|
Daad
| |
| Friday, August 10, 2007 - 4:10 am: |
| 
|
श्रद्धा, छान चाललीये कथा. संवादांचा फ़्लो मस्तय. आणि नुसती संवादात अडकूनही नाहीये. चालू दे मस्तीत!
|
Ravisha
| |
| Friday, August 10, 2007 - 4:24 am: |
| 
|
तुम्हाला 'किम्बहुना' हा शब्द खटकला असावा! आणि तो तर आम्ही सर्रास सम्भाषणातही वापरतो!>>> किंबहुना तो आणि तत्समच शब्द जास्त वापरतो
|
Manogat
| |
| Friday, August 10, 2007 - 4:25 am: |
| 
|
श्रद्धा, मस्त छान वेग घेतला आहे कथेने..पुढचे पोस्टींग लवकर टाक..
|
Sneha21
| |
| Friday, August 10, 2007 - 9:44 am: |
| 
|
श्रद्धा, मस्त ......पुढचे पोस्टींग लवकर टाक..
|
१७ मे २००२. प्रवास पुढे चालू झाला. ड्रायव्हर त्याचं मौनव्रत सोडून शिशिरशी काहीबाही गप्पा मारत होता. माझ्या डोक्यातून मघाशी पडलेल्या स्वप्नाचा विचार काही जात नव्हता, म्हणून त्यांच्या बोलण्यात भाग घ्यावा असंही वाटेना. तशात उन्हाने डोकंही दुखायला लागलं होतं. मी टुणकी येण्याची वाट बघत बसून राहिले. एका टपरीवजा हॉटेलापाशी जीप थांबली. तिथंच चार रस्ते फुटत होते. ' आलं टुणकी! ' ड्रायव्हरने जाहीर केलं तशी मी चकितच झाले. डावीकडं चारसहा तुरळक घरं दिसत होती. बाकी तिन्ही बाजूंना फक्त शेतंच! गाव असेल असं वाटतही नव्हतं. आम्हाला ज्यांच्याकडे जायचं होतं, त्यांचा घर डावीकडच्या रस्त्यावरून जरा पुढं गेल्यावर उजवीकडच्या एका गल्लीत होतं म्हणे! ते शोधायला काही कठीण नाही असं त्या ड्रायव्हरचं मत पडलं शिवाय तिथवर जीप गेली नसती, म्हणून आम्ही तिथेच उतरलो आणि इनामदारांचं घर शोधायला सुरुवात केली. गावात सगळीकडे शांतताच! दुपारचे चार वाजले होते. ऊन तापत होतंच... डावीकडे पहिल्यांदा गावातली ( बहुधा एकमेव!) शाळा दिसली. एकमजली कौलारू घरासारखी शाळा. तिथेही सामसूमच दिसत होती, पोरांना सुट्ट्या लागल्या असणार. रस्त्यावर भेटलेल्या चारदोन लोकांकडे चौकशी करत करत, इनामदारांचं घर सापडलं एकदाचं! आसपास छोटी छोटी घरं होती. चार दोन मुली अंगणात काहीतरी वाळवण राखायचं काम करत होत्या. एक बाई एवढ्या दुपारी खराट्यानं तिच्या घरासमोरचं अंगण झाडत होती. आम्ही तिथून जाताना त्यांनी आमच्याकडे अगदी निरखून बघितलं. माझा जीन्स टॉप हा पेहराव त्या ठिकाणी भलताच विसंगत वाटत होता बहुधा! इनामदारांच्या घराचा बाहेरचा दरवाजा बंदच होता. चारदोन वेळा कडी वाजवल्यावर एका बाईने येऊन दार उघडलं. ' कोण आहे, शांताबाई? ' आतून एका बाईंचा आवाज ऐकू आला. शांताबाईंनी आम्हाला आत यायला सांगितलं. आतमध्ये प्रशस्त अंगण होतं. डाव्या बाजूला गुरांचा गोठा होता. तिथेच भिंतीला टेकून उभ्या केलेल्या दोन तीन जुन्या मॉडेलच्या सायकली. बाकीही बरंच सामान अंगणात पडलं होतं. माझ्यासाठी हे सारं वातावरण अनोखं होतं. ' तूच शिशिर इनामदार का रे? ' साधारणपणे पन्नाशीच्या बाई असतील त्या! नऊवारी साडी नेसलेल्या. ' हो... आत्याने फोन करून सांगितलंच असेल. ' ' आज सकाळीच फोन आला होता तिचा. कालही करत होती म्हणाली. आमच्या फोनचा त्रासच फार. लागला तर लागतो कधीतरी.. माझा नातू खेळणं म्हणूनच जास्त वापरतो. ' त्या हसत म्हणाल्या. ' सॉरी, असं अचानक येऊन बराच त्रास देतो आहे तुम्हाला... ' ' त्रास कसला रे त्यात? तुम्ही आलात, छान वाटलं. ' त्या मनापासून म्हणाल्या. ' तुझी आज्जी यायची दर्शनाला तेव्हा आमच्याकडेच हक्काने उतरायची. तुझ्या आईचं काही येणं नाही झालं मात्र... ' बर्याच वर्षांची ओळख असावी तसं त्या मनापासून बोलत होत्या. मला छान वाटत होतं. त्यांनी आमची आवर्जून सगळ्यांशी ओळख करून दिली. त्यांच्या सासूबाई, पार नव्वदीला टेकलेल्या, चांगल्याच गप्पिष्ट. त्यांची सून आशा, यजमान लक्ष्मणराव, मुलगा श्रीधर, गोड आणि मस्तीखोर नातू विकास... थोड्याच वेळात त्यांच्या घरात संकोच वाटेनासा झाला. रात्री जेवणं आटोपली. मी आज्जींच्या खोलीत बसून त्यांच्याशी गप्पा मारत होते. ' चांगलं आहे हो... सासूची इच्छा पूर्ण करतेयस.. आजकालच्या मुली कुठे अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात म्हणा... ' विश्वास माझाही नव्हता तसा, मी आईंची इच्छा म्हणून आले होते. पण हे त्यांच्यापाशी का बोला असा विचार केला मी! त्यांना सांगावं का स्वप्नाबद्दल, अचानक विचार आला मनात... ' आज्जी, आज आम्ही येत असताना मला पेंग आली जरा... तेव्हा मला स्वप्न पडलं. एक सवाष्ण बाई आली होती स्वप्नात.. हिरवी साडी नेसलेली.. ' ' रमाच ती... इनामदारांच्या काही सुनांना स्वप्नात दर्शन दिलंय म्हणे तिनं! त्यांनी आपल्या कर्तव्यात चुकू नये म्हणून.... ज्यांनी यात कसूर केलीय त्यांना त्याचा त्रास झाल्याशिवाय राहिलेला नाही. ' मला एकदम आईंनी सांगितलेलं आठवलं. जन्माला येऊन अवघ्या तासाभरात गेलेली त्यांची मुलगी... ' पण असं का? तिचं दर्शन घेतलं काय, न घेतलं काय, तिचा आशीर्वादच लाभावा नं घराण्याला... हा त्रास कशासाठी? ' माझा स्वर नकळत चिडका झालेला. ' तिची कहाणी ऐकलीस तर कदाचित कळेल बयो तुला... ' त्या सांगू लागल्या, रमेची कहाणी. अगदी मध्यरात्र उलटून जाईस्तोवर. क्रमशः
|
Aktta
| |
| Saturday, August 11, 2007 - 6:52 pm: |
| 
|
ही भुताची भुतीची गोष्ट आहे का..... म्मSSSSSमी मला भीती वाटते..... एकटा....
|
Nilima_v
| |
| Monday, August 13, 2007 - 6:10 am: |
| 
|
सुन्दर! खुप छान आहे... मी लहानपणी शिर्डीला जाताना आजीने ब्रेक घेतला आणि टांग्यातून आम्हाला घेउन एका घरी गेली. ते नव्वदीतले गृहस्थ होते. माझ्या पणजोबान्ना आणि साईबाबांना त्यांनी पाहिले होते. आता बाकी काहीच आठवत नाही, पण मी त्याना काही साईबाबांच्या गोष्टी सांगून impress केले असे आई सांगते. या गोष्टीवरून प्रसंगाची आठवण झाली.
|
R_joshi
| |
| Monday, August 13, 2007 - 9:03 am: |
| 
|
श्रध्दा कथा खुपच रोमांचित करणारी आहे. पुढचे भाग लवकर टाक
|
Shraddhak
| |
| Monday, August 13, 2007 - 12:15 pm: |
| 
|
१८ मे २००२. ' ....लहान होते, तेव्हा माझी आई सांगायची हो राघोजी इनामदारांच्या कथा... कसं त्यांनी एके वेळी एका वाघाला तलवारीच्या एका फटक्यात गारद केलं नि कसे ते पन्नास दरोडेखोरांशी केवळ दोन साथीदारांच्या सहाय्याने झुंजले. राघोजी इनामदार खरोखर मोठा कर्तृत्त्ववान माणूस. त्यांच्या वडिलांनी मिळवलेली इनामदारी त्यांनी अथक प्रयत्न करून राखली; वाढवली. त्याकाळी या भागातही दरोडेखोर लुटारूंचा उपद्रव फार! पण राघोजी इनामदारांना भीती म्हणून ठाऊक नव्हती. हातात तलवार घेऊन रात्रीबेरात्री हिंडत असत. त्यांची पहिली पत्नी, पार्वती... इनामदारांइतकंच तोलामोलाचं घराणं होतं तिचंही! दिसायला पार्वती देखणी, शिवाय राजेशाही थाटात वाढलेली, काहीशी अहंकारी... शोभायचंही तिला ते म्हणा! वयाच्या दहाव्या वर्षी पार्वती वीस वर्षांच्या राघोजींची पत्नी म्हणून इनामदारांच्या वाड्यात आली. राघोजी आणि पार्वतीची जोडी दृष्ट लागावी, इतकी सुंदर... राघोजी एकुलते एक त्यामुळे एकुलत्या एका देखण्या, सुस्वभावी सुनेच्या कौतुकात कुठं कमतरता नव्हती. वर्षं उलटली, तसं इनामदारांना जाणवू लागलं, कुठेतरी, काहीतरी न्यून आहे सुखात! पार्वतीची कूस काही उजवत नव्हती. नवस, सायास, वैद्यांची औषधं सगळं सगळं दोघांनीही करून पाह्यलं. परिणाम शून्य! जसे जसे दिवस जाऊ लागले तशी तशी मुलाची आशा मावळायला लागली. मग नर्मदाबाई इनामदारांनी निर्णय घेतला.... राघोजी इनामदारांचं दुसरं लग्न लावून द्यायचा! राघोजी एकुलते एक.. इनामदारांचा वंश पुढे वाढवण्यासाठी हे त्यांना करायलाच हवं होतं.. ' असलं काही ऐकलं की माझ्या डोक्यात तिडीकच जाते. मी काहीतरी बोलायला म्हणून त्यांच्याकडे बघितलं, तशी म्हणाल्या, ' ठाऊक आहे पोरी, तुला हे विचार पटत नसतील, संतापली असशील या गोष्टीने.. पण तो काळ तसाच होता बायो... तो काळ तसाच होता. नर्मदाबाई इनामदारांनी पस्तिशीच्या राघोजी इनामदारांसाठी देशमुखांच्या सोळा वर्षांच्या रमेला मागणी घातली. देशमुखही वतनदार पण त्याआधीच्या काही वर्षांत आलेल्या संकटांमुळं आणि भाऊबंदकीमुळं त्यांची परिस्थिती ' बडा घर, पोकळ वासा ' अशी झालेली... रमेच्या लग्नाची त्यांना चिंता होतीच. इनामदारांसारख्यांनी मागणी घातलीय म्हटल्यावर त्यांना स्वर्ग दोन बोटं उरला. आपल्यापेक्षा एकोणीस वर्षांनी मोठ्या राघोजींशी लग्न करून रमा पार्वतीची सवत म्हणून वाड्यात आली. पार्वतीचं बिनसलं ते इथंच! तिचं राघोजींवर नितांत प्रेम होतं, त्यात कुणी वाटेकरीण यावी... तिच्याच्याने नाही सहन झालं ते. पार्वती अंतर्बाह्य बददली.. कठोर, कोरडी झाली.. संतापानं अखंड धुमसू लागली. रमेचा दोष यात काहीही नव्हता... ती अजाण, अल्लड होती. इनामदारांची कीर्ती परिचयाची होतीच तिच्या! इनामदारांकडं येताच दबून गेली. राघोजींचा मात्र रमेवर जास्त जीव जडला. दिसायला ती पार्वतीहूनही सुंदर... पार्वतीनं तिचा दुस्वास करायला सुरुवात केली. वर्षभरात रमेला मुलगा झाला. नर्मदाबाई, थोरले इनामदार, यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. रमेचं घरातलं स्थान उंचावलं. पार्वतीचं महत्त्व अर्थातच कमी झालं. रमा जराशी निर्धास्त झाली होती. तिच्या आयुष्यात जरा जरा सुख येऊ लागलं होतं. नर्मदाबाईंची मोठ्या सुनेवर आता कडक नजर होती. पार्वतीला आपलं नशीब स्पष्ट दिसायला लागलं होतं. तशात ते आक्रीत घडलं... राघोजी इनामदारांना क्षयरोग जडला. प्रकृती झपाट्याने खालावत चालली. आपल्या लेकाची ही दुर्दशा पाहून थोरल्या इनामदारांनी हाय खाल्ली आणि वर्षभरात ते निवर्तले. नर्मदाबाईंनीदेखील कच खाल्ली होती. पार्वतीला जणू नवी वाट गवसली. अख्ख्या इनामदारीच्या जबाबदार्या स्वतःच्या खांद्यांवर पेलून समर्थपणे उभी राहिली पार्वती... राघोजींना वाड्याबाहेर देखील पडता येईना झालं. पार्वतीनं सगळी सूत्रं स्वतःकडे घेतली. तिचं एकछत्री साम्राज्य प्रस्थापित झालं, घरावर. इतकंच काय, नर्मदाबाईदेखील तिच्यापुढे दबून राहू लागल्या. रमेचा जाच वाढला. राघोजी सगळं बघत होते, पण असहाय्य होते. त्यांनी रमेला सदैव स्वतःपाशीच रहायला सांगितलं. पण पार्वतीला काहीही फरक पडत नव्हता. राघोजींबद्दलचं प्रेमही आटलं होतं बहुधा! रमेला थोडा आधार होता तो राघोजींचाच! पार्वती राघोजींची थोडीफार काळजी घेत असे, ते केवळ तिला कुणी बोल लावू नये म्हणून! रमेचे मात्र हाल सुरु होते. राघोजींच्या दुबळ्या आधाराने ती कशीबशी दिवस कंठत होती. लग्नानंतरचे सुरुवातीचे सुखी दिवस केव्हाच संपुष्टात आले होते. राघोजींच्या मनावर आणि पर्यायाने घरावर राज्य करणार्या रमेला आश्रिताची अवस्था प्राप्त झाली... क्षयाबरोबर चाललेली लढाई राघोजी तब्बल बारा वर्षांनी हरले. ते गेले, तेव्हा फक्त रमा होती त्यांच्याजवळ... ते गेले तेव्हाच रमेला जाणीव झाली, पुढे काय वाढून ठेवलं आहे याची! पार्वतीची सत्ता, राघोजींचं आता नसणं, आयुष्यभराचा जाच, घरात काडीवरही हक्क नसणं.. आता पार्वतीला अडवणारं कुणीच नव्हतं... कदाचित सूडापायी ती आपल्याला...????? आणि तिने तो निर्णय घेतला.... सती जाण्याचा! ' क्रमशः
|
Sneha21
| |
| Tuesday, August 14, 2007 - 10:37 am: |
| 
|
वाह, फ़ारच सुन्दर शैली आहे तुम्चि लिहिन्याची प्लिज लवकर पुर्न करा
|
Chetnaa
| |
| Tuesday, August 14, 2007 - 12:16 pm: |
| 
|
श्र, अगदी वाढलिय उत्सुकता... पुढचा भाग लवकर येऊ दे...
|
Aashu29
| |
| Tuesday, August 14, 2007 - 1:08 pm: |
| 
|
farach sundar!! mast lihiteyas
|
Manogat
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:39 am: |
| 
|
shradha पुढच डायरी च पान कधी लिहिणार आता.... आम्ही वाचक ताटकाळत आहोत
|
Shraddhak
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:45 am: |
| 
|
' पार्वतीला अर्थातच त्याचं काही वाटलं नाही. रमेला तिच्यालेखी काहीही महत्त्व नव्हतंच नाहीतरी. रमा मात्र दुःखाने धुमसत होती... इतक्या वर्षांची मानहानी, उपेक्षा, आश्रितासारखं जिणं, ज्या नवर्याच्या आधाराने ती या घरात आली होती, त्याची असहाय्यता, तिच्यासाठी कुणीच काहीच न करणं... राघोजींच्या पार्थिवाला अग्नी द्यायची वेळ आली. रमेने हिरवी साडी नेसली, नर्मदाबाईंनी तिच्या अंगावर सौभाग्यलेणी चढवली. राघोजींचा देह चितेवर ठेवला गेला. गावातल्या सवाष्णींनी रमेची ओटी भरली. आणि त्या सतीपुढे आशीर्वादासाठी वाकल्या. रमेची नजर पार्वतीकडे गेली. तिचा चेहरा निर्विकार होता. ' सती, आशीर्वाद दे बायो.... ' नर्मदाबाईंनी तिला म्हटलं तशी ती भानावर आली... ' माझ्या आशीर्वादानं इनामदारांच्या घराण्यात कुणालाही अपत्यसुखाच्या बाबतीत कसलाच त्रास होणार नाही. ' पार्वती चमकली. रमेनं जाता जाता तिच्या वर्मावर घाव घातला होता. तिच्या अपत्यहीनतेवर तिने सरळ बोट ठेवलं होतं. त्या घटनेनंतर काही दिवसांनी तिथे देऊळ आणि तुळशीवृंदावन बांधण्याचं काम सुरु झालं. पंचक्रोशीतल्या बायाबापड्या तिथे दर्शनाला यायला लागल्या. कर्मधर्मसंयोगाने त्यातल्या काहींना मुलंही झाली. सतीचा आशीर्वाद फक्त इनामदार घराण्यावरच नाही तर तिचं मनोभावे दर्शन घेणार्या सगळ्यांवर आहे ही जाणीव पक्की होऊ लागली. पुन्हा एकदा रमेला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं. यावेळेस पार्वतीला करता येण्याजोगं काहीही उरलं नव्हतं. रमेचा मुलगा, बाळाजी... आई सती गेली तेव्हा तो जाणता झाला होता. आईची होणारी उपेक्षा त्याने बघितली होतीच. सुरुवातीला काही दिवस, इनामदारांचा मुलगा, वंशाचा दिवा, म्हणून पार्वतीने त्याला माया लावू पाहिली. पण बाळाजीने तिला कधीही आदर दिला नाही. थोडा मोठा होताच त्याने इनामदारीची सारी सूत्रं स्वतःकडे घेतली. सगळी कुळं, नोकरचाकर ' धाकल्या मालकांचाच ' हुकूम ऐकणार हे स्पष्ट दिसत होतं. पार्वतीची सत्ता संपली. जगण्यात तिला काही रस उरला नव्हता. असाच तिने एके रात्री विष पिऊन जीव दिला. चार दिवस लोक त्याबद्दल बोलले तेवढंच! नंतर मात्र पार्वतीची आठवणही कुणाला राहिली नाही.... ' त्या बोलायच्या थांबल्या होत्या. माझ्या मनात दोघींविषयी कणव दाटून आलेली... नियतीने त्या दोघींना का असं खेळवावं? आता मला जाऊन रमेची पूजा वगैरे करावीशी वाटेना. सर्वसाधारण बाई होती ती... जाचाने त्रासलेली, सतत दुःख सहन केलेली, नवर्यामागोमाग कदाचित इच्छा नसताना मृत्यू पत्करलेली... शेवटच्या क्षणीदेखील सवतीवर सूड उगवण्याची संधी न सोडणारी... आयुष्यभर जे महत्त्व तिला मिळालं नाही ते जिवाचं मोल देऊन मिळवणारी... तिच्या कृतीत दिव्य, उदात्त असं काहीही नव्हतं. अगदी राघोजींबद्दलचं प्रेमही नव्हतं. होती ती पार्वतीबद्दलची भीतीच! ' झोप बायो... उद्या तुम्हाला जायचंय ना रमेच्या दर्शनाला? ' आज्जींच्या आवाजाने मी भानावर आले. रात्र बरीच झाली होती. पण दुसर्या दिवशी जावं की न जावं? या द्वंद्वात गुंतून मी रात्रभर जागी होते. क्रमशः
|
Daad
| |
| Wednesday, August 22, 2007 - 3:58 am: |
| 
|
हे शाब्बास, श्रद्धा! पुढला भाग अन तो ही इतका उत्कंठावर्धक. बहोत अच्छे!
|
श्र,सही चाललय. गॅप घेऊ नकोस गं फ़ार..
|
Mankya
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:12 am: |
| 
|
श्र .. मस्त फ्लो आहे कथेला ! कथानक भलतच रंगात आलय ! माणिक !
|
Aashu29
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:50 am: |
| 
|
वाह!! उत्कंठावर्धक!! मस्त जमलिये कथा!!
|
Shraddhak
| |
| Wednesday, August 22, 2007 - 9:38 am: |
| 
|
१९ मे २००२. जायचं ठरलं शेवटी. फार लांब नव्हतं. ' इथून जवळ डोंगरात एक वारी नावाचं ठिकाण आहे. त्याच रस्त्यावर अलिकडं इनामदारांचा पूर्वीचा वाडा आणि सतीच्या देवळाची जागा आहे. ' श्रीधर सांगत होता. त्याच्याच गाडीतून आम्ही निघालो. शिशिर श्रीधरशी गप्पा मारण्यात रंगला होता. श्रीधर उत्साहाने आजूबाजूला दिसणार्या शेतांबद्दल, पिकांबद्दल त्याला माहिती सांगत होता. लौकरच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक छोटी वाट आतपर्यंत गेलेली दिसली. थोडं अजून पुढे गेल्यावर एका वाड्याची ढासळलेली दगडी कमान दृष्टिपथात आली. वाड्याचेही थोडेच अवशेष शिल्लक राहिलेले. पावसाळ्यात आजूबाजूला नुसतं रान माजत असणार. सध्या उन्हाळा असल्याने नुसतं खुरटं, वाळकं गवत आसपास दिसत होतं. ' वाडा बघायचा का आपण? ' मी शिशिरला विचारलं. त्याने होकार दिला. विकास आमच्यासोबत गाडीतच होता, तो तिथं धडपडेल म्हणून विकास श्रीधर गाडीतच थांबले. आम्ही त्या कमानीखालून वाड्यात प्रवेश केला. मूळ वाडा दुमजली असावा. एकीकडे काही खोल्या शिल्लक राहिलेल्या दिसत होत्या. नक्षिदार दरवाजे असावेत पूर्वीचे. आत्ता मात्र एखाददुसरं तग धरून राहिलेलं फळकूट... त्यावरची नक्षी आता दिसेल ना दिसेल अशी.. आतमध्ये प्रशस्त चौक होता. मध्ये दगडी कारंजं असणार. शिशिर आणि मी न बोलता सगळी वास्तू बघत होतो. ' वाड्याची डागडुजी कधीच का केली नाही, देव जाणे! ' शिशिर स्वतःशीच बोलल्यागत बोलला. ' पार्वतीने इथे, या वाड्यातच विष पिऊन जीव दिला ना? तिचा आत्मा वावरतो म्हणे इथे... ' सकाळीच आशाने मला सांगितलेलं... मी त्याला हे सांगितलं तसा तो जोरात हसला. त्या शांततेत तो आवाजही केवढा विचित्र वाटला. ' सुधा, काय चाललंय काय तुझं? आधी सतीच्या दर्शनाचा हट्ट, मग या वाड्यात भूत आहे, वगैरे... ' ' ए, आशाने जे मला सांगितलं तेच सांगतेय तुला. माझा विश्वास नाही असल्या गोष्टींवर. पण इतर लोकांचा असावा, म्हणून या वाड्याची डागडुजी कधीच झाली नाही, आय थिंक. ' ' हं... ' बाजूला एक जिना होता. पायर्या बर्यापैकी अवस्थेत होत्या; म्हणून आम्ही वर चढून गेलो. समोरच्या बाजूचा भाग बराच ढासळला होता. तिथून, एका भगदाडातून मला रमेचं देऊळ स्पष्ट दिसलं. फार लांब नव्हतं ते. कुतुहल म्हणून आणखी थोडं पुढे जाऊन बघायला लागले. आणि का कोण जाणे अचानकच मला वाटलं... ही नक्कीच पार्वतीची खोली होती. रमा सती गेल्यावर तिचं बांधलेलं देऊळ पार्वतीला सतत इथून दिसत असणार. ते सतत तिच्या नजरेसमोर असणार... कदाचित फक्त देऊळ नव्हे तर रमाही.... पार्वतीच्या आत्महत्येचं कारण हे आहे.... मला माझ्याच मनात आलेल्या ह्या विचारांचं नवल वाटलं. माझा असल्या गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता. कधी नव्हे ते माझ्या डोक्यात विचित्र विचार चाललेले.... ' चल जाऊया... आपल्याला उशीर होईल नाहीतर. ' शिशिर जवळ येऊन म्हणाला. ' शिशिर, रमेचं दर्शन घ्यायला नको असं वाटतंय आता. आपण घरी परत जाऊया? ' तो गोंधळून माझ्याकडे बघत राहिला. ' मला माहितेय, या एकाच गोष्टीसाठी आपण हैदराबादहून इथे आलो. पण काल सगळी हकीकत ऐकल्यापासून मला तिचं दर्शन घ्यायची, तिची पूजा वगैरे करायची इच्छा उरलेली नाही. ' त्याने काहीतरी बोलायला तोंड उघडलं पण मला काही बोलायचा विचार बदलला असावा. ' चल जाऊया. इथे येऊन श्रीधर वगैरेंसारखी मंडळी भेटली, हेही नसे थोडके. आज संध्याकाळी निघायचं मग परत जायला? ' मी हो म्हणून मान डोलावली. आम्ही पायर्या उतरून भराभर गाडीकडे गेलो. विकास मागच्या सीटवर गाढ झोपला होता. श्रीधर एका म्हातार्या माणसाशी काहीतरी बोलत उभा होता. ' चलायचं मंदिरात? आताशा कुणी फारसं जात नाही म्हणा तिथं... हे तिथले पुजारी आहेत. हेच तिथं पूजाअर्चा करतात आणि आसपासच्या परिसराची देखभाल करतात... ' मी त्यांना नमस्कार केला. त्यांच्याशी जुजबी बोलणं चाललं होतं. ओघात ते एकटेच राहत असल्याचं कळलं. त्यांना इथे राहावतं तरी कसं, माझ्या मनात विचार आला. त्या वाड्याभोवतालची शांतता, तो वाडा, रमा आणि पार्वतीची कहाणी... सगळ्या गोष्टी मला प्रचंड अस्वस्थ करत होत्या. ' येताय ना मंदिरात? ' श्रीधरच्या आवाजाने मी भानावर आले. मंदिरात नाही जायचं मला, मनात फक्त हाच एक विचार.... मी नकारार्थी मान डोलावली. तोही बुचकळ्यात पडला. शिशिर इनामदारांची बायको, जरा विक्षिप्तच आहे, हे त्याला पटलं असावं. आम्ही घरी जायला निघालो. ' आज्जींना हे सांगू नका, श्रीधर. त्यांना वाईट वाटेल. ' मी म्हटलं. घरी आलो, जेवणं वगैरे आटोपली. आम्ही संध्याकाळी निघणार होतो. जरा आराम करायला म्हणून मी आणि शिशिर वरच्या खोलीत पहुडलो होतो. ' आता सांग, का बरं जायचं नाही म्हणालीस ते? सविस्तर सांग. ' मी त्याला सांगितलं सगळं. मला त्यावर दर्शनाला जाऊ नये असं का वाटलं तेही... तो डोळे मिटून ऐकत होता. संध्याकाळी आम्ही निघालो. श्रीधर आम्हाला गाडीने वरवट बकालपर्यंत सोडणार होता. माझं डोकं जरा दुखत होतं म्हणून मी मागच्या सीटवर डोळे बंद करून बसलेले.... त्यातच कधीतरी पेंग आली असावी. आणि मला पुन्हा रमेचं स्वप्न पडलं. गेल्या वेळी पडलेलं तसंच... अं हं. एक फरक होता. आत्ता रमेच्या चेहर्यावरचे भाव कृद्ध होते. मी पुन्हा दचकून जागी झाले. अंग घामेजून गेलं होतं. आत्ताच पुन्हा जावं का देवळात? एक विचार चाटून गेला मनाला. पण पहिल्यांदाच आयुष्यात कशाचीतरी भीती वाटली. त्या वाड्याची, त्याच्या आसपासच्या निःशब्द शांततेची, रमेची आणि पार्वतीचीही.... क्रमशः
|
Ana_meera
| |
| Wednesday, August 22, 2007 - 12:05 pm: |
| 
|
खर आहेS त्या अनभिज्ञ जगाची आपल्याला भिती वाटतेच. खूप छान लिहितेस. पुढचा टाक हा पटापट.
|
|
|