|
Ajjuka
| |
| Tuesday, May 29, 2007 - 9:52 am: |
|
|
शीर्षक नंतर... "कधी येणार तुझा मित्र?" प्रश्न आला आणि माझी तंद्री मोडली. पावसाळा सुरू व्हायच्या आधीची वेळ. उन्हाची तलखी, मळभ, मधूनच सुटणारा वारा.. सगळं एकाकी... एकटं वाटायला लावणारं. अश्यात मी विद्यापीठात दुपारच्या चारच्या वेळेला बसस्टॉपवर उभी होते आणि येणारी प्रत्येक बस सोडत होते. प्रश्नकर्त्या आवाजाचा मालक बहुतेक विद्यार्थी असावा डॉक्टरेटचा. त्याशिवाय का मे महिन्याच्या शेवटी शेवटी विद्यापीठात आलाय हा. "मित्र?" माझा प्रश्न "येणारी प्रत्येक बस सोडत, उन्हाची इथे उभी दिसलीस गेला तास दीड तास.. तेव्हा मित्रच असणार!" मी हो नाहीच्या मधलंच हसले. "सांगू नकोस. हरकत नाही. पण मला बोलावसं वाटलं म्हणून आलो." सांगावं का याला.. मी इथे एका विभागात शिकवते. visiting faculty आहे आणि पेपर तपासायला आले होते. होतं असं. अजूनतरी कधी कधी मी शिक्षक न वाटता विद्यार्थी वाटते. बरंय ना.. कशाला फोडा फुगा! "मी समोरच्या department चा विद्यार्थी. डॉक्टरेट करतोय." (मला वाटलंच होतं). "कंटाळा आलाय सतत काम करायचा. आपल्या हळूहळू या विद्यापीठाच्या बाहेरचं जगच माहित नाहीसं होणार डॉक्टरेट पूर्ण होईतो अशी भिती वाटायला लागलीये. गैरसमज करून घेऊ नकोस पण तू माझ्या रोजच्या माहौल च्या बाहेरची वाटलीस त्यामुळे बोलावसं वाटलं.." (माहौलच्या बाहेरचीच तर होते मी. आमचं नाटकाचं डीपार्टमेंट. विद्यापीठाच्या शैक्षणिक माहौलच्या विरूद्धच तर होतं.) "काही हरकत नाही. मी नाही गैरसमज करून घेणार.." "याच स्टॉप वर मी तासनतास घालवतो कधी कधी, आज तू तेच करतीयेस त्यामुळेही बोलावसं वाटलं. या स्टॉप वर एक बरय की झाडाची सावली आहे. आपण सोडून सगळं जग उन्हात असतं. कधीतरी तेही बरं वाटतंच की." (याचा विषय काय आहे नक्की डॉक्टरेटचा? मानसशास्त्र की काय?) सगळ्या एकाकी शांततेवर ओरखाडे काढत एक बस आली. थांबली. आता आम्ही दोघंही चढलो नाही. कंडक्टरने विचित्रपणे पाह्यलं आणि मग बस निघून गेली. क्रमशः..
|
Rajya
| |
| Tuesday, May 29, 2007 - 10:19 am: |
|
|
अज्जुका, चालु द्या, वाचतोय. पात्र परीचयच चालु आहे अजुन. अज्जुकाची कथा म्हणजे वाचायलाच हवी अशी असते. आणि ते कथेचं नाव "नंतर" आहे की नाव नंतर सांगतो असा त्याचा अर्थ आहे?
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 29, 2007 - 1:45 pm: |
|
|
|अज्जुकाची कथा म्हणजे वाचायलाच हवी अशी असते. | बापरे मला टेन्शन आलं... |आणि ते कथेचं नाव "नंतर" आहे की नाव नंतर सांगतो असा त्याचा अर्थ आहे?| कथेचं नाव अजून ठरलं नाहीये म्हणून नंतर.
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 29, 2007 - 4:54 pm: |
|
|
"ते जग उन्हातचं काय म्हणत होतास तू?" "म्हणजे कसं की आपण उन्हात असतो तेव्हा जगावर सावली असते म्हणजे निदान आपल्याला तरी ते तसं वाटतं. राग येतो खूप. चरफडायला होतं. असं का असं का?... मग अश्या जागा शोधायच्या जिथे आपण सावलीत आणि सगळी दुनिया उन्हात असेल. sadist म्हण हवं तर. पण ते असतेच ना प्रत्येकाच्या आतमधे!" (काहीतरी घोळ झालाय का? किंवा मला भास होतायत का? उन्हामुळे, पोरांच्या पेपर्समुळे की आणिक कशाकशाने माझं डोकं हल्लक नाही ना झालं? मग हा मला जे वाटतं तेच का बोलतोय?) "हं.. खरंय तुझं. बरं वाटतं इथे बसून! पण नुसतंच तेवढंच नाहीये यात. ह्या.. बरोब्बर ह्याच जागी बसल्यावर येणारी बस, ती समोर उभी रहाते आणि मग जाणारी बस असा सीन विलक्षण जीवघेणा दिसतो" (एकदा शूट करून ठेवणारे मी हे!) "त्यासाठी थांबलीयेस तू इथे?" मी हो म्हणाले आणि तो माझ्या कडे आधी अविश्वासाने नी मग ओलावून बघत राह्यला. समजल्यासारखं मीही बघत राह्यले. आता काही बोलायला जाणार इतक्यात मला हाक ऐकू आल्यासारखं वाटलं "कावेरी मॅम!" दोघांनीही आवाजाच्या दिशेने पाह्यलं. वीरेंद्र, माझा विद्यार्थी. हुशार पण आगाऊ. शिक्षक असूनही बाकीचे सगळे मला नावानेच हाक मारतात पण हा हट्टाने मॅम्’ म्हणणार तेही काहीश्या कुत्सित धारेसकट. "तुम्ही आज येणार होतात हे आधी माहित नव्हतं. कधी करताय मॅम भाषांतर पूर्ण? दोन महिन्यात प्रयोग करायचाय मला. थांबा १० मिनिटं. होस्टेल ला जाऊन घेऊन येतो केलेलं काम." आत्ता नको वीरेंद्र… असे म्हणेपर्यंत त्याच्या बाइकचा कर्कश्श आवाज करत वीरेंद्र गेला सुद्धा. माझ्या नवीन मित्राच्या चेहर्यावर असंख्य प्रश्न होते. थोडा गडबडलेला भावही.. "मॅम? भाषांतर? तू कोण आहेस?" "नाट्य विभागात शिकवते मी. विद्यार्थी आहे हा माझा. त्याला एक नाटकाचे भाषांतर करून द्यायचंय." "ओह! सॉरी! मला वाटलं तू.. तुम्ही पण विद्यार्थिनीच आहात.." "सॉरी काय त्यात. I am flattered! . आणि तू च म्हण, तुम्ही नको." मला हसू आलं (चेहर्यावरच्या हसूच्या रेषा जड झाल्यात.. खूप दिवसांत वापर नाही त्यांचा..) थोडा काळ शांततेत गेला. त्याचा गांगरलेपणा संपला आणि त्याने विचारले, "उन्हात आहेस? अगदी तळपत्या उन्हात?" "हो. पण संपेल ते लवकरंच" सांगावा का याला माझ्या उन्हाचा पत्ता? बोलून टाकावं याच्याजवळ मनातलं? परत कधी भेटणारे हा आयुष्यात. काय म्हणेल फार फार तर्… एका वेड्या बाईशी गाठ पडली. म्हणूदेत काय फरक पडतो? "उद्या माझ्या घटस्फोटावर शेवटचे शिक्कामोर्तब होईल. मग आम्ही कायमचे वेगळे असू.." एक क्षण शांततेत गेला… "ओह! I am sorry! " तो पुटपुटाला.. " don’t be! ते व्हायचच होतं." तेवढ्यात ब्रेक्स चा आवाज करत वीरेंद्र परत हजर झाला…..
|
Mankya
| |
| Wednesday, May 30, 2007 - 1:30 am: |
|
|
अज्जुका .. " चेहर्यावरच्या हसूच्या रेषा जड झाल्यात.. खूप दिवसांत वापर नाही त्यांचा. " सही है ! मस्त रंगात आलीये कथा ! लगे रहो ! माणिक !
|
Sakhi_d
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:26 am: |
|
|
>>चेहर्यावरच्या हसूच्या रेषा जड झाल्यात.. खूप दिवसांत वापर नाही त्यांचा..>> खरय त्याचा वापर नाही केल्या की त्या जडच होतात... छान लिहिते आहेस...
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:47 am: |
|
|
"कावेरी मॅम! हे नाटकाचं मूळ स्क्रिप्ट पण माझ्याकडेच आहे अजून. आत्ता सापडलं! म्हणजे तुम्ही सुरूवातही नाही केलीत अजून? मॅम, प्लीज मला लवकर हवंय भाषांतर.." माझा नवीन मित्र त्याला काही बोलायला जाणार इतक्यात वीरेंद्रकडून स्क्रिप्ट घेऊन मीच तोंड उघडले. "बरं झालं मला कॉपी दिलीस ते. माझ्याकडे एक होती पण ती सापडत नाहीये आता. काळजी करू नकोस. एकदोन दिवस जरा कामात आहे पण ते संपले की लगेच सुरूवात करते." "मॅम, नरेन सर कसे आहेत? त्यांना नमस्कार सांगा. लेखी परीक्षा तर संपलीये. पुढच्या आठवड्यात productions आहेत. ते झालं की संपलं इथलं मॅम! मग कामाचा शोध. नरेन सर काय करतायत नवीन? मला काम करायचंय त्यांच्याबरोबर २६" "भेट तू नरेनला. तो ओळखतो तुला." "ओके मॅम! नक्की भेटीन. आणि ते भाषांतराचं प्लीज लवकर करा. मी फोन करतो तुम्हाला पुढच्या आठवड्यात." "बर!" वीरेंद्र आला तसा कर्कश्शपणे गेला आणि परत एक चिडचिड उफाळून आली. नरेन सर म्हणे! माहीतीये तुम्हाला नरेन सर आणि मी एकत्र रहात नाही गेले वर्षभर २६ तरी मुद्दामून तेच. "नरेन सर म्हणजे? तुझा नवरा?" "हं.. उद्यापासून माजी नवरा!" "आणि या कोणाला माहीत नाहीये की तुमचा घटस्फोट होतोय हे?" "माहीतीये सगळ्यांना. अगदी उद्याची तारीख नसेल माहीत पण आम्ही एकत्र रहात नाही आणि घटस्फोट घेतोय हे माहीतीये." "मग तरी?" (तरी काय? हे सगळे नरेनकडे मिळू शकणार्या कामावर आशा लावून बसलेत आणि नरेन त्याचा फायदा घेऊन यांच्यापुढे बिचारेपणाचं नाटक करतो मग येतात हे सगळे मला मुद्दामून टोचायला..) "हो तरी! सवय झाली आता!" तो बिचारा खूपच गांगरून गेल्यासारखा वाटला. काही क्षण अवघडलेल्या शांततेत गेल्यावर मलाच शांतता सहन होईना. जरा ताण हलका करायला मी विचारलं.. "अरे तुझं नावच नाही माहीत मला! माझं तर तुला कळलंच आहे, कावेरी. कावेरी देशमुख." आधी गोंधळला पण मग समजल्यासारखा त्याने मूड बदलला. "मी किरण शहाणे! nice to meet you, कावेरी!" हसून त्याने हात पुढे केला. मीही हसून 18same here! 19 म्हणत हात मिळवला. क्रमशः २६
|
(चेहर्यावरच्या हसूच्या रेषा जड झाल्यात.. खूप दिवसांत वापर नाही त्यांचा..) खल्लास.. लवकर टाक पुढला भाग!
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:20 am: |
|
|
अरे आत्ताच टाकला ना पुढचा भाग... माझ्या लिखाणाचा वेग लय म्हणजे लयच स्लो आहे राव! विचारा इथल्या जुन्यांना.. ६-८ महिने पूर्ण करत होते माझं नाटक. २००१-२००२ ची गोष्ट आहे! पण सगळे वाचताय त्याबद्दल आभार!
|
Bee
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:47 am: |
|
|
चांगली लिहितेस तू, अज्जुका.
|
Rajya
| |
| Wednesday, May 30, 2007 - 6:06 am: |
|
|
ह्म्म्म्म, interesting अज्जुका, वाचतोय आम्ही.
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:22 am: |
|
|
"उद्या celebration तर मग? सुटण्याचं? कसं साजरं करणार?" मी क्षणभर बघत राह्यले. मग माझ्याही डोळ्यात एक बेफिकीर मिश्कीली उतरलीच असावी… "ठरलं नाही अजून! तू येतोस माझ्याबरोबर celebrate करायला?" " Anytime! कावेरी मॅम!" ऐतिहासिक नाटकात शोभावी अशी पोज मारली त्याने की मला हसायला यायला लागले. खूप पूर्वी… दहा बारा वर्षांपूर्वी… नरेन भेटला तेव्हा त्याच्या विनोदांवर मी अशीच हसायचे खूप हसायचे.. मग हळूहळू ते सगळे विनोद पांचट वाटायला लागले. हसू येईनास झालं. किंवा आलं तरी जुनी आठवण ताजी झाल्याचं हसू उमटायचं. त्याही नंतर असले विनोद नरेनचं सुटका करून घेण्याचं, लपण्याचं साधन आहे हे लक्षात यायला लागलं. नरेनला माझ्यापासून कधीतरी का होईना सुटका हवी असू शकते, क्षणभरापुरतं का होईना लपायला हवं असतं ह्या वास्तवाशी जुळवून घेण्यातच खूप दिवस गेले. ‘मठ्ठ!’ असं म्हणून हसला होता नरेन तेव्हा… आणि मग काही दिवसांनी अश्या विनोदांवर डोक्यात वीज चमकावी तशी रागाची रेषा उसळी घेऊ लागली. नंतर मात्र असा विनोद त्याने केला की एक जोरदार भांडण ठरलेल असायचं. अस भांडण जे रात्री बिछान्यातही मिटायचं नाही. तिथेही 'माझं खरं! मला जिंकायचंय! मी महान!’ असंच व्हायचं. पण भांडणातून का होईना संवाद तरी होता. मग तोही बंद पडला… "हॅल्लो..! कुठे हरवलीस? ती बघ बस येतेय्… तुझा आवडता सीन सुरू झालाय!" मी भानावर आले. शस्त्रक्रीया पार पडणार उद्या post operative complications न होता. ते साजरं करायचं काहीतरी ठरत होतं ना.. "तेच! साजरंच तर करतेय मी.. आत्तासुद्धा.. बघ ना हा बस चा सीन इतक्या शांतपणे बघितलाच नव्हता कित्तीतरी वर्षात.. आपल्या दिशेने, आशेने येणारा तो मोठ्ठा चौकोनी आकार.. एवढा मोठ्ठा तरी आपल्या आशेने येतोय बघ. आशा कशाची तर आपल्याला गिळून टाकण्याची. पण मोठा दुर्दैवी तो.. समोर येतो.. आ वासतो… आशाळभूत कुत्र्यासारखा… आणि आपण बस मधे चढतच नाही.. आपण safe . तो आकार खिन्न होऊन निघून जातो. त्याच संथ गतीनं… आपण जिंकतो!" मी जग्गजेत्याच्या चेहर्याने जाणार्या बसकडे पहायला लागले. "इतकं वाईट असतं का लग्न कावेरी?" …… "सांग ना इतकं वाईट असतं लग्न?" उत्तर द्यायला मला तरी शब्द सापडले नाहीत आणि मी नुसतीच धुमसत होते. तेवढ्यात 'मालगुडी डेज्’ ऐकू आली पर्समधून्… ही धून म्हणजे… नरेनचा फोन? का? आता कशासाठी? उद्या भेटूच ना तिथे! आता नरेनच्या नंबरसाठी वेगळी धून काढून टाकली पाहीजे! भितीच्या मुंग्यांचे डोक्यात वारूळ झाले आणि मी फोन कट केला. क्रमशः…
|
Mankya
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:43 am: |
|
|
अज्जुका .. मस्त ! कथा अगदी स्पर्शतेय आत कुठेतरी. येऊदेत ! छोटे छोटे प्रसंगही मस्त रंगवलेस, सही जा रही हो ! माणिक !
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:50 am: |
|
|
धन्स रे माणक्या.. जशी येतेय डोक्यात तशी लिहीतेय.. बघू काय करतात ही पात्र आता!
|
अज्जुका, एकदम सॉलिड.......... सही रे सही!!! जरा लवकर येऊ दे
|
Bhagya
| |
| Thursday, May 31, 2007 - 12:04 am: |
|
|
अज्जुके! शेवटी घेतलंस लिहायला! येऊ दे अजून......
|
Chinnu
| |
| Thursday, May 31, 2007 - 3:27 am: |
|
|
भितीच्या मुंग्यांचे डोक्यात वारूळ झाले आणि ... सही!
|
Ajjuka
| |
| Thursday, May 31, 2007 - 6:54 am: |
|
|
परत 'मालगुडी डेज’! मी अस्वस्थ झाले. आत्ता मला फोन घ्यायचा नव्हता कुणाचा.. नरेनचा तर मुळीच नाही. "नरेन?" या प्रश्नानंतर आता फोन कट करण्यात काहीच अर्थ नव्हता. घेतला.. सगळंच विसकटल्यासारखं वाटलं परत एकदा.. "बोल!" फोनच्या दुसर्या बाजूने येणारे शब्द थंडपणे ऐकत होते मी पण समोरचं सगळंच चिंध्या चिंध्या होताना का दिसत होतं? "आई बाबा दोघंही अमेरीकेत आहेत. दादाकडे." बरं झालं ते तिकडे आहेत ते. नाहीतर सगळं माहीत असूनही या शेवटच्या घावाच्या वेळी समजावणी आणि emotional blackmail चं अस्त्र काढायला आईनं कमी केलं नसतं. "हं.. उद्या भेटू ११ वाजता. कोर्टात. बाय." फोन ठेवला. किरण माझ्याकडेच बघत होता पण माझ्या चिंध्या सावरेपर्यंत माझ्याकडे लक्ष नसल्याचं दाखवलं त्यानं.. गुणी बाळ! मी सावरले हे बघून तो काही बोलायला जाणार एवढ्यात मीच बोलायला लागले. "घाणेरडं असतं लग्न! एकमेकांना गृहित धरणं, हक्क, अधिकार आणि सतत जिंकणं.. बास एवढंच.. " असंच काहीबाही बोलत होते बहुतेक मी किंवा नसेल सुद्धा पण हे असं खूप काय काय येऊन गेलं डोक्यात. "लग्न करू नकोस कधी. मैत्रिणी कर, एकत्र रहा… पण लग्न करू नकोस कधी.." "नरेनच्या फोनला घाबरलीस का तू?" राग आला मला पण तेही खरंच होतं. मी घाबरलेच नरेनच फोन म्हणल्यावर्… "बस आ वासते पण तुला खेचू शकत नाही.. तू जिंकतेस. पण बसमधे नरेन असेल तर हरशील म्हणून?" आता मला असह्य झाल होत. त्याचं मनगट घट्ट पकडून जीवाच्या आकांतानं मी त्याला गप्प केलं. आणि तो गप्प झाल्यावर त्याचं मनगट झिडकारून दिलं. "मला वाचायचा प्रयत्न करू नकोस." शक्य तितक्या थंड स्वरात मी त्याला सांगितल. क्षणभरच त्याच्या नजरेत फिस्कारणारं मांजर चमकून गेलं अशीच फिस्कारणारी नजर होती नरेनची जेव्हा मी त्याला खेळवत खेळवत नेऊन ऐन वेळेला नकार दिला होता…. खूप महिन्यांनंतर आमची लय जमली होती. मलाही सगळं हवसं होतं पण त्यापेक्षा मला त्याला हरवायचं होतं. त्याला चिडलेला, हतबल, almost भीक मागताना बघायला मला मजा आली होती. पण ते टिकलं नाही. शेवटी त्याच्या ताकदीने त्याने मला गृहित धरलंच आणि तो जिंकला. शी!! श्वापदं.. नुसती श्वापदं होतो आम्ही तेव्हा. पण त्या प्रसंगाने आमच्यातला संवाद संपवला. भांडण संपवल, आपल्या कामाच्या पलिकडे माझ्याशी बोलणं त्याने तोडलं. मी भांडायचा प्रयत्न केला तर तो सरळ उठून बाहेर जात असे किंवा कोणालातरी घरी बोलवत असे. मग आल्यागेल्याचं आगतस्वागत केल्याचं नाटक मला करावंच लागे. काय करणार लोक ओळखत होते आम्हाला आणि इमेज खराब करून घेणं नरेनला परवडण्याआरखं नव्हतं. सूड सूड घ्यायचा तो मी त्याच्याशी भांडल्याचा. "जिंकणं इतकं महत्वाचं का असतं कावेरी?" माझी तंद्री मोडली. "माझं काम सगळ्यांपेक्षा उत्तम हवं, मी माझ्या जोडीदारापेक्षा वरचढ असायला हवं, माझा लोकांनी हेवा करायला हवा.. ह्याची गरजच नाही वाटली तर?" आत्ता माझं त्याच्याकडेही लक्ष गेलं. "तुलाही जिंकायचंय.. हं? आणि तूही बसवरच विजय मिळवतोयस!" "आता तू मला वाचतेयस!"त्याने साभार परतफेड केली. मला काहीतरी धारदार बोलायचं होतं पण त्याच्या चेहर्यावरचा कशी परत फेड केली’ ची खुशी लपत नव्हती आणि मला हसायलाच यायला लागलं अचानक. नरेनशी लग्न ते घटस्फोट एवढ मोठ्ठं विनोदि आयुष्य जगल्यावरही मला कशाचंही कधीही हसू येतंच.. क्रमशः..
|
Mankya
| |
| Thursday, May 31, 2007 - 7:26 am: |
|
|
अज्जुका ... वाचतोय गं ..! " मी भांडायचा प्रयत्न केला तर तो सरळ उठून बाहेर जात असे किंवा कोणालातरी घरी बोलवत असे. " खरंय .. फार भयंकर प्रकार आहे हा ! मस्त रेखाटलयस ! माणिक !
|
Rajya
| |
| Thursday, May 31, 2007 - 12:20 pm: |
|
|
"माझं काम सगळ्यांपेक्षा उत्तम हवं, मी माझ्या जोडीदारापेक्षा वरचढ असायला हवं, माझा लोकांनी हेवा करायला हवा.. ह्याची गरजच नाही वाटली तर?" खरंच याची गरज असते. अज्जुका, मस्त चालु आहे.
|
|
|