Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 14, 2006

Hitguj » My Experience » भटकंती » Europe » माझा 'जर्मनी'वास! » Archive through July 14, 2006 « Previous Next »

Mi_anu
Monday, July 10, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पश्चिम जर्मनीत फ्रँकेनथालमधे मी एक वर्ष राहिले. फ्रँकेनथाल हे एक लहानसं टुमदार शहर आहे. इथलं वैशिष्ठ्य म्हणजे सिरॅमिकवरचं नाजूक नक्षीकाम आणि दुसरं म्हणजे हे शहर एक मोठा कालवा बुजवून त्यावर वसवलेलं आहे. शहराच्या वस्तूसंग्रहालयात अनेक शतकांपूर्वीचं फ्रँकेनथाल नकाशात दाखवलेलं आहे.

सुरुवातीचे चार पाच महिने 'हे काय आहे,ते काय आहे' करण्यात गेले. एकंदरीत स्वच्छता आणि व्यवस्था खूप चांगली आहे. रस्ते, रस्त्याच्या कडा फरसबंद. जिथे माती आहे तिथे सुंदर फुलझाडं लावून पाणी घालून व्यवस्थित निगा राखलेली आहे. त्यामुळे धूळ कमी. (पुण्यातल्यासारखं नाकातोंडाला रुमाल बांधून अतिरेकी अवतारात बाहेर नाही गेलं तरी घरी आल्यावर चेहऱ्यावर धुळीची पुटं चढलेली दिसत नाहीत.)

शक्य असेल तर जर्मनीत जर्मन भाषा शिकूनच जाणे चांगले. कचेर्‍यांमधे असलेली तरुण आणि थोडी मध्यमवयीन मंडळी आंग्ल भाषा बोलतात, पण प्रयत्नांनी. त्यातही पश्चिम जर्मनीत तरुण लोक आंग्ल भाषा बोलायला तयार असतात. पण पूर्व जर्मनीत आंग्ल बोलायची प्रवृत्ती कमी. बोलायला जी भिती मला सहकार्‍यांशी जर्मन भाषेत बोलताना असते कि आपल्याला जे म्हणायचे आहे ते भाषेमुळे काहीतरी वेगळे व्यक्त होईल. पण तीच भिती एका जर्मन माणसाला इंग्रजी भाषा बोलताना असते कि त्याला जे म्हणायचे आहे ते भाषेमुळे चुकीचे म्हटले जाईल आणि वेगळे अर्थ निघतील.

बाकी बाजार आणि इतर ठिकाणी सामान्य जनतेशी व्यवहार करताना निदान मोडकीतोडकी जर्मन भाषा तरी यावी. आपण 'आ' वासून बावळटपणे काउंटरवरील बाई वैतागून काय बोलते आहे याचा अंदाज करायचा प्रयत्न करावा आणि त्याने ती अजून वैतागावी कारण ती काय बोलते हे समजायच्या नादात आपण काउंटरवरील आपले सामान उचललेले नाही.(गंमत म्हणजे ती हेच सांगत होती कि सामान लवकर उचल!!)हा विशेष चांगला अनुभव पण नाही. घरुन निघताना शब्दकोषात पाहणे विसल्यामुळे मी लवंगाचे तेल मागण्यासाठी तीन मेडीकल च्या दुकानात लवंगाचे चित्र काढून दाखवले होते. (पु.लं. ची युक्ती!!) त्यात कहानी मे ट्विस्ट असा कि भाजीवाले आदी लोक पुस्तकी जर्मन न बोलता बोलीभाषेच्या जवळ जाणारी जर्मन भरभर बोलतात. त्या जर्मन चे उच्चार थोडे तोंडातल्या तोंडात. त्यामुळे 'मला थोडे जर्मन येते पण मला कळले नाही.थोडे सावकाश बोलाल का?' या विनंतीने मग हावभाव भाषेत काम चालून जाते किंवा लोक सोपे शब्द वापरुन तेच वाक्य परत बोलतात. कचेरीत 'मी तुम्ही सांगता ते समजायचा प्रयत्न करते पण नाही समजले तर आंग्ल भाषा वापरा' ने काम चालते. बँकेत आलेले पत्र दाखवून 'हे पत्र नक्की काय सांगते हे मला सांगा' असे सांगता येते. इ-पत्रांचा साधारण अर्थ आणि मुद्दा आता कळतो.

जर्मन भाषेचे थोडेफार मिळालेले ज्ञान वापरण्यासाठी मी पण उत्सुक असते, पण निरुपद्रवी ठिकाणी. कामात शक्यतो नाही, जिथे आपण स्वत:ला योग्य व्यक्त करणे खूप गरजेचे असते. इतर ठिकाणी जास्तीत जास्त जर्मन बोलण्यास माझी हरकत नाही, मातृभाषेबरोबरच एक किंवा अनेक भाषा आपल्याला चांगली बोलता येणे हे चांगलेच. बर्‍याचदा असेही होते कि लोक कौतुकाने माझ्याशी जर्मन भाषेत बोलतात, त्यांना द्यायचे उत्तर जर्मन भाषेत मनात तयार करुन(कर्तरी कर्मणि प्रयोग,वाक्यातील वस्तूंचे लिंग तो/ती/ते, त्याप्रमाणे क्रियापदात होणारा बदल,वाक्यातला काळ हे सर्व आठवून) बोलायला तोंड उघडेपर्यंत समोरचा माणूस दूऽऽऽऽर गेलेला असतो.

जर्मन भाषेचे व्याकरण काही प्रमाणात मराठीसारखे वाटते. 'तु' आणि 'तुम्ही' अशा अर्थाची दोन संबोधने जर्मन भाषेमधेही आहेत. इंग्रजी भाषेतीलही बरेचसे शब्द जर्मन भाषेत कॉमन आहेत. पण काही शब्द अगदीच धोबीपछाड घालतात! इंग्रजी भाषेतला 'कमोड' जर्मन भाषेत 'लहानसे कपाट' बनतो. 'मॉर्गन' म्हणजे 'सकाळ' आणि 'मॉर्गन' म्हणजे 'उद्या'! इंग्रजीतला 'आय' जर्मनमधे उच्चारताना 'इ' आणि इंग्रजी 'इ' जर्मनमधे उच्चारताना 'ए' बनतो. (इंग्रजी 'ए' आधीच जर्मनमधे 'आ' बनून आ वासून बसलेला असतो.) त्यामुळे फोनवर आपल्या नावाचे स्पेलिंग जर्मन माणसाला सांगितले की हमखास 'ध' चा 'मा' होतोच. तसेच 'स्पेलिंग तसाच उच्चार' यामुळे 'उदय कुळकर्णी' चा 'उडाय कुलकार्नी' आणि 'आमटे' चा 'आमाट'(शेवटचा इ जर्मन भाषेत 'सायलेंट' बरं का!) होतोच. प्रद्युम्न,अद्वैत आदी जोडाक्षरवाली नावं तिथे गेल्यावर रोज एक नविन विनोद बनून जर्मन माणसांच्या तोंडातून बाहेर पडतात.

अर्थात जर्मनीतही 'यायला पाहिजे' म्हणून इंग्रजी आणि फ्रेंच शिकणारी तरुण मंडळी वाढू लागली आहेत. 'अमेरीकन स्टाईल' तरुण मंडळीत लोकप्रिय आहेच. काही फॅशन 'आ' वासायला लावतात. (त्या काय हो, हल्ली भारतातही 'आ' वासायला लावतातच.) केस रोज वेगळ्या रंगात रंगवणे, हनुवटी,भुवई,डोळ्याची बाजू कुठेही टोचून त्यात छोटासा चंदेरी गोळा अडकवणे,साधारण पंख पसरलेल्या पक्ष्याच्या आकाराचा टॅटू पाठीच्या खाली काढून लो वेस्ट जीन्स घालून तो दाखवणे, डोक्याला रंगीबेरंगी रुमाल बघितले की कळतं, हे तिथलं 'उमलतं तारुण्य' इ.इ. आहे.

इथे थोडी खटकलेली गोष्ट म्हणजे इतक्या छोट्याश्या जागी पाच वृद्धाश्रम आहेत. संध्याकाळच्या वेळी बरेच आजीआजोबा हातात हात घालून फिरायला निघतात. घरासमोरच एक वृद्धाश्रम आहे. शनिवार रविवार मुलं आपल्या आईवडिलांना भेटायला येतात. काही वेळा एखादी आजी एखाद्या आजोबांना व्हीलचेअर्सवरुन फिरायला घेऊन निघालेली दिसते. 'त्यांची संस्कृती. त्यांना असेल सोयीची.' म्हटलं तरी कुठेतरी पोटात गलबलतं. मग आठवतात आपल्या इकडले नातवंडांना बागेत फिरायला घेऊन आलेले आजोबे आणि आज्या.

नक्की काय हवं आहे आपल्याला? तेच कळत नाही. इथली संपन्नता,स्वच्छता,प्रगतता की मायभूमीतील गजबजाट, जिवंतपणा आणि संस्कृती?दोन्ही एकाच ठिकाणी मिळेल का?मिळवणं आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर आज उद्या नाही, पण एक दिवस नक्कीच मिळेल!

Limbutimbu
Monday, July 10, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चान्गल लिहिल आहे! अजुन येवु देत अनुभव तिकडचे! :-)

Nvgole
Monday, July 10, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा! अनु तू इकडे पण आलीस का?

तुझे इथे स्वागत असो!


Lopamudraa
Monday, July 10, 2006 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही एकाच ठिकाणी मिळेल का?मिळवणं आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर आज उद्या नाही, पण एक >>>...kharay.. apalyaach haatat aahe.!!!

Dineshvs
Monday, July 10, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर्मन लोकांच्या कलाकुसरीच्या कल्पना जरा वेगळ्या आहेत. त्यांच्या दागिन्यात वैगरे भौमितिक आकारच जास्त दिसतात, असे काहि निरिक्षणात आले का ?

Sampada_oke
Thursday, July 13, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, हल्ली जर्मनांमध्ये पूर्वेकडच्या देशांचे वेड डोक्यात भिनते आहे. म्हणून असेल बहुदा, पण इथे विविध रंगांचे, आकारांचे खडे असलेले दागिने, जरदोझी वर्क,एंब्रॉयडरी अशा हस्तकला असलेल्या वस्तूंची आवड वाढते आहे. त्यांना कॉटनच्या कपड्यांची सुद्धा आवड निर्माण होते आहे.
मात्र सोने, चांदी ई. चे दागिने तुम्ही म्हणता तसे भौमितिक आकारातच प्रामुख्याने आढळतात.


Mrdmahesh
Thursday, July 13, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर्मनी बद्दल बरंच ऐकायची इच्छा आहे... विशेषत: तिथल्या neo-natzi बद्दल.. तिथे भारतीयांना कसे वागवतात? तिथल्या संस्कृतीची आपल्या संस्कृतीशी (असतील तर काही) साम्ये.. तिथे भारताची प्रतिमा, त्यांच्या एकत्रीकरणानंतरचे पश्चिमेचे पूर्वेशी संबंध इ.
या सगळ्यावर काही लिहिले गेले तर उत्तम. भौगोलिक दृष्ट्या जर्मनी ( T.V. वर बघितलेला) सुंदर वाटला...
काही वर्षापूर्वी एका मराठी मासिकात जर्मनी बद्दल माहिती देणारी एक छोटीशी चौकट येत असे... त्यात जर्मनी मध्ये भारतीय संस्कृती, वेद, योग, अध्यात्म, आयुर्वेद इ. गोष्टींबद्दल आकर्षण आहे असे वाचले होते.. हे कितपत खरे आहे?? त्या चौकटी खाली एका एजन्सी चे नाव यायचे. (शकुंतला, चारू असेच काहीतरी नाव होते). तिथे भारताचा काही प्रभाव असावा असे वाटते कारण पुण्यात मी जे काही परदेशी पर्यटक पाहिले त्यात जर्मनच जास्त होते.
आणि आर्यवंशाबद्दल तिथे कोणी अजूनही बोलते का? त्यांचा इतिहास याबद्दल काय सांगतो? याबद्दल तिथला सामान्य माणूस काय म्हणतो?


Sampada_oke
Thursday, July 13, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, जर्मनीबद्दल माझे मत विचाराल तर मी म्हणेन, तुम्ही जितक्या मोकळ्या मनाने एखाद्या संस्कृतीजवळ जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हढे चांगले अनुभव तुम्हांला येतील. जर उगाच पूर्वग्रह दूषित नजरेने तुम्ही पाश्चिमात्य म्हणजे वाईटच असे समजाल तर कधीच काही चांगले पाहू अगर अनुभवू शकणार नाही.( तुम्ही, हे प्रातिनिधिक म्हणून वापरलेले संबोधन आहे, कृपया गैरसमज नसावा.)

आता हीच गोष्ट जर्मनांचे खाणे, पिणे, वागणे, बोलणे ह्या सगळ्याला लागू होते, कसे ते बघा.

निओ नाझींचा वावर इथे दिसतो, मात्र त्रास झाल्याचे अजून कोणा इतर भारतीयांच्या ऐकिवात नाही. त्यांचा स्वतंत्र पक्ष असून ते निवडणूक सुद्धा लढवतात, मात्र असे ऐकले आहे की पूर्व जर्मनीत त्यांचा प्रभाव जास्त आहे. ह्याला एक कारण म्हणजे, साधारण १९४५ ते १९९०, म्हणजे जरी बर्लिन भिंत १९८९ मध्ये पाडली गेली तरी, १९९० पर्यंत पूर्व आणि पश्चिम जर्मनी विभागलेले होते. पूर्व जर्मनी हा कम्युनिस्टांच्या नियंत्रणाखाली असल्याने पश्चिम जर्मनीपेक्षा मागासलेला होता. अजूनही केवळ बघून तुम्ही कोणता भाग पूर्व जर्मनीत होता हे ओळखू शकता. तर सांगायचा मुद्दा हा, की नाझींचा प्रभाव त्या भागांमध्ये जास्त आहे.

संस्कृतीमधील साम्ये आणि फ़रक हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो, मात्र एव्हढेच सांगते की अजूनही कुटुंबाला प्राधान्य दिले जाते, जसे शनिवार रविवार हे फ़क्त कुटुंबासाठी राखीव असतात. त्याच बरोबर
Live In Relationships चे प्रमाण सुद्धा बरेच जास्त आहे. थोडक्यात दोन्ही प्रकारची उदाहरणे समान प्रमाणात दिसतात.

मात्र भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना उत्सुकता आणि आदर दोन्ही असल्याचे आढळले. नीट माहिती करून घेतल्याशिवाय सहसा कोणी जर्मन टीका करताना अथवा कौतुक करताना दिसणार नाही. म्हणूनच जेव्हा एखादे प्रोजेक्ट जर्मन माणूस हातात घेतो, तेव्हा त्याने आधीच त्याबद्दलची पूर्ण माहिती जमा केल्याचे दिसते. आंधळेपणाने अथवा काहीही तयारी न करता मनात आले म्हणून काहीतरी केले, असे दिसत नाही. मग ते साधे फ़िरायला जाणे असो किंवा घर बदलणे असो अथवा शिक्षण असो. इथे प्लंबरच काय पण सेल्समन व्हायला सुद्धा ३ वर्षांचा अभ्यासक्रम असतो. जर एखाद्याला सुतार व्हायचे असेल तर त्याला एक परिक्षा द्यावी लागते, ज्यात त्याला लाकडाचा ओंडका दिला जातो तो तासून ठराविक मापाचा गोल बनवायचा असतो. जर तो हाताने तासून बनवू शकला तर त्याला ऍडमिशन मिळते, जराही कमी जास्त मापाचे झाले तर पुन्हा प्रयत्न करायचे. एखाद्या वर्षी जर जास्त आर्किटेक्ट कॉलेजांमधून पास होऊन बाहेर पडले तर त्या सर्वांना रोजगार मिळावा ह्यासाठी पुढच्या वर्षी आर्किटेक्चरच्या ऍडमिशन बंद ठेवल्या जातात.( राज्या राज्यानुसार कायद्यांमध्ये फ़रक आहे.)

जर्मनी त्याच्या टापटीपीसाठी आणि स्वच्छतेसाठी सर्व युरोपात प्रसिद्ध आहे. निसर्गाची आवड सर्व लोकांना आहे, प्रत्येक गाव संपल्यावर एखादे घनदाट जंगल हमखास आढळते. प्रत्येक रुतुनुसार विविध झाडे लावण्याची इथे पद्धत आहे. गावागावांत सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची काळजी तिथली म्युनिसिपल कॉर्पोरेशन घेते.

जर्मनांच्या नीटनेटकेपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या पार पडलेला फ़ूटबॉल वर्ल्डकप. ऑक्टोबर २००५ मध्येच १ महिन्याच्या वर्ल्डकपचा आराखडा तयार होता. प्रत्येक गावात कोणती टीम राहील, त्यांचा प्रवास कुठून कसा होईल, सार्वजनिक ठिकाणी मोठे स्क्रीन्स लावून मॅच दाखवण्यासाठीचे आवश्यक
infra structure कसे असावे ह्याची कल्पना सर्व संबंधितांना दिली गेली होती. गेले १-१.५ वर्षे इथले पोलीस, मोठ्या दुकानांमधले सेल्समन ईंग्रजीचे धडे घेत होते. जेव्हा सामान्य नागरिकांना एका सर्व्हे मध्ये विचारण्यात आले की ह्या सामन्यांदरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता वाटते का? तर केवळ १३% लोकांनी होकारार्थी उत्तर दिले होते. ह्यात जनतेचा पोलिस यंत्रणेवरचा विश्वास दिसून येतो.

जर्मनांना त्यांच्या भाषेबद्दल अमाप प्रेम आहे. म्हणून जर एखाद्या
foreignerने जर्मनमधून संभाषण सुरु केले तर त्यांना अतिशय कौतुक वाटते. का तर, त्यांच्या मते जर्मन भाषा ही शिकायला कठीण आहे. उलट एखाद्या भाषेला जेव्हढे अधिक नियम तेव्हढी ती शिकायला सोपी, असे माझे स्वतःचे मत आहे. समजा दोन भारतीय एकमेकांशी ईंग्रजीमधून बोलताना त्यांना दिसले तर प्रचंड आश्चर्य वाटते. लगेच विचारणा होते, तुम्ही मातृभाषेत का नाही बोलत? मग नेहमी समजावून सांगावे लागते, इतकी राज्ये, इतक्या विविध भाषा. म्हणून ईंग्रजीचाच वापर कसा अधिक केला जातो ई. ई. मात्र आपल्या संस्कृतीबद्दल, देशाबद्दल, परंपरांबद्दल, सणांबद्दल जर आपण उत्तरे देऊ शकलो नाही, तर मात्र त्यांच्या नजरेत आपली प्रतिमा डागाळलीच म्हणून समजा.

आयुर्वेद, योग, वेद ह्यांची क्रेझ बरीच आहे. पण योग्य माहिती मिळवण्यासाठी धडपड करणारे बरेच सापडतात. कोणतेही शास्त्र योग्य माहितीशिवाय आचरणात आणायचे नाही, ही खूणगाठ बांधूनच ते नवनवीन गोष्टी शिकतात.

आर्यवंशाबद्दल मात्र कोणीही बोलताना दिसत नाही. हिटलर हा शब्द उच्चारायला इथे बंदी आहे. इतकेच काय, शुभ म्हणून स्वस्तिक जर घरात लावलेत तर एकदा आलेला पाहुणा परत येणार नाहीच म्हणून समजा.

मला आलेले अनुभव हे असे आहेत, काहींना वेगळे सुद्धा येत असतील, पण मी म्हणेन, आपल्या भारताबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल योग्य माहिती देऊन त्यांचे अज्ञान दूर करणे हे आपले काम. कारण प्रत्येक भारतीय हा पूर्ण भारताचा प्रतिनिधी म्हणून वावरत असतो. प्रत्येक संस्कृतीमधले चांगले घ्यावे, या मताची मी आहे. उगाच दुराग्रहाने सगळे गोरे वाईटच असे ठरवून वागू नये, हे सांगण्यासाठी एव्हढा प्रपंच.:-)


Dineshvs
Thursday, July 13, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, मी जर्मनीला गेलो होतो तेंव्हा, त्या देशात चित्रपटनिर्मिती खास उल्लेखनीय नव्हती. आताहि फारसे काहि वाचायला मिळत नाही.
याबाबतीत काय परिस्थिती आहे ? नाटक, संगीत ऑपेरा वैगरे ?


Vinaydesai
Thursday, July 13, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

unfortunately , जर्मनीमध्ये चित्रपट आणि TV कार्यक्रमांची निर्मीती फारशी नाहीच आहे. त्यांची Dubbing Industry फार पुढारलेली असावी. कार्यक्रम अजिबात नसतात असं नाही, पण बहुतेक वेळा अमेरिकन चित्रपट डब करून दाखवले जातात.

काही वर्ष जर्मनीत राहिल्यानंतर माझी बायको माझ्याबरोबर अमेरिकेला आली, आणि TV वर Bill Cosby ला बघून म्हणते, 'अरे, हा बघ English बोलतोय'...

खरं तर मी सहा वर्षं जर्मनीत होतो, आणि लिहायला गेलो तर भरपूर लिहिता येईल, पण मूड लागत नाही.. :-(


Storvi
Thursday, July 13, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय मागे ( अनेक वर्षांपुर्वी ) Berlin wall पाडली तेंव्हाचे वर्णन वाचल्याचे आठवतय... तुम्हीच लिहिले होते ना ते?

Varadakanitkar
Thursday, July 13, 2006 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा खूप छान वाटलं. अजुन लिही ना. तिथे Universities कशा असतात. तिथे bunglows जास्तं असतात की buildings ? मला खूप आवडतं असं वाचायला.

Ameyadeshpande
Friday, July 14, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय सध्या मी तुमचं मॉरिशस वाचतोय (जरा रस घेत घेत वाचतोय) तोपर्यंत तुम्ही जर्मनी घ्याच जरा म्हणजे हातातलं संपेस्तोवर जर्मनीही मिळेल वाचायला :-)
संपदा, अजून लिही ना...


Dineshvs
Friday, July 14, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय युरपमधे निर्माण केलेल्या बहुतेक फ़िल्म्स ना एक ज्यादा ट्रॅक ठेवलेला असतो. त्या त्या देशातल्या भाषेत ते डब केलेले असतात. याच ट्रॅकचा फायदा घेऊन पुर्वी अनधिकृतरित्या ईंग्लिश सिनेमे हिंदीत डब व्हायचे. मेकॅनोज गोल्ड हा मस्तानाका सोना, नावाने आला होता आणि नॉट नाऊ डार्लिंग हा, नही नही अभी नही, अभी करो ईंतजार नावाने.
पुढे भारतीय मार्केट बघता ते अधिकृतरित्या डब होवु लागले.


Sampada_oke
Friday, July 14, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, तुमचं`परदेसाई`सध्या वाचतेय. ते वाचूनच मला लिहायची हुक्की आली बहुदा. नाहीतर इतके दिवस लिही लिही म्हणून सांगून लोकं कंटाळली.:-) तुम्ही तर ६ वर्षे जर्मनीत राहिला आहात, मग आवर्जून लिहाच. माझे तर फ़क्त ३ वर्षातले हे अनुभव आहेत.

दिनेशदा, इथल्या टी.व्ही. सिरियल्स ह्या बहुतांशी डब केलेल्या असतात. इतकेच काय, सर्व हॉलिवूड चित्रपट सुद्धा डबच केलेले असतात. म्हणून काहीवेळा अशी मजा होते की, एखादा हॉलिवूडपट आवडतो. पण ईंग्रजीमधून बघायचा झाला तर व्हीडिओ लायब्ररीमध्ये काय नावाने शोधायचा प्रश्न पडतो. कारण सिनेमाच्या नावापासून सर्व भाषांतरित केलेले असते.:-) विनय यांनी सांगितलेला किस्सा सगळ्यांच्याच बाबतीत घडतो.

आपल्या भारतातील एकता कपूरच्या मालिकांचा घातला जाणारा रतीब पाहता, इथली टीव्ही सृष्टी किती मर्यादित आहे हे जाणवते. मात्र आता इथेही डेली सोप्सचे प्रमाण वाढतेय. त्यातल्या त्यात टीव्ही शेफ़(कुक) ही संकल्पना बरीच पुढारलेली वाटते. प्रत्येक चॅनेलचा स्वतःचा असा सेलेब्रिटी शेफ़ (कुक) आहे. सर्वजण तितकेच लोकप्रिय आहेत. इतकेच काय, दर शनिवारी सर्व कुक्स एकत्र येऊन प्रत्येकजण एक एक नवीन पदार्थ करतो. त्यातील मजा वेगळीच आहे. ( शेफ़ हा शब्द भारतात रूढ असला तरी जर्मनमध्ये त्याचा अर्थ बॉस असल्याने माझ्या लिखाणात कुक हा शब्द येतो आहे. :-))

पुन्हा एकदा डबिंगबद्दल. इथे बॉलिवूड सिनेमांची सुरुवात झाली
K3G पासून. ३.४५ तास शांतपणे बसून लोकांनी हा सिनेमा टीव्हीवर पाहिला. तो त्यांना इतका आवडला की त्याचे पुन्हा मोठ्या पडद्यावर स्क्रीनींग झाले. शाहरुख खानचे जर्मन चाहते, ह्याच सिनेमापासून निर्माण झाले. मग मोहोब्बतें, कल हो ना हो, कुछ कुछ होता है असे शाहरुखचे सर्व सिनेमे दाखवून झाले आहेत. ह्या सर्व डब सिनेमांमधील शाहरुखला ज्या जर्मन माणसाने आवाज दिलाय, त्याला तोड नाही. जणू काही शाहरुखच जर्मन बोलतोय असे वाटते. आवाजातले चढ उतार, हसणे, रडणे अगदी शाहरूखच्या स्टाईलमध्ये हा कलाकार करतो. अमिताभचा आवाज मात्र तितका जमला नाहीये.

शाहरुखच्या वाढत्या लोकप्रियतेचे अजून एक द्योतक म्हणजे, सर्व एशियन शॉप्समधे शाहरुखची पोस्टर्स विकायला असतात. सतत नवीन पोस्टर्सची मागणी मुला मुलींकडून होत असते.

केवळ शाहरुखच्या सिनेमांवरच हे बॉलिवूड प्रेम थांबत नाही, तर धूम, साथिया, कहो ना प्यार है, हम तुम, हे सर्व सिनेमे डब करून पुन्हा पुन्हा दाखवले गेले आहेत.

या सिनेमांधील लग्न समारंभ पाहून, असे एखादे लग्न अटेंड करायला भारतात जायला तयार असणारे सुद्धा लोकं आहेत.

आत्ता घडलेला एक किस्सा सांगते. आमचा एक जर्मन मित्र भारतातून परत आला, येताना त्याने विमानात `इक्बाल` पाहिला, त्याला तो सिनेमा पाहताना रडू कोसळले, पण त्याला तो इतका आवडला की आम्हांला त्याने इक्बालची सीडी मागवून घ्यायला सांगितलेय. ह्या सिनेमातील विषयावर तो एक तास आमच्याशी बोलत होता.

थोडक्यात मतितार्थ असा, भारत म्हंटले की बॉलिवूड असे समीकरण आता रुढ होते आहे.

वरदा, इथली शिक्षणपद्धती आणि राहणीमान याविषयी नंतर वर्णन करते.


Mi_anu
Friday, July 14, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर्मनीबद्दलचे बरेच अनुभव प्रतिसादात छान सांगितले आहेत. अगदी असेच आहे माझ्या मनात पण.

Mrdmahesh
Friday, July 14, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा,
खूपच छान लिहिलेस.. अजून माहिती येऊ देत. तिथे मराठी मंडळे नक्कीच असतील.. आपले धार्मिक कार्यक्रम (सत्यनारायणा सारखे :-)) व्यवस्थित करता येतात का? भारतीय लोक सण कसे साजरे करतात (गणेशोत्सव)? पूर्व, पश्चिमेत किती दरी आहे? (ती नक्कीच कमी झालेली असेल..). तिथे भारतीय विद्यार्थ्यांना शिकण्याच्या संधी किती? भारतीय संगणक तज्ज्ञांना तिथे किती मागणी आहे? एकूणच नोकरीच्या संधी भारतीय लोकांना किती आहेत?
खरंतर अनेक प्रवासवर्णने वाचलीत पण ती सर्व अमेरिका किंवा इंग्लंड बद्दलच होती. जर्मनीतले प्रवासवर्णन कधी वाचण्यात आलेच नाही. त्यामुळे त्या देशाची माहिती अशी जवळ जवळ नाहीच... आदरयुक्त आकर्षण मात्र आहे..
अजून माहिती येऊ देत... :-)


Bee
Friday, July 14, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह किती छान लेख आहे हा.. आणि संपदानेही खूप छान लिहिले आहे. मज्जा आली.. माहिती मिळाली..

विनय, तुमचा बर्लिनवरचा लेख अवश्य टाका कुठेतरी.. मला तुमचे लिखान खूप आवडते.


Limbutimbu
Friday, July 14, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्पदा, मस्त लिहिल हेस, अजुन येवु दे!
तेवढीच ज्ञानात भर पडती हे
सगळ सगळ वर्णन कर
विनय, तू पण लिही की! :-)
V&C वर मेन्दू शीणला की हे वाचून खूप बरे वाटते!
:-)

Moodi
Friday, July 14, 2006 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु सुरुवात छान केलीस, त्यामुळे संपदाने पण मौलीक अन सुरेख भर घातली. संपदा अजून लिही वेळ मिळेल तसे.

जर्मन लोकांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते दर्जा अन गुणवत्ता याबाबत कधीच तडजोड करीत नाहीत. आज जगात त्यांचे नाव आहे ते त्यामुळेच. अन तू म्हणालीस ना की काम ते हातात घेतात, त्याची पूर्ण माहिती मिळवतात ते यामुळेच, अतिशय कष्टाळू अन मेहेनती.

मी इथे आल्यावर घरात देवामागे भिंतीवर कुंकवाने छोटे स्वस्तिक काढले. माझ्या नवर्‍याचा युगोस्लाव्हियन बॉस घरी जेव्हा आला तेव्हा त्याने ते पाहिले अन जोरात ओरडला स्वस्तिक, स्वस्तिक, तुम्ही हिटलरपासुन चोरलेत ना ते?( हे सगळे चेष्टेतच म्हणाला अन अजूनही तसेच चिडवतो) मी म्हटले की हे आमचे शुभ चिन्ह, हीच संस्कृती.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators