Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 26, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » ललित » ट्रकवारी » Archive through May 26, 2007 « Previous Next »

Nandini2911
Friday, May 25, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी आपल्या काय अभिलाषा असतात ना. सगळ्याच पूर्ण होतील असं नाही. आणि पूर्ण झाल्याच तर मग मनातल्या चोरकप्प्यात काय जपणार? सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने माझ्या बर्‍याचशा अशा मोठ मोठ्या अभिलाषा पूर्ण झाल्यात. खरंच खोटं नाही... मात्र ज्या छोट्याशा अपेक्षा होत्या ना त्या मात्र अपूर्ण राहिल्या. किंबहुना अजून पूर्ण झाल्या नाहीत, असं म्हणणं जास्त योग्य नाही का?

लहानपणी आमची एकच छोटीशी खोली होती. तेवढंच घर होतं. कोल्हापूरला टेंबलाईच्या टेकडीखाली आम्ही रहायचो. मी खुप लहान होते. आई पपा आणि मी असं तिघंच. पण बाकीच्याची मोठ मोठी घरं. सेपरेट रूम्स. अवघी पाच सहा वर्षाची असताना आईने देवाकडे काही माग म्हटलं की मी मनातल्या मनात मागायचे "देवा, मोठं घर दे. माझी वेगळी रूम दे." देवाने ऐकले. मोठंच्या मोठं घर दिलं नऊ खोल्याचं. आणि मला मात्र हॉस्टेलवर रहायला पाठवलं. तिघीमधे एक रूम शेअर करण्यासाठी.

पाहिलं, माझं काय असंच होतं. सांगायचं असतं एक आणि सांगत बसते भलतंच. आता माझं किती मोठं घर आहे, किती स्क़ेअर फ़ूट वगैरे नाही मी ऐकवणार... त्याऐवजी मी तुम्हाला एक वेगळीच गंमत सांगणार आहे.

माझी लहानपणापासून प्रबळ इच्छा होती ट्रक ड्रायव्हर किंवा क्लीनर व्हायची.. का याचं उत्तर माझ्याजवळ देखील नाही. वयाची पंचवीशी गाठपर्यन्त ही इच्छा पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झालंच होतं. पण म्हणून मनातली इच्छा अजून मेली नव्हते. पण ती पूर्ण होईल आणि इतक्या नाट्यमय पद्धतीने हे मात्र वाटलं नव्हतं.

अरे दचकू नका. मी कुठे ट्रक चालवायला गेले नव्हते. हा.. पण माझी ट्रक मधली सफ़र मात्र मजेदार होती. तर चला माझ्यासोबत पनवेल ते बार्शी. ट्रकमधून. रात्री साडेनऊवाजता.

मे महिन्याची बारा तेरा तारीख. मला बार्शीला मझ्या आजीच्या चौदाव्याला जायचं होतं. जायचं नाही जायचं. सुटी मिळते नाही मिळते अशा नेहमीच्या कसरती करून झाल्यावर मी एकदाची शनिवारी निघाले. आधीच ठरवलं होतं, प्रवास करायचा तर रात्रीचाच. या भागातून दिवसा फ़िरणं म्हणजे ताप असतो नुसता. ऊन राक्षसासारखं पिडतं. त्यापेक्षा रात्रीचा प्रवास बरा. झोप होत नाही ही गोष्ट खरी आहे पण मी तीन चार रात्री सलग जागरणं करु शकते. अर्थात दिवसा न झोपता.

रात्री आठ वाजता पनवेल स्ट्यांडला पोचले. इथलं एक वैशिष्ट्य आहे. हवी ती बस कधीच येत नाही. आणि आली तरी ती रिकामी नसते. पंढरपूर, तुळजापूर, लातुर, अशा बसेस नसत्या येत होत्या आणि जात होत्या. मी मात्र तशीच उभी होते.


