Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 18, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » ललित » Dil se re » Archive through June 18, 2007 « Previous Next »

Daad
Monday, June 18, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडं आधी काही सांगायचय....

पुस्तक वाचतो नं आपण, तसं गाणं वाचायची खोड आहे मला. पहिल्यांदा नुसतीच सुरावट, मग गायकाचा किंवा गायिकेचा आवाज, मग शब्दं, मग सूर आणि शब्दांचं एकत्र नांदणं, मग ताल्-ठेक्यांची झुळझुळ, त्यासाठी वापरलेली instruments वगैरे वगैरे...
ह्यात आवडलेलं गाण अनेकदा ऐकलं जातं. एखाद्या गहन सखोल पुस्तकासारखं प्रत्येक ऐकण्यात वेगळा पदर उलगडत जातो... आणि कधी कधी दृश्यमान होतं गाणं.

ए. आर. रहमानचं "दिलसे" हे गाणं असंच ऐकलं मी.... मनात आलं ते लिहून ठेवलंही. तुम्हाला सांगावं असं माझ्या लेखात 'सघन' असं काही नाही. पण जमेल त्या वाकड्या तिकड्या शब्दांत माझी अनुभूती (मोठ्ठा शब्द आहे...) तुमच्या पर्यंत पोचवण्याचा थोडा अट्टाहास म्हणा ना, आहे हा. माझ्यासारखं गाणं "वाचणार्‍यांना" नक्की काहीतरी जाणवेल. इतरांना कदाचित आवडणारही नाही. पण तरीही.......

हा लेख वाचण्यापूर्वी आणि नंतरही ते गाणं ऐकणं फार फार आवश्यक आहे..... (नाहीतर एखाद्या सुंदर मैफिलीचा नुसताच वृत्तांत वाचल्यासारखं होईल ते)

परत एकदा सांगत्ये, हे मला "दिसलेलं" गाणं आहे.... तुम्हाला तसं दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे माझा.



Daad
Monday, June 18, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिल से.....
ए. आरचा अत्यंत व्याकूळ करणारा, कधी थोडा रुद्ध, हळवा होणारा आवाज, त्याची मॉड्युलेशन्स भावली. संथ एक दोनच percussion instruments नी सुरू होणारं गाणं.... पहिल्याच ओळीत तीन वेळा धमाका उडतो "सूरज", "पारा" आणि "दिलसे" याच शब्दांवर.
त्याने वापरलेली वाद्य किंवा sampling करून वापरलेले आवाज आवडतात मला. या गाण्यातला असाच एक आवाज म्हणजे पाण्यावर काठी मारल्यास उठणारा आवाज.... नीट कान देऊन ऐकल्यास ऐकू तर येतोच पण एकदा ऐकला की गाणंभर पाठ सोडत नाही.
"गम दिलके बस चुलबुले है... पानी के ये बुलबुले है... उठतेही बनते रहते है...." इथे कळतो त्या काठीच्या आवाजाचा परिणाम.....

"शब्दं संपले आणि तरीही काही सांगण्यासारखं उरलं की सुरू होतो तराणा...." असं कुणी म्हटलय (बहुतेक कुमारजींनी)
धपापणार्‍या हृदयाची काहीतरी सांगण्याची धपड अगदी अगदी पकडलीये तबलामृदुंगाच्या बोलांनी.
"धागिन धाग दिन देग धागदिन
धागिन धाग दिन देग धागदिन"

धाप लागून बोलायला गेल्यास, तोंडाने घेतलेल्या श्वासाचा जो आवाज येतो तो आणि तिथे घेतलेला क्षणिक विराम याचा वापर करून म्हटलेले पुढचे बोल
"धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
ता sss अ धि अ धिं sss धिंधिं ना
नागिन धिं
अ धिं धिं ना....
अ धिंधिं तानं धित्तान झिग झिग... "

त्यातल्या मधे मधे आलेल्या 'अ' ने जो परिणाम साधलाय तो शब्दातीत आहे.

(पुढील लेख लिहिला तेव्हा मूव्ही बघितला नव्हता. नंतर कधीतरी बघितल्यावर त्याचं केलेलं चित्रिकरणही आवडलं.)


Daad
Monday, June 18, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डब लब डब लब डब लब......

धकधकणार्‍या हृदयाचा आवाज.....
शांततेत नांदणार्‍या संथ हृदयाच्या डोहावर निष्ठूर काठीचे एका मागोमाग एक घाव घातले तर....
.... तर कसे तरंगांचे ओरखडे, वेदनेच्या लाटा उठतात, कसे दु:खाचे बुडबुडे फुटतात, कसं डबडबून येतं हृदय..... कसं घायाळ घायाळ होतं... आत आत!

हे संभाळत जगणार्‍या या देहाच्या कक्षेला भेदूनही रोजचा सूर्य....
तो उगवतो, मावळतो, निर्विकार क्षणांचा पारा थेंबा-थेंबावे ठिबकतो, संततधार धरल्यासारखा... कुणी केलेल्या नवसाची फेड करीत जगतो आपण एक नको असलेलं आयुष्य?
ही... ही... अमानुष सक्तीही, आसक्ती होते मग कधीतरी. रोजच्या श्वास घेण्यालाही "जीवन" म्हणायला लागतो आपण कधीतरी.....
......मार्गाला लागतो आपण कधीतरी.

अशाच एका कलत्या दुपारी पाऊल उमटतं न जगलेल्या आयुष्याचं. दैवाने कापून, तोडून, भिरकाटून दिलेला आपलाच दुसरा तुकडा भेटणार असतो संध्याकाळच्या कलत्या उन्हात. पूर्णत्व अनुभवायचं, परत एकदा, शेवटचंच बहुतेक, अगदी काही तास की मिनिटं?

अगदी थोडावेळ काहोईना पण, अर्थ मिळणार असतो प्रत्येक श्वासाला. आतापर्यंतं तुकड्या तुकड्यात पांघरलेली ही स्थळ-काळाची लक्तरं एकदा कदाचित फक्त एकदाच वस्त्रं बनून येणार असतात, आपलं उरलं-सुरलं नागडं अस्तित्वं सजवण्याची ही एक, एकच एक संधी.

आपल्यातच आपण विरघळण्याची वाट बघतो आपण. प्राण वेध घेतात, एकदा डोळे बनून, कधी कानोसा घेऊन तर कधी श्वासात गंध शोधत...

डब लब डब लब डब लब...... सवयीने धकधकतं हृदय आणि त्याबरोबर सवयीनेच घाव घालत असते अदृष्टाची काठी. पाणी काय हृदय काय, घाव बसला की तरंग उठतात, लाटा किनार्‍याला थडकून फुटतात..... पण धकधक आहेच अविरत, सवयीनेच...
घावांनी हल्लक झालेला, कसोशीने जोडलेला वरचा पापुद्रा साधतोय न साधतोय तोच परत काठी वाजते... सवयीने! वाट बघण्यातही हजार मरणं जगतो आपण, आनंदाने!

अजून भगभगणरा रोजचा सूर्य आणि त्याबरोबर ठिबकणारा क्षणांचा पारा... वितळतात आपल्यासाठी आणि.....
आणि नजरेला पडतो, भेटतो आपल्या कायेबाहेरचा आपलाच प्राण.

आणि सगळे बंध तोडून निघते एक आकांत, एक आह.......
.....दिलसे!

'धागिन धाग दिन देग धागदिन
धागिन धाग दिन देग धागदिन'
शब्द नाहीतच नुसतीच केविलवाणी धडपड.... एकमेकांना सांगण्याची आणि समजून घेण्याची...

काय म्हणतोस?
कसा आहेस?
फार सोसलंस रे....

कुठे होतीस गं?
किती शोधलं तुला?
काय झालं हे?
............
योजलेलं यातलं काहीच म्हणत नाहीत....

हृदयं छातीत न धडधडता कानातच वाजतं.... धापणार्‍या आवाजात, शब्दं संपून, शब्दांच्या पलिकडलं, फक्त आपल्याला अन त्याला कळेल अशा अनाकलनीय भाषेत धापतात, रडतात, कुजबुजतात दोघे.... आह, दिलसे रे!

आपसूकच आकळतं त्यांनाच मग...
विलगलेली ही दोन पानं पानझडीच्या एका घावात वेगळी होऊन कुठे, कशी भरकटली, कसल्या कसल्या वावधुळींनी कुठे कुठे भिरकावून दिलं दोघांना, दिशाहीन होऊन एकमेकांना शोधत कशी फरपटली दोघं.....
'धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
ता sss अ धि अ धिं sss धिंधिं ना
नागिन धिं
अ धिं धिं ना....
अ धिंधिं तानं धित्तान झिग झिग...

......किती जंगलं, किती काटे, कसली गावं, कसली माणसं, कुणा कुणाचे ओरबाडे, कुठे कुठे ओरखडे, कसे घाव्-डाव, कसं खपली धरणं, कसं भरून येणं.....

अ धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
.......मग दोघांनी आयुष्य, आयुष्य म्हणत काळाच्या पुस्तकात कुठल्यातरी दोन पानांत कसाबसा मिळवलेला विसावा, तिथेच पडलेली जाळी, मग पडलेल्या जाळीतून जमतील तशी, मिळतील तितकी वाचलेली अक्षरं, माग घेण्यासाठी..... आहेस का तू? कुठे असशील तू?..... आह, दिलसे!

समजावतात एकमेकांना...
काय करणार, तुझा माझा इलाज नाही, सखे. कात झडल्या जाळीतही अडकून असतं एक जिंदा दिल, धकधकतं ना गं, सवयीनेच.....
दिल म्हटलं की दर्द आलाच की रे....
नव्हे गं, दर्द आहे तिथेच दिल आहे....
राणी, ह्याच वेदनेचे पंख होऊन, जाळी झालेलं हे कलेवर फोडून उडून का जात नाही आपली आस आणि विश्वासही?

तरीही थिजलेल्या मनाच्या दगडी पहार्‍यावरही पालवतात चुकार वेली, घोसावतातही यथावकाश, कुणा कुलकुलणार्‍या चोचींसाठी शिंपी होतो डोळ्यांचा काठ..... येणार्‍या ऋतूसाठी परत एकदा सजतात डहाळी डहाळीवर, तुझे-माझे श्वास.... पानझडही येतेच, तिचाही नाईलाज..... आह दिलसे रे!

डब लब डब लब डब लब......

धकधकणार्‍या हृदयाचा आवाज. शांततेत नांदणार्‍या संथ हृदयाच्या डोहावर निष्ठूर काठीचे एका मागोमाग एक घाव घातले तर....
.... तर कसे तरंगांचे ओरखडे, वेदनेच्या लाटा उठतात, कसे दु:खाचे बुडबुडे फुटतात, कसं डबडबून येतं हृदय..... कसं घायाळ घायाळ होतं... आत आत!

दिलसे रे sss !


Sakhi_d
Monday, June 18, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद खरच खुप सुंदर लिहिले आहेस. सगळच्या सगळ कुठेतरी आत आत झिरपतय अस वाटते. खरच खुप सुंदर....

Sanghamitra
Monday, June 18, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाई गं कसलं छळवादी लिहितेस? आधीच त्या गाण्याने झपाटलं होतं ते कमी म्हणून की काय?
पण खरंच एक काळ असा होता की दिवसातून दहा वेळा तरी हे गाणं ऐकून व्हायचंच.
शब्द, संगीत आणि आर्तता एकूणच जरा जीवघेणाच प्रकार आहे हा.


Manjud
Monday, June 18, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या गाण्याचे side rhythms नीट ऐकू यावेत म्हणुन stereo चा मोठ्ठा आवाज केला होता. आणि बाबा नेमके लवकर घरी आले तेव्हा.....
"हा काय डान्स बार आहे का? एवढ्या आवाजात गाणी लावतं का कोणी घरात. आधी बन्द कर तो खोका" ह्या त्यांच्या आगपाखडीवर "बाबा, डान्स बार मधे अशी गाणी नाही हो लावत" हे माझ शांतपणे दिलेल उत्तर ऐकून आईच्या हातचा धपाटा आणि "फेकुन देइन तो stereo खाली पुन्हा ईतक्या जोरात गाणी लावलीस तर..." हे बाबांचे शब्द दोन्ही एकदमच माझ्यावर कोसळले होते.

दाद, माझ्या कोवळ्या आठवणी जाग्या केल्यास गं. कसले खतरनाक विषय निवडतेस तू लिहायला


Nandini2911
Monday, June 18, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर.. आम्ही शाळेत असताना हे गाणं घेऊन डान्स बसवला होता. एकदम वेगळा प्रकार. गाणं तर असलं डोक्यात चढत जातं ना.. त्यातलं..
"दिल है तो दर्द होगा... दर्द है तो दिल भी होगा... " ही ओळ अक्षरश्: जीवघेणी आहे.
रहमानचा आवाज इतका मस्त वाटतो ऐकताना. एकदम सही विषय.


Bsk
Monday, June 18, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सुरेख लिहलय! गाणे आवडीचे आहेच, आता हे लेख पण दर वेळॆला वाचला जाणाअर गाण्याबरोबर !! too good......

Mankya
Monday, June 18, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही है दाद .. एकदम बरोबर !
अश्याच काहिश्या भावना मनात येतात पण शब्दात उतरवता येत नाहीत, अगदी जसं च्या तसं उतरवलस बघ .. मस्तच !

माणिक !


Shyamli
Monday, June 18, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए बाई काय चाललय काय ग तुझं?आधि ते नक्ष फरयादी आणि आता हे दिलसे,एकुण तू जीव घेणार आमच्या सारख्यांचा.
हे असं गाणं वाचायची, गाण्यात हरवायची एकुणच खुळी सवय लागलेली मग एखाद गाणं अस मनाच्या कोप-यात अलगद जाऊन बसतं, आणि कधि तरी कुठे तरी ऐकु आलं की मग सुरु होतं मनात दिल से रे sss .....
बाप रे नादात बरच काही लिहून गेले कि मी, माफ कर ग शलाका पण हे लिखाण म्हणजे केवळ दिल से sss राहवलंच नाही अजिबात
शब्द नाहीतच नुसतीच केविलवाणी धडपड.... एकमेकांना सांगण्याची आणि समजून घेण्याची... >>आहा

धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
ता sss अ धि अ धिं sss धिंधिं ना
नागिन धिं
अ धिं धिं ना....
अ धिंधिं तानं धित्तान झिग झिग... ">>>>त्यातल्या मधे मधे आलेल्या 'अ' ने जो परिणाम साधलाय तो शब्दातीत आहे...
अगदि अगदि, कसं ग जमत तुला असं सगळच शब्दात पकडायला?
छे! सगळा लेखच copy pest करावा लागणार असं दिसतय, थांबते :-)

कुछ तो खास है यार तुममे जो सब के दिलोंको छु रही हो :-)

दिलसे रे ssssssss :-)

एकदम सलाम आपला तर :-)


Ashwini
Monday, June 18, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, मस्त! गाणं तर जीवघेणं आहेच, प्रत्येक वेळी ऐकताना जीव घेतल्याशिवाय सोडतच नाही पण त्यामागची कारणमीमांसा आज कळली. :-)

Asami
Monday, June 18, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद दर वेळी हे गाणे ऐकले कि काहितरी लिहायला पाहिजे त्यावर असे नेहमी वाटत राहिलेय, ते काय ते आज कळले. Hats off to you !!!

1999 मधे NH मधे Fall foliage बघायला गेलो होतो एकदा एकटाच तेंव्हा trekking करताना sterio वर दिल से लावऊन बसलेलो. तेंव्हा बाजूने जाणारे एक american couple गाणे संपेपर्यंत माझ्या बाजूला येउन शांतपणे ऐकत बसलेले ते आठवले. simply awesome



"शब्दं संपले आणि तरीही काही सांगण्यासारखं उरलं की सुरू होतो तराणा...." असं कुणी म्हटलय (बहुतेक कुमारजींनी)
धपापणार्‍या हृदयाची काहीतरी सांगण्याची धपड अगदी अगदी पकडलीये तबलामृदुंगाच्या बोलांनी.
"धागिन धाग दिन देग धागदिन
धागिन धाग दिन देग धागदिन"
>> रहमानला ही सवय आहे. Thakshak मधेपण असाच सुंदर वापर केलाय म्रुदुंगाचा. त्याबद्दल त्याची एक commentry वाचली होती त्यात तो म्हणाला होता कि त्या piece ला न्याय देउ शकेल असे शब्द कोणाला लिहिता येतील असे त्याला वाटले नव्हते म्हणून त्याने हा प्रयोग केला.

Marathi_manoos
Monday, June 18, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Phakta dole mitun parat Gana athavala...divas masta suru zala ....Thanks Daad!

Dineshvs
Monday, June 18, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दाद, तराण्यातल्या निरर्थक शब्दसमुहांचा, इतका सुंदर अर्थ, दिग्दर्शकालाही अभिप्रेत नसेल.

Sashal
Monday, June 18, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, छानच लिहीलंय .. हे गाणं म्हणजे perfect आविष्कार आहे मनाच्या हिंदोळ्यांचा .. फ़क्त हृदय च बोलतंय, डोकं (माणूस बनून विचार करण्याची बुध्दी) मुदामहून भिरकावून दिल्यासारखं, असं वाटतं ऐकताना .. तू मस्तच वर्णन केलं आहेस त्या 'अनुभूती'चं ..

ए. आर्. चा आवाज मात्र कसला कमाल आहे .. रंग दे बसंती मध्ये त्याचं आणि लता मंगेशकर चं एक गाणं आहे, 'लुक्का छुपी बहौत हुई .. ' असं, कसलं म्हंटलंय त्याने ते! शेवटी अशी ओळ आहे त्यात, 'यहाँ सबकुछ है माँ फ़िर भी, बीन तेरे लगे मुझको अकेला sss .. ' त्याने इतकी जबरदस्त म्हंटलेय ही ओळ की आई पासून दूर हरवलेल्या मुलाची अगतिकता पुरेपूर उतरलीय त्यात .. अप्रतीम!

मध्ये एका तामिळ मैत्रीणीच्या नवर्‍याबरोबर ए. आर्. विषयी बोलणं चालू होतं, तर तो सांगत होता की म्हणे, ए. आर्. चे काहि ठराविक राग आहेत, त्यातच mix n match करून तो त्याच्या tunes बनवतो .. त्याच्या मते, इलाय राजा त्याच्यापेक्षा खुप जास्त accomplished composer आहे आणि इलाय राजा ने कदाचित त्याच्या career मधल्या २० वर्षांनंतर अशा प्रकारचं repetition केलं असेल तर ए. आर्. ने म्हणे सहा सात वर्षांतच अशा repetitions न सुरुवात केली .. सुदैवाने किंवा दुर्दैवाने, मला रागातलं काहिच कळत नाहि, पण मला तरी ए. आर्. ची गाणी अजिबात repetitive वाटत नाहित .. आणि जितक्या जास्त वेळा ऐकावी तशी जास्तच आवडत जातात ..


Kedarjoshi
Monday, June 18, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धकधकणार्‍या हृदयाचा आवाज.....
शांततेत नांदणार्‍या संथ हृदयाच्या डोहावर निष्ठूर काठीचे एका मागोमाग एक घाव घातले तर.... क्या बात है शलाका.
ह्या गाण्यात वल्ह्याचा एका ठिकानी वापर खुप चांगला केला आहे. तो जेव्हा मध्येच जोरात येतो तेव्हा अस वाटत की खुप जोरात पळाल्यामुळे ऋद्य धडधड करत आहे.
पण तो डुबुक डुबुक आवाज बहुतेक की बोर्ड चा आहे.

असामी तु खामोश रात गाण्याबद्दल म्हणतोयस का? जबरी गानं आहे ते.

ह्याची देही AR ला गेल्या शनिवारी शिकागोत ऐकल. फक्त वंदे मातरम मध्ये भरुन पावलं, बाकीची गाणी बोनस.

कुमारजींचा मी पण चाहता आहे. (त्यांचा झिनी झिनी मध्ये पण असेच काही एक जबरी फिलींग येते.)


Manuswini
Monday, June 18, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरोखर हे गाणे म्हणजे एकदम जीव घेते बघ........
दिल है तो दर्द होगा
इतकी दर्द भरी ओळ एकली की वाटते अहाहाहा

प्रेमाने झपटलेल्याला बरोब्बर कळते ही ओळ :-)
केदार,

ते खामोश रात तकक्षक मधले ना
त्यातील एक ओळ आहे ना ती सही आहे,

जीने का था हम मे दम पर नही था कोई हमदम खुशीयोंकी थी जुस्त्जु मिल रहे थे बस गम ही गम



Ravisha
Monday, June 18, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोर में जिस दुनियाके भी खामोशी थी और एक थे हम
राहें सभी थी सुनी सुनी,बुझ रहे थे कदम थम थम....


Asami
Monday, June 18, 2007 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़क्त खामोश रात नाही तर धीम त दारे बद्दल पण बोलत होतो.

Deepanjali
Monday, June 18, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो , तक्षक मधला तो तराणा जबरदस्त आहे , मृदुंगाचा ताल आणि धिन त देरे दा नि ' मस्त वाटतं ऐकताना .
फ़क्त त्याला न्याय द्यायला श्रीदेवी सारखी dancer हवी होती , तब्बु आणि dance म्हणजे अगदीच ........





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators