|
Daad
| |
| Wednesday, June 27, 2007 - 11:01 pm: |
| 
|
कधीतरी पोस्टाने एक ज्ञानेश्वरीची प्रत आली आणि त्याबरोबर पत्रही. उघडून वाचलं आणि कोसळले. पत्र विनयने लिहिलं होतं. बाई गेल्या. शेवटचा फक्त महिना-पंधरा दिवसच दवाखान्यात होत्या. आमच्याच बॅचचा डॉक्टर झालेल्या शैलेशने त्यांची विनामुल्य देखभाल केली. शेवटी वाचा शुद्ध राहून नामजप चालू रहावा यासाठी फक्त वैद्याची औषधं घ्यायला कबूल झाल्या. त्यांच्या मरणोत्तर, विनयनेच त्यांच्या जवळच्या माणसांना त्यांच्या वतीने भेट पाठवली होती. मला अतिशय अतिशय कौतुक वाटलं त्याचं. न राहवून त्याने दिलेल्या फोन नंबरवर फोन केला विनयला. परत एकदा जुना, शाळेतला धाडसी विनय ऐकतेय असं वाटलं. "कशी आहेस? मुलगा, दीपक काय म्हणतात?" विनयने आपुलकीने विचारलं. आणि "बाई गेल्या गं... " म्हणून रडूही लागला. मलाही हुंदका आवरला नाही. त्याच्याकडूनच कळलं सगळं. विनय उशा पायथ्याशी होता. त्यांची शेवटची अशी काहीच इच्छा नव्हती. अतिशय समाधानानी मनाने गेल्या म्हणे, बाई. हे जसं कळलं तशाच काही अप्रिय गोष्टीही कळल्या ओघाओघाने. हॉस्पिटलमध्ये हलवलं तेव्हा सुशीलला कळवलं. पण तो तेव्हा जर्मनीत होता कामासाठी, सहपरिवार. काही लागलं तर कळव असं सांगून त्याने फोन ठेवला होता. न सांगताच बाईंना हे सगळं कळत होतं. सगळे जवळचे विद्यार्थी येऊन भेटून जात होते. बाई गेल्यावरही सुशीलला फोन केला विनयने. बाईंच्या इच्छेप्रमाणे देहदानासाठी हॉस्पिटलला कळवतोय असही सांगितलं. तर 'अस्सं होय, बरं झालं तुला त्रास नाही काहीच., मी आल्यावर घराचं वगैरे बघेन....' असलं काहीतरी बोलून सुशीलने फोन ठेवलाही. हे सांगताना विनयच्या तोंडून अतिशय गलिच्छ शिवी गेली आणि मला रडू आवरेना. विनय सावरून म्हणाला , 'चुकलंच माझं. शिवी द्यायला नको होती....' मी त्याला अर्धवट तोडून त्वेषाने म्हणाले , 'बरोबर आहे, खरं तर जमलं असतं तर थोबाडायला हवा होता....' 'नाही. चुकलो असतो आपण. किमान इतकं तरी शिकलो बाईंकडून गेल्या काही महिन्यांत की, त्याला शिक्षा करणारे आपण कोण, तो तिथे वर बसलाय ना, त्याच्यावर सोडूया सगळं. आणि बाईंनीच जिथे त्याला क्षमा केली तिथे आपण काय गं?' विनय वडिलांच्याच कंपनीचं काम बघत होता, आपला सगळा जास्तीचा वेळ तो वृद्धाश्रम, मुक्तांगण सारख्या संस्थांसाठी घालवत होता. बाईंनी कुणाला किती अन काय दिलं ते ज्यांना मिळालं त्यानाच कळलं. बाईंच्या भाषेत 'अनुभूती'. गोडीच्- कुणाला साखरेची मिळाली तर कुणाला गुळाची. एकाची दुसर्याला सांगून नाही कळायची, ती चाखायलाच हवी. हे असं सुचणंही बाईंचंच देणं आहे. आजही कधीतरी शाळेतले आमच्या वेळचे बाईंची 'आवडी' लागलेले मित्र, मैत्रिणी भेटतात... कधीही, कुठेही.... आणि बाईंच्या आठवणींचा परिमळू झुळकतो.... मनं अळूमाळू करत पापण्यांशी येऊन ठाकतो, त्यांच्याच मानसपूजेतला गंध! समाप्त
|
Daad
| |
| Wednesday, June 27, 2007 - 11:04 pm: |
| 
|
हे व्यक्ती चित्रण खर्या बाईंचंच, पण मला भेटलेल्या नाहीत. ऐकलेल्या बाईंबद्दल आहे हे. तेव्हा यातली 'मी' मी नव्हेच. नावं सगळीच बदललीयेत. मला अगदी भावल्या ह्या बाई, म्हणून तुमच्यापुढे ठेवण्याचा एक प्रयत्नं. खरोखर ज्यांना ह्या बाई भेटल्यात आणि आयुष्य उजळून गेल्या त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. अशी, आयुष्य परिमळू शकणारी माणसं तुम्हां आम्हां सर्वांना अनवरत भूमंडळी भेटोत ही सदिच्छा....
|
Mrinmayee
| |
| Wednesday, June 27, 2007 - 11:10 pm: |
| 
|
अप्रतीम! केवळ अप्रतीम! मनं अळूमाळू करत पापण्यांशी येऊन ठाकतो, त्यांच्याच मानसपूजेतला गंध! लाजवाब!!! तोच गंध अगदी अलगद तु आमच्यापर्यंत आणून पोचवलास बघ!
|
Daad
| |
| Wednesday, June 27, 2007 - 11:12 pm: |
| 
|
स्वाती, मृ च्या चित्रेबाई.... आठवलं मला ते कालच. पुन्हा वाचलं काढून. मस्तच लिहिलं होतं तिने. उपमा आणि दृष्टांत यातला फरक मलाही माहीत नाही (नाहीतर कसातरी करून "घुसडला" असता लेखात ;)). आणि समजून घ्यायला खरच आवडेल. वैभवा, गज़ल कार्यशाळेत आम्ही गेलोच की पुन्हा एकदा ;) आम्ही भाग्यवान, 'गुर्जी' सुद्धा चांगले मिळाले आम्ही.
|
Maitreyee
| |
| Wednesday, June 27, 2007 - 11:44 pm: |
| 
|
शलाका, बाईंचं व्यक्तिचित्रण अगदी लाजवाब!
|
Rani_2007
| |
| Wednesday, June 27, 2007 - 11:53 pm: |
| 
|
शलाका, अप्रतिम व्यक्तिचित्र ...... कुठेतरि मनाला हेलावून गेले.
|
Arch
| |
| Thursday, June 28, 2007 - 2:49 am: |
| 
|
नेहेमीप्रमाणेच सुंदर. आणखी एक आदरणीय व्यक्तिमत्व आमच्यापुढे उभ केल्याबद्दल धन्यवाद.
|
मला आठवतंय तसं लिहायचा प्रयत्न करते. उपमा (simile) म्हणजे ज्यात स्पष्ट तुलना केलेली असते. उदा : साखरेसारखा गोड. उपमा वापरताना उपमेय ( ज्याला उपमा दिली जात आहे), उपमान ( ज्याची उपमा दिली जात आहे), आणि ' सारखा','प्रमाणे','जणू' असे शब्द वापरलेले दिसतात. दृष्टांतात (analogy) अशी स्पष्ट तुलना नसून अध्यारुत (implied) दाखला दिलेला असतो. सहसा तात्विक / अदृष्ट मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेंद्रियांच्या कक्षेतील ( दृष्ट) गोष्टीचे उदाहरण वापरलेले असते. (intangible explained with the help of something tangible) . उदा : मोगरा फुलला.. फुले वेचिता बहरू कळियासि आला.. इवलेसे रोप लावियले द्वारी.. त्याचा वेलू गेला गगनावेरी.. मनाचिये गुंती गुंतियला शेला बाप रखुमादेवीवरे विठ्ठली अर्पिला..' यात मोगरा, शेला हे दृष्टांत आहेत. ( यातलं ' दृष्टादृष्ट' प्रकरण लक्षात आणून दिल्याबद्दल वैभवचे आभार.) रूपक (metaphor) हा तिसरा अलंकार. यात उदाहरणाच्या अध्यारुत अर्थाची उपमेयाशी तुलना केली जाते. उदा : पाऊस तिच्या डोळ्यांच्या देशी पडला अन इंद्रधनू इथले विस्कटले आहे ( वैभवच्या ' हितशत्रू' गज़लमधील शेर.) आता डोळ्यांचा देश नसतो आणि डोळ्यातून वहातात ते अश्रू, पाऊस नव्हे हे सर्वज्ञात आहे. इथे पाऊस आणि इंद्रधनू ही रूपकं आहेत. उत्प्रेक्षा असा अजून एक अलंकार शिकल्याचं आठवतं. पण तो कसा असतो हे आता आठवत नाहीये. हे आठवलं तसं लिहीलंय. चुभूद्याघ्या. दाद, तू माहीत नसताना हे लिहील्याबद्दल तुझ्यावर चिडावं की त्यानिमित्ताने जरा पुन्हा व्याकरणाला उजाळा मिळाला म्हणून तुझे आभार मानावेत हे अजून ठरत नाहीये.
|
दाद.. मस्तच लेख.. स्वाती.. माझ्या आठवणीप्रमाणे जेंव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले जाते तेंव्हा तो उत्प्रेक्षा अलंकार होतो.. उदा. अमृताहूनी गोड नाम तुझे देवा चु. भू. द्या. घ्या.
|
Bee
| |
| Thursday, June 28, 2007 - 3:55 am: |
| 
|
दाद, वाचताना असे वाटले होते तुझ्याच बाईंचे चित्रण तू रेखाटते आहेस, इतके सुंदर लिहिलेस.
|
Daad
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:35 am: |
| 
|
स्वाती, चिडू नकोस बाई... (आणि आभार मी मानायचे तुझे) खरं ते सांगितलं. माहीत नाही! बाई माझ्या नाहीत (आणि त्यांनी दहावीत सांगितलेला फरक माझ्या आत्तापर्यंत लक्षात राहिला असता तर.... हं! अजून काय हवं होतं? ) पण तू किती सुंदर समजावून सांगितलायस? -दृष्टांतात (analogy) (implied) दाखला दिलेला असतो. सहसा तात्विक / अदृष्ट मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेंद्रियांच्या कक्षेतील ( दृष्ट) गोष्टीचे उदाहरण वापरलेले असते. (intangible explained with the help of something tangible) . आता ह्याच्याइतकं चपखल कोण दुसरं सांगू शकणार?
|
दाद स्वतःच्या अनुभवावरून लिहायचं म्हटलं तर आपली शिदोरी कितीशी पुरणार? ऐकीव अनुभवावरून इतकं दमदार लिहीता येणं हे देणंच म्हणायचं. छानच! स्वाती व्याकरणाच्या वर्गात बसल्यासारखं वाटलं. मस्त उजळणी झाली. देवदत्त म्हणतोय तेच मलाही आठवतंय उत्प्रेक्षेबद्दल. अजून अतिशयोक्ती, व्याजोक्ती असे बरेच काय काय आठवले. एका जुन्या पुस्तकात हे सगळे भाषालंकार सुंदर मराठी, संस्कृत उदाहरणांसकट दिले होते. नाव आठवत नाही.
|
Reshim
| |
| Thursday, June 28, 2007 - 5:34 am: |
| 
|
दाद, अतिशय सशक्त आणि कसदार लिखाण आहे तुमचं. कथा, ललित सगळच खूप मनाला भिडणार असतं. एखाद्या प्रतिथयश लेखकाचे लेख वाचत असल्यासारख वाटतं. अभिनंदन आणि खूप खूप शुभेछ्या. असच उच्च दर्जाचे लिहित रहा.
|
Psg
| |
| Thursday, June 28, 2007 - 9:06 am: |
| 
|
दाद! हलवून टाकणारं लिहितेस गं!
|
Sush
| |
| Thursday, June 28, 2007 - 9:27 am: |
| 
|
सुन्दर ललितलेखन, दाद खरतर हे ललित एका कथेच्या रुपातहि तुम्हाला लिहिता आले असते. असो तरिही वरिल लेखण परिणाम साधते.
|
Manutai
| |
| Thursday, June 28, 2007 - 10:24 am: |
| 
|
दाद, एखाद्या मराठी वीकलीत पाठव ना, खूपच तोउचिन्ग आहे. अनेक लोकांनी वाचुन धडा घ्यावा असे वाटते.
|
Abhi_
| |
| Thursday, June 28, 2007 - 11:08 am: |
| 
|
शलाका, अ प्र ति म!! हे सर्व वाचताना मला आमच्या एका बाईंची आठवण झाली.. त्यांनी शिकवलेले ८ वी ते १० वी या तीन वर्षातले मराठीचे तास डोळ्यासमोर तरळून गेले
|
Zelam
| |
| Thursday, June 28, 2007 - 12:06 pm: |
| 
|
दाद मस्तच गं. लेख पूर्ण होण्याची वाटच बघत होते.
|
देवा, तो अलंकार उत्प्रेक्षा नव्हे तर व्यतिरेक. सन्मे, इच्छुकांसाठी : हा एक दुवा सापडला शोधाशोधीत. दाद, पुढच्या वेळी पोस्ट करायच्या आधी मला consult कर. On a serious note, तुझ्या लेखाबद्दल बोलताना विषयांतर झालं त्याबद्दल क्षमस्व. लेख छानच आहे. वाचताना मलाही ज्यांच्या शिकवण्यातून आणि आचरणातून खूप काही शिकायला मिळालं अश्या सगळ्यांची आठवण झाली. मॉड्स, या व्याकरणाच्या पोस्ट्स अस्थानी वाटल्यास योग्य जागी हलवाव्यात ही विनंती.
|
त्यातली मी ही तु आहेस असेच गृहीत घरुन वाचल्यामुळे जेव्हा तु मी ती नाही ही पोस्ट केल्यानंतर थोडे वेगळे वाटले. पण व्यक्तीचित्रन हे काल्पनीक व्यक्तीच वा न भेटलेल्या व्यक्तींच असु शकते त्यामुळे चालेल. मस्त उतरलय. स्वाती त्या दुव्या साठी अनेक धन्यवाद. व्याकरणाचा बी बी उघडाल का मॉड. परत एकदा शिकता येईल.
|
|
|