Nandini2911
Friday, May 25, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जवळ जवळ अर्धा तास झाल्यावर मात्र मला पर्यायी व्यवस्था शोधणं गरजेचे आहे असं वाटायला लागलं. बार्शी सोलापूर जिल्ह्यातला एक तालुका आहे. मात्र अजून बरंचसं मागासलेलं हे गाव आहे. इथे travels बसेस जात नाहीत. ट्रेन मिळायचे चान्सेस नाहीत.
स्टॅडबाहेर येऊन तरी पण मी चौकशी सुरू केली. लातुरला Travels वाले जातात. तिथे कुठे सीट मिळाली तर मी विचारत होते. कुठलीही travels ची गाडी आली की मी "लातुर? बार्शी?" असं आशाळभूतपणे विचारत होते. बहुसंख्य गाड्या मात्र गोवा साईडवाल्या.

च्यायला.. मला रत्नागिरीला जायचं असतं तेव्हा दिसत सुद्धा नाही. आणि आता चारशे रुपयात सीट घेऊन चालल्या होत्या. नशीबच असलं असतं त्यला काय करणार? वैतागून मी परत स्टॅडकडे चालले होते. तेवढ्यात परत दोन तीन बसेस आल्या. "शेवटचा ट्राय" मी स्वत्:ला बजावलं.

एकही बस थांबली नाही. कोण तरी कुणाशी तरी लग्न करत होतं, त्याच्या वर्‍हाडाला घेऊन या बशी चालल्या होत्या.

पाठोपाठ एक बस थांबली. "लातुर?" मी परत विचारलं. बोर्डवर कोल्हापूर लिहीलं होतं.

"काय ताई? लातुरला कुणीकडं.?" एका माणसाने विचारलं. तो पण तिथेच उभा होता.

"लातुर नाही बार्शीला जायचय. पण बस नाही मिळत आहे." मी त्याला उत्तर दिलं.
"किती शीटा?" त्यानं विचारलं.
"मी एकटीच."
"आणि सामान?"
"काहीच नाही."

"मग नाही जमणार, लेडीजना कसं नेणार?" तो बाजुच्याला म्हणाला.

"तुमच्याकडे सीट आहे?" मी जवळ जवळ ओरडले.
"आहे, पण बाईमाणूस आहे म्हणून नको,"
मला खरंतर इतका राग आला होता. एसटीने जाण्यापेक्षा प्रायव्हेट बसमधे जास्त सेफ़ असतं. तरीपण हा बाबा नाहीचा पाढा लावून बसला होता.

"कुठली सीट आहे तुमच्या बसमधे?" मी परत एकदा विचारलं.

तो माणूस आधी हसला. मोठ्याने. मग म्हणाला.
"ताई. बस नाही. म्हणून तर नको म्हणालो ना. ते बघा."

त्याने बोट दाखवलं तिकडे मी पाहिलं. Goods carrier लिहीलेला अशोक लेलेंडचा ट्रक. आणि मी यातून आठ तासाचा रात्रीचा प्रवास करणार??
तोही या अनोळखी पुरूषासोबत. ?? बाप रे!!. त्यापेक्षा मी पहाटेची बस पकडून जाईन.

मी स्वत्:लाच समजावत होते.
"कुठी निघालाय ट्रक?" कुतूहल काही शांत बसू देईना.
"बार्शीला. आम्ही बार्शीवरून माल घेऊन आल्तो. आता परत जाणार. आठवड्यातून दोनदा वारी अस्ते आमची." हा माणूस एकदम बोलका होता. मोठे मोठे डोळे. पान तंबाखूने काळे झालेले दात. तो टीपिकल पायजमा आणि शर्ट. आणि डोक्याला गांधी टोपी. साधारण पंचेचाळीशीचा असावा.
काही नाही तर मी बस येइपर्यन्त गपा तरी मारल्या असत्या. नाहीतरी आता रस्त्यावरची गर्दी कमी होत होती. अशावेळेला कोणाशी तरी ओळख करून ठेवावी. त्यामुळे मी पण त्याने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देत कधी मधे काहीतरी विचारत उभी ह्तोए. एकही बस मात्र येत नव्हती.

(क्रमश)


Rajya
Friday, May 25, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, हे काय खरं नाही.
असं जरा मूड लागतोय वाचायचा तोपर्यंत संपली पोस्ट.
कथा तुकड्यात न टाकता पुर्ण टाकावी असा काहीतरी नियम करता येईल का? जरा mod , admin कोण मदत करेल का बघतो?

नन्दुमावशी, बेष्ट.
आप लगे रहो.


Nandini2911
Friday, May 25, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साडेदहा वाजत आले तरी बस नाहीच. एसटी पण नाही. मी जवळ जवळ दीड तास त्या पनवेलच्या रस्त्यावर इकडून तिकडे फ़िरत होते. एक तर रात्रीची वेळ. वर मरणाचं ट्राफ़िक. मोठ मोठ्या गाड्या सुसाट जात आहेत. आणि मी एक तरी गाडी आपल्या गावाकडे जाते का ते शोधत.

जगदाळेमामाशी बर्‍यापैकी ओळख झाली. कशाला निघाली वगैरे विचारून झालं. तिथल्याच एका चहाच्या टपरीवर बोलता बोलता मी सहज बार्शीमधल्या माझ्या नातेवाईकाचा उल्लेख केला. माझ्या आजीची मावसबहीण बार्शीतच असते. तिचे दोन मुलगे डॉक्टर. मोठा शंकरमामा शेतीमधे. त्यामधला अतुलमामा माझ्या आजीची ट्रीटमेंट करत होता. त्याला ओळखत नाही असं बार्शीत कुणीही नाही. एमडीला तो राज्यात पहिला आला होता.
"म्हणजे, तुम्ही शंकररावाची भाची.." तो उद्गारला.
"तुम्ही शंकरमामाला ओळखता?" एक वेळ डॉक्टरमामाला बार्शीकर ओळखणार नाहीत पण शंकरमामा... अख्खी बार्शी ओळखते. सुखाच्या दु:खाच्या कुठल्याही प्रसंगी धवून जाणारा.
"अहो, ताई असं काय करता? ते आमचे थोरले बंधुच जणू. ते आहेत म्हणून तर आम्ही आहे."

डोक्यात एक प्लान बनत होता. जगदाळेमामाच्या बोलण्याने त्यालाच पुष्टी मिळाली. पण तरीही रिस्क फ़ॅक्टर होताच.

मोबाईलवरून शंकरमामाला कॉल केला.
"मामा.."
"अगं कुठे आहे तू? तुझ्या जीवावर मी अर्धी कामं टाकली आहेत. लवक ये" त्याने डायरेक्ट तासायलाच सुरुवात केली.

शंकरमामाचं आणि माझं चांगलं पटतं. त्याने मला पुलंचा नारायण असं नाव ठेवलय. घरात कुठलंही कार्य असलं की आमची जोडी असतेच. मी गोंधळ घालायला. तो गोंधळ निस्तरायला. पण त्याच्याकडून मला खूप शिकायला मिळतं. मी अख्खं लग्न आता लावून देऊ शकते. काय तयारी करावी लागते ते मला चांगलंच कळलय. अर्थात हे कार्य वेगळं होतं तरीही मी कुठे मदत करू शकेन हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याने मी येणार म्हटल्यावर catering आणि पूजेचं सामान या दोन गोष्टी माझ्या वर ताकल्या होत्या. त्यामुळे तो माझी इतकी वाट बघत होता.
"मामा, प्रॉब्लेम झालाय. गाडी मिळत नाही."
"मग लाल डब्याने ये."
"अरे तोच तर मिळत नाही ना.... इथे काहीच नाहीये. मी असं करते. घरी जाते. आणि उद्या पहाटे निघते. दुपारपर्यन्त पोचेन." मी त्याला सांगितलं.
"कशाला? यायचं तर आता ये नाहीतर येऊ नको." तो जवळ जवळ खेकसला.
"अरे मामा तुला ते ट्रकवाले जगदाळे माहीत आहेत का?"
"हो, त्याच्या इथे काय संबंध?"
"अरे, त्याचा ट्रक इथे उभा आहे. बार्शीलाच येईल ना तो पण..."
"तुझ्या आईला समजलं ना तर दोघाना घराबाहेर काढेल..."
"पण तिला समजलं तर ना.. "
"पण समजलं तर.. तर काय?"
"हे बघ.. आपण मांडवली करू. माणसं तुझ्या विश्वासातली आहेत. मी स्वत्:ची काळ्जी घेऊ शकते. काही वाटलंच तर तुला कॉल करेन. पण प्लीज रे... तू कुणाला सांगु नको. मी बार्शीला पोचल्यावर स्वत्: सांगेन.. ठीक आहे? "
"मी काय बोलू? त्या जग्याला फ़ोन दे." मी हसत हसत जगदाळेमामाच्या हातात फ़ोन दिला.

येस्स... एव्हरीथिंग वॉज क्लीअर.. माझी ट्रकवारी लवकरच सुरू होत होती.


मंडळी, नमनालाच घडाभर तेल ओतलं हे खरं आहे. पण येताय ना तुम्हीपण सोबत?



(क्रमश)


Nandini2911
Friday, May 25, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी जगदाळे मामाना सांगितलं..
"चला मी पण येते तुमच्यासोबत.." पलीकडून शंकरमामाने सेटिंग केलेलीच होती. त्यामुळे मी निर्धास्त होते.

बरोबर अकरा वाजता आम्ही तो रिकामा ट्रक घेऊन निघालो. जगदाळेमामा पाठी जाऊन झोपले. मला प्रवासात झोप येत नसल्यामुळे मी पुढे बसले. गूफ़र नावाचा क्लीनर ताबडतोब चादर घेऊन पाठी झोपायला गेला. ड्रायव्हारमामाचे नाव मजहर. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ही माणसं मला का भेटतात हे ठाऊक नाही. एक बरय.. मी मुसलमान मोहल्ल्यात वाढल्यामुळे कधीही माझे भलतेच नाव सांगून पळ काढू शकते. मजहरभाईनी मला पाहिलं आणि म्हणाले. "तो आज आप हमारे क्लीनर.."

मला एकदम सातव्या आसमानात वगैरे गेल्यासारखं वाटायला लागलं. आयला... ट्रकचा ड्रायव्हर नाहीतर नाही. क्लीनर तर सही. एक रात्रीसाठी का होईना.

आणि मग... हम निकले गड्डी लेके...

काय मस्त वाटत होतं. एवढा मोठा रस्ता. वळणावळणाचा. एक तर मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे एकदम मस्त. त्यावर रात्रीची वेळ. किंचित सुटलेली थंडी. मे महिन्यात खरं तर त्याला गारवा वगैरे म्हणतात. पण एकून तीपण थंडीच.

रस्त्यावर क्वचित दिसणारी वाहनं. दिसली तरी आपल्यापेक्षा बुटकी वाहनं. इतका सही प्रवास सुरू होता ना... मज्जा वाटत होती.

फ़क्त एक प्रॉब्लेम होता.. मजहरभाईनी हिमेश रेशमियाची गाणी लावली होती. इतक्या मस्त वातावरणात ती गाणी ऐकणे वैताग होता. पुण्यात मी तोही प्रॉब्लेम मिटवला.

मस्तपैकी जुन्यागाण्याची सीडी घेतली.
"ठंडी हवा ये चांदनी सुहानी.. ए मेरे दिल सुना कोई कहानी..."

परफ़ेक्ट.


Lampan
Friday, May 25, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी :-) ... you know what i want to say !!!

Marhatmoli
Friday, May 25, 2007 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनि,

सहि आहे एकदम. please पुढच लवकर लिहि.


Rajya
Saturday, May 26, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी,

संपली की कथा, अजुन कीती लिहावं तिनं?:-)

नन्दुमावशी,
संपली ना नक्की? कारण प्रत्येक पोस्ट नंतर क्रमश्: लिहिलं होतं म्हणुन म्हटलं. :-)


Nandini2911
Saturday, May 26, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) नाही अज्जून आहे. इतक्यात कंटाळलात? आणि कथा नाही. स्वानुभव आहे.

Kmayuresh2002
Saturday, May 26, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी,बिगी बिगी लिव की पुढे.. आम्हाला पण मिळु देत लवकर तुझ्या ट्रकवारीचा अनुभव:-)

Manjud
Saturday, May 26, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हे काय, उश्या घेउन कधिची बसलेय, छान मूड लागला होता वाचायचा............पण हीचं अजुन क्रमश्: आहेच वाटते....

Nandini2911
Saturday, May 26, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही म्हणायला पनवेल सोडलं तेव्हा मला थोडी भिती वाटली. पण काय करणार. उडी तर मारलीच होती आता पोहणं किंवा बुडणं यापैकी काहीतरी केलंच पाहिजे ना..

खूपदा असं झालय की मी रात्री अपरात्री अशी कुठेतरी गेली आहे. मला अंधाराची प्रचंड भिती वाटते. माझ्यासोबत रात्रीचे फ़िरलात तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही. मी मुद्दाम रात्री फ़िरलेय. भिती घालवण्यासाठी. पण मनात कुठेतरी ती भिती अजूनही आहे. एरवी काही वाटत नाही. पण आज मात्र खुप भिती वाटत होती. अशावेळेला माझ्याकडे एक उपाय आहे. मी सर्व मित्राना (हो, मित्रानाच मैत्रीणी बर्‍याचदा कामाला येत नाही हा माझा अनुभव आहे.) मेसेज पाठवला. "मी आता ट्रकमधून जातेय. मला भिती वाटते तरी मला अधून मधून फोन करा."

कुणाचेही उत्तर आले नाही. एक तर शनिवारची रात्र. कुणी जिवंत सापडण्याची शक्यता कमीच. त्यात रात्रीचे अकरा वाजून गेलेले. म्हणजे जिवंत प्राणी झोपेच्या अधीन. बाप रे!!! जगदाळे मामा पण पाठी जाऊन झोपलेले. केबिनमधे मी आणि मजहर. आणि समोरचा तो सुनसान रस्ता... आता???

अशावेळेला मला देव आठवतो. मारुती स्तोत्रापासुन ते शुभंकरोति.... जे जे येत होतं ते सगळं म्हणून झालं..

मोबाईल वाजला. अद्वैतचा मेसेज.. "तु ट्रकमधे काय करतेस?" मी माझ्या पद्धतीने उत्तर टाईप करायचा प्रयत्न केला. पण मला मराठी टाईप करायचा वैताग येतो. शेवटी त्याला कॉल केला. तो एक तर इतक्या रात्री जागा होता. ऑफ़िसमधे होता. आणि त्याच्याजवळ बोलायला वेळ होता.

शेंडा ना बुरखा असलेल्या विषयावर आमची चर्चा सुरू होती. तब्बल दीड तास. वाटेत कुठल्यातरी ढाब्यावर ट्रक थांबला. मजहर, गफ़ूर, जगदाळेमामा जेवायला उतरले. मी मात्र वाटेत खायला घरूनच sandwiches बांधून आणले होते. मी प्रवासात शक्यतो बाहेरचं काही खात नाही. चहा मात्र घेतला.

वर हे सगळं चालू असताना अद्वैतशी बोलणं चालूच. बिचारा. तो मला भूक लागली आहे असं सारखं सांगत होता. आणि मी मात्र त्याला बॉम्बेचं नाईट लाईफ़ आणि बंगलोरचे नाईटलाईफ़ यातली गंमत सांगत होते.

एक मजा झाली. त्या ढाब्यातून बाहेर आल्यावर मला आपला ट्रक कोणता ते कळेच ना.. एक तर रात्रीची वेळ रंग कुठला ते आठवेना. नंबर लक्षात नाही. बाकीची मंडळीइ आत जेवत होती. मी तिथेच असलेल्या चार पाच ट्रकजवळ उभी राहिले. फोनवर बोलत असल्यामुळे एखाद्याला वाअटावं की म्हणुन मी बाजुला उभी आहे.

थोड्या वेळाने मला गफ़ूर दिसला. नशीब तो तरी लक्षात होता. आणि परत आमची ट्रकवारी सुरू झाली.

अद्वैत पण घरी गेला. त्यामुळे फोनवर बोलण्यासाठी पण कुणी नव्हतं. रात्रीचे दीड वाजत आले होते. मी शांत बसून्होते.
तेवढ्यात परत मोबाईल वाजला. इतक्या रात्री एकच माणूस जागा असू शकतो,
"हेलो.. रेहान?" मी विचारलं.
"भगवान जब अकल बाट रहा था तब पिक्चर देखने गयी थी क्या? " पुढची वाक्ये लिहीणं म्हणजे स्वत्:च्या हातानी स्वत्:चा उद्धार करणं.

जवळ जवळ पाच मिनिटं तो बडबडला. आणि मी चिडून फोन स्विच ऑफ़ केला. आयला... इथे मदत करणं धीर देणं वगैरे सोडा.. डायरेक्ट आरडाअ ओरडाच सुरू.


Nandini2911
Saturday, May 26, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी फोन बंद केल्यावर मजहरभाई माझ्याकडे बघून मिश्किल पणे हसला.
"क्या हुआ? बहित गुस्से मे था क्या?" त्याने विचारलं.
मी आश्चर्यचकित.
"मतलब?"
"आपका मरद था ना अभी?"
मला हसू आवरेना.
"अच्छा.. तो आपका बॉयफ़्रेंड था.. है ना?" त्यानं विचारलं. मात्र मी अजून हसतच होते. देवा... हा अजून एक.
"मजहरभाई.. ज्याच्याशी मी बोलत होते ना,, तो माझ मित्र आहे. बेस्ट फ़्रेंड. त्याच्यापलिकडे काही नाही." मी त्याला समजावलं.
पण तरी तो गालातल्या गालात हसतच होता.
"आपकी शादी हुई की नही." मी त्याला विचारलं.
त्याच्या बायकोचं नाव आर्शिया. मुलीचं नाव नाझ. एकच मुलगी. तिला मोठं झाल्यावर वकील व्हायचय.
"अभी इतना पढने का तो बहित पैसा लगेगा. लेकिन क्या करे, बेटीका दिमाग तेज है. इसलिये मे जरूर पढाऊंगा..."

का कुणास ठाउक पण मला पपाची खूप आठवण आली. त्याना पण आपल्या मुलीचा प्रचंड अभिमान. ते मला एकदा म्हणालेले "आज तू सगळ्याना सांगतेस की मी आर एम देसाईची मुलगी म्हणून. देव मला तो दिवस दाखवू देत जेव्हा लोक मला नंदिनीचे वडील म्हणून ओळखतील."

मला वाटतं प्रत्येक आईवडीलाची हीच इच्छा असेल ना.. माझ्या पिढीला दर गोष्टीत जनरेशन गॅप दिसतो. पण मग त्याच वेळेला आईवडीलाचा हा अभिमान आम्ही आहोत ते कसं काय विसरलं जातं. सगळं इतक्या सहजतेने मिळत जातं की ते मिळण्यासाठी राबणार्‍या हाताची कधी कधी किंमतच वाटेनाशी होते.
एक साधासा ट्रक ड्रायव्हर, पण त्याची चोवीस तास राबायची तयारी होती. तो राबत होता... का तर मुलीला शिक्षण मिळावं म्हणून. मी आईवडीलाच्या प्रत्येक इच्छेविरुद्ध गेले. तसं याच्या मुलीने करू नये हीच अपेक्षा.. आमेन.

मजहरभाईशी गप्पा मारतानाच मी मधे अर्धा तास डुलकीपण काढली. बाकीचा वेळ ते मला रोड साईन्स, बाकीच्या गाड्याना हात कसे दाखवायचे. त्याचे अपघाताबद्दलचे अनुभव वगैरे बद्दल बोलत होते. त्याच्या बोलण्याचा स्पीड तर फ़ास्ट होताच. पण ट्रक तर त्याहून बेफ़ाम चालला होता.

मला मधेच पुलंचा व्हिक्टोरियावाला आठवला. आणि प्रवासात ज्ञान्संपादनाचा प्रयत्न करणारे मास्तर. ट्रक चालवताना बडबड केली तर चालकाच्या एकाग्रतेवर परिणाम होत नाही. ही वाक्य मी माझ्या वहीत नोंदवून घेतलं.

जवळ जवळ सात वाजता आम्ही बार्शीला पोचलो. एस टीने अजून वेळ लागला असता. शिवाजीनगर स्टॉपला उतरून मी घरी आले. माझ्या या adventure बद्दल सांगायला वेळ नव्हता आणि ती परिस्थितीपण नव्हती.

शंकरमामाने मात्र आल्या आल्या मला हळुच एक मोठं चॉकलेट दिलं. "मामाची भाची शोभतेस.." तो म्हणाला.

संध्याकाळी मात्र सगळ्याना हा प्रसंग सांगितला. मोबाईलवर कुणी बोलायला लागलं तर तो स्विच ऑफ़ करता येतो. समोर बोलायला लागलं तर काय करणार. बिचारी मी. खाली मान घालुन ऐकून घेतलं. काय करणाअर?

आजोबा मात्र उलट सगळ्याना ओरडले. "एवढी काळजी होती तर तिचं रेजर्वेशन करायचं होतं. एक तर वेळेवर येण्यासाठी तिने इतकं केलं... आणि तुम्ही येउन तरी काय केलं?" हा टोला अर्थात त्याच्या सुनाना. जाऊदे. त्याच्याशी आपलं देणं घेणं नाही.

एकूणच जो तो मला बोलत होता. "काही झालं असतं मग काय केलं असतं तू इतक्या रात्री?" हाच प्रत्येकाचा सूर होता.



Rajya
Saturday, May 26, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दु,
पुढे काय? जरा लवकर. :-)


Zakasrao
Saturday, May 26, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे राजु आता ती ट्रक मधुन उतरली ना. अजुन पुढे काय अस का विचारतोस? तिला आणखी एकदा ट्रक मधुन पाठवायचा विचार आहे का? का तिने घरच्यानी कोणत्या भाषेत आणि कशी कशी खरडपट्टी काढली ते पण ती लिहु दे.
btw

मला वाटतं प्रत्येक आईवडीलाची हीच इच्छा असेल ना..>> .....................>>
इच्छेविरुद्ध गेले. तसं याच्या मुलीने करू नये हीच अपेक्षा.. आमेन.>>>>>
छान लिहिलस हे. बाकि वर्णन तर छान आहेच पण हे जरा खास.
हा लंपन म्हणजेच अद्वैत ना! बिचारा सारख म्हणत बसला असेल कि मला झोप आली आहे. हो ना!
बर झाल तु मला फ़ोन किंवा SMS केला नाहि ते.


Limbutimbu
Saturday, May 26, 2007 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्रकवाल्याला भाड्याचे किती पैशे दिलेस? की दिलेच नाहीस?? DDD

Nandini2911
Saturday, May 26, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मला माहित होतं की माझं काहीही वाईट होणार नाही. इतका दुर्दम्य आत्माविश्वास माझ्या ठिकाणी आहे. आणि त्याचं तसंच कारणही आहे.

माझा माणसातल्या माणुसकीवर अजूनही विश्वास आहे. मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही माझं कुणी करणार नाही. हे मला ठाऊक आहे. आजही माझं काम रिस्क या प्रकारातच येतं. आगरी आणि कोळी लोकाशी रोजचा संपर्क आहे. पण मला कधीच जीवाची पर्वा वाटली नाही. वाटत नाही. जे होणार आहे ते होणार आहे. घर बसल्या होईल, त्यासाठी मध्यरात्री कुठे जायची गरज काय?

परत अजून एक विवाद असतो, एकट्या मुलीने हे असं फ़िरणं.. काय करता काय होऊन बसलं म्हणजे... आता या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. कारण असा प्रसंग ओढवलाच तर मी काय करेन हे मलाच माहीत. प्रश्नकर्त्याचे पुढचे वाद तयारच असतात. पण मला माहीत आहे, प्रतिकार करायला शक्ती लागत नाही. लागते ती हिंमत. स्वत्:वरचा विश्वास. जो माझ्याकडे आहे. त्याहुनही जास्त माझा समोरच्यावर विश्वास असतो. आणि सगळ्यात जास्त.. वर जो सगळ्याचा मालिक बसलाय ना त्याच्यावर तर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे मी निर्धास्त होते.

तसं बघायला तर सगळाच योगायोग आहे. मी रात्री पनवेलला गेले काय, जगदाळेमामा मला भेटले काय, ते शंकरमामाच्या ओळखीच निघाले.. सगळंच झपक्यात घडलं. आता मी पनवेलला बस शोधत होते म्हणेपर्यन्त पर्यत्न बार्शीला पोचलेसुद्धा होते. सगळंच अचाट आणि अतर्क्य. अर्थात पूर्वीसुद्धा अशा गमतीशीर अनेक घटना घडल्या आहेत. पण ही घटना विषेश लक्षात राहील ती रात्रीचा तो बेफ़ाम प्रवास, किशोरचा आवाज आणि मजहरभाईच्या गप्पा..
"लाईफ़मे ना सब ख्वाहिश पूरी करनेका. ताकि कयामत के दिन खुदा से आंख मिलाके बोल सके. जितनी जिंदगी दी उतनी जीके आये. "


स मा प्त


Rajya
Saturday, May 26, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, जिरली ना चांगली

नन्दुमावशी,:-)
छानच, मध्ये थोडं पनवेल ते पुणे मलाही थोडं बोअर झालं पण नंतर मात्र परत छान प्रवास झाला.
आणि नन्दु, ते का बोअर झालं ते सांगता येणार नाहे बरं का, नाहीतर उगाच आमचा मास्तुरे नको व्हायला.:-)

झकासराव, तुम्ही शोभता हो कोल्हापुरचे:-)


Rupali_rahul
Saturday, May 26, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, छान आहे ट्रकसवारी... वर्णन एकदम खासच अणि स्वानुभावाचे बोल तर त्याहुनही...

Neelu_n
Saturday, May 26, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>सगळं इतक्या सहजतेने मिळत जातं की ते मिळण्यासाठी राबणार्‍या हाताची कधी कधी किंमतच वाटेनाशी होते.
>>>प्रतिकार करायला शक्ती लागत नाही. लागते ती हिंमत.
नंदिनी तु ट्रकवारी केलेलीस त्यादिवशी तुला कोपरापासुन नमस्कार केला होता आता तुझ्या लिखाणशैलीला... सही है. :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators