Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 22, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » एकटी » Archive through May 22, 2007 « Previous Next »

Nandini2911
Thursday, May 10, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दरवाजा उघडून आत आले. संध्याकाळचे सात साडेसात वाजले असतील. एक कुबटसा वास मला जाणवला. खरं तर मला आता या वासाची पूर्ण सवय झाली होती. दिवसभर घर बंद. त्यात आल्यावरही दरवाजा खिडक्या सगळे बंद. उद्या सकाळी थोडा वेळ खिडक्या उघड्या ठवायला हव्या. परत एकदा मनाशी विचार केला.

तिथेच असलेल्या खुर्चीवर बग ठेवली. आणि कोपर्‍यात ठेवलेल्या सोनुकडे पाहिलं. सोनु मला बघून खुश होता. तिथल्या तिथे फ़िरायला लागला की समजायचं की स्वारी खुशीत आहे. सोनु, माझा गोल्ड फ़िश आणि या घरातला एकमेव जिवंत प्राणी, माझ्याशिवाय.
"काय करतोयस?" मी त्याला विचारलं. "आज कंटाळा नाही ना आला? मी मात्र खूप दमले रे... खूप काम होतं." रोजच्याप्रमाणे दिवसभराच्या सगळ्या हकीकती सोनुला सांगितल्या. तो शांतपणे ऐकत होता. मी स्वत्:साठी एक मोठा मग भरून कॉफ़ी करून घेतली. जगजितसिंगची सीडी लावली. सोनुला खाऊ दिला आणि नुसती बसून राहिली. अजून एक दिवस संपला. किंबहुना संपवला.

बाजुच्या खोल्यामधून नेहमीचे आवाज येत होते. कुणाच्या घरी कूकरचा शिटी तर कुणाची पोरगा पाढे म्हणत होता. अख्ख्या चाळीत शांत असलेली खोली फ़क्त माझीच होती. दिवसा मी नसते म्हणुन आणि संध्याकाळी एकटीच असते म्हणून.

रात्र होत गेली तशी भुकेची जाणीव झाली. सकाळी केलेलं शिल्लक होतंच. ते अजून नासलें नव्हतं. गरम केलं तर खराब होईल म्हणून तसंच ताटात वाढून घेतलं. एक एक घास चिवडत बसले. अजून किती दिवस हे असंच... माझा मला प्रश्न पडला. पस्तिशी तर गाठली होती. कशी गेली इतकी वर्षे? जेवता जेवता मनात विचार आला. आज तरी महेशला फ़ोन करेन. रोज आज उद्या परवा चालू असते आपले.
मी केला नाही तर त्याने तरी करायला हवा होता ना? सख्खा भाऊ म्हणून काहीतरी त्याचे पण कर्तव्य होते की नाही? बायकोच्या माहेरी पुण्याला जाता येतं. पण इथे भायखळ्याला मला भेटायला येता येत नाही. का तर तिला चाळीतलं वातावरण आवडत नाही. त्याच चाळीत वाढलेला नवरा कसा चालतो मग?

याच घरात मी जन्मले. त्यानंतर चार वर्षानी महेश. अकरा वर्षाची होते तेव्हा बाबा गेले. तिथेच झोपलेले होते पण सगळे म्हणत होते की बाबा गेले. पण जेव्हा माझ्या झोपलेल्या बाबाना बांबूवर दोरीने घट्ट बांधलं आणि आई जोरत रडायला लागली तेव्हा माझंच मला समजलं. बाबाना हे लोक घेऊन गेले. परत कधीच आणणार नाहीत. आणि माझ्या आईला आणि भावाला सांभाळणारी मीच एकटी आहे.

हातातला घास खाली ठेवला आणि भिंतीवरच्या बाबाच्या आणी आईच्या फोटोकडे पाहिलं. बाबा तर आता फ़क्त फोटोतच आठवतात. आणि आई... तिला जाऊन या जुलैमधे सहा वर्षे होतील. अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं. कधी कधी वाटतं युगे लोटून गेली आपल्याला असं रहायला लागून.





Nandini2911
Friday, May 11, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेच दिवस जात होते आणि जात राहतील. मी मात्र कुठेतरी या सगळ्यामधे हरवले होते. डोळ्यावर झोप आली तशी मी लाईट बंद केला. आजूबाजूच्या खोलीतला कोलाहल चालूच होता. तेवढ्यात पाण्यातच सोनुने उडी मारली. मी चटकन उठून लाईट लावला.
"काय रे काय झालं?" मी त्याला विचारलं.
त्याच्या इवल्याशा मोहरेईवढ्या डोळ्यात मला भिती दिसली. "अरे झोप ना बाबा,, उद्या परत मला ऑफ़िसला जायचय... घाबरु नको. मी आहे ना इथेच." त्याच्या काचेवर मी हलकेच हात फ़िरवला. तो जर शांत झाला.

बिचारा.. माझ्यासारखाच तोही एकटा.. या महिन्याचा पगार झाला की त्याला एक तरी साथीदार आणायचा. मी मनाशी निश्चय केला. आणि त्याला भिती वाटू नये म्हणून लाईट तसाच चालू ठेवून झोपले.

परत दुसरा दिवस.. याच ऑफ़िसमधे मी गेली बारा वर्षे काम करतेय. आधी टायपिस्ट होते आता computer वर टाईप करते एवढाच फ़रक. रोजच्या दिवसात वेगळं असं काही घडतच नाही. त्यामुळे दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला तेही समजत नाही. रोज सकाळी तीच ४४ नंबरची बस पकडायची आणि संध्याकाळी परत येताना पण तीच. याशिवाय जगात काही घडतय किंवा काही वेगळं घडू शकते यावरचा माझा विश्वासच उडाला होता. पण म्हणुन काही वेगळं घडत नाही असं नाही ना??

आज महेशला फ़ोन करायचाच असें मी ठरवलं होतं. लंच ब्रेक मधे मी त्याला फ़ोन लावला.
"हेलो, कौन है?" पलीकडून त्याचा आवाज आला. या आवाजाने सगळ्यात आधी मला ताई म्हणून हाक मारली होती. आणि आज त्याला माझा आवाज ओळखत नव्हता.


Nandini2911
Saturday, May 12, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मी बोलतेय." मी त्याला सांगितलं.
"ओह, ताई.. काय म्हणतेस? कशी आहे?" त्याचा आवाज अजूनही तसाच होता.
"मी बरी आहे, निशा कशी आहे? वेदान्त काय म्हणतो?"
"सगळे मजेत. वेदान्त तुझी आठवण काढतो. आता फ़ोर्थला गेलाय ना... तुझा जॉब कसा चालू आहे?"
"ठीक चाललाय. मुंबई दौरा कधी? दिल्ली सोडून यावंसं वाटत नाही का?" मी विचारले.
"अं.. नाही... बघेन पुढच्या महिन्यात वगैरे. पुण्याला आलो की कळवेनच मी तुला. चल ठेवू मी आता."
मी काही बोलायच्या आत त्याने फ़ोन ठेवला सुद्धा.
नाती अशी बदलतात? याच महेशच्या शिक्षणासाठी मी दोन नोकर्‍या केल्या. त्याला इंजिनीअरिंगला जाता यावं म्हणून आलेली स्थळे नाकारली. आईचे सगळे दागिने याच्या कॉलेजमधे घातले.
"मी नोकरी करेन आणि तुम्हाला खूप खुशीत ठेवेन असं म्हणायचा. नुसता म्हणायचाच...

आईच्या आजारपणात तर नंतर नंतर त्याने येणेदेखील सोडून दिलं होतं. निशा एकदा म्हणाली होती. "थेरडी मरत पण नाहीलवकर." हॉस्पिटलमधे तिचं हे वाक्य ऐकलं आणि त्याच क्षणी ठरवलं. आईचं काहीही कमी जास्त झालं तरी याला कळवायचं नाही. पण मी जसं ठरवते तसं घडतं थोडीच. आईचं सगळं आजारपण मी काढलं. अंथरुणात पडून होती चार वर्षे. नोकरी, घर आणि आई सगळं मीच तर बघत होते. बाबाच्या जाण्यानंतर अख्खं घर हातावर धरलं होतं.

पण तरीही आई गेल्यानंतर माझी नाही महेशची गरज होती. तिच्या प्रेताला जाळायला. मी आयुष्यभर जळत राहिले. त्याचं काहीच नाही. एवढं करूनही मी माझ्याच घरात उपरी होते. चौदाव्याला आलेले सगळे जण हळूच कुजबुजत माझ्या वाढत्या वयाची आणि काळ्या टिकलीची चर्चा करत होते. सगलं समजत होतं मला. पण मी काय उत्तर देणार?

वाटलेलं भाऊ तरी म्हणेल की चल माझ्या घरी. पण नाही. एका दिवसासाठी सुद्धा त्याने कधी बोलावलं नाही. मी परत या चाळीत एकटीच.

असंच होतं. आठवू नये त्या आठवणी आठवल्या तर डोळ्यात पाणी येतंच.. काय कमी होतं मला. एकटी होते. हवा तेवढा पैसा हातात होता. हवं तसं स्वातन्त्र्य होतं. मग तरी माझ्या डोळ्यात अश्रू का? भावाने घरी बोलावलं नाही म्हणून की तो घरी आला नाही म्हणून. ज्या ज़णी त्याने "तुझं घर माझं घर" हा भाव सुरू केला. त्याक्षणी नातं संपून गेलं होतं. आता परत त्या नात्याला जिवंत करायचा वेडेपणा मी का करत होते. ऐन उन्हाच्या वेळेला त्या डांबरी रस्त्यावरून चालत होते. डोक्यावरचं ऊन आणि विचार दोघेही मला तापवत होते.

परत कधीही महेशला फ़ोन करायचा नाही हा निर्णय घेतला. आणि मगच ऑफ़िसमधल्या पुढच्या कामाना सुरुवात केली.


Zakasrao
Saturday, May 12, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा मोठे भाग टाक ना! आणि हो मी वाचतोय.

Sakhi_d
Saturday, May 12, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>जरा मोठे भाग टाक ना! आणि हो मी वाचतोय.
>>

मलाही हेच म्हणायचे आहे :-)

Rupali_rahul
Monday, May 14, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, मी पण वाचतेय लवकर लवकर पुढचे भाग पोस्ट गं...

Sneha21
Monday, May 14, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा एकदम हट्के आहे......

Bhramar_vihar
Monday, May 14, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, लगे रहो जल्दी जल्दी!

Neelu_n
Tuesday, May 15, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी चांगलय!! वेगवेगळे विषय हाताळतेयस ते. पुढचा भाग लवकर टाक.

Chaffa
Friday, May 18, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा! नंदिनी ओपनिंग झाले का? आता आधिच्या कथे ईतकीच मोठी आहे का? म्हणजे मला साठवुन ठेवायला तोडून तोडुन वाचायला मजा नाही येत गं! आणी हो सुंदर सुरुवात हे वेगळे लिहायला नकोच.

Yogita_dear
Friday, May 18, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मगच ऑफ़िसमधल्या पुढच्या कामाना सुरुवात केली.... बाई नंदिनी ही तुझी कामं संपुन कधी पुढची कथा पोस्ट करशील????

Gobu
Sunday, May 20, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,
सुरेख लिहीलस ह!
पुढचा भाग लवकर लिही


Nandini2911
Sunday, May 20, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दिवशी संध्याकाळी ऑफ़िसमधून आल्यवार मी सोनुशी गप्पा मारत होते. सीडीवर आशाचे "सलोना सा सजन है..." चालू होते. काही गुलाबी आठवणी माझ्याही होत्या. आठवल्या आणि डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेला मी माझं घर सोडलं असतं तर....

सोनू आज बर्‍यापैकी खुश दिसत होता. काय कारण होतं कुणास ठाऊक? इतके दिवस एकटी असल्यामुळे मी जेव्हा खूप कंटाळले होते, तेव्हाच मी सोनुला घरी आणं होतं.
दुकानदार मला म्हणाला होता, "ते बहोत लकी फ़िश है. जसके घर जायेगा बरकत देगा. खुद की जान दे देगा अगर घर के मालिक पे कुछ मुश्किल आयी तो. पर घर को आबाद रखेगा..."
माझ्या सुनसान घरात कसली आलीये मुश्किल आणि कसली आलीये आबादी.

दारावर टकटक झाली.
"इतक्या उशीरा कोण असेल?" मी सोनुला विचारतच दरवाजा उघडला.
दारात महेश आणि निशा उभे होते.
"अरे,, न कळवता आज इकडचा दौरा कसा काय?" मी अभावितपणे बोलून गेले.
"काही नाही. पुण्याला आलो होतो. म्हटलं सहज तुला भेटावं." तो आत येत म्हणाला.

माझ्या त्या एकाच खोलीकडे तिरकस नजरेने बघत माझी वहिनी पण आली. तिला मी कधीच आवडले नाही, आणि त्याचं कारण मला कधी समजलं नाही
"वेदांत नाही आला?" मी विचारलं.
"त्याला पुण्यातच आईकडे ठेवलय." निशा म्हणाली.

"काय घेणार? चहा कॉफ़ी की जेवूनच जाणार?" मी घरी आलेल्या "पाहुण्याना" विचारलं.

"काहीही चालेल." महेश म्हणाला.
"मला कॉफ़ी."निशा.

मी किचन कट्ट्याजवळ येऊन कॉफ़ी बनवायला घेतली. पलंगावर बसून निशा आणि महेशची कुजबुज चालली होती. निशा एकदा असंच माझ्या भावाला म्हणाली होती. "तुझी बहिण जराशी वेडसर आहे ना?" त्यावर तिचा नवरा म्हणाला होता "लहानपणापासूनच"

गसवर ठेवलेले दूध उतू गेलं आणि मी परत भानावर आले.



Rajya
Monday, May 21, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ, नन्दुमावशी, जरा पटपट लिहा की, का रायटर देऊ पाठवून.

Sneha21
Monday, May 21, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nandini,
पुढचा भाग कधी लिहिणार ?
आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत.
लवकर लिही.

Gobu
Monday, May 21, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ, नन्दुमावशी, जरा पटपट लिहा की, का रायटर देऊ पाठवून...

नन्दिनी भगिनी,
टाईप करायला येवु का?


Nandini2911
Monday, May 21, 2007 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

{"बाकी काय म्हणतोस?" मी कॉफ़ीचा कप हातात देत विचारलं.
"काही नाही गं, नेहमीचं आपलं काम. तू सांग तुझे काय चालू आहे?"
"माझं काय रे. आहे तसंच चालू आहे. तोच जॉब, तेच ऑफ़िस आणि तेच घर.."

निशा सोनुकडे बघत होती.
"सोनु.. सोनु नाव आहे त्याचं. मी एकटीच असते ना.. कुठेतरी वाचलं होतं की एकटं असणार्‍यानी एखादा प्राणी पाळावा. एकटेपणा दूर करण्यासाठी. " मी हे सगळं तिला का सांगत होते कुणास ठाऊक?

"ताई, जरा एक काम होतं तुझ्याकडे." महेश किंचित अवघडून म्हणाला.
तरीच माझ्याकडे यायला त्याला वेळ मिळाला होता.

"बोल ना.. काय पाहिजे माझ्याकडून?"
"नाही, तसं तुझ्याकडून काही नकोय, पण मी विचार करतोय की ही खोली आता विकून टाकावी. मी पण तिकेडे दिल्लीला फ़्लेट बूक केलाय आणि.."

"काय? काय बोलतोयस तू? ही खोली विकायची?"

"हो अगं म्हणजे बघ ना... इथे एक बिल्डर टॉवर बांधणार आहे. आरामात याची किंमत पंचवीस लाख वगैरे होईल... तुला काय. मीर रोड वगैरे तिकडे रहाता येईल... काय करायची ही एवढीशी खोली ठेवून.." तो भडा भडा बोलत होता. मी ऐकून घेत होते. कानावर घण कसे बसतात ते आज मला कळत होतं.

"आणि तुमचेही काही सेविंग असेलच ना.. फ़्लेट घेण्यासाठी." निशा बोलली.

मी डोळे मिटून घेतले. पाण्याचा सुळ्ळ्कन आवाज आला. सोनुने पाण्यातच उडी मारत होता. कदाचित माझी अस्वस्थता त्याच्यापर्यन्त पोचत होती.

"महेश, ही खोली विकणारा तू कोण?" मी स्वत्:च्या आवाजामधे शांतपणा आणत म्हणाले.

"हे बघ ताई, खोली बाबाच्या नावावर होती. त्यानंतर आईच्या नावावर. आणि आईनंतर ती माझी झाली ना?" तो चुळबुळत म्हणाला.
"वारसा हक्क आहे. पण आम्ही इथे राहत नाही. त्यामुळे आम्हाला या खोलीची गरज नाही. " निशा मात्र स्पष्टपणे म्हणाली.
ओह,, म्हणजे, इकडून फ़ूस लावली होती तर.
"मग मी कुठे रहायला जाऊ?" मी विचारलं.
"सांगितलं ना तुला तिकडे उपनगरात स्वस्तात जागा मिळेल. शिवाय तुला एकटीला अशी किती मोठी जागा लागणार?" आता मात्र तो किंचित चिडला होता.
"तुमच्यासारख्यासाठी स्पेशल हॉस्टेल्स वगैरे पण असततच ना..." निशा म्हणाली.

सोनु जोरजोरात स्वत्:भोवती गिरकी घेत होता.

"म्हणजे?"

"अगं म्हणजे वर्किंग वूमेन्ससाठी वगैरे. तुला तिथेही रहता येईलच ना"

"महेश, हे माझं घर आहे. आणि हे सोडून मी कुठेही जाणार नाही," मी संतापाने ओरडले.

अर्ध्या चाळीला आवाज ऐकू गेला असेल.
"हे बघा, तुम्ही विना कारण आरडा ओरडा करू नका. तुम्हालाही आम्ही आलेल्या पैशातला एक हिस्सा देऊ.. निघतो आता आम्ही. परत येऊ तेव्हा सविस्तर बोलणी करू. पण सध्या हे लक्षात घ्या, आम्ही ही खोली विकतोय." निशा म्हणाली.
नवर्‍याला जवळ जवळ ओढून नेले तिने.
"येतो गं ताई" तो म्हणाला.
माझं कुणाकडेच लक्ष नव्हतं. इतका नीचपणा, इतका स्वार्थीपणा... तेही कुणाकडून तर सख्ख्या भावाकडून. ज्याला अक्षरश: तळहाताच्या फ़ोडासारखं जपलं. ज्याचं शिक्षण व्हावं म्हणून मी दिवसरात्र राबत रहिले. समोर आलेला सुखाचा घास लाथाडला. आज सगळे मजेत आहेत. तो पण आणि माझा हा भाऊपण. सप्पाअक्क असा पाण्याचा आवाज आला. आणि मी सोनूकडे पाहिलं. क्षण दोन क्षण मी पाहतच राहिले. काय घडतय तेच कळेना, कसलंतरी अनामिक बळ माझ्या अंगात आलं. मी ताडकन उठून दाराबघेर गेले. महेश आणि निशा अजून जिन्यात होते.

"महेश.. " मी जोरात हाक मारली."इकडे ये"

तो परत चढुन वर आला. पाठोपाठ निशाही. अर्ध्याहून जास्त चाळकरी बाहेर आले.
"महेश, मघशी तुला सांगितलं पण परत सांगते. हे घर माझं आहे. आणि सोडून कधीही जाणार नाही, याच घरातून बाबा गेले, आई गेली आणि मीही जाणार. वारसा हक्क म्हणाली ना तुझी बायको,,,,, तेव्हा कुठे होता तुझा हक्क जेव्हा मी आईची घाण रोज साफ़ करत होते? "थेरडी" म्हणायची ना तुझी बायको तिला? तिच्यासाठी आणि तुझ्यासाठी मी या घरात राहिले. आणि आज तू मला सांगतोस की तू या घराचा मालक? विसरलास का? त्या दिवशी विवेक येऊन गेला तेव्हा... कोण विवेक तेही विसरलास? मी ज्याच्याबरोबर रंग उधळत होते. घरची लाज वेशीवर टांगत होते. विसरलास का हे शब्द पण? तू केलंस ते प्रेम आणि मी केलं ते लफ़डं.. होय ना?" मी संतापाने बडबडत होते.
"चला, निघू या.." निशा महेशचा हात धरून म्हणाली.
"नाही,आता नाही निघायचं. कळू देत सगळ्याना तुम्ही दोघं काय चीज आहात ते. या चाळीतल्या प्रत्येकाला माहीत आहे माझ्याबद्दल. तुच सगळ्याना सांगत असतेस ना मी जराशी वेडसर आहे म्हणून? अख्खं आयुष्य बरबाद झालं माझं या घरापायी... आणि तू मला वेडी म्हणणारी.." माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं.
"हे बघ ताई, तू माझ्यासाठी खूप केलंस, पण त्याचा या खोली विकण्याशी कय संबंध? मी नंतरही घेईन तुझी काळजी." महेश मला शांत करण्यासाठी म्हणाला.
"महेश, माझ्या संतापाचा संबंध या खोली विकण्याशीच आहे. मी या घराची मालक आहे. आणि इथून जर मला कुणी बाहेर काढणार असेल तर मी कायद्याच्या मार्गाने जाईल."

"हं,, भारी पडेल तुम्हाला ते. कायदा आमच्या बाजूने आहे.." निशा छद्मीपणाने म्हणाली.
"खरंच?? " मीही आवाजात मुद्दाम तिरकसपणा आणला. "महेशने तुला सांगितलं नाही का? मी गेली वीस वर्षे वकीलाकडे काम करतेय. कायदा मला चांगलाच ठाऊक आहे. आईचं आजारपणाचा मी खर्च केलाय. शिवाय मी मला इथल्या संपत्तीत वाटा आहेच आहे. या खोलीसाठी आलेला प्रत्येक खर्च मी केलाय. सोसायटी लाईट पाणी सगळं माझ्या नावाने भरतेय. आता तुम्ही कुठुन उपटसुंभ उठलात हक्क दाखवायला? कर्तव्याच्या वेळेला हजर नव्हता..."

"हे बघ ताई.. आपण शांतपणे नंतर बोलू. "
"नाही महेश, नंतर कधीही नाही. मी आयुष्यात परत केव्हाही तुला भेटणार नाही, विसरून जा की तुझं इथे कुणी आहे. आणि विसरूउन जा. की इथे तुझ,न घर आहे. जा, महेश, कायमचा जा.. मी एकटी जगू शकते. मला कुणाच्या खोट्या सहानुभुतीची गरज नाही, "
मी डोळ्यातले पाणी थोपवत शांतपणे पाठी फ़िरले.

घरात आले. रूमचा दरवाजा बंद केला आणि अश्रूना वाट मोकळी करुन दिली. "घर के मालिक पे मुश्किल आयी तो ये जान दे देगा..." कुठूनतरी शब्द आठवले.

काचेच्या त्या गोल रिकाम्या भांड्याकडे माझं लक्ष गेलं. सोनुने मघाशी पाण्याबाहेर उडी घेतली होती. त्याचं जग त्यानं सोडलं होतं. कशासाठी कुणासाठी ते न सांगता. मला एकटीला ठेवून तो पण निघून गेला होता. जाता जाता फ़क्त या घराचा मालक कोण हे सांगुन गेला होता...



समाप्त





Arch
Monday, May 21, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, आवडली ही कथा. छान दाखवले आहेस व्यक्तीस्वभाव. छानच

Zakasrao
Tuesday, May 22, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी छान आहे कथा. शेवटी नायिका ही कुढत न बसता आपल्या हक्कांवर गदा येणार असेल तर लढण्याचा जो निर्णय घेते ते आवडल.


Mankya
Tuesday, May 22, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी .. शेवट अप्रतिम गं .. शब्दशः अप्रतिम ! नायिकेची लढाऊ वृत्ती, भावाचा लुच्चेपणा आणि एका मुक्या जीवाचं मालकावरचं ( ईथं तो सोबती, मित्रच म्हणायला हवा. ) प्रेम, सही मिश्रण केलंस या सगळ्याचं आणि तेही वास्तवाला धरून. मान गये !

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators