|
Chaffa
| |
| Wednesday, August 22, 2007 - 2:55 pm: |
| 
|
रुढार्थाने ही भयकथा नाही तर गुढकथा या प्रकाराच्या आसपास असलेला हा एक प्रयत्न आहे त्यामुळे...................! *************** वारस!************* सकाळी सकाळी संज्याचा फ़ोन आलेला पाहुन नाही म्हंटलं तरी मला आश्चर्य वाटलंच कारण एकतर हा प्राणी ईतक्या सकाळी उठणार्यातला मुळीच नाही, आणी लवकर उठून मला फ़ोन करणे हा प्रकार त्याच्याकडून होणारच नाही त्याने केलाच फ़ोन तर त्याच्या एखाद्या तथाकथीत मैत्रीणीला असेल पण मला? शक्यच नाही. विचारांच्या तंद्रीतच मी फ़ोन घेतला आणी संज्याच्या शिवराळ भाषेतल्या संभाषणाला तयार झालो. "अविनाश असशील तसा निघुन ये". फ़ोनवरचा संज्याचा आवाज माझ्या विचारांच्या विरुध्द दबका आणी घाबरल्या सारखा होता. हा सुध्दा त्याचा काहीतरी चावटपणा असावा असे वाटून मी त्याच्यावर उखडलो. " यार, संज्या तुला सकाळी सकाळी दुसरा कुणी भेटला नाही काय? मस्त झोपेचं खोबरं केलस!" " अविनाश मी खरंच संकटात आहे फ़ोनवर जास्त काही बोलता येणार नाही तु ताबडतोब ईथे निघुन ये!" बस्स ईतकेच शब्द आणी फ़ोन कट झाल्याचा आवाज. आता मात्र मी चांगलाच विचारात पडलो हा मला ईतक्या विनवण्या करतो आहे म्हणजे खात्रीने तो एखाद्या संकटात आहे पण नक्की कुठल्या? संज्या म्हणजे माझा फ़ार जुना मित्र म्हणजे कॉलेजच्याही आधीचा. दिसायला खरंच देखणा त्यात व्यायामशाळेत जाउन कमावलेले शरीर, भारदस्त व्यक्तीमत्व त्यातच बोलताना ओठाच्या कोपर्यात हलकीशी मुरड घालण्याच्या सवयीमुळे चेहरा कायम मिश्कील दिसे. साला, कॉलेजातल्या आर्ध्या पोरी याच्याच मागे असायच्या! आणि हा देखिल नेहमी पोरींच्या घोळक्यात दिसायचा. वृत्ती एकदम बेफ़िकीर त्यामुळे त्याला तरी कसलेच टेंशन आलेले मला तरी पहायला मिळाले नाही. आणि भिती त्याच्या जवळपास फ़िरकायलाही भित असावी ईतका बिनधास्त वावरायचा पठ्ठ्याने एकदा फ़क्त १०१ च्या पैजेखातर कुणाच्यातरी उतार्यावरचा नारळ फ़ोडून खाल्ला होता. कॉलेज नंतरही जितकावेळ आम्ही एकाच शहरात होतो तेवढ्या काळात त्याने अनेक नोकर्या बदलल्या शेवटी एका खनिजांच्या शोधात असणार्या एका कंपनीत तो एका लठ्ठश्या पगारावर रुजु झाला. त्याच्या त्या फ़िरत्या नोकरीत मग आमची भेट फ़ारशी होत नव्हतीच पण अधुनमधुन फ़ोनाफ़ोनी मात्र व्हायचीच. त्याच संज्याचा हा असला घाबरलेला आवाज ऐकुन मी जरा जास्तच काळजीत पडलो. पण ताबडतोब ईथे निघुन ये "ईथे" म्हणजे कुठे ते माझ्या लक्षात येईना. अखेरीस त्याच्या कंपनीत चौकशी करायची बुध्दी सुचली आणि मला एकदाचा संज्याचा पत्ता सापडला.दुर कुठल्यातरी खेड्यात तो खनिजांच्या शोधात गेला होता. आधी महाराष्ट्राच्या सिमेबाहेर असलेल्या त्या खेड्याचा पत्ता काढून मी तिथे जायला निघालो. सामानाची बांधाबांध करेपर्यंत सुध्दा मला दम निघाला नाही कपडे कसेबसे एका बॅगमध्ये कोंबुन मी स्टेशनकडे धाव घेतली. ट्रेन, बस, एक खाजगी सुमो आणी अखेरीस पायी प्रवास करुन मी एकदाचा संज्या रहात असलेल्या गावात पोहोचलो. शहरीसुविधांपासुन वंचित असलेले ते गाव पाहुन मला मुळीच आश्चर्य वाटले नाही कारण यापेक्षाही मागासलेल्या गावात मी अनेकदा गेलेलो आहे. गावात संज्याचा पत्ता शोधायला बिलकुल कष्ट लागले नाहीत. कारण ईतक्या छोट्या गावात नविन आलेला माणुस आगदी सहज सापडतो. आश्चर्य वाटले ते संज्याची आवस्था पाहून. भारदस्त शरीराचा हा माणुस पार खंगला होता, नेहमी त्याच्या टवटवित चेहरा पहाण्याची सवय असल्याने त्याचा तो फ़िक्कुटलेला चेहरा पहाताना मला नाही म्हंटले तरी भरुन आलेच. मला पहाताच संज्याने गहीवरल्या आवाजात मला हाक मारली, आणि त्याचा तो खोल गेलेला आवाज ऐकुन माझे उरलंसुरंल आवसानही गळाले. दोन्ही हाताने त्याचे खांदे धरुन गदागदा हलवत मी म्हणालो." अरे संज्या दोस्ता काय झालय हे तुझं?". थकल्यासारख्या हलचाली करत संज्याने माझे आपले खांदे माझ्या हातातुन सोडवुन घेतले, इतक्याश्या हलचालींमुळे सुध्दा त्याला त्रास झाल्याचे मला स्पष्ट जाणवत होते. फ़ार अशक्त झाला होता तो, पहाडासारख्या या माणसाचे हे असे कशाने झाले हे मला जाणुन तर घ्यायचेच होते पण प्रथम संज्याला जरा हुशारी वाटायला हवी होती, मी बरोबर नेलेल्या बिस्कीटच्या पुड्यांमधला एक पुडा फ़ोडुन त्याला खाउ घातला. थोड्यावेळाने जरा बरं वाटल्यावर संज्याने त्याची कहाणी मला ऐकवली. " तुला माहीत आहेच माझ्या कामाचे स्वरुप काय आहे, असेच इथुन तिथुन आलेल्या मातिच्या नमुन्यातुन जमिनीतल्या खनिजांचे प्रमाण काढत असताना एका नमुन्यात चांदीचे प्रमाण भरपुर प्रमाणात सापडले. नमुन्याच्या क्रमांकावरुन ती जमिन असलेल्या ठिकाणाचा पत्ता कळला पण तो नमुना कुणामार्फ़त पाठवला गेला ते मात्र कळले नाही त्यामुळे पुढची सॅपल्स मिळवण्यासाठी कुणाला तरी तिथे जाणं भाग होतच ती जबाबदारी शेवटी माझ्यावर येउन पडली आणि मी या गावात आलो." ईथे धाप लागल्यामुळे तो जरासा थांबला पाण्याचा घोट घेउन त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. " ईथे आल्यावर प्रथम माझे काम होते ते आसपासच्या जमिनीतील चांदी आणि ईतर धातुंचे प्रमाण शोधणे, त्या प्रमाणे मी कामही चालु केले पण जवळपासच काय आजुबाजुच्या अनेक मैलाच्या परीसरातही मला कुठल्याच धातुचा अंशही सापडला नाही. अखेर मिळालेली माहीती बोगस आहे असे ठरवुन मी तसा रिपोर्टही तयार करायला घेतला पण माझ्या बुटाला लागलेल्या मातीकडे माझे लक्ष गेले का कुणास ठाउक? मी त्या सॅपलच्या टेस्ट घेतल्या, त्या मातीत मात्र भरपुर प्रमाणावर चांदी सापडली. आता प्रश्न होता तो ती माती नक्की कुठली हाच पण थोडा विचार केल्यावर मला त्याचेही उत्तर सापडले. मी सगळ्यात शेवटी फ़क्त माझ्या घराच्या म्हणजे आत्ता आपण बसलोय त्याच्या पाठीमागे नदी पर्यंत चालत गेलो होतो आणि मातीत वाळूचे कणही सापडले होतेच याचाच अर्थ मला चांदीची ती खाण सापडलीच होती आता फ़क्त थोडेसे खोदकाम करुन मातीच्या खालच्या थरातही चांदी सापडते की नाही ईतकेच पहायला हवे होते कारण नदीच्या जवळपासच्या जमिनीत वरच्यावर चांदीसारखे धातु सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठूनच मी गावात जाउन खोदकाम करायला मजुर मिळतायत का याची चौकशी केली आणि मला पहीला धक्का बसला, ईथे खोदकाम करायला यायला एकही माणुस तयार झाला नाही, या बाजुचा लौकीक फ़ारसा चांगला नाही हे मला गावात आल्या आल्याच कळले होते. आगदी या घरात मी राहू नये यासाठीही गावातल्या लोकांनी माझी समजुत काढायचा प्रयत्न केला होता. पण गावातल्या अंधश्रध्दा मला आता परीचयाच्या आहेत त्यामुळे मी बेफ़िकीरपणे ईथे रहायला लागलो त्याचा एक फ़ायदाही झाला तो म्हणजे वेळी अवेळी मला कामात डीस्टर्ब करायला कुणिही येत नव्हते, पण ते अवेळी ईथे दिवसाढवळ्याही खोदकाम करायला माणसे मिळेनात. शेवटी मोठ्या मिनतवारीने भरपुर बक्षीसिचे आमिष दाखवुन मी काही माणसे मिळवली आणि खोदकाम सुरु केले साधारण दहा फ़ुटाचा खड्डा खणायचा होता दोन दिवस पुष्कळ होते ईतक्या कामाला, साधारणत बारा साडेबाराच्या दरम्यान मजुरांपैकी एकजण घामाघुम होउन माझ्याकडे आला त्याच्या हातात एक पेटी होती जवळपास एक फ़ुट बाय सहा इंचाची ती म्हणे त्यांना खोदताना सापडली होती, सर्वसाधारणपणे असला माल हा मजुरांच्यात आपापसात वाटणी करुन संपवला जातो पण शेवटी त्या जागेची भीती लोभावर मात करण्याईतपत दाट होती तर! मला मात्र उत्सुकता आवरता आली नाही आणि मी ती पेटी उघडली, कसलेतरी भेंडोळे आत बघुन माझा थोडा हिरमोड झाला, साला इतके सांभाळुन ठेवले काय होते तर एक हात लावताच भुगा भुगा होणारा कागदासारखा तुकडा?" संज्याचा श्वास एव्हाना जलद झाला होता मी हाताने त्याला थांबायची खुण केली पण उत्तेजीत होवुन तो बोलतच राहीला. " रागानेच मी ते भेंडोळे भिंतीवर भिरकावले आणि भिंतीवर आपटताच जिर्णशीर्ण झालेल्या त्या पत्रावळीचा भुगा होवुन आतुन टपकन त्यातुन काहीतरी पडले. जवळ जाउन पाहीले तर लालजर्द रंगाचा एक खडा, हीरा?.... हीराच असावा तो! झटकन मी तो उचलला आणि आजुबाजुला पाहीले कुणीच माझ्याकडे पहायला नव्हते, आणि कुणी पाहीले असते तर मी काही चोरी करत नव्हतो पण आपली नसलेली एखादी वस्तु हाताळताना थोडं अवघडल्यासारख होतच. चांगल्या मुठी एवढ्या आकाराचा तो खडा पहाताच माझ्या अंगातुन एक शिरशीरी निघुन गेली." त्याचं बोलणे मी मन लावुन ऐकत होतो सहाजीकच माझ्या मनात प्रश्न उमटला ईतकं सगळं चांगल झालेलं असताना संज्याची ही अवस्था का?, "माझ्या या अवस्थेला कारण काय तेच मी तुला आता सांगणार आहे" माझ्या मनातला प्रश्न वाचल्यासारखा संज्या म्हणाला. " त्याचा संबंध या खड्याशी आहे की नाही ते मला माहीत नाही पण हा खडा सापडल्यानंतर एकदोन रात्रीतच मला ती अशुभ स्वप्न पडायला लागली, एक रखरखीत वाळवंट जवळच समुद्र असावा कारण त्याची गाज स्पष्ट ऐकु येते आहे आणि काही कळायच्या आतच माझ्या पाठीवर चाबकाचा फ़टका बसतो आणि मला माझ्या कामाची सुरुवात करावी लागते आणि मी जवळ खणुन काढलेल्या दगडांनी माझे घमेले भरुन पुढे चालू लागतो, मला फ़क्त ईतकेच कळते की मी जर हे काम केले नाहीत तर त्याचे परीणाम वाईट असतील म्हणजे नेमके कसे ते नाही कळत पण खुप वाईट अस काहीतरी असेल ईतके मात्र जाणवते. त्या तापत्या उन्हात काम करताना माझ्या घश्याला कोरड पडते पण पाणी मिळेल असे काहिही लक्षण दिसत नाही मी आजुबाजुला नजर फ़िरवतो तिथे अनेक स्त्री-पुरुष मला अशी कष्टाची कामे करताना दिसतात त्यातले काहीजण तर एखाद्या श्रीमंत घराण्यातले असावेत असे जाणवते त्यांच्या अंगावरच्या एकेकाळी भरजरी असतील अश्या कपड्यांच्या आता चिंध्या झालेल्या दिसताहेत. पुन्हा एकदा पाठीवर जिवघेणी वेदनेची रेषा चमकुन जाते आणी मी पुन्हा कामाला लागतो. दिवसभर त्या तापत्या वाळवंटात पाठीवर फ़टकारे खात मी काम करतो हळूहळू दिवस मावळतो आणि काम थांबल्याचा ईशारा होतो.......... आणि त्याच क्षणी माझे डोळे उघडतात आणि मी स्वत कडे पहातो तर सगळे अंग धुळीने माखलेले, कपडे फ़ाटलेले हाताला फ़ोड आल्याने होणारी आग आणि पाठीवर हे अंगाची लाही लाही करणारे चाबकाचे वळ असे म्हणत संज्याने माझ्याकडे पाठ वळवली आणी ईतकावेळ अंगावर असलेले ब्लॅकेट बाजुला केले त्याच्यी सगळी पाठ त्या लालभडक दिसणार्या वळांनी भरली होती काही ठिकाणीतर जखमा मांस बाहेर दिसेल ईतपत खोल गेलेल्या दिसत होत्या. थोडक्यात संज्या सांगत असलेल्या त्या भयानक जागी तो जाउन आल्याचे हे पुरावेच होते, " पण हे सगळे किती दिवसांपासुन चालले आहे?" मी संज्याला विचारले खोल गेलेल्या आवाजात संज्या म्हणाला " गेला महीनाभर तरी हा प्रकार चालु आहे प्रत्येकवेळी झोप लागल्यावर हेच स्वप्न पुढे चालू रहाते आत्तापर्यंत मला ईतकेच कळलेय की ती जागा म्हणजे एक चांदीची खाण आहे." लहान मुला सारखा मुसमुसत संज्या म्हणाला "खुप खुप त्रास होतो रे! गेले कित्येक दिवस मी पुरेसा झोपलो नाहीये रे, झोपेची भितीच वाटते कायम जागा रहायचा प्रयत्न करत असतो पण चुकुन कधितरी डुलकी लागतेच आणि पुन्हा तिच जिवावरची मेहनत आणि फ़टकारे". संज्याची ती हकीकत ऐकुन मी तर पार हतबध्द झालो दिवसेंदिवस न झोपता रहाणे आणि पुन्हा झोप लागताच हे असले प्रकार, संज्याची ही आवस्था झाली यात काही वेगळे नव्हते. दुसरा कुणी असता तर हे सगळे मनाचे खेळ आहेत असे समजुन मी त्याची समजुत घातली असती पण संज्याचा बद्दल मी हा विचारही करु शकत नव्हतो कारण त्याच्या सारख्या खंबिर मनाच्या आणि बेडर स्वभावाच्या माणसाच्या बाबतीत असे घडणे शक्य नव्हते, बरं मी काही मानसशास्त्र जाणत नाही पण स्वप्नांचा प्रभाव माणसाच्या शरीरावर पडत नाही ईतके तरी मला नक्कीच समजत होते. पण आता समोर दिसत होते त्यावर विश्वास ठेवणे भाग तर होतेच पण त्या भयंकर यातनांतुन माझ्या प्रिय मित्राची सुटकाही करायलाच हवी होती. काहीतरी ठोस हालचाल करायलाच हवी होती या सगळ्या विचारांच्या गरदोळातुन दिवस मावळुन रात्र पडलेली समजलीच नाही. जशी जशी रात्र वाढत चालली तसा तसा संज्याचा अस्वस्थपणाही वाढायला लागला होता. स्वयंपाक वगैरे काही करायला सुचणे आता तरी शक्य नव्हते म्हणुन मी सोबत नेलेल्या बिस्किटे आणि केक्सवरच आम्हाला उदरभरण करणे भाग पडले. रात्री झोप घेणे संज्याला शक्य वाटत नव्हते तरी मला थोडीतरी विश्रांती घेणे गरजेचे होते. म्हणुन मी संज्याच्याच कॉटवर अंग पसरले नाहीतरी त्याला कुणाच्या तरी आधाराची गरज होतीच, विचारांच्या आणि प्रवासाच्या थकव्याचा परिणाम म्हणुन झोपही चटकन लागली. रात्री अचानक जाग आली नक्की कशाने ते समजेना झटकन डोळे उघडल्यावर आपण कुठे आहोत हेही लक्षात यायला थोडा वेळ लागला पण झर्रकन दिवसभरातल्या घडामोडी आठवल्या आणि क्षणभरात मी भानावर आलो, शेजारी संज्या झोपला होता पण...... ती नेहमीसारखी शांत झोप नव्हती कारण त्याच्या घश्यातुन कण्हल्यासारखे आवाज येत होते, मध्येच एक दबकी किंकाळीही मारल्याची मला जाणिव झाली. वास्तवाचे भान येउन मी त्याला गदागदा हलवुन उठवले, जाग आल्यावर त्याच्या चेहर्यावरचे ते वेदनांचे जाळे!.......... देवा! मला त्याच्या चेहर्याकडे पहाणे अशक्य झाले म्हणुन मी नजर वळवली आणि जे दिसले ते पाहून यापेक्षा त्याच्या चेहर्याकडे पहाणे जास्त बरे होते असे वाटायला लागले, सकाळी मी आग्रहपुर्वक त्याला घालायला लावलेल्या शर्टच्या पार चिंध्या झाल्या होत्या आणि त्याच्या पाठीवर पुन्हा जखमांचे नवे वळ.......! आता झोप लागणे शक्यच नव्हते मी हातातल्या घड्याळाकडे नजर टाकली, बारा चाळीस झाले होते. पुन्हा एकदा माझ्या डोक्यात संज्याच्या त्या विलक्षण अनुभवाने थैमान घातले त्याच्या त्या अनुभवाची उजळणी होत राहीली आणि पुन्हा पुन्हा त्या खड्यापर्यंत आल्यावर विचारात खंड पडत होता एकच गोष्ट सारखी मनाला खटकत होती ती म्हणजे तो खडा, मी या आधी कुठे बंर असेच काही वाचले की ऐकले आहे?........... सकाळ होताच मी प्रथम त्या खड्याकडे एक नजर टाकायचे ठरवले रात्र अशीच सरत गेली मधे मधे संज्याला झोप लागत होती आणि कदाचीत तो पुन्हा त्या दुःस्वप्नात अडकत होता त्याच्या पुन्हा पुन्हा जागे होण्यामुळे कदाचीत त्याच्या त्या स्वप्नात पडलेल्या खंडाची भरपाई त्याला द्यावी लागत असावी कारण सकाळ होईस्तोवर त्याच्या अंगावरच्या वळांमध्ये भयाण वाढ झालेली होती, मला झोप लागणे शक्यच नव्हते डोक्यात विचारांचे काहूर माजले होते हळूहळू त्या खड्याचे गुढ धुसरपणे माझ्या मनात उलगडत होते पण प्रत्यक्ष तो खडा पाहिल्याखेरीज नुसते अंदाज बांधण्यात अर्थ नव्हता. सकाळ होताच मी संज्याकडे तो खड्याची मागणी केली,संज्याने जवळच पडलेल्या आपल्या बॅकसॅकमधुन एक पुरचुंडी काढून माझ्या हातात दिली. उघडलेल्या पुरचुंडीतला तो खडा पाहुन माझेही डोळे विस्फ़ारले, उगवत्या सुर्याचा एक चुकार कवडसा अचानक त्याच्यावर पडला आणि मुग्ध करुन टाकेल असा तो खडा चमकला, संज्या म्हणतो त्याप्रमाणे हा नक्कीच हीरा होता. पण मला कुठेतरी आत असे वाटत राहीलेली भिती आता साक्षात खरी ठरली होती. मी एका पुरातत्व संशोधक मित्राकडे या हिर्याचा फ़ोटो पाहीला होता आणि त्याला असलेल्या शापाबद्दल जोरदार वादही घातले होते या आजच्या युगात या शाप वगैरे सारख्या गोष्टींवर माझा विश्वास बसणे शक्यच नव्हते त्याने सांगितलेला त्या हिर्याचा ईतिहास झटकन माझ्या डोळ्यासमोरुन सरकुन गेला. फ़ार पुर्वि म्हणजे पार चौदाव्या शतकातली ती कहाणी होती आणि तिही अपुर्ण अवस्थेत कारण यात ठिकाणाचा पत्ता नव्हता, त्यातल्या व्यक्तींची नावे नव्हती पण जी काही माहिती होती ती अशी, कुण्या एका खाणमालकाला त्याच्या खाणीत हा हिरा सापडला होता तोपर्यंत सापडलेल्या हिर्यांमध्ये हा सर्वात मोठा आणि सुंदर होता, सहाजीकच त्याच्याबद्दलची माहीती आजुबाजुला पसरायला वेळ लागला नाही आणि अखेर ती माहीती त्या ठिकाणी राज्य करत असलेल्या राणी पर्यंत गेली. आणि तिला त्याचा मोह आवरता आला नाही तिने त्या खड्याची मागणी केली आणि तो द्यायला त्याच्या मालकाने नकार देताच त्याला कैद करुन तो खडा मिळवण्यात आला राणीने आपल्या चांदिच्या खाणीवर त्या खड्याच्या मालकाला अत्यंत वाईट वागणुक देउन राबवले या सगळ्या हाल अपेष्टांमध्ये त्याचा जिव गेला, पण मरता मरता त्याने दिलेला शाप आजही त्या खड्याला आहे. तो मिळवणारा माणसाला जे हाल त्या खड्याच्या मुळ मालकाचे झाले ते भोगायला भाग पडतात. जी माहीती मिळाली होती ती इतकीच होती पण त्या पुस्तकात त्या खड्याचा फ़ोटो होता आणि हा खडा त्याच्याशी तंतोतंत जुळत होता म्हणजे संज्या म्हणतो तश्या त्या सगळ्या हाल अपेष्टांना सामोरे जाउन त्यातच त्याचा अंत होणार होता पण तरीही त्याची सुटका नव्हतीच त्याचा आत्मा कायमचा त्याच जागी बंदिस्त होणार होता, ( संज्याच्या वर्णनात तिथे काम करणार्या लोकांची माहीती आलीच होती त्यावरुन हा अंदाज) पण म्हणुन मी काही माझ्या प्रिय मित्राच्या मरणाची वाट पहात स्वस्थ बसणे मला शक्य नव्हते. पण मला करतायेण्यासारखे होते तरी काय? हताश होत मी विचार करत राहीलो, ज्या भुर्जपत्रात तो खडा गुंडाळला होता ( होय संज्याने सांगितलेली ती गुंडाळी म्हणजे एखादे भुर्जपत्रच असणार याची मला एव्हाना खात्री झाली होती) त्यातुन माहीती मिळण्याची शक्यता ते नष्ट झाल्याबरोबरच संपली होती एकच शेवटचा मार्ग दिसत होता तो म्हणजे माझ्या ज्या मित्राकडे मला ही माहिती मिळाली होती त्याला इथे बोलावुन घेणे जवळपास धावतच जाउन मी माझा मोबाईल टेबलावरुन उचलला पण नेटवर्क? त्याचा पत्ता नाही, मग संज्याने त्याच्या मोबाईलवरुन मला फ़ोन कसा केला? प्रश्न फ़ार महत्वाचा होता पण मित्राच्या जिवनमरणाच्या प्रश्नापुढे तो दुर्लक्षीत झाला आणि मी जवळपास कुठून फ़ोन करता येतो का याच्या शोधात निघालो. अखेर पत्ता लागला की त्या गावाततर फ़ोन नव्हताच पण आजुबाजुच्या गावातही कुठे नव्हता. शेवटी दोन गावांपलीकडे एका रेल्वे स्टेशनावरुन फ़ोन करता येणे शक्य होते पण तिथे चालत जाणे हाच पर्याय समोर होता म्हणजे एखादी बैलगाडी मिळू शकली असती पण ती शोधायला लागली असती. शेवटी पायी जाण्याचा निर्णय मी घेतला. प्रवास सुखाचा तर नव्हताच पण भयंकर थकवा आणणारा झाला स्टेशनवरुन फ़ोन करता आला पण तो ट्रंक कॉल, लागेपर्यंत दोन तास मोडले आणि लागल्यावर कळले की माझा तो मित्र आता भारताबाहेर गेलेला आहे. माझा शेवटचा आशेचा किरणही सुर्या बरोबरच मावळला. अतिशय थकल्या शरिराने आणि त्याहीपेक्षा थकल्या मनाने मी गावाकडे परतलो. गावाच्या आत पोहोचलो नाहीतर मला गावात कुजबुज चालु असलेली जाणवली. इतक्या रात्री चालु असलेली कुजबुज माझ्या मनाला अशुभ वाटली झपाट्याने पावले उचलत मी संज्याच्या घरापाशी आलो आणि मनाला वाटलेली ती अशुभ शंका खरी ठरलेली होती. रात्रीत केंव्हातरी संज्याचे प्राण त्याला सोडून गेले होते मरणापुर्वी त्याने मारलेल्या भयाण किंकाळीने गावातले लोक गोळा झाले होते आणि संज्याच्या मृत शरीरावरच्या जखमा पहात आपाअपसात कुजबुज करत होते. म्हणजे त्यांच्या मनात पहीला संशयीत मीच असला पाहीजे पण नेमका मी गावात नव्हतो त्यामुळे अखेर त्यांचा संशय फ़िटला. त्यांच्याच मदतीने मी संज्याच्या माझ्या प्रिय मित्राच्या मृतदेहावर अंतीम संस्कार केले, नाही म्हणायला त्याच्या कंपनिचा प्रतीनिधी तेथे हजर झाला होता मीच त्याला बोलावुन घेतले होते कारण संज्याला जवळच अस कुणीच नातेवाईक नव्हते आणि दुरचे असतील तर ते मला माहीत नव्हते त्यामुळे त्याच्या कंपनीत कळवणे गरजेचे होते.' संज्या' कालपर्यंत माझ्यासारखाच एक हाडामासाचा देह असलेला आज राखेच्या ढीगात कुठेतरी राख होवुन राहीला होता मला आता आणखी जास्तवेळ तेथे थांबणे शक्य नव्हते, रहात होतो त्या घरातुन मी माझे सामान घेतले संज्याचे सामान घेण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्याच्या सामानाला त्याच्यासोबतच अग्नी दिला गेला होता त्याचा सर्वनाश करणारा तो खडा काही कोठे सापडला नाही कदाचीत एका जिवाची आहुती मिळाल्यावर तो पुन्हा जेथुन आला तेथे गेला असावा. जड मनाने परत येत असताना माझ्या मनात एकच विचार होता संज्याचे जाणे हे त्याच्यासाठी चांगले होते की नाही? संज्याच्या मृत्युला आता महीने उलटून गेले आहेत. दोनच दिवसांपुर्वी त्याच्या वकीला कडून मला त्याच्या मृत्युपत्राची माहीती मिळाली, संज्याने त्याच्याकडे असलेले सर्वकाही माझ्या नावे केलेले आहे 'सर्वकाही'.............. आणि दोनच दिवसांपासुन मला ती अभद्र स्वप्न पडायला लागली आहेत.........................
|
Prajaktad
| |
| Wednesday, August 22, 2007 - 5:53 pm: |
| 
|
सुपर्ब ! जबरी कथा लिहलिस आहेस चाफ़्फ़ा ! अंगावर काटा आला.. एकाच पोष्ट मधे लिहलेस हे छान!..
|
Amruta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:19 pm: |
| 
|
ओह्ह, अजुनही धडधड थांबली नाहीये.
|
Zelam
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:20 pm: |
| 
|
छान जमलीय हो चाफ्फा.
|
Disha013
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:36 pm: |
| 
|
छान लिहिलिये. अशा कथा एका दमात सलग वाचल्या तरच त्यांचा अपेक्षित परिणाम होतो. ती तशी लिहिलिये म्हणुन अजुन छान हं.
|
Tukaram
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:38 pm: |
| 
|
खुपच छान. .... ......
|
Daad
| |
| Wednesday, August 22, 2007 - 11:10 pm: |
| 
|
चाफ्फा. मस्तं गोष्ट भयकथागूढकथा, काय म्हणाल ते, नावासकट! कथाबीज छानच आणि भाषा, ओघ, मस्तच. पण एक विचारू का? एका पोस्टमध्ये संपवण्यासाठी थोडी घाई केलीयेस का? मला भयकथा वगैरे लिहिण्याचा अनुभव नाही त्यामुळे असेल असं वाटत कदाचित. चू.भू.द्या.घ्या. परत एकदा कथा छान झालीये.
|
Zakasrao
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:44 am: |
| 
|
शेवटची ओळ तर विलक्षण परिणामकारक आहे.
|
Runi
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:56 am: |
| 
|
चाफ्फा, कथेच्या शेवटामुळे 'वारस' नाव एकदम समर्पक.
|
चाफ़ा,मस्तच मांडणी रे.. खिळवुन ठेवलेस अगदी..शेवट मात्र अंदाज बांधला त्याच्याशी मिळताजुळता निघाला..
|
Ajai
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:03 am: |
| 
|
चाफा- उत्तम जमलेली गुढकथा,पण खुपच छोटि झालिय IMHO . तसेच आधिच गुढकथा आहे असे लिहल्याने आणि कथेच्या शिर्षकामुळे शेवटाचा अंदाज येतो. BTW त्या उतार्यावरच्या नारळ खायच्या वाक्यावरुन मला माझे किडे आठवले. माटुंग्याच्या बादल, बिजली, बरखा सिनेमाच्या कोपर्यावर जरिमरि किंवा अशाच कुण्या देविचे मंदीर आहे तिथे अमावास्येला बरेच नारळ रस्त्यावर टाकलेले असायचे. रात्रीच्या show ला येकदा जाताना आम्ही दोन मित्रानि ते नारळ group बरोबर पैज लवुन खाल्ले. मी ठिक होतो पण तो मित्र कदाचित घबरल्यामुळे असेल दुसर्यादिवशी तापाने फणफणला होता.
|
Swa_26
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:33 am: |
| 
|
चाफ़ा... मस्त जमलीय कथा!! शेवट वाचेपर्यन्त खिळवुन टाकलेले!! BTW अजय, ते मंदिर मनमाला देवीचे आहे... (विषयांतराबद्दल क्षमस्व!!)
|
Manjud
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:45 am: |
| 
|
चफ़्फ़ा, सॉलीड लिहिली आहे गोष्ट. मी सध्या रत्नाकर मतकरींचे " गहिरे पाणी" वाचत्ये.......... त्या पार्श्वभूमीवर तर फारच आवडून गेली ही गोष्ट. अजुन येऊ द्यात. लगे रहो चाफ़्फ़ाभाई!!!!
|
Monakshi
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:59 am: |
| 
|
चाफा, जस्ट सुपर्ब, तुम्ही भयकथा खूपच छान लिहिता. अजुन येऊद्यात.
|
Ana_meera
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:17 am: |
| 
|
कथा चांगली आहे. शेवट काय होईल याचा अंदाज येतो, पण तरीही वाचनिय आहे.
|
उत्कंठावर्धक. आनामीरा म्हणते तशी अपेक्षित पण वाचनीय. पण मला तो हिरा त्याच्या सामानात मिळतो की काय असे वाटलेले. ' सर्वकाही ' चा ट्विस्ट आवडला.
|
Ana_meera
| |
| Thursday, August 23, 2007 - 12:34 pm: |
| 
|
शिवाय संघमित्रा मला तर भलताच संशय आला murder झालाय की काय मित्राकडून हिर्या करिता!!
|
Chaffa
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:43 pm: |
| 
|
धन्यवाद सर्वांनाच! दाद पुन्हा एकदा आपल्याला दाद देतो तुमचे गणित बरोबर आहे पण लांबी प्रमाणाबाहेर जास्त झाली होती कदाचीत त्यामुळे मुळ मुद्दा विसरल्या जाण्याची शक्यता होती म्हणुन जरा दुरुस्त करुन लहान केली. अजय हे उतार्यावरचे नारळ आम्हीसुध्दा पैजेखातर खाल्लेत. लिंबाचा रस काढुन प्यायलोय बरंच थ्रिल वाटायच पण एकदा घरी कळले आणि मग..........!
|
Apurv
| |
| Thursday, August 23, 2007 - 4:20 pm: |
| 
|
कथा इथेच संपली का? अजून वाढवता आली असती... पुढे काय होते ह्याची उत्सुकता जागृत होता होताच अचानक संपली. पण वाचायला मजा आली. नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळा विषय. राहुल पाठक ह्यांची एक मायबोलीवर गुढ कथा छान होती. श्यामलन style .
|
Panna
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:24 pm: |
| 
|
चाफा, सॉलिड!!! सही इफेक्ट आलाय!! पुढची कथा लवकर येउ द्या!! शेवट तर मस्तच.. वाचकांच्या कल्पनाशक्तीला चांगलाच वाव मिळेल असा!!
|
|
|