|
Shraddhak
| |
| Wednesday, August 08, 2007 - 8:37 am: |
| 
|
१५ मे २००२. गेल्या तीन दिवसांत केलेला प्रवास. हैद्राबाद - नागपूर - शेगाव - बरीच नावही न आठवणारी गावं - टुणकी. नक्की कशासाठी? आत्ता यावेळी डायरीदेखील लिहावीशी वाटत नाहीय, थकलेय खूप.... पण आधीच खंड पडलाय महिनाभराचा. मनावर कायमचा ठसा उमटवणार्या बर्याच घटना घडल्यात गेल्या महिनाभरात... पंधरवडा झाला, शिशिरच्या आई जाऊन! गेले तीन वर्षं डायबेटिस पाठी लागला होता... ' आता कंटाळा आला ' म्हणत होत्या, औषधं.. पथ्यं! थकल्या होत्या आताशा! डायलिसीस चालू झालं दोन महिन्यांआधी तशा आणिकच मलूल दिसायच्या! एप्रिलमध्ये तब्येत जरा जास्त बिघडली तशी आम्ही दाखल केलं हॉस्पिटलमध्ये. माझ्या मागे चक्रच लागलं. ' घर, हॉस्पिटल, नोकरी, घर ' . त्या म्हणायच्या वारंवार ' तुला त्रास होतोय नं... संपावं हे एकदाचं... कायमचं! ' मी ओठ गच्च आवळून रडं परतवायचे. ' तुमचा कसा त्रास होईल, आई? ' हॉस्पिटलमध्येच गेल्या त्या.. दाखल केल्यापासून दोन आठवड्यांनी! जायच्या आदल्या दिवशी मला जवळ बसवून घेतलं, " सुधा, एक काम करशील का गं माझं? तेवढी एकच गोष्ट काही शेवटपर्यंत माझ्याकडून झाली नाही, ती तू तरी पुरी कर. " ' काय? ' म्हणून विचारलं तशी म्हणाल्या, " तुला मी सांगितलंय बघ... आपलं मूळ गाव टुणकी. ( तशाही परिस्थितीत ते नाव ऐकून मला हसू आलं.) आपल्या घराण्याचा मूळपुरुष तिथला. तिथून मग शाखा उपशाखांनी विस्तारत गेलं इनामदार घराणं.. त्याबद्दल बोलायला मला वेळ पुरेसा नाही. मुद्द्याचं तेवढं सांगते. त्या मूळपुरुषापासूनच्या चौथ्या पिढीतली, राघोजी इनामदारांची पत्नी, रमा, त्यांच्या मृत्यूनंतर सती गेली. तिचं तुळशीवृंदावन आणि देऊळ अजूनही टुणकीत आहे. माझ्या सासूबाईंपर्यंतच्या पिढीतल्या इनामदारांच्या सुना नेमानं तिथं जाऊन दर्शन घ्यायच्या, सतीचा आशीर्वाद घ्यायच्या. तिनं सती जाताना वर दिला होता म्हणे, इनामदारांच्या घरातल्या मुली आणि सुनांना तिच्या आशीर्वादाने कधीही अपत्यसुखाच्या बाबतीत कुठलाही त्रास होणार नाही. लग्नानंतर मी आणि हे लगोलग परदेशीच गेलो. शिशिरचा जन्म भारताबाहेरचाच! तेव्हा काही रमेच्या दर्शनाला जाणं झालं नाही. शिशिरच्या जन्मानंतर मला तब्बल दहा वर्षांनी पुन्हा दिवस राहिले. वय वाढलं होतंच. मला भयंकर त्रास व्हायला लागला. तुझा विश्वास नाही तरी सांगते, मला स्वप्नं पडायची. हिरवी साडी नेसलेली सवाष्ण बाई यायची सतत स्वप्नात... बोलायची काही नाही, माझ्याकडं रोखून बघत राहायची. माझा त्रास वाढायला लागला.... " त्यांना बोलता बोलता धाप लागली. मी चटकन पाणी दिलं त्यांना. थोड्या वेळाने पुन्हा त्या बोलू लागल्या. " गेलं ते बाळ शेवटी. मुलगी होती गं! पण तासभरदेखील नाही जगली. ह्यांना अखेरपर्यंत पटलं नाही, पण रमा कोपली होती माझ्यावर. मी माझं कर्तव्य केलं नाही. तिच्या दर्शनाला गेले नाही. सुधा, माझं एवढं ऐक. तू तरी लौकरात लौकर तिथे जाऊन ये. माझ्यावतीनं माफी माग रमेची. तुझा संसार नुकताच सुरु झालाय गं. हे असले त्रास तुझ्या, शिशिरच्या वाट्याला नकोत. जाशील ना? " काही न सुचून मी त्यांच्याकडं बघत राहिले तशी पुन्हा म्हणाल्या, " जाशील ना? " मी तात्काळ होकार दिला. दुसर्या दिवशी त्या गेल्या. सगळ्या त्रासातून सुटका झाल्याचं समाधान त्यांच्या चेहर्यावर होतं. माझ्या मनात सारखं त्यांनी सांगितलेलंच! आई अंधश्रद्ध नव्हत्या. पण मग ती स्वप्नं, त्या स्वप्नांतली ती सवाष्ण बाई ( रमा?), त्यांचं दुसरं बाळ दगावणं... सतीचा कोप? की केवळ कल्पना? आईंना मुलीची हौस होती. पण ती हाती लागली नाही म्हणून सतीच्या कथेवर विश्वास बसला असावा का त्यांचा? मनात विचारांचं चक्र फिरत राहिलं. तेरावं झाल्यावर मी शिशिरशी बोलले या संदर्भात. माझे आई बाबाही आले होते तेव्हा! ते काहीसे चकितच झाले. " सुधा, जाणार आहेस का खरंच? लहानपणापासून ओळखतोय तुला. अशा गोष्टींवर तुझा विश्वास नाही हे माहीत नाही का मला? तरीही... " " तरीही बाबा, शिशिरच्या आईंची इच्छा होती. माझा विश्वास नसला तरी... त्यांच्या इच्छेपायी जावंसं वाटतंय. बाकी काही नाही. " " विश्वास माझाही नाही.. " शिशिर संभाषणात भाग घेत म्हणाला. " आणि आत्ताच जायला हवं असंही नाही. पुढे कधीतरी पाहता येईल. " " पुढे नको.... सध्या आपल्या ऑफिसमध्ये तसंही काम कमीच आहे. सुट्टीही आहे. जायचं तर आत्ताच जाता येईल. " " ठीक आहे. मी बुकिंग वगैरेचं बघतो. " असं म्हणून तो आत निघून गेला. बाहेरच्या खोलीत मी, आई, बाबा एवढेच उरलो. " सुधा, काय हे? " बाबांचा स्वर काहीसा नाराजीचाच! " तुला लहानपणापासून शिकवलेलं सगळं व्यर्थच का? " " तसं नाही बाबा... पण त्यांनी अगदी अखेरच्या क्षणी, माझ्यावरच्या विश्वासाने मला हे करायला सांगितलंय. मी गेले नाही तर काय होईल? त्या आता नाहीत मला जाब विचारायला, हे खरं आणि शिशिरदेखील मला ' हे का केलं नाहीस? ' असा जाब विचारणार नाही हेही खरं... But my conscience is not allowing me to do so." बाबांना ते पटलं बहुधा. विषय बंदच झाला मग इतरांच्या लेखी! माझ्या मनात मात्र चालू होता. सतत... ... आता झोप अनावर होतेय. झोपावं. डायरी उद्याच लिहावी मग. क्रमशः
|
हम्म.. interesting बर्याच दिवसांनी कथा वाचायला मिळतेय तुझी..
|
सुरुवात मस्त.
|
Tukaram
| |
| Wednesday, August 08, 2007 - 3:09 pm: |
| 
|
छान सुरुवात आहे. उद्या नक्की लिही.
|
Mansmi18
| |
| Wednesday, August 08, 2007 - 6:18 pm: |
| 
|
श्रद्धा, अतिशय सुंदर आणि सहज लेखन. क्रुपया जमल्यास लवकर पुर्ण करा. धन्यवाद.
|
Prajaktad
| |
| Wednesday, August 08, 2007 - 6:40 pm: |
| 
|
श्रद्धा ! खुप दिवसानी तुझी कथा वाचायला मिळतेय.सुरवात interstating झालिय.
|
Aktta
| |
| Wednesday, August 08, 2007 - 6:43 pm: |
| 
|
सुंदर सुरवात... अनी हो जरा लवकर पुर्न कर प्लीज़.... नाहि तर मला "रेहान आणी सती" अशी एका कथा लीहावी लागेल... एकटा...
|
Madhavm
| |
| Thursday, August 09, 2007 - 4:10 am: |
| 
|
सुरुवात मस्तच झालीये! एकटा, तुझी कल्पना सहिच आहे. पण सतीच्या आशीर्वादाने श्रद्धा लवकरच कथा पूर्ण करेल.
|
Ladaki
| |
| Thursday, August 09, 2007 - 7:24 am: |
| 
|
श्रध्दा छान सुरुवात केलीयेस... नाहि तर मला "रेहान आणी सती" अशी एका कथा लीहावी लागेल... >>> एकटा... सध्यातरी आम्हाला नंदिनी आणि श्रध्दाच्या लेखणीतुन उतरलेल्या 'रेहान' आणि 'सती' वाचायला जास्त आवडेल... त्यामुळे तुम्ही स्वतःच्या ईच्छेला थोडा वेळ स्वल्पविराम द्या... //त्रास देतेय थोडा तुम्हाला... त्यासाठी आधीच क्षमा मागते... या विनांतीवर चर्चा अपेक्षित नाहिये... कृपया याची सगळ्या वाचकांनी नोंद घ्यावी... लाडकी...
|
Manjud
| |
| Thursday, August 09, 2007 - 7:53 am: |
| 
|
लाडके, keep it up श्र, बर्याच दिवसानी आम्हाला मेजवानी तुझ्या कथेची....... सुरुवात मस्तच आहे. आणि चक्क ह्या क्थेत बॅंगलोर नसून टुणकी आहे.
|
Shraddhak
| |
| Thursday, August 09, 2007 - 9:01 am: |
| 
|
१६ मे २००२. १३ मेला नागपूर गाठलं आम्ही. तब्बल चार तास लेट झालेली फ़्लाईट. नागपूरला उन्हाळा मी म्हणत होता. तिथे शिशिरच्या आत्यांकडे उतरलो. विश्रांती, जेवण, थोड्याफार गप्पा... सकाळी तरी लौकरच जाग आली. कुठल्यातरी ट्रॅव्हल्सची बस, सीट्स अडचणीच्या! माझ्या कपाळावरची आठी पाहून शिशिर म्हणाला, ' अगं, थोड्याशा अंतराचा तर प्रवास आहे. चालवून घे आता. ' हा लगोलग टुणकीला जायचा हट्ट खरंतर माझाच, त्यामुळे उगीच तक्रार करण्यात काही अर्थ नव्हता. खिडकीतून मुकाट बाहेर बघत राहिले. सगळीकडे जाणवणारा रखरखाट. कधी एकदा शेगाव येतं असं झालेलं. तिथून पुढेही प्रवास होताच! ' आपण कुणाकडे राहणार आहोत टुणकीला? ' हा प्रश्न विचारायचं मला आत्ता सुचत होतं. ' आत्याने दिलाय एकांचा पत्ता. इनामदारांच्याच नात्यात आहेत म्हणे! त्यांच्याकडे जाऊया. आत्याची ओळख आहे; नाही म्हणायचे नाहीत. ' शेगावला पोचलो. बस स्टॅंडवर चौकशी सुरु केली; टुणकीला जाणार्या बसची. बराच वेळ काही माहितीच मिळेना. उन्हाने जीव कासावीस व्हायला लागला. शिशिर इतर काही व्यवस्था होतेय का बघायला स्टॅंडबाहेर गेलेला; तो येण्याची वाट बघत तिथेच एका बाकावर टेकले. आजूबाजूला टिपिकल वातावरण... येऊन लागणार्या, लागलेल्या, निघणार्या बसेस, बस लागल्यावरची लोकांची झुंबड, तर्हेतर्हेचे आवाज, उन्हाने त्रस्त होऊन किंचाळून रडणारी लहान बाळं... त्यांना त्रासलेल्या त्यांच्या आया... दूरवर खाद्यपदार्थांचा स्टॉल दिसत होता, पण मला काही खावंसंच वाटत नव्हतं. मनात मधून मधून रमेच्या कथेचाच विचार.. का गेली असेल सती ती? भाग पाडलं असेल का तिला कुणी? ही कथा मी आधी कधीच ऐकलेली नव्हती आईंकडून. नेमकी ती त्यांना आत्ता का आठवावी? आणि तिचा तो आशीर्वाद, तिचा कोप वगैरे गोष्टी खर्या असतील का? किती वेळ मी तशीच विचार करत बसून राहिले; कुणास ठाऊक! शिशिरने मला हलवलं तेव्हाच तंद्री मोडली माझी. ' काय रे? ' ' बसचं माहीत नाही, पण एक गाडी जातेय टुणकीला. त्या ड्रायव्हरला पटवलंय मी. टुणकीत आपण ज्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांना ओळखतो म्हटला तो. चल आता. ' मला जरा भीतीच वाटली. अनोळखी मुलूख, आणि हा कुणावरही विश्वास ठेवून कसा काय तयार होतो. रस्त्यात काही केलं म्हणजे? माझ्या चेहर्यावरचे भाव शिशिरला वाचता आले असावेत. ' चल गं, काही होत नाही. इथे बसून वैतागण्यापेक्षा निघालेलं बरं... किती वेळ लागेल बस मिळायला देव जाणे... ' तो त्रासलेला दिसत होता. मी बॅगा उचलून निमूटपणे त्याच्यासोबत चालू लागले. शिशिरमध्ये कधीकधी मला माझ्या बाबांच्या स्वभावाचाच भास होतो. बेधडक निर्णय घेण्याची वृत्ती.. भीती, काळजी हे शब्दच शब्दकोशात नसावेत बहुधा. बाहेर एका झाडाखाली एक जुनाट जीप उभी होती. दोन्ही बाजूंना दारं नसलेली, जुन्या स्टाईलची जीप! ' सामान मागे टाकू का? ' शिशिरने त्याला विचारलं. त्याने काही न बोलता होकारार्थी मान हलवली. सामान टाकून आम्ही आत चढून बसलो. शिशिर ड्रायव्हरशेजारी बसला अर्थातच! धुरळा उडवत जीप धावू लागली. मागे वळून शिशिरने विचारलं, 'Comfortable?' मी हो / नाही च्या मध्ये मान हलवली. ' शिशिर, आपलं बोलणंच झालं नाही ह्याबद्दल फारसं... तुला काय वाटतंय ह्या सतीच्या कथेबद्दल? ' ' काहीच नाही. ' तो सहजपणे म्हणाला. ' आई गेल्यावर तू बरीच अस्वस्थ होतीस, आईने तुला सांगितलेली तिची शेवटची इच्छा तू पूर्ण करायची तयारी दाखवलीस, आणि अनायासे जमतही होतं, म्हणून मी ह्या ट्रिपला हो म्हटलं इतकंच! बाकी ह्या सतीच्या कथेबद्दल म्हणशील तर मला आधी कधी आईने ती सांगितल्याचं आठवत नाही. बहुधा बाबांनी आईला हे असलं काही मला सांगायला मना केलं असावं. त्यांचा तर असल्या गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता. किंबहुना अशा गोष्टींची त्यांना काहीशी चीडच! ' ' पण आईही नव्हत्या ना अंधश्रद्ध! ' ' खरंय.. नव्हती खरंतर! मग या एकाच बाबतीत असं का व्हावं, माहीत नाही... ' मी बाहेर बघत राहिले. एक कुठलंतरी छोटं गाव लागलं. उन्हानं सगळेच व्यवहार जवळपास थंडावलेले. तुरळक लोक दिसत होते. जीपमध्ये आम्ही तिघे गप्पच बसलेलो! ड्रायव्हरलोक बर्यापैकी बोलके असतात, हा आमचा नेहमीचा अनुभव. गेल्या वर्षी नैनिताल ते कौसानी प्रवासात आमच्या ड्रायव्हरने त्याच्या गावातल्या एका शापित हवेलीची कथा आम्हाला अगदी रंगवून रंगवून सांगितलेली.... हा मात्र अगदी शांतपणे गाडी चालवत होता. ' अजून किती वेळ लागेल म्हणे? ' त्या शांततेचा भंगच करायचा या इराद्याने मी प्रश्न विचारला. ' अजून तरी दीड तास... ' एवढंच त्रोटक उत्तर देऊन तो पुन्हा गप्प झाला. सीटच्या पाठीवर डोकं टेकून मी डोळे मिटून घेतले. पेंग यायला लागली होतीच! किती वेळ असा गेला कोण जाणे! आणि मला ते स्वप्न पडलं. हिरवी साडी नेसलेली एक बाई, अतिशय देखणी, जेमतेम तिशी पस्तिशीतली असावी, केसांचा अंबाडा, सगळे सौभाग्यालंकार घातलेले. चेहरा मात्र निर्विकार, भावहीन. माझ्याकडे रोखून पाहतेय असं वाटायला लागलं. मी दचकूनच जागी झाले. घामाने चिंब झाले होते. ' सुधा?आर यू ओके? ' शिशिरचं लक्ष गेलंच माझ्याकडे. अजून एका लहान गावात गाडी थांबलेली. ' काही नाही... काही नाही. मी बरी आहे. तहान लागलीय. कुठे जरा एखादी बिसलेरीची बाटली, एखादं कोल्ड ड्रिंक मिळालं तर बघतोस का? ' मी त्याला स्वप्नाबद्दल काहीच बोलले नाही. ' बाय द वे, हे गाव कुठलं? ' मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं, ' आणि तो ड्रायव्हर कुठेय? ' ' वरवट बकाल का काहीतरी आहे. त्याला शेतीचं काही सामान घ्यायचंय ते आणायला तो गेलाय. ' शिशिर उतरून पाणी आणायला गेला आणि त्या स्वप्नाचा विचार करत मी गाडीत तशीच बसून राहिले. क्रमशः
|
Rajankul
| |
| Thursday, August 09, 2007 - 9:56 am: |
| 
|
त्यांचा तर असल्या गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता. किंबहुना अशा गोष्टींची त्यांना काहीशी चीडच! >>>> अस पुस्तकी कुणी बोलत नाही हो वाक्य दुरुस्ती करा. अजुन एक (भाकड)कथा. जरा वाचनीय येउ द्या
|
Zelam
| |
| Thursday, August 09, 2007 - 12:12 pm: |
| 
|
श्र interesting . वरवट बकाल, टुणकी कुठून काढतेस अशी नावं शोधून! :-)
|
Zakki
| |
| Thursday, August 09, 2007 - 12:20 pm: |
| 
|
मग राजनकूल, तुम्ही कशी म्हणता हीच वाक्ये?
|
Shraddhak
| |
| Thursday, August 09, 2007 - 12:33 pm: |
| 
|
झेलम, in fact ही खर्या गावांची नावं आहेत. 
|
Aashu29
| |
| Thursday, August 09, 2007 - 4:48 pm: |
| 
|
ज्यांना भाकड कथा वाटतेय त्यांनी कृपया वाचु नये!! श्रद्धा तु चालु ठेव ग!!
|
Itgirl
| |
| Thursday, August 09, 2007 - 5:54 pm: |
| 
|
खरेच आहे Aashu म्हणतेय ते.. छान आहे कथा, चालू राहू देत.
|
Amol_amol
| |
| Thursday, August 09, 2007 - 8:09 pm: |
| 
|
राजानकुल दुसरी एखादी साइट शोधा.... श्रध्दा, छान चालले आहे... पुढचे भाग लवकर टाक...
|
Aktta
| |
| Thursday, August 09, 2007 - 8:23 pm: |
| 
|
मी साइटची नाव देउ का.... मला कथा पन आवडली आनी साइट पन एकटा.....
|
>>>>> अस पुस्तकी कुणी बोलत नाही हो वाक्य दुरुस्ती करा. काकाऽऽऽ, पुण्याचा सदाशिव नारायण शनिवार पेठात कधी गेला नाहीत का????? नसाल तर दुर्दैव तुमचे! DDD आम्ही अशी भाषा वापरतो, आजही! एनिवे, तुम्हाला 'किम्बहुना' हा शब्द खटकला असावा! आणि तो तर आम्ही सर्रास सम्भाषणातही वापरतो!
|
|
|