Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 13, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » स्टॉपवॉच » Archive through June 13, 2007 « Previous Next »

Swaatee_ambole
Wednesday, June 13, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

“हॅलो!”
सुमीत अक्षरशः ड्रायव्हरच्या सीटमधे बसल्याजागी उडाला. नशीब, कार ट्रॅफिकमधे अडकून थांबलेली होती. आत्ता फुल स्पीड मधे असतो तर.. दचकता दचकता आपल्याला याचं हायसं कसं वाटू शकतं याची दचकता दचकताच त्याला गंमतही वाटून गेली.
शेजारच्या सीटवर बसलेल्या त्या माणसाने हस्तांदोलनासाठी हातही पुढे केला होता. अरे ! हा आला कुठून? आपल्याला कळलं कसं नाही? म्हणजे कार इथेच बराच वेळ अडकली होती हे खरं, आपण कसल्याश्या विचारात गढलो होतो हे ही खरं, पण म्हणून दार उघडून शेजारी माणूस येऊन बसलेला कळू नये आपल्याला!!!
काहीतरी बोलायला हवंय.. काय बरं? हां.. “अहो, कोण तुम्ही? काय पाहिजे? एकदम कारमधे काय येता?” सुमीतच्या तोंडून कसेबसे इतके प्रश्न बाहेर पडले. छे छे, आपल्या आवाजात आत्ता अजून थोडी जरब यायला हवी होती. निदान संताप. हे म्हणजे जवळपास त्या उपटसुंभाची प्रेमाने चौकशीच केली की आपण!
“मी.. तुमचा मृत्यू.”
“आँ??? काय???”
“मृत्यू.. Death.. यम.. काहीही म्हणा..“
“आ.. अहो काय आचरटपणा चालवलाय हा? उतरा बघू खाली आधी!!” (आचरटपणा? आचरटपणा?? एक चांगली शिवी सुचू नये आत्ता??)
“हो हो.. मी जातोच आहे. मलाही घाई आहे. पण उद्या परत येईन मी. तुम्हाला न्यायला.”
“काय!!”
“हां.. उद्या सकाळी दहा वाजता. तुम्हाला न्यायला येईन.”
“ओ.. कोण भेटलं नाही का सकाळपासून?” (हां! आता कसं!!)
“भेटलं ना. तुमच्या आधी दोन इंटिमेशन्स आणि ३ कलेक्शन्स करून आलो.”
“इंटिमेशन??”
“हो.. हेच.. तुम्हाला दिलं तसं.”
“ओ, काय येडे बिडे काय? पोलिस बोलावू का निघता आता?”
यावर तो माणूस कमालीच्या समजूतदारपणे मंद हसला. “नाही, तुमचा विश्वास बसणं कठीण आहे. हे असंच होतं सहसा. पण ठीक आहे, माझं काम मी केलं. उद्या भेटू. सकाळी दहा वाजता. तोपर्यंत काही प्रश्न, शंका, अडचण असली तर नुसती आठवण काढा. मी हजर होईन.”
आणि इतकं बोलून क्षणार्धात तो गायबही झाला.



क्रमशः


Swaatee_ambole
Wednesday, June 13, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्या कारच्या हॉर्नच्या आवाजाने सुमीत भानावर आला. पुढचा ट्रॅफिक हटला होता. अचानक त्याला गळून गेल्यासारखं वाटलं. पण मागचा माणूस चिडून मारायला यायच्या आत कार निदान बाजूला घ्यायला हवी होती. सुमीत रस्त्याच्या कडेला वळायला लागला. तोच शेजारून एक व्हॅन कर्कश्श हॉर्न मारत पुढे गेली. बाप रे ! दिसलीच नाही की ती येताना! मेलोच असतो आत्ता! नाही, आत्ता कसे? उद्या, नाही का?
उद्या? उद्या काय? म्हणजे आपण चक्क विश्वास ठेवतोय की काय त्यावर!

कार एका बाजूला थांबवून सुमीत खाली उतरला. काहीतरी करायला हवं होतं. नीट सुसंगत विचार करायला हवा होता. श्या! काहीतरी व्यसन तरी असायला हवं होतं आपल्याला. आत्ता एखादी सिगरेट ओढली असती.. एखादं पान खाल्लं असतं.. जरा ताळ्यावर आलो असतो. डोक्यावर ऊन मी म्हणत होतं. त्याला एकदम कसनुसं वाटलं. पुन्हा कारमधे बसून त्याने बिस्लरीची अख्खी बाटली घटाघटा प्यायली. आत अजून छान थंड होतं. आता त्याला जरा हुशारी वाटायला लागली.

श्या!! काय एकेक भास! हो.. म्हणजे भासच असणार नक्की. असं कुठे असतं होय! इंटिमेशन म्हणे!! अशी इंटिमेशन्स मिळत असती तर काय बघायलाच नको! पण कधीकधी वाटतं बाकी खरंच. आप्पाआजोबा नाही का, मरण्याआधी एक दिवस काकाआजोबांवर घातलेला दावा काढायला वकीलाला सांगून आले होते. आणि काकाआजोबांकडे जाऊन हात जोडून ‘झालं गेलं विसर आणि माझ्या मागे सुमाला आपली मुलगी समज’ म्हणून रडले होते! आणि त्या शेजारच्या आपटेकाकू..

“क्यूँ आजकल नींद कम ख्वाब ज्यादा हैं.. लगता खुदाका कोई नेक इरादा है..” त्याचा मोबाईल गायला लागला.
(नेक इरादा? हं!!)

“हॅलो सुमीत हिअर”
“अबे है किधर तू? वो कस्टमर मेरे सरपे आके बैठा है यार!” तिकडे जसमीतचा जीव चालला होता.
“अरे.. ट्रॅफिकमें फँस गया था.. तू एक काम कर.. तू मिल ले उससे. मेरी तबीयत कुछ ठीक नहीं है. सोच रहा हूँ यहींसे घर चला जाता हूँ.”
“अरे, तो बता दिया होता! मैंने कबसे बिठाके रख्खा है उसे यार! वैसे हुआ क्या तुझे?”
“नहीं.. कुछ खास नहीं.. लगता है बुखार चढनेवाला है”
“अच्छा, ठीक है. आराम कर ले. शाम को फोन करता हूँ.”
“थँक्स यार”
“अरे कोई नहीं! और मुझे पता है तुझे आज ही बुखार क्यों चढा.”
“क्या?”
“हाँ.. तेरी व्हेज कोल्हापुरी जो नहीं है आज”
“क्या???”
“अब बन मत. एक बात बता, कहीं तुम दोनोंने ये छुट्टी प्लॅन तो नहीं की थी?”
“दिमाग का इलाज करा ले जस्सी!”
त्याने जसमीतच्या खदाखदा हसण्याकडे दुर्लक्ष करत फोन कट केला. आणि मग चक्क बंदच केला. आत्ता कोणाशीच बोलायची इच्छा नव्हती त्याची.


कल्पना.. त्यांच्या ऑफिसमधली नवीन अकाउंटंट. स्मार्ट. सुमीतला बघताक्षणीच आवडली होती. पण कमालीची आखडू! लिफ्टमधे / कॉरीडॉरमधे दिसलं तर साधं ओळखीचं स्माईल द्यायला सहा महिने घेतले होते तिने. गेल्या न्यू इयर्स पार्टीला सुमीतने हे तिच्या लक्षात आणून दिलं तेव्हा अशी काही खळखळून हसली होती, की बस!! त्यानंतर गेले बरेच दिवस तिला ‘कॉफी घेऊ या का?’ हे विचारायचा सुमीत प्लॅन करत होता. स्थळ.. संवाद.. एकूण कथानक त्यातल्या वळणांसहित लिहून तयार होतं.. फक्त प्रयोगाची वेळ ठरवायची खोटी होती!
मग हे राहूनच जाणार तर! मी असाच.. कुँवाराच मरणार की काय?
काहीतरी करायला हवं.. पण चोवीस तासात काय करणार?
आता मात्र ते चोवीस तासांचं खरं समजायला लागल्याबद्दल त्याला स्वतःचाच राग यायला लागला.


घरी जाऊ या.. आईशी बो….
छे! हे.. हे कसं बोलणार? काय सांगायचं तिला? मी उद्या मरणार आहे? मला यम भेटला?
पाच वर्षांपूर्वींची आई असती तर हे ऐकून “हात मेल्या! काय काय रे चालू असतं तुझ्या डोक्यात एकेक!!” म्हणून किती सहज उडवून लावलं असतंन.. आपल्याही डोक्यातून.
पण ताईचं ते तसं झाल्यापासून..
आता आईशी काही म्हणजे काही चांगलंसुद्धा बोलायची भीतीच वाटते. कशाने गप्प होईल, कशाने रडायला लागेल.. काही समजतच नाही.
बाबांची फिरतीची नोकरी असल्यामुळे त्यांच्या असण्यापेक्षा नसण्याचीच सवय होती आपल्याला सगळ्यांनाच. आणि आता तर ते खरंच असून नसल्यासारखेच झालेत. खरंच, आईचं काय होईल आपण खरंच मेलो आत्ता तर?
आता मात्र सुमीतच्या पोटात खड्डा पडला. सगळी भीती एकदम हाडीमांशी जाणवली.
किती वाजले? त्याने चमकून घड्याळ पाहिलं. अकरा. अकरा???? एक तास गेला इतक्यात??
एक अख्खा तास आपण काहीही न करता वाया घालवला? ते काही नाही, फक्त तेवीस तास आहेत हातात.. कदाचित अखेरचे.. जितकं जमेल तितकं जगून घ्यायचंय या तेवीस तासांत! खरंच, ‘मरण्याआधी एकदा करायचंच’ असं आपल्या डोक्यात कधी काही होतं का? पण त्याचं डोकं जणू बंद पडलं होतं. काही केल्या त्याला असं काही आठवेना.




क्रमशः


Mankya
Wednesday, June 13, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती .. कथा पण लिहितेस का ! मान गये !
सुरुवात तर भलतीच interesting आहे की, भरभर येऊदेत गं !

माणिक !


Sakhi_d
Wednesday, June 13, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती मस्त चलु आहे, येऊ दे भरभर

Vaibhav_joshi
Wednesday, June 13, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा ? तू पण ?

पण मस्त कन्सेप्ट आहे . शेवट कसा होईल याची उत्सुकता लागली आहे . लवकर लिही . The watch is ticking
:-)


Jaijuee
Wednesday, June 13, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातीबाई,

अहो चौवीस तासांची वासरी देणार आहात का? लवकर लिहा जरा! रोज थोडासा "एपिसोड" लिहु नका!

its interesting! त्यामुळे उत्कंठा ताणू नका!

Zelam
Wednesday, June 13, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान चाललीय कथा. पुढच्या भागांची वाट बघतेय.

Ashwini
Wednesday, June 13, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, कथा? सुरूवात मस्त. भरभर लिही. :-)

Swaatee_ambole
Wednesday, June 13, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून तिशी गाठायची आहे, कितीतरी गोष्टी आहेत ज्या आता आपल्याला करताच येणार नाहीयेत. तसं पाहिलं तर आत्तापर्यंत म्हणण्यासारखं केलंच काय आहे? काहीही नाही. काहीच नाही. हा एक तास वाया गेला म्हणून चडफडलो, पण तसा विचार केला तर गेली पंचवीस वर्षं वायाच गेलीत की!
पण तेव्हा आपण मरणार हे कुठे माहीत… नाही, म्हणजे तसं माहीत असतं.. कधीतरी मरणार हे.. पण असे इतक्या लवकर मरू हे काय स्वप्न पडलं होतं?

मग.. मग जीजाजींना पण असंच इंटिमेशन मिळालं असेल? आणि चिकूला? तो कुठे काही कळण्याच्या वयाचा होता? तीन.. साडेतीन वर्षांचाच होता की. सकाळी बापलेक रोजच्यासारखे आनंदात निघतात काय.. रस्त्यात ट्रक स्कूटरला उडवतो काय.. आणि काही मिनिटांत ताईच्या संसाराच्या चिंधड्या रस्ताभर होतात काय..!!

ती रडलीच नव्हती. आपण रडलो. बाबांसारखे बाबा रडले. आईच्या डोळ्यांना तर अक्षरशः संततधार लागली होती. पण ताई.. बातमी ऐकल्यावर ती जणू बंद पडली. काळ जणू तिच्यासाठी तिथेच, त्या क्षणीच थांबला. निदान पोस्टमॉर्टम होऊन बॉडीज ताब्यात मिळाल्या त्या पाहून तरी रडेल अशी आशा वाटली सगळ्यांना. पण ते काही मग पोचलंच नाही तिच्यापर्यंत. ती संपलीच होती.

तिला कसली शुद्धच राहिली नाही त्यानंतर. मुकं बहिरं तान्हं मूल असावं तसं करावं लागतं आता तिचं. आई स्वतः हार्ट पेशंट. तरी तिने पूर्ण दोन वर्षं तिचा तसा सांभाळ केला. सायकिऍट्रिस्ट्सचे उंबरठे झिजवले. खरंतर मुळात आई देवभोळी नव्हे, पण त्या काळात कोणी काही सांगेल ती सगळी व्रतंवैकल्यं केली. शेवटी जेव्हा तिलाच हार्ट अटॅक आला, तेव्हा मात्र ताईला इन्स्टिट्यूशनमधे ठेवायचा निर्णय घ्यावा लागला.

आपण या सगळ्यात कुठे होतो? अपघातानंतरचे काही दिवस सोडले, तर आपण खुशाल पान उलटून पुढे जगायला सुरुवात केलीच होती की. मग धीर देणं, कसली जबाबदारी घेणं दूरच, उलट घरातलं वातावरण ‘बोअरिंग’ होतं म्हणून आधी अभ्यासाचं आणि नंतर जॉब लागल्यावर कामाचं निमित्त सांगून घराबाहेरच जास्तीत जास्त वेळ काढायला लागलो. घरी असताना ‘नाही’ म्हणताच येत नाही म्हणून काय चार कामं करायचो ते सुद्धा आईला अप्रूप वाटायचं.

ताईला इन्स्टिट्यूशनमधे ठेवल्यापासून दर रविवारी आईबाबा भेटायला जातात तिला. आई न चुकता तिच्या आवडीचं म्हणा, सणावाराचं म्हणा, खाण्यापिण्याचं काय काय उरापोटी करून नेते. कधी नवीन कपडे, कधी चपला, कधी काही, कधी काही. तिच्याशी बोलत बसते, तिला आठवड्याभरातल्या लहानसहानसुद्धा हकीकती सांगत बसते. आणि तिला या कशातलंच काहीच कळत नाही. माणूसच ओळखत नाही तर. आपण पहिल्या दोन तीन वेळाच कसेबसे गेलो असू. पण हे बघून पोटात ढवळून यायचं. आधी ते तिथलं वातावरण, आणि त्यात हा आईचा वेडाच्याच सदरात मोडू शकेल असा आशावाद. त्यानंतर आपण त्या दोघांबरोबर जाण्याचं टाळायला लागलो. मधल्या वारी कधीतरी एकटंच जायचं. आणि तिथे जाऊन आईने दिलेल्या वस्तू नर्सच्या ताब्यात देऊन ताईसमोर चक्क वाचत नाहीतर डिस्कमॅनवर गाणी ऐकत बसायचं. जीजाजींनीच दिलेल्या डिस्कमॅनवर. भेटायला जातो याचं आईला समाधान, बाकी काही नाही. ‘नाही जात’ असं म्हणायचीही कधी हिम्मत झाली नाही.
---


‘ओ सायेब, हितं कुटं गाडी लावलीय?’
सुमीत एकदम भानावर आला. ‘सॉरी सॉरी.. निघतच होतो..’ सुमीतचा पांढराफटक चेहरा पाहून हवालदारही जरा निवळला असावा. ‘निगा निगा लवकर. आमचे सायेब आले तर म्हागात पडंल तुमाला.’
सुमीतने कार स्टार्ट केली. आणि नकळत घड्याळ पाहिलं. ए…क…???

जेवून घेऊ. आज मस्त जेवून घेऊ आपण.
क्या शौक फरमाएंगे? थाई? ओके.. चलो थाई रेस्टॉरंट चलते हैं..
त्याच्या कथानकात एकदा कल्पनाला या रेस्टॉरंटमधे जेवायला आणायचं होतं. तो मेनूकार्डवरची यादी वाचायला लागला. नेहेमीच्या डिश नकोत.. आज काहीतरी निराळं ट्राय करू. काय बरं? .. एक नाव म्हणता येईल तर शपथ! आणि माहिती सगळ्या डिशेसची सारखीच वाटते. मग आज ऐशच करू. त्याने वेटरला त्यातल्या सगळ्यात महागड्या डिशेसची ऑर्डर दिली. आज किंमतीचा विचार नाही करायचा.
मघाशी तो ट्रॅफिक हवालदार काय म्हणाला? सायेब आले तर महागात पडेल? आज ट्रॅफिक ऑफेन्सच काय, कोणाचा खून जरी केला तरी कसा काय महागात पडेल आपल्याला??

आपण काय खून करणार म्हणा! उंदीर मारायलासुद्धा घाबरतो आपण. खरंतर इतका क्षूद्र.. मरायच्याच लायकीचा प्राणी… मरायच्याच लायकीचा..
खरंतर, ताईच्या जगण्यालातरी काय अर्थ आहे आता? समजा.. समजा आपल्याजागी…
खरंतर बाबासुद्धा… नाहीतरी वय झालंय.. आज नाही उद्या… आणि असून नसल्यासारखेच तर…
आणि दुसऱ्याच क्षणी सुमीतला स्वतःची भयंकर लाज वाटली.
बाबा? बाबांचाच तर खरा आधार आहे आईला आत्ता. बोलायचा स्वभाव नसेल त्यांचा, पण तिचं मन जपतात. त्यांना काय तिच्या धडपडीतला फोलपणा कळत नसेल? पण तरी ती म्हणेल तिथे नेतात, हवं ते आणून देतात. किती सहज आपण असून नसल्यासारखे म्हटलं! असून नसल्यासारखे ते नाहीयेत, आपण आहोत. बाकी तर जाऊच दे. अगदी फिनान्शिअलीसुद्धा अजून आपण असं काय कमावतो? ताईची फी, आईची औषधं, घरखर्च, हे सगळं आपल्या पगारात होणार आहे का? त्यांच्या इन्व्हेस्ट्मेंट्स आहेत म्हणून त्यांच्या रिटायरमेंटनंतरसुद्धा हे सगळं सुरळीत चाललंय.

पुढ्यात अन्न आलं, पण आता त्याची अन्नावरची वासना उडाली होती. खरंच आपण इतके.. इतके इनसिग्निफिकन्ट आहोत? आपण नसलो तरी कशातच काही फारसा फरक पडणार नाही? पण आपण चालतो-बोलतो तरी आहोत ना? अगदीच ताईसारखं..

आता राहून राहून तो विचार त्याला छळायला लागला. भरल्या ताटावरून उपाशी उठून बिल देऊन तो बाहेर पडला. अजूनही घरी जायची कल्पना त्याला झेपत नव्हती. अगदी नाही सांगितलं जरी आईबाबांना, तरी त्यांना पाहिल्यावर आपण नक्की कोसळून पडू अशी भीती वाटत होती. त्याने गाडी जवळच्या बागेकडे घेतली. आत्ता दुपारी बागेत चिटपाखरू नव्हतं. एक झाडाच्या थंड सावलीतलं बाक बघून त्याने त्यावर अंग टाकलं.

तो.. तो म्हणाला होता.. काही प्रश्न असेल तर बोलवा म्हणून. बोलवावं का? हे विचारावं का? की माझ्याऐवजी ताईला नाही का नेता येणार? पण आपण बोलावलं, आणि तो खरंच आला तर? मग तो भास नव्हता यावर शिक्कामोर्तबच की! शिवाय आला तरी तो काही आपल्याजागी दुसऱ्या कोणाला न्यायला तयार व्हायचा नाही हे आपल्यालाही लॉजिकली कळतंच आहे की! पण नाही आला तर निदान एकदाचं हे टेन्शन संपेल तरी. लावूनच टाकू काय तो सोक्षमोक्ष एकदा.
त्याने डोळे मिटले. आता आठवण करायची म्हणजे नक्की काय करायचं? कसा बरं दिसला होता? काय घातलं होतं त्याने? आवाज कसा होता? नक्की मराठीतच बोलला आपल्याशी…

“हॅलो..”
सुमीतने खाडकन डोळे उघडले. खरंच बाकावर त्याच्या शेजारी तोच सकाळचाच माणूस बसला होता. किती साधा! किती हसतमुख!! याने खरंतर आयुर्विम्याची पॉलिसी वगैरे विकायची!!
“काही विचारायचं होतं?”
हा.. हा खरंच आला? म्हणजे…
सुमीतला एकदम भोवळ आली…

---

सुमीत भानावर आला तोवर उन्हं कलली होती. बागेत शाळेतून परतणाऱ्या मुलांची कलकल सुरू झाली होती. आणि तो.. तो होताच शेजारी बसलेला. शांतपणे वाट बघत. सुमीत जरा सावरून बसला.
“बोला.. काय विचारायचं होतं?”
त्याला कुठून सुरुवात करावी हेच कळेना. त्यात घशाला कोरड पडलेली.
“अं.. कार मधे जाऊ.. कार मधे पाणी आहे..”
“चला”
थोडं पाणी प्यायल्यावर सुमीतला जरा हुशारी वाटली.
“माझी बहीण आहे.. ती..”
“हो.. मला माहीत आहे.”
“ओह..”
“तुमच्या फाईलमधे आहे ती सगळी माहिती.”
(फाईल??)
“तर मी असा विचार करत होतो की… नाहीतरी तिला..”
“नाही. तशी सोय नाही.”
“अहो पण.. माझ्या आईला, माझ्या फॅमिलीला माझी गरज आहे हो..” सुमीतचा आवाज त्याच्या नकळत रडवेला झाला.
त्यावर तो माणूस फक्त मंद हसला.
त्याच्या त्या स्माईलचा सुमीतला राग यायला लागला होता. त्याची कॉलर पकडून त्याच्या एक मुस्कटीत भडकवावी असा त्याला मोह व्हायला लागला.
“हसताय काय? मी मरणार आहे आणि तुम्ही हसताय? आत्ता लाईफ सुरू झालंय हो माझं!! अजून काहीसुद्धा केलेलं नाही आयुष्यात!! ती.. ती.. आधीच मेल्यातच जमा आहे.. मग का?”
“शांत व्हा.. शांत व्हा तुम्ही.. हे पहा, असं करता येत नाही. माझ्या हातात नाही ते.”
“पण का? तुमच्या नाही तर कोणाच्या हातात?? हा अन्याय आहे!!”
“खरं सांगू का? हे न्याय/अन्याय मला समजत नाही. मी म्हणजे नुसतं स्टॉपवॉच आहे म्हणा ना. तुमचा जन्म झाला, तेव्हापासून हा काऊंटडाऊन सुरू झाला होता. आता वेळ संपत आली..”
“मग तुम्ही मला हे सांगितलंत तरी का? तसंच न्यायचं होतंत. हे चोवीस तास तरी मी रोजच्यासारखे आनंदात घालवले असते!”
“असं म्हणता? जाताना असं नसतं वाटलं, की ‘अरे, आधी कल्पना असती तर निदान हे हे तरी केलं असतं मरायच्या आधी’?”
सुमीतला आता अगदीच काहीच सुचेना.
“मी.. मी काय करू!!”
“ते मी कसं सांगणार?”
“हं.. बरोबर आहे.. तुम्ही काहीच सांगू नका.. नुसत्या धमक्या द्या..!!”
“धमक्या?”
“तुम्ही जा. जा तुम्ही. मला काही शंका नाही आता.”
“ठीक आहे. भेटू उद्या.”

---

सुमीतने कार स्टार्ट केली. कधीतरी घरी जायलाच हवं होतं.
“सुमीत!!!! अरे, कुठे होतास इतका वेळ? आम्ही काळजीत पडलो की रे!! मोबाईल लागत नव्हता तुझा.”
“अगं हो.. बंद केला होता.. विसरूनच गेलो..”
“अरे, देव पावला बघ!! सावनीच्या डॉक्टरांचा फोन आला होता. ती आज बोलली, सुमीत!! नर्सला नावाने हाक मारून पाणी मागितलंन. आम्ही भेटायला गेलो मग तिला. सुमीत, सुमीत, तिने मला ओळखलंन!! ‘आई’ म्हणून हाक मारलीन रे!!!”
“काय सांगतेस काय?”
“हो ना!! जवळ बसली. बाकी फार काही बोलली नाही, काही आठवत नाहीये तिला बहुतेक अजून. पण तिने मला ओळखलं रे राजा!!”
“खरंच? डॉक्टरना भेटलात? काय म्हणाले?”
“ते म्हणतायत, बघू कशी प्रगती होते.. निदान एक स्टेप तर पुढे पडली. तिला आता ते अपघाताचं आठवेल तेव्हा जपावं लागेल.. आपण जपू की.”
“अं?”
“अरे, आपण असूच की सगळे तिच्या पाठीशी!”
“हो.. हो.. असूच की आपण.. आपण असणारच आहोत..”
“ही घे.. देवापुढे साखर ठेवली होती. का रे? दमलायस का? असा का चेहरा तुझा?”
“हो गं.. खूप दमलोय..”
“अरे.. या नादात लक्षच नाही बघ माझं. चल पानंच घेत्ये. जेवून घे, आणि झोपून जा. तुझी न्यूजची वेळ झाली का? तुला बाहेरच देऊ का ताट?”
“नाही, नको. आज इथे एकत्रच बसू सगळे.”
आणि मग कधी नव्हे ते सुमीतने आपण होऊन देवाला हात जोडले. कसं कोण जाणे, पण दिवसभरात प्रथमच त्याला आता शांत शांत वाटत होतं.
“आणि आई, उद्या मला जाम उठवू नकोस, बरं का? सकाळी जायचं नाहीये. दहा अकरा .. कितीही वाजू देत. मी आपण होऊन उठेन तेव्हा उठेन. नाही तर नाहीसुद्धा उठणार.”
“हात मेल्या! काहीतरीच बोलत असतोस एकेक!!!”


--- समाप्त ---


Manaswii
Wednesday, June 13, 2007 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

too good!!! काय वाटलं ते नक्कि सांगता येणार नाही,पण आत खूप हेलावल्यासारख वाटलं...
आपलेहि stopwatch चालु असते,हि भयानक जाणीव झाली.


Sahi
Wednesday, June 13, 2007 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन्दर कथा. मला फ़ोंट खुप आवडला.वाचायला सोपा.लगे रहो.

Vaibhav_joshi
Wednesday, June 13, 2007 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच ... very subtle . त्याचे २४ तासातले emotions मस्त protray केले आहेत . पुढे काहीही होवो , जे घडलंय , जसं घडलंय ते आवडलं

Disha013
Wednesday, June 13, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त कथा. too good ! खरच खुप छान उतरलयं त्याच्या भावना,चिंता आणि नन्तरची बोच सगळंअच.
शेवटच्या वाक्यातुन थोडेसे सुचित केलं जातयं, असं मला वाटलं.
खरच आपल्याला असं आधीच कळत नाही तेच किती बरं आहे.


Sashal
Wednesday, June 13, 2007 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच लिहिली आहे .. आवडली ..

Ameyadeshpande
Wednesday, June 13, 2007 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्वी, वैभव नी म्हणलंय ते सगळच वाटलं. रोजची धाव धाव करताना काही मिनिटं शांत out of measured time असा थोडातरी वेळ द्यावा रोज, निदान काय कशासाठी धावतोय ते पहाण्यासाठी.

अशीच नाही, पण मी लहान असताना शेखर कपूरची एक सिरीयल पाहीली होती ती आठवली. त्यात त्याला कुणीतरी देवदूत भेटतो, हातात एक बटण आणि एक पैशानी भरलेली बॅग घेऊन आणि सांगतो की तुला ही बॅग हवी असेल तर हे बटण दाब. हे बटण दाबलस की ह्या जगातला एक माणूस त्या क्षणी मरेल आणि पैसे तुझे. खूप दिवस शेखर कपूरचं ते मानवी मन विचारात गुंततं... आणि तुझ्या कथेत सुमीतच्या डोक्यात जसा एक स्वार्थी विचार येतो, त्याच स्वार्थीपणाला बळीपडून शेवटी तो ते बटण दाबतो. त्या नंतर तो देवदूत त्याच्या कडे परत येतो ते बटण मागायला आणि सांगतो की आता मला हे दुसर्‍या व्यक्ती कडे घेऊन जायचय तुझ्यासारख्याच एखाद्या. तेव्हा शेखर कपूर प्रचंड सुन्न होतो.... "पुढच्या माणसानी आता बटण दाबलं तर तो मरणारा माणूस मी ही असू शकेन" अशा त्याच्या प्रश्नावरती देवदूत होकारार्थी उत्तर देतो.

खूप वेगळी लिहिलियेस स्वातीताई. वेगळं वाटलं वाचून एकदम.


Asami
Wednesday, June 13, 2007 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास concept ...... .... .... जमलीये नीट

Chinnu
Wednesday, June 13, 2007 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातीताई, तुझ्या कविते एवढीच सुंदर कथा! वाचून शांत शांत वाटलं!

Saurabh
Wednesday, June 13, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोहीणी हट्टंगडी आणि श्रीराम लागु(?) चा चित्रपट(?) आठवला, ज्यात श्रीराम लागुला अशी सुचना मिळते. आणि तो स्वतः ऐवजी कायम कोणाचे ना कोणाचे नाव सुचवत असतो मृत्युला. शेवटी कंटाळून मृत्युलाच मारायचे ठरवतो(!) पण त्याच्या हातुन बायकोचा मृत्यु होतो आणि तिचं उर्वरीत आयुष्य त्याला मिळते! त्यात लागु एका सार्वजनीक घड्याळ्याच्या मोठ्या काट्यान्ना लोंबकाळुन काळ थांबवायचा प्रयत्न करतायत असा एक प्रसंग होता जो लक्षात राहिला आहे...
तर सांगायचा मुद्दा हा.. की ही कथा त्याला बरीच समांतर असल्याने पाहिजे तेवढा परिणाम झाला नाही. पण विषय नवा नसला तरी हाताळणी छान आहे.




Ashwini
Thursday, June 14, 2007 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे विषय तितकासा महत्वाचा नाही, किंबहुना पुढे काय होतं हा प्रश्नही गौण आहे. महत्वाचं आहे ते मृत्युची सूचना मिळाल्यावर त्याच्या मनात उमटणारी आंदोलने टिपण्याचा प्रयत्न. ती कासाविशी, हतबलता, परिस्थितीला शरण जाण्याची असाहाय्यता, सगळी उलघाल नीट व्यक्त होते आहे.
लेखनातील साधेपणा, सच्चेपणा ही या कथेची जमेची बाजू म्हणता येईल. कुठलाही अभिनिवेष न बाळगता केलेले down to earth लेखन हे या कथेचे यश आहे.


Zelam
Thursday, June 14, 2007 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलंय. आवडलं.
मृत्यूची सूचना मिळाल्यावरच जीवनाची, आपल्या माणसांची खरी किंमत कळते हे छान व्यक्त झालंय.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators