Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 29, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » नक्श फ़रियादी है » Archive through May 29, 2007 « Previous Next »

Daad
Monday, May 28, 2007 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"नक्श फ़रियादी है किसिकी शौखी-ए-तहरीर का
कागजी है ....."

"पैरहन हर पैकर्-ए-तसवीर का.... सुभानल्ला, क्या बात है, क्या बात है" मी माझ्या अफाट उर्दू उच्चारात त्याने सुरू केलेला शेर पूर्ण केला. आता मला वेळ काढायला कुणी हवं होतं असं नाही पण एकूण माहोल "कुछ शायरी हो जाय...." वाला. माहोल म्हणजे माझा माहोल....

ऑफिसच्या कामासाठी मी मुंबईत होतो. वरळी सीफेस वर रात्रीच्या ११ वाजता निरुद्देश भटकणे हा काही विरंगुळा होऊ शकत नाही पण अवस्थाच अशी की खोलीत एकटा की गर्दीत एकटा? तर आपण बुवा 'गर्दीत एकटा' वाले!
टरकेश नंबर वन. म्हणजे तसे कशालाच घाबरत नाही पण स्वत:च स्वत:ची समजूत काढायची, वगैरे सेंटी भानगडी नको वाटतात. . त्यामुळेच तर इतकी वर्षं मुली-बिलीच्या भानगडीत पडलो नव्हतो. च्यायला पहिलं त्या मुलीला समजवा, मग आई-बापाला समजवा आणि कुणी काही समजून घेत नसलं की मग आयुष्यभर स्वत:ला समजवा.
बघितलेयत ना दोस्त आपले. अरे असला दंडेल बन्या, त्याला तिरकं जाण्यापूर्वी माणूस दहादा विचार करेल, असला... पोरीच्या भानगडीत रडला, चक्क रडला. थबथबलेल्या स्पंजसारखा झाला होता काही दिवस. जरा धक्का लागला की ठिबक, जरा धक्का लागला की ठिबक!

आमचे आई-बाबा तरी धन्यच. त्यातल्या त्यात आई - 'तू काय तुला कशी हवी ती शोध बाबा'. आता हे काय पॅंटचं कापड आहे? मातोश्री आमच्या म्हणजे ग्रेटच. आई-बाबांनी शेवटी वैतागून शोधून आणली तिच्याशी लग्न केलं.

पण गळ्याशप्पथ सांगतो, गेल्या दोनच वर्षांत विदुला आपला जीव की प्राण का काय म्हणतात ते झालीये. त्रिखंडात शोधून मिळाली नसती, हे आई म्हणते ते साक्षात खरंय. बघितल्याक्षणी आवडली. हे दातार लोक मुळचे मुंबईतलेच मग ग्वाल्हेरला शिफ़्ट झाले. म्हटलं ही ग्वाल्हेरचं मराठी किंवा हिंदी बोलणार, दोन्ही उच्चच आपल्याला.
भेटलोही कसल्या सणसणीत ऐतिहासिक, गूढ वगैरे म्हणतात तसल्या जागी! आईशप्पथ काही काही विसरलो नाहीये. नाही म्हणजे सकाळी भाजी कोणती खाल्ली ते रात्री विचारलं तर डोकं खाजवणार आम्ही. तिला "बघायला" - हा आईचा शब्द, मला मुळीच पसंत नाही- फोटोत बघितल्याक्षणी आवडली म्हणून "भेटायला" गेलो तेव्हा.

तिच्या घराजवळ ग्वाल्हेरला शहराबाहेर त्या पडक्या गढीत, म्हणजे गढीच्या दरवाजातच. गढीचा मेन दरवाजा सोडल्यास धड असं काही शिल्लक नाही. त्या दरवाजात एका बाजूला मी, एका हातात मोबाईल आणि दुसरा हात न उडणारे केस बसवत.
दुसर्‍या बाजूला विदू, गडद निळ्या (तो मोरपिशी रंग होता हे नंतर कळलं) सलवार कुरत्यात (तेव्हा मी त्याला कुडता म्हणायचो). सैल बांधलेली एकच वेणी, विदूच्याही एका हातात मोबाईल आणि दुसरा हात खरेच उडणारे केस (आई म्हणाली तस्से सम्माटाच्या सम्माटा) आणि ती मस्तं ओढणी जागच्या जागी बसवत. मीच खूप बडबडलो, प्रश्न-बिश्नं विचारले.
फोटोत हसली नव्हती, पण तिथे मी बोलताना हसली. आपला statue च एकदम. अरे मुलीच्या गालाला खळी ठीकय, बघितलीये. पण खळ्या? गालावर एक खोल खळी, मग ज ss रा खाली ओठांच्या कोपर्‍यात वर थोडी छोटी खळी, मग हनुवटीच्या जवळ परत एक नाजुक खड्डा... हे असलं सगळं परत दोन्ही बाजूला.
मी पड पड पडलोय त्यात....
त्या गढीतून निघताना मीच जरा बर्‍यापैकी लपेटून दिली तिची ओढणी तिला आणि ती हसल्यावर परत पडलो सगळ्या खळ्यांत, अजून पडतोच आहे...
आईशप्पथ, आपल्याला एक कविताच व्हायला हवी होती, तिथल्यातिथे.

क्रमश:


Daad
Monday, May 28, 2007 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याइतकी बिंधास्त नाहीये, विदू, जरा reserved nature चीच म्हणायला हवी... पण गेल्या काही महिन्यांत थोडी अधिक मोकळी झालीये. बोलते-बिलते मनातलं वगैरे. आई-बाबांची पेट्टं आहे. वैनीपेक्षा हे माझं मत. दादा सुद्धा कबूल करेल विचारलं तर, वहिनीच्या मागे.

विदूला जरा सेंटीच म्हणायला हवं. दादाचा पुंडू झोपेत हसला तर हिच्या डोळ्यात आनंदाने पाणी, झाडावरचं घरटं खाली पडलं तर हीचा जीव वर खाली, आमच्या आईचा पाय मुरगळला तर, शेकताना आईपेक्षा हिचंच हाई-हुई, कहर म्हणजे मला जरा migrain चा त्रास होतो... कधीतरीच. तर, तुझी डोकेदुखी मला घेता आली तर किती बरं होईल, रे, खूपच दुखतय कारे? दुसरा बाम चोळून देऊ का?... कधी कधी मग मीसुद्धा जरा जास्तच त्रासाचं नाटक करतो, लाड करून घ्यायला आवडतं तिच्याकडून. प्रचंड गोड प्रकरण.

माझा सध्या बाड्-बिस्तरा अमेरिकेत फिलीत आहे. तर म्हणे आई-बाबा एकटे पडलेत. तिचे नाही, माझे! माझी आई स्वत:शी सुद्धा एकटी नसते. बाबा क्लबमध्ये जातात. दादा, वैनी जवळ असुनसुद्धा ते एकटे कसे? तर म्हणे माझ्याबद्दल जरा जास्तं आहे दोघांनाही. त्यामुळे आजूबाजूला माणसं असूनसुद्धा 'मी' नाही म्हणून 'एकटे'. असं हवं ते माणूस जवळ नसलो की आपण माणसातही एकटे होतो. आहे बुवा concept , म्हटलं!

आईने दोन्-तिनदा छेडल्यावर, परवा मी सुद्धा गमतीने म्हटलं 'मी सुद्धा एकटा आहे गं माझ्या अजून न झालेल्या मुलांशिवाय'... तर एकदम गप्पच. चिडत नाही ती, पण कोमाऊन जाते. आपली लगेच माघार, बिनशर्त! नसेल तयारी अजून.. आत्ता दोनच तर वर्षं होतायत लग्नाला आणि आम्ही दोघं तसे अजून जवळ येतोच आहोत. म्हणजे मी बुडलोय पूर्णच....
क्रमश:


Mankya
Tuesday, May 29, 2007 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद .. Great going ! मस्त लिहितेस !

माणिक !


Daad
Tuesday, May 29, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यात टॉप गोष्ट म्हणजे "गाते". विदू नुसती गात नाही, तर खरच सुंदर गाते. मला गाता-बिता येत नाही. पण गाणं कळतं. म्हणजे विदूच्या भाषेत, "जाण आहे". म्हणजे कुणी अगदी मनापासून म्हटलेलं आपल्या आतपर्यंत पोचतं. अगदी गज़ल, भावगीतापासून, रागदारी तानफेक आणि संतूर्-बिंतूर, सगळं. आपण तालमितले तय्यार "कानसेन"!

विदू जी ss वघेणं गाते. शास्त्रीय वगैरे शिकलीये पण गज़ल म्हणजे, जान ओतून गाते.

हा गालिबचा शेर तिचा आवडीचा म्हणून माझाही. हृदयनाथांची चाल आणि लताबाईंनी मूळ गायलेलं असलं प्रचंड डोंगराएवढं गाणं.... पण काय पेलते! तिच्या फरिया sss दी मधल्या या वरचा मिंड.......... नुसतं स्स्स....!!
'तो कोमल धैवतापासून षड्जापर्यंत आहे' हे तिने सांगितलेलं....
माझ्यामते, विदू तो मिंड घेते तेव्हा, आपल्याला सोडलेलं धैवताला कळत नाही आणि गळा मिठी पडली याचा षड्जालाही पत्ता नाही. हे म्हणजे कसं? तर
आजूबाजूला षडजाचा डोह असावा, धैवताच्या किनार्‍यावरून नुसतं झोकून द्यावं डोहात तसं.... खळबळ नाही, तरंगही नाही, एकही! एकदम थेट तळंच.

मी मॅडसारखं हे तिला सांगितलं तर वेडी माझ्या गळ्यात पडून रड-रड रडली. मोकळी मोकळी झाल्यासारखी वाटली त्यानंतर. बरोबरच आहे म्हणा... आपल्या जरातरी बरोबरीचा आहे, म्हणजे आपली किलबिल थोडीतरी कळणारा कावळा तरी आहेच, असं काहीतरी वाटलं असणार तिला.

मी पण गज़ल, उर्दू वगैरेत जरा जास्तं रस घेतो... इतकं आईच्या भाषेतलं त्रिखंडातलं रत्नं हातात पडलय तर अगदीच माकडपणा नको.
आपण तिला आपल्या सगळ्या भानगडी सांगितल्या.... कुठच्या पेपर मध्ये कॉपी केलीये पासून सगळं. पीत होतो हे तिला माहीत होतंच, करून बघायचं म्हणून चिरूट ओढलाय, मित्रांबरोबर पैज लावून गोलपिठ्यात चक्कर मारलीये.. पण मग आईच्या कुशीत शिरून रडलोय पण बेफाम.... काही ठेवलं नाही सगळं सांगितलं.

तेव्हा धीर करून तिनेही सांगितल.... कसली सेंटी मुलगी होती ही! होती कसली, अजून आहे.
त्यांच्या कॉलेजात म्हणे कुणी एक कार्यक्रम बसवायला यायचा. ही अशी दिसते, असलं गाते मी समजू शकतो. पण हिने कधी पुढे पाऊल टाकलं नाही, तोच गुंतला. शेवटच्या वर्षाला विचारलंही तिला. तो मुसलमान, हे दातार. विदूने मला सांगायलाच नको, मला माहीत आहे, हिच्या आईने जीवच दिला असता. त्याने घरी यायचा प्रयत्न केला दोनदा तर काकांनी मु.म्बईच सोडली सगळं गुंडाळून.

आता विदूच्या जीवाची घालमेल का? तर, तो कसा असेल? त्याने जीव्-बीव तर दिला नाही ना? पुन्हा लग्न करून सुखी झाला असेल का?
हे असलं काही तरी.

मी विचारलंही तू नाही ना गुंतलीस? तर, 'नाही रे. पण आपल्यामुळे कोणी कशाला दु:खी व्हायचं? कळलं असतं तर बरं झालं असतं. ओझ नको बाबा जीवावर!' हे असलं! प्रच्चंड सेंटी!

मी समजावलंही तिला. पोरं लोक असलं फार दिवस मनावर घेत नाहीत वगैरे. लग्नं बिग्नं करून आरामात असेल पठ्ठ्या. सुखी का काय ते माहीत नाही. कोण महामाया गळ्यात पडते त्याच्यावर आहे.
म्हटलं, आपल्याला भिजवतो तो आपला पाऊस. आंघोळीला मोरीत जाऊनच्या जाऊन उगीच न पडलेल्या पावसाची काळजी करत बसायचं.... शॉवर चालू बिच्चारा.... गळला काय, बरसला काय, ठिबकला काय? काय नाहीच तुम्हा बायकांना.
तर नाक उडवून "तुम्हा पुरुषांना नाही कळायचं" म्हणून पार!

असल्या वेडाबाईला अजून काय समजावणार? संभाळून घ्यायचं झालं. आई म्हणते ना, एखादं आलं किरकिरं माझ्या सारखं की होईल कणखर आपणंच.
क्रमश:


Kmayuresh2002
Tuesday, May 29, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,सुरूवात आवडली.. पुढे जाऊ देत फ़ाश्ट:-)

Daad
Tuesday, May 29, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरुवाती सुरुवातीला खूप उदास व्हायची एकदम. घरच्यांची आठवण वगैरे येत असेल, संकोचानं जात नसेल म्हणून स्वहस्ते माहेरी सोडून आलो दोन्-तीन वेळा. पण लगेच दोन दिवसात मेसेज येतो मोबाईलवर "घायला ये रे, कंटाळले". की आम्ही उड्या मारत एका पायावर आणायला छू....

सगळ्याच लग्नं करून नवर्‍याच्या घरी जाणार्‍या मुली ग्रेट बाबा. सगळं सोडून आपली मुळं उचलून दुसरीकडे रुजायचं. काय खायची गोष्टंय? आपल्याला चार दिवस हॉटेलात रहायला लागलं तर कावतो आपण. आईच्या हातचा चहा, वहिनीच्या हातचे पोहे, दादाच्या हातातून काढून घेतलेला सकाळचा पेपर, बाबांच्या घरातल्या घरात म्हणत पार शेजारच्यांच्या अंगणात पोचलेल्या शतपावली, विदूचंन नुसतं आजूबाजूला वावरणं आणि.... हं! आणि असलं बरंच काही.
ह्यातलं काहीही आठ दिवसांपेक्षा जास्त मिळालं नाही की आपण बेचैन.

लग्नाआधी दोस्त लोकांबरोबर, टुरवर कलीग बरोबर दुसरं काही करायला नाही म्हणुन प्यायचो... ग.म्मत. एकट्याने कधीच नाही. पण विदूच्या सांगण्यावरून सोडली... साफ सोडली. हल्ली त्यामुळेच टूरवर एकट्याने यायला नको वाटतं झक्कासपैकी विदूला बरोबर घेऊनच फिरतो जमेल तेव्हा. विशेषत: भारतात येणार असेन तर नक्कीच. विदुची मग मुंबई, ग्वाल्हेर अशी फेरी होते.

तशीच आता ग्वाल्हेरला घरी गेलीये. त्यावेळच्या कॉलेजातल्या चार तरी चिमण्या यावेळी जमणार आहेत म्हणे. ही तिची तिथली मैत्रिण म्हणजे कहर आहे. कुठुन कुठुन पत्ते आढून गोळा केल्यात इतर मैत्रिणी... नुसता चिवचिवाट असणार चालू, अखंड. आजच विदूशी बोलायला फोन केला. conferance च्या दोन सेशन्समध्ये, तर ही आहेच कबाबमे..... हिची सत्त्याणव वाक्यं ऐकल्यावर विदूची तीन ऐकायला मिळाली. तिन्ही दिवस रहाते म्हणतेय....
या बायकांना ना, एक बोलायला मिळालं की पुरे. कुणी ऐकायला नसलं तरी चालेल एक वेळ..... नवरा-बिवरा गेला तिकडे तेल लावत....

क्रमश:


Mankya
Tuesday, May 29, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद .. खूपच आवडलं आतापर्यंतच लिखाण ! मस्त जमून आलीये ! लगे रहो !

माणिक !


Manjud
Tuesday, May 29, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद.......... keep writing .....लवकर लिहि पुढचं..

Lampan
Tuesday, May 29, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय मस्तं लिहितोयस .. direct डोक्यातंच छापलं जातंय का डोक्यात जे आधिच छापलंय तेच इथे दिसतंय .. कि तसलंच काहीतरी .. ९२ तास वाचंत रहावं असलं ...

Nkashi
Tuesday, May 29, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, मला कोणी वरील शेरोशायरी चा अर्थ सांगाल का? :-(

Bhramar_vihar
Tuesday, May 29, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थबथबलेल्या स्पंजसारखा झाला होता काही दिवस. जरा धक्का लागला की ठिबक, जरा धक्का लागला की ठिबक!

आपल्याला सोडलेलं धैवताला कळत नाही आणि गळा मिठी पडली याचा षड्जालाही पत्ता नाही.

आपल्याला भिजवतो तो आपला पाऊस. आंघोळीला मोरीत जाऊनच्या जाऊन उगीच न पडलेल्या पावसाची काळजी करत बसायचं....

दाद, कसलं लिहिलयस! लवकर पूर्ण कर.

Vaibhav_joshi
Tuesday, May 29, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका .. अप्रतिम !!! लवकर पूर्ण कर .
मला माहीत असलेले अर्थ

नक्श :- आकृती , नकाशा .. protrait
फ़रियादी .. विनंतीवजा , तक्रारवजा .. धावा
शोख़ि-ए-तहरीर :- अनिर्बंध लेखन , unretrained writing
पैरहन .. dress
पैकर .. कागदी रुप

माझ्यामते

तिच्या / त्याच्या उत्कट लिखाणातील ( पत्रातील ? ) भाषा जरी धावा केल्यासारखी , काकुळतीला आल्यासारखी असली तरीही शेवटी तो एक कागदच आहे .. उसकी एक कागज़ी तस्वीर है और कुछ नही

असा अर्थ असावा .

चू . भू . दे . घे .

कथा चालू राहू दे .


Gobu
Tuesday, May 29, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,
मित्रा अशक्य लिहीतोस ह तु!
एक विनन्ती आहे सन्सारी कथा बनवु नको या सुन्दर कथेला!
अर्थात तु फार चान्गले लिहीतो आहेस, जास्त सान्गणार नाही!


Rajya
Tuesday, May 29, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु,

दाद पु. नसुन स्त्री आहे.

दाद मस्तच, लगे रहो.


Shyamli
Tuesday, May 29, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलांनो दाद 'तो' नसुन 'ती' आहे :-)

दाद, ही तुझ्या लिखाणाला दाद बघ, तुझं लिखाण 'त्याचं' वाटुन गेलं या सगळ्यांना
मस्त लिहितीयेस, आवडतयं :-)
बाकी, तुझ्यासारखी दाद द्यायलासुध्दा नाही जमत बुवा आपल्याला :-)

Kedarjoshi
Tuesday, May 29, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याने सुरू केलेला शेर पूर्ण केला.

सुरुवातीलाच मध्य? व्वा दाद क्या बात है. मस्त जमलय.

Swaatee_ambole
Tuesday, May 29, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, छान लिहीत्येस. लवकर येऊ दे पुढचं. :-)
( बास! बोललेच!! आता कोणी काही म्हणो!!)


Ameyadeshpande
Tuesday, May 29, 2007 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>च्यायला पहिलं त्या मुलीला समजवा, मग आई-बापाला समजवा आणि कुणी काही समजून घेत नसलं की मग आयुष्यभर स्वत:ला समजवा.



एकदमच मस्त चालू आहे दाद... वाट पहातो आहे पुढची.

Marathi_manoos
Tuesday, May 29, 2007 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Daad...sagala Manatala sangate aahes asa vatat aahe....Keep going!


Prajaktad
Tuesday, May 29, 2007 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे!भन्नाट गाडिला एकदम ब्रेक.... ' दाद ' सुसाट सोडा गाडी परत एकदा..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators