Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 04, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » जिवति » Archive through September 04, 2007 « Previous Next »

Dineshvs
Monday, September 03, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐका जिवतिदेवी तुमची कहाणी | आटपाट नगर होतं | तिथे राजा राणी सुखाने रहात होते | राजा हुशार होता, राणीही हुशार होती | दोघेही आयटीवाले होते || १ || राजा मोठ्या कंपनीत अधिकारी होता | राणीही मोठ्या कंपनीत अधिकारी होती | द्रव्य होतं धन होतं | गाडी होती बंगला होता | तरी राजा दुःखी होता | राणीही दुःखी होती || २ || राजाराणीला मुळबाळ नव्हते | राणी राजाकडे खंत व्यक्त करी | राजा म्हणे, दोघे डॉक्टरकडे जाऊ | तपासण्या करु, औषधपाणी करु | दोघे डॉक्टरकडे गेले, तपासण्या केल्या || ३ || डॉक्टर म्हणाले तसा काहि प्रॉब्लेम नाही | दिसामागुन दिस गेले, मासामागुन मास गेले | राणीला काहि मूल होईना | राजा राणीची प्रगति झाली || ४ || राजा अमेरिकेत तर राणी जपानमधे | दोघे एकत्र क्वचितच असत | राजा नसताना राणीला एकटे वाटे | राणी नसताना राजाला एकटे वाटे || ५ || अश्यात एकदा काय झाले | राणीकडे एक स्त्री आली | भल्याघरची दिसत होती | नाकीडोळी नीटस होती, रंगाने उजळ होती || ६ || पदरात एक तान्हुली होती | म्हणु लागली ताई मला काम द्या | धुणीभांडी करीन | सैपाक पाणी करीन || ७ || चोरीमारी करणार नाही | लबाडी करणार नाही | फक्त मला आसरा द्या | माझ्या तान्हुलीला छप्पर द्या || ८ || राणीला दया आली, तिने होकार दिला | राणीने फोटो काढले | बाईची मेडिकल टेस्ट केली | तिचे नाव जगनी होते || ९ || जगनी काम करु लागली | दिवसरात्र राबु लागली | जेवणखाण बघु लागली | आला गेला बघु लागली || १० || तिची तान्हुली गुणी बाळ | दिसामासाने वाढु लागली | रांगु लागली पडु लागली | बोलु लागली खेळु लागली || ११ || राणीला तिचा लळा लागला | राजालाही तिचा लळा लागला | राणीला बाळाची कामना झाली | राजालाही बाळाची कामना झाली || १२ || दोघे परत डॉक्टरकडे गेले | डॉक्टर म्हणाले दोघे बिझी | बाळ होणार कसे तुम्हाला | म्हणाले दत्तक घ्या || १३ || नाहितर दुसरा उपाय सुचवतो | राजाने ऐकले राणीने ऐकले | राजाला पटले राणीला पटले | जगनीला कसे सांगु असे झाले || १४ || तिला ते डॉक्टरकडे घेऊन गेले | डॉक्टरानी तिच्या टेस्ट केल्या | एलायझा टेस्टही केली | म्हणाले स्त्री योग्य आहे || १५ || तिला कसला आजार नाही | तिच्याही बोलुन घ्या, | करार करु, पैसे देऊ | राणी जगनीला म्हणाली || १६ || तु एक स्त्री मी एक स्त्री | जसे तुला बाळ आहे तसे मलाही हवे | माझ्यावर कृपा कर, होकार दे | द्रव्य देते पैसा देते || १७ || डॉलर देते येन देते | राजा म्हणाला, मला दान दे | जगनी म्हणाली मी तयार आहे | मला पैसा नको, अडका नको || १८ || कायदेशीर करार करा | माझे मागणे मग मागीन | आधी तुमची हौस पुरवीन | राणी आनंदली राजाही आनंदला || १९ || डॉक्टरानी तयारी केली, करार केला | राणीचे बीज राजाचे बीज एकत्र केले | प्रयोगशाळेत वाढवले, शीतपेटीत जोपासले | जगनीच्या गर्भाशयात रोपण केले || २० || जगनी परत पोटुशी झाली | राणीने तिची बहीणीगत काळजी घेतली | राजानेही बहिणीगत काळजी घेतली | डॉक्टरानी वैद्यकिय काळजी घेतली || २१ || जगनीच्या सोबतीला दुसरी बाई ठेवली | जगनीला काम करु देऊनासे झाली | जगनी म्हणे मला सवय आहे | काम करु द्या, बाळ नीट वाढेल || २२ || राजाराणीचा गर्भ जगनीच्या पोटात वाढु लागला | जगनीची तान्हुली पण वाढु लागली | राजा तान्हुलीशी खेळु लागला | राणी तान्हुलीशी खेळु लागली || २३ || राणी जगनीला म्हणे माझे बाळ हिच्यासारखे हवे | राजा म्हणे आमचे बाळ असेच हवे | जगनी आनंदली आणि सुखावलीही | राणी जगनीसाठी औषध आणी || २४ || राजा जगनीसाठी टॉनिक आणी | राजा तान्हुलीसाठी खेळणी आणी | राणी तान्हुलीसाठी खेळणी आणी | तान्हुलीलाही त्यांचा लळा लागला || २५ || जगनीनी पैसे घ्यायला मात्र नकार दिला | राणीने काय केले, तिच्यानावे अकाऊंट उघडले | त्यात पैसे भरु लागली | जगनी तेजाळली, अंगाने भरली || २६ || नवमास नवदिस पुर्ण झाले | यथावकाश ती दवाखान्यात गेली | राणीही सोबत गेली | तान्हुली राजाकडेच राहिली || २७ || जगनीला वेणा लागल्या | राणी तिचा हात घट्ट धरुन राहिली | डॉक्टरानी सुलभ प्रसुती केली | गुटगुटीत तान्हुला झाला || २८ || राणीसारखा गोराचिट्ट | राजासारखा नाकेला | राणी आनंदली, रडु लागली | राजा आनंदला नाचु लागला || २९ || राणी म्हणाली जगनीला | जगनी तु माझी सखी खरी | मला सुख दाखवलेस | आमचे आयुष्य उजळवलेस || ३० || राजा म्हणे माझी तु सख्खी बहिणच जणु | तुझे अनंत उपकार कसे फ़ेडू | राणी म्हणे, आता तुझा करार पुर्ण झाला | आता तुझे मागणे माग || ३१ || जगनी म्हणे अजुन थोडे थांबा | मागणे मग मागीन | तान्हुला गोडच होता | राणी घरी असली कि त्याला घेऊन बसत असे || ३२ || राजा घरी असला कि त्याला घेऊन बसत असे | तरिही तान्हुलीला दोघे विसरले नव्हते | तिचेही खुप लाड होत | जगनी सुखावली, भरुन पावली || ३३ || तानुल्यास पाजु लागली | दिसामासाने तान्हुला वाढु लागला | मुठी चोखु लागला हुंकारु लागला | असे चार महिने गेले || ३४ || जगनी म्हणाली राजाराणीला | आता माझे मागणे मागते | राणी म्हणाली काळजी नको | मी तुझे देणे वेगळे ठेवलेय || ३५ || बँकेत ठेव ठेवलीय | जगनी म्हणाली मला नको पैसे | मला दुसरेच काहितरी हवे | कबुल केले आहेत, म्हणुन नाकारु नका || ३६ || राणी धास्तावली, राजाही धास्तावला | जगनी म्हणाली घाबरु नका | मी त्यातली नव्हे | मी एक अजाण बाई || ३७ || शाळेत शिकले होते, दहावी झाले होते | पण माझी आई देवदासी | देवाशी माझे लग्न लागले | जणु गावाशीच लग्न लागले || ३८ || तान्हुलीच्या बाप कोण ते मला माहित नाही | पण माझ्या तान्हुलीला तो नरक नको | तिला दत्तक घ्या, तिला आपली म्हणा | तिला तुमचे नाव द्या, आधार द्या || ३९ || शिक्षण द्या शहाणी करा | माझी आठवण काढु देऊ नका | आई तुझी लहानपणीच गेली असे सांगा | मला उपकार नको दान द्या || ४० || राणी म्हणाली वेडी का तु | तान्हुली पण आमचीच आहे | तुझी इच्छा असेल तर ती इथेच वाढेल | राजा म्हणाला आमचीच म्हणुन वाढवु || ४१ || जगन म्हणाली भरुन पावली | आता मी माझ्या गावी जाते | राणी म्हणाली का गं जातेस | जगन म्हणाली माझी आई थकली || ४२ || तिला कुणी खाऊ घालीना, जेऊ घालीना | राणी म्हणाली जपुन रहा | पत्र पाठव फोन कर | जगन निघुन गेली || ४३ || वर्षामागुन वर्षं गेली | तान्हुली मोठी झाली | तान्हुलाही मोठा झाला | दोघेही शिकले सवरले || ४४ || राजाराणीने कधी भेदभाव केला नाही | एकेदिवशी काय झाले | मदर्स डे होता | तान्हुलीने राणीसाठी पुस्तक आणले || ४५ || तान्हुल्याने पहिल्या कमाईची साडी आणली | राजा हरखला, राणी हरखली | राणी रडु लागली | तान्हुला म्हणाला का गं आई || ४६ || राणी म्हणाली तुमची आई वेगळी | तिला विसरु नका | तान्हुला म्हणाला तूच आमची आई | राजा म्हणाला हिच तुमची आई || ४७ || तसेच दुसरिही एक आई | तान्हुला म्हणाला आम्हाला भेटवा | तिने आम्हाला का सोडले | राणी म्हणाली तिने नाही सोडले || ४८ || दरमहिन्याला फोन करते ती मला | वचन दिले होते म्हणुन गप्प राहिले | आज ते वचन मोडते | तिला भेटा तिचा आशिर्वाद घ्या || ४९ || राजाराणी तान्हुलातान्हुली निघाले | जगनीच्या गावी आले | जगनी हॉस्पिटलात आयाबाई म्हणुन रहात होती | स्वाभिमानाने जगत होती || ५० || तान्हुल्याला बघुन हरखली | तान्हुलीला बघुन हरखली | राजाराणीच्या पाया पडली | राणी तिला उराउरी भेटली || ५१ || तान्हुला म्हणाला घरी चल | तान्हुली म्हणाली आता तु हवीस | जगनी म्हणाली इथेच राहते | सय आली कि येते, सय आलि कि तुम्ही या || ५२ || हातपाय चालताहेत तोवर काम करते | म्हातारी झाले कि न्यायला या | जिथे असेन तिथुन आशिर्वाद देत राहिन | राजाराणीला अंतर देऊ नका || ५३२ || त्याना आईवडिलांचा मान द्या | सगळे रडु लागले | सगळे हसु लागले | राजाराणी सुखाने निवृत्त झाले || ५४ || अशी हि जगनीची कथा | राजाराणीची कथा | तान्हुलीची कथा, तान्हुल्याची कथा | साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण || ५५ ||

Avv
Monday, September 03, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ्युचरिस्टिक!! असं लिहिलं होतं पण एक्च शब्द म्हणून परत आलं.
पैसा, करियर इतकं महत्वाचं होईल का हो? बेसिक इन्स्टिंक्टस नाकारण्याइतकं? तुम्ही आशावादी आहात म्हणून शेवट सकारात्मक केलात की काय? एरवी स्वत्:ला पालकत्वाची संधी नाकारणारे लोक इतक्या संवेदनशीलतेने वागतील ही शक्यता कमीच.

असो. सध्याच्या आयुष्यातून असंही काही निर्माण होऊ शकेल हे खरं.


Dineshvs
Monday, September 03, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Avv अगदी आजच आणंद या गुजराथमधल्या गावी, सरोगेट मदर्स हि प्रथा व्यावसायिकरित्या सुरु झालीय असे वाचले. तब्बल ४२ आया, गरोदर आहेत आणि ३५ मुले जन्मली आहेत. यात सर्व कायदेशीर आहे. या पैश्याच्या विनियोग कसा केला जातो, तेही लिहिले आहे.
म्हणजे फार पुढच्या गोष्टी नाहित या. फक्त मुले मोठी झाल्यावर त्यानी कसे वागावे, यावर माझे हे सकारात्मक विचार.
थोडे भाबडे वाटतील, नव्हे आहेतच. म्हणुनच हा भाबडा फ़ॉर्म निवडला.


Nandini2911
Monday, September 03, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यात पाणी कधी आले समजलेच नाही.

Itgirl
Monday, September 03, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच ग नंदू, समजलेच नाही डोळ्यात पाणी कधी जमले.. शिकले, सवरलेले समाजातले राजा राणी प्रसंग आला तर असेच वागोत

Psg
Tuesday, September 04, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिले आहे. थोडक्यात पण सगळे! :-) फ़ॉर्म आवडला.

चातुर्मासातल्या कथा अश्या असतात. पण प्रत्येक ओळीला काही बंधन आहे का- जसे एका ओळीत अमुक इतके शब्द, अमुक इतक्या मात्रा असे? कुतुहल आहे..


Manjud
Tuesday, September 04, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, काय लिहू? फारच छान............ एवढेच मी म्हणेन कारण शब्दच सुचत नाहियेत.

आज गोकूळाष्टमीच्या दिवशी कथा वाचायला मिळाली. देवकीचा कान्हा यशोदेकडे वाढला तशीच कथा आहे ही......


Bee
Tuesday, September 04, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेचा form आवडला. पण खरच ही कथा खूप भाबडी झाली आहे..

Mankya
Tuesday, September 04, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा .. Superb !! चातुर्मासातल्या कथेचा फॉर्म असल्यामुळे जास्त आवडली . आजचा काळ पाहता अश्या चांगल्या गोष्टींची काही दिवसांनी कल्पना तरी करू शकू याचीही शाश्वती नाही .
Manjud... देवकीचा कान्हा यशोदेकडे वाढला .. अगदी अगदी !

माणिक !


Kmayuresh2002
Tuesday, September 04, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,छान मांडली आहेस रे कथा.. मांडणी आणि कथासूत्र दोन्ही आवडले

Athak
Tuesday, September 04, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिवतीदेवी तुमची कहाणी शब्दशा सु फळ संपुर्ण
आधुनिक विचार करायला लावणारी
वा दिनेश छानच


Daad
Tuesday, September 04, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, दिनेशदा. एकदम नवीन फ़ॉर्म. गोष्टं छान आहेच पण ह्या फ़ॉर्मात असल्याने अधिक आवडली.

Jaijuee
Tuesday, September 04, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, आमची कहाणी पण काहीशी ह्या राजा- राणीसारखीच रे! :-( पण आम्ही राजा राणीने सरळ ब्रेक घेतला एकमेकांसाठी! कथा भाबडी आहे पण बाज छान आहे आणि आमच्यासारख्या अनेक सॉफ़्टवेअरवाल्यांसाठी खरी असल्याने कनेक्टेबल आहे!

Kanak27
Tuesday, September 04, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा खुप खुप सुन्दर

हे मान्यकि आजचा काल तसा नहि पण चान्गल चान्गल वाचल्यावर मन कस प्रसन्न होत थोड्या वेळासाठी तरि आपण आपले Tensions विसरतो. आज तसच वाटतय. :-) .
मस्त.


Deepa

Maasture
Tuesday, September 04, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच भाबडी आणि ढोबळ आहे ही कहाणी.
आधुनिक जिवती हि कलपना सोडली तर विस्तार, शैली, मांडणी सगळे खूप सुमार आहे.
तुमच्या आधीच्या कथा वाचल्या आहेत. कथेच्या बाबतीत इथल्या उत्तम लेखकांपैकी एक आहात असे म्हणता येत नसले तरी याहून चांगल लिहायची नक्की कपॅसिटी आहे तुमची असे मात्र म्हणता येईल.


Nandini2911
Tuesday, September 04, 2007 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मास्तुरे आले. बर्‍याच दिवसानी आलात. बरे आहात ना? येत जा अधून मधून :-)

Gobu
Tuesday, September 04, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशजी, डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे
अभिनन्दन!


Princess
Tuesday, September 04, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशजी, खुप सुरेख कथा. कथा सांगण्याची तुमची style पण खुप आवडली. प्रत्येक कथेच्या वेळी तुम्ही काहीतरी अनोखा प्रयोग करतात आणि तो वाखाणण्यासारखाच असतो. अशी सुरेख कहाणी सुफळ संपुर्णच होणार.

Bombayviking
Tuesday, September 04, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीतरी नाविन्य आहे. एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. तोड्डा कोई जवाब नही !!!

Jayavi
Tuesday, September 04, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश.........खूप खूप भाबडी कथा आहे.....! मनापासून आवडली. नवा फ़ॉर्म पण आवडला कथेचा. काहीतरी नवं करणं तुझं आजतागायत सुरु आहे हे मात्र कौतुकास्पद आहे




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators