|
Apurv
| |
| Tuesday, May 29, 2007 - 8:30 pm: |
|
|
विश्वासच बसत नाही की कोण मुलगी हे लिहीत आहे.
|
Daad
| |
| Tuesday, May 29, 2007 - 10:56 pm: |
|
|
ज sss रा थकल्यासारखा वाटला का आवाज तिचा? जाम धम्माल चालली असेल. थकेल नाहीतर काय? 'विदू' म्हटलं की, मनोजवंम मारुततुल्य वेगंम ने विचार सुमडीत भटकून येतात. तोपर्यंत समोरच्या जगाचा पत्ता नाही आपल्याला. कठीण आहे माझं. माझ्याकडे वळुनही न पहाता हाताने तस्लीम करून माझ्या वाहवाचा स्वीकार करणारा हा वीर पुरुष एकदम आपल्याच गावचा, 'गर्दीत एकट्यांच्या गावचा' वाटला. पण नक्कीच माझ्यापेक्षाही एकटा. कारण मी गर्दीकडे तोंड करूनतरी, तो तर पाठ करून. भरमसाठ उच्च उर्दू-हिंदीत मी वळून विचारलं, "क्यू बरखुरदार, क्या माजरा है?" इतकं देशाबाहेर भटकूनही माझ्या इंग्रजीला मुंबईचा वास मारतो तिथे उर्दूच्या पट्टीत हिंदी बोललो तर काय होतं? पचका! तेच झालं. झब्बा, शेरवानी, जुल्फंच म्हणावीत असे कपाळावर रुळणारे केस, सहा फूट उंच, सावळलेला आणि फेरीवाल्याच्या पेट्रोमॅक्सच्या उजेडात केशरी दिसणारा रंग..... हा असला ads मध्येच शोभणारा प्राणी शुद्ध मराठीत, 'नमस्कार,' म्हणाला. "हॅ! धत तिच्या मारी, मराठीच का!!" मी पोटभर हसलो... तो ही हसलाच शेवटी. "कुठचे?" थोडा संभाषणाच्या मालगाडीला धक्का देत म्हटलं. "इथला नाही..." गाडी थोडी डगडगून परत होती तिथेच. "वाटलंच! उंची वरून मला वाटलंच की चंद्रावरचे...." मी जरा जोरदार धक्का दिला "मुळचा नेपच्यून... आमच्यात मी सगळ्यात बुटका आहे..." आयला ये तो अपना बाप निकला. महाशय एकदम ' not to be loosely shunted ' निघाले. मी टाळीसाठी हात पुढे केला. दोघेही आपसूकच चालू लागलो, गर्दी पासून दूर. "घेणार?" मी विचारलं. "मी सोडलीये" "अहो, उसाचा रस कुणी सोडतं का?" "कहर आहेस, यार" अस म्हणून आता मात्रं माझ्या पाठीवर थाप मारून तो भरपूर हसला. दोघे ठिय्या मारून बसलो एक एक ग्लास घेऊन. ग्लास हातात येण्यापूर्वीच आम्ही अरे-तुरेवर आलोसुद्धा. हातातल्या ग्लासाकडे बघून मी म्हणालो "जाने क्या हाल हो कल शीशेका, पैमानेका,..." "आय हाय! गहरी चोट खायी लगती है कंबख्त दिलने...." तो हसून हळहळला. "नाही यार, हातात ग्लास आहे म्हणून ती गज़ल आठवली. मधू इथे अन, चंद्र तिथे झालंय." त्याला सांगताना माझ्याच लक्षात आलं आपण विदूला किती miss करतोय. काळजात कळ का काय म्हणतात ती उठली. "...आणि उद्या, परवा अं.... तेरवा भेटणारचये". माझं मलाच हसू आलं. त्याला सांगतोय की च्यायला आपल्यालाच समजावतोय आपण? "नवीन नवीन?" थोडी मान वाकडी करून हसत त्याने विचारलं. "दोन वर्ष झाली...." मी माझं व्हिजिटिंग कार्ड पुढे करत, ओशाळं हसंत कबुली दिली. कुणाही अनोळखीशी बोलताना दहाव्या वाक्याला प्रतिक्षिप्त क्रियेसारखं व्हिजिटिंग कार्ड बाहेर पडतं खिशातून जातिवंत सेल्समन! माझ्या DNA मध्येच म्युटेशन का काय म्हणतात ते झालं असणार. "वर्षांचं काय घेऊन बसलास यार, काही काही फुलं आसमंतच नाही तर रुजतात ती मातीही गंधाळतात. रोप नेऊन लावा दुसरीकडे, इथली माती परमळतेय आपली युगंनयुगं....कायमची." "जाने क्या हाल हो कल शीशेका, पैमानेका आज दर छोड चला है कोई मैखानेका हाथ थर्राने लगे, जाम गिरा, टूट गया ये कोई वक्त न था आपके याद आने का" त्याने मतला पूर्ण करून एक शेरही म्हटला. क्रमश:
|
Daad
| |
| Tuesday, May 29, 2007 - 11:01 pm: |
|
|
"क्या बात है" मी मनात म्हटलं. "बेटा रुतलाय खोलवर...... आता फक्त गहराई बघायची" माझं आपलं एक मत आहे. आपण बोललच पाहिजे असं नाही. कधी कधी समोरचाच आपल्या आतलं बोलतो... नुसतं ऐकलं तरी पुरतं. आज ऐकणेकी हवा है तर. चलेगा चलेगा! अरे, चलेगा क्या, दौडेगा! एकटा एकटा झुर झुरके रात बितानेमे क्या मजा? "असलं काही नसतं. आपण गेल्यावरही मयखाना तसाच चालू, शराब, नकाब, साकी सगळं असतंच. आपल्यालाच साली उत्सुकता आपण गेल्यावर काय झालं असेल? नांदतायेत सुखाने की 'हाथ थर्राने लगे, जाम गिरा टूट गया' होतंय? हं? ...... महत्वाचं नाहीये... मी मयखान्याला सोडलं की मयखान्यातून धक्के मारून बाहेर काढलं! काय फरक पडतो? .... साथ छूट गया.. is the fact , बस" "इस मुहब्बत ने कर दिया नाकाम वर...." मला अर्ध्यावरच थांबवत म्हणाला, "एकतर्फ़ीच रे, one way . आधी कुणाचीतरी वाट बघायची, मग येत नाही म्हटल्यावर वाट चालायची...... बरं, वाट चालायला काहीच हरकत नाही पण कधीतरी कुठेतरी पोचणार माहीत असलेल तर ना? "आयुष्याची वाट लागली" म्हणतात ना, तेच. निव्वळ फकिरी रे दुसरं काही नाही." त्यानंतरचा त्याचा नि:श्वास कुठेतरी मलाच डसून गेला. असहाय्य, helpless म्हणतात तसं वाटलं. थोडसं guilty ही. म्हटलं च्यायला दोन दिवस बायको भेटली नाही म्हणून आपण रडतोय... ह्याचं अख्खं आयुष्यंच हरवलंय. अशावेळी उगीच काहीतरी बोलणं म्हणजे आकाशाला पॅचवर्क केल्यासारखं..... "फकिराच्याही छातीत कोवळ्या कोंबासारखं एक जिंदा दिल असतं. कुणालाच कळत नाही. अरे पण त्याची त्याला कळते ना उठणारी प्रत्येक आह, येणारी हरेक कळ, हर धडकन? जिवंत असेपर्यंत! कसं नाकारायचं आपलंच जिवंत असणं? फकीर झाला म्हणून काय झालं? अं?" "दिल मे फ़िर गिरया ने इक शोर उठाया 'गालिब'.... आह जो कतरा न निकला था, सो तूफ़ा निकला....", त्याला चढलेला दिसत होता, उसाचा रस. मला वाटलं की मला अजून चढायचा होता. पण ह्याचं ऐकता ऐकता चढायला लागलाच होता बहुतेक कारण ह्यावेळी मला शेर आठवायला लागला नाही... आपोआप निघून गेला तोंडातून. "तोबा... वाह" त्याने हसून दाद दिली. "गालिब, वाचण्याची नाही, जडण्याची चीज आहे, यार, जीवघेण्या बिमारी सारखी." असं म्हणून तो बांधावर चढला. एव्हाना आम्ही चालत दगडी भरावाच्या पार टोकाला आलो होतो. मला पोहता येतं पण माझा मी तरंगण्यापुरतंच. या सहाफुटी पुतळ्याला वाचवायला अजून कुणीतरी लागेल हाताशी असं म्हणून मी सुद्धा त्याच्या मागे मागे चालू लागलो. "तिच्या मनात काही नव्हतं रे... नसावं.... नव्हतंच! साध्या मराठी घरातली साधी मुलगी. पण गज़लेसाठी गळ्यात वेगळी जान होती तिच्या. शिकवलेला हर लब्ज, हरकत... हूबहू उचलायची. शेवटच्या वर्षी मीच जरा जोर करून विचारलं. तोंडाने नाही म्हणाली. पण रडलीही बेदम. काय कळलंच नाही, मनात होतं का नव्हतं! घरातून काय विरोध वगैरे असेल, म्हणून घरी गेलो... दुसर्यांदा गेलो तर, मुंबई सोडून ग्वाल्हेरला गेलेले कळले सगळे.... मनात आणलं तर शोधून काढेन पाताळातून सुद्धा...... आत्ता होती, आत्ता नाही सारखी गायब झाली. वादळात सापडलेल्या पानांसारखं भिरकाटून दिलं दैवाने दोघांना. कुठच्याकुठे. बरं, नाही म्हणावी तर या समुद्राच्या गाजेसारखी बरोबर, रे. अखंड.... नक्ष फरियादी है......." तोल सावरत निमुळत्या बांधावरून चालत तो म्हणाला. तीच चाल, तोच मिंड, तोच षडजाचा डोह..... आणि कोमल धैवताचा किनारा मला एकदम कान गरम झाल्यासारखे वाटले. "....... अरे, शोधून काढलीच." तटकन थांबून वळून माझ्या डोळ्यात थेट बघत म्हणाला,"तुझा कोण देव असेल... तर आज माझ्यासाठी मन्नत मांग, दोस्त! ... म्हणावं अपने यारको बक्श दे इस बार..... या वेळी यश दे. एक घाव दोन तुकडे.... आर या पार. सगळं सांगणार तिला. शब्दांत, आंसुओंमे.... जमेल तसं दिल खोलून दाखवणार... कर म्हणावं फैसला, भेटणारेय उद्या ग्वाल्हेरला तिच्याच घरी जाऊन. लग्नं झालंय कळलं.... पण शेवटी फैसला तिच्याच हातात..... झोकून द्यायचं बळं आलं असेल आई-बापाच्या पंखाखालून बाहेर पडल्यावर..... नाही तर आहेच याची गाज आपल्याला कवेत घ्यायला केव्हाही....." हसंत हसंत असं म्हणून त्याने समुद्राकडे तोंड करून हात फैलावले. तेव्हढ्या निमिषातही त्याच्या डोळ्यात चकाकणारा दर्या आणि त्यातलं वादळ मला दिसलंच. त्याचा थोडा तोल जातोय असं बघून मी..... क्रमश:
|
Daad
| |
| Tuesday, May 29, 2007 - 11:03 pm: |
|
|
होटेलात परत येईपर्यंत घामाने थबथबलो होतो. परत परत स्वत:ला बजावत होतो त्याचा तोल गेला..... त्याचा तोलच गेला..... त्याचाच तोल गेला..... सगळ्यात आधी हे होटेल सोडायचं. सगळं सामान भरेपर्यंत तास तरी गेलाच. खाली लॉबीत आलो. बिलाचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत समोरच्याच सोफ्यात बसलो आणि मोबाईल वाजला. "विदू...." "हो रे, खूप उशीरा फोन केलाय नं? काय करू, झोपच येईना. तुला कळायलाच हवं सगळ्यात आधी..... तुलाच..... कसं सांगू?" "विदू.... माझं ऐक ज...." "थांब, राजा. मला बोलूंदे. तू म्हणाला होतास ना? तेच खरंय आपल्याला भिजवतो तोच आपला पाऊस. आता नाही एकटा पडायचास कध्धी कध्धी...... मी... तू आपण दोघे..... नं..... ए, नाव काय ठेवायचं रे होणार्या बाळाचं?.... मुलगा....." माझ्या डोळ्यासमोर लाजून कुजबुजत विचारणारी विदू येईचना काही केल्या... फ़्रंट डेस्क जवळ माझं भिजलेलं व्हिजिटिंग कार्ड दाखवत चौकशी करणारा पोलीस इंस्पेक्टर, माझ्या थिजलेल्या डोळ्यांतून... जाईचना काही केल्या..... कानात मात्रं गाज.... अखंड..... नक्श फरिया sss दी है...... समाप्त.
|
Daad
| |
| Tuesday, May 29, 2007 - 11:11 pm: |
|
|
वैभवा, हा गालिबचा शेर माझ्या स्वत:च्या सगळ्यात आवडीचा. अर्थं खूप वेगवेगळे निघू शकतात असला खो ss ल शेर आहे. कागदावर चितारलेलं प्रत्येक चित्राची तक्रार आहे की मी, माझं अस्तित्वं हे कुणाच्यातरी (हाताच्या) शौकापलिकडे काही नाही आणि शिवाय माझा पेहराव एक कागदच. म्हणजे कुणाच्या तरी क्षणिक शौकासाठी माझा जन्म तो सुद्धा कागदासारखं क्षणभंगूर शरीर घेऊन..... ही तक्रार....... आता विचार करा... आपण सगळे "त्याच्या" शौकाचीच चित्रं नाही का.... तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभारी.
|
Saurabh
| |
| Tuesday, May 29, 2007 - 11:35 pm: |
|
|
कमाल! बहोत खुब! ..
|
Mankya
| |
| Wednesday, May 30, 2007 - 1:25 am: |
|
|
दाद .... " काही काही फुलं आसमंतच नाही तर रुजतात ती मातीही गंधाळतात. रोप नेऊन लावा दुसरीकडे, इथली माती परमळतेय आपली युगंनयुगं....कायमची " " एकतर्फ़ीच रे, one way . आधी कुणाचीतरी वाट बघायची, मग येत नाही म्हटल्यावर वाट चालायची...... बरं, वाट चालायला काहीच हरकत नाही पण कधीतरी कुठेतरी पोचणार माहीत असलेल तर ना? "आयुष्याची वाट लागली" म्हणतात ना, तेच. निव्वळ फकिरी रे दुसरं काही नाही " क्या बात ! व्वाह ! माणिक !
|
hats off to you, daad काय अप्रतिम लिहतेस तू! हि कथा सगळ्यात जास्त आवडलि अस प्रत्येक वेळि वाटत.
|
य्ये बात!!! सही गज़लको सही अंजाम.. मस्तच लिहीलय अगदीच रहावलं नाही म्हणून पूर्ण गज़ल देतोय.. नक़्श फ़रियादी है किस की शोख़ी-ए-तहरीर का काग़ज़ी है पैरहन हर पैकर-ए-तस्वीर का कावे-कावे सख़्त जानी हाये तनहाई न पूछ सुबह करना शाम का लाना है जू-ए-शीर का जज़्बा-ए-बे इख़्तियार-ए-शौक़ देखा चाहिये सीना-ए-शम्शीर से बाहर है दम शम्शीर का आगही दाम-ए-शुनीदन जिस क़दर चाहे बिछाये मुद्दा अन्क़ा है अपने आलम-ए-तक़रीर का बस के हूँ 'ग़ालिब' असीरी में भी आतिश ज़र-ए-पा मू-ए-आतिश दीदा है हल्क़ा मेरी ज़ंजीर का
|
सॉलिड... मस्त.. धमाल.. एकदम सही. याच्यापुढे माझी गाडी जातच नाही आहे
|
Sakhi_d
| |
| Wednesday, May 30, 2007 - 3:57 am: |
|
|
सुरेख.... अप्रतिम... काय लिहायचे तेच कळत नाही.. office मधे बसुन वाचतेय हे लक्षातच आल नाही... खुपच सुंदर....
|
Rajya
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:12 am: |
|
|
दाद, काय म्हणु? काहीच म्हणत नाही, हीच तुझ्या कथेला दाद.
|
Meenu
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:15 am: |
|
|
वाह क्या बात है ..! जीयो शलाका .. किती तरी दिवसांनी असं खिळवुन ठेवणारं काही तरी वाचायला मिळालं .. छे ..!! सुरुवात केल्यावर शेवट कधी आला हे कळायच्या आत कथा संपली .. अप्रतिम ..!! लिहीत रहा नेहमीच ..
|
Lampan
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:16 am: |
|
|
_/\_ ह्यापेक्षा जास्तं काय ..
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:31 am: |
|
|
तुझ्या कथेवर मी प्रतिक्रिया देण म्हणजे बाथरुम सिन्गर ने लतादिदीना प्रतिक्रिया देण्यासारख आहे. शब्द सुचत नव्हते म्हणुन साष्टांग नमस्कार घालायचा ठरवला मनाशी तर इथे लंपन आधीच नमस्कार घालुन रिकामा. असो. माझाही साष्टांग नमस्कार तुझ्या प्रतिभेला. उच्च आहे एकदम. _/\_
|
Psg
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:50 am: |
|
|
फ़ार emotional लिहिलं आहेस. शब्दातलं सौंदर्य फ़ुलवतेस! सलाम!
|
म हा न. ... ...
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:16 am: |
|
|
वरच्या सगळ्यांनी लिहिलं तेच... raised to N
|
Nakul
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:34 am: |
|
|
वाह शलाका सुरेख परत परत वाचावी अशी कथा
|
Dhumketu
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:40 am: |
|
|
मस्तच आहे... मायबोलीच्या पहील्या पानावर पाहील्यावर ईकडे आलो आणी एका दमात वाचून काढली. आणी हो.. १-२ दिवसात कथा पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन. आजकाल लोक एक भाग टाकतात आणी आम्ही बुवा खुप हळू लिहितो..वेळच मिळत नाही म्हणून नंतरचे भाग उशीरा टाकतात.. म्हणूनच आजकाल कथेच्या bb त घुसतच नाही.. उगीचच उष्टे हात घेऊन हॉटेलमध्ये असल्यासारखे वाटते. मधे कधीतरी एक डेली सोप विषयी वाद झाला होता. रोज आपले हळु हळू पोस्टणे म्हणजे डेली सोप असावे असे मला वाटते.. पण तुम्ही त्यात अडकला नाहीत हे छान झाले (अडकायला छान संधी होती कारण लिखाणाची शैली आवडत होती लोकांना)... काही लोक उगीचच लोका सांगे ब्रह्मज्ञान असे करतात... खाजुन खरूज काढतोय का मी?
|
|
|