|
Farend
| |
| Tuesday, July 17, 2007 - 2:01 am: |
| 
|
परवाच 'भिंतीवरी' असलेले कालनिर्णय बघत होतो आणि आषाढ सुरू होत असल्याचे लक्षात आले. येथे अमेरिकेत आषाढ्-श्रावण म्हणजे फक्त उन्हाळा आणखी जास्त होतो, बाकी काहीच फरक नाही. पण भारतात आणि ते ही पूर्वी शाळेत असताना या सुमारास केवढा बदल व्हायचा! कॅलेंडर कडे बघता बघता मी काही वर्षे एकदम मागे गेलो... हा जर चित्रपट असता तर चित्र धूसर होऊन कॅलेंडर च्या पानांसारखेच फडफडून एकदम काही वर्षांपूर्वीचा मी तसाच कालनिर्णय कडे बघत उभा असलेला शॉट समोर आला असता. एकतर दोन महिन्यांची सुट्टी संपून शाळा चालू व्हायची. म्हणजे वैताग! त्यात पाऊस चालू व्हायचा, पण इतका नाही की शाळेला दांडी मारता येईल अजूनही आषाढ्-श्रावण म्हंटले की डोळ्यासमोर काही ठराविक गोष्टी उभ्या राहतात्: नुकताच संपलेला आंब्यांचा सीझन आणि तरीही विजेच्या तारेवर लटकणार्या कोयी, अधून मधून गाडीवर विकायला येणारे तोतापुरी आंबे व कोणतेतरी तमाशाप्रधान चित्रपटातील गाणे ऐकून तोतापूरी आंब्याची कोय फोडून त्यात भुंगा निघतोय का ते पाहाणे. मातीचा वास, नवीन पुस्तकांचा वास, कव्हरे घालणे वगैरे. तेव्हा Back to school sale वगैरे भानगडी नसल्याने अप्पा बळवंत चौक किंवा जवळ नवीनच निघालेल्या दुकानात आम्ही आणायला जायचो. नंतर मग प्रत्येक विषयासाठी १०० की २०० पानी ते कळाल्यावर वह्या आणणे. घरासमोरच्या मातीत येणारी हिरवळ, कहाण्या आणि मग गणपतीच्या 'मीटिंग्स', ज्यात ठरवून कधीही त्याबद्दल चर्चा होत नसे. मधे राखी पौर्णिमा यायची. तेव्हा एवढे 'उत्तरीकरण' झालेले नसल्याने ही नारळी पौर्णिमाही होती. दिवे, दिंड आणि नारळीभात. नागपंचमी च्या दिवशी काय करता येत नाही याची चर्चा, "नागोबाला दूध"! (दिव्याची अमावस्या नंतर 'गटारी' ही झाली, पण ते चिकन वगैरे खाऊ लागल्यावर) तसेच दहीहंडी. आम्ही कॉलेज मधे एकदा दुसरे काही मिळाले नाही म्हणून एक टेस्ट ट्यूब टांगून दहिहंडी केली होती. आणि झेंडावंदन. खादी किंवा पांढरे कपडे घालून फिरणारे कार्यकर्ते, सायकलच्या हॅंडलला लावलेले झेंडे आणि भिरभिरे. सार्वजनिक ठिकाणी सकाळी सकाळी 'कर चले हम फ़िदा...' पासून सुरू होणारा लाउडस्पीकर वरचा मूड संध्याकाळपर्यंत 'मुंगळा...' वर जायचा. दारू पिउन नाचायला तेच कार्यकर्ते. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर इतक्या वर्षांत काय झाले त्याचे एका दिवसात हायलाइट्स! त्याच्या थोडे आधी पालखी. पालख्यांचा मुक्काम पुण्यात २-३ दिवस असल्याने त्यावेळेस पुण्यात तेच वातावरण असायचे. ज्या दिवशी पालख्यांचे पुण्यात आगमन होते (फक्त येथेच 'आगमन' शब्द योग्य वाटतो. 'सिंहगड एक्सप्रेस ने कल्याण स्थानकावर आगमन झालेल्या' वगैरे कशासाठी? '...स्थानकावर आलेल्या' का नाही?) त्या दिवशी (आता जुन्या) मुंबई पुणे रस्त्यावरून सकाळी जाताना खडकी पिंपरीत काय वातावरण असते! तेथील सगळ्या कंपन्या आपला कॉर्पोरेटपणा सोडून दारात मांडव घालून वारकर्यांसाठी थोडेफार खाणे व पाण्याचे लाल कापडात गुंडाळलेले माठ ठेवायचे व भीमसेन जोशी किंवा प्रह्लाद शिंदे जोरात असायचे. मग पालख्या पुण्यातून पुढे गेल्यावर दुसर्या दिवशी पेपर मधे हमखास येणारा पूर्ण दिवे घाट व्यापून टाकलेला वारकरी व पालख्यांचा फोटो. दर पावसाळ्यात हमखास लक्ष जाणारी शाळेच्या दुसर्या मजल्याच्या जवळ असलेली पानशेत च्या पुराच्या वेळची पाण्याची लेव्हल दाखवणारी रेघ आणि नेहमी शाळेभोवती जमणारे पाणी. घरी धुतल्यानंतर तिसर्या दिवशीही थोडेसे दमट राहणारे कपडे. पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी सर्वांच्या अंगणातील झाडीत दिसणारा तो हिरवागार रंग अजूनही डोळ्यासमोर आहे पण त्याचे नेमके वर्णन करता येत नाही. मग वापरली जाणारी काळी दणकट छत्री. आमच्या आजोबांच्या जमान्यातील आणि आता हळुहळू नाहीश्या झालेल्या गोष्टी म्हणजे त्या काळ्या छत्र्या आणि काळ्या सायकली. पावसाळ्यात एखाद्या सायकल ला मागे मडगार्ड नसेल तर तिच्या चाकाची धार थेट आपल्या अंगावर यायची, म्हणून तसे कोणी दिसले तर त्यातून वाचण्याची धडपड. सायकलीची घंटाही थोडी गंजून 'ट्रिन्ग ट्रिन्ग' न करता नुसताच काहीतरी घासल्यासारखा आवाज काढत असे. ही सायकल अत्यंत टिकाऊ होती, फक्त कधी पडली की मग पायडल चेन कव्हर वर घासून तो "खणंग" सारखा आवाज यायचा, नेमका मुलींसमोरून जाताना तो आवाज आला की एव्हढा राग का यायचा त्याचे आता आश्चर्य वाटते. पुढे मग गाडीने जाताना रेनकोट घालायचा कंटाळा म्हणून पाऊस नसेपर्यंत जायचे आणि मग कोठेतरी शेड, झाड वगैरे शोधायचे हा उद्योग. झाडाखालीही वरती फांद्यांवर किंवा पानांवर पडून जमलेले मोठे थेंब आपल्या कॉलर च्या मधून थेट पाठीवरच पडायचे. लहान असताना त्यातही झाडावर आधी वीज पडते की लोखंड वगैरे शोधून तिकडे जाते याची चर्चा चालायची. तसेच इंद्रधनुष्य पडले की ते बाहेरचे दुसरे दिसते का म्हणून दुसर्याला दाखवायची धडपड आणि ते बाहेरचे इंद्रधनुष्य कायम रंगात बुचकळल्यावर बर्याच वापरलेल्या ब्रशने काढल्यासारखे फक्त सुरुवातीला आणि शेवटी उमटत असे आणि मधे दिसत नसे. हे बहुतेक वेळा संध्याकाळीच पाहिल्याने पूर्वेला दिसले, पण क्वचित एक दोनदा सकाळी पश्चिमेला ही पाहिल्याचे आठवते. पाऊस 'अमुक इंच' पडला हे कसे ठरवतात ते कळायचे नाही आणि वाटायचे की अंगणात जमणार्या पाण्यात पट्टी बुडवून बघत असावेत (मग ते शास्त्रशुद्ध रीतीने कसे बघतात ते नंतर कोणत्यातरी इयत्तेत कळाले). तसाच आणखी एक उद्योग म्हणजे पावसाचे पाणी सर्वात स्वच्छ असते हे कळाल्यावर पाऊस पडताना रस्त्यात वरती 'आ' करून ते पाणी डायरेक्ट प्यायचा केलेला प्रयत्न! बसमधे जर कोणी निष्काळजी पणाने खिडकी उघडी ठेवली तर बसायची एक जागा कमी होत असे. पुढे कंपनीच्या बसमधे ही तसेच. तेव्हाही नेमकी पावसाच्या दिवशी छत्री नेलेली नसे, तर काही नग असे होते की अगदी फेब्रुवारीत पाऊस आला तरी त्यांच्याकडे बरोबर छत्री असायची. एक सीट कमी होणे मी लोकल्स मधे ही पाहिले आहे. पण पाऊस बघायला आवडणार्या प्रत्येकाने त्या दिवसात रेल्वेने पुणे मुंबई प्रवास करावाच. त्याबद्दल मी रंगबिरंगी वर लिहिले आहे म्हणून पुन्हा इथे लिहीत नाही. पुण्यात निदान तेव्हातरी मे च्या शेवटी गारांचा पाऊस पडत असे. कधी कधी जोरदार मोठ्या गारा पडायच्या. माझी एक आठवण म्हणजे पुणे विद्यापीठाजवळ एका ठिकाणी आम्ही चहा, सामोसे वगैरेच्या दुकानात उभे होतो आणि एकदम तसा पाऊस सुरू झाला. समोरच गर्द हिरवळ होती आणि त्यात असंख्य मोती विखरून ठेवल्यासारख्या त्या गारा दिसल्या... अगदी ५-१० मिनिटे वितळेपर्यंत. आम्ही वर्गातील ८-१० मुले व मुली तेथे होतो आणि 'तसे' काहीही नसताना उगीचच तो शॉट मला कायम रोमॅंटिक वाटतो. कदाचित 'रिमझिम गिरे सावन...' सारख्या पावसाळी वातावरणातीलच वाटणार्या गाण्यांचा परिणाम असेल पण नेहमी दिसणार्या मुलीही अशा वेळी आम्हाला कदाचित जास्त सुंदर वाटत. आम्ही, म्हणजे मुले, त्यांना कसे दिसायचो कोणास ठाऊक? आमच्या घरासमोर काही जण पावसात खेळताना मी छोटे बर्फाचे तुकडे असलेल्या ट्रेमधला बर्फ त्यांच्या अंगावर आम्ही दिसणार नाही असा फेकायचो. मग ते ही गारा पडतायत असे समजून वेचू लागायचे, आणि तो ठराविक चौकोनी आकार पाहिल्यावर त्यांच्या लक्षात यायचे (एक दोघांच्या तरीही यायचे नाही). सर्वात मोठ्या गारा मी लिंबाच्या आकाराच्या पाहिल्या आहेत पण त्याहुनही मोठ्या असतात म्हणे. याच सुमारास कोठेतरी बातम्यांत केरळच्या किनार्यावर मॉन्सून आला आहे असे कळायचे आणि काही दिवसांनी तो चालू व्हायचा. कधी मधे बराच खंड पडायचा तर कधी वळवाचा कुठला आणि मॉन्सून कुठला कळत नसे. पावसात क्रिकेट खेळता येत नसे, फूटबॉल खेळायला जास्त मजा यायची, पण का कोणास ठाऊक ती आवड टिकली नाही. पण लोखंडी गज किंवा जरा टणक फांदी घेऊन रस्त्यालगतच्या मातीत 'रवारवी' खेळणे हा पाऊस थांबल्यानंतर चा आवडता खेळ असे. म्हणजे प्रत्येकाने तो गज जोरात आपटायचा, माती असेल तर तो रोवला जाऊन उभा राहतो, नाहीतर पडतो. त्यावेळी असे पाहिजे तेव्हा गज कोठे मिळायचे कोणास ठाऊक? त्यावेळी मला 'गज' शब्दाचा तोच एक अर्थ माहीत होता (हिंदीतील मोजमाप माहीत नव्हते) त्यामुळे 'दो गज ज़मीन के नीचे' यात गजासंबंधी एवढे भीतीदायक काय असेल ते कळत नसे. आणि पुण्यातील पाऊसही मला वाटते तेव्हा कमी असायचा. बालकवींनी "क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे" हे कदाचित पुण्याच्या पावसाबद्दल लिहिले असावे, कारण तेव्हा साधारण ऑगस्ट मधे पुण्यात तसाच पाऊस पडत असे. म्हणजे कोणी फारसे भिजत नसे. मग कधीतरी धरणातून पाणी सोडले की मुठा आपले खरे रूप दाखवायची, ते पाहायला लकडी पुलावर झुंडी च्या झुंडी यायच्या. एरव्हीची मुठा बघताना विश्वासही बसणार नाही की 'वरती' एव्हढे पाणी आहे. पुलाच्या कमानीपर्यंत पाणी आले की पुलाच्या मध्यभागी उभे राहून खाली एकटक बघितले की पाणी पुढे जात नसून पूल आणि आपणच उलट्या दिशेला जात आहोत असे वाटायचे. मात्र या लेव्हल ला पाणी आले की किनार्यावर राहणार्या लोकांचे खूप हाल व्हायचे. अर्थात मुठेच्या पाण्याची पातळी आधी ठरवूनच एवढी वाढत असल्याने त्या लोकांची व्यवस्था करणे शक्य असायला हवे, प्रत्यक्ष किती करतात काय माहीत. आमच्या घराबाहेरच रस्ता असल्याने पावसाचे वाहणारे पाणीही लगेच दिसायचे. त्यामुळे त्यात कागदाच्या होड्या करणे, थोडीशी माती लावून धरण वगैरे बांधायचा प्रयत्न करणे वगैरे असले उद्योग चालायचे. त्या होड्या पाण्यात कलंडायच्या म्हणून आम्हाला कोणीतरी डबल होडी शिकवली होती, त्यात दोन होड्या असल्याने ती पाण्यातून 'स्टेबल' जायची. पाऊस खूप जोराचा झाला की रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहणारे ओहोळ मोठे होऊन रस्ताच व्यापून टाकायचे. हे पाणी आता घरापासून खूप लांब राहिले, किंवा आम्ही त्यापासून लांब आलो. वय वाढले म्हणून, फ्लॅट मधे आलो म्हणून की बदलत्या काळाचा अपरिहार्य परिणाम म्हणून, सांगता येत नाही. पण असे वाटते की आपल्या पुढच्या पिढीचा हा पावसाशी एव्हढा जवळाचा संबंध येत नाही. घरातून पाऊस पाहणे आणि कधी येता जाता त्यात भिजणे यापेक्षा असंख्य वेगळ्या गोष्टी पावसाशी संबंधित असतात त्याचे अनुभव त्यांना मिळाले नाहीत तर त्यांना कदाचित कळणारही नाही पण आपल्यालाच वाईट वाटेल ते कशाला मुकतायत याचे. कदाचित असेही असेल की आपल्या आधीच्या पिढीने असेच वेगवेगळे अनुभव आपल्यापेक्षा जास्त घेतले आणि प्रत्येक पिढीला हे असेच वाटत असणार. येथेही अमेरिकेत पाऊस आल्यावर कोणते शेतकरी काय करतात त्याच्या किंवा 'ओम्कारेश्वर पावसाळ्यात एकदा तरी बुडतोच किंवा गणपतीच्या दहा दिवसांत एकदा तरी पाऊस येतोच' अशा कहाण्या गावागावांत असतीलही पण 'सबर्ब' मधे राहून त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि तसे झाले तरी या पिढीला त्या आपल्या गोष्टी ऐकायला आणि अनुभवायला मिळत नाहीत असे वाटेलच. छे! त्यापेक्षा कालनिर्णय कडे इतक्या वेळ बघायलाच नको! कॉम्प्युटर च्या कॅलेंडर मधे मे आणि जून मधे तारीख वार सोडले तर काही फरक दिसत नाही, तेच पाहणे बरे!
|
Ravisha
| |
| Tuesday, July 17, 2007 - 2:31 am: |
| 
|
"आला शिशिर संपत, पानगळती सरली, ऋतुराजाची चाहूल, झाडावेलींना लागली" असं काहीसं वाटून गेलं,आषाढाच्या प्रारंभीच साहित्याच्या गुलमोहरावर झालेल्या ह्या वर्षा विहाराने मन अगदी चिंब झाले... धन्यवाद Farend ,पावसाळ्यातील तुमच्या ह्या ललित आठवणींबद्दल....
|
>> म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर इतक्या वर्षांत काय झाले त्याचे एका दिवसात हायलाइट्स!
छानच लिहीलेय. माझे गाव वेगळे असले तरी या आणि अशाच असंख्य पावसाच्या आठवणी (पावसाच्या नाही तरी) या लेखाच्या निमित्ताने परत येऊन गेल्या. रंगीबेरंगीही वाचायला हवे.
|
अमोल,माझ्या मनातल्या सगळ्या पावसाळी आठवणी ताज्या झाल्या आणी डोळ्यापुढे तरळ्ल्या. thanks alot
|
Zakasrao
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:54 am: |
| 
|
छान लिहिलस. नॉस्टॅल्जिक झाला आहेस का? वारीच म्हणशील तर अजुनही तोच फ़ोटो दिवेघाट भरुन टाकणारा असतो. आता तर वारी निरा गावच्या पुढे गेली आहे. लिन्क मिळत नाहिये शोधली. पण तो फ़ोटो यवुन गेला लोकसत्ता मधे. अजुन काहि मस्त फ़ोटो होतो मागच्या आठवड्यात. शाळेतल नवीन वह्या पुस्तकांवर नाव टाकुन घेणे सुंदर अक्षरात आणि कव्हर घालणे ही दोन कामे जोरात असायची. त्यात माझ अक्षर खराब होत म्हणुन मी चांगल अक्षर असणारा शोधुन त्याला माझ नाव टाकायला लावत होतो. आणि पहिल पान देवाला सोडत होतो. नवीन वह्या,पुस्तके त्यांचा वास आणि पावसाळा ह्यांची जोडी होती.
|
Zaad
| |
| Tuesday, July 17, 2007 - 6:31 am: |
| 
|
मस्त लिहीलंय, पावसाच्या आठवणी अजून ओल्याच आहेत म्हणून छानही वाटलं पण नव्या उन्हाची भीतीही वाटत आहे....
|
Zaad
| |
| Tuesday, July 17, 2007 - 6:31 am: |
| 
|
मस्त लिहीलंय, पावसाच्या आठवणी अजून ओल्याच आहेत म्हणून छानही वाटलं पण नव्या उन्हाची भीतीही वाटत आहे....
|
Manjud
| |
| Tuesday, July 17, 2007 - 7:16 am: |
| 
|
farend , सहीच लिहिलंय. वाचणारा प्रत्येक जण आपल्या आठवणीत रममाण होऊन जातो. आषाढी एकादशीपासून गणपती होईपर्यंत एकूणच सगळे वातावरण कसे भारलेले असायचे. आम्हाला दर श्रावणी सोमवारी शाळा अर्धा दिवस असायची. आठवड्यातून एक दोन दिवस कसली तरी सुट्टी असायचीच. घराघरातून गोडाधोडाचे खमंग वास सुटलेले असायचे. मंगळागौरीचं जाग्रण, शुक्रवारची सवाश्ण आदींमध्ये अगदि बुडून जायचो आम्ही. गणपतीची सजावट, पुजेची तयारी, गौरींचे मुखवटे वगैरे कामं कुठल्या तरी नशेतच व्हायची. मात्र गणपती झाले की पितृपक्ष सुरू व्हायचा आणि सहामहीचे वेध लागायचे. मग आषाढ श्रावणाची नशाच उतरायची. farend एकदम nostalgic केलंत.
|
Daad
| |
| Tuesday, July 17, 2007 - 7:23 am: |
| 
|
फारएंड (अमोल), काय लिहिलय! मस्तच वाटलं वाचून. मी मूळची मुंबईची पण तुम्ही लिहिलय ते सगळ सगळं आठवलं (नदी सोडून). नाही म्हणायला आमच्या शाळेजवळून एक नाला जायचा आणि मागच्या डोंगरातलं पाणी वाहून आणायचा. तो मात्रं फुगायचा.... मुंबईत एव्हढंच फुगलेलं पाणी बघितलंय. पावसात हट्टाने पहिल्या पहिल्यांदा घातलेले गमबूट. मग त्यात पाणी जाऊन किंवा ते चिखलात फसून जे काय व्हायचं ते व्हायचं! शाळा सुटल्यावर एका छत्रीत दोन्-दोन तीनतीन मैत्रीणींनी हीही हुहू करत घरची वाट घ्यायची.... गणपती, नागपंचमी, दहीहंडी... सगळं आठवलं. काही म्हणा, अतिशय सुंदर आठवणी अतिशय सुंदर शब्दात... एकदम आवडेश! (लिहा हो... लिहीत रहा, छान लिहिता)
|
Srk
| |
| Tuesday, July 17, 2007 - 11:34 am: |
| 
|
फारेंड, अगदी मनातल लिहिलत. साधं, सरळ आणि अतिशय सुंदर.
|
मग पालख्या पुण्यातून पुढे गेल्यावर दुसर्या दिवशी पेपर मधे हमखास येणारा पूर्ण दिवे घाट व्यापून टाकलेला वारकरी व पालख्यांचा फोटो. >>>>> ह्या वेळेसही तो फोटो आला. दोन तिन दिवसांपुर्वीच तो फोटो पाहुन बायकोला म्हणालो की एकदा तरी वारी करायला हवी. बघु कधी जमते ते. ( गेले ११ वर्ष दरवेळी वारी पाहीली की स्वतला तसे म्हणतोय). पालखी जेव्हा FC road वर यायची (तिथे मी राहायचो, रुपाली चा बाजुला) तेव्हा काय जबरी वाटायच. त्या रांगोळ्या, डोके ठेवन्यासाठी चाललेली धडपड, अन जर खरच पालखीला डोके लागले तर अभिमानाने भरत यायच, ते भगवे झेंडे घेऊन नाचनारे लोक, काय जादु असते कळत नाही. ( पण शेवटची दिंडी फक्त सुटाबुटात राहानार्या लोकांची असायची, त्यात ग्यानोबा, तुकोबा असा होनारा गजर उगीचच आम्हाला नाटकी वाटायचा. फोटो साठी केलेला). अन तेथील ट्रफीक जाम झाल्यावर नंतर होनारी भांडन व अमराठी लोकांचे वा अतिशिक्षीत मराठी लोकांचे पालखीला नावे ठेवने, कारण त्यांना त्यातल्या काही भिक मागनार्या बायाच दिसल्या हे सर्व आठवले. मस्त लिहीलस अमोल.
|
झ्क्कास हा घे तो फोटो
|
Mahaguru
| |
| Tuesday, July 17, 2007 - 2:03 pm: |
| 
|
फारएंड, छान लिहले आहेस!
|
Sashal
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:10 pm: |
| 
|
Farend मस्तंच लिहीलंय .. आमच्या मुंबईच्या पावसाच्या आठवणी थोड्या वेगळ्या असतात .. इथला बे एरियाचा पाऊस बघून मला खूपच बिच्चारं असल्यासारखं वाटतं ..
|
अमोल, मस्तच लिहीलंयस. हायलाईट्स आणि आगमन खास!! सशल, अगदी अगदी.
|
Zelam
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:23 pm: |
| 
|
फारेंड मस्त लिहिलंत. आवडलं.
|
Karadkar
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:53 pm: |
| 
|
अमोल, सहि आहे. मला माझे देशातले सगळे पावसाळे आठवले.
|
farend छान लिहिलेस, मला पहिला para एकदम सेम वाटला, ते नविन पुस्तके वगैरे वगैरे. पण मुंबईचा पावुस वेगळा असतो. मुंबईत भरपुर पावुस झाला की लवकर सुट्टी मिळायची नी घरी जाताना मजा वाटायची पाणी उडवत friend च्या अंगावर, शाळेची बस चुकवुन नी मनात आंनद असायचा की आज आई घरी असणार,एक मात्र असायचे आईचे ते वाट बघणे नी गरम पाण्याची पुन्हा अंघोळ घालणे नी गरम गरम जेवण बाहेर झालेला मिट्ट काळोख अगदी दुपारी १ वाजता, मग जेवुन झाले की झोप. .......... एक दमट पणा,कुंद हवा असायची बाहेर पावुस थांबल्यावर, विशेष करुन बहुतेक वेळा आई नी पप्पा अश्यावेळी घरीच असायचे. रोजच्या सुट्टीपेक्षा असा दिवस खुप छान वाटायचा कारण पुन्हा संध्याकाळी आईचा गरम गरम काहीतरी चटपटीत breakfast असायचा. बहिणीची भजीची demand , माझी मेदु वडा, गरम सांबार वगैरे वगैरे असे काहीतरी असायचे. काय मजा होती तेव्हा. नी आता monotonous life आहे इथे. इथे काय ती मजा नाही.... सशल म्हणते तसे गरीब पावुस. US मधील पावुस काही देखणा नसतो असे आम्ही म्हणतो.
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 17, 2007 - 6:42 pm: |
| 
|
अमोल छान लिहिले आहे, पण sashal च्या पोस्ट प्रमाणे, मुंबईच्या पावसाच्या आठवणी वेगळ्याच आहेत.
|
Ksha
| |
| Tuesday, July 17, 2007 - 8:54 pm: |
| 
|
हो, पुण्यातल्या बर्फासारख्या भुरभुरणार्या पावसाची बरोबरी मुंबईच्या कोसळणार्या पावसाशी होणार नाही. रस्त्यांवरच्या दिव्यांच्या पिवळट प्रकाशात तो पाऊस बघितला की अगदी तसंच वाटायचं! मग रात्री तसेच कधी कधी बाहेर जायचो जेवल्यांवर, गप्पा मारत फिरायला. थोडासा रिमझिमणारा पाऊस अंगावर झेलत भरत नाट्यजवळ उभे राहून थोड्या गप्पा मारत, सौंदर्यस्थळं न्याहाळंत, मग उपाशी विठोबावरून अगदी खुन्या मुरलीधराला वळसा घालून फिरून आलो तरी काही फार भिजलेलो नसायचो. कसला मस्तं वाटायचा पाऊस तो! मधूनच एखादी छोटी सर पडून गेली की हवा प्रसन्न, ताजीतवानी व्हायची एकदम! (अगदी भरून श्वास घेतला तरी वाहनांच्या धुराचा वास यायचा नाही, म्हणजे बघा ) तेव्ह्ढ्याशा पावसाने सुद्धा फुलांचा सडा पडायचा रस्त्यांवर. बादशाही पासून अगदी वाड्यापर्यंत नुसता घमघमाट यायचा फुलांचा. रात्री पाऊस पडला की खिडकीच्या काचेवर होणारा आवाज ऐकत ऐकत झोपायला छान वाटायचं. त्यांत आकाशवाणीवाले एकदम मूड ओळखून गाणी लावायचे. सगळी पावसाची गाणी. अगदी सांजधारा पासून रात्री झोपताना ऐकलेल्या बेला के फूल पर्यंत! अमोल. सहज ओघवतं लिहून एकदम नॉस्टॅल्जिक केलयंस! आषाढ श्रावण जाम मिसतोय मी इकडे
|
|
|