesday, September 12, 2007 - 12:22 pm: |
|
|
नंदिनी, सुरेख लिहिलंयस. आवडलं.
|