Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 25, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » सुटका » Archive through May 25, 2007 « Previous Next »

Psg
Wednesday, May 23, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुटका.

जयंतरावांनी अधीरतेनी कुरियरवाल्यानी दिलेलं पाकीट फ़ोडलं.. दादाकडूनच आलेलं होतं.. त्यांनी राधाताईंना हाक मारली..
"अगं ए, हे पाहिलस का? दादाकडून कुरियर आलंय बघ.."
राधाताईही लगबगीनी बाहेर आल्या.. "अगंबाई, आलं का? काय काय आहे?"
"हो हो. नीट पाहू तरी दे. हा बघ, हा सगळा प्रोग्राम दिसतोय.. तारीखवार तपशील आहेत त्यात. नीट पाहून ठेव कुठे कुठे कधी जाणार आहोत आपण ते. दादाला नीट पाहून फोन करतो. तो वाटच पहात असेल आपल्या फोनची.."
"हो हो, मलाही वहिनींशी बोलायचंय..."
"काय मग राधाबाई.. बरोब्बर एका महिन्यानी तुमची परदेशवारी सुरु तर!"
जयंतरावांनी थोडं चिडवलं राधाताईंना.
"खरंच की हो. एक महिनाच राहिला आता. सगळी नीट तयारी करायला हवी आत्तापासूनच. वन्सनांही फोन करून टाका तुम्ही."
"हो हो. तू हे नीट वाच एकदा. मग मी त्याच्या कॉप्या काढून आणतो. एक जयश्रीकडे लागेल, आणि दोन मेधा-मायाकडेही पाठवूया. एक शेजारी जोश्यांकडेही देऊया लागली तर म्हणून.."
"झालंच म्हणजे. भाऊजी सांगलीभर करतील आपण सिंगापूरला जाणार ते."
"करूदे की.. जाणार तर आहोतच ना आपण?" जयंतराव हसले. परदेशवारीचं स्वप्न होतं त्यांचं जे आता लवकरच पूर्ण होणार होतं...

जयंतराव, राधाताई, जयंतरावांचे मोठे भाऊ- दादा आणि वहिनी असे चौघे सिंगापूर, मलेशियाच्या ट्रिपला निघाले होते. खरं तर दादांनी हा घाट घातला आणि त्याला जयंतरावांची बहिण जयश्रीचा भक्कम पाठींबा मिळाला म्हणूनच हे शक्य झालं होतं. अलिकडे पुण्यामुंबईची लोक सर्रास युरोप, अमेरिका, सिंगापूरचे दौरे करतात.. आपणही एक असा दौरा करावा अशी जयंतरावांची सुप्त इच्छा होती. तशी आर्थिक अडचणही नव्हती. पण त्यांची ८२ वर्षांची वृद्ध आई त्यांच्याकडे होती. तिला एकटं सोडून फ़िरायला जाणं शक्यच नव्हतं.

तशी या आधी जयंतराव-राधाबाईंनी भारतातली ठळक ठिकाणं पाहिली होती. पण अलिकडे, गेल्या ५ वर्षात फ़िरायला तर सोडाच, पण त्यांच्या मुलींकडेही त्यांना जाता आलं नव्हतं. उभयतांना दोन मुली होत्या- मेधा आणि माया. दोघी शिकलेल्या होत्या आणि सुखानी संसार करत होत्या.. मात्र दोघी लांबच्या गावी होत्या.. मेधा पुण्याला, तर माया नाशिकला. मुली शिकत होत्या, लग्नं व्हायची होती तेव्हा हे दोघं वर्षाकाठी एकदा यात्रा कंपनीबरोबर फ़िरून यायचे. तेव्हा माईंना उभारी होती, मुलींची सोबत होती. पण धाकट्या मायाचं लग्न झालं ५ वर्षापुर्वी आणि माईही एकदम खूप थकल्या. तशी त्यांना कुठली व्याधी नव्हती, पण शरिरच साथ देईना. गरगरल्यासारखं व्हायचं, मधेच चक्कर यायची, जीव घाबरल्यासारखा व्हायचा, विस्मृति होत होती- कधी औषध घ्यायच्याच नाहित, कधी दोनदा तेच घ्यायच्या.. त्यामुळे त्यांच्या सोबत सतत कोणी ना कोणी लागायचं.. तसं दोन-तीन तास एकट्या राहू शकत त्या, पण त्यापेक्षा जास्त वेळ नाही. मनानीही निवृत्त झाल्यासारख्या झाल्या सगळ्यातूनच.

माईंची सगळी हयात सांगलीतच गेली. सासर-माहेर सगळं इथेच. दादाकडे मुंबईला आधी जात असत त्या. २-३ महिने रहायच्या, पण त्यांना मुंबई आवडायची नाही विशेष. तसंच नातींची लग्नं झाल्यावर त्यांच्याकडेही त्यांचे संसार पहायला जाऊन आल्या होत्या एकदा. आता मात्र बाहेर थांबलं होतं. घराबाहेर पडलं की भिती वाटायची, हेलपाटे जायचे. एक छोटी चक्करही मारता येईल असा विश्वास नव्हता. त्यामुळे माई सतत घरीच असायच्या. कोणी आलं तर विरंगुळा, नाहीतर थोडा वेळ टीव्ही, थोडा वेळ वाचन करायच्या. जयश्री, त्यांची मुलगी सांगलीतच होती. ती तिच्या संसारात, व्यापात असायची, जमेल तशी माईंना भेटायला यायची.

अशातच एक दिवस दादांचा जयंतरावांना फोन आला की ’आम्ही सिंगापूरचा प्लॅन करत आहोत, तुम्ही दोघं येणार का?’ असाच फोन दादांनी जयश्रीलाही केला होता. पण तिला काही कारणानी जमत नव्हतं, म्हणून दादांनी जयंताला विचारले. जयंतरावांच्या इच्छेनी एकदम उचल खाल्ली. पण माईचं कसं करायचं? तिला एकटं टाकून कसं जायचं? पण या वेळी जयश्री अगदी भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभी राहिली.
"मला माहित आहे जयंता तुला किती हौस आहे परदेशवारीची. दादा अनायसे जातोय, त्याची सोबत आहे, तर जा तुम्ही दोघंही त्यांच्याबरोबर."
"अगं, पण माई..."
"अरे, मी आहे ना इथे. माईला माझ्याकडे नेईन मी. २० दिवसाचा तर प्रश्न आहे. तशीही माई आताशा माझ्याकडे येत नाहीच. या निमित्तानी येईल. आणि तुम्हीही कुठेच गेला नाहीत रे मायाच्या लग्नानंतर. जा, जाऊन या. अगदी मनापासून सांगते."
"खरंच? पण आधी माईलाही विचारतो मी. ती ’हो’ म्हणली तरच जातो."
"विचार की. अरे माझ्याकडे मी नेतेय तिला म्हणल्यावर ती कशाला नाही म्हणेल रे?"
जयंतरावांना खूपच बरं वाटलं.
"तुला मी थन्क्स तरी कसं म्हणू जयश्री?"
"अरे असं का बोलतोस? माझीही आईच आहे ना ती? तुम्ही वर्षानुवर्ष तिचं करताय. १५-२० दिवस मी केलं तर त्यात काय मोठंसं? अगदी नि:शंक मनानी कळव तू दादाला तुमच्या येण्याचं."

तरीही जयंतरावांनी माईंना विचारलंच.
"माई, मी आणि राधा दादा-वहिनीबरोबर गावाला जायचं म्हणतोय- सिंगापूरला- २० दिवस."
"हो का? कधीसं?"
"वेळ आहे माई अजून. २ महिने आहेत. पण बुकिंग आधी करावं लागतं ना. जयश्रीकडे राहशील का माई तेवढे दिवस?"
"जयाकडे?" माई विचारात पडल्या. जुन्या वळणाच्या त्या. जावयाकडे रहाणं पटत नव्हतं. पण इलाज तरी काय होता? त्या परस्वाधीनच होत्या आता. सोबतीची गरज होतीच त्यांना. त्या गप्प बसल्या पाहून जयंतराव गडबडले. त्यांना वाटलं माईंना आवडलं नाही की काय?
"माई, जया आपणहोऊन म्हणाली की तुला नेईल तिच्याकडे म्हणून. नाहितर आपण बोलावूया का तिला इथे रहायला तितके दिवस?"
माईंना कळत होतं जयंता इतका अधीर का झालाय ते. दोघं बिचारे कुठेच गेले नव्हते किती वर्ष झाली. राधा बिचारी तर घर एके घर करायची सतत. त्यांच्यामुळे दोघही कसे बांधल्यासारखे झाले होते. त्यांनाही बदल करावा असं वाटलं तर बिघडलं कुठे असा विचार केला माईंनी..
"जयंता जा तुम्ही. मी राहीन जयाकडे. कळव तू दादाला तसं."

आपल्या मनातली इच्छा अशी झटकन पूर्ण होईल असं जयंतरावांना वाटलच नव्हतं. मग त्यांनी वेळ घालवला नाही. लगेचच दादाला कळवलं, योग्य रकमेचा चेकही पाठवून दिला. राधाताईही हरखल्या. तेच ते दिवसचे दिवस करून कंटाळा आला होता त्यांनाही. पण सासूची जबाबदारी होती त्यांच्यावर आणि त्या करायच्याही माईंचं मायेनी. माईंना त्यांची आणि त्यांना माईंची सवय झाल्यासारखी होती. माईंनी या वयात इतका समजूतदारपणा दाखवला याचं त्यांना खूप कौतुक वाटलं. पण आता रूटीन मधे बदल होणार म्हणून खूप बरंही वाटलं त्यांना. मनातल्यामनात खूप बेत सुरु झाले त्यांचे. नातवंडांसाठी कायकाय घ्यावं याची लिस्ट तयार झाली. मुलींना वरचेवर फोन करून मनातल्या शंका विचारत होत्या त्या. तसंच जयावन्संकडेही येणंजाणं चालू होतं. माईंना कायकाय लागेल, त्यांची औषधं, त्यांना एकदा डॉक्टरकडे नेऊन आणणं, तपासण्या करणं हे सुरु केलं त्यांनी.

बघता बघता २० दिवसच राहिले निघायला. त्या दिवशी राधाताई नेहेमीसारख्या उठल्या, दूधं तापवली तरी माईंची चाहूल नाही! वास्तविक माई पहाटे ५ पासूनच जाग्या असायच्या. राधाताईंना वाटले की झोप लागली असेल पहाटे, म्हणून त्या उठवायला गेल्या नाहीत. जयंतराव फ़िरायला गेले होते. ते ७ वाजता परत आले तरी माई झोपलेल्याच. राधाताई घाबरल्या. नको त्या शंकेनी दोघेही माईंच्या खोलीत गेले. पण माई अचेतन होत्या. झोपेतच कधीतरी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते.

जयंतरावांना एकदम धक्काच बसला! राधाताई तर मटकन बसल्याच खाली. दोघांना पटकन काही सुधरेनाच!

पण शेजारचे जोशीकाका, काकू मदतीला धावले. त्यांनी डॉक्टरांना बोलावले. व्रुद्धापकाळामुळे माईंचा हार्टफ़ेल झाला होता! जयश्री आणि बाकी सगळे नातेवाईक जमले, दादा-वहिनीही ताबडतोब आले. अखेर सगळे सोपस्कार पार पडले.

४-५ दिवस झाले होते या घटनेला. दुपारची वेळ होती.. जयश्री आली घरी. सुदैवाने घरात या चौघांशिवाय कोणीच नव्हते हे पाहून जयश्रीला हायसंच वाटलं. तिला आज जे काही बोलायचं होतं त्यात बाहेरचे लोक नको होते तिला.

तिने आधी राधाताई आणि वहिनींना बाहेर बोलावलं. दादा आणि जयंतरावांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटलं.
"तुम्ही तुमच्या सिंगापूर ट्रिपचं काय करताय?" जयश्रीनी दादांना विचरलं. घरात ते मोठे, त्यामुळे निर्णय तेच घेणार होते.
"काय करताय म्हणजे? रद्दच झाली ती आता."
"कळवलंत का तसं टूर कंपनीला?"
"नाही, या गडबडीत कळवायचं राहिलं बघ. आत्ता लगेच कळवतो. अजून १५ दिवस आहेत. त्यांनाही आमच्या जागी कोणी नवीन लोक मिळतात का ते पहायला वेळ मिळेल. जयंता, तुझ्याकडे ते कागद पाठवले होते ना मी, ते दे. त्यावर असेल फोन नंबर त्यांचा."
"हे तुमचं ठरलच का म्हणजे?"
दादा एक मिनिट पहातच राहिले जयश्रीकडे. त्यांनी बाकीच्यांकडेही पाहिले. तिघेही तिच्याकडेच बघत होते.
"आता, ठरवायचं काय आहे त्यात? ठरल्यातच जमा आहे ते! माईचं हे असं झाल्यानंतर आम्ही ट्रीपला जाऊ का?"
वहिनी म्हणाल्या, "वन्सं, हे म्हणतात ते बरोबर आहे. आत्ता सगळ्यांनाच खूपच धक्का बसला आहे. ट्रिपला जायचा, फ़िरायचा उत्साह तर पाहिजे ना. आणि ते बरोबरही दिसणार नाही."
"बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, आणि एरवी मी असे प्रश्न विचारलेही नसते. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे... तुमचं जायचं ठरल्यानंतर मी आले होते एकदा घरी माईला सोबत म्हणून.. राधा-जयंता तुम्ही खरेदीला बाहेर गेला होतात तेव्हा. माई तेव्हा खूप गंभीर झाली होती.. मला म्हणाली ’माझ्यामुळे या मुलांना उगाच अडकून पडल्यासारखं होतं. मला फ़ार अपराधी वाटतं याबद्दल. आता हौसेनी हा घाट घातला आहे, तर तो धड पार पडूदे. माझं मधेच काही आजरपण उद्भवलं नाही म्हणजे मिळवली. राधा-जयंता किती दिवस झाले कुठे गेले नाहीत. बांधून घातल्यासारखे झालेत उगाच.. मुलांची ही ट्रिप निर्विघ्नपणे पार पडूदे हीच प्रार्थना करते जया आता. अजून देवानी आयुष्य तरी किती दिलंय कोण जाणे. माझा सगळ्यांना किती त्रास होतो गं, लवकर सुटकाही होत नाही. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या..देवानी लवकर सोडवावं आता यातून..’"

जयश्रीला सांगता सांगताच दु:खाचे कढ आले. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं.

थोडं सावरून जयश्री पुढे म्हणाली, "म्हणूनच तुमच्याशी बोलायला मुद्दाम आले मी अत्ता. मला माहित होतं की तुम्ही या परिस्थितीत गावाला जायचा विचारही करणार नाही. पण ’तुम्ही जा’ असं आवर्जून सांगायला आले मी. माईची शेवटची इच्छा म्हणून तरी.. तिच्या इच्छेचा मान राखा. तिला मनापासून वाटत होतं की तुम्ही जाऊन यावं, कोणत्याही कारणानी त्यात विघ्न येऊ नये.. तिच्यामुळे तर अजिबात नाही.. एक पूर्ण समधानी आयुष्य जगली ती.. आणि मृत्युही अगदी सुखानी आला तिला. तिच्यासाठी शोक करू नका. मोकळ्या, खुल्या मनानी ट्रिपला जा, फ़िरून या. आणि लोकांची, नातेवाईकांची.. ते काय म्हणतील याची चिंता करू नका. ते माझ्यावर सोडा. माईचे दिवस झाल्यावरही थोडे दिवस आहेत मधे, तोवर आपण सगळेच सावरू. तुम्ही फ़िरून आलात की या दु:खाचा विसर पडायला मदतच होईल. दादा, बरं झालं तू टूर कंपनीला फोन नाही केलास ते."

चौघही विचारात हरवले. माईला ही अशी सुटका हवी होती अशी कल्पनाही नव्हती त्यांना. मुळात तिचं बंधन असं वाटलं नव्हतं कधीच.. पण माईंना मात्र कंटाळा आला होता. आपला संसारात काहीच उपयोग नाही, मग आपण जगतोय तरी कशाला? मुलं प्रेमानी करत आहेत, पण किती वर्ष त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची? तीही साठीच्या पुढेमागे होती आता. या वयातही केवळ आपल्यामुळे त्यांच्या जगण्यावर बंधन येत आहे हे सहन होत नव्हतं त्यांना. एकटा मृत्युच काय ती आपली सुटका करेल या सगळ्यातून.. फ़क्त आपलीच नाही तर मुलांचीही.. बहुदा काळाने माईंचे विचार ऐकले होते...

पण आपली खरच सुटका झाली आहे का? आणि त्याचा आनंद मानावा की दु:ख? हे चौघांनाही समजेना. माईच्या आठवणींमुळे सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू होते...




Rajya
Wednesday, May 23, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, छानच. :-)

असं माणसानं एका दमात कथा संपवावी, म्हणजे लवकर लिही, लवकर लिही अशी भुणभुण लागत नाही मागे.


Supermom
Wednesday, May 23, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, सुरेख कथा.
छानच जमलीय. अन एका झटक्यात पूर्ण केलीस हे बेष्ट.


Kmayuresh2002
Thursday, May 24, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम,छान मांडली आहेस गं कथा.. आपल्या आसपास घडु पाहणारी... आणि मुख्य म्हणजे आटोपशीर आहे.
मानवी नातेसंबंधांवरील कथा लिहिण्यात आता तुझा हातखंडा झाला आहे:-). मुख्य म्हणजे tV वरील मालिकांसारखी ही नाती अती जटील आणि अनिर्बंध नसतात.. किंवा ओढुनताणुन वागणारीही नसतात.. अतिशय सरळ, साधी आणि आपलीच वाटणारी असतात.
ही तुझ्या लिखाणाची खासियत आहे आणि म्हणुनच तुझं लिखाण भावतं मनाला.


Maasture
Thursday, May 24, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पुन्हा एकदा एक सपक, रटाळ, नीरस, शेवटी लाBअच्या लांब संवाद असलेली, अगदीच फुटक्ळ कथाबीज असलेले लेखन. याला तर कथाही म्हणता येत नाही. बाजूच्या घरात घडलेल्या सर्वसाधरण घटनेनेचे शैलीहीन व कंटाळवाणे वर्णन म्हणता येईल.

वारंवार वेगवेगळ्या बीबीवर जऊन मला प्रतिसाद द्या असा जोगवा मित्रांकडे मागून हवे तसे अभिप्राय मिळाले तरी त्यामुळे प्रत्यक्ष सुढारणेला मुळीच फायदा होत नाही.

दाद चांगल लिहितेय, चाफ्यातही उत्तरोत्तर सुधारणा होतेय. तुम्ही थोडतरी चांगल लिहायचा किमान प्रयत्न तरी करा हो.


Psg
Friday, May 25, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मास्तुरे- हे आतापर्यंत उघड आहे की तुम्हाला माझे लेखन आवडत नाही.. मी काहीही लिहिले तरी ते तुम्हाला कंटाळवाणे, नीरस वाटते. तरी सुद्धा प्रत्येक वेळी आवर्जून ते तुम्ही वाचता आणि तीच ती comment देता याबद्दल तुमचे कौतुकच वाटते मला! धन्यवाद.

कथा काही वाचकांना आवडते, काहींना नाही. त्याबद्दल तुम्ही अवश्य मत द्या. परंतु, मी माझ्या मित्र-मैत्रिणींकडे जोगवा मागते का, ते मला मला हवी तशीच comment देतात का.. या कशाशीच तुमचा संबंध नाही आणि तुम्ही कृपया त्यावर काहीच बोलू नका.

आणि तुम्ही प्राध्यापक आहात म्हणे! मग तुम्हाला इतके तरी नक्कीच माहित असेल की एखाद्या विद्यार्थ्याची तुम्ही सतत हेटाळणी केलीत, सतत टाकून बोललात तर तो कधीच सुधारणार नाही! तुम्हाला करायचाच असेल तर constructive criticism करा. तुम्हाला मला 'सुटका' मधे काय म्हणायचे होते ते समजले आहे, मग मला 'चटपटीत संवाद, विनोदी शैली, ई' असलेली तीच कथा, किंवा किमान एक प्रसंग तरी लिहून द्या. माझी शिकायची तयारी आहे.

आणि सर्वात शेवट.. माझ्यात सुधारणा व्हावी ही तुमची जी कळकळीची इच्छा आहे (म्हणे!) ती तुमच्या खर्‍या नावानी व्यक्त केली असतीत तर जास्त भावले असते.


Maasture
Friday, May 25, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पूनमवैणी, तुम्ही गैरसमज करून घेताय वा देताय. ते दूर करण्याचा माझ्यापरीने प्रयत्न करतो.

मास्तुरे- हे आतापर्यंत उघड आहे की तुम्हाला माझे लेखन आवडत नाही..
लेखन कुणाचे आहे यावर ते आवडते की नाही हे मी ठरव्त नाही. ते कसे आहे यावर ते ठरते
मी काहीही लिहिले तरी ते तुम्हाला कंटाळवाणे, नीरस वाटते. तरी सुद्धा प्रत्येक वेळी आवर्जून ते तुम्ही वाचता आणि तीच ती comment देता याबद्दल तुमचे कौतुकच वाटते मला! धन्यवाद.
पुन्हा तेच. अहो लेखक हा माझ्या वाचना फोकस नाही, लेखन हा आहे. की काही केवळ तुमचेच लेखन आवर्जून वाचत नाही. मी महिन्यातून दोन ते तीन वेळा इकडे येऊन गुलमोहोरवर लिहिलेले सर्वांचे गद्य लेखन आवर्जून वाचतो, आणि त्यावर प्रतिक्रिया देतो. तसेच तुम्ही इतरत्र जे काही लिहिता ते वाचून तिथे कधीच प्रतिक्रिया द्यायला येत नाही.
परंतु, मी माझ्या मित्र-मैत्रिणींकडे जोगवा मागते का, ते मला मला हवी तशीच comment देतात का.. या कशाशीच तुमचा संबंध नाही आणि तुम्ही कृपया त्यावर काहीच बोलू नका.
संबंध कसा आहे ते सांगतो. मी माझे मत द्यायला सुरूवात केली तेंव्हा मला असे दिसले की तुमच्या अगदी सुमार लेखनालासुद्धा एरवी गुलमोहर किंवा इतर कुठल्या चांगल्या बीबीवर चुकुनही न फिरकणारे लोक येउन वा वा म्हणून जात आहेत. नंतर लक्ष ठेवले असता दिसले की तुम्ही कथा टकली की SG Road अशा ठिकाणी जाउन तिथे त्या वेळेला असलेल्या दोन तीन दोन तीन लोकांची नावे घेउन 'अरे मी कथा टाकली आहे रे वाचा आणि आभिप्राय द्या' अशी बर्‍याचदा पोस्ट टाकता. तसे करून अनुकूल अभिप्राय मिळवायला मी काहीच हरकत घेतली नाही, पण असे करून पॉप्युलर असल्याचा फक्त आभास निर्माण होतो, खरच लेखनाचा दर्जा वाढत नाही हे माझे मत मी नोंदवले जे करण्याचा मला हक्क आहे.

constructive criticism

माझा प्रत्येक प्रतिसाद नीट वाचा, मी कथेतले माझ्या मते काय चुकले आहे ते अगदी स्पष्ट शब्दात लिहिले आहे. फालतू कथा असे अर्थहीन लिहिले नाही. त्यातले सत्य मान्य करण्याची आणि सुधारण्याची तुमची तयारी नाही तर नसू दे मला काहीच फरक पडत नाही.
पण ते झाकण्यासाठी तुम्ही तुमच्याबद्दल मला काही आकस आहे असे जे चित्र उभे करायचा प्रयत्न करता आहात तो काही पटला नाही.

आता दादसारखे चांगले लिहा म्हटले तर तुम्हाला वाटते की या कथेत चतपटीत अथवा विनोदी संवाद घालावेत. अहो इतका ढोबळ अर्थ नाका घेउ प्रतिक्रियेचा. या कथेत तसे संवाद कसे चालतील ? दादसारखे म्हणजे तसे दर्जेदार असे म्हणायचे होते मला.

मला काही इथे वाद घालायचा नाही. प्रतिक्रिया दिली आणि देणार, पटली तर घ्या नाहीतर आकसापोटी दिली, माझे लेखन महानच आहे असे म्हणून सोडुन द्या.






Psg
Friday, May 25, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रिया दिली आणि देणार, पटली तर घ्या नाहीतर आकसापोटी दिली, माझे लेखन महानच आहे असे म्हणून सोडुन द्या.

ही भाषा फ़ारच ओळखीची वाटत आहे. :-)
सगळ्याबद्दल बोललात.. तुमच्या identity बद्दलही सांगा की!



Maasture
Friday, May 25, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आय्डेंटिटी, तुमची आयडेंटिटी हा मुद्दा नाही. तर तुमचे लेखन कुठल्या दोषांमुळे कथा म्हणवून घ्यायच्या पात्रतेचे नाही हा मुद्दा होता. तसेच त्याचे तुम्ही करत असलेले प्रमोशन हा मुद्दा होता. त्याट मी काय सुधारणा सुचवत होतो आणि तुम्ही ते शब्दश्: घेउन काय घोळ घातलात हा मुद्दा होता.
त्यावर बोलण्यासारखे काहीच नसेल तर तसे सांगा, उगाच वैयक्तिक पातळीवर उतरू नका.


Psg
Friday, May 25, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगाच वैयक्तिक पातळीवर उतरू नका.
!! हे तुम्ही म्हणताय??

बरं बाबा.
हां. सांगा आता. कथाबीज फ़ुटकळ आहे असं म्हणताय. बरं. विस्तार करता का?


बाजूच्या घरात घडलेल्या सर्वसाधरण घटनेनेचे शैलीहीन व कंटाळवाणे वर्णन म्हणता येईल.
बरं. म्हणूनच म्हणलं की अशी घटना घडल्यावर 'चटपटीत संवाद' कसे साधतात लोक ते सांगा ना.

त्याचे तुम्ही करत असलेले प्रमोशन
तुमचा इथे काही संबंध नाही. मी तुमच्यापाशी 'जोगवा' मागितला नव्हता, तरी तुम्ही आलातच ना? :-) तेव्हा हा मुद्दा सोडूया आपण. कथेबद्दलच बोलूया, काय?

त्याट मी काय सुधारणा सुचवत होतो आणि तुम्ही ते शब्दश्: घेउन काय घोळ घातलात हा मुद्दा होता.
मी कोणताच घोळ घातला नाहीये. तुम्ही सुचवलेल्या सुधारणा समजल्या नाहित. बाकीचे छानच लिहितात. पण आपण 'सुटका' बद्दलच बोलूया. हं.. सांगा..

Meenu
Friday, May 25, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैयक्तिक पातळीवर पूनम नाही उतरली आहे तर आपण स्वतः उतरलात. तुम्हाला कथा आवडली नाही हे तुम्ही कळवलत चांगलं केलत.

प्रतिक्रीया वाचुन मलाही असच वाटलं की जरा कथा इतकी रटाळ, सपक इ. इ. असेल तर तुम्ही ती शेवटपर्यंत वाचायचे आणि प्रतिक्रीया द्यायचे कष्ट कशाला घेतलेत?

मागे एकदा पूनमच्या कथेवर मास्तुरे अशा भेकड खोट्या नावानी तुम्ही असलीच प्रतिक्रीया दिली आहेत. खर्‍या नावानी हे बोलायचं तुमचं धाडस का होऊ नये ..?

बरं एकदा पूनमचं लिखाण आपल्याला आवडत नाही म्हणल्यावर परत परत तेच वाचायची चुक का करता आपण ..?

तीचं लिखाण इतरांशी compare करुन काड्या घालायची काय गरज? दाद, चाफा आणि पूनम ह्या तिघांचीही शैली आणि विषय पुर्णपणे वेगळे आहेत. तेव्हा त्यांची तुलना करणं योग्य ठरणार नाही.

आणि आपण स्वतः पूनमची हीच कथा पुन्हा लिहून दाखवा बरं चांगल्या पद्धतीनी .. इथे वाद घालण्यासाठी इतकं लिहीण्यात वेळ घालवण्यापेक्षा कथा लिहून काढण्यात घालवा.

sgroad वरची सर्व लोकं पूनमला personally ओळखतात. त्यामुळे तीथे त्यांच्याशी ती काय बोलतेय. जोगवा मागतेय का अजुन काही यात तुम्ही न पडलात तर बरं. असली मोफत detective गिरी करुन तुम्ही स्वतःचं हसं कशाला करुन घेताय.


Bhramar_vihar
Friday, May 25, 2007 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..... खरा आयडी वापरुन लिहायचं का टाळता मास्तुरे??

पूनम, मला आवडली कथा.. आणि मी एसजी रोडचा नाहीये! :-)


Rajya
Friday, May 25, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मास्तुरे, तुम्ही मास्तर होता तर.

पूनम, मग काय चुकलं त्यांचं?

मास्तर होते त्या काळात अंगात रग असेल, मस्ती आली की ठोकायला समोर निष्पाप मुलं आहेतंच.
आता मास्तुरे रीटायर झाले असतील. त्यांचं, मुलं, बायको कोणीही काहीही ऐकत नसेल. मग उद्योग काय करणार?
दर महीन्याच्या एक तारखेला बॅकेत जाऊन पेन्शन घेणे व उरलेले दिवस उगवत्या तरुणाईच्या नावाने नसलेले दात खाणे. आणखी एक उद्योग म्हणजे ओळख न दाखवता लपुन छपुन (या वयात मोडलेली हाडे जुळत नाहीत म्हणुन) काड्या करणे.

मास्तुरे, चालु द्या तुमचं मी आहे तुमच्या पाठीशी. तुमच्यासाठी एक चारोळी पण केली आहे मी, याला आपले ध्येय बनवु आपण.

कोणी निंदा
कोणी वंदा
काड्या करणे
हाच आमचा धंदा.

पूनम, तुझं चालुदे.


Kmayuresh2002
Friday, May 25, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मी एसजी रोडचा नाहीये!.. आणि असे असुनसुध्दा तू या कथेला चांगले म्हणतोयस?काय हे भ्रमा, शो. ना. हो.:-) तू,मीनु कधी गुलमोहरासारख्या चांगल्या बीबींकडे फ़िरकता तरी का? आणि पूनमने कथा लिहिली की मात्र लगेच येता आणि वाचुन चांगलं म्हणता. छे.. छे.. छे.. :-)
अरे इथे मराठी साहित्याचे एवढे गाढे अभ्यासक आपलं बहुमोल मतप्रदर्शन करत आहेत आणि तुम्हाला त्याची किंमतही असु नये.. अरे रे..:-)
बाकी काही म्हण पूनम, आवडत नसुनसुध्दा तुझ्या कथाना भलताच भाव देतात बुवा लोकं..:-) रकानेच्या रकाने लिहिण्यासाठी वाया घालवत आहेत. कारण काय तर तुझ्यात सुधारणा व्हावी गं.. त्यांची तळमळ आणि त्या मागची मळमळ जरा समजुन घे गं.. लोकांमध्ये साहित्यिक सुधारणा घडवुन आणण्याचा उदात्त हेतु बाळगुनच हे विविध रुपांनी अवतरतात मायबोलीवर.. ते तरी काय करणार म्हणा.. कर्तव्याला बांधील आहेत ते आपल्या..

कुणी निंदा कुणी वंदा
लोकसुधारणा हाच आमचा धंदा..


Kmayuresh2002
Friday, May 25, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या,सेम पिंच रे..:-) कुणी निंदा... :-)

Shraddhak
Friday, May 25, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद चांगल लिहितेय, चाफ्यातही उत्तरोत्तर सुधारणा होतेय. तुम्ही थोडतरी चांगल लिहायचा किमान प्रयत्न तरी करा हो. <<<<
मास्तुरे, कथा तुम्हाला अजिबातच आवडली नाही हे कळलं. पण वरीलप्रकारे सुधारणा सुचवल्या तर त्या पूनमने कशा अमलात आणाव्यात ते जरा सांगता का? दाद आणि चाफा यांच्या बाबतीत तुम्ही उल्लेखिलेल्या गोष्टी सत्य असतीलही पण पूनमला ही माहिती जाणून घेऊन नक्की काय फायदा होईल असे आपल्याला वाटते?
आणि अहो, कथा फालतू आहे ह्या शब्दांत तुम्हाला negative प्रतिसाद संपवता आला असता. तिथे तुम्ही सपक, रटाळ, नीरस, शैलीहीन वगैरे शब्दसंपदा वापरून तो मुद्दा प्रचंड मोठा लिहिला आहे.
पूनमच्या तथाकथित अभिप्रायांचा जोगवा मागण्यावरही तुम्ही एक परिच्छेद लिहिलायत.
मग खरोखर उपयुक्त ठरतील अशा प्रतिक्रिया लिहिताना हात आखडता का घ्यावा? तिथे मात्र ' दाद आणि चाफा कसे लिहितात, तुम्ही चांगलं लिहायचा प्रयत्न करा हो ' अशी मोघम वाक्यं. Strange श्रीयुत मास्तुरे!

" मला ही कथा अजिबात भावली नाही.
मला खटकलेले मुद्दे :
१.....
२..... "

हा format वापरता येतो का बघा बरं? खरोखर एखाद्याचे लिखाण सुधारण्याची तळमळ असेल तर संगतवार मुद्दे द्या. उदा. अमुक पात्र नीट रंगवले नाही, अमुक एक भाग अमुक अमुक कारणाने पसरट वाटला, अमुक भाग गाळला असता तर कथा चांगली वाटली असती, इत्यादी, इत्यादी.

हे लिहिल्यावर लेखिका योग्य तो बोध घेईल यातून. न घेतला तर तिची मर्जी! तिची वाटचाल अतिशय कूर्मगतीने होत आहे म्हणून सोडून द्या.


वारंवार वेगवेगळ्या बीबीवर जऊन मला प्रतिसाद द्या असा जोगवा मित्रांकडे मागून हवे तसे अभिप्राय मिळाले तरी त्यामुळे प्रत्यक्ष सुढारणेला मुळीच फायदा होत नाही.<<<<
अशा वैयक्तिक आरोपांचे काय प्रयोजन? तुम्ही म्हटलंय तसे अभिप्राय तिला मिळाले तर मिळू द्या की. तिची सुधारणा होणार नाहीये, याचा फायदा / तोटा तुम्हाला काहीच नाही ना?
असो.



Nandini2911
Friday, May 25, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा... इतके जण का लिहत आहेत बरे?
लक्ष देऊ नका. यापेक्षा चांगला उपाय नाही. मास्तुरेना खरोखर सुधारणा सांगायच्या असत्या तर त्यानी केव्हाच सांगितल्या असत्या. त्याना काड्या करण्यात इंटरेस्ट आहे. मग जाऊ दे ना.. बोलू दे काय बोलायचे आहे रे. पूनम कथा छान लिहितात. वाचणारे वाचतील, आवडत नाही ते सोडून देतील. हाय काय नि नाय काय... आपण लिहत जावे हेच खरे.


मास्तुरे प्राध्यापक आहेत म्हणे. त्याना लिहायचा अनुभव नाही. मग ते का बरे बोलत आहेत?
कोल्हापूरला कुठल्या कॉलेजातले तुम्ही प्रोफ़ेसर? ते कळेल का जरा...

च्यायला.... सोडून द्या विषय. अशाच्या नादी न लागणे हेच उत्तम. ज्याला आपल्या लेखनात सुधारणा हवी असते तो नेमक्या शब्दात सांगतो. खुपेल किंवा मला जास्त समजते अशा थाटात बोलत नाही.




Zakki
Friday, May 25, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला इथे 'फायनल ड्राफ्ट' या नाटकाची का बरे आठवण होत आहे? एक मास्तर नि एक मुलगी, चांगली कथा याबाबत चर्चा करताहेत म्हणून?


Kmayuresh2002
Friday, May 25, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी,जेव्हा अती होतं ना तेव्हा असं मैदानात ऊतरावचं लागतं गं सगळ्यांना.. पूनमच्या मागच्या कथेच्या वेळीही असाच प्रकार झाला होता तेव्हा सगळे शांतच राहिले होते.. पण संयमालादेखील मर्यादा असते ना.:-)

Nandini2911
Friday, May 25, 2007 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर, मला पूर्ण अनुभव आहे अशा गोष्टीचा. माझ्या कथेवर बघ काय चालू आहे. या लोकाना भांडण लावुन देणे हाच उद्योग असतो. आपण वाईट म्हणून बाजूला व्हायचं. कुणीतरी मधे पडणार. आणि मग त्याच्या विरोधात कुणीतरी. मग वाद भलतीकडेच जाणार. चांगले वातावरण गढूळ करायचे. सगळॅ हसत खेळत आहेत ते बघवत नाही काही पोटशूळवाल्याना.

बरं ज्याला आपण बोलतो त्याला ओळखतो का? ती व्यक्ती नक्की कशी आहे हे न बघताच हवे ती विशेषणे चिटकवली जातात. मला हे लक्षात आल्यापासून मी अशा लोकाना भीक घालत नाही.

मुळात मला हेव्यादव्यामधे इंटरेस्ट नसतो. पूनम चांगले लिहिते हे ज्याना ठाऊक आहे ते तिची कथा भ्कार आहे हे कुणी दहादा सांगूनही वाचणारच ना..

या लोकाचा प्रॉब्लेम हा असतो कि यानी कधी populist लिखाण वाचलेलं नसतं. आता ज्याला शेक्सपीअर आवडतो त्याला सीडनी शेल्डन जरा कठीण जाणार ना.. :-)

तेव्हा आपण याच्याकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम मार्ग. याच्या सूचनेतून काही शिकण्यासारखं असेल तर जरूर घ्यावं. पण मनाला लावून मात्र घेऊ नये. हा वाद लवकर संपावा हीच इच्छा...

नाहीतर हल्ली मायबोलीवर कथापेक्षा वाद जास्त रंगत आहेत. v&C वर कथा लिहू या का? एक भा प्र.






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators