Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 21, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » ‘आई’ » Archive through August 21, 2007 « Previous Next »

Zulelal
Monday, August 20, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

‘आई’

लोकल गाडी मिनिटभरासाठी त्या स्टेशनावर थांबली आणि ती दोघं लगबगीनं गाडीत चढली.

हातातल्या ऊबदार दुलईतलं तान्हुलं सांभाळत गर्दीतून वाट काढत ती आत आली आणि भराभरा सीटवरच्या प्रवाशांना सरकायला सांगत स्वतःसाठी जागा करून घेत हातातलं तान्हुलं तिनं अलगद मांडीवर घेतलं...

पुढच्याच स्टेशनवर शेजारचीच एक जागा रिकामी होताच, दरवाजाशीच लोंबकळणाऱ्या नवऱ्यालाही तिनं बोलावलं, आणि स्थिरावल्याचं समाधान दोघांच्याही चेहेऱ्यावर उमटलं. हलक्‍या हातांनी तिनं बाळाच्या अंगावरची दुलई सारखी केली, आणि बाळाच्या गालावरून मऊशार हात फिरवून ती नवऱ्याकडं पाहात मंद हसली.

नवराही बाळाकडे कौतुकानं पाहात होता. नुकताच बहुधा डिस्चार्ज मिळाला होता तिला. दुपटी, थर्मास, आणि असंच काहीकाही सामान असलेली हातातली पिशवी सावरत नवरा तिच्याकडे पाहून हसला, आणि पुन्हा तिच्या चेहेऱ्यावर हासू फुटलं... त्या हसण्यातून फुलणारा मातृत्वाचा आनंद गाडीतल्या त्या एवढ्याश्‍या डब्यात मावत नव्हता. झोपलेल्या बाळाचा मुखडा न्याहाळणाऱ्या तिच्या मजरेत अपार मायेचा महापूर लोटला होता... हास्यातून मातृत्वाच्या कृतकृत्यतेचा आनंद भरभरून ओसंडत होता...आसपासच्या जगावरही आपला हा अवर्णनीय आनंद उधळून टाकावा, अशा हसऱ्या नजरेनं आजूबाजूला पाहाणारी तिची नजर पुन्हापुन्हा मांडीवरल्या तान्ह्यावर स्थिरावत होती... आपल्या या तान्ह्याला, "कुठे ठेवू अन कुठे नको',असं तिला झालं असावं, हे तिच्या देहबोलीतूनच जाणवत होतं.

...‘गगनात न मावणारा आनंद' कसा असतो, त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण मी समोरच्या बाकावरून अनुभवत, न्याहाळत होतो.

तिलाही बहुधा, या आनंदाच्या क्षणात अवघ्या जगानं भागीदार व्हावं, असं वाटत होतं... जन्माला आल्यानंतर पहिलाच लोकल प्रवास करणारं मांडीवरच ते इवलं तान्हंही, शांतपणे आईच्या कुशीत विसावलं होतं. त्या प्रवासात अगदी सहजतेने साजऱ्या होणाऱ्या एका अनुपम मातृसोहळ्याचा मी साक्षादार झालो होतो...

पुढच्या एका स्टेशनवर पुन्हा मिनिटभरासाठी गाडी थांबली, आणि गर्दी थोडीशी ओसरून गेली. आता डबा काहीसा ऐसपैस झाला होता... नवऱ्याच्या आधारानं ती बाकावर सावरून बसली, आणि त्या चिमुकल्यासाठी हाताचा झोका करू लागली. आईच्या आश्‍वस्त आधाराखेरीज कशाचीही जाणीव नसलेलं ते बाळ मात्र शांत झोपलेलंच होतं आणि एका अपार मातृत्वाला उधाण आलं होतं...

मातृत्वाची माया उधळण्यासाठी ती "आई' आतुर झाली होती...

गाडी पुन्हा सुरू झाली, तेवढ्यात केस अस्ताव्यस्त विस्कटलेल्या, मळकट कपड्यांतल्या दोन लहानग्यांनी पळतपळतच येऊन डबा पकडला, आणि खिडकीतनं सहज बाहेर नजर लावलेल्या त्या आईच्या उरात बहुधा कालवाकालव झाली.. नकळतच आपल्या बाळाला उराशी घट्ट पकडत तिनं क्षणभरासाठी डोळे मिटून घेतले आणि विपरीताच्या खुणा सभोवती नसल्याची खात्री होताच मंदपणे डोळे उघडून ती बाहेर बघू लागली.

त्या दोघीजणी एव्हाना डब्याच्या दरवाज्याशी उभ्या होत्या. ‘आई’च्या डोळ्यातली भीतीची छटा पुसली गेली होती, आणि पुन्हा तेच मायेचं हास्य चेहेऱ्यावर फुललं होतं...

त्या दोघींमधल्या "मोठी'नं हातातल्या दगडाच्या खापऱ्या सावरत कसलासा विचित्र "ताल' धरला, अनं हिच्या डोळ्यात पुन्हा कारुण्य उतरलं.

‘....बचपन के दिन ये, घडी खेलने की...' ती ‘मोठी' आपल्या हातातल्या खापऱ्या एकमेकांवर बडवत अर्ध्यामुर्ध्या शब्दांच्या साथीनं काहीतरी गुणगुणत होती, आणि ‘छोटी'नं डब्यातल्या एकाच्या पायावर लोटांगण घातलं होतं... भीक मागण्यासाठी लहानपणीच‘कमावलेल्या' केविलवाण्या नजरेनं, तोंडाकडे हात नेत आणि मधूनच पोटावर हात फिरवत ती करुणा भाकत होती.

काहीशा अवघडलेल्या त्या प्रवाशानं पटकन खिशात हात घालून रुपयाचं नाणं त्या "छोटी'च्या हातावर ठेवलं, आणि तिच्या चेहेऱ्यावर आनंदाच्या असंख्य छटा उमटल्या... हातातलं नाणं न्याहाळत बराच वेळ ती तशीच उभी होती, आणि समोरची ‘आई' स्वमग्न होऊन तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद न्याहाळत होती. ...अचानक ‘मोठी'च्या हातातल्या खापऱ्यांचा नाद थांबला, आणि एका हातानं ‘छोटी'च्या झिंज्या धरून तिनं छोटीला भानावर आणलं... हातातलं नाणं मोठीच्या हातात देत ‘छोटी'नं पुढच्या प्रवाशाचे पाय धरले... आता ही ‘आई' आणखीनच करुण झाली होती. चटकन तिनं पिशवीत हात घालून एक छोटीशी कापडी पर्स काढली, आणि हाताला येतील तितकी नाणी "छोटी'च्या हातात कोंबली. नवरा आपल्याकडे अचंब्यानं बघतोय, आणि त्याच्या नजरेत काहीसा रागही मिसळलाय, याचं तिला तिळाइतकंही भान नव्हतं... क्षणात त्या छोटीनं त्या आईचे पाय धरले, आणि पायावर डोकं ठेवून ती तशीच बसून राहिली. मघाशी रुपयाच्या नाण्याकडे पाहाताना भीक मागायचं विसरलेली ती छोटी, आता हातातल्या पैशांकडेही पाहात नव्हती... बाजूला उभ्या असलेल्या मोठीच्या हातातला ‘ताल'देखील काहीसा मंदावला होता, आणि बेसुऱ्या आवाजातलं ते गाणं संथसंथ झालं होतं...

मांडीवरल्या बाळाकडे भरभरून पाहात त्या ‘आई'नं एका हातानं छोटीला उठवलं, आणि आपलं हास्य तिच्या नजरेत मिसळून उधळू लागली... ती छोटीही, एव्हाना धीटावली होती... अचानक ती त्या बाळाच्या आईला बिलगली... हातातली चारपाच नाणी बाकड्यावर टाकून तिचे चिमुकले हात बाळाच्या अंगावरल्या मऊशार दुलईवरून फिरत होते. बराच वेळ भान विसरल्यागत ती बाळाच्या दुलईवरून हात फिरवत राहिली, आणि ‘आई' एकदम दचकली. बाळाला मांडीवरून उचलून तिनं खांद्याशी घट्ट धरलं. छोटीकडे पाहातानाच्या तिच्या नजरेतला आईचा ओलावा मात्र तिळाइतकाही कमी दिसत नव्हता... छोटीचा हात एकदम थबकला, आणि तिनं त्या आईकडे पाहिलं. तिच्या चेहेऱ्यावरलं हासू पाहून ती सावरली, आणि तिचा हात पुन्हा पुढं झाला... ही ‘आई' अजूनही स्वप्नाळू नजरेनं छोटीकडे पाहात होती. कापडी पिशवीतलं सामान सावरत नुकताच बाप झालेला तो पोरसवदा तरुण एकदा छोटीकडे आणि एकदा बायकोकडे पाहात आजूबाजूच्या प्रवाशांच्या नजरांचाही वेध घेत होता... कुठल्यातरी झोपडपट्टीतलं आपलं घर नव्याच्या स्वागतासाठी सजवण्याची हौस त्याच्या नजरेतही उमटली होती... ‘आई'च्या अंगावरचा नवा कोरा, रस्त्याकडेच्या फुटपाथवरल्या कुठल्याशा दुकानातून घेतलेल्या नव्या, रंगीबेरंगी टिकल्यांची ‘एम्ब्रॉयडरी' काढलेला लाल रंगाचा पंजाबी ड्रेस त्याच्या हौशीची साक्ष देत होता. ‘छोटी'चे चिमुकले हातही त्या ‘ड्रेस'वरून हळुवारपणे फिरत होते... आणि ती ‘आई', शांत नजरेनं छोटीकडे पाहात तिची नव्या कपड्यावरून हात फिरवायची इच्छा मनसोक्तपणे पूर्ण करीत होती... नजरेतली माया अव्यक्तपणे उधळत होती.

एकेक स्टेशन पार करत गाडी धावतच होती, आणि अचानक ‘तो' उठला. हातातली पिशवी सावरत त्यानं तिलाही उठण्याची खूण केली, आणि बाळाला खांद्याशी घट्ट पकडत जडपणे ती उठली... अंगावरल्या नव्या ड्रेसवरली एम्ब्रॉयडरी कुरवाळत भान विसरलेले छोटीचे हात तिनं हळुवारपणे बाजूला केले, आणि पुन्हा आपलं ‘आईभरलं’ हास्य तिनं छोटीवर उधळलं....

स्टेशनवर गाडी थांबली, आणि ती मागंमागं पाहातच खाली उतरली.

फलाटावर उतरली, तेव्हा ती आपलाच ड्रेस कुरवाळत होती... ‘छोटी'च्या हाताचा हळुवारपणा मनात साठवत होती... सहजपणे घडलेल्या, एका ‘आई'च्या दर्शनानं मी तृप्त झालो होतो. गाडीत उधळल्या गेलेल्या मातृत्वाच्या मागे उरलेल्या सुगंधानं भारावून गेलो होतो...

खिशात हात घालून मीही एक नाणं छोटीच्या चिमुकल्या हातावर ठेवलं, आणि पुढच्या स्टेशनावर उतरायच्या तयारीनं सावरून बसलो.

डब्यातली तुरळक गर्दी नेहेमीसारखीच ‘तटस्थ’ होती...
-------------


Chinnu
Monday, August 20, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) अगदी लोकल मध्ये समोर बसून हे सर्व पाहिल्यासारखं वाटलं!

Mansmi18
Monday, August 20, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप छान! <keep it up>

Kedarjoshi
Monday, August 20, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या आईची आपल्या मुलाला त्या मुलीत पाहन्याची जी नजर असेल ती मला तो परिच्छेद वाचताना जानवली. नव्हे त्यामुळेच ही छोटी गोष्ट मनाला भिडली.

झुलेलाल तुम्ही खुप छान लिहीता हे पण आता लिहावे वाटत नाहीये.


Aktta
Monday, August 20, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही मला तर मी एखाद्या दुपारच्या लोकल मधे बसुन वाचतो आहे अस वाटल.... तो चप्पक चाप्पक आवाज पन ऐकायला आला... :-)
एकटा...


Disha013
Monday, August 20, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल,तुम्ही वर्णन फ़ार सुंदर करता.खुपच छान!


Farend
Tuesday, August 21, 2007 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खेळण्याच्या वयात भीक मागावी लागणार्‍या मुलांकडून 'बचपन के दिन...'! हा विरोधाभास जबरदस्त आहे. मस्त लिहिले आहे झुलेलाल.

बाकी नवजात अर्भकाला घेऊन लोकल मधून जावे लागणे म्हणजे अचाटच आहे, असंख्य लोकांना करावे लागत असेल पण. मुंबईची लोकसंख्या पाहता लोकल्स च्या एका डब्याचा एक भाग अशांसाठी राखीव ठेवला पाहिजे "सारे समय के लिये" :-)


Mankya
Tuesday, August 21, 2007 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप सुरेख वातावरणनिर्मिती अन भावही छान रेखाटलेत !

माणिक !


Chetnaa
Tuesday, August 21, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, अप्रतिम..
एकाही संवादाशिवाय प्रचंड आशय सांगितलात....
अगदी समोर घडतेय असे वाटले...


Daad
Tuesday, August 21, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, परत एकदा, पुन्हा... फारच छान. चेतना म्हणतेय तसं एकाही संवादाशिवाय किती सुंदर रेखाटलाय सगळा प्रसंग... नुसतीच घटना नही तर त्यातली पात्रंही!
फार फार छान लिहिता.


Manogat
Tuesday, August 21, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील सर्व comments ला अनुमोदन. फ़ारच सुरेख लीहिलेल आहे.

Ana_meera
Tuesday, August 21, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना अनुमोदन. प्रसंग डोळ्यापुढे उभा करण्याची ताकद आहे हो झुलेलाल तुमच्या लेखणीत..

Lopamudraa
Tuesday, August 21, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर लिहिले आहे झुलेलाल.... अप्रतिम.

Maudee
Tuesday, August 21, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वरील सर्व comments - उकडीचे मोदक:-)


Ladaki
Tuesday, August 21, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान रेखाटलाय प्रसंग... ऑफिसमधे असुनही ट्रेनमधे असल्यासारखा प्रत्यक्ष अनुभवला...

एक विनंती... तुमच्या प्रोफ़ाइलमधे 'रत्नागिरी' व्यवस्थित लिहा...
plzzzzzzzz

Monakshi
Tuesday, August 21, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, केवळ अप्रतिम. सगळा प्रसंग जसाच्या तसा उभा रहातो डोळ्यासमोर.

Mi_anu
Tuesday, August 21, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त.
प्रभावी कथन.दृष्य डोळ्यासमोर उभे राहते.


Savyasachi
Tuesday, August 21, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, छान लिहीलय.
लडकी, पुर्वीची लोकं रत्नागिरीचा उच्चार तसा करायचे.


Jaijuee
Tuesday, August 21, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान! ललित साहित्याच्या घाटणीचं लेखन! कथाप्रकारात जरा न बसणारच! पण अभिव्यक्ती नक्कीच सुंदर!

Zulelal
Tuesday, August 21, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

‘रत्नांग्री’- पु.लं.ना हेच नाव आवडायचं. गावात तर रत्नागिरीला, ‘रत्नारी’ रत्नाईरी. म्हणतात, ते जसंच्या तसं लिहिता येत नाीये.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators
>