Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 18, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » विनोदी साहित्य » नावात काय्ये? » Archive through July 18, 2007 « Previous Next »

Daad
Wednesday, July 18, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'अहो, नाव काय ठेवायचं?'
'कोणाला नावं ठेवायचीयेत आत्ता, या वेळी?', जागृती आणि सुषुप्ती यांच्या सीमारेषेवर घोटाळणार्‍या नवर्‍याकडून उत्तर नाही पण प्रश्न. अशावेळी 'इश्श्य हे काय?' वगैरे चालत नाही. नवरा प्रेमाच्या तळ्यात नाहीये, झोपेच्या मळ्यात आहे हे ध्यानात घेऊन, हा देवाघरचा जीव वगैरे मनात न आणता, पुन्हा समाधीत जाण्यापूर्वीच गदागदा हलवून माणसांत आणावा लागतो.

'काय गं झोपूही देत नाहीस. आजच्या अख्ख्या दिवसात काय चुकलो असेन तर माफ कर, आणि तू एक सर्वांगसुंदर, सद्गुणी बायको आहेस... आता झोप?....घुर्रर्र'
शेवटच्या झोपू? मधला 'ऊ' सुद्धा न म्हणता एकदम डायरेक्ट घोरण्याचा खर्ज.
बायकोला द्यायचा, daily अहेराचा डोस.... हे सुंदर, सद्गुणी वगैरे वगैरे... हे नवीन शिकल्येत. पण मी पहिल्या दोनतीनदाच फसल्ये हं! आठ महिन्यांच्या गरोदर बायकोला सर्वांगसुंदर वगैरे म्हणजे... मला पहिल्या पहिल्यांदा छानच वाटलं.... बर्‍यापैकी जरा नवीन नवीन उपमा शोधायचे पहिले दोन्-तान महिने. पण एकदा मात्रं सुरंगी न म्हणता सरंगा म्हणाले होते.... झोपेत.
आता मस्करी करतायत असं वाटतं. पण ह्यांचा नेम चुकत नाही, आपलं देणं देऊन टाकल्यासारखां म्हणून मोकळे होतात.

आता गत्यंतर नाही असं लक्षात आल्यावर कितपत उत्साहात नवरे कान टवकारतात, त्याच्या निम्म्या उत्साहाने ह्यांनी टवकारले.
'आई म्हणतायत...' अशी सुरूवात केली मी, आणि चूक लक्षात आली. आपल्या 'आई'च्यापासून सुरू होणारं कोणतही वाक्यं कोणत्याच नवर्‍याला ऐकू जात नाही हे विसरलेच होत्ये मी. तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
ह्यांच्या घराण्याला घराणं न म्हणता, 'घोराणं' म्हणायला हवं. सगळेच घोरतात वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये! हा पोटातला पठ्ठ्या ही घोरत असावा आत्तापासूनच, काय सांगता येत नाही.

क्रमश:


Daad
Wednesday, July 18, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'ए, मम्याचा फोन होता ऑफिसात. काय गं तुझ्या एकेक बहिणी, ऑ?', आठव्या महिन्यात (बायकोच्या) नवर्‍याला जितकं करवादता येतं तितकं करवादून हे म्हणाले.

'काय नाव सांगितलं?', मी शांतपणे विचारलं.

'ऑ?, तुला कसं कळलं?'
'मला म्हणाली होती की नाव सुचलं की लग्गेच फोन करेन.... दुपारी वाजला होता मोबाईल. मी आडवारल्ये होत्ये म्हणून कट केला. त्यामुळे तुम्हाला केला...'
'अगं बोर्ड मीटिंगमधून बोलावून आणलं तिने बाहेर. हे नाव काय तव्यावरची पोळी आहे, सुचल्या सुचल्या कळवायला? आणि नाव तरी काय....'
इथे मात्र करवादी चेहरा पुसून पळवादी दिसायला लागला.
'काय बरं ते?... आपलं हे... च्यायला नाव धड नव्हतं. एव्हढं नक्की आठवतय.'
'बरोबरय, माझ्या बहिणीने सुचवलय ना? पण नाव काय होतं?', म्हटलं नाव महत्वाचं, टोमणे मग मारता येतील.
मम्या जरा साहित्यिक लिहित्ये-बिहित्ये... ह्यांच्या घरी काही नाहीच साहित्यातलं. तेव्हा ह्यांना नसणारच ते 'धड' वाटलं. तरी म्हणत होत्ये जरा काही वेगळं वाचा.
'....काही तरी चंची चंची सारखं होतं....' हे अजून डोक्यातली चंच्या शोधतच होते.
'चंची?', साहित्य इतकं पुढे (की मागे) गेलं असेल असं वाटलं नव्हतं. मध्यंतरी कुणीतरी भेटलं होतं पुण्याचं... की... गावात काय आहे म्हणा... पण त्यांनी सांगितलं की त्यांच्या ओळखीच्यात कुणाच्यातरी मित्राच्या ऑफिसातल्या कॅन्टीनच्या मालकाच्या भावाच्या मुलांची नावं- थेंब आणि ठिपका....! आपण एव्हढं हसायला नको होतं तेव्हा.... त्यांच्यासमोर. असेलही... चंची, अडकित्ता, थेंब, ठिपका, टीपकागद, खोडरब्बर, कर्कटक....

'हा, आठवलं', मी कंपासमध्ये फिरून येईपर्यंत ह्यांच्या चंच्या, गाठोडी, उघडून झाली होती बहुतेक.
'तरी म्हणतो विसरेन कसा.... अरे सतरा सर्वर्सची नाव लक्षात रहातात तिथे एक साधं नाव... काय समजलीस मला? मी म्हणजे...', नाव सोडून बाकी सगळं चाललं होतं.
'अहो..... नाव काय सांगितलं?', आठव्या महिन्यात आवाज चांगलाच लागत असावा कारण फटकन नाव आलं.
'घडवंची!'

'ऑ?', हा माझा. पूर्णं dropped jaw म्हणतात तस्सा. 'काय डोकं बिकं फिरलं का काय मम्याचं?'
'तेच म्हणतो मी. म्हणजे आत्ता तूच म्हणतेयस म्हणून ठीकय... मी म्हटलं असतं तर भांगडा नाचली असतीस', हे!
अती हिंदी सिनेमे बघितल्याने, 'थयथयाट केला असतास' हे सुचणं शक्यच नाही. म्हटलं ना, साहित्याचं काही नाहीच ह्यांच्याकडे.
'आणि मुलाचं की मुलीचं ते सांगितलच नाही?' (पुन्हा हेच)

हे किनई अतिबावळट प्रश्न विचारताना खूप्पच गोड दिसतात.... त्यामुळे सुटतातही!

'म्हटलं ना तुम्हाला साहित्यातलं काही काही कळत नाही! अहो घडवंची हे मुलीचं नाव!'

'पण आपल्याला मुलगी....' त्यांना तिथेच थांबवत मी म्हटलं, 'अहो, पण झालीच मुलगी तर? नाव नको का ठरवायला आत्तापासूनच?'
'पण according to our घराण्याज statistics .....'

हे ह्यांचं एक पूर्ण ऐकून घ्यावं लागतं. ह्यांच्याकडे १४ सख्खे-चुलत भाऊ आणि फक्त दोन बहिणी. त्यांच्यात पुन्हा तिसरा चान्स घेतलेल्यांमध्येच फक्त सगळ्या मिळून दोन मुली. त्यामुळे खात्रीच आहे मुलगाच होणार.
सगळा गोतावळा जमला की मुलींशी वागताना ह्या सगळ्याच भावांची कशी तंतरते, त्या सगळ्या कशा गुंडाळतात ह्यांना ते बघितलय. त्यामुळे मीसुद्धा विषय वाढवत नाही. मुलगी झाली की येतील ताळ्यावर, जातात कुठे!

'घडवंची म्हणजे स्वयंपाकघरातलं फडताळ', मला हे सांगतानाही कसतरीच वाटलं. शिवाय 'फडताळ' कळलं असतं की नाही कोणजाणे म्हणून वर आणखी इंग्रजीत सांगितलं, 'म्हणजे किचन कबिनेट!',

'हॅ! मुळीच ठेवू देणार नाही असलं नाव. एकवेळ पंचगंगा, वैनगंगा काहीही म्हणेन पण...'. बरोब्बर! हे कोल्हापूरकडचे असल्याने रागावले की अगदी अस्सल original संदर्भ येतात.

'अरे घडवंची नाही, 'प्रत्यंचा' असेल. तुझं मराठी कच्चंच होतं नाहीतरी', सासूबाई अगदी देवासारख्या धावून आल्या, 'आमच्या भिशीत आहेत ना तिच्या सासूबाई! त्यांनीच सुचवलेलं. म्हटलं काही नको. लग्नं झाल्यावर दोन्ही घराण्यांना अगदी ताणून धरेल' (हे माझ्याकडे न बघता)

नाही म्हणायला रामायण आणि महाभारत बघितल्याने प्रत्यंचा तेव्हढी कळली ह्यांना.
'हिच्या बहिणी सुचवणार! क्यायच्या क्याय नावं एकेकतरी... प्रत्यंचा! मग मुलाचं नाव काय? 'भाता'? ',

मला तरी 'बाण' सुचला असता, पण हे म्हणजे कमाल आहेत.

क्रमश:


Daad
Wednesday, July 18, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हे बघ तू उगीच माझं डोकं खाऊ नकोस नावावरून. त्याला बघितल्यावर मला नाव सुचणार आहे' असं म्हणून ह्यांनी पूर्ण विराम दिला त्या विषयाला. स्वत:ला कुणी ऋषी-बिषी वगैरे समजतात की काय! त्या उत्तर रामायणात वसिष्ठ ऋषींनी नाही का, लव-कुशाची अशीच at ramdom नावं ठेवली? नुसती त्यांच्या चेहर्‍याकडे बघून? तसंच असावं बहुतेक.

स्नेहा हाक मारली तर अर्धी बिल्डिंग 'ओ' देईल म्हणून ते नाही.
ऋचा म्हणायला कठीण,
वाणी म्हटलं की कोपर्‍यावरचा नुसत्या बनियन्वर वावरणारा वाणी आठवतो,
ऋषिन तर अनेकवचनी नाव वाटतं (हे) म्हणे,
बरीचशी नावं नात्यातच वापरली गेलीत म्हणून नको,
जाईली, जुईली, सायली.... नेमकी टॉमबॉय निघाली पोरगी तर पचकाच.
दोन अक्षरी अगदीच लहान,
तीन अक्षरी चालेल पण जोडाक्षर नको,
चारपेक्षा जास्तं अक्षरं म्हणजे श्वास संपेल म्हणतानाच,
तो किंवा ती बोबडं बोलणारच (दोन्ही घरात अनुवंशिक आहे ते) त्यामुळे ऋचा, श्रीरंग वगैरे नावं बाद.
नट्-नट्यांची नावं तर मुळीच नको ह्या एकाच मुद्द्यावर ह्यांचं आणि माझं एकमत.
तरीही, 'शिल्पा शेट्टी... आपली... आपलं नुस्तं शिल्पा छानय की', इती बाबांच्या क्लबमधले दाभोळकर, वय वर्षे बासस्ठ.

उगीच देवादिकाचं वगैरे मुळीच नको-इती पुढारलेल्या आज्जेसासूबाई...
जरा देवा-बिवाचं काहीतरी असेल असं ठेवा गं- माझी आई

'दूर्योधन ठेऊया?', शेजारच्या काण्यांचा तेजस. ह्याला कायम व्हीलन्स आवडतात. 'अरे ते कठीण नाही का म्हणायला?' हे तरी ग्रेटच आहेत. 'मग शकुनी?'

'ए, हिरोशिमा किंवा नागासाकी कसं वाटतं?', माझी भावजय. हीने नुकतीच जपानी कंपनीत नोकरी धरलीये, 'असल्याच नावांची फ़शन येणारय ते बाळ वयात येईपर्यंत.
'मग तोपर्यंत काय? सुशी म्हणूया की साशिमी?' माझा भाऊ म्हणजे एक जबरी खोडरब्बर आहे. ती बोलेल ते खोडून काढण्यात पटाईत, एकदम.

मैदानी खेळाचा तास असल्यासारख्या, बाळाने मारलेल्या लाता, हात लावून बघितल्यावर त्याचं नाव 'बेकम' ठेऊया ही अमुल्य सूचना भाच्याची, 'आत्ते, बेंडिट लाईक बेकम बघितलायस ना?' कमरेवर हात ठेवल्याशिवाय सरळ उभं ही रहाता येत नाही तिथे bend it काय नाहीच!

'तू काही काळजी करू नकोस. त्याला बघितलं की आपल्याला नाव सुचेलच...' आता भाऊ!
मग तर मला काळजीच काळजी लागली. हे आणि तो एकत्र झाले की काहीतरी प्रचंड गोंधळ होतोच होतो.

क्रमश:


Chyayla
Wednesday, July 18, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद मस्त सुरु आहे कथा.. लिहिण्याची पद्धत आणी संवादही अफ़लातुन आहेत.. येउ दे पुढे.

Vaibhav_joshi
Wednesday, July 18, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंची,अडकित्ता, थेंब, ठिपका, टीपकागद, खोडरब्बर, कर्कटक....

शलाका तू प्रचंड हुकलेली आहेस . over the top . मस्त


Aaftaab
Wednesday, July 18, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑफ़िसमध्ये हसून गडाबडा लोळायचंच बाकी आहे आता... धुरळा चालु आहे नुस्ता..


Sanghamitra
Wednesday, July 18, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> आजच्या अख्ख्या दिवसात काय चुकलो असेन तर माफ कर, आणि तू एक सर्वांगसुंदर, सद्गुणी बायको आहेस... आता झोप?....
>> दाद एकदम वाट लागली वाचताना.

बाकी कर्कटक जाम आवडलं. (कर्कोटक असं बहुतेक कुठल्यातरी पुराणात एक नाव वाचलेलं आठवतंय.)


Vaibhav_joshi
Wednesday, July 18, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी कर्कटक जाम आवडलं.
चला ! सन्मे निदान तुझा तरी प्रश्न सुटला .
:-)



Zakasrao
Wednesday, July 18, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बेकहॅम मात्र जाम पटल त्या बाळाच्या लाथा बघुन. पण अशी कल्पनाही केली नव्हती मी. :-)
वैभव हुकलेली :-)
जोरदार पन्चेस आहेत अगदी माणुस त्या पन्चेस नी गडाअबडा लोळला पाहिजे असे. :-) येवु दे.


Manogat
Wednesday, July 18, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह वाह दाद,
मस्त लिहिलयस... हास्यकल्लोळ झाला :-) keep it up


Badbadi
Wednesday, July 18, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, जबरी लिहिलं आहेस :-) पुढचा भाग अजून जबरी येऊदेत...

Zaad
Wednesday, July 18, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्क्क्क्कास लिहीलंयस शलाका!!!!!!!!!
पुढच्या भागाची वाट पाहतोय.


Aparnas
Wednesday, July 18, 2007 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, अशक्य आहेस!... ...


Ultima
Wednesday, July 18, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद हसु आवरण अशक्क्य आहे..... toooo gooodd


Jaijuee
Wednesday, July 18, 2007 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यावेळी तुला मूळीच नाव विचारणार नाही कारण तुझा स्टॉक भारी आहे खोडरबर, वै. :-) प्रत्यंचा तरी कूल आहे दोन्हीकडच्यांना ताणणारी! मी स्वत:च हे नाव घ्यायला तयार आहे! :-)

Swaatee_ambole
Wednesday, July 18, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंची!!
मस्त लिहीलंयस दाद. :-)

मी एकांच्या मुलांची नावं ' क्रांती' आणि ' आंदोलन' अशी ऐकली होती, त्याची आठवण झाली.

BTW , माझ्या माहितीत ' घडवंची' म्हणजे उंच स्टूल. चुभूद्याघ्या. :-)


Runi
Wednesday, July 18, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंची,अडकित्ता, थेंब, ठिपका, टीपकागद, खोडरब्बर, कर्कटक....
>>>> दाद नुसता धुमाकुळ घातलाय्स या कथेत... असेच चालु दे.

Chinnu
Wednesday, July 18, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयशप्पत दाद, कुठेच कुणालाच आणि कशालाच सोडलं नाहीस गं! पुणं, कोल्हापुर, बाण, प्रत्यंचा.. धन्य हो भिशीतल्या सासूबाई! सहीच..
स्वाती :-) आंदोलनाचे माहीत नाही पण क्रांती नवाची HR होती एका कंपनीत. अजून तरी तिकडे क्रांती झाल्याचे ऐकिवात नाही!


Shyamli
Wednesday, July 18, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पथ काय चाल्लय काय :-)
जबरी

Ravisha
Wednesday, July 18, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"माझा भाऊ म्हणजे एक जबरी खोडरब्बर आहे. ती बोलेल ते खोडून काढण्यात पटाईत, एकदम."- :-)
नावात काय आहे?- इथे तर अख्खी कंपासपेटी आणि बरेच काही दिसत आहे :-)
उजाडला का नववा महिना? :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators