|
Supermom
| |
| Friday, April 27, 2007 - 8:58 pm: |
|
|
ओसरीवर चपला काढून ठेवत मास्तर जुईच्या वेलाखाली ठेवलेल्या बादलीकडे गेले. थंड पाण्याचे दोन तांबे पायावर घेतल्यावर उन्हाची तलखी थोडी कमी झाली. तेच पाणी घेऊन त्यांनी चेहरा, हात स्वच्छ धुतले. आता त्यांना बरीच हुशारी वाटू लागली.जवळच पाटावर ठेवलेल्या पंचानं तोंड पुसून ते ओसरीवर थोडे टेकले. तोच हातात पन्ह्याचा पेला घेऊन सुमतीबाई बाहेर आल्या. 'दमलात ना हो? आज खूप तापली होती उन्हं. मला काळजीच वाटत होती...' 'छे, काळजी कशाची?' विमनस्क सुरात मास्तर म्हणाले.त्यांचा ओढलेला सूर ऐकूनच आजही पगार झाला नाही हे न सांगताच कळलं सुमतीबाईंना. पन्ह्याचे दोन घोट घेऊन मास्तर मागे सरकून, ओसरीच्या भिंतीला टेकून बसले. 'नको आता पन्हं. इच्छाच नाहीय बघ आज...' 'अहो, नाही झाला पगार तर नाही. होईल आज ना उद्या. असं उदास होऊन कसं चालेल बरं? अन अजून पंधरा दिवसांचे डाळ तांदूळ आहेत घरात. तोवर होईलच.' त्या समजुतीनं म्हणाल्या. एक सुस्कारा टाकून मास्तर पुन्हा सरकून बसले.सुमित्राबाई त्यांच्याजवळच अधोवदन बसल्या होत्या. त्यांच्याकदे बघताबघता मास्तरांना एकदम गहिवरूनच आलं. अंगावर साधीच सुती साडी, गळ्यातल्या मंगळसूत्राशिवाय अंगावर एकही दागिना नाही, हातात भरगच्च काचेच्या बांगड्या अन गावातल्या जत्रेत घेतलेल्या खोट्या मोत्यांच्या कुड्या. या रूपातही किती खानदानी, शालीन दिसत होत्या त्या. 'सुमती, मी तुला काहीच देऊ शकलो नाही ग. माझ्या संसारात लंकेची पार्वतीच राहिलीस तू...' 'काहीतरीच काय बोलताय आज? काय झालंय काय तुम्हाला? कधी काही तक्रार केली का मी? अगदी सुखात आहे मी. पुन्हा असं मनातसुद्धा आणू नका...' सुमतीबाई हलकेच म्हणाल्या. 'अन चला पाहू आत. मुलं झोपेला आलीत. लवकर जेवून घेऊ या. दोघंही थांबलीत तुमच्यासाठी अजून...' हाताला धरून उठवलंच सुमतीबाईंनी त्यांना.
|
Sneha21
| |
| Monday, April 30, 2007 - 9:26 am: |
|
|
फ़ारच छान सुरुवात प्लिज लव्कर लिहा पुढे.....
|
Supermom
| |
| Wednesday, May 02, 2007 - 1:08 pm: |
|
|
अस्वस्थ मनानंच मास्तर आत आले. अकरा वर्षांचा सुमंत खिडकीजवळच्या टेबलावर अभ्यासाचा पसारा मांडून बसला होता. मागच्या अंगणातल्या फ़रशीवर झाडाखाली खेळणारी धाकटी जानकी आपल्याच नादात होती. 'मुलांना कशाला थांबवलंस ग? वाढून द्यायचं त्यांना.' 'ती ऐकणार आहेत थोडीच? तुमचीच मुलं ती....' किंचित हसून, कृतककोपाने सुमतीबाई म्हणाल्या. सुमतीबाईंनी पानं घेतली अन जानकीला हाक दिली, 'ये ग सोने आता घरात. उन्हं उतरली असली तरी झळा जाणवताहेत अजून...' आईची हाक ऐकताच जानकी घरात आली. चौघंही जेवायला बसले. साधंच जेवण. भात, मुगाची आमटी अन अंगणातल्या झाडावरच्या ताज्या कैरीची चटणी. पण सुमतीबाईंच्या हाताच्या चवीने साध्याच अन्नाला विलक्षण रुची येत असे. भराभर घास घेत,कसबसं मास्तरांनी जेवण संपवलं. झाकपाक करून,मुलांना झोपवून सुमतीबाई बाहेर आल्या तेव्हा मास्तर परसातल्या आंब्याच्या झाडाखाली सतरंजीवर लवंडले होते. 'झोपलात का हो?' 'त्यांच्या जवळ बसत, हळूच सुमतीबाईंनी विचारलं. 'नाही ग. तीही रुसलीय वाटतं माझ्यावर..' 'तीही? म्हणजे आणखी कोण?' 'ही परिस्थिती ग. कधी बदलेल असं झालंय बघ मला...' 'असं हार मानून कसं चालेल बरं?अन इतकं काही वाईट नाही आपलं. मी मघाशी सांगितलंच तुम्हाला, की अजून पंधरवडा सहज जाईल. शिवाय परसातल्या भाज्या आहेत. होईल सारं नीट...' सुमतीबाई असं म्हणाल्या खर्या, पण मास्तरांनी काहीच उत्तर दिलं नाही. डोळ्यांवर एक हात घेऊन ते पडून राहिले. हवेत आता हलका गारवा जाणवू लागला होता. पण मास्तरांच्या तप्त मनाला त्यानं आज सुखावलं नाही. 'खरंच, या बारा वर्षात किती तडजोडी केल्या सुमतीनं. आजच्या इतकी आर्थिक टंचाई कधी जाणवली नाही हे खरंय, पण ती ज्या थाटात, वैभवात वाढली त्याचा मागमूसही नव्हता या छोट्याशा घरात. या बारा वर्षात तक्रार म्हणून ऐकली नाही आपण कधी तिच्याकडून. कायम हसतमुख असते. मुलंही तिच्यासारखीच. शांत, समजूतदार...' 'अन काळजी करायची नाही हे कसं शक्य आहे? गेले सहा महिने पगार नाही. शिक्षक संघटनेच्या वाटाघाटी चालूच आहेत पण कधी तडीस जातील माहीत नाही. शिल्लक संपत आली आहे. उसनं कुणाकडून घेणं आपल्या मानी मनाला सोसवणारं नाही. काय करावं? कसं करावं?...' मास्तरांचं विचारचक्र अविरत धावत होतं.
|
Milindaa
| |
| Wednesday, May 02, 2007 - 1:29 pm: |
|
|
सु. मॉ. , इतकं पण 'बोल्ड' लिहू नका हो वाचायला त्रास होतो
|
Supermom
| |
| Wednesday, May 02, 2007 - 1:45 pm: |
|
|
मिलिंदा, आता सुरू केलीच आहे 'बोल्ड' गोष्ट तर संपवते तशीच. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. मला वाटतं की बर्याच लोकांना 'बोल्ड' टाईपचा त्रास होतोय.
|
Psg
| |
| Thursday, May 03, 2007 - 5:48 am: |
|
|
सुमॉ, पुढचे भाग 'बोल्ड' नको बाई, साधेच लिही जमले आहेत दोन्ही भाग. पण वेग दे जरा..
|
R_joshi
| |
| Friday, May 04, 2007 - 8:39 am: |
|
|
सुपरमॉम नात्याची गुंतागुंत उलगडणारी अजुन एक कथा. सुरुवात छान झालि आहे.पुढचा भाग येवु दे लवकर
|
Mankya
| |
| Monday, May 07, 2007 - 3:16 am: |
|
|
सुमॉ .. मस्तच ! पुढचे भाग येऊ द्या लवकर ! माणिक !
|
Manogat
| |
| Monday, May 07, 2007 - 6:19 am: |
|
|
सुपरमाॅम, सुरेख, मस्त झालि आहे सुरवात...
|
Supermom
| |
| Monday, May 07, 2007 - 1:35 pm: |
|
|
बारा वर्षांपूर्वीच्या घटनांचा चित्रपट मास्तरांच्या मिटल्या डोळ्यांसमोरून सरकत होता. सुमतीबाईंचा नि मास्तरांचा प्रेमविवाहच होता एका परीने. दोघेही बरोबरच वाढलेले. एकाच लहानशा गावात नि एकाच शाळेत. सुमतीबाईंचे वडील जमीनदार होते. घरी भरपूर पैसाअडका, दूधदुभतं, कशालाच काही कमी नव्हतं. सुमतीचा मोठा भाऊ श्रीहरी अन शेंडेफळ सुमती. ही दोन्ही मुलं अगदी लाडाकोडात वाढलेली. जमीनदारांच्या पत्नी सुमतीच्या लहानपणीच गेल्यानं आजीची माया अन वडिलांचा करारी, कडक स्वभाव या वातावरणात दोघंही लहानाची मोठी झाली. तारुण्याची चाहूल लागली अन बालपणीच्या मित्रावर आपला जीव जडलाय हे सुमतीला हळूहळू जाणवू लागलं. त्यानं सहज विचारलेल्या प्रश्नावर आपण इतके लाजून लाल का होतो, बागेतल्या रसाळ फ़णसाचे गरे त्याच्या आईला नेऊन द्यायचा बहाणा करून वारंवार त्याच्या घरी का जातो, त्याला दुरून सायकलवरून येताना पाहून आपल्या ह्रदयाची धडधड का वाढते हे तिला कळतच नसे. काही काळातच हे एकतर्फ़ी प्रेम एकतर्फ़ी राहिलं नाही. अन एके दिवशी दोघांनाही आमराईत लाजून गुजगोष्टी करताना श्रीहरीनं पाहिलं. मोठ्या भावाच्या तत्परतेनं त्यानं ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. जमीनदारसाहेब तापट असले तरी खुल्या विचारांचे, समंजस होते. सुमतीला समोर बसवून त्यांनी सरळच विचारलं. तिनंही प्रामाणिकपणे दोघांचीही लग्नाची इच्छा असल्याचं सांगून टाकलं. 'त्यांच्या घरच्या नि आपल्या परिस्थितीत महदंतर आहे हे माहीत आहे ना तुला? एकदा लग्न झाल्यावर प्रेमानं पोट भरत नाही.' श्रीहरीने नाराजीनेच विचारलं. त्याला हा निर्णय फ़ारसा पसंत नव्हता. पण सुमती आपल्या निर्णयावर ठाम होती नि एक आर्थिक परिस्थिती सोडली तर मुलामधे नाव ठेवायला जागा नव्हती इतका तो सालस होता. मास्तरांच्या इच्छेनुरूप लग्न साधेपणानं पार पडलं. सुमतीच्या माहेरून काहीही स्वीकारायला मास्तरांनी नकार दिला. सोन्याचं एक मंगळसूत्र सोडलं तर सुमतीला सासरून एकही दागिना मिळाला नाही. तिच्या आईच्या दोन बांगड्या मात्र आजीनं आईची आठवण म्हणून तिला घ्यायला लावल्या. मास्तरांच्या घरी सुमती अगदी समरस होऊन गेली. सुरुवातीला 'मोठ्या घरची मुलगी' म्हणून जरा बिचकतच वागणार्या सासूसासर्यांचं मनही तिनं अगदी सहजच जिंकून घेतलं. साध्या साध्या वस्तूंनी घर सजवलं. मास्तरांच्या पगारात अगदी चैनीत नसलं तरी खाउनपिऊन सुखी असा त्यांचा संसार चालला होता. वृद्ध सासूसासर्यांच्या अंतकाळी सुमतीनं अगदी मनापासून त्यांची सेवा केली अन त्यांचे आशिर्वादही घेतले. आजवर तसं अगदी छान चाललं होतं. पण गेल्या सहा सात महिन्यात संपाचे वारे वाहू लागले अन पगार अडकला. थोड्या शिलकीवर सहा महिने कसेबसे काढले पण आता झळ चांगलीच जाणवू लागली होती. यातून मार्ग कसा काढावा हे मास्तरांनाही कळेनासं झालं होतं. माहेरून काही मदत मागावी का असा विचार सुमतीनं बोलून दाखवताच मास्तरांनी ठाम नकार दिला होता. पण पंधरवड्यात पगार झाला नाही तर परिस्थिती बिकट होती.
|
Mandarp
| |
| Wednesday, May 16, 2007 - 5:27 am: |
|
|
सुपर मौम, पुढचा भाग कधी लिहिणार आहेस? आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत. लवकर लिही. मंदार
|
Monakshi
| |
| Wednesday, May 16, 2007 - 6:30 am: |
|
|
सहीच सुमॉ, तुमच्या कथा ख़ूपच छान असतात. इतकं छान वर्णन असतं की गोष्ट आपल्या डोळ्यांसमोरच घडते आहे असं वाटतं. पुढल्या भागांची वाट पहात आहे.
|
Supermom
| |
| Friday, May 18, 2007 - 3:20 pm: |
|
|
पडल्या पडल्या मास्तरांचा किंचित डोळा लागला. पण त्यांच्याजवळ बसलेल्या सुमतीबाई अजूनही विचार करीत होत्या. 'माहेरी जाऊन दादाला मागावे का पैसे? ह्यांना मुळीच आवडणार नाही हे खरंय पण पगार झाला की परत करता येतील. अन इतक्या वर्षात दादाने राखी, भाऊबिजेला दिलेल्या पैशातला एक रुपया फ़क्त वरचा घेतलाय आपण. यांना आवडत नाही म्हणून...' 'आजवर यांच्या संसारात खाऊन पिऊन सुखी होतो आपण. ही अशी अडचणही कधी आली नाही. पण आता वेळ कठीण आलीय. मुलांची फ़ी, किराणा, इतरही अनेक किरकोळ खर्च कसे निभायचे?...' 'माहेरून काही मागू नये इतपर्यंत ठीक आहे, पण त्यांनी प्रेमानं दिलेलं स्वीकारायचं नाही हा कसला हट्ट? ही कसली नीतीमूल्यं? नातेवाईकांमधे देणंघेणं चालतच असतं....' मनात डोकावून गेलेल्या कडवट विचारांनी सुमतीबाई जराश्या दचकल्याच. 'आदर्शं, प्रेम, ह्या सार्या गोष्टी भरल्या पोटीच ठीक असतात. फ़ाके पडायची वेळ आली की हे सारे डोलारे पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळत जातात...' असं श्रीदादा आपल्या लग्नाच्या हट्टावर चिडून म्हणाला होता ते खरं की काय?...' मनातल्या विचारांची सुमतीबाईंनाच लाज वाटली. 'इतकी वर्षं ह्यांच्या आदर्शांवर विश्वास ठेवून काढली तेव्हा सुखातच होतो ना आपण? सोन्यानाण्यांचे डोंगर नसतील जमवले आपल्या सालस नवर्याने. पण त्याच्या स्वभावानं अन चोख वागण्यानं गावात किती चांगलं नाव आहे त्यांचं. मास्तरांची पत्नी म्हणून या आदराचा, कौतुकाचा आपला भाग आपणही मनापासून झेलतच आलोय ना? मग या थोड्याशा अडचणींना घाबरून कसं चालेल?...बघूया कसं काय होतं ते..' मास्तरांना हलकेच हलवून त्यांनी उठवलं. घरात येऊन दोघेही अंथरुणावर पडले. माहेरी मदत मागायचा बेत तेवढ्यापुरता सुमतीबाईंच्या मनातून दूर झाला. पण असेच आठ दहा दिवस गेले. पगाराचं काही चिन्ह दिसेना. तेव्हा सुमतीबाईंच्या मनात पुन्हा जुन्या विचारानं उचल खाल्ली. मास्तर आता चिंता बोलून दाखवत नव्हते, पण त्यांच्या चेहर्याकडे बघून सुमतीबाईंच्या पोटात तुटत होतं. आता तीन चार दिवसात पगार झाला नाही तर कोणालातरी मागणं हाच उपाय होता. 'दुसर्या कोणाला मागण्यापेक्षा दादा घरातलाच नाही का? ..' सुमतीबाईंना मनापासून वाटत होतं. पण मास्तरांची काय प्रतिक्रिया होईल, ते दुखावणार तर नाहीत ना...' या आणि अशाच गोष्टी त्यांच्या मनात थैमान घालीत होत्या. शेवटी सकाळी उठल्यावर त्यांनी मनात एक विचार पक्का केला. 'माहेरी जायचंच. दादाकडून पैसे मागून आणायचेच. घरी आल्यावर ह्यांना समजावता येईल. पण ही कोंडी आता फ़ुटायलाच हवी. पैसे मागायला जातोय हे नाही सांगायचं घरी.... नाहीतरी वहिनी अन दादाला बर्याच दिवसात भेटलो नाहीय आपण...'
|
मी वाचत्ये बरं का सुमॉ.. ( बाकी काही, म्हणजे ' छान लिहीत्येस', ' लवकर लिही' वगैरे म्हणायची भिती वाटते आजकाल.)
|
मी पण. लिही गं सुमॉ
|
Supermom
| |
| Friday, May 18, 2007 - 5:38 pm: |
|
|
सकाळची कामं भराभर उरकत त्यांनी एकीकडे स्वैपाकही लवकरच करून ठेवला. मास्तर आंघोळ करून आले तसं हलकेच त्या म्हणाल्या, 'आज जरा माहेरी जाऊन येऊ का मी? स्वैपाक करून ठेवलाय. तुम्ही शाळेतून थोडे लवकर याल तर येताना मुलांनाही घेऊन या. संध्याकाळपर्यंत येतेच मी परत...' 'हो, हो. अगदी निश्चिंत मनानं जा तू, सुमती. घरच्या रामरगाड्यात तुला फ़ारसं माहेरी जाताच येत नाही. उशीर झाला तर काळजी करू नकोस. खिचडी करीन मी रात्रीसाठी. नाहीतर असं कर ना, रात्री राहिलीस तरी चालेल. सकाळी मी येईन तुला घ्यायला. नाहीतरी उद्या रविवारच आहे...' मास्तर स्निग्धपणे म्हणाले. 'नको, नको. मी रहायला जात नाही कुठे मुलांना सोडून. तसंच कारण असल्याशिवाय....' 'ते ही खरंच आहे म्हणा. फ़क्त वडिलांच्या मृत्यूनंतर अन श्रीहरीच्या लग्नात काय ती तू माहेरी राहिलीस. काय करणार? नवर्याला सोडून तुला राहवतच नाही ना?' मास्तरांच्या थट्टेनं सुमतीबाईंच्या गालावर गुलाब फ़ुलले. सारं भराभर आवरून सुमतीबाई निघाल्या. हातातली पिशवी फ़ारच मोठी अन जुनाट असल्याचं आत्ता कुठे त्यांना जाणवलं. पण घरात दुसरी पिशवी नव्हतीच. भराभर चालत त्या जात होत्या.ऊन तापायला सुरुवात झाली होती. बरोबर वहिनीच्या आवडीचं घरच्या आंब्याचं ताजं लोणचं अन परसातले अळू घ्यायला त्या विसरल्या नव्हत्या. वाड्याचं भलंमोठं दार दिसू लागलं तशा त्या थोड्या थबकल्या. पदरानं घाम पुसत, हातातली पिशवी त्यांनी नीट धरली. या बारा वर्षात, माहेरी जाताना इतका संकोच, इतकी हुरहूर कधी मनात दाटल्याचं त्यांना आठवत नव्हतं. आश्चर्यमिश्रित आनंदानं वहिनीनं त्यांचं स्वागत केलं. 'वन्सं, आज अशा अचानक? अन उन्हं किती तापलीयत? आधी कळवायचं तरी. महादूला पाठवलं असतं हो मी गाडी घेऊन....' वहिनीने दिलेला थंडगार, वाळा घालून सुवासित केलेल्या पन्ह्याचा पेला हातात घेत सुमतीबाई पाटावर टेकल्या.
|
सुमॉ लौकर लौकर लिही की गं. स्वाती
|
Supermom
| |
| Friday, May 18, 2007 - 8:21 pm: |
|
|
'दादा दिसत नाही कुठे? पन्ह्याचे दोन घोट घेत, जरा सावरून बसत सुमतीबाईंनी प्रश्न केला. 'अहो, तालुक्याच्या गावाला गेलेत. येतील जेवायच्या वेळेपर्यंत. बसा आता निवांत. हे खाऊन घ्या थोडं अन आराम करा.... तोवर जेवायची वेळ होतेच आहे. कित्ती दिवसात भावाबहिणींची पंगत झाली नाहीय.' बोलता बोलताच वहिनीनं चिवड्याची बशी सुमतीबाईंसमोर ठेवली. घरातल्या थंडगार अन स्नेहमयी वातावरणात सुमतीबाईंना जरा हुरूप आला. सावकाशपणे त्यांनी खाणं संपवलं अन त्या वहिनीशी गप्पा मारू लागल्या. त्यांच्या लहानपणापासून कामाला असलेल्या, आता थोड्या म्हातारपणाकडे झुकलेल्या देवकीबाई स्वैपाक करत होत्या. मधूनच त्यांच्याशी देखिल त्या सुखदुखाच्या गोष्टी बोलत होत्या. शेंदरी रंगाची साडी नेसलेल्या, वर्णानं गोर्यापान अन बांध्यानं नाजुकशा भावजयीकडे सुमतीबाई मधूनच कौतुकानं बघत होत्या. सारं घर कसं व्यवस्थित सांभाळलं होतं तिनं. 'आईबाबांच्या माघारी आपलं माहेर हिनं कसं मनापासून जपलंय....' सुमतीबाईंच्या मनात आलं. 'दादाचा स्वभाव थोडा तुटकच आधीपासून. त्यात आपलं लग्न त्याच्या मनाविरुद्ध झाल्यापासून थोडा आणखीच दूर गेलेला वाटतो तो आपल्याला.पण वहिनी मात्र सगळे बंध जपते मायेनं....' ' वन्स, जरा ही आवळ्याची सुपारी बघा हो चाखून. घरी केलीय यंदा...' वहिनीच्या हातातली सुपारी घेताघेता सुमतीबाईंचं लक्ष तिच्या बोटातल्या अंगठीकडे गेलं. 'नवी केलीस का ग, वहिनी अंगठी?' 'हो, बघा ना वन्सं, यंदा शहरात गेले होते तेव्हा आणली यांनी...' किंचित लाजत, वहिनीनं अनामिकेतली अंगठी काढून दाखवली. सुबक घाटाची ती अंगठी कुणालाही आवडेल अशीच होती. 'अंगठी तर सुरेख आहेच, पण माझ्या देखण्या वहिनीच्या बोटांमधे अधिकच खुलतेय..' सुमतीबाईंनी चेष्टा केली तशी वहिनी खळखळून हसली. 'थोडी सैल आहे बघा वन्सं...' 'मग जरा लठ्ठ हो की ग. लग्नापासून बघतेय, तू दोन मुलं झाली तरी अशीच सडपातळ आहेस...' वहिनी यावर काही बोलणार तोच बाहेर मोटारचा आवाज आला. 'आले बघा...' म्हणत वहिनी बाहेर जाणार तोच श्रीहरीच आत आला. 'अरे वा, आज सुमती इकडे कुठे? घरी सगळे बरे आहेत ना ग?' हसून सुमतीबाईंनी मान डोलावली. थोड्या वेळानं जेवणं उरकली. जेवून श्रीहरीला पुन्हा बाहेर जायचं होतं. पण सुमतीच्या जायच्या वेळेआधी नक्की येतो असं सांगून तो बाहेर गेला. जाताना पत्नीशी घरात जाऊन हलक्या आवाजात काहीतरी बोलूनही गेला. जेवणं झाली अन दोघी गप्पा मारत बसल्या.मुलं शाळेतून परत आली अन खाऊन, आत्याकडून लाड करून घेऊन तीही खेळायला गेली. थोडं बोलून झालं अन सुमतीचं लक्ष वहिनीच्या बोटांकडे गेलं... 'अगबाई, अंगठी कुठाय तुझ्या बोटातली...?' धस्स होऊन वहिनीनं हाताकडे पाहिलं. 'अहो, आत्ता तर होती...पडलीबिडली की काय कुठे?' कावर्याबावर्या होऊन दोघी सगळीकडे शोधू लागल्या. घर, अंगण, कपाटांच्या खाली, प्रत्येक जागी शोधून झालं. पण अंगठीचा कुठे मागमूसही नव्हता. 'कुठे हरवली असेल हो? आता रागावतील बघा..' वहिनीचे डोळे भरून आले होते. सुमतीलाही काय बोलावं ते सुचेना. बराच वेळ दोघींनी पुन्हा शोधलं. पण काही उपयोग झाला नाही. आता उन्हं उतरायला लागली होती. श्रीहरीचा अजूनही पत्ता नव्हता. 'मी निघते आता वहिनी. सापडेल बघ घरातच कुठेतरी.... काळजी करू नकोस.' त्या कसंनुसं म्हणाल्या, पण त्यांचा चेहरा पार उतरला होता. 'दादाची भेट झाली नाहीच. वर वहिनीची अंगठीही हरवली...' या सगळ्यात त्या आपण कशासाठी आलोत हे थोडा वेळ विसरल्याच होत्या. वहिनीने चहा ठेवला होता, तोवर तोंड धुवायला म्हणून त्या न्हाणीघरात गेल्या. पदरानं चेहरा पुसतच परत आलेल्या सुमतीबाई स्वैपाकघरात शिरल्या अन तिथलं दृश्य बघून धरणी पोटात घेईल तर बरं असं त्यांना वाटलं. वहिनी त्यांच्या पिशवीचे सोडलेले बंद घाईघाईने पुन्हा बांधून ठेवत होती.
|
Supermom
| |
| Friday, May 18, 2007 - 9:30 pm: |
|
|
उभ्या जागी सर्वांगाला आग लागावी तसं झालं सुमतीबाईंना. ओशाळं हसत वहिनी पुढे झाली, 'या वन्सं. चहा घ्या. आल्याचा तुम्हाला आवडतो तसा केलाय...' आता याक्षणी वहिनीनं साक्षात अमृत दिलं असतं तरी त्यांना नको होतं. 'मी चोरी करेन असं वाटलं वहिनीला? म्हणजे हे प्रेम, हा जिव्हाळा सारा दिखाऊच? माझ्या माघारी माझी पिशवी उघडून बघण्यापेक्षा सरळ सरळ माझ्यावर आरोप केला असता तरी तोंड दिलं असतं मी त्याला. माझी परिस्थिती साधारण असेल, पण मी कोणाचं काही घेईनच कसं? ....' विचारांनी त्यांच्या डोक्यात घणाचे घाव पडायला सुरुवात झाली होती. वहिनी पुढे बोलतच होती, 'बाहेरच्या ओसरीवर शहाळी अन केळ्यांचा घड ठेवलाय वन्सं. अन पेढेघाटी डब्यात लाडू आहेत रव्याचे. मुलांसाठी खाऊ म्हणून. हे सारं उचलायला महादूला पाठवतेय बरोबर. गाडीनं सोडेल तो तुम्हाला...' मृतप्राय मनानं सुमतीबाईंनी चहा घेतला वहिनीनं कुंकू लावलं. महादूनं पिशवी उचलली. 'चला ताईसाहेब...' 'गाडीत सुमतीबाई गप्पच होत्या. महादूच्या प्रश्नांना हो नाही करत होत्या. पण त्यांचं चित्त थार्यावर नव्हतंच. त्या गाडीतून उतरल्या तोच शेजारच्या आजींनी किल्ली आणून दिली. 'घरी आले गुरुजी, अन मुलांना घेऊन बाहेर गेलेत कुठेतरी...' त्यांनी सांगितलं. मास्तर घरी नसल्याबद्दल कधी नव्हे ते बरं वाटलं सुमतीबाईंना. नाहीतर त्यांच्या कुशीत शिरून त्या नक्कीच कोसळून रडल्या असत्या. 'दोन हजार रुपये मागण्यासाठी गेलो आपण, अन जन्माचा घाव घेऊन आलो...' त्यांना वाटत होतं. महादूनं सारं सामान उचलून घरात आणून ठेवलं. एरवी त्याला चहा दिल्याशिवाय जाऊ न देणार्या सुमतीबाईंना आज तो केव्हा गेला हे देखिल कळलं नाही. विमनस्क मनानं त्या पडून राहिल्या. त्यांच्या मानी मनाची जखम भळाभळा वहात होती. बर्याच वेळाने मास्तरांचा अन मुलांच्या हसण्याचा आवाज आला, तशी त्या उठून बसल्या. 'सुमती, अग दिवे न लावता का बसलीयस? हे बघ आम्ही काय काय आणलय...' आश्चर्यानं सुमतीबाईनी त्यांच्या हातातल्या सामानाकडे बघितलं. 'अग, पगार झाला सुमती आज. अन मागची बाकीही मिळेल पुढच्या महिन्यात...' मास्तरांचा चेहरा फ़ुलून आला होता. पण सुमतीबाई काहीच बोलल्या नाहीत एक क्षण. 'तुला बरं नाही की काय ग? उन्हाची गेलीस.... 'नाही हो. जरा डोकं दुखत होतं बघा....' स्वतः ला सावरत त्या उठल्या. 'चला छान झालं हो. आता काळजी नाही..' त्या उसन्या अवसानानं म्हणाल्या. पिशवी उघडून त्यातली घरातली साधी साडी नेसावी म्हणून त्यांनी बंद सोडले, अन चकित होऊन त्या बघतच राहिल्या. पिशवीत सुरेख इरकली साडी अन पोलक्याचं कापड होतं. गोंधळून जाऊन त्यांनी घडी उलगडली, अन एक पाकीट अन चिठ्ठी त्यातून बाहेर पडली. मोत्यासारख्या वळणदार अक्षरात वहिनीनं लिहिलं होतं....., 'वन्सं, तुमच्या नकळत हा कारभार केल्याबद्दल रागावू नका. शाळेतली सारी परिस्थिती ह्यांना कळली आहे. तुम्ही दोघं कधीही आपणहून मदत मागणार नाही हे आम्हाला माहीत आहे. इतक्या वर्षांत तुमची भाऊबीज राहिलीच आहे. ती देतोय असं समजा. तुम्ही घेणार नाही कदाचित म्हणून तुम्हाला न सांगता हे मी पिशवीत ठेवलेय. मुळीच नाही म्हणू नका. आम्हाला फ़ार वाईट वाटेल...' पाकिटातून बाहेर पडलेल्या पांच हजारांच्या नोटांकडे बघत सुमतीबाई हमसाहमशी रडू लागल्या. समाप्त.
|
Disha013
| |
| Friday, May 18, 2007 - 10:47 pm: |
|
|
सुंदर,हळवी कथा! सगळी कथा सलग वाचली मी. मस्त गं सुमॉ शेवट गोड असेल असे वाटलेच होते कारण तुझ्या कथेतली पात्रांचे नातेसंबंध तु कडवट होवु देत नाहिस.
|
सुमॉ तू छानच लिहीतेस. सुंदर वर्णन आणि उत्सुकता शेवटपर्यंत टिकवतेस. वाचायला मस्तच वाटली गोष्ट. ही जरा बाळबोध झालीय असं वाटलं मला ते एक असो पण तुझी लेखणशैली अतिशय दर्जेदार आहे.
|
Zakasrao
| |
| Saturday, May 19, 2007 - 3:33 am: |
|
|
सुमती आणि मास्तर यांच्या मनातील विचार छान रंगवलेत. आवडली कथा.
|
Psg
| |
| Saturday, May 19, 2007 - 6:35 am: |
|
|
कथा आवडली सुमॉ. सुमतिची व्यक्तिरेखा सुंदर आहे.
|
Manjud
| |
| Saturday, May 19, 2007 - 7:00 am: |
|
|
काय सुंदर आहे गोष्ट, फार म्हणजे फारच सुंदर........... नणंद भावजयीच नातं फारच छान रंगवलं आहे.
|
सही आहे. शेवट आवडला.
|
|
|