|
मित्रहो, 'ऋतू येत होते.. ऋतू जात होते..' कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांनाच गेले काही दिवस या ओळीने पछाडलं होतं. आज या ओळीने सुरू होणारी शेवटची गज़ल सादर करत आहोत.. जी सर्वात आधी लिहीली गेली होती.. या गज़लच्या निमित्ताने, कार्यशाळेतला अखेरचा पाठ म्हणून, काही गोष्टी आपल्या निदर्शनाला आणून द्याव्यात असं वाटलं. १. या गज़लसाठी वैभवने १६ शेर लिहीले होते. हे त्यातले निवडक ११ आहेत. गज़लमध्ये किमान ५ शेर असावेत असा सर्वमान्य संकेत आहे. कमाल संख्येवर बंधन नाही. आपल्याला जितक्या कल्पना जितक्या पद्धतीने सुचतील, तितक्या लिहून काढाव्यात. सादरीकरणाच्या वेळी वाचकांचा / प्रेक्षकांचा कल पाहून त्यापैकी ६ ते ७ शेर सादर करता येतात. असे सादरीकरण आटोपशीर होते. २. या आधीही काही गज़लांच्या संदर्भात आपण 'मुसलसल' / 'गैर मुसलसल' हे शब्द ऐकले असतील. गज़लमधील प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते. गज़ल ही गाण्या वा कवितेप्रमाणे 'उलगडत' जात नाही. परंतु, हे सगळे शेर कधी कधी एकाच विषयावरील असू शकतात. अश्या गज़लला 'मुसलसल' किंवा 'रवानी' गज़ल असं म्हणतात. (मुसलसल चा अर्थ continuous) 'गैर मुसलसल' गज़लमध्ये निरनिराळ्या विषयांवरील शेर असतात. वरील गज़लमधील शेर क्रमांक १,२,४,५,७,११ हे शेर घेऊन 'ती आणि तो' अश्या theme वरची मुसलसल गज़ल होवू शकते, तर शेर क्रमांक १,३,६,८,९,१० हे शेर एकत्र करून एक गैरमुसलसल गज़ल होवू शकते. ३. सुचणा-या सगळ्या कल्पना शब्दबद्ध करून झाल्या, की गज़ल झाली असं म्हणता येत नाही. मग त्या शेरांचा क्रम ठरवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. चमकलात? 'प्रत्येक शेर स्वतंत्र कविता.. गज़ल उलगडत नाही..' या नियमांशी हे विधान विसंगत वाटतं का? थोडा विचार केलात तर तशी विसंगती नाही हे लक्षात येईल. यात 'मुद्द्याची गोष्ट' ही आहे की गज़ल लिहीत असताना ती कवीची अतिशय व्यक्तिगत अशी अभिव्यक्ती असते हे जितकं खरं, तितकंच एकदा लिहून झाल्यावर क़लम खाली ठेवून त्याच रचनेकडे वाचकाच्या दृष्टीनेही पाहता यायला हवं. तसं केल्यावर वातावरण निर्मिती, ओघ आणि परिणामकारकता विचारात घेऊन शेरांचा क्रम लावता येतो. हे सांगायचं कारण आपण सर्वजण यापुढे गज़ल लिहीत राहूच. तर ती लिहून झाल्यावर सादरीकरणाच्या दृष्टीनेही वाचकाच्या/प्रेक्षकाच्या नजरेने त्यावर काम करावं आणि मगच ती अभिव्यक्ती पूर्णत्वाला गेली असे समजावं. कार्यशाळेच्या नियामक मंडळातर्फे आपणां सर्वांना पुढील काव्यप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !! खुलासे ऋतू येत होते, ऋतू जात होते फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते अता आठवे, प्रश्न टाळून माझा मला काढले तू निकालात होते जरा नीट सांगा कुणाला उमगलो कुणी पाहिले थेट डोळ्यात होते? नकाशात उल्लेख नव्हता निराळा तुझे विश्व माझ्याच गावात होते तपासून घे तू पुन्हा शब्द सारे खुलासे किती त्या दिलाश्यात होते नजर श्वापदाची, हसू माणसाचे, वसू लागले कोण कोणात होते कशी वेळ पाळायची आसवांनी अवेळी तुझे गीत ओठात होते शहर पेटलेले! कुणाला पुकारू? सखे सोबतीही जमावात होते! करावी कशी पाठ दुःखाकडे मी उभे हात जोडून दारात होते तमासारखा राहिलो जन्मभर मी कधी सत्य आले उजेडात होते पुन्हा आज रेंगाळला प्राण माझा कुणी आपलेसे म्हणे आत होते - वैभव!!
|
Desh_ks
| |
| Wednesday, April 11, 2007 - 6:27 am: |
| 
|
नकाशात उल्लेख नव्हता निराळा तुझे विश्व माझ्याच गावात होते तपासून घे तू पुन्हा शब्द सारे खुलासे किती त्या दिलाश्यात होते नजर श्वापदाची, हसू माणसाचे, वसू लागले कोण कोणात होते पुन्हा आज रेंगाळला प्राण माझा कुणी आपलेसे म्हणे आत होते उदाहरणासह समजावून सांगितलेली गोष्ट अधिक चांगली आणि अधिक लवकर समजते याचा ही गज़ल आणि सोबतचं विवरण हा सुयोग्य प्रत्यय आहे. हृदयस्पर्शी शब्द आणि सहज प्रवाही रचना यांची सुरेख गुंफण आहे या शेवटच्या "पाठात". मनात शिरलेले शेर केवळ उद्धृत केले आहेत. या पलीकडे काही म्हणावं या पेक्षा त्या अनुभवाचा आस्वाद घ्यावा हेच खरं. -सतीश
|
Meenu
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:05 am: |
| 
|
वाह !! वैभव सुंदर ..!! गुरुजींची गज़ल आहे शेवटी .. खरच सुंदर .. काय मजा आहे नाई ..? आता काय अजुन नविन येणार असं वाटता वाटता प्रत्येक शेर सर्वस्वी नविन आणि वेगळ्या कल्पनेनी नटलाय .. सालंकृत वाटतीये ही गज़ल ..
|
मला दाद देण्यास शब्दच सुचेना प्रकटले गुरूजीच शब्दात होते. सांष्टांग प्रणिपात.
|
Jo_s
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:31 am: |
| 
|
वैभव सुंदरच गझल, बरे झाले इथे शेवटी आली नाहीतर आम्हा सारख्याना लिहीण्याचे धाडसच झाले नसते. जरा नीट सांगा कुणाला उमगलो कुणी पाहिले थेट डोळ्यात होते? नकाशात उल्लेख नव्हता निराळा तुझे विश्व माझ्याच गावात होते तपासून घे तू पुन्हा शब्द सारे खुलासे किती त्या दिलाश्यात होते नजर श्वापदाची, हसू माणसाचे, वसू लागले कोण कोणात होते मस्तच शेर आहेत सारे.
|
Psg
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:45 am: |
| 
|
वैभव!! finesse !! इतकं सहज, सोप्या शब्दात, इतकं आशयसंपन्न लिहिणं तुझा हातखंडा, तुझाच USP ! सर्वांगसुंदर गजल. मक्ता सर्वावर कडी! लिहत रहा. खूप खूप शुभेच्छा..
|
Me_anand
| |
| Wednesday, April 11, 2007 - 8:04 am: |
| 
|
व्वा वैभवजी... एकदम मस्त.. क्या बात है!!! जरा नीट सांगा कुणाला उमगलो कुणी पाहिले थेट डोळ्यात होते? अप्रतीम.... नकाशात उल्लेख नव्हता निराळा तुझे विश्व माझ्याच गावात होते .... एक शंका आहे .. किंबहुना हा शेर झेपला नाही दुसरी ओळ जरा विसंगत वाटते.. ती अशी असावी का? 'तुझे गाव मझ्याच विश्वात होते' कशी वेळ पाळायची आसवांनी अवेळी तुझे गीत ओठात होते खुपच छान पुन्हा आज रेंगाळला प्राण माझा कुणी आपलेसे म्हणे आत होते अप्रतीम....
|
Princess
| |
| Wednesday, April 11, 2007 - 8:33 am: |
| 
|
व्वा वैभव, एक एक शब्द म्हणजे कळस आहे अगदी. कुठली ओळ, कुठला शेर आवडला हे खुप विचार करुनही सांगताच येणार नाही. बरे झाले तुझी ही गझल आता वाचायला मिळाली नाहीतर काही लिहिण्याचे धाडस खरेच झाले नसते. स्वाती, तुझे आभार, ही गझल आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल.
|
Mankya
| |
| Wednesday, April 11, 2007 - 8:43 am: |
| 
|
वैभवा ... सहजता, लय, आशय अशा अनेक गोष्टींनी संपन्न शब्दाविष्कारच हा ! तुझ लिखान म्हणजे नेहमीच एक Non Stop गाडिसारखं वाटतं मला, तुझ्या मनातून शब्दांच्या मार्गाने थेट वाचकाच्या मनापर्यंत अन प्रवासही रम्यच, त्या धावत्या विश्वात प्रत्येक वाचक अगदी रमून जातो अन स्वतःचं अस्तित्व, भान सगळं विसरतो ! अनेक दिवस या प्रवासातून मन बाहेर येत नाही ! तस प्रतिक्रिया म्हणून तुझ्या गज़लेखाली दोन शब्द लिहिणेही मुश्किल पण ते भाग्यही नसे थोडके ! मतला ... मस्त ! थेट डोळ्यात .. खूप आवडला ! दिलाश्यात .. वाह ! शब्दरचना अन आशय मस्तच ! हसू माणसाचे .. शब्द अपुरे ह्याबद्दल लिहायला ! शहर पेटलेले, अवेळी .. खूपच बोलके ! मक्ता .. रेंगाळला प्राण .. वाह ! रूखरूख लागली मनाला ईथे ही गज़ल संपते म्हणून ! शेवट अप्रतिम ! माणिक !
|
Visunaik
| |
| Wednesday, April 11, 2007 - 9:32 am: |
| 
|
कळस गज़ल!!! बरे का..!,अरेच्च्या,खरे का,अरे वा!
|
Meenu
| |
| Wednesday, April 11, 2007 - 9:38 am: |
| 
|
विसुनाईक अशी का प्रतिक्रीया म्हणे .. बरे का..!,अरेच्च्या,खरे का,अरे वा! >> म्हणजे काय ?
|
बरे का..!,अरेच्च्या,खरे का,अरे वा! लगागा लगागा लगागा लगागा भावना पोहोचल्या.
|
Reshim
| |
| Wednesday, April 11, 2007 - 10:20 am: |
| 
|
अप्रतिम गजल! तशी मी फ़क्त read only मेंबर आहे. पण वैभवजी, तुमची गजल वाचून प्रतिक्रिया लिहाविशी वाटली. खूपच आवडली.
|
अशा "वैभवा"ने अम्ही धन्य झालो असे पांथ एका प्रवासात होते...
|
वैभव... सुंदर गझल.. मार डाला..
|
Meghdhara
| |
| Wednesday, April 11, 2007 - 2:14 pm: |
| 
|
एक एक शेर सुंदर. मक्ता व्वा! जो अगदी मनातलं बोललात.
|
Chinnu
| |
| Wednesday, April 11, 2007 - 2:44 pm: |
| 
|
नजर श्वापदाची, हसू माणसाचे, वसू लागले कोण कोणात होते कशी वेळ पाळायची आसवांनी अवेळी तुझे गीत ओठात होते शहर पेटलेले! कुणाला पुकारू? सखे सोबतीही जमावात होते! गुरुजी, सलाम! स्वाती, सुचना फार informative आहेत, धन्यवाद. वसू लागले कोण कोणात माहीत नाही, पण गझलचा संचार नकीच झाला आहे! ही आपणा सर्वांची कृपा. धन्यवाद.
|
Jayavi
| |
| Wednesday, April 11, 2007 - 4:07 pm: |
| 
|
स्वाती.....तुझं विवरण खरंच अगदी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. किती तरी गोष्टी तू आणि वैभवनी आम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगून खूपच चांगलं मार्गदर्शन केलं आहेस. मनापासून आभार वैभव..... Master Stroke जरा नीट सांगा कुणाला उमगलो कुणी पाहिले थेट डोळ्यात होते? वा.......क्या बात है!! नकाशात उल्लेख नव्हता निराळा तुझे विश्व माझ्याच गावात होते हा अगदी वैभवी शेर करावी कशी पाठ दुःखाकडे मी उभे हात जोडून दारात होते अप्रतिम!! पुन्हा आज रेंगाळला प्राण माझा कुणी आपलेसे म्हणे आत होते हा शेर म्हणजे कळस!!!
|
Peshawa
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:00 pm: |
| 
|
हर हर महा शेर! मजा आला
|
Yog
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:30 pm: |
| 
|
कुणी आपलेसे म्हणे आत होते... क्या बात है!
|
|
|