Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 13, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » हक्क » Archive through June 13, 2007 « Previous Next »

Supermom
Wednesday, May 30, 2007 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज श्याम उशिराच घरी येणार होता. अन सुशांत त्याच्या मित्राकडेच रहाणार होता अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री दहा पर्यंत वैदेही एकटीच होती घरी.

दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदेहीनं. पण आता फ़ारच कंटाळा यायला लागला होता तिला.स्वैपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं, आता मात्र ती पुरतीच वैतागली होती.

गरमगरम वाफ़ाळत्या कॉफ़ीचा कप घेऊन ती व्हरांड्यात येऊन बसत नाही तोच बेल वाजली.

'आता या वेळी कोण आलं असेल बरं?'
मनाशी नवल करतच ती उठली. बघते तर दारात सुशांतच उभा होता.
'का रे, काय झालं?'

'अग स्कॉटच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. म्हणून तो अन त्याची आई गेलेत दवाखान्यात त्यांना घेऊन. मग घरीच आलो झालं. बाबाही उशिरा येणार आहेत ना ग?'

'हो ना रे. बरं झालं तू घरीच आलास ते. अगदी बोअर झाले होते बघ मी. ...'

सुशांत हलकेच हसला. गव्हाळ वर्णाचा नि भरपूर उंचीचा लेक असा हसला की वैदेही अगदी निरखून बघत असे त्याच्याकडे. 'मातृमुखी अन सदा सुखी' असं आई म्हणायची त्याची आठवण तिला अशा वेळी हटकून येई.

'ममा, भजी कर ना ग मस्तपैकी. बाबांना खूप आवडतात. अन बघ कशी अगदी 'भज्यांचीच हवा' आहे...'

'अरे लबाडा, बाबांचं नाव कशाला रे सांगतोस? तुला हवीत म्हण ना..'

'एकही बात है मदर इंडिया...'

अन वैदेहीबरोबर तो देखिल खळखळून हसला.

आंघोळ करून सुशांत आला तोवर पाऊस पडायला सुरुवात झाली होती. वैदेहीनं आधी श्यामची आवडती चटणी मिक्सरमधून काढली. भज्यांचं पीठ भिजवणार तोच बेलचा कर्कश्श आवाज पुन्हा घुमला.

'बघ रे राजा जरा... आज तुझे बाबाही लवकर आलेले दिसतात...'

वैदेहीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सुशांतनं दार उघडलंही होतं.

पण दारात श्याम नव्हताच. एक गौरवर्णी,मध्यम वयाचा माणूस उभा होता. डोळ्याला सोनेरी काड्यांचा चष्मा, फ़्रेंच कट दाढी नि किंचितसे घारे डोळे... अंगावरचे कपडे थोडे भिजलेले.

'येस..?'

सुशांतनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं.

अन बाहेर चमकलेल्या विजेच्या लोळाबरोबरच त्याच्या तोंडून सावकाश,कष्टानं आल्यासारखे शब्द आले..,

'यंग मॅन, आय एम युवर डॅडी...'

'सर, यू आर मिस्टेकन..' किन्वा 'यू आर इन द रॉन्ग हाऊस..' असं काहीतरी बोलायच्या विचारात असलेला सुशांत एकदम गप्प झाला.


बाहेर आलेल्या वैदेहीचा चेहरा पांढराफ़टक पडला होता.एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती. कुठल्याही क्षणी खाली कोसळेल अशी.


Sneha21
Thursday, May 31, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह, जबरदस्त सुरुवात.....प्लिस लवकर लिहा ना सुपर्मोम

Mankya
Thursday, May 31, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त सुरूवात आहे सुमॉ .. येऊद्यात !

माणिक !


Supermom
Thursday, May 31, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई,...'
गोंधळलेला सुशांत आळीपाळीनं एकदा वैदेहीकडे नि एकदा त्या अपरिचित व्यक्तीकडे बघत होता.

'कोण आहे हा माणूस? खुशाल आपला बाप आहे म्हणून सांगतोय.... अन आई त्याला घरातून हाकलून लावायच्या ऐवजी इतकी सैरभैर का बरं झालीय?...'
त्याला काहीच कळत नव्हतं.
या द्विधा मनस्थितीतून त्याची सुटका त्या माणसानेच केली.

'आय एम सॉरी. मी फ़ोन करायला हवा होता आधी. कल्पना द्यायला हवी होती. वैदेहीला फ़ारच धक्का बसलेला दिसतोय माझ्या येण्याचा. निघतो मी...'

डोक्यावरची हॅट तिरकी बसवत तो भर पावसात भिजतच निघून गेला.

त्याच्या मागे धाडकन दार लावून घेत सुशांत वळला. वैदेहीला आधार देऊन त्यानं खुर्चीत बसवलं.

'ममा, काय प्रकरण आहे हे सारं? तू ओळखतेस का त्या माणसाला...?

सतरा अठरा वर्षांच्या, अजून तारुण्य अन बालपण या दोन्हीच्या उंबरठ्यावर घुटमळत असलेल्या मुलाच्या स्वरातली धार वैदेहीला असह्य झाली.

'तू थोडा शांत बस पाहू. मला एकटीला राहू दे जरावेळ...'

सोफ़्यावरची उशी मानेखाली घेत तिनं डोळे मिटून घेतले.सगळ्या शरीरातला उत्साह, ताकद, जणूकाही कोणीतरी काढून घेतलय असं तिला वाटत होतं. सुशांत वर खोलीत निघून गेला अन बसल्या जागी ती आडवीच झाली. काळीज अजूनही धाडधाड उडत होतं तिचं. कोसळणार्‍या पावसाच्या धारांचा आवाज अन मनातलं वादळ या दोन्हींच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती.

दारात लॅच की सरकवल्याचा आवाज आला अन ती उठून बसली. श्याम घरी आला होता.

'हुश्श, दमलो बुवा. आज या पावसानं अगदी कंटाळा आणलाय...'
वैदेहीच्या मुद्रेकडे लक्ष जाताच तो बूट काढता काढता क्षणभर थबकला.

'काय ग? आज उदासशी? अग, आज तर जाम खुश होणार बघ तू. ऑफ़िसमधला सुकुमारन आला परत भारतातून. अम्मानं खास साडी पाठवलीय तुझ्यासाठी..'

हातातलं पॅकेट तिच्याशेजारी ठेवत तो तिच्या बाजूला बसला. नेहेमीच्या तिच्या उत्फ़ुल्ल स्वभावाप्रमाणे ती झडप घालून ते पार्सल उघडेल अन साडी स्वतः भोवती लपेटून आरशात बघेल अशी अपेक्षा होती त्याला.

पण वैदेहीचा काही प्रतिसादच येईन तेव्हा तिच्याभोवती हात घालून तिला त्यानं मायेनं जवळ घेतलं.

'मला सांगणार नाहीस?...

दुसर्‍याच क्षणी सारा बांध फ़ुटला तिचा. श्यामच्या खांद्यावर डोकं ठेवून तिनं एक जीवघेणा हुंदका दिला.

'तो...तो आला होता रे आज. श्याम, मला खूप भीती वाटतेय रे....'

'कोण, सुनील?.....'
एकदम धसकून जात श्यामनं विचारलं. जणू वैदेहीचं भावविश्व ढवळून टाकणारी एकच व्यक्ती या जागात आहे हे ठाऊक असल्यासारखं.

पण पुढच्याच क्षणी तो शांत, गंभीर झाला.

'काय झालं? काय म्हणाला तो?...'

'लगेच निघून गेला. पण सुशांतला भेटला रे तो. त्यानंच दार उघडलं सुनीलला. अन तो त्याचा डॅडी असल्याचंही बोलला तो...'

'सुशान्त कुठे आहे?...'
श्याम पटकन उठून उभा राहिला.

'त्याला आधी सावरायला हवं राणी. तो किती बावरलेला असेल..... तू जेवणाची तयारी कर. मी आलो त्याला घेऊन.'

दोन पायर्‍या एकाच वेळी चढत श्याम वरती गेला. सुशांतशी तो काय बोलला ते वैदेहीचा ऐकू आलं नाही. पण सुशांत मुकाट्यानं त्याच्याबरोबर खाली आला.

वैदेहीच्या तोंडाची चवच गेली होती. सुशांतही नुसताच अन्न चिवडत होता. एकटा श्याम मात्र कमालीच्या शांतपणे जेवत होता.

जेवणं उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आले. बाहेरचा पाऊस आता आणखीच तडतडत होता. नेहेमीपेक्षाही नकोसा वाटला तो वैदेहीला.

'बस सुशांत. आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचंय...'

सुशांतनं एक तीव्र दृष्टीक्षेप वैदेहीकडे टाकला.

'तो कोण होता ते स्पष्ट सांगा मला आधी.... ..इज ही रिअली माय फ़ादर?'
एका दमात, धाप लागल्यासारखा सुशांत बोलला.

'हो,तो खरंच बोलला. ही इज युवर फ़ादर. नीट ऐकून घे. मग त्रागा कर बेटा. आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी...'

'आईचं प्रेम होतं त्याच्यावर? म्हणजे मी तुमचा मुलगा नाही? मी सुशांत नटराजन नाही? अन हे तुम्ही दोघांनीही लपवलं माझ्यापासून? खोटं बोलली आई माझ्याशी.....'

अतीव संतापाने, श्यामचं बोलणं पूर्ण न होऊ देताच तो ओरडला.त्याच्या उंच कपाळावरची शीर थाडथाड उडत होती.

'वॉच युवर माऊथ, सुशांत. यू आर टॉकींग टु युवर मदर...'

श्यामचा आवाज वाढला तसा सुशांत पुन्हा खाली बसला. पण मनातल्या मनात तो धुमसतच होता.

'नीट ऐक आधी आई अन मी सांगतोय ते. अन पूर्ण ऐकल्याशिवाय एक शब्दही बोलू नकोस..'






Prajaktad
Thursday, May 31, 2007 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!जबरी सुरवात..पुढचे भाग पटापट येवु दे आता.

Runi
Thursday, May 31, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ..तुम्ही पण टीव्हीवाल्यांसारखा एकदम क्लायमॅक्सच्या वेळी ब्रेक घेताहात.
लवकर लवकर टाका पुढचा भाग.


Supermom
Thursday, May 31, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहेमीच्या संयमी आवाजात श्यामनं सुशांतला सारा भूतकाळ सांगायला सुरुवात केली.सुशांत लक्ष देऊन ऐकत होता. पण वैदेहीचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिच्या डोळ्यांसमोरून पूर्वायुष्याचा चित्रपट सरसर उलगडत होता.

मध्यम परिस्थितीतल्या आईवडिलांची वैदेही एकुलती एक लेक. दिसायला आखीवरेखीव, सावळ्या वर्णाची नि सुरेख केसांची. अभ्यासात जात्याच हुशार. दहावी, बारावी अन इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीत नोकरी पटकावते काय, अन वर्षभरातच कंपनी तिला परदेशी पाठवायचा निर्णय घेते काय, सारंच इतकं भराभर घडत गेलं की मित्रमैत्रिणी, नातेवाईक सारे हेवा करत होते. आईबाबांना तर आपल्या सुविद्य, सुस्वरूप मुलीला कुठे ठेवू नि कुठे नको असं होऊन जात असे.

'आयुष्यात सारंकाही मनासारखं मिळतं बाई तुला...' असं म्हणणार्‍या सगळ्यांना आणखी एक धक्का बसला. दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात आलेल्या वैदेहीचं लग्नही ठरलं ते अगदी पटकन. नात्यातल्याच कुणीतरी सुनीलचं स्थळ सुचवलं. शिकलेला,चांगल्या खानदानी घरातला सुनील अमेरिकेतच नोकरी करीत होता.खरंतर त्याला वैदेहीसारखी करियर गर्ल नको होती. पण त्याच्या घरच्या सार्‍यांनाच वैदेही खूप आवडली, अन त्या दोघांचं लग्न थाटात पार पडलं. सुखाच्या हिंदोळ्यावर झुलतच वैदेही त्याच्या बरोबर विमानात बसली.

टेक्सासला आल्यावर काही दिवस अगदी फ़ुलपाखरासारखे उडून गेले. वैदेहीला तिच्या कंपनीनं आनंदानं तिथल्या प्रोजेक्टवर नेमणूक दिली. अगदी नव्या नवलाईचा दोघांचा संसार सुखाचा चालला होता. पुढे येणार्‍या नशिबाच्या फ़ेर्‍यांची थोडीही कल्पना वैदेहीला नव्हती. सुनील आता मधून मधून वीकएंडला कामासाठी बाहेर रहातो, उशिरा येतो हे तिला कधीकधी खटकायचं पण परत आल्यावर तो इतका गोड वागत असे, की ती अगदी मोहरून जायची.

अन एका काळ्याकुट्ट शनिवारी, वैदेहीच्या ध्यानीमनीही नसताना ते घडलं.

सकाळी नाश्ता करून, दोघांनीही बाहेर जायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे वैदेही तयार होत होती. सुनील आंघोळीला गेला असताना दारावर टकटक झाली.

वैदेहीनं की होल मधून बघितलं. दारात एक परदेशी स्त्री उभी होती. कडेवर दोन वर्षांचं गुटगुटीत मूल...

'इज सुनील हिअर?'

वैदेही काही बोलणार तोच सुनील खोलीत आला. त्या स्त्रीकडे बघून तो इतका दचकला की वैदेहीच्या मनात एकदम अशुभाची शंका आली.

पण त्या स्त्रीनं सुनीलला काही संधीच दिली नाही. एखाद्या चंडिकेसारखी ती त्याच्यावर तुटून पडली.

'यू चीटेड मी. हाऊ कुड यू डू धिस टु मी..?' असं किंचाळत ती एका हातानं त्याला थापडा मारू लागली.

वैदेहीचा अगदी दगड झाला. तिच्या तोंडातून शब्दही फ़ुटेना.

'हिला फ़सवलं म्हणतेय ही, अन माझं काय? माझं तर आयुष्यच उध्वस्त केलं यानं....'


बातमी मिळताच वैदेहीचे आईबाबा अथक प्रयत्न करून, कसाबसा व्हिसा मिळवून अमेरिकेत पोचले. लाडक्या लेकीची अवस्था बघून ते बिचारे पारच खचून गेले.

'पोलिसात देऊ या त्याला. असा सोडणार नाही मी. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती काय?'
बाबांना संताप आवरेना. पण वैदेहीनं अन तिच्या आईनंच त्यांना शांत केलं.

'जे घडायचं ते घडून गेलय बाबा. एकतर त्याचं एक लग्न आधीच झाल्याने आमचं लग्नही वैध नाही. अन कोर्टानं त्याला करायला भाग पाडला, तरी मला त्या नीच माणसाबरोबर संसार करायचा नाहीय आता... मी माझ्या पायांवर उभी आहे. माझं आयुष्य जगायला समर्थ आहे मी..'

वैदेहीनं निक्षून सांगितलं होतं. सुनील केव्हाच त्याच्या बायकोबरोबर रहायला गेला होता.

पण वैदेहीच्या दुर्दैवाचे दशावतार अजून संपले नव्हते. थोड्याच कालावधीत तिला दिवस असल्याचं लक्षात आलं, अन ती मुळापासून कोसळून पडली.
तिनं सुनीलला फ़ोन केला. पण अपेक्षेप्रमाणंच त्यानं कुठलीही जबाबदारी घ्यायला नकार दिला.

आता वैदेहीसमोर बाळाला जगात येण्याआधीच नाहीसं करणं एवढा एकच उपाय होता.पण आईबाबांनी खूप समजावून सांगितलं, तरी तिचा जीव ते करू धजावत नव्हता. सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं तिला वाटत होतं.


Rani_2007
Thursday, May 31, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा चांग़ली चालू आहे.. रूनीशी सहमत.

Marathi_manoos
Thursday, May 31, 2007 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ
please next part .....masta chalu aahe

Mankya
Friday, June 01, 2007 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ .. मानलं ! कसलेल्या लेखकासारखं लिखाण आहे ! पुढच्या भागाची वाट पहातोय !

माणिक !


Supermom
Friday, June 01, 2007 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशीच एक दिवस, विमनस्क अवस्थेत ती ऑफ़िसच्या लंच टाईममधे डबा उघडून बसली होती. पहिला घास घेणार तोच समोरच्या टेबलावरून शब्द आले,

'कितने दिन हो गये अम्मा के हाथ की इडली खाये....'

वैदेहीनं दचकून त्या दिशेला बघितलं. श्यामल वर्णाचा, भरपूर उंचीचा एक तरुण तिच्याकडे बघून हसत होता.

'लीजिये ना. मेरी मां ने बनायी है...'

वैदेहीनं डब्याच्या झाकणात दोन इडल्या अन चटणी घालून त्याला दिली. त्यानंही निस्संकोचपणे त्या घेतल्या. वर आपल्या डब्यातला दहीभात तिला देऊ केला.

श्याम नटराजन. मूळचा मद्रासचा पण शिक्षणानिमित्ताने अन नोकरीसाठी बराच काळ मुंबईत राहिलेला होता तो. वैदेहीच्या सेक्शनमधे बाकी कोणीच भारतीय नव्हते.

आधी ती संकोच अन स्वतः च्या वेदनेच्या कोशात गुरफ़टून गेल्याने श्यामशी मोजकंच बोलत असे. पण दिलखुलास स्वभावाच्या नि अस्खलित मराठी बोलू शकणार्‍या श्यामनं आपल्या स्वभावानं तिची मैत्री अन विश्वास लवकरच संपादन केला. एकदा दोनदा तो वैदेहीला सोडायला घरी सुद्धा आला.

थोड्याच दिवसात वैदेही अन श्यामची घनिष्ट मैत्री जमली. श्यामनंही तिचा भूतकाळ समजल्यावर तिच्या मनावर फ़ुंकर घालायचा प्रयत्न केला. पण आपल्या मर्यादा त्यानं कधीच सोडल्या नाहीत.

अन महिनाभरातच त्यानं वैदेहीच्या घरी तिच्याशी लग्न करण्याबद्दल विचारलं.

घरात आधी सार्‍यांना धक्काच बसला. या मुलात तर काही खोट नाही ना, असंही त्यांना वाटून गेलं. पण श्यामची भावना एकदम प्रामाणिक होती. त्याला वैदेही मनापासून आवडली होती. त्याच्या घरात फ़क्त म्हातारी आई होती. तिचा अर्थातच या लग्नाला तीव्र विरोध होता.

वैदेहीनं आधी नाहीच म्हटलं त्याला. पण आईबाबा नि स्वत श्यामनं तिची खूप समजूत घातली. तिच्या होणार्‍या मुलाचं पितृत्व स्वीकारायला तो तयार होता.

शेवटी श्यामच्या निर्मळ मनाचा विजय झाला होता. एका प्रसन्न दिवशी कोर्ट मॅरेज करून वैदेही आपटेची सौ. वैदेही श्याम नटराजन झाली.

सुशांतच्या जन्माच्या वेळी श्याम तिचा हात घट्ट धरून उभा होता. बर्थ सर्टिफ़िकेट वर जेव्हा त्यानं सुशांत श्याम नटराजन लिहिलं तेव्हा वैदेहीचे डोळे भरून आले होते.

सहा महिन्यांचा व्हिसा संपून आईबाबा भारतात परत गेले. या सहा महिन्यात वैदेहीच्या जगात केवढी मोठी उलथापालथ झाली होती. पण निदान तिच्या आयुष्याचं तारू श्यामसारख्या मजबूत नावाड्याच्या हाती सुखरूप लागलं याचाच आनंद मानून, डोळे गाळतच ते मायदेशी परतले.

सुशांतनंतर वैदेहीला पुन्हा मूल झालंच नाही. पहिल्या बाळंतपणातील काही गुंतागुंतीमुळे तिला मूल होणं शक्यच नाही असा रिपोर्ट आला तेव्हा ती अनिवार रडली होती. पण श्यामनंच तिचं सांत्वन केलं.

'अग वेडे, त्याच्या नि आपल्या प्रेमात वाटेकरी येणार नाही तेच बरंय.' तो हसून म्हणाला होता.

सुशांत जसाजसा मोठा होऊ लागला तसे वैदेहीपेक्षाही श्यामशी त्याचे मायेचे बंध विणल्या जाऊ लागले. श्यामनंही तसंच त्याच्यावर प्रेम केलं. टेक्सास सोडून ते नंतर दुसरीकडे स्थायिक झाले. श्यामनं नोकरीही बदलली. ग्रीन कार्ड आल्यावर वैदेहीनं मात्र नोकरी सोडून पूर्ण वेळ सुशांतच्या संगोपनातच घालवायचं ठरवलं.

आयुष्याची विस्कटलेली घडी नीट बसली होती. श्यामच्या आई एकदा येऊन गेल्या, अन सुनेचं सावळं सौंदर्य अन शालीनतेने त्यादेखिल हरखल्या.

सारंकाही सुरळीत चाललं होतं, अन सुशांत कॉलेजला जायच्या वेळी सुनीलच्या रूपानं हे सावट पुन्हा तिच्या संसारावर घिरट्या घालू लागलं होतं.


श्यामनं सांगितलेलं सारंकाही सुशांतनं नीट ऐकून घेतलं. काही काळ खोलीत जीवघेणी शांतता पसरली.

सुशांतच्या डोळ्याच्या कडांना पाणी साचलं होतं. ते तसंच ओघळू देत, ओठ दाताखाली दाबून तो हलकेच म्हणाला,

'मी बाबांना,.... म्हणजे त्या माणसाला भेटलो एकदा तर चालेल का? मला एकदा भेटायचंय त्यांना..'

'बाबा' हे संबोधन सुनीलसाठी ऐकून श्यामला कोणीतरी आपल्या काळजावरून सुरी फ़िरवतय असं वाटलं.

'हो, जरूर. तुला वाटेल तेव्हा भेट तू...'

आवाज प्रयत्नपूर्वक काबूत ठेवत तो म्हणाला.

सुशांत पुढे काहीही न बोलता उठून वर गेला.

वैदेही अन श्याम कितीतरी वेळ निशब्द बसून होते.



अपूर्ण.


Supermom
Friday, June 01, 2007 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढे सार्‍या नकोनकोशा वाटणार्‍या घडामोडी अगदी वेगानं आकार घेत गेल्या. सुनीलनंही फ़ोन करून सुशांतला भेटायची इच्छा व्यक्त केली. श्यामनं अगदी हसतमुखानं त्याला होकार दिला. सुशांत तर त्या दिवसापासून वैदेही अन श्यामशी कामापलिकडे बोलतच नव्हता. प्रत्येकाच्या मनात एक काहूर माजलं होतं. घरातली शांतताही कमालीची स्फ़ोटक बनली होती.

पुढच्या आठवड्यात रविवारी सुनील अन सुशांतची भेट होणार असं ठरलं. वैदेही अन श्याम त्याला हॉटेलमधे सोडून देणार होते. सुनील तिथेच येणार होता. तासा दीड तासानं ते सुशांतला परत न्यायला येणार होते.

वैदेहीला सारखं रडू येत होतं. मधूनच ती श्यामला बिलगून रडतही असे.

'तू रडू शकतेस वैदेही. मी पुरुष आहे ग. मला रडताही येत नाही. वर्षानुवर्षं मेहनत करून एखादी सुरेख मूर्ती बनवावी अन कुणा दुसर्‍याच माणसानं ती चोरून न्यावी तसं वाटतंय मला...' तो एकदा खिन्नपणे म्हणाला होता.

पण तितक्याच धीरोदात्तपणे त्यानं वैदेहीला समजावलं होतं.

'वैदेही, तुला सुनीलबद्दल कितीही तिरस्कार वाटत असला, तरी त्याचं बीज सुशांतच्या मनात रोवू नकोस. शेवटी तो त्याचा मुलगा आहे. अन सुशांतनं आयुष्यातले सारे निर्णय स्वतः घ्यावे हे मत आहे माझं. त्याच्यावर कुठलीही गोष्ट लादल्या जायला नको...'

'श्याम, तुला भीती नाही वाटत का रे? तो सुनीलच्या जास्त जवळ जाईल अन आपल्याला दुरावेल याची...'

'वाटते कधीकधी. एखाद्या दुबळ्या क्षणी..... मी ही माणूसच आहे ग. पण खरं सांगू वैदेही, माझं मन मला सांगतं अशा वेळी. मी फ़क्त त्याला जन्म दिला नाही, बाकी सारं केलंय. तो माझा मुलगा नाही हे कधीच वाटलं नाहीय मला. अगदी तो झाल्याझाल्या त्याला छातीशी धरलं ना, तेव्हापासून तो मला माझाच वाटत आलाय. माझ्या प्रेमात नक्कीच इतकी ताकद आहे ग. तो सुनीलच्या जवळ जाईल की नाही हे नाही मी सांगू शकणार. पण माझ्या दूर जाणार नाही हे नक्की....'

त्याच्या या बोलण्याने वैदेहीला तेवढ्यापुरतं बरं वाटत असे. पण मनातून मात्र ती अस्वस्थच होती.

रविवार उजाडला. सकाळी अकराची वेळ ठरली होती. सुशांत न बोलताच तयार झाला.

ठरल्याप्रमाणे तिघं निघाले. हॉटेलच्या आवारात श्यामनं गाडी थांबवली. बाहेरच्या एका टेबलावर उन्हाच्या छत्रीखाली सुनील बसला होता.

मागे वळूनही न बघता सुशांत निघाला.

'सुशू, तासाभरानं येतो आम्ही घ्यायला तुला...'
श्यामनं त्याला आवाज दिला.

'नको. माझं झालं की मी फ़ोन करीन. मग या तुम्ही..'

'ओ. के. सेल फ़ोन घेतलायस ना?'

नुसतीच मान हलवून सुशांत चालू लागला.


वैदेही नि श्याम घरी आले. टी. व्ही चं कुठलंतरी चॅनेल लावून, दोघं बसून राहिले. त्यांचं लक्ष अर्थातच फ़क्त घड्याळाकडे होतं.


अपूर्ण.


Runi
Friday, June 01, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ इतके मस्त ओघवते लिहीत आहेस ना की तुम्हारा जवाब नही...

Sneha21
Friday, June 01, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mast aahe katha.........pls lawkar purna kara

Manjud
Friday, June 01, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलते है break के बाद....... supermom तुझ्या कथेचा शेवट नेहमी गोड असतो तसाच ह्या कथेचा पण असुदे.

Sakhi_d
Saturday, June 02, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>त्यांचं लक्ष अर्थातच फ़क्त घड्याळाकडे होतं.
>

आणि आमचे लक्ष पुढ्च्या पोस्टकडे... :-)

Sakhi_d
Wednesday, June 13, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमाॅ कधी टाकणार पुढची पोस्ट

Sneha21
Wednesday, June 13, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन किति वाट पहावि ति....................supermom?

Supermom
Wednesday, June 13, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संथ पावलं टाकत सुशांत सुनील बसला होता त्या टेबलाकडे गेला. त्याला बघताच सुनील उठून उभा राहिला.

'ये बस सुशांत. काय घेणार तू? ...'

बाबा कधीच हा प्रश्न विचारत नाहीत. सुशांतच्या मनानं नकळत तुलना केली. आपण सगळे हॉटेलमधे गेलो की ते आपला आवडता ज्यूस अन काहीतरी चमचमीत स्टार्टर्स मागवतात. अन मग,

'काय सुशू, ती कोण पोरगी होती काल सॉकर फ़ील्डवर?...' असं काहीसं मिष्कील बोलून आधी हसवतात आईला नि आपल्याला.
पण पुढच्याच क्षणी तो विचार त्यानं एखाद्या जळमटासारखा झटकून टाकला.

'यांना अजून आपली काहीच तर माहिती नाहीय. मग कसं बरं कळणार त्यांना?...'

'अं, नको मला काहीच. नुसत्या गप्पाच मारू या....'

'अरे असं कसं? थांब मी कॉफ़ी मागवतो. मला या वेळी कॉफ़ीशिवाय होत नाही....'

सुशांतला खरं म्हणजे कॉफ़ी अजिबात आवडत नसे. पण आयुष्यात बर्‍याच नावडत्या गोष्टी असतात. हं...

एक सुस्कारा सोडून तो सावरून बसला. कॉफ़ी येईपर्यंत सुनील स्वत बद्दल बरंच काही बोलत होता. सवयी, आवडीनिवडी.... सुशांतला जरासा कंटाळाच यायला लागला मग.

'पण हे सुद्धा माहीत हवंच की आपल्याला. आता यापुढे हे 'बाबा' देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहेत....'

कॉफ़ी आली, तरी सुनील बोलतच होता. सुशांत हळूहळू कॉफ़ीचे घुटके घेत त्याचं बोलणं ऐकत होता. पण त्याचं लक्ष त्या बोलण्याकडे फ़ारसं नव्हतंच. तोंडातल्या कडवट कॉफ़ीच्या चवीसारखाच,मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी धाडकन विचारून मोकळा झालाच तो...

'आज, इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही? याआधी कधीच यावसं नाही वाटलं तुम्हाला?..'

सुशांतच्या स्वरातल्या धारेनं सुनील एक क्षणभरच चपापला. पण दुसर्‍याच क्षणी त्याच्या घार्‍या डोळ्यात काहीशी गुर्मीची, काहीशी रागाची छटा उमटली.

'ते खरंच इतकं महत्वाचं आहे का सुशांत? मी आलो, आपली भेट झाली,हे महत्वाचं नाही का?

'महत्वाचं कसं नाही? या प्रश्नांची उत्तरं माझ्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत. इतकी वर्षं तुम्हाला आपल्याला कोणी मुलगा आहे याची आठवणही झाली नाही. अन अचानक एखाद्या वादळासारखे तुम्ही माझ्या आयुष्यात येता काय... हे सारं इतकं सहज वाटतंय तुम्हाला?..'

'सुशांत, मी तुझा राग समजू शकतोय. पण तिला..जेनीला तुमच्याशी कुठलेही संबंध ठेवलेले चालणार नव्हते. तिनं तसं वचनच घेतलं होतं माझ्याकडून....'

'वचन? हं...'

सुशांतला आता संताप आवरेना. आईशी केलेलं लग्न, तिच्याबरोबर काढलेले सहा महिने इतक्या सहज विसरला हा माणूस.. अन बाकी सारी वचनं पाळणं जमलं याला..'

एक प्रकारचा सुन्नपणा आला होता सुशांतच्या मनाला.' कशाला आलो आपण यांना भेटायला? काय गरज होती?...'

'अन मग आताच इतक्या वर्षांनी का आलात?..' कुतुहलानं रागावर विजय मिळवला होता.

'अं..म्हणजे काय आहे की... जेनीचा नि माझा घटस्फ़ोट झाला गेल्या दोन महिन्यांपूर्वी. मुलांचा ताबाही तिच्याकडे गेला.. तेव्हा खूप वाटायला लागलं या दोन महिन्यात की.......'

'की आपला अजून एक मुलगा आहे. आपल्या मनात आलं तसा आपण त्याला टाकून दिलाय. आता मनात येईल तेव्हा आपण त्याला जाऊन भेटू शकतो. आपल्या 'बाप' असण्याचा हक्क गाजवायला....'

भावनातिरेकानं सुशांतचा आवाज इतका चढला की त्याला धाप लागली. आजूबाजूचे लोक विचित्रपणानं आपल्याकडे बघताहेत ही जाणीव झाली तसा तो पुन्हा खाली बसला.

'आज, आयुष्याच्या मध्यावर, तुम्ही एकाकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण आली माझी. कुठे होतात तुम्ही इतकी वर्षं? मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा...माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी...मला मांडीवर बसवून घास भरवताना? तेव्हा माझे बाबा होते माझ्याजवळ. तुम्ही... तुमचा काहीही हक्क नाहीय माझ्यावर. पुन्हा कधीच नका येऊ माझ्याकडे. मी तुम्हाला वडील मानत नाही. मुळीच नाही...'

पालथ्या हाताने डोळ्यात दाटू पाहणारं पाणी पुसत सुशांत उठला.

बाहेर येऊन, तिरीमिरीतच त्यानं टॅक्सीचा नंबर डायल केला. बाबा इथवर येईपर्यंतचाही उशीर नको होता त्याला.

मघाशी किती निरभ्र होतं आकाश. नि आता ढग पुन्हा दाटायला लागले होते आभाळात.


घरी पोचताच, दारावरची बेल जोरजोरात वाजवायला सुरुवात केली त्याने.

'आईबाबा आहेत की बाहेर गेलेत?....' कमालीचा अस्वस्थ झाला तो या विचारानं.

दार उघडणार्‍या वैदेहीला हातानं बाजूला करूनच तो अधीरतेने आत शिरला.

'बाबा कुठे आहेत ग?...'

तिच्या उत्तराचीही वाट न बघता तो धाड धाड जिना चढून वर गेला.

खोलीच्या खिडकीशी श्याम उभा होता. त्याचे रुंद खांदे केवढेतरी झुकलेले वाटले सुशांतला.

'बाबा..'

अन पुढे काही बोलताच येईना त्याला. आवेगानं तो श्यामच्या मिठीत शिरला.

'बाबा.. मी फ़क्त तुमचाच मुलगा आहे. ..फ़क्त तुमचाच. आय डोंट नो एनिबडी एल्स....'

मागून आलेली वैदेही ओल्या डोळ्यांनी हे सारं बघत होती. त्याचं हे कोसळणं सुद्धा फ़ार फ़ार सुखावून गेलं तिला.

हलक्या पावलांनी ती जिना उतरायला लागली. मध्यावर पोचत नाही तोच श्यामचा आवाज आला,

'वैदेही, भजे राहिलेयत हं. तू सुरुवात कर, आम्ही दोघं आलोच तुझ्या मदतीला...'




समाप्त.


Zelam
Thursday, June 14, 2007 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, छान, आवडली नेहमीसारखीच.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators