|
Daad
| |
| Friday, July 13, 2007 - 1:55 am: |
| 
|
जायचं? नाही जायचं?... करत, वाईटही दिसलं असतं म्हणूनही जायचं ठरवलं अश्विनने. आजपर्यंत, गाण्याचा कोणताही..... अगदी हौशी कलाकारांनी कोजागिरीला केलेला कार्यक्रम असला तरीही अश्विनचा भाग असायचाच. मुळात गाणं हा जिव्हाळ्याचा विषय, उत्तम तबलावादक, गाण्याची जाण, आणि परदेशात राहून जमेल तितका आपल्य मातीशी, संस्कृतीशी संबंध म्हणूनही अश्विन कोणत्याही कार्यक्रमाला कसलाही हातभार लावायला तयार असायचा, अगदी वाकडी वाट करूनही. महाराष्ट्र मंडळाने, सावनीचा कार्यक्रम करायचा ठरवलं आणि अश्विनचं संथ आयुष्य पुन्हा एकदा ढवळून निघालं. नको वाटलं पुन्हा तिला बघणंही. तसं तिच्याबद्दल न कळणं सोप्पं नव्हतं. सावनी प्रथितयश गायिका झाली होती, जगभर गाण्याचे कार्यक्रम चालले होते. जमेल तिथे आणि जमेल तितका काढता पाय घेतला त्याने या कार्यक्रमाच्या बाबतीत. रंजनला, त्याच्या बायकोला शास्त्रीय गाण्याची फारशी आवड नसल्याने घरात सावनीच्या सीडीज वगैरे आणणं टाळू शकला तो. मुंबईत गेलं की गाण्याच्या कार्यक्रमात, तिचं सोडून बाकी, अगदी गल्लीतलेही कार्यक्रम अटेंड करायचा, अश्विन. कधी कधी त्याला वाटायचं की,... 'काय म्हणून आपण टाळतो ती चार पावलं चाललेली वाट? त्यातलं काय नक्की खुपतं आपल्याला? आत्ता काय कमी आहे? निरतिशय प्रेम करणारी बायको आहे, मूल आहे, हव्या त्या क्षेत्रात, हवी तशी नोकरी आहे, मान आहे, मित्र-मैत्रिणी आहेत.... सुख म्हणजे अजून दुसरं काय? कसलीही पडझड न होता संथ, smooth असा आयुष्याचा प्रवास म्हणजे सुख का? ते तर कुणालाच लाभत नाही.... मग? ...मग उगाच विचार करून डोकं त्रासून घ्यायचं नाही म्हणून तो विषय सोडून द्यायचा.... तेव्हढ्यापुरताच. पण आठवणी कशा पुसायच्या? ते technique अजून साधलं नव्हतं त्याला. कुणाच्यातरी साथीला बसायचा आणि तिची गाणी सुरू झाली की.... की हातात सम यायची सवयीने पण काळजाची चुकायचीच........ तिची पेट्टं गाणी.... केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर... अश्विनला हसू यायचं ह्या आठवणीने. पहिल्या प्रॅक्टिसला, ह्या गाण्याची लग्गी जशीच्यातशी आली नव्हती तेव्हा सावनीने नुसतं कसं बघितलं होतं त्याच्याकडे! त्या रात्री घासून बसवली दुगून. दुसर्या दिवशी तिच्या डोळ्यातली चमक विसरला नव्हता तो. तिने म्हटलेलं सगळ्यात त्याला आवडणारं गाणं म्हणजे 'जाईन विचारित रानफुला...'. त्यातली आवर्तनं जीवघेणी होती. कधी कधी तिच्यासाठी समही ओठंगून उभी आहे की काय... का आपण लय पुढे-मागे करतोय?.... असं त्याला वाटायचं. परत परत ऐकली त्याने केलेल्य साथीची टेप आणि त्याला जाणवलं की.... आपण लय बदलत नाही.... आपल्या श्वासाच्या बिघडलेल्या लयीमुळे आपल्याला तसं वाटतं फक्त. .................................................... फार पूर्वी कधीतरी झालेल्या घावाची जखम.... अगदी उराशी बाळगलेली नसते पण.... किती बरी झालीये हेच बघितलेलं नसतं वळून. actually ती बरी होण्यासाठी काहीच प्रयत्न केलेले नसतात... एक दुर्लक्ष करण्याशिवाय. काळ सगळ्या जखमा बर्या करतो हे तितकसं खरं नाहीये. नुसती वर वर खपली धरलेली दिसत्ये. आत आत जखम ओलीच असते. आपल्याच मनाला माहीत असतं की बाबा जखम आहे, अजून ओली आहे, तेव्हा जरा जपून...... मग साधा धक्काही टाळतो आपण... तिचे कार्यक्रम टाळतो, तिच्या सीडीज आणायचं टाळतो, तिचे-आपले common फ़्रेन्ड्स... टाळतो आणि त्यात गमावतोही, काही जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी..... .................................................... जाऊयाच कार्यक्रमाला. फारतर लांब कुठेतरी बसू, दिसणार्-बिसणार नाही असे. you neven know ... विसरलीही असेल. माहितीही नसेल आपण इथे आहोत. आपण दिसतोयही किती वेगळे पूर्वीपेक्षा. हे टक्कल, बिक्कल बघून हसत सुटेल त्यावेळसारखी.... किंवा ओळखही दाखवणार नाही. आणि..... कदाचित आपण टाळलं त्यापेक्षा कितीतरी जास्तं तिलाच टाळायचं असेल... काय होईल ते होईल.... च्यायला जायचं कार्यक्रमाला......... क्रमश:
|
Daad
| |
| Friday, July 13, 2007 - 2:07 am: |
| 
|
'ए, काय हे? हे कपडे घालून येणार गाण्याला? मी काढून ठेवलाय तुझा झब्बा. आणि जरा ती sandals सरकव रे माझ्याकडे. साडी तोकडी दिसेल नाहीतर', रंजन दातात पिन धरून पदर लावत म्हणाली. इतरवेळी अश्विनने उगीच तत्परता दाखवत sandals धरली असती समोर आणि वसुलीही केली असती कामाच्या मोबदल्याची. पण आज नुसतीच आणून ठेवली तिच्यासमोर आणि परत बेडच्या कडेला बसला. रंजनाला खटकलंच. 'काय रे? बरं वाटत नाहीये का? चल रे, मी चालवते कार पाहिजे तर. खूप दिवसांत छान काही ऐकायला मिळालं नाहीये. आणि सगळा कार्यक्रम क्लासिकलचा नाहीये. भावगीतंही म्हणणार आहेत interval नंतर... आमच्यासारख्या येडबंबूंसाठी' तिच्यासमोर उत्साह दाखवत अश्विन निघाला. मग उगीचच लांबचा रूट काढून, टाइमपास करत उशीरा पोचले ते कार्यक्रमाला आणि पाठीमागे कुठेतरी बसले. पोचले तेव्हा इलेक्ट्रॉनिक तानपुरे लागले होत्ये. हा अश्विनने घालून दिलेला पायंडा. प्रेक्षक यायला लागल्यावर तानपुरे वाजत असले पाहिजेत.... त्याला स्वत:ला हे वातावरण बनत, घडत जाताना अनुभवायला फार आवडायचं. तानपुरे वाजतायत, पेटीचा एकसंथ सूर वहातोय, तबला लागतोय..... या वॉशवरच आता गायक येऊन चित्र रेखाटणार.... पण आत्ता नेमक्या त्याच विचाराने त्याला गुदमरल्यासारखं झालं. सावनी हातात तिचा तानपुरा पेलत स्टेजवर आली. लोकांबरोबर त्यानेही टाळ्या वाजवल्या. 'वयाच्या मानाने जरा मोठ्याच दिसतायत नाही?', रंजनाची comment त्याच्यापर्यंत पोचलीच नाही. किंबहुना आपल्यापर्यंत काहीच पोहचू न देण्याची धडपड चालू होती. बाजुलाच बसलेल्या जयंताच्या माहेरी गेलेल्या बायकोची चौकशी, मागे बसलेल्या फणसेबाईंच्या गुढग्यांची परत परत वळून चौकशी, आपल्या लेकाच्या तबल्याचं कौतुक, रंजनाची पर्स उघडून मोबाईल बंद आहे की नाही बघणे.... बरेच उपाय सुचले त्याला आणि त्याने वापरलेही सगळे.... नको... नको.... म्हणणार्या दुखर्या मनाचं न ऐकता, चोरट्या नजरेने तरीही बरंच काही टिपलं... कळत नकळत.... मोतिया रंगाची रेशमी साडी, खांद्यावरून लपेटून पुढे घेतलेला पदर, सैलसर आंबाड्याची मानेवर गाठ, पेटीवादकाला खूण करीत एलेक्ट्रॉनिक तानपुरे परत एकदा फ़ाईन ट्यून करणं, हातातल्या लावलेला तानपुर्याच्या खुंट्या परत एकदा तपासून बघणं.... काहीच बदललं नाहीये की काय?.... एक पाय खाली, अन दुसरा उभा धरून सावनीने परत एकदा पदर सावरला आणि तानपुरा उभा धरून कानाला लावून डोळे मिटले. एका हाताने छेडत तिने दुसर्या हाताने त्याची जवारी काढताच तो सुलक्षणी तानपुर झणकारू लागला. तिने एकदाच सगळ्या प्रेक्षकांवरून हसून नजर फिरवली आणि परत डोळे मिटले. .... काहीच बदललं नाहीये.... केसांची उजव्या बाजूची किंचित पिकलेली बट सोडल्यास.... तोच डौल, तेच सहज वावरणं, पहिला स्वर लावण्याआधी तेच आत्ममग्न होणं.... मग तसंच डोळे उघडून..... अश्विनला काय करावं ते कळेना. त्याने घाबरून इकडे-तिकडे बघितलं आणि पुढे बसलेल्या वाघांच्या खांद्यावर हात ठेवला... त्यांनीही समजून तिथे चाललेल्या लवंगा, वेलदेड्याच्या देवाण्-घेवाणीतली वाट वाकडी करून त्याच्या समोर डबी धरली. अतिशय एकाग्रतेने डबीत जवळ जवळ शिरून लवंग काढल्यासारखी काढतानाही त्याला जाणवली तिची नजर...... थेट त्याच्यावर स्थिर झालेली... समोर बसलेला दोन्-तीनशेचा जमाव भेदून.... ह्यालाच, ह्यालाच घाबरत होता तो.... सावनी, फारच तयारीचं शास्त्रीय गाऊ लागली तेव्हा तिच्या सगळ्याच गाण्याला साथ करायचा नाही, तो. जायचा मात्र जरूर. प्रत्येक कार्यक्रमाला. असा पहिला स्वर लावण्यापूर्वी डोळे मिटून घ्यायची सावनी आणि डोळे उघडून पहिली नजर फक्त त्याच्यावर.... कशी कोणजाणे पण त्याने जागा बदलली तरीही तिचे डोळे जणू पापण्यांआडसुद्धा माग ठेवायचे त्याचा. तिला विचारल तर म्हणाली होती की, 'गंमत आहे नाही? माहीत नाही... कसं ते... मुद्दाम बघत नाही मी तुला.... पण तू दिसतोस' .......आणि तानपुरा वाजायचा थांबला..... तशी त्याने मान वर करून तिच्याकडे बघितलं. चित्रं झाली होती सावनी.... चलन्-वलन थांबल्यासारखी. आधाराला तानपुर्याचावरच दुसरा हात, दोन्ही भुवया वर चढलेल्या... डोळे मोठ्ठे झालेले. त्यांचं प्रखर दिव्यांच्या प्रकाशात अनावर तरळताना पाहून त्याने न राहवून नुसती पापणी लववली.... बरंच काही सांगून गेला अश्विन त्यातून.... ' its ok , सावनी, carry on . आत्ताच नको विचार करूस कसलाच... ही मैफिल मह्त्वाची... मग बघू काय ते....' हे सारं दुसर्या कुणापर्यंतही पोचेपर्यंत, सावनीने परत डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेऊन आपल्या निकोप आवाजात निखळ निषाद लावला. श्वास पूर्ण संपायच्या आधीच थांबली. असं निषादाने भिजवून आता एकदाची षड्जाच्या सावलीत उभी रहातेय, असं वाटत असतानाच षडजाच्या नुसत्या सावलीला स्पर्श करून परत एकदा निषादाचं आर्जव केलं. अन मग तिन्ही तानपुर्यांतून वहात असलेला, समोर हा असा... असा.... वाटलं तर कधीही त्याच्या कवेत शिरता येईल असा... षड्ज उभा असतानाही, त्याला टाळून कोमल रिषभाच्या उन्हात उभी राहिली सावनी.... रिषभाच्या उन्हाचा आसरा घेत...... त्याक्षणी अश्विनच्या रोमारोमात उभा राहिला सावनीचा, मारवा. निषादाचं आर्जव करणारा आणि रिषभाचा आसरा शोधणारा, असा.... स्वत्:पासून हरवलेला षड्ज! क्रमश:
|
Ravisha
| |
| Friday, July 13, 2007 - 2:23 am: |
| 
|
अहाहा,"स्वतःपासून हरवलेला षड्ज" स्वरांचे हे सगळे वर्णनच केवळ अप्रतिम!!! आज पहिल्यांदाच न राहवून प्रतिक्रिया दिली. sorry for the interruption
|
Daad
| |
| Friday, July 13, 2007 - 3:40 am: |
| 
|
नकळत डोळे मिटले त्याचे, आक्रसलेला चेहरा, ताठरलेले खांदे सैलावले..... तिच्या हळव्या, मवाळ, हुरहुर लावणार्या सुरांसहं आपल्याच आत आत उतरत गेला तो, .....शोधत गेला..... त्याचाच हरवलेला, षड्ज! कुठे आहोत आपण नक्की आयुष्यात? का असला प्रश्नं कायम छळतो आपल्याला? त्या वळणावर.... जेव्हा आपण या मारव्यातल्या षड्जासारखे हरवलो, कधी निषादाचा तर कधी रिषभाचा आसरा शोधण्याच्या, आर्जवाच्या दैवावर सोडून दिलं आपल्याला... त्या, त्या वळणावरून कधी पुढे आलो का? काय हरवलं तिथे?... त्या वेळी?.... त्या दिवसापर्यंत, हे गृहितच धरून चाललो होतो. सावनी अशीच गात रहाणार, आपण तिला साथ करत रहाणार.... आयुष्य ह्यापेक्षा वेगळं असणार नाही. आपण फ़र्ममध्ये सांगून अर्धा दिवस टाकून जाणार होतो, साथीला. नेहमी सावनीचं म्हणजे कार्यक्रमाच्या, स्पर्धेच्या दिवशी सकाळी फोन करायचा. 'ए, लक्षात आहे ना? चार आणि पाचचे दोन्ही तबले घेऊन ये. आणि मध्यमाचा चारचाच आणलास तरी चालेल..... नाहीतर असं करतोस का? ते सुद्धा दोन्ही आणशील का? sorry , रे. तुला जड होणार सगळं..... आणि.... मलाही पिकप करशील का रे? आई इतक्या लवकर येणार नाहीये.... आणि मला असं कट्टाकट्टी नाही पोचायचं...' मध्ये श्वास न घेता बोलायची, जवळ जवळ. शिवाय मागे विंगेत चार चारदा, 'बिहागची हवा आहे की नाही रे आज? आईचं काहीतरीच असतं.....' 'होईल ना रे व्यवस्थीत, अशू?', 'सारंगची वेळ निघून चाललीये... श्शी काय वैतागये, वेळ पाळता येत नाही या आधीच्या गाणार्यांना... ', 'पाणी हवय रे... पण आत्त्ता प्याले ना, की सारखे आवंढे येतात.... नुसता घसा ओला करू का?', 'वेळ मिळाला तरच तराणा म्हणायचाय.... मला कळेल कारे वेळ संपल्याचं?... नाहीतर तूच खूण करशील? मी घड्याळ बघणं वाईट दिसेल ना' 'उद्या पेपर आहे साइकचा आणि काही अभ्यास झाला नाहीये....' हे आणि असलंच बरंच काही. अश्विन नुसताच धीर द्यायचा, 'सावनी, एका जागी स्वस्थ उभी रहा. दोन दीर्घ श्वास घे. its ok , सगळं ठीक होईल.' क्रमश:
|
Daad
| |
| Friday, July 13, 2007 - 3:46 am: |
| 
|
सावनीची आई, तिची गुरू. सावनीला घडवण्यात सर्वस्वी कारणीभूत. मालतीबाई पूर्वी स्वत: अतिशय सुंदर गायच्या. किराण्याची परंपरा पुढे चालवू शकतील असा फिरोजजींना विश्वास देऊ शकणार्या त्यांच्या काळातल्या त्याच. घराण्याचं सगळं गाणं ह्या शिष्येच्या गळ्यात उतरवलं पंडितजींनी. आलेलं वाईकरांचं बड्या घरचं स्थळ नाकारून मालतीबाईंनी तबलजी बरोबर पळून जाऊन लग्नं केलं. पुढे बहरलं काहीच नाही, सगळंच सुकलं. जेमतेम परिस्थितीवर मात करता करता कोमेजून गेल्या त्या. शिकवण्या करण्यात जन्मं गेला त्या,न्चा. सावनीला मात्रं तयार केली त्यांनी. सावनीची तयारी ऐकून स्वत: पद्माताईंनी तिला आमंत्रण दिलं होतं... शिकण्याचं. ताईच येणार होत्या त्या कार्यक्रमाला. त्यादिवशी सावनीने सकाळी फोन केला नाही. त्याने फोन केला तर हॉलवरच भेटू म्हणून गडबडीने ठेवला फोन. आलं असेल टेन्शन जरा लवकर, असं अश्विनलाही वाटलं. मालतीबाईंनीच त्याला फोन करून सांगितलं की सावनी स्पर्धेला येणार नाहीये, थोडं बरं नाहीये... वगैरे वगैरे. मग रजा फुकट जायला नको म्हणून तोही गेला नाही. दुपारी कधीतरी अलकाचा, सावनीच्या मैत्रिणीचा फोन आला. 'अश्विन, तुला ह्यातून काही मिळवायचं असेल तर.... आता वेळ घालवू नकोस..... आज काहीही झालं तरी संध्याकाळच्या सावनीच्या कार्यक्रमाला ये आणि तिला भेट, बोल तिच्याशी स्पष्टपणे. ', अलकाच्या स्वरात घबराट होती. तिला थोडी कल्पना होती, अश्विनला किती अन काय वाटतं सावनीबद्दल त्याची. 'सावनी संध्याकाळी गाणारेय? पण स्पर्धेला गेली नाही ना? बरं नाहीयेना तिला?', अश्विनला आश्चर्यच वाटलं हे ऐकून. 'अरे, ती... ती नं... चांगली गायली आज, पहिली आलीये. आणि पद्माताई... त्या पण खूष आहेत तिच्यावर. तिला आपली शिष्या म्हणून...', अलका चाचरत बोलत होती, शिवाय मोबाईल कटही झाला. ऑफिसमधून फार बोलता आलंच नसतं क्लायंटच्या समोर, शिवाय संध्याकाळी भेटू तेव्हा विचारूच खडसावून म्हणून अश्विनने परत फोनही केला नाही. संध्याकाळी तो गडबडीने हॉलवर पोचला आणि विंगेत जाणार इतक्यात त्याला मालतीबाईंनी अडवलं. 'सावनी खूप अपसेट आहे. तिला भेटू नकोस आत्ताच अगदी.' अश्विन तरीही म्हणाला, 'का? मी का नाही भेटायचं? आणि तिला बरं नव्हतं आणि गाणार नव्हती ना? मग....', आईंच्या चेहर्याकडे बघून तो आवाज शांत करून परत इतकच म्हणाला, ' believe me, actually मला भेटली तर जरा शांत ...' त्याच्या डोळ्यात बघत थंड पण खंबीर स्वरात त्या म्हणाल्या, ' तू कोण? अश्विन? तुला तिच्या भल्याचं जास्तं कळतं की मला, तिच्या सख्ख्या आईला?' अश्विनच्या कपाळावरची शीर उडू लागली,'मी कोण? मी.... मी...' .......आणि त्याला शब्द सुचेनात. खरच आपण कोण सावनीचे? कधी विचारलं आपण तिला जग म्हणतं तसं formally ? गृहीत धरून चाललोय.... आयुष्याची हीच वाट, अशीच, आपल्याला हवी तशी चालणार आहोत.... आपल्याबरोबर सावनी असणारच आहे, ती गाईल, आपण तबला वाजवू साथीला..... 'मला कल्पना आहे तुला काय वाटतं तिच्याबद्दल.... पण तिला विचारलंस? बोललास कधी तिच्याकडे? नाही ना? तिच्या मनाचा विचार केलास कधी? सावनीला अजून खूप काही मिळ....' आई अजून काही बोलू जाणार इतक्यात मागून सावनी हातात तानपुरा घेऊन स्टेजवर जाण्यासाठी आली. तिच्याकडे बघून अश्विनच्या तोंडून एकच वाक्य बिघून गेलं, 'ठीक आहे, सावनी, carry on . आत्ताच नको विचार करूस कसलाच... ही मैफिल महत्वाची... मग भेटू....' कुठेतरी मागे जाऊन बसला..... पुढ्यातल्या दिग्गज, यशस्वी कलाकारंच्या रांगा टाळून. कार्यक्रम संपतानाच पद्माताईंचं भाषण झालं. अगदी उल्हासित स्वरात त्यांनी, या उदयोन्मुख हिर्याला पैलू पाडण्याचं कार्य अतिशय आनंदाने करणार असल्याचं सांगितलं. त्यासाठी सगळं, अगदी आई-वडीलांसुद्धा सोडून ती त्यांच्या बरोबर रहाणार होती, गुरू-शिष्य परंपरेतलं आजच्या काळातलं हे एकमेव उदाहरण असेल.... वगैरे वगैरे..... क्रमश:
|
Daad
| |
| Friday, July 13, 2007 - 3:51 am: |
| 
|
इतकं होऊनसुद्धा अश्विन थांबला, तिला भेटण्यासाठी. अतिशय प्रफुल्लित चेहर्याने, हसून सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करणारी सावनी त्याला अनेकांनी घेरलेली दिसली. तिला नुसताच हात करून तो जड पावलांनी वळला. मालतीबाई टाळत होत्या त्याचं घरी येणं हे त्याला ही जाणवलं. दोनच दिवसांत नंतर अलकाच्या मदतीने भेटला सावनीला कसातरी. आई बाहेर गेली होती तिची, पण सावनी तेव्हासुद्धा गडबडीतच होती. बाहेर जायलाच निघाली होती. तिला जबरदस्तीने समोर बसवून डोळ्यांत बघत विचारलं त्याने, 'सावनी, खरं सांग तुला काय वाटतं माझ्याबद्दल? की मीच वेड्यासारखा....' एक क्षणभर.... किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ असेल कदाचित पण कुठेतरी तिच्या डोळ्यात त्याला तो, त्याचा षड्ज, सापडल्या सारखा वाटला. इतक्यात तिच्या आईचा आवाज आला गेटपाशी आणि हाती येत असलेली त्याची सावनी परत एकदा निसटली.... 'अरे, असलं काय विचारतोस? अगदी जवळचा मित्र आहेस आणखी काय?... अलका जशी, तसाच तू ही. चल, पळते आता, नाहीतर आई वैतागेल, अजून किती करायचंय! भेटुया रे सवडीने, मी जाण्यापूर्वी. आणि भेटणं जमलं नाहीच तरी, कॉन्टॅक्ट ठेवा रे माझ्याशी नाहीतर हरवाल.....' 'बेस्ट लक, सावनी, काळजी घे' असं म्हणून तो वळला आणि जमेल तितक्या भराभर दूर गेला, जातच राहिला..... त्यानंतर आयुष्यभर..... हरवलेच ते एकमेकांना... तिथेच त्याच वळणावर. सावनी दहा दिवसांतच पद्माताईंबरोबर दौर्यावर गेली, परदेशी. तिने फोन करायचा प्रयत्न केला नंतर पण त्यानेच दाद दिली नाही. कुठेतरी अतिशय लाजिरवाणं वाटलं त्याला. सावनीची झेप आपल्याला खरच झेपणारी नाही हेच परत परत सांगत राहिला तो स्वत:ला..... पुढली वाट शरीर चाललं, मन चाललं.... बहुतेक! मग काय मागे राहिलं?.... आपणच तर तोडून आलो तो दोर. तुकड्या तुकड्यांत आयुष्य जगायचं नाही असं ठरवूनच नाही का दूर गेलो? बदली करवून घेतली, फिरतीची नोकरी शोधली, परदेशी गेलो..... खरच कुठे गेलो? कुठेच नाही. त्याच वळणावर घुटमळत राहिलो. पुढला स्वर, सापडत नसला, पुढला विचार सुचत नसला की कसं तेच तेच गातात, वाजवतात? तसंच. खरच, कधी बढत झालीच का आपल्या आयुष्याची? गाणारं माणूस निघून गेलं..... षड्जं तिथेच... निषाद आणि रिषभाच्या गुंत्यात..... 'तळ्यात्-मळ्यात' करत. typical मारवा झाला की काय आपल्या आयुष्याचा? ताकद असली तरच निसटता येतं निषाद, रिषभाच्या चकव्यातून.... त्याने डोळे उघडले तेव्हा मारव्याची मध्य लयीतली बंदिश सुरू झाली होती. तोच मवाळ सूर, तेच हळवेपण, तीच हुरहुर लावणारे.... पण सूर ऐकू येईनातच, त्याला. कार्यक्रमभर स्वत:च्या हरवलेल्या षड्जाच्या, निषाद्-रिषभाच्या चकव्यात फिरत राहिला परत परत, तेच तेच सांगत राहिला... वेगवेगळ्या स्वरात, पट्टीत, लयीत...... नक्की काय हरवलंय आपलं? क्रमश:
|
Aparnas
| |
| Friday, July 13, 2007 - 5:05 am: |
| 
|
षडजाच्या नुसत्या सावलीला स्पर्श करून परत एकदा निषादाचं आर्जव केलं षड्ज उभा असतानाही, त्याला टाळून कोमल रिषभाच्या उन्हात उभी राहिली सावनी.... रिषभाच्या उन्हाचा आसरा घेत...... त्याक्षणी अश्विनच्या रोमारोमात उभा राहिला सावनीचा, मारवा. निषादाचं आर्जव करणारा आणि रिषभाचा आसरा शोधणारा, असा.... स्वत्:पासून हरवलेला षड्ज! >>> आह! मारवा इतक सुरेख कधीच कळला नव्हता दाद! अतिशय अप्रतिम आणि तरल लिहितेस तू. फारच सुरेख खरंतर तुझ्या लिखाणावर प्रतिक्रिया द्यायला जमतच नाही. तुझं सुंदर लिखाणाला दाद द्यायला शब्दच नाही उरत माझ्या शब्दकोशात!
|
Manogat
| |
| Friday, July 13, 2007 - 9:28 am: |
| 
|
दाद, तुझ्या या लेखणिला प्रतिक्रिया देण्या येवढी माझी पात्रताच नाही.. आणि शब्द पण नाहीत. तुझी ही लेखणी बरच शिकवते मला... Keep it up
|
निषाद , षडज , रिषभ अस गाण्यातल ओ कि ठो कळत नसताना... कुठेतरी एका छान मैफ़िलीत असल्याची जाणिव होतेय.. ही जादु तुझ्या लिखाणाचीच... तु मायबोलीला लाभलेली देणगी आहेस दाद..यात अतिशयोक्ती नक्किच नाही.
|
Zelam
| |
| Friday, July 13, 2007 - 12:10 pm: |
| 
|
दाद great , छानच चाललंय. बाकी यात नवीन काय म्हणा?
|
दाद, नेहेमीप्रमाणेच वाचनिय.. पुढचा भाग कधी?
|
अह! मस्त वाटले प्रत्येक वाक्याला मनातुन दुजोरा होता... हे असेच होते करत .. :-) मनाची बेचैनी, ती जखम ओली असणे वगैरे खुपच शिवले ते वर्णन.......... एक हिंदी गाणे सहज आठवले हे वाचताना तुम मुझे भूल भी जावो.. मधील प्रत्येक ओळ असेच काहीतरी सांगते.
|
Zakki
| |
| Friday, July 13, 2007 - 5:33 pm: |
| 
|
पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पहात आहे. अजून त्या सावनीला काय वाटते ते कळले नाही, पण मला आजच ऐकलेले 'चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये, हम दोनो', हे गाणे आठवले.
|
Mansmi18
| |
| Friday, July 13, 2007 - 7:34 pm: |
| 
|
निषाद , षडज , रिषभ अस गाण्यातल ओ कि ठो कळत नसताना... कुठेतरी एका छान मैफ़िलीत असल्याची जाणिव होतेय. ------------------------------- प्राजक्ता १००% बरोबर. पुलंच्या लिखाणातील पण असे संगीताचे संदर्भ जसे डोक्यावरुन जातात तसे हेही गेले पण... वाचायला फ़ारच छान वाटते. दाद, अतिशय सुंदर आणि सशक्त लिखाण. असेच लिहित राहा.(उगाच चेकॉव का ग़ोगोल च्या भानगडीत पडु नका
|
Farend
| |
| Saturday, July 14, 2007 - 5:48 pm: |
| 
|
हो माझेही तसेच झाले. काहीतरी चांगले किंवा वाइट वाटले एवढेच कळाले. पुलंच्या काही लेखात तसेच होते, तेथे आपला काही आवाज चालत नाही, पण येथे ते समजावून घेता येईल का? कदाचित बरेच वाचावे किंवा कोणत्यातरी एक्स्पर्टला वाचून दाखवावे लागेल एक नक्की की कथा आवडली आणि पुढे वाचायची उत्कंठा आहेच.
|
Neelu_n
| |
| Saturday, July 14, 2007 - 6:31 pm: |
| 
|
>>>>>निषाद , षडज , रिषभ अस गाण्यातल ओ कि ठो कळत नसताना... कुठेतरी एका छान मैफ़िलीत असल्याची जाणिव होतेय.. शलाका, हेच एकदम खरय. खुपच छान, मनाला भावणारं लिखाण आहे तुझे. तुझ्या एकुण लिखाणावरुन तु स्वत्: गाण्यातली उत्तम जाणकार अथवा स्वत:च गात असावी असे वाटतय. तुझ्या मागच्या कथेतही असेच संगीताचे बरेच तपशील होते. पुढच्या भागाची उत्कंठेने वाट बघतेय.
|
Daad
| |
| Sunday, July 15, 2007 - 3:28 am: |
| 
|
ही कथा लिहून इथे देताना हीच, अगदी हीच शंका होती. जरा "जास्तच" शास्त्रीय संगाताचे संदर्भ आहेत, यात. आणि तुमचं अगदी बरोबर आहे... परिभाषा माहीत नसली की उगीच काठाकाठाने फिरल्यासारखं वाटतं. ज्या तुटपुन्ज्या ज्ञानाच्या आधारावर ही कथा लिहिलिये, ते इथे देतेय. जाणकारांनी त्यावर टिप्पणी जरून जरूर करावी. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात रागांच्या वेळा, ऋतू ठरलेले आहेत. मारवा हा संध्याकाळी, नुकताच सूर्य मावळला आहे अशा वेळी गायला जातो. घोळक्यात असूनही एकटं करणारी ही वेळ. विव्हलता, एकटेपण, 'तनहाई', हुरहुर, कसल्यातरी अनामिक दु:खाने भरून टाकण्याचं सामर्थ्य आहे या रागात. ('सांज ढले, गगन तले, हम कितने एकाकी' हे हिंदी गाणं याच रागात सुरू होतं. 'शब्द शब्द जपुन ठेव बकुळीच्या फुलापरी' हे सुद्धा) षड्ज किंवा 'सा' हा सगळ्या सुरांचा 'बेस' किंवा संदर्भ, सगळ्याच रागांसाठी हे लागू होतं.. मारव्यात निषाद (नी) आणि कोमल रिषभ (रे) हे, षड्जाच्या आधी आणि नंतरचे स्वर. या रागात जवळ जवळ षड्ज टाळून निषाद आणि रिषभाची आंदोलनं दाखवली जातात, तसा नियम आहे, या रागाच्या विस्ताराचा. हे म्हणजे कसं? आपलं हक्काचं, आधाराचं घर्-दार सोडून आजूबाजूच्या घरांतून आर्जवं करीत वणवण भटकण्यासारखं-केविलवाणं अगदी! या रागात, कधी सा लागतो तेव्हा मात्र तो शतका शतकांच्या हरवलेल्या जिवलगाची भेट घडल्यासारखं वाटतं. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल खूप धन्यवाद!
|
Nilima_v
| |
| Sunday, July 15, 2007 - 3:52 pm: |
| 
|
दाद, अतिशय सुंदर आणि सशक्त लिखाण. असेच लिहित राहा.(उगाच चेकॉव का ग़ोगोल च्या भानगडीत पडु नका दाद तुम्हाला कमी लेखण्याची अजिबात ईच्छा नाही. तुम्ही मायबोलीवरच नाही तर एकुण उत्क्रुष्ठ लिहितात हे सांगायला माझी गरज नाही. मी फ़क्त बी च्या लेखनातील positives सांगत होतो. त्याच्यावर टीका करतन काहींनी लिहिले की तो हिन्दी serials सार्खे लिहितो. ते काही आपल्याल पटले नाही.
|
Bee
| |
| Monday, July 16, 2007 - 3:00 am: |
| 
|
दाद, सगळे भाग आवडलेत. तुला संगीतातलं बरच काही कळतं असं दिसतं
|
Daad
| |
| Monday, July 16, 2007 - 3:58 am: |
| 
|
निलिमा बी यांच्या 'नवर्याचे घर' कथेला प्रतिक्रिया लिहिताना माझ्या कथेचा संदर्भ दिलात्- माझ्या कथेत वास्तव नसल्याचा, अशाच प्रकारची एक प्रतिक्रिया तुम्ही यापुर्वीही दिलीये, जागू यांच्या "वीज" या कथेला प्रतिक्रिया लिहिताना. /hitguj/messages/75/126186.html?1181831744 माझ्या नक्की कोणत्या कथेसाठी अशी प्रतिक्रिया दिलीत ते सांगितलं नाहीये, तिथे. पण मी आजवर मायबोलीवर काही मोजक्याच कथा लिहिल्यात, त्या बघूया. कृष्ण आणि रुबिक क्यूब्- एका घरात दत्तक घेतलेल्या तरूण आडवयातल्या मुलाला ही गोष्टं बाहेरून कळते आणि त्रागा करून तो घराबाहेर पडलाय, मित्राकडेच आहे. त्याच्या आई-वडिलांची तगमग हा ह्या कथेचा गाभा. ह्या परिस्थितीतले आई-वडील मला भेटलेत. साधी माणसं- गावाकडल्या एका शेतावर कूळ म्हणून काम करणार्या एका कुटूंबात जेव्हा सच्च्या मनाच्या आपल्या नवर्याचा "चोरटेपणाने" वागण्याकडे कल बायकोच्या लक्षात येतो, तेव्हा तिची झालेली तडफड आणि आपल्या परीने तिने घेतलेला मार्ग- हा या कथेचा गाभा. लहूदा आणि पारू मला प्रत्यक्ष भेटली आहेत त्यांना मी जवळून ओळखते. नक्ष फरियादी है- रीतसर आईवडिलांनी ठरवून लग्नं केलेला आपला नायक बायकोछ्या प्रेमात पडतो. एकूणच 'प्रेम' म्हटलं की, येणार्या भावनांच्या कल्लोळालाच घाबरून त्यापासून दूर राहिलेला हा, शेवटी प्रेमात पडतो, बायकोच्या. arranaged marriages करणार्या आपल्यापैकी बर्याच जणांच्या हे लक्षातही येत नसेल, (कदाचित). त्याचं हे प्रेमात पडणं, अशाच एका हळव्या क्षणी insecure feeling मधुनच त्याने केलेला वेडेपणा- हा या कथेचा गाभा. नुसतं नवरा बायकोचं प्रेम नाहीये यात. एका ट्रेन प्रवासात भेटलेली कुणी एक, या कथेची, कथेत न डोकावणारी नायिका आहे. त्यावरून सुचलेली ही कथा. ओळख्- घरातल्यांच्यामुळेच मुलापासून फारकत झालेली ही आई. तिला मुलगा 'मुलगा' म्हणून खूप उशिरा भेटतो. त्यांचे मनोव्यापार, एकमेकांना "ओळखण्याचा" त्यांचा प्रवास कसा सुरू होतो त्याची कथा. ह्या बाईंना मी बघितलय एका लग्नात आपल्या नातवासह. हरवलेला- अजून पूर्णं पोस्टली नाहीये कथा. पण या कथेच्या उगमबद्दल जास्तं काही लिहीत नाही. पण ही "वास्तव" आहे इतकच सांगत्ये. (ह्या व्यतिरिक्त एक विनोदी (स्पर्धा) आणि काही व्यक्तिचित्रणं लिहिलियेत. स्पर्धा हा माझा स्वत:चा अनुभव आहे आणि व्यक्तीचित्रणातल्या व्यक्ती मला प्रत्यक्षा किंवा अप्रत्यक्ष भेटल्यात. हो... आणि 'दिल से रे' हे त्या गाण्याचं मला दृश्यमान झालेल्याचं चित्रण्- माझा अनुभव, तेव्हा वास्तवच. पण ते जाऊद्या. तुमचा आक्षेप "कथांच्या वास्तवाशीच" आहे असं मी गृहीत धरत्ये.) वरच्या कथांमधला कोणता विषय तुम्हाला "वास्तव" वाटला नाही? की माझ्या भाषेच्या trick मुळे तुम्हाला त्यातलं "वास्तव" भेटलं नाही? वास्तवाची तुमची व्याख्या काय? माझ्यामते मला आलेला अनुभव किंवा माझ्यापर्यंत पोचलेला दुसर्या कुणाचा अनुभव हे वास्तव. ते व्यक्त करण्याची उर्मी म्हणजे लिहिण्याची प्रेरणा, चिकाटीने ते लिहून काढणे, कधी कधी पुन्हा पुन्हा लिहून काढणे हा स्वत्:शी, स्वत्:च्या "अनुभूतीशी" प्रामाणिकपणा, तुमच्याशी share करणे हा आनंद. मग तुमच्या प्रतिक्रियांमधून शिकणे हा दुहिरा आनंद. हे इतकं सोप्प आणि सरळ आहे. उदाहरणार्थं, मला विजेची मुळीच भिती वाटत नाही म्हणून जागू यांची 'वीज' ही कथा "अवास्तव" होत्ये का? मुळीच नाही. तो त्यांचा अनुभव. माझी अनुभूती हे माझं "वास्तव" ते समर्थपणे तुमच्या मनात उतरवू शकले तर ती तुमची "अनुभूती" होत्ये. काही वाचकांसाठी ते त्यांच "वास्तव" होतं, तर काही वाचकांसाठी ती शलाकाचीच अनुभूती उरते. पण....... ते अवास्तव होतं का? (हा प्रश्न आहे. याला तुमचं उत्तर 'हो. होतं अवास्तव!' असं असेल तर फिर बेसिक फ़ंडामेच गडबड है आपुनके तो.) माझ्या या पोस्ट्मध्ये तुम्हाला काही गैर वाटल्यास, आधीच माफी मागत्ये. यापुढला संवाद पत्ररूपाने व्हावा अशी इच्छा आहे. कुणीही मायबोलीकर या संवादात interested नसावा. हा संवाद, माझ्यासाठीतरी, तुमच्याकडून काही शिकण्याचा किंवा समजून घेण्याचा अनुभव असेल. तुमचा हा आक्षेप किंवा हे मत तुम्ही माझ्या कथांना प्रतिक्रियेच्या रूपात लिहिलेला वाचनात नाही (लिहिला असल्यास परत एकदा माफ करा). दुसर्यांच्या कथांमध्ये मात्रं तो उल्लेख आला. हे जरा मजेशीर वाटलं मला. मायबोलीची जागा अशा खुलाश्यांसाठी फुकट जावी असं वाटत नाही. मग 'हा' खुलासा तरी कशा साठी? तर आपण माझ्या कथेच्या संदर्भात दुसर्यांच्या कथांवर केलेली पोस्ट्स आणि त्याचा इथे केलेला खुलासा याला कुठेतरी माझ्याबाजूने "खुलासा"! आता कथा....
|
|
